पी. एस. पी. एस.....

Submitted by फकिर बेचारा on 28 February, 2012 - 03:50

हे लेखन पूर्णपणे काल्पनिक असून त्याचा वास्तवाशी संबंध नाही. काही साधर्म्य असलेच तर निव्वळ योगायोग! दुसरे काय?

पुण्यातल्या मुठा नदीकाठची फ़सवण गल्ली ही आजकाल काव्यपंढरीच झालेली होती. पुणे विद्यापीठ परीसरातील विद्यार्थी आणि विद्यासाधकांचा राबता देखील या बोळातील नवोदीत कविंच्या वाढलेल्या राबत्यापुढे कमीच होता. या बोळातल्या पुरातन पिंपळवृक्षाच्या बगलेत असणा-या झुळझुळ्यांच्या वाड्याकडे पाहून नवोदीत कविंना हात जोडताना तेथील रहिवाशांनी अनेकदा पाहिले होते.
दाराजवळच्या पिंपळाला उजवे घालून पुढे गेले की अनेक स्थित्यंतरात नेटाने उभी राहिलेली पण सध्या दुरावस्थेत असलेली दिंडी लागते. तिला पार केले की उजव्याच हाताला तिच्या इतकाच पुरातन जिना लागतो. या जिन्याची एक एक पायरी म्हणजे मराठी कवितेच्या इतिहासातील एक एक टप्पा असं कुणीतरी सांगताना अलिकडेच ऐकलं होत. हाच तो ’उन्नत्तीचा मार्ग. असे समजून पंढरीतल्या नामदेवाच्या पायरीला भक्तिभावाने लोटांगण घालणा-या वारक-याचा भाव, आणि ही पायरी चढणा-या नवोदीत कविचा भाव सारखाच होता! याचे एकमेव कारण म्हणजे माडीवर असणारे ‘परस्पर सहकारी प्रशंसक संघाचे कार्यालय.’
एका अलगद संध्याकाळी, लैलाबाई या परस्पर सहकारी प्रशंसक संघाचे कार्यालय शोधत या बोळात शिरल्या. लैलाबाई नवोदीत कवियत्री होत्या. कवितेच्या क्षेत्रात बरच काही करण्याची आणि उत्तम काव्यनिर्मिती करण्याची ईच्छा त्या बाळगुन होत्या. ब-यापैकी कविता लिहीत. वृत्तांचे तंत्र अजून त्यांना पूर्णपणे अवगत झालेले नसले तरी वृत्ते, छंद या गोष्टींचा छंद लागलेला होता. चुकत माखत एखादी गजलही रचत पण बोलीभाषेत त्याची हजल होई.

लैलाबाई जसजशा झुळझुळे वाड्याच्या दिशेने जाउ लागल्या तसतश्या काव्यपंढरीच्या काव्यखुणा त्यांना पटू लागल्या. तोच त्यांच्या विरूध्द दिशेने जाणारा एक तरूण त्यांना दिसला. त्या तरूणाचे केस, दाढी वाढलेली असून त्याने कळकट्ट कुडता पायजमा परीधान केला होता. नजर अनंतात विलीन झाल्यासारखी वाटत होती. चेहे-यावर स्वप्नाळू, प्रेमभंग, मनस्वी राग, ईत्यादी भाव आलटून पालटून हजेरी लावत होते. खांद्यावर खादीची शबनम बॅग आणि खिशाला बरीचशी पेने, हे पाहून तो कवि असावा हे ओळखायला लैलाबाईंना आजिबात वेळ लागला नाही. तेवढ्यात आकाशाकडे पहात त्याने काही हातवारे केले आणि तो पुढे निघून गेला.

लैलाबाई दाराजवळच्या पिंपळाजवळ आल्या. या छोट्याशा पिंपळपारावर मगाच्या त्या कविसारखेच स्वप्नाळू डोळ्याचे काही तरूण दाटीवाटीने बसलेले असून त्यांचे बहुधा काव्यवाचन चाललेले असावे. मधेच वाचताना त्यातील काहीजण, गणिताचे मास्तर बेरजा वजाबाक्या करायला शिकवताना बोटे मोडतात तशी बोटे मोजीत होते. ते मात्रा मोजीत असावे हे चाणाक्ष लैलाबाईंच्या लगेच लक्षात आले. पण तिथे न रेंगाळता त्यांनी त्या जिन्यावर पहिले पाऊल टाकले. सारा माहोल पाहून आपण योग्य ठिकाणीच आलो आहोत अशी त्यांची खात्री पटत चालली.
गेले अनेक महिने लैलाबाईंच्या कविता अक्षरश: पडून (अडून?) होत्या. कधी त्या अनुल्लेखाने मारल्या जात होत्या तर कधी चुकुन माकून दखल घेतलीच कोणी, तर त्यातील वैगुण्य, कमतरता, चुका, मात्रा, वृत्ते ईत्यादी ईत्यादी..... एक ना अनेक. यावरच चर्चा. काही वेळा तर असंबध्द, अश्लील टवाळ्या.
लैलाबाई हुशार असल्याने त्यांनी साधक बाधक विचार केला. हे असे आपल्या बाबतच का होतय असा विचार करता करता, त्यांना परस्पर सहकारी प्रशंसक संघाबद्द्ल माहिती मिळाली. माहिती देणारा त्या संघाचाच एक सभासद होता. आणि आता त्या संघाचे सभासदत्व घेण्यासाठीच त्या संघाच्या कार्यालयात येत होत्या.

जिना चढून लैलाबाई दरवाजाशी आल्या. आत पाच सहा व्यक्ति बसलेल्या होत्या. त्यातील मुख्य टेबलावर बसलेली व्यक्ति हा संघाचा म्होरक्या असावा. बाकी ईतर त्याच्या अवती भवती असून प्रत्येकाच्या हातात मोबाईल फ़ोन होता. त्या प्रमुखा समोर एक व्यक्ति, ‘नामदेव पाडुरंगास नैवेद्य ग्रहण करण्यासाठी विनवित आहे असे भाव चेह-यावर ठेऊन अति नम्रपणे उभी होती. ही व्यक्ति देखील एक गझलकार होती हे लैलाबाईंना नंतर समजले.

लैलाबाई दरवाजाशी येताच आत चाललेले हास्यविनोद एकदम थांबले. उभ्या असलेल्या त्या व्यक्तिने लैलाबाई ना ओळखले आणि, याऽऽ याऽऽ याऽऽ याऽऽ अशा लफ़्फ़ेदार आवाजात हसून स्वागत केले. या त्यांच्या याऽऽ याऽऽ मध्ये देखील एक लय असल्याचा लैलाबाईंना भास झाला. काय काम आहे आपले? नामदेवांनी हसतमुखाने लैलाबाईंना विचारले.
"मी लैला मानमोडे". लैलाबाई स्वत:चॊ ओळख करून देत म्हणाल्या. मी..मी कवियत्री आहे..लिहीते जमेल तसं ... म्हणजे आत्ताच सुरवात झाली......
"कशाला? म्होरक्याने विचारले.
"अहो माझ्या गझल लेखनाला." लैलाबाईंनी ओशाळून उत्तर दिले.
असं असं.... त्यातील एक जण म्हणाला
वा वा वा म्हणजे आपण नवोदीत कवयत्री दिसता. बसलेल्या एका व्यक्तिने मान डोलावत
लैलाबाईंकडे पहात म्हटले. छान.. छान.. आपण अगदी योग्य ठिकाणी आला आहात.

"हे आमच्या संघाचे अध्यक्ष ‘बाबुराव आवांतर." ऊर्फ़ बेधडक. म्होरक्या व्यक्तिकडे निर्देश करीत नामदेवांनी ओळख करून दिली. बाबुरावांनी लैलाबाईंकडे पाहून मंद स्मितहास्य केले. तेंव्हा त्यांच्या या हास्यामधे पुष्कळच आवांतर गोष्टी आणि गझलेतील काफ़िये दडले असल्याचा लैलाबाईंना भास झाला.

अगोबाई.... तेच का तुम्ही? मी तुमची पंखा आहे हो बाबुराव.

"बाबुराव म्हणजे मराठी गजलेचे दादामुनी. मराठी गझलेची धुरा भटसाहेबांच्या नंतर आपल्या खांद्यावर कोण वहात असेल तर हे आमचे बाबुराव. हं आता त्यांचे आडनावच आवांतर असल्याने गझलेव्यतिरिक्त ईतरही आवांतर लेखन आणि गोष्टी ते करीत असतात. आणि त्यांच्यावर वाचकांच्या उड्याही पडत असतात. "

अय्या.... वाचकांच्या उड्या? कोणावर?" लैलाबाईनी आश्चर्याने विचारले.

"अहो त्यांच्या लेखनावर आणि गझलांवर हो."

"बाबुरावांच्या आणि गालीबांच्या गझलेतील शेरांच्या खयालात बरेच साम्य असल्याने हे दोन गझलकार समविचारी असल्याचे बोलले जाते." बसलेल्या व्यक्तिंपैकी एकाने तोंड उघडले.
आमच्या या संघाची मूळ कल्पनाही बाबुरावांचीच.

काय हो, तुमच्या या ‘परस्पर सहकारी प्रसंशक संघाबद्द्ल काही आवांतर माहिती द्याल का?" लैलाबाईंनी पृच्छा केली.

अहो, अगदी सोपे आहे आमचे कार्य, तुमच्या प्रकाशीत होणा-या साहित्याचा एक धागा आमच्या संघाशी जोडलेला असणार. संघाच्या पदाधिका-यांनी लिहीलेल्या गजलांना तुम्ही नावाजायचे आणि संघ तुमचे साहित्यही उचलून धरेल. एकदा का बाबुरावांचे सर्टिफ़िकेट तुमच्या लेखनाला लाभले की मग बघा तुमचे साहित्य कसे वर येते ते. मग मोठमोठ्या मुशाय-यात तुमचा सहभाग असेल. त्याचे खुसखुशीत वृत्तांत लोकांना वाचायला मिळतील. (अर्थात सेंन्सॉर्ड) आणि पहाता पहाता तुमची गझल उच्च स्थानी पोहचेल. अहो असे अनेक शायर आमच्या संघाचे सदस्यत्व घेतल्याने आज प्रसिध्दीस आलेले आहेत.

लैलाबाई समजल्यासारखी मान हलवतात.

हे पहा कवियत्रीबाई, एकदा का तुम्ही आमच्या संघाच्या सदस्या झालात की मग पहा कसा बदल होतो ते! कोणताच खयाल नसलेल्या तुमच्या टुकार शेरांना ‘सुंदर खयाल’ असे म्हटले जाईल.

डळमळीत जमिनीवर रचलेल्या मतल्याला, सुंदर मतला असे म्हटले जाईल.

शेराच्या पहिल्या ओळीतील विचाराचा दुस-या ओळीत यशस्वी समारोप जरी झाला नसेल तरी गझलकार म्हणून तुमचा समारोप होणार नाही याची काळजी संघ घेईल.

वृत्ते अगदीच गडबडली असतील तर संघाचे सदस्य तुमची विचारपूस करण्यास कटीबध्द असून त्वरित डागडुजी करण्यात येईल.

आणि लयीच्या बाबतीत तर तुम्ही बिल्कुल काळजी करू नका. तुमच्या कुठल्याही गझलेला लय, चालीत म्हणून दाखवणारे आमच्या संघात पुष्कळ आहेत.

कवयित्री बाई तुम्ही फ़क्त ईतकेच करायचे की संघवाल्यांच्या साहित्य , गझलांचे तुम्ही भरभरून कौतुक करायचे आणि लग्नमुंजीच्या पंक्तित यजमान फ़िरत असता, वाढप्याला ईकडे जिलबी येऊद्या...., जिलबी येऊद्या......असा पुकारा करतो तसं तुम्ही ‘सुंदर! अजून येऊद्या.. अजून येऊद्या’ असे म्हणायचे की झाले.

या उलट बिगर संघवाल्या कविची गझल, कविता प्रसिध्द झाली की त्यातील चुका, वैगुण्ये
दाखवून संघवाल्यांची री ओढायची. गझलेत काही नाव ठेवण्यासारखे सापडले नाही तर कुठलातरी भलताच विषय काढून, त्या कवि , कवियत्रीची टवाळी सुरू करायची. म्हणजे ती कविता बुडलीच म्हणून समजा. असे झाले की मग आनंदोत्सव साजरा करायचा. असे आनंदोत्सव साजरे करणे ही आमच्या संघाची परंपराच आहे.

परस्पर सहकारी प्रशंसक संघाच्या कार्याचे एक एक पदर लैलाबाईंसमोर उलगडत होते.
आणि आमच्या संघाशी वैर पत्करणा-यांची काय गत होते याचे उदाहरण पाहिजे असेल तर या बोळीत विमनस्कपणे फ़िरणा-या त्या कविकढे बघा. मनावर परिणाम झालाय त्याच्या. रोज आमच्या कार्यालयात येऊन कटकट करीत असतो.

बाई...बाई.... लैलाबाईंच्या अंगावर काटा आला. आपण भ्रमिष्ट झालो असून झुळझुळे वाड्याच्या परिसरात फ़िरत आहोत असे दृष्य त्यांच्या डोळ्यापुढे क्षणभर तरळून गेले.

‘नको नको. मी घेते तुमचे सदस्यत्व. अहो त्या साठीच तर आले आहे इथे. काय फ़ॉर्मालिटीज आहेत तुमच्या?

“तशा फ़ॉर्म्यालिटीज काही नाहीत हो. ही बघा बाबुरावांची अगदी ताजी गझल उद्याला प्रसिध्द होते आहे. ती प्रसिध्द झाली की मग आमच्या संघाबद्द्लची निष्ठा म्हणून त्याला प्रतिसाद द्यायचा. एकदा का तुमचा प्रतिसाद आला की तुम्हाला सदस्यत्व मिळालेच म्हणून समजा. “
"बर.... अहो पण ती गझल कोणती हे तरी सांगा?"
ऐका, अर्ज है. बाबुरावांनी म्हणताच उपस्थितांनी इर्शाद इर्शाद असा गलका केला.
मग बाबुराव गजल ऐकवू लागले.

"चालतांना लोकांनी मालाच वाटाड्या केला होता
पोचले मुक्कामी ते आवाज भसाड्या केला होता"

क्या फ़र्माया है..... जनाब. बहुत अच्छे बहुत अच्छे.... सभासद बेभानपणे प्रतिसाद देत होते. लैलाबाईंना काय बोलाव ते सुचत नव्हत.
“अहो पण वाटाड्या आणि भसाड्या हे काफ़िया काही जुळत नाहीत हो. वृत्तही गडबडलय! नकळत त्या म्हणाल्या.”

लैलाबाई ...अहो ती बाबुरावांनी मतल्यात घेतलेली सूट आहे. एक पदाधिकारी म्हणाला.
ते ऐकून लैलाबाईंना घाम फ़ुटला. पण आता याची सवय करावी लागणार होती. भानावर आल्यासारख्या त्या ‘अच्छा है, अच्छा है.... असं ओरडल्या आणि संघाच्या सभासद झाल्या. आता मात्र त्यांना अगदी हलक हलक वाटत होत.

"फ़ार मोठमोठे शायर आमच्या संघात येतात बरं लैलाबाई". इति. एक सभासद.
"कारण आम्हीच त्यांना मोठे केलेले असते." इति दुसरे सभासद.

चला आमच्या आनंदोत्सवाची वेळ झाली. आता कार्यालयाची वेळ संपली.
आतून बाटल्या अन ग्लासांची किणकिण ऐकू आली. तशा लैलाबाई उठल्या आणि निरोप
घेऊन निघाल्या. चला मी तुम्हाला खालपर्यंत सोडायला येतो. नामदेव म्हणाले.

जिना उतरता उतरता नामदेव म्हणाले ," अहो एवढेच कशाला आमच्या संघात येणा-या मोठमोठ्या शायरांच्या सहवासाचा परिणाम म्हणून या पिंपळावरचे पक्षी देखील गझला गुणगुणत असतात. निट ऐका.

संध्याकाळची वेळ होती. पिंपळावर खरोखरीच पक्षांचा किलबिलाट ऐकू येत होता.
तोच टप्प… असा आवाज आला. लैलाबाईंनी मागे वळून पाहिले , मागुन येणा-या नामदेवांच्या शर्टावर पक्षी शिटला होता. नामदेव कसनुसे हसले.

नामदेवांनी सांगितलेल्या पक्षांच्या गोष्टीला एका पक्षाने दिलेले हे अनुमोदन होते की त्यांचा केलेला धिक्कार होता? याचा विचार करीत लैलाबाई झुळझुळे वाड्याच्या बाहेर पडल्या.

गुलमोहर: 
शब्दखुणा: