आमच्या काही पाककृती

Submitted by बेफ़िकीर on 1 March, 2012 - 01:59

आपले ठाम असे शंकास्पद अष्टपैलूत्व सिद्ध करण्याच्या उथळ हव्यासापायी पाककृती विभागात आपणही काही चमक दाखवावी असा विचार मनात आला. पण गझलेतील राजकारणात अनेक वर्षे काढल्यामुळे मनात आलेल्या प्रत्येक विचारावर गझलेचा आणि त्यामुळेच यमकांचा प्रभाव पडणे अनिवार्य होते. त्यामुळे पाककृती या शब्दातील 'क' हा काफिया व 'कृती' ही रदीफ घेऊन तसेच 'आ' ही अलामत घेऊन 'गाललगा' या वृत्तात एक गझल निर्माण झाली. या गझलेत सहा सात शेर असून लहान बहरीमुळे माझ्यावर गझलेचा अर्थही सांगण्याची जबाबदारी येऊन पडली. खरे तर तसा मी अत्यंत नि:संदिग्धपणे नि:संदिग्ध गझल करणारा म्हणून सर्व विश्वात माहीत आहे. पण ही जमीनच अशी की मला स्पष्टीकरणे द्यावीच लागली.

तर आमच्या घरातील काही व इतरही काही कृती खाली देत आहे.

नाककृती - यात दोन प्रकार पडतात. नाक आल्यास ते रुमालाने पुसणे हे त्याचे अत्यंत घिसेपिटे व्हर्जन असून बदलत्या मौ की मोसमांच्या या कलियुगात नाक सतत येते. नाक या अवयवाबद्दल मला अतीव आदर आहे. याचे कारण तो अवयव भिन्नभिन्न पद्धतीने शेरात वापरता येतो. नाकासमोर चालणे हा त्यातला एक भाग. नाकच वाकडे असल्यास (जे माझे आहे) नाकासमोर चालूनही माणूस वाकडा वागतो हा भौतिकशास्त्रीय सिद्धांत या वाक्प्रचाराच्या निर्मीतीप्रक्रियेत विचारात घेतलेला दिसत नाही. नाक येणे हे सुंदर मुलींच्या बाबतीत झाल्यास त्यांचे (मुलींचे) सौंदर्य शतपटीने वाढते व नाकपुड्यांवर एक लाचार स्वभावाचा रक्तिमा येतो असा एक काकोडकरी समज पूर्वीच्या साहित्यिकांनी पसरवलेला आहे. त्यावर मी अजून पुरता विचार केलेला नाही. नाक कापणे असाही एक खास विभाग असून त्यात माझ्या आईवडिलांनी माझ्यामुळे अनेकदा प्रवेश केलेला आहे. नाक उडवणे, मुरडणे आणि नाकी नऊ आणणे हे तीन प्रकार तर कित्येक शेरात वापरता येतात. नाकी नऊच का आणले जातात यावर पुरेसे साहित्य उपलब्ध नाही. मी एकदा आठ आणून पाहिले होते, पण नऊ आल्यावर जो त्रास होतो तो वेगळाच. मराठी भाषा नेमाडेंच्या हिंदू कादंबरीसारखी समृद्ध आहे पण अडगळ मात्र नाही. तर नाककृती. आमच्या कलत्राने केलेल्या पाककृती आलेल्या पाहुण्यांसमोर आत्मविश्वासाने सादर होण्याआधी मला दोन खोल्या ओलांडून पलीकडे जाऊन खमंग वास आल्याचे लेखी द्यावे लागते याला नाककृती असे म्हणतात. असे केल्याशिवाय पदार्थ चांगला होत नाही. याला आवश्यक साहित्य म्हणजे एक नाक, ओलांडण्यासाठी दोन खोल्या, पेशन्स आणि पदार्थाचा वास प्रत्यक्षात कसाही येत असला तरी तो खमंग आहे म्हणण्याचे कसब. हे सर्व साहित्य योग्य प्रमाणात घेऊन नम्रपणे उभे राहावे व 'वास आला का रे?' असे दरडावून विचारल्यावर तातडीने 'अप्रतिम वास येतोय' असे नम्रपणे म्हणून टाकावे. झाली नाककृती.

टाककृती - पानात टाकायचे नाही हां, या लहानपणापासून मिळणार्‍या धमकीवर माझा एक अबोल व घाबरट प्रश्न असा की 'मग कुठे टाकायचे'! मला नऊ भाज्या आवडत नाहीत, बाकी सर्व आवडते. कोबी, फ्लॉवर, नवलकोल, कारले, दोडके, वांगे, पडवळ, घोसावळे, दुधी भोपळा! यातील नवलकोल हा अतिशय उग्र वासाचा पदार्थ असून पडवळ हे उगीचच उगवते असे माझे स्पष्ट मत आहे. मी घरातील कर्ता पुरुष असल्याचा एक समज टिकवून ठेवण्यात मी यशस्वी झालेलो असल्याने यापैकी कोणतीच भाजी घरात होत नाही. तरीही मी झोपलो आहे हे बघून हळूच लोणी कढवले जाते. लोणी कढवण्याचा वास या जगात का अस्तित्वात आहे हेच मला समजत नाही.तो वास आला नाही तर काय बिघडेल? नाकाची आतील नाजूक अशी त्वचा अक्षरशः खरवडत तो वास फुफ्फुसांमध्ये पोचतो आणि मी झोपलेलो असलो तर जागा होतो. मी जागा झालेलो पाहून युद्धपातळीवर गॅस बंद करून ते लोण्याचे पातेले झाकून टाकले जाते. माझ्या घरात माझा थोडा वट आहे. पण शेवटी तूप हा अत्यंत हलकट स्वभावाचा पदार्थ उगीचच पॉप्युलर आहे. तो काहींना लागतोच जेवणात. तर आपल्याला न आवडणारी गोष्ट कोणाच्याही लक्षात न येता व टाकली हेच समजणार नाही अशा पद्धतीने टाकणे याला म्हणतात टाककृती. यात लागणारे साहित्य म्हणजे काही पदार्थांचा तिरस्कार, पदार्थ टाकण्यासाठी एक योग्य जागा आणि लपाछपीत जसे कोणालाही न दिसता वावरायचे असते तसे वावरण्याची सवय. ही एकदा जमली की माणूस सुखी होतो. टाककृती एका सेकंदापासून ते दोन तास इतक्या वेळात करता येते व ती निवडक दहात घेता येते.

काककृती - ही सज्ञान पुरुषांसाठी असलेली कृती असून स्त्रियांनी व स्त्री म्हणून मिरवणार्‍या ड्यु आयड्यांनी वाचू नये. या कृतीला लागणारे साहित्य म्हणजे कावळ्याची नजर, कावळ्याचा नाक खुपसण्याचा स्वभाव, कावळ्यासारखे ओरडणे व जमल्यास कावळ्याचा रंग. कावळ्याचा रंग शरीराला नसला तरी चालेल पण मनाला तरी हवाच. या कृतीमध्ये वरील साहित्य घेऊन आपल्याच गच्चीवर तासनतास थांबावे व खालून चाललेल्या मोहक थव्यांचे निरिक्षण करत करत काव काव करावी व शेजारपाजारच्या पुरुषांनाही या कृतीचे व्यसन लावावे. या कृतीचे अनंत फायदे आहेत. एक म्हणजे सतत सुखद दृष्ये बघितल्यामुळे मन काळे असले तरी प्रसन्न राहते. दुसरे म्हणजे हक्काची कावळीण, जी घरात असते ती भडकून माहेरी जाण्याचा निर्णय घेऊ शकते व त्यातून स्वातंत्र्य मिळते. जे खरे कावळे असतात ते घराच्या आसपास फिरकत नाहीत. अनेक मित्र मिळतात व माणूस जगन्मित्र ठरतो. घरात काहीही करावे लागत नाही कारण गच्चीवर आपण जे करत असतो ते पाहिल्यावर आपला अपवित्र स्पर्श घरात नकोच असतो. या कृतीचा एक सर्वात महत्वाचा व मोठा फायदा म्हणजे एकदा वयात आल्यानंतर कोणत्याही वयात ही कृती करता येते. ही कृती योनीनिरपेक्ष असून त्यात फक्त मानवी थवेच आवडतात असे नाही तर टिटव्याही आवडू शकतात.

धाककृती - ही कृती 'करण्याची कृती' नसून 'सोसण्याची कृती' आहे. या कृतीसाठी लागणारे साहित्य म्हणजे बेदरकार वागणूक ठेवणे. आपण बेदरकार वागणूक ठेवली की बाकीच्यांना ही कृती करता येते. तसे पाहिल्यास 'लार्जली' ही कृती स्त्रीवर्गाकडून केली जाते. यात वरचा (स्वतःचा) ओठ उजवीकडे दोन सेंटिमीटर (स्टॅन्डर्ड मापन, कमी जास्त चालेल) खेचून त्याचवेळेस स्वतःचे नाक डावीकडे खेचणे व डोळ्यात घोर निराशा आणणे असा एक प्रकार मोडतो. या प्रकारामुळे पाहणारा हतबल होऊन सुधारण्याच्या शपथा घेऊ लागतो याचे काही दाखले मी स्वतः पाहिलेले आहेत. धाककृती करण्यासाठी 'स्त्री' असणे हे क्वॉलिफिकेशन पुरते. लहानपणी आईचा, मोठेपणी बायकोचा आणि मरणासन्न अवस्थेत असताना नर्सचा धाक हेच आमचे आयुष्य असे सांगून अनेक वृद्ध तडफडून मेलेले आहेत. ही कृती करण्याचा दुसरा प्रकार म्हणजे स्वयंपाक न करणे. यात समोरच्याला स्पष्ट संदेश मिळतो की मी म्हणजे स्वयंपाचकासाठी लावलेली बाई नव्हे. त्यातून समोरच्यात नैतिक सुधारणा घडवणे सुलभ होते. ही कृती करण्याचा तिसरा प्रकार म्हणजे पाय आपटून त्याच वेळी भांडेही आपटणे. दोन आवाजांमधील सूक्ष्म फरक जरी लक्षात आला नाही तरी ही धाककृतीच आहे एवढे नक्की समजते. यामुळे माणूस घाबरून काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह करायला लागल्याचे दाखवतो. कन्स्ट्रक्टिव्हमध्ये केर काढणे, लहान मुलाचा भांग पाडून देणे येथपासून ते 'किती राब राब राबतेस तू' असे हळुवार उद्गार काढणे यातील सर्व समाविष्ट आहे. धाककृतीचा चौथा प्रकार म्हणजे पलंगावर आडवे होऊन उशीत तोंड खुपसून हमसल्यासारखे गदागदा हालत मौन पाळणे. ही अतिशय भयंकर कृती असून यातून वैवाहिक जीवन तावून सुलाखून निघते. हे पार केलेला पती आयुष्यात काककृती करू शकत नाही. सर्वात शेवटचा प्रकार म्हणजे माहेरी (तेथे स्वीकारले जात असल्यास) निघून जाणे. मात्र याचा एक वेगळाच फायदाही मिळतो समोरच्याला. त्यामुळे नुसतेच 'ही मी निघाले माहेरी' असे विधाता वृत्तात बोलणे आणि समोरच्याला काल्पनिक आवंढे गिळायला लावणे हे सोयीस्कर ठरेल.

वाककृती - ही सर्वांना खुली आहे. वय, लिंग व धर्म यांच्या अटी नाहीत. सहसा गरजूंकडून ही कृती केली जाताना दिसते. या कृतीस लागणारे साहित्य म्हणजे हिप रिप्लेसमेन्ट न झालेली कंबर, आपले स्वतःचे पाय आपल्याला स्वतःला दिसतील इतपत पोट व कसलीही गरज. ही ऐतिहासिक कृती असून विविध पातळ्यांवर ती योजली गेलेली आहे. राजकारणात त्याचा सर्वाधिक फायदा असून एक माजी ज्येष्ठ मंत्री नारायणदत्त तिवारी यांनी या कृतीचा एक नावीन्यपूर्ण असा फायदा शोधून जगाला चकीत केलेले आहे. ही कृती करण्यास फार तर दोन अडीच सेकंद लागतात व त्याचे फायदे अगणित आहेत. कौटुंबिक पातळीवर सहसा ही कृती पुरुष करताना दिसतात.पण त्यात काही फारसे विशेष नाही असेही एक मत आहे.

काकाककृती - अनेकदा काककृती आणि यात गोंधळ होतो, मात्र सर्वस्वी वेगळी अशी ही कृती आहे. हिचा सर्वात मोठा म्हणण्यापेक्षा सर्वात मोठे दोन फायदे हे की आपले अस्तित्व दिसून येते व 'काकाक' का म्हणता याला अशी लाडीक विचारणा झाल्यामुळे आपल्यातील कुसुमाग्रज सुखावतात. या कृतीला दिड मिनिट लागते. या कृतीला लागणारे साहित्य म्हणजे इन्टरनेट कनेक्शन, वेळ व मॉडरेशनचा अभाव. अनेक दिवसही ही कृती करता येत असून त्यात पहिले आठ दिवस व नंतरचे सहा महिने त्या कृतीच्या लिंक्स परिचयातील रसिकांना नम्रपणे पाठवणे हे समाविष्ट होते. यात काही जण पारंगत असल्याचा आरोप होतो व एक नवीनच वाद उभा राहतो हा एक स्वतंत्र फायदा आहे.

अशाच चाककृती, फाककृती, झाककृती व हकनाककृती अशा काही कृती आहेत. त्यांच्याबद्दल लिहावे की नाही हे ठरलेले नाही.

===========================

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

:*8-)

लैच भारी. तुमी का बी लिवा. आमाला लै गोड लागतंय. मायबोलीच टैमवाईज दोन भाग पडत्यात असं आमचा बामनमित्र म्हणत हुता. येक तुमी हिथं यायच्या अगुदरचा आन दुसरा तुमी आल्यावरचा. कुनितरि म्हनलं बि, तुमि यायच्या अदुगर लैच टुकार साहित्य हुतं हिथं. कोन शन्वार पेठेतुन शुक्रवार पेठेपत्तुर गेला तरि त्याचं प्रवासवर्नन असायचं. तुमि आला अन कादंबरि, कथा, कैता, गझ्ला सारं मोप यायला लाग्लं. काय फाश्ट लिवता राव. एक लेख वाचतुय न्हाई कुठं गझल तैयार, गझल उघडतुय न्हाई तोवर इनोदि लिखान तैयार, इनोदि वाचतुय न्हाई कुटं तर गटगचम व्रुतानत तैयार, ते वाचतिय न्हाई कुटं तोवर शिन्माचा रिपोर्ट तैयार, शिन्माचं वाचतुया तोवर कादंबरि तैयार. तिचा एक भाग वाचतुय न्हाई तर दुसरीचा भाग तैय्यार. आमचा बामन मित्र म्हनत हुता २२ व्या शेतकातला एक म्हत्वाचा आरम्भशुर लेखक म्हुन तुमचं नाव लैच आदरानं घ्यायला लागल.

लिवा लिवा. आमि हायेच वाचाय.
( हितं भांडाण न्हाई लागलं जनु ? )

बेफि..
खास तूमच्यासाठी,

कोबीची रबडी, फ्लॉवरचे आईसक्रीम, नवलकोलचा शिरा, कारल्याचे लोणचे, दोडक्याची खीर, वांगेभात, भरले पडवळ, घोसावळ्याची भजी आणि दुधी भोपळ्याचे पराठे... असा बेत करावा म्हणतोय.