एक संध्याकाळ "संतूर"लेली

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 1 March, 2012 - 02:02

संतूरच्या सुरांनी दरवळलेली एक संध्याकाळ ….. कुवेतच्या वाळवंटात एक सुखद, तरल, गोड झुळूक !!

संतूर हे वाद्यच मुळी अतिशय आनंदी आणि Romantic आहे आणि ते वाजवणारे जर साक्षात पंडित शिवकुमार शर्मा असतील तर……. ह्याहून जास्त कुणी काय अन् कशाची अपेक्षा करेल …. ?

मंचावर ७४ वर्षे वयाचा अतिशय देखणा तरुण ……. आपल्या सुरांनी समोर जमलेल्या प्रत्येकाच्या हृदयाचा ठाव घेतो. तरुणाई अजून वेगळी काय असेल ? कमालीचं आकर्षक व्यक्तिमत्व लाभलेले शिवाकुमारजी आपल्या आदबशीर बोलण्यानं मैफिलीची सुरवात करतात. फक्त कान नाही तर डोळे सुद्धा आसुसून वाट बघायला लागतात. काय पेश करणार आहेत ते छानपैकी समजावून सांगतात. साथीला तबलजी पंडित रामकुमार मिश्रा आणि तानपुऱ्यावर जपानी शिष्य ताकाहीरो अराई !!

1256813951175-santoor player shivkumar sharma.jpg

पहिला भाग फक्त क्लासिकल …..शास्त्रीय. राग वाचस्पती……हळूहळू संतूर बोलायला लागतो ….. गायला लागतो, दरवळायला लागतो आणि बघता बघता स्वत:चं साम्राज्य उभं करतो आणि प्रत्येकाला स्वत:च्या पाशात बांधायला लागतो. भान येतं तेव्हा मध्यांतर झालेलं असतं. शब्दात काय वर्णन करणार…… ते अनुभवायलाच हवं. मध्यांतर होता होता पंडितजी धीरगंभीर आवाजात कलेची तारीफ कशी करायची ते सांगतात. ताली बजाने के सिवा और भी तरीके होते है तारीफ करनेके !! मग मिश्कील स्वरात म्हणतात, “बहोत खूब “, “क्या बात है”, “वाहवा”…….. ऐसी भी नजाकत भरी तारीफ कर सकते हो !! दुसऱ्या भागात इसी प्रकार की तारीफ सुनना ज्यादा पसंद करुंगा….. !!

एक छोटा म्हणता म्हणता एका तासाचा झालेला ब्रेक, चहा, बिस्किटं….. गप्पा…..!!

पुन्हा एकवार तशीच बैठक…. !! आता थोडं सेमिक्लासिकल !! राग पहाडी…….!! रागातले सूर ……. सुरावट…… रागाचा विस्तार ….. हळूहळू रागाची ओळख, मग मैत्री, पुढे पुढे तर जिगरी दोस्तीच होते. सूर इतके ओळखीचे होतात की नकळत आपणही गुणगुणायला लागतो. आता संतूर अगदी रंगात आलेला असतो. बोटं जादूसारखी फिरत असतात……तबलाही मस्तीत येतो……. वेग वाढतो, श्वास वाढतो…..आवेग वाढतो…….. सूर अगदी टिपेला पोचतात…… श्वास रोखल्या जातो….. आणि तिहाई होऊन संतूर विसावतं. टाळ्यांचा गडगडाट………कितीतरी वेळ……!! पंडितजींचा भावपूर्ण सत्कार !! मंत्रमुग्ध श्रोते……. नकळत उभे राहतात……..पुन्हा एकवार टाळ्या ….. !!

संपली मैफिल ………नाही नाही…….अजूनही डोक्यात तेच सूर आहेत …. तीच नशा …. उतरायला वेळ लागणारच !!

गुलमोहर: 

हो रे...... अजुनही त्याच धुंदीत आहे Happy
पहाडीला खरंच मजा आली. ओळखीच्या सुरावटी होत्या ना...... मग ती बेचैनी......मजा आली !!
कसले सही दिसतात रे ते....... !!

सुंदर अनुभव.
त्यांचा हात असा काही नजाकतीने फिरत असतो, कि क्षणभर सूर न ऐकता
त्या हातांकडेच बघावेसे वाटते.

आहाहा ! सही !
>>>आता संतूर अगदी रंगात आलेला असतो. बोटं जादूसारखी फिरत असतात……तबलाही मस्तीत येतो……. वेग वाढतो, श्वास वाढतो…..आवेग वाढतो…….. सूर अगदी टिपेला पोचतात…… श्वास रोखल्या जातो….. आणि तिहाई होऊन संतूर विसावतं <<< वा ! मी पण पोचले त्या मैफिलीत Happy मनापासून धन्यवाद !

हो रे दिनेश....... मोठ्या मोठ्या पडद्यांवर दिसणारे त्याच्या हाताचे क्लोज-अप्स अगदी जिवाच्या आकांताने साठवून घेत होते नजरेत Happy

पद्मजा........ अगदी अगदी...... Happy

अवल ...... मी अजूनही त्या मैफिलीतच आहे Wink

खरच ग जयु.....आणी काल तर त्यान मि वाकुन वन्दन केले तर खरा खुरा देव भेटल्याचा आनन्द होत ग्....एकदम सही ...अजुनही त्याच नशेत आहे मी पण .....

Happy

सुंदर फोटो आणि वर्णन
शिवजींनी एका मैफीलीत दाद देण्याचे प्रकार सांगीतले होते
अगदीच सुमार कार्यक्रम आणि अरसिक प्रेक्षक असतील तर कार्यक्रम केंव्हा सम्पतो ते कळत नाही. कलाकार उठल्यावर ४-५ लोक टाळ्या वाजवतात.
त्यापेक्षा चांगला कार्यक्रम असेल तर काही लोक ध्यान देउन ऐकतात, थोडीशी आपाप्सात कुजबुज चालु असते. अशा कार्यक्रमात कलाकार उठल्यावर सगळेच लोक टाळ्या वाजवतात.
कार्यक्रम खुपच सुंदर झाला तर सगळेच कान देउन ऐकतात आणि कार्यक्रम संपल्यावर सगळेच उभे राहुन जोरात टाळ्यांचा वर्षाव करतात
पण ज्यादिवशी सर्वोत्तम कार्यक्रम होतो आणि समोर बसलेले प्रेक्षक अत्यंत रसिक असतात त्यावेळेस कार्यक्रम सम्पला तरी सगळेच येवढे तल्लीन झालेले असतात की त्यांना काही वेळ टाळ्या वाजवायचे पण भान रहात नाही. क्षणभर सगळीकडेच शांतता असते. तो मैफीलिचा सर्वोत्तम क्षण असतो

जयाबाई... बहोत शुक्रिया...
शिवजी स्वतः उत्कॄष्टं तबला वादक आहेत. जुन्या काही हिन्दी गाण्यांना फिल्म इंडस्ट्रीमधे त्यांनी तबला वाजवलाय.
संतूर हे तार "छेडण्याचं" वाद्यं नाही (सतार, सरोदसारखं). तारेवर आघात करण्याचं आहे.
बेदम ताणलेल्या तारा, आपण आघात केला की, एक प्रतिघातासारखी रिअ‍ॅक्शन आपल्या हाताला मिळते. त्यात हे डिजिटल वाद्यं. म्हणजे मिंड नाही.
ह्या प्रतिघातामुळे ह्या वाद्यात लयीनुसार कलाकुसर करणं सोप्पं आहे.
... पण...
हे वाद्यं हातात असताना, आलापीची (आलापा.... जिला अजून लय शिवलेली नाही अशी) कला-कुसर हे एक भयंकर दिव्यं आहे.
शिवजींची आलापी ऐकणं एखाद्या गायकी ढंगाची सतार ऐकण्याइतकं सुंदर आहे. त्यांना वाजवताना बघणं हा एक अप्रतिम अनुभव आहे. डोळे मिटून अल्लाद चालणार्‍या त्यांच्या हातांना त्या दोन काठ्या ह्या धिक दोन बोटांइतक्या नैसर्गिक, सहज आहेत... संतूरशी त्यांचं एकरस होणं... केवळ अवर्णनिय.

तबल्यावर कोण होतं गं?
(अप्रतिम कुसरीच्या जागा घेतल्या जात असताना टाळ्या वाजवणार्‍यांचे हात कलम करावेत... असं मला अनेकदा वाटत आलय... हिंस्त्र विचार आहे, कबूल. पण गुन्हाही तितकाच गंभीर आहे...)

दाद....... खरं सांगू....... मला मैफिलीत तुझी प्रचंड आठवण आली...... तुला विश्वास बसणार नाही कदाचित.
तबलजी कुछ जम्या नाही यार...... दबका वाजत होता तबला Sad
असा मस्त क्रिस्प नव्हता........ पण प्रत्येक वेळी झाकीर हुसेन ची अपेक्षा कशी ठेवणार ?
तू म्हणतेस तसं ....... शिवजींची ती कलाकुसर बघणं म्हणजे एक स्वर्गीय आनंद...... Happy

शिवकुमार शर्मा म्हणजे एकदम सुसंस्कृत आणि आदबशीर व्यक्तीमत्व. मी एकदा त्यांची मुलाखत घेतली होती.

जयावि, छान लिहिले आहेस.

धन्यु नंदिनी Happy
तू त्यांची मुलाखत घेतली होतीस.......... क्या बात है !! वाचता येईल का गं ?

जयवि, रत्नागिरीला गेले की स्कॅन करून तुला मेल करेन. मी इथे किस्सा बीबीवर त्याना भेटले होते तो किस्सा लिहिला होता. तोदेखील जरूर वाच. Happy