लाभले आम्हास भाग्य (भाषा ४/४)

Submitted by Arnika on 1 March, 2012 - 03:32

जागतिक मराठी भाषा दिवसाच्या शुभेच्छांसह सप्रेम...

“तू आधीपासून शिकलीस मराठी म्हणून बरं आहे. पण आता मुलांना मुद्दाम शिकवण्याचा व्यावहारिक्दृष्या काही उपयोग नाही. आम्ही शिकवायचं म्हंटलं तरी आमच्या समाधानासाठी आणि अभिमान वगैरे जपण्यासाठी.” चारपाच पालक कार्यक्रमाच्या मध्यांतरात चहाचे घोट घेत मला म्हणाले. माझ्या मते त्यांचं म्हणणं शंभर टक्के खरं होतं आणि म्हणूनच मला त्याचा कुठेतरी त्रास होत होता. ज्या भाषेत आपण विचार करतो, ज्या भाषेने जग बघायचा एक नज़रिया दिला तिचा कुठेतरी ‘उपयोग’ नाही ही बोच फार सलत होती. मध्यांतर संपलं, आणि आम्ही ‘विविध गुणदर्शनाचे’ उरलेसुरले कार्यक्रम बघायला जागेवर बसलो.

...आता कार्यक्रमाचं शेवटचं गाणं राहिलं होतं. चार जणांबरोबर मी मंचावर गेले. मगाशी झालेल्या संभाषणानंतर ‘लाभले आम्हास भाग्य’ म्हणाताना माझा आवाज मला उगाचच साशंक वाटत होता. इतक्यात प्रेक्षकांतील माणसं जोडीजोडीने उठून जाताना दिसली. ‘काहीही झालं तरी हे गाणं खड्या आवाजात संपवायचं’ असं ठरवून आम्ही पाच जण गात राहिलो. ‘बोलतो मराठी, ऐकतो मराठी’ च्या पहिल्या गजराला आवाज अगदी सशक्त झाल्यासारखा वाटला म्हणून आम्ही वळून एकमेकांकडे पाहिलं... प्रेक्षकांतून उठलेली प्रत्येक व्यक्ती मंचावर गाणं म्हणायला आली होती; सुरात सूर मिसळत होती! त्या गाण्याला अचानक बारा हत्तींचं बळ आलं. प्रत्येक शब्दाबरोबर एकेक प्रेक्षक त्या सोहळ्यात ओवला जात होता. शेवटी ‘गर्जते मराठी, वर्षते मराठी, स्पंदते मराठी’ (किंवा मनाला येईल त्या क्रमाने) या शब्दांनी संपूर्ण सभागृह दुमदुमत होतं. त्यात ‘ते’ पालक होते, त्यांची मुलं होती, आणि त्यांचे आई-वडीलही होते. गाणं संपल्यावर आणि टाळ्या सुरू होण्याआधी मिनिटभर काहीतरी ऐकू येते होतं...

तुडुंब! आनंद असेल, अभिमान असेल, तृप्ती असेल, समाधान असेल, ऐक्य असेल, नाहीतर आजून काही अनामिक. त्याला नाव असायची गरज वाटत नव्हती. जे काही होतं ते सगळ्यांना चिंब भिजवत होतं! त्या क्षणी पट्कन वाटलं, आपण कोण मराठी जपणारे? कधीकधी मराठीच जपते आपल्याला! अभिमानाने पोट भरत असतं तर इथल्या कुठल्याही माणसाने पुन्हा कधीही नोकरी केली नसती.

मराठी शिकण्याने असं काय दिलं होतं? त्या शिक्षणाचा काय उपयोग होता? मध्यांतरातलं संभाषण पुन्हा आठवलं. ‘अभिमान वगैरे जपायला’. कशाला जपायचा होता तो अभिमान? त्याचा तरी काही उपयोग होता का? आठवायचा प्रयत्न करायला लागले...

“माझ्या बहिणीचा होणारा नवरा पंजाबी आहे. पण त्याला ग्रीक जड जातंय खूप. इंग्लंडमधे वाढल्यामुळे इंग्लिश व्याकरणही कधी शिकला नाही तो. ग्रीकमधले संधी, समास, सव्यय-अव्यय वगैरे प्रकार समजून घेताना तुला कसली मदत होते सांग ना, म्हणजे कुलजीतलाही तसं समजावता येईल.” आंदोनीया कागद-पेन घेऊन मांडी घालून बसली.
“लिहून बिहून घेण्यासारखं काही नाहीये गं माझ्याकडे सांगायला” तिच्या त्या ‘पत्रकार पवित्र्या’ला घाबरत मी म्हणाले. खरं तर मीच विचार करत होते की हिला सांगायचं काय?
अर्धवट झोपेत शिकलेले शब्दांचे प्रकार? ‘संधी’ म्हणजे काय हे चारदा ऐकूनही पाचदा चुकलेली उदाहरणं? दोन महिने पुस्तकातून न समजलेली, पण परीक्षेच्या दोन तास आधी आजीने गुणगुणलेल्या कवितेच्या ओळीतून लगेच ‘उमगणारी’ अक्षरगणवृत्त? ‘च्याऽऽयला, आलाच का परत तत्पुरुष समासाचा प्रश्न’ म्हणत वार्षिक परीक्षेत मारलेल्या बोंबा? बाईंच्या, ‘लक्ष द्या, पुढे उपयोग होईल’ या सूचनेला दिलेली जांभई? की शाळा सोडल्यावर नव्या भाषा शिकताना पदोपदी मिळणारे ‘आम्हीही असंच म्हणतो! समजलं मला, मराठीत समजलं!’ असे समाधानाचे डोस? शेवटी आंदोनीयालाच विचारलं, “यातलं नक्की काय लिहीशील?” हातातलं पेन विसरून ऐकता ऐकता ती अचानक म्हणाली, “काही नाही! पण हे सगळं मलाही हवंय. मला मराठी शिकव.”
......
“तू किती वेळा इंग्लिशच्या चुका सांगतेस?” रॉब एकदा जेसिकाला सुनावत होता. “आपण सगळे जन्मापासून इंग्लिश बोलत आलोय. सगळ्यांना ते येतं.” जेसिका हिरमुसली. त्या रात्री मला फोन करून म्हणाली, “चुकलं तर आपण दोघी किती वेळा एकमेकींना सांगतो! चिडतेस का गं तू पण माझ्यावर?” मी खळखळून हसले.
जन्मापासून मराठी बोलत असूनही “अर्निका, मुळाक्षरे मधला मु ऱ्हस्व! कितीदा चुकशील?” असं म्हणून कान धरणारी आजुबाजूची माणसं आठवली. “अरे ‘स्थब्द’ काय म्हणतोस, ‘स्तब्ध’ म्हण नीट” अशी माझी नेहमीची मागणी आठवली. जेसिकाला म्हणाले, “वेडी आहेस का? सांगितलं नाहीस तर मात्र नक्की चिडेन, कळलं?” मोठा निश्वास टाकत ती म्हणाली, “See, you have to love your own language to want to be corrected in others’ languages!”
......
पंचवीस ग्रीक मंडळीं, सव्वीसावी मी. तीन महिने नाचाच्या तालमी. पहिल्या भेटीत पानोसने मला दिलेला सुटकेचा मार्ग, “अर्निका, मी इंग्लिशमधून शिकवू का?”
दिवसभर सगळ्यांशी इंग्लिशमधे मनसोक्त गप्पा मारल्यावर रात्री घरी फोन करून मराठीत फक्त ‘बाबा, अर्निका बोलत्ये’ म्हणण्यातला गोडवा आठवला. मराठी कार्यक्रमांसाठी एकत्र भेटल्यावर मराठीत होणारा धांगडधिंगा आठवला. दिवसभर इंग्लिश बोलून रात्री ग्रीक नाचासाठी जमलेले चेहरे दिसले...आणि एकूण पाच ग्रीक शब्द येत असताना, “नाही, ग्रीक चालेल” असं बावळट उत्तर पानोसला देऊन टाकलं! तीन महिन्यांनी शेवटची तालीम झाली आणि पानोस म्हणाला, “कठीण गेलं ना आमच्यामुळे? इंग्लिश बोल असं का नाही म्हणालीस?”
“I had my reasons!” मी गमतीत म्हणाले.
“It’s because you understand, right?” माझ्या हातावर जोरात टाळी देत पानोस निघून गेला.
......
“आज कंटाळा आलाय. तिकडे तेहरानचे माझे सगळे मित्र-मैत्रिणी सिनेमाला गेले आहेत. आणि इथे मी अभ्यासाचं नाटक करत्ये! जाऊया आपणही?” फ़ाहिमे कळकळीने म्हणाली.
“चल!”
“इंग्लिश सिनेमा नक्क्कोय पण मला.”
मग युसेफ़ने जवळच्या शहरात एक छोटासा सिनेमा शोधून काढला. निव्वळ पन्नास माणसांसाठी असलेल्या त्या स्क्रीनसमोर आम्ही सहा जणांनी फ़ारसी चित्रपट पाहिला. “अर्निका, तुला समजला नाही तर?” या भीतीने फ़ाहिमे अस्वस्थ होत होती. ‘समजतंय, समजतंय’ अशी शाश्वती मी अधून-मधून देत होते. तिच्याकडे बघताना भारतात सगळे ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ बघायला गेले तेव्हा मी इंग्लंडमधे एकटीने ‘अशी ही बनवाबनवी’ पन्नासाव्यांदा पाहिल्याचं आठवलं. तेव्हाचं माझ्या चेहऱ्यावरचं हसू आज फ़ाहिमेचं झालं होतं...आणि ते ‘न समजण्याचा’ प्रश्नच नव्हता.
......
काय दिलं असेल मराठीवरच्या प्रेमाने? समजूत दिली असावी. बाकी भाषा शिकण्याची समजूत, त्यांचा मान राखण्याची समजूत, माणसं समजण्याची समजूत! ‘लाभले आम्हास भाग्य’ खरोखरच वाटतं म्हणून दुसऱ्यांनाही त्यांच्या भाषांबद्दल हेच वाटत असावं ही समजूत. घरची आठवण येत असणाऱ्या एखाद्या संध्याकाळी ‘डोल डोलतंय’ चं माझ्या लेखी महत्व काय हे ठाऊक असल्याने, मैत्रिणींच्या न कळणाऱ्या भाषेतील रांगड्या गाण्यांवरही ताल धरायची समजूत. मग अशा एखाद्या लहानात लहान प्रसंगामुळे काही माणसं कायमची जोडली जातात. तीच गुढी पाडव्याच्या पंगतीला हजेरी लावतात, माझ्या मराठीची नक्कल करतात, आणि दोन सणांची गल्लत करून गुढी उभारल्यावर जोरात ‘मोरया’ असं ओरडतात. इतक्यात आजी फोन करते. विचारते, “आज एकटी नाहीस ना राजा?”

“नाही गं आजी, एकटी नाही!” असं म्हणत आजुबाजूला बघून हसताना श्रीमंत वाटतं!
माणसांची श्रीमंती, संस्कृतींची श्रीमंती, विचारांची श्रीमंती, आणि हे सगळंच ‘उपयोगाचं’ वाटायला लावणारी श्रीमंती. कदाचित तिच्या हव्यासापोटीच जपावासा वाटत असेल; ‘अभिमान वगैरे’...
----------------------------------------------------------------------------

गुलमोहर: 

अर्निका, लेख वाचायाला आवडला ..

पण मराठी का शिकावं, त्याचा अभिमान का बाळगावा ह्याकरता एक भावनिक सोडलं तर दुसरं कारण नाही हेच जाणवलं ..

Happy धन्यवाद!!
सशल, हो खरं आहे सध्या तरी... फार भावनिक कारणं झाली मी लिहिलेली.
पण तीही अगदीच निरुपयोगी नाहीत याची आठवण स्वतःला करून देतात म्हणून हे मनोगत Happy

-

छान लिहितेस. Happy

अर्थात यात 'मराठी'चं काय विशेष हा प्रश्न आहेच. मला वाटतं भाषेचं 'अ‍ॅप्टिट्यूड' असणार्‍या माणसाला कानांवर पडणार्‍या प्रत्येकच शब्दाबद्दल आस्था असते, संदर्भ शोधले जातात, संबंध जुळवले जातात आणि त्यातून (फॉर द सेक ऑफ इट म्हणतात तसा) आनंद मिळतोच.

पण लेख तरीही आवडलाच. Happy

फार छान लिहिलेत चारही लेख. तिसर्‍या लेखात वाचताना मीदेखील तुझ्याइतकीच खूप एक्साईटेड होते (इथे रोमांचित का काहितरी लिहावं असं वाटलं, पण एरवी तो शब्द वापरत नसल्याने बाद केलं :फिदी:). मलापण भावनिक जवळीक हा मुद्दा मराठी शिकण्याचं कारण म्हणुन पुरेसा वाटतो.

तुडुंब! आनंद असेल, अभिमान असेल, तृप्ती असेल, समाधान असेल, ऐक्य असेल, नाहीतर आजून काही अनामिक. त्याला नाव असायची गरज वाटत नव्हती. जे काही होतं ते सगळ्यांना चिंब भिजवत होतं! त्या क्षणी पट्कन वाटलं, आपण कोण मराठी जपणारे? कधीकधी मराठीच जपते आपल्याला!>>
सुरेख लिहिले आहेस अर्निका ! खरेच मराठी माय आपल्याला जपत असते !

स्वाती_आंबोळे >> +१.

लेख सुंदर आहे पण भावनांचा कर्ता चुकलाय असे राहून राहून वाटत राहते.

असामी,
भावनांचा कर्ता चुकलाय >>> म्हणजे काय रे? मला खरोखरच समजलं नाही म्हणून विचारते आहे.

यात 'मराठी'चं काय विशेष हा प्रश्न आहेच.>>>> स्वाती, भाषेबद्दलचा मुद्दा बरोबर, 'मराठीचं' विशेष असं की ती मातृभाषा आहे म्हणून जास्त जवळीक वाटते. जिव्हाळ्याच्या लोकांबरोबर, मागच्या पिढीबरोबर याच भाषेतून संवाद होतो म्हणून विशेष वाटत असावी.

लिहिलेल्या लेखातली कारणं मराठीशी मला जवळीक का वाटते त्याबद्दल आहेत, सगळ्यांना का वाटावी याबद्दल नव्हे...त्यामुळे ती व्यवहारदृष्ट्या 'पूर्ण' नाहीत हे माझंही मत आहे!...

पण कधीकधी त्या पलिकडे बघायची संधी मिळते आणि मग इतकीच काही निरुपयोगी वाटत नाही माझी भाषा, तिचा उपयोग मी करेन/करून घेईन तिथे होतो असं मला म्हणायचं आहे. Happy

भावनांचा कर्ता चुकलाय >>> म्हणजे काय रे? मला खरोखरच समजलं नाही म्हणून विचारते आहे >> +१
Happy

मस्त लेख!

लिहिलेल्या लेखातली कारणं मराठीशी मला जवळीक का वाटते त्याबद्दल आहेत, सगळ्यांना का वाटावी याबद्दल नव्हे...>>> Happy

फार फार सुंदर लेखमालिका... अतिशय आवडली. Happy

लिहिलेल्या लेखातली कारणं मराठीशी मला जवळीक का वाटते त्याबद्दल आहेत, सगळ्यांना का वाटावी याबद्दल नव्हे...>>> अगदी समर्पक उत्तर

अर्निका , फार आवडली तुझी लेखमालिका. आणि विचार मांडण्या मधिल सरलता. तुला भेटायला खुप आवडेल. Happy

छान लेखन.
"प्रत्येक शब्दाबरोबर एकेक प्रेक्षक त्या सोहळ्यात ओवला जात होता......" भन्नाट अनुभव.

अप्रतिम सुंदर झालेली आहे ही लेखमालिका. कशी काय वाचायची राहून गेली कळत नाही. तू समोर बसून खळखळून हसत, मधेच स्तिमीत होऊन ते सगळं दाटलेलं आश्चर्य आम्हाला सांगते आहेस आणि ओसंडणारा आनंद आमच्याबरोबर वाटून घेते आहेस असं वाटलं Happy सगळे लेख वाचून खुप काहीतरी सापडलंय असं वाटतंय, जे कधी हरवलंच नव्हतं! पण आभार मानणार नाहिये. आणखी लिही असंच भरपूर!!