हे तर काहीच नाही ...

Submitted by आर्च on 25 February, 2012 - 09:03

पुष्कळांना सवय असते म्हणायची, "हे तर काहीच नाही". मग ती एखादी कलाकृती असो, किंवा जागा असो किंवा खाण्याचा पदार्थ असो. तुम्ही पहाताय, किंवा खाताय त्यापेक्षा मोठ्ठा किंवा जास्त चांगला अनुभव मी घेतला आहे असं सांगायच असतं का बढाया मारायची सवयच असते का आपल्याकडे लक्ष वेधून घ्यायच असतं. प्रत्येकाच्या बाबतीत कारण वेगळ असतं किंवा काहींच्या बाबतीत तीनही कारणं असू शकतात.

एकदा आम्ही युरोप टूरला आमच्या एका मित्राबरोबर गेलो होतो. कशालाही छान म्हटलं की हा म्हणायचा, " ये तो कुछ नहीं, यु.एस.में तो इससे बढकर है |" दोनचारदा तेच तेच ऐकल्यावर शेवटी म्हटलं, " विनोद, तेरेको पता था की यु.एस. में इससे बढकर है तो आयाही क्यूं? स्वतः नाही एंजॉय करायच तर दुसर्‍याला तरी करून द्यावं न. पण एवढं म्हटल्यावर तो थांबला असता तर तो विनोद ( नावाच्या संदर्भात) कसला!

माझ्या एका मैत्रिणीला सवय होती . काही सांगताना ती म्हणायची, "You can't even imagine". एकदा स्वतःच्या श्रीमंत नातेवाईकाचं कौतुक सांगताना आम्हाला म्हणाली, " अगं इतके श्रीमंत आहेत न ते, त्यांचं एवढं मोठ्ठ घर, एवढा पैसा, You can't even imagine" . ग्रुपमध्ये तेंव्हा एक मिश्कील मैत्रीण होती. म्हणाली, "काय ग काय नाव त्यांच?" तिने नाव सांगितल्यावर ही म्हणाली, " हो ग ऐकलय नाव. टाटा, बिर्ला, आणि हे तुझे नातेवाईक". मला नाही वाटत तिच्या लक्षात आलं हिचं म्हणणं कारण तिची ती सवय अजून गेली नाही.

एका पार्टीमध्ये एकजण त्याला नुकताच आलेला अनुभव सांगत होता. तो ग्रोसरी स्टोअरमध्ये गेला असताना त्याने कसा गनपॉईंट होल्डअप झाला. तो कसा घाबरला आणि टिव्हवर पाहिल्यासारखा बेधडक जमिनीवर आडवा पडून राहिला वगैरे वगैरे. तर तेथे असलेले एक महाशय म्हणाले, "हे तर काहीच नाही, माझ्या कलीगने तर शूटआऊट अनुभवलय ग्रोसरी स्टोअरमध्ये". प्रत्येक अनुभवाला "तेरे उपर मेरी" असा किस्सा असलाच पाहिजे का? आणि असला तर " हे तर काहीच नाही" अशा शब्दाने सुरुवात केली पाहीजे का? खरं तर तसा उद्देश असतोच असं नाही पण एक सवय - लक्ष वेधून घ्यायची.

अजून एक मला बोचणारी गोष्ट म्हणजे, कोणाकडे जेवायला गेल्यावर त्या होस्ट आणि होस्टेसच्या समोर तिने केलेला पदार्थ अमूक एका रेस्टॉरंट्मध्ये काय मस्त मिळतो हे सांगणं. म्हणजे हे तर काहीच नाही, परवा हॉटेल दीपकमध्ये खाल्लेलं इतक छान होतं न! म्हणण्यासारखच. काही गोडबोले ( नावाने नाही) होस्टेसला खूष करायला म्हटले असते, " भाभीजी, छोले तो बिलकुल चाचादी हट्टी जैसे बने है| " तेवढाच त्या होस्टेसच्या कष्टाला सलाम.

कोणी खूप एक्सायटेडली आपल्याला सेलमध्ये कसं छान बारगेन मिळालं हे सांगत असलं की काहींना सवय असते लगेच म्हणायचं, " हे तर काहीच नाही, तू २५ डॉलर्संना घेतलस? मला तर तेच २० डॉलर्सला मिळालं" झालं! सांगणार्‍याच्या उत्साहावर विरजण आणि शिवाय पैसे थोडे जास्तच गेल्याची चूट्पूट.

आता नक्की आठवत नाही, मी पहिल्यांदाच यु. एस्. ला आल्यावर आम्ही कुठेतरी गेलो होतो समुद्र किनार्‍याच्या गावात. नवरा अगदी काय छान जागा आहे न म्हणत होता आणि मी म्हटल होतं, " आमच्या दिवेआगरची सर नाही ह्या जागेला". पुढे कित्येक दिवस तो एक विनोदाचा भाग बनला होता. " काय दिवेआगरपेक्षा नसेल पण तरी छान आहे की नाही किंवा दिवेआगरमध्येही असच असेल नाही?"

आता हे ललित वाचून तुम्हीपण म्हणाल, " हे तर काहीच नाही". पण मी मानणार असते एकेकाला असं म्हणायची सवय. Happy

गुलमोहर: 

हे माझ्याघरी येऊन दोन तास गप्पा मारताना पंचवीस वेळा सांगायचं. >>
नंदिनी हापिसातल्या एका कलिगची आठवण झाली तुझं हे वाक्य वाचून. ती मुंबईत असते.. फोन करून तासनतास बोलत बसते पण बोलताना सारखं टुमणं सुरूच.. आय एम सो बिझी..

प्रतिसादांमुळे ललित विनोदी लेखनात हालवायची इच्छा होऊ शकेल लेखकांना, असे हसू नका.

विनाकारण असे हासू नका येथील दु:खांनो

बेफिकीर ~ देअर यू आर ! पण या निमित्ताने अशा विनाकारण होणार्‍या तुलनेकडे "लाईटली" पाहावे हे योग्यच.....स्ट्रेस बस्टर धागा आहे हे त्यातील उदाहरणावरून स्पष्ट व्हावे.

@ मास्तुरे ~ मान्य. सहसा जेवण या बाबीकडे तुलनेचा काटा जास्त झुकतो. पण तुम्ही उल्लेखीलेली सर्व उदाहरणे या धाग्याच्या प्रवाहात चपखल बसतात. विशेषतः दूध, कुस्ती आणि वहाणा. यापैकी वहाणा मात्र भारतभर आपला दबदबा टिकवून आहेत. "अभ्यंकर" सारख्या कोकणस्थ ब्राह्मण घराण्याची चौथी पिढीही 'कोल्हापूरी वहाणा' च्या धंद्यात आपला दबदबा कसा टिकवून आहे हे त्यांच्या दुकानाबाहेर चपला खरेदीदारांची लागणारी पाळी पाहून समजते.

आता 'अरे ला कारे' बद्दल मी काय बोलावे ? हे तर इथले व्यवच्छेदक लक्षण स्थापित झाले आहे.

फारच भावनिक विषयाला हात घातलाय ईथे..
चांगलं लिहीलय.. (सध्ध्या मा.बो. वर एक होते कुसुमाग्रज म्हणून आता ते एकाचे ३२ वर पोचल्याने ईतर बाफ दिसत नाहीयेत.. त्यामूळे हाही बाफ ऊशीरानेच दिसला!)

पण "हे तर काहीच नाही" हे दर वेळी दुसर्‍याला कमी दाखवण्यासाठी असते असे नाही.. जरा गप्पा टप्पा रंगात आल्या की ऊत्साहच्या भरात हे वाक्य देखिल बोलले जाते.
मी तरी बरेच वेळा "भूतांच्या गोष्टी" एकमेकास लोक सांगत असतात तेव्हा "हे तर काहीच नाही" हा वाक्प्रचार अगदी हमखास ऐकला आहे. खरे तर एकापेक्षा दुसरे भूत जास्त भयानक असते का माहित नाही.. Happy पण प्रत्त्येकाच्या घाबरण्याच्या कोशंट वर ते अवलंबून असेल. मग स्पर्धा लागतेच...

भुंग्या,
तुझे एकंदर मित्रांचे किस्से ऐकता आमच्या आजवरच्या मित्रांना "हे तर काहीच नाही" असे म्हणावेसे वाटते. त्या हमिनूम च्या किश्श्या (किस्स लिहीणार होतो) Happy मध्ये " हे तर काहीच नाही" असा वाक्प्रचार तू वापरल्याचे आठवते... तेव्हा ऊगाच "आम्ही नाही त्या गावचे" असा आव आणु नको हां Happy

सगळ्यांना मनापासून धन्यवाद.

माझी आई रत्नागिरीची आणि वडील दिवेआगरचे म्हणजे कुलाबा जिल्ह्यातले. कुठचा हापूस आंबा चांगला -रत्नागिरी का कुलाबा - ह्यावर त्यांच्यात नेहेमी वाद असायचे. तेंव्हा कधीतरी आईला चिडवायला आम्हाला बाबा म्हणायचे, " हे तर काहीच नाही, तुमच्या आईच्या रत्नागिरीमध्ये तर..." त्याचीपण एक मजा असायची. Happy

Lol हा वाचलाच नव्हता आधी.

शेवटच्या "दिवेआगर" च्या किश्श्यावरुन चुपके चुपके मधली "हमारे जिज्जाजी..."नी सुरवात करणारी शर्मिला आठवली.

वैद्यबुवा...... अगदी अगदी Happy
आर्च..... मस्त धागा आहे...:)
सगळ्यांचे किस्से वाचून मज्जा आली.

सह्ही लिहीलयस आर्च! नेहमी होत खरं अस आजुबाजुला....

अगदी इथल्या गोर्‍यांनासुद्धा... 'दिस इज नथिंग.. आय हॅव सीन/हॅड बेटर' असं म्हणताना ऐकलय Lol

कोल्हापूरच्या म्हशीच्या दुधाबद्दल (९वीत असताना गंगावेस तालमीबाहेर उभं राहून म्हशी आणि गवळ्यासमोरच उभं राहून धारोष्ण दूध प्यायले आहे) मात्रं खरंच म्हणावंसं वाटतं, "हे तर काहीच नाही, कोल्हापूरला तालमींच्या इथे जे दूध मिळतं ते गरम गरम आणि लस्सीसारखं दाट असतं. एक ग्लास प्यायलं की तिथेच बाजूला झोपून जावंसं वाटतं". कोल्हापूरच्या आजीने प्रेमाने ते दूध प्यायला सकाळी सकाळी नेलं होतं. अर्धा ग्लास प्यायल्यावर बास म्हणावंसं वाटत होतं. पण आजीच्या प्रेमाखातंर एकदाचं पिऊन टाकलं.

'हे तर काहीच नाही' हे उद्गार दोन अर्थाने येत असावेत. एक म्हणजे खरोखरंच एखाद्या ग्रेट गोष्टीबद्दल कौतुक मनात दाटलेलं असतं आणि सिमिलर गोष्ट दिसल्यावर ते उफाळून येतं. दुसरं म्हणजे समोरच्याला खाली पाडणारी गोष्ट आपल्यापाशी आहे हे दाखवण्याची असूया कम् ईर्षा मनात कायम असणारे लोक हे बोलत असतात.

नाही पण खरचं असं असत कधीकधी त्यांचही खरं:

मी कित्येकदा चितळेची बाकरवडी खाल्ली आहे पण मला अमरावतीची चिंच-दाण्याच्या कुट घातलेली बाकरवडी छान वाटली नि ती एक खाऊन पोट भरते इतकी मोठी असते. चितळेंची तर तिखटजाळ आणि स्पाईसी असते. कोल्हापुरची तर अगदी लसणाच्या वाटणानी भरलेली असते!

विदर्भातल्य कित्येक गोष्टी मला जगातल्या इतर गोष्टीपेक्षा छान वाटतात आणि मी तिथला असल्यामुळे असे नाही तर its the fact असेही माझे ठाम मत आहे.

'हे तर काहीच नाही' हे उद्गार दोन अर्थाने येत असावेत. एक म्हणजे खरोखरंच एखाद्या ग्रेट गोष्टीबद्दल कौतुक मनात दाटलेलं असतं आणि सिमिलर गोष्ट दिसल्यावर ते उफाळून येतं. दुसरं म्हणजे समोरच्याला खाली पाडणारी गोष्ट आपल्यापाशी आहे हे दाखवण्याची असूया कम् ईर्षा मनात कायम असणारे लोक हे बोलत असतात.>>>>>>>>>>>>>> +१, अश्विनी अगदी योग्य शब्दात लिहिलं आहेस हे...

माझ्या मते तर सर्वच गोष्टी युनिक असतात, कुठल्याच गोष्टीची त्याच प्रकारच्या गोष्टीशी तुलना होऊ शकत नाही. आणि हे तर काहीच नाही.... आमचं अमुक तमुक खूप मस्त... हे वाक्य आणि फिलिंग दोन्ही व्यक्तिसापेक्ष आहे. त्याचा त्रास करून घेऊ नये... जगरहाटी सुरू ठेवावी. Happy

परवा एका ओळखीच्या , दोन मुलांच्या आईच्या अजूनही छान दिसण्याबद्दल मी तिचं कौतुक केलं तर ती पटकन म्हणाली,'हे तर काहीच नाही, तू माझ्या लग्नाचा अल्बम पाहाच एकदा'
Happy स्वभावाला औषध नाही हेच खरं..

कल्पूच्या ह्या वाक्यांना सहमत,
>>मग सांगा ना की ही रेसिपी पूर्वी टाकलेल्या अमक्या वा तमक्या रेसिपीशी मिळती-जुळती आहे. कडवट भाषेत "अशिच रेसिपी वा ह्याच्या पेक्षा सोप्पी रेसिपी अमुक्-तमुकने २००९ मध्ये टाकलेली आह>><<<

मला खरेतर अजुन कळत नाही, दुसर्‍यांची कुठलीही रेसीपी आली की व त्या रेसीपीचा प्रतिसाद पाहून, लगेच काही जणं आपली रेसीपी लिंक देवून सांगायचे इथे मी पण मिळती जुळती लिहिलीय रेसीपी.
अरे कशासाठी पुढे पुढे करताय? लक्ष वेधायलाच ना? की खपत नाही दुसर्‍याल मिळालेला प्रतिसाद?
की आपण पण रेसीपी लिहिलीय, तिचा टीरपी तितका वाढला नाही मग आता पुढे करा. त्याहून ही कुरघोडी करणारे महाभाग इथे पाहिलेत, ही रेसीपी मी इथे पाहिलीय, किंवा वरची रेसीपी इथून उचललीय असे लिहिणारे असतात... हा तर इतका कुसकट भाग वाटतो ना...

अश्वीनी , +१

बाकी गंमतीच्या दृष्टीने, माझ्या आईला इंदोरची कचोरी, गुजरातच्या कचोरीपेक्षा छान असे कायम वाटते. पण ते तसे वाटायचे कारण माहेरवाशीण विरुद्ध सासर हे कळीचे आहे.

दक्षे, ते कारण आहेच गं पण नवरा बायकोची अशी भांडण ह्यात दुसरा मुद्दा माझं माहेर कसे चांगले आहे सासार पेक्षा असाच असतो बहुधा. Proud

इंदोरची कचोरी>> तुम्ही कधी आमच्याकडच्या शेगावची कचोरी खाल्ली का? एकदा खाऊन बघा. कशी टम्म फुगलेली असते आणि आतील सारण ताजे असते. इंदोरची कचोरी असेल चांगली पण शेगावच्या कचोरेची सर येणार नाही. सॉरी टू से!

शेवटी आलीच का बरोबरी बी?

शेगावच्या कचोरीला आता पूर्वीची सर अज्जीबात नाही, कारण मी व्हराडातली नसले तरी गजानन महाराजांच्या दर्शनाला काही वर्षापुर्वी गेलो असताना खाल्ली होती, पण हाय रे रामा! ना ती पूर्वीसारखी चव, ना तो आकार. खूप वाईट वाटले पण अफसोस. शेगावला जाणे नियमीत असायचे त्यामुळे त्यातला फरक कळणारच.

बाकी सासरी धाकटी जाउ अन सासूबाईंची चढाओढ चाललेलीच असते अशी. आर्च धन्यवाद. मजा आली वाचुन.

आमच्या लहानपणी बाहेरच खायला देत नसत मुला.न्ना. तेव्हा शेगावला ती कचोरी खाल्ली होती शाळेत असताना गेलते तेव्हा. खरच केवढी मोठी, ताजी अन टेस्टी होती. पण हल्ली तिथे तितकी चा.न्गली कचोरी मिळत नाही अस म्हणतात Happy

"हे तर काहीच नाही" हे उत्साहाच्या भरात, आप्ली पण भर घालायच्या दृष्टीने, आपल्या गावाची माणसा.न्ची आठवण आली म्हणून.. जेव्हा म्हणले जाते, तेव्हा काही वाटत नाही. पण दुसर्‍याला कमी लेखण्यासाठी हे का ना वापरतात तेव्हा ते चा.न्गले वाट त नाही.

लेख चा.न्गला आहे. Happy आमचे हे नेहेमीच त्या.न्ना काही सा.न्गितल की अग, हे तर काहीच नाही .... म्हणून आपली टकळी सुरू करतात.. Sad

Pages