कॉलेजच्या गेट मधून चौघे बाहेर पडले. पुण्यासारख्या शहरात अडमिशन झालं पण कसला उत्साह कोणाच्या चेहऱ्यावर दिसेना. चौघेही उदास चालले होते.. वैभव म्हणाला-
"आपल्याला नाही आवडलं बुवा कॉलेज"
"अब इतने टक्के मी इतनाइच मिलेंगा, पन्नास टक्क्यात अजून काय पाहिजे"
"ते आहे रे पण 'पत्रे' काही दिसेना"
"पत्रे??? अरे काय म्युनीसिपालीटीचं कॉलेज आहे काय"
"अरे पत्रे म्हंजे पोरी रे...एकही आयटम नाही साला..." बाजूला चाललेल्या दोन वेण्या घातलेल्या नाकाचा शेंडा ओठांना मिठी मारण्या इतपत खाली आलेला- अशा पोरीकडे पाहत वैभव म्हणाला
"लेका तुला रे कधी पोरी आवडायला लागल्या. अरे तू तर एवढा चिकना दिसतो, तू पोरांपासूनच सावध रहा" - तुषार वैभव कडे पाहत म्हणाला...
तेवढ्यात सुश्या म्हणाला- "सध्या तर तू ह्या तुष्या पासूनच सावध रहा"
"जळता रे तुम्ही माझ्यावर जळता, नाहीतरी तुझं आयुष्य बस मध्ये गर्दी बघून खेटण्यातच गेला"--तावातावात वैभव म्हणाला
"नाही रे त्याने गावात उसाचे मळे लय गाजवले... रात्रीचा पण बॅटऱ्या घेऊन जायचा"
"काय बोलतो राव, तिथे तर भल्याभल्यांच्या बॅटऱ्या बंद पडतात"- सुश्या चिडवण्याच्या स्वरात म्हणाला
बराच वेळ एकमेकांची खेचण्यात गेल्यावर दिन्या मूळ मुद्द्यावर आला-
"अडमिशन तर झालं पण रूमचं काय ??"
"हा ना राव, पुण्यात घर घ्यायचं म्हणजे अख्खं खानदान विकावं लागतंय... असं कुणीतरी म्हणायचं...."- तुष्या
"तुला कोण विकत घेणार तुष्या?? काळी म्हैस पण दुध देती तू नुसताच काळा...."
तेवढ्यात विषय पुन्हा भरकटतोय पाहून सुश्या म्हणाला-"अरे मी कॉलेजच्या शिपायाला विचारलेलं, तो म्हणाला आहे रूम, नंबर पण घेतलाय मी"
"एकच नंबर... लय भारी काम केलस..."
"बस का!!! आपण भारीच काम करतो"
दंड मागे घेऊन आणि छाती पुढे ताणून सुश्या म्हणाला. छाती ताणून यासाठी म्हणलं कारण तो एवढा लुकडा कि त्याची छाती कितीही हवा भरली तरी काही फुगायचा नाव घ्यायची नाही... निदान या जन्मात तरी
"तू भारीच काम करतो रे. तुझ्या आई बापानेच फक्त एक वाईट काम केलं" -वैभव अगदी शांत सुरात म्हणाला
त्यावर सुश्या "काय?" म्हणणार तेवढ्यात त्यालाही आपली 'व्हाया' आई बाप उडवलेली कळली. तो शांतच बसला. मग चिडून म्हणाला- "चला डायरेक्ट रूमच पाहायला जाऊ"
मग ते त्या दिशेने चालू लागतात
"अरे तुष्या तुझा भाऊ येणार होता ना पैसे घेऊन रूम चे"
"हो आलाय ना... केलाय मी फोन त्याला पत्ता पण सांगितला. आलाच असेल. हे काय समोरच आहे. फोन वर बोलतोय बघ"
तुष्याचा भाऊ भलताच गोरा, उंच, 'मजबूत बांधा' या प्रकारात मोडणारा. तुष्यात अन त्याच्यात काहीच साम्य नाही
दिन्या तुष्याच्या त्या भावाचं लांबूनच निरीक्षण करत एकदा दिन्याकडे बघायचा एकदा भावाकडे, असं दोन-चार वेळा केल्यावर विश्वास न बसल्यासारखा तो म्हणाला-
"तुष्या हा तुझा भाऊ??"
"हो"
"सख्खा???"
"अरे हो रे...."
"म्हणजे तुझ्याच आई बापाचा पोरगा??" चेहऱ्यावरचे संशयाचे भाव वाढतच चाललेले
"अरे हो बाबा"
"लेका मग तू नक्की कुणाचा????" दिन्याच्या या बोलण्यावर तर सगळे पोट धरून हसायला लागले.....तुष्या मात्र दुध देणाऱ्या ऐवजी मारक्या म्हशी सारखा पाहायला लागला.
मग सगळे रूम पाशी आले. तुष्या त्याच्या भावाकडे पैसे घ्यायला गेला बाकीचे कॉलेजचा जो शिपाई रूम दाखवणार होता त्याच्याशी बोलत उभे राहिले.
तुष्याचा भाऊ अजून फोन वरच बोलत होता, त्यामुळे खाणा-खुणा करूनच तुष्या ने पैसे मागितले. तर त्याने ५०० रुपयेच तुष्याच्या हातात टेकवले... तुष्या त्या ५०० च्या नोटेकडे पाहतच राहिला. तशीच तळहातावर घेऊन तो या तिघांमध्ये आला...
त्याचा असा चेहरा पाहून वैभव म्हणाला-"काय झालं रे?? "
असा म्हणत त्याच्या हाताकडे पाहिलं तर त्याचाही चेहरा फोटो काढण्याजोगा झाला.
"अरे तुझ्या दादाला म्हणावं, राहायला आलोय इथे, लॉज नाही बुक केलाय..."
"फोन वर बोलताना मध्ये बोललं कि ते चिडतय .....म्हणजे दादा रागावतो"
शेवटी चोघेही वैतागून रूम पाहायला त्या शिपायाच्या मागे जायला लागले. तिथे एवढी गल्ली-बोळ कि तो शिपाई कुठे कसा गेला कोणाला कळलं नाही... ह्यांनी आवाज दिला तर हा मागेच उडी टाकून उभा
"अहो इकडून कुठून"
तो तिथल्याच भिंतीवर तोंडातल्या फवाऱ्याने रंगकाम करत म्हणाला-
"इथून शॉटकट हाय"
चौघांनी त्या भिंतीवर नुकत्याच काढण्यात आलेल्या चित्राकडे आश्चर्याने पाहत माना हलवल्या आणि त्याच्या मागोमाग चालू लागले...
शेवटी एक एवढी अरुंद बोळ आली कि हे चौघे पाहूनच थबकले. ती एवढी छोटी होती कि जाणाऱ्यांचे हात बाजूच्या भिंतीचे मुके घेतल्याशिवाय जाणारच नाही . आणि भिंती तर एवढ्या खरबडीत कि काळ्या माणसाचे हात गोरे व्हायचे अन गोऱ्याचे घासून लाल...
ह्यांनी कशी बशी ती खिंड पार केली. तर पुढे पुन्हा आडवी भिंत... अरेच्चा कुठय रूम... डावीकडे पाहतोय तर एक छोटा दरवाजा अन आत जाऊन हा शिपाई ऐटीत तिथल्या कॉटवर जाऊन बसलाय.. एक पाय दुसऱ्या पायाच्या गुडघ्यावर ठेऊन तळवा हलवत म्हणाला--
"काय कशी आहे रूम??"
हे चोघे आत गेले अन ते आश्चर्याने रूम नामक ऐतिहासिक खिंडार पाहू लागले...
तो शिपाई पुढे बोलला-
"मग मी म्हणलं ना मी लय कामाचा माणूस हाये... आर, लाथ मारण तिथं पाणी काढण "
"इथ लाथ मारलं तर पोपडे निघातायेत" तुष्या कुजबुजला
त्या रूमची अवस्था पाहून यांना हसावं की रडावं कळेना... आडवी लांबलचक रूम आणि उभी तेवढीच रुंद, त्यामुळे तिथे ज्या दोन कॉट टाकल्या होत्या त्या उभ्याच टाकल्या होत्या, आडव्या टाकल्या असत्या तर एकमेकांना चिटकून तो डबल बेडच झाला असता.
त्यात एवढ्या उन्हाचही तिथे काळाकुट्ट अंधार, दिन्याचा हात लाईट लावायला स्वित्च कडे गेला, त्याने तसच ट्यूब कडे पाहिलं अन त्याचा लाईट लावायचा विचार बदलला. कारण ट्यूब धुळीने एवढी माखली होती कि उजेड सुद्धा काळाच पडतो कि काय याची त्याला भीती.
मग बाकी रूम मध्ये पाहायला काही उरलच नव्हता, एक पंखा होता तो चालू केला तर एखादं कुत्रं अनोळखी माणूस पाहून गुरगुराव तशा आवाजात तो चालू झाला, मग हळू हळू जसा स्पीड वाढायला लागला तसं ते कुत्रं रडायला लागलं, मग पंखा एक वरच असला जोरात फिरायला लागला की बासच. मग तड-तड आवाज, हे दिन्या घाबरलं, आता पंखा एकतर रूम घेऊन उडणार किंवा फुसका बार निघाल्यासारखा आपल्या डोक्यावर कोसळणार, असच वाटायला लागलं, त्याने पहिल्यांदा ते हेलीकॉप्तर बंद केलं.
त्या पंख्याचा आवाज ऐकून, प्रेयसी ने 'बचाव बचाव' हाक मारल्यासारखा एक उंदीर टपकन कुठून आला अन यांच्या पायातून शिरून सगळ्यांना नाचवून गेला, सुश्या घाबरून त्या शिपायाला म्हणाला
"हे काय हो? "
"हितं पलीकडं गणपतीचं देऊळ हाये ना, मग असतात उंदरा हितं, भिऊ नका काही करत न्हायी" असं म्हणत एका भिंतीच्या दिशेने हात जोडून त्या शिपायाने नमस्कार केला.
हे चौघे मात्र एकमेकांच्या तोंडाकडे पाहायला लागले, पहिला कोण नमस्कार करतय.
दिन्या म्हणाला-"तरी नशीब इथे शंकराचं मंदिर नाही, नाहीतर फुसकन नाग यायचा कोठून तरी "
चौघांनी खाणा-खुनांनीच एकमेकांना रूम नापसंत असल्याचं दर्शवलं, नंतर फोन करून सांगतो असं म्हणून तिथून काढता पाय घेतला, बाहेर येताना मात्र भिंतीला न घासता आलेल्याच त्यांनाच कौतुक वाटलं
बाहेर येऊन पाहतो तर तुष्याचा भाऊ अजून फोन वरच बोलतोय. न राहवून दिन्या पुन्हा तुष्याला म्हणाला-
"तुष्या, तुझ्या भावाला गर्लफ्रेंड आहे का रे, कधीचा फोन वर लागलाय"
"येड्या लग्न झालय त्याचं, एक मुलगा पण आहे त्याला"
"काय बोलतो?? अरे तो तर केवढा तरुण दिसतो, तुष्या खरच तू नक्की कोणाचा??"
आता मात्र तुष्याचा कंट्रोल सुटला त्याने मुठ आवळून दिन्याच्या पाठीत खवली, तशातही दिन्या पाठ चोळत हसतच राहिला,
त्यानंतर ह्यांनी बऱ्याच ठिकाणी रूम शोधल्या पण प्रत्येक रूम मध्ये काही ना काही व्यंग निघायचं, एखादी चांगली भेटली तर ह्यांचा उत्साह चेहऱ्यावर इतका ओसंडून वाहायचा की ब्रोकर मुद्दाम जागीच पैसे वाढवून सांगायचा. तेवढ्या १-२ दिवसात त्यांनी पुण्यातल्या बऱ्याचशा ब्रोकरशी संबंध प्रस्थापित करून झाले.
मग एखादा माणूस वय सरत आल्यावर आता मिळेल त्या पोरीशी लग्न करायचं असा ठरवतो तसा त्यांनी आता मिळेल ती रूम फायनल करायचं ठरवलं
आता हि शेवटची रूम, जशी असेल तशी चालेल, म्हणून ते आता एम.आय.टी जवळ एक रूम पाहायला जातात. अपार्टमेंट तर चांगली होती, शिवाय ग्राउंड फ्लोरचा फ्लाट...
सुश्या बेल वाजवतो, पण कोणी दार उघडत नाही, पुन्हा वाजवतो.
"अरे बेल बंद आहे येड्या"
"झालं!!! इथून सुरुवात, दारातच हे, तर घरात काय"
मग ते कडी वाजवतात तर दार उघडच, अन ते लोटलं जातं. आत एक माणूस उघडा बंब एका खुर्चीत बसलेला. तो एवढा जाडा कि त्याच्या पोटाच्या घड्या खुर्चीच्या हात ठेवण्याच्या दांड्यावर लोळत पडल्या होत्या आणि ह्याचे हात त्या गादीवर लोळत पडले होते, कसलं तरी मासिक पोटावर दोन घडींच्या खाचात रोवून वाचत बसला होता. त्यावर दिन्या म्हणतो
"हा खुर्चीत बसला नसणार"
"का रे???"
"अरे त्याला खुर्चीत बसताच येणार नाही, सुताराने ह्याच्या अंगाभोवती खुर्ची बनवली असणार"
त्या माणसाला ऐकू जाणार नाही अशा आवाजात त्यांनी हसून घेतलं....तेवढ्यात तो माणूस म्हणाला
"हम्म , कोण पाहिजे??"
"रूम पाहायला आलो होतो"
"हं या आत, ए गणेश ह्यांना रूम दाखव रे " आतल्या दिशेने आवाज देत तो माणूस म्हणाला .
तसे हे चौघे आशेने आतल्या खोलीकडे पाहायला लागले, तेथून एक त्यांच्याच वयाचा मुलगा आला, मग हे आत गेले....
"कोणती रूम आहे??"
"हीच आहे की " तो मुलगा म्हणाला
हीच रूम म्हणाल्यावर चौघांच्या नजरा चारही बाजूंना फिरू लागल्या. आणि त्यांना पहिल्याच नजरेत रूम आवडली.. आतल्या खोलीचं रंगाचं काम चालू होतं, मस्त गुलाबी रंग देत होते...
तो रूम दाखवणारा मुलगा कम्प्लीट सेल्समन होता, तो रूमची अशी तारीफ करायला लागला की रूम न पाहताच कोणीही घेईल.
"मुद्दामच गुलाबी रंग द्यायला लावला मी मालकाला, म्हणलं तरुण मुले येणार म्हणजे गुलाबी कसा अ??? हा हा हा " असं वेड्यासारखं एकटच हसत वैभवच्या पोटात कोपराने ढोसायला लागला, ते चौघे एकमेकांकडे पाहून हसले...
रूम खरच छान होती, फक्त एकच अडचण होती, आतल्या खोलीची सिलिंग खूपच खाली होती, म्हणजे हातात कापड घेऊन आळस दिला तरी सिलिंग पुसलं जाईल
तर दिन्या म्हणाला -"मित्रा रूम तर मस्त आहे, रंग पण देताहेत, तेवढं हे सिलिंग वर ढकललं तर बर होईल"
"आम्ही ढकलू हो, पण ते वरच्या मजल्यावरचे ऐकायचे नाहीत हा हा हा !!!" असं म्हणून पुन्हा तसाच हसला.. या वेळी मात्र वैभव ने काढता 'पोट' घेतला
तरी या चौघांनी रूम पसंत केली, जाऊदे एकच खोली तशी आहे ना?? घेऊ बघून. पण तरीही ते त्या मुलाला पिळत होते, आणि तो आपला वाक्चातुर्य दाखवल्याशिवाय राहत नव्हता... आज तर रूम विकून मालकाला खुशच करायचा असा त्याचा निर्धारच होता जणू
सगळी रूम दाखवून झाल्यावर तो त्यांना 'बालकनी' मधे घेऊन गेला. अन मस्तपैकी त्याच्या कट्ट्यावर वर उडी टाकून बसला...बहुतेक तो सांगत होतं इथे असं सुद्धा बसता येतं
"बघा कसली मस्त हवा आहे इथ. आणि ह्या रूम चा एक फायदा तुम्हाला सांगतो" चारही बाजूंना चोरट्या नजरेनं पाहून काही सिक्रेट सांगावं तशा आवाजात तो म्हणाला
"इथ राहिलात ना तुम्हाला हमखास पोरी पटणार, हे काय इथूनच एम.आय.टी च्या पोरी जात असतात, अगग!!! काय आयटम असतात सांगू.... " हे वाक्य तर त्याने जीभ वगैरे चावून सांगितलं.. काय पोरगा आहे राव . रूम ची वैशिष्ट सांगताना काय सांगतोय तर इथे पोरी पटतील.
नंतर बराच वेळ तो मुलगा बोलत राहिला अन हे ऐकत राहिले... शेवटी रूम पसंत करून, सगळे व्यवहार करून हे तिथे राहायला देखील आले, आणि हो ह्या वेळी मात्र तुष्याने मुद्दामच त्याच्या भावाला बोलावलं नाही....
चांगलं आहे. अजून लिहा......
चांगलं आहे. अजून लिहा......
छान फुलवलीत.. अजून येऊद्या
छान फुलवलीत.. अजून येऊद्या असेच म्हणेन..
छान आहे. पण क्रमशः आहे का?
छान आहे.
पण क्रमशः आहे का?
छान आहे. पण क्रमशः आहे का? >>
छान आहे.
पण क्रमशः आहे का? >> +१