आइए. 'शॉक' फर्माइए..!

Submitted by A M I T on 13 March, 2012 - 00:19

आग, वीज आणि पाणी या तीन गोष्टींशी माणसाने कधीही खेळू नये.'
जन्माला आल्यापासून समजायला लागल्यानंतर आमच्या घरातील वडीलधार्‍या मंडळींनी आम्हाला पोलिओनंतर जर कुठले डोस पाजले असतील, तर ते हेच 'उपदेशाचे डोस'..!

आता अगदी भोवरा फिरवण्यापासून आमचा आवडता 'डॉक्टर डॉक्टर' (या खेळात शेजारची सुमी पेशंट बनण्यास तयार झाल्यावर गोपाळ आणि माझ्यात डॉक्टर बनण्यासाठी प्रसंगी 'कुस्ती' नावाचा तिसराच खेळ होऊन जायचा.) इथपर्यंत इतके नाना प्रकारचे खेळ असताना आम्ही आग, वीज आणि पाण्याशी का खेळावे? हे समजायला मार्ग नव्हता.
आग आणि पाण्याचं ठाऊक नाही, पण वीज आमच्या गावात गेली कित्येक वर्षे एक खेळ नियमित खेळत असते. त्या खेळाचं नाव... 'लपंडाव'..!

अखेर खेल खेल में तो प्रसंग आलाच.

रविवारची एक सकाळ. उद्या म्हणजे सोमवारी ऑफिसात सुझीचा वाढदिवस असल्यामुळे रोजच्या चुरगाळलेल्या कपड्यांना इस्त्रीच्या उष्ण पोटाखालून चिरडून काढणे गरजेचे होते. त्यानुसार उजव्या कोपर्‍यात आपल्या पाठीवर असंख्य वस्तू बाळगलेल्या एका टेबलावरील ओझे हलके करीत ओढत - ओढत नेऊन तो टेबल इलेक्ट्रिक बोर्ड असलेल्या भिंतीला चिकटवला आणि त्यावर शुभ्र चादर पसरून त्याचा यथोचित सन्मान केला.
इस्त्रीची पिन इलेक्ट्रिक बोर्डात जोडून बटणाची मान खाली झुकवली आणि काही क्षणांत इस्त्री शर्टात झुरळासारखी इकडे-तिकडे फिरू लागली.

मी स्वप्नांत तो कडक इस्त्रीचा शर्ट घालून सुझीला बुके देणारच होतो, इतक्यात...बायकोने एक साडी आणून टेबलवर आपटली.
त्या बुकेतली फुलं बायकोच्या साडीवर कशी काय बुवा सांडली? या विचारात मी पडलो.
"अहो जरा एवढी साडीपण इस्त्री करा." केसांना साईबाबांसारखा टॉवेल गुंडाळलेली सौ. हातातील जळती अगरबत्ती हवेत फिरवत म्हणाली.
मी प्रश्नार्थक नजरेने निव्वळ तिच्याकडे पाहिले.
"संध्याकाळी भगिनी मंडळात जायचंय." ती अगरबत्ती मला टेकणारच होती.
"अगं मग इस्त्रीवाल्याकडे द्यायची होतीस ना..!" इस्त्री आणि मी सारखेच गरम झालो होतो.
"मढं बसू दे त्या इस्त्रीवाल्याचं..! मागच्या महिन्यात नाही का आपण शालूच्या लग्नाला गेलो होतो?"
"हो. हो. गेलो होतो खरे." पण इस्त्रीवाल्याचं मढं आणि शालूचं लग्न यांचा संबंध मला कळेना.
मी तिथे जेवताना काजू समजून लसूण खाल्ला होता, हे मला चटकन आठवलं. सौ. त्याचीच तर आठवण करून देत नसावी? असा मला संशय आला.
"तेव्हा मी त्या इस्त्रीवाल्याकडे तुमच्या शर्टला मॅचिंग असलेली साडी इस्त्री करायला दिली होती. तर त्या गाढवानं त्या साडीला किचनमधल्या खिडकीच्या आकाराएवढं भगदाड पाडून आणलंन." अगरबत्तीच्या जळत्या टोकाइतके सौ. चे डोळे लाल झाले होते.

सौ. चा मुद्दा माझ्या लक्षात आला. मी तिच्या साडीला इस्त्री करून देण्यास तयार झालो. माझ्या शर्ट - पॅन्टची इस्त्री आटोपून मी साडी इस्त्री करू लागलो.

दहा-पंधरा मिनिटे झाली असतील.

'या जगात स्त्रीचा कधीच भरवसा नसतो', तेवढ्या वेळात माझ्या मनात हा एकमेव विचार चमकून गेला.

"अहो, हे काय?" सौ. च्या या वाक्याने माझी तंद्री भंग पावली.
"काय झालं?" मी जरा घाबरतच विचारले.
माझ्याकडून साडीवर दुसरी खिडकी तर तयार झाली नाही..!
"इतका वेळ झाला. अजून पदरच इस्त्री करताय..!"
मी एक क्षण साडीकडे पाहिले. पदरावरच्या जरतारीच्या नाचर्‍या मोराची चुरगाळलेली पिसे सरळ करण्यात इस्त्री मग्न होती.
मला आता कळलं, हल्लीच्या बायका शर्ट - पॅन्ट का घालतात ते..!
"अरेच्चा होय की..! आताशा पदरावरचा 'मोर'च हाय. खरी साडी अजून 'म्होर'च हाय." इस्त्रीसोबत आता मला फाल्तू कोट्या करण्याचादेखील मूड आला.

मी इस्त्रीस स्पर्श केला मात्र...
मला एकदम धक्का बसला. एखाद्याच्या गंजीत (काही सुशिक्षित लोकं जिला बनियन संबोधतात.) बर्फाचे तुकडे टाकल्यावर तो ज्या उत्साहाने सबंध शरीराची हालचाल करील, तशीच विचित्र हालचाल मी आता करीत होतो.
माझे केस निवडणुकीतल्या उमेदवारासारखे 'उभे' राहिले होते.
विजेच्या संपर्कात येऊन मला शॉक लागला होता.

एकूणच शॉक हा संपर्कजन्य रोग आहे, हे माझ्या चांगलेच लक्षात आले आणि जगात स्त्री आणि इस्त्री या दोन गोष्टींचा कधीच भरवसा नसतो, या निष्कर्षाप्रत मी पोहोचलो.
तेव्हापासून इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा मी धसकाच घेतला. साधं पंख्याचं बटण दाबायचं झालं तरी पायात चपला सरकवतो. याआधी मी केवळ विजेच्या बिलाची धास्ती घ्यायचो.

कोणतीच गोष्ट पोटात अधिक काळ न राहण्याची दैवी देणगी लाभलेल्या सौ.द्वारे माझं हे 'करंट अफेअर' संध्याकाळपर्यंत सबंध चाळीत पसरलं आणि मी एक 'शॉकीन माणूस' म्हणून प्रसिद्ध पावलो.
चाळीतील काही रणबीर कपूर प्रेमी तरुणांनी मला 'शॉकस्टार' ही पदवी बहाल केली.

त्या दिवशी सौ. भलतीच घाईत दिसत होती.
"अहो, ठक्कर मॉलमध्ये सेल लागलाय." एवढंच बोलून सौ. एव्हरी डे चे सेल टाकल्यासारखी पळतच गेली.
काय 'सेल'फिश बाई आहे..! अशी एक कोटी चटकन मला सुचली.
आज ही काय उचलून आणणार आहे? या प्रश्नानेच मी घामाघूम झालो. मागे तिने सँडलवर फ्री होते म्हणून माझ्यासाठी मौजांची जोडी आणली होती.
पण जेव्हा ती मॉलमधून परतली तेव्हा तिच्यासोबत एक सुंदर देखणी बाई होती. ती सुंदर देखणी बाई सौ. ची शाळेतली मैत्रीण होती आणि तिचा नुकताच आंतरजातीय विवाह झाला होता.
आमच्या घरातील पाहुणचार झोडून तिने आम्हा उभयतांना आपल्या घरी येण्याचे आमंत्रण दिले.

त्याप्रमाणे आम्ही उभयतां तिच्या घरी येऊन ठाकलो. सूक्ष्म निरीक्षणाअंती माझ्या असे लक्षात आले की, तिच्या नवर्‍याच्या डोक्यावरील केसांच्या तुलनेत माझ्या डोक्यावरील केसांची संख्या समाधानकारक होती. या आनंदात मी सौ. ने या खेपेला मॉलमधून इअरिंग्जच्यासोबत फ्री म्हणून आणलेल्या कंगव्याने केस विंचरले.
"यांना नॉन व्हेज चालेल ना?" सौ.च्या मैत्रिणीने अन'नॉन' नजरेने माझ्याकडे पाहत सौ. ला विचारले.
"नाही बाई. आमचे हे किनई शुद्ध 'शॉका'हारी आहेत." सौ. ने माझा परा'कोटी'चा अपमान केला. वर आपल्या दातांचं दर्शन देत यथेच्छ हसली.
सौ. माझ्यासारखं कोटी करायला शिकली होती, याचा मला आनंदच होता, पण तिने खुद्द माझ्यावरच कोटी केली, याचा राग त्या आनंदापेक्षा जरा जास्तच होता.

झाल्या प्रकाराने घरी गेल्यावर आमच्या दोघांत तुडुंब भांडण झालं आणि त्याची परिणती सौ.च्या माहेरी जाण्यात झाली. यावेळी मला दुसर्‍या प्रकारचा शॉक बसला.

मी प्रचंड दु:खी झालो. रात्री - अपरात्री निर्मनुष्य सडकांवर उदासवाणा भटकू लागलो. मला वेड लागलंय, असा स्वतःचा समज करून घेऊन आमच्या शेजारचे परांजपे मला कसलीही पूर्वसूचना न देता एका वेड्यांच्या रूग्णालयात घेऊन गेले.

आम्ही डॉ. च्या केबिनात प्रवेश केला तेव्हा डॉ. वेड्यासारखे हसताना आम्हाला दृष्टीस पडले. ते चांदोबातील विनोद वाचत होते, याचा उलगडा नंतर झाला. त्यांच्या समोरील टेबलावर DR. ASHOK अशा नावाची पाटी होती. मला मात्र त्या पाटीवरील ती अक्षरे A SHOCK अशी दिसू लागली.
नंतर तिथल्या एका अर्धवट कंपाउंडराने मला एका खोपटेवजा खोलीत नेले.
"आइए मेहरबान
लेटीए जानेजाँ
'शॉक' से दिजीए जी
इष्क की इम्तिहान" तिथल्या एका चादराच्छादीत कॉटकडे बोट दाखवत तो आपल्या भसाड्या आवाजात म्हणाला.
त्याच्या या गाण्यातील सूचक ओळीतून 'मी पुन्हा शॉकचा शिकार होणार आहे' हे मला कळून चुकले आणि त्याप्रमाणे माझ्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून हातापायाच्या बोटांवर मोजता येणार नाही इतक्या वेळा मला शॉक दिला.
मी बेशुद्ध पडलो.

शुद्धीवर आलो तेव्हा सौ. आणि तिच्या माहेरचा गोतावळा सुतकी चेहरे करून माझ्या कॉटभोवती गर्दी करून बसला होता.
सौ. चे डोळे रडून रडून उकडलेल्या बटाट्यासारखे सुजले होते.
"तुम्ही सगळे असे का बसलाय? ही काय शोकसभा आहे का?" परांजपेने तिथल्या जीवघेण्या शांततेचा भंग केला.
"मला वाट्टं परांजपे, ही शोकसभा नसून 'शॉक'सभा असावी." तशा प्रसंगीदेखील कोटी करण्याचा मोह मला अनावर झाला.
यावर उपस्थित मंडळी दिलखुलास हसली. त्यांना हसता येत होते, हा नवा शोध मला लागला.

मी आणि सौ. जेव्हा त्या खोपटेवजा खोलीतून बाहेर पडलो, तेव्हा मी एकवार वळून त्या खोलीकडे पाहिले. त्या खोलीच्या प्रवेशद्वारावर मोठ्या अक्षरांत लिहिले होते...
आइए. शॉक फर्माइए..!

* * *

हास्यगाऽऽरवा २०१२ मध्ये पुर्वप्रकाशित

http://kolaantudya.blogspot.in/

गुलमोहर: 

आणि काही क्षणांत इस्त्री शर्टात झुरळासारखी इकडे-तिकडे फिरू लागली.>> ईईईई... Proud

मस्त खुसखुशीत शॉक Happy

व्वा अमित,
मस्त लिहिलंयस.
मी तुला कोट्याधीश पदवी केव्हाच दिली होती.
वरच्या एका प्रतिसादात महेश या ज्येष्ठ मायबोलीकरांनी देखील दिली आहे.

मस्त लिहिलंय, पण इस्त्रीच्या प्रसंगांतली मजा पुढल्या दोन प्रसंगांत नाही आली. पहिल्या प्रसंगात वाक्यावाक्यातून हसू उतू जातंय.

@मित.. Rofl आणी सर्व हाहाहा च्या स्मायल्या अपुर्‍या पडल्या रे....
मस्त !!!!
टायटल पासून एंड पर्यन्त जबरदस्त!!!

अन'नॉन', 'शॉका'हारी , आताशा पदरावरचा 'मोर'च हाय. खरी साडी अजून 'म्होर'च हाय, ती अक्षरे A SHOCK अशी दिसू लागली... Class!

अप्रतीम! Lol

मस्त मजेदार खुसखुशीत.
पहिल्या २ प्रसंगांतली मजा तिसर्‍यात नाही आली. तिन्ही प्रसंगांची एकमेकांतली गुंफण नीटशी जमली नाही असं वाटलं. स्वतंत्र प्रसंग म्हणून पहिले २ प्रसंग आवडले. Happy

अमित, लवकर उरकविल्यासारखं वाटतंय, तरीही खुपच मजा आली वाचून..
तुझ्या लग्नात तुझ्या लेखांचे एक पुस्तक प्रकाशित करुन तुझ्या बायकोला भेट द्यावी म्हणते.. Proud

Pages