एकदम घाईघाईतच ट्रिप ठरवली. सध्या आई, मावशी आल्यात माझ्याकडे. भारतातून बराच खाऊ आणलाय, शिवाय असं तसंही करून घेतलय. सताठ दिवस बाहेर म्हणजे तयारीही बरीच आणि जोरदार. माझ्या नेहमीच्या सवयीने एक यादी बनवली, ’न्यायच्या समस्त वस्तू’. पथ्य-बित्याचं निमित्तं आणि खाण्याची हौस त्यामुळे स्वयंपाक शक्यतो घरीच करण्याचा बेत होता.
आई, मावशी, मावसोबा...सगळ्यांचीच वयं झालीत. त्यामुळे सामान भरताना वातावरण जरा टेन्स.
तिच्य औषधांबद्दल अठ्ठावन्नाव्या वेळी विचारल्याने आई माझ्यावर वैतागली होती. कुठलाचतरी शर्टं कुठल्याचतरी पँटवर घेऊन आल्याने मावशी मावसोबांवर तडकली होती.
त्यांच्या शेव्हिंग किटचा उल्लेख लिस्टमध्ये नसूनही मी घ्यायला लावतेय म्हणून आमचे ’हे’ कोणत्या पीनलकोडखाली हा गुन्हा घालता येईल ह्या शोधात.
जिथे जिथे नजर जाईल तिथे तिथे सामान आहे. दुपारचं जेऊनच निघायचय त्यामुळे आत्ताच्या जेवणाची भांडीही आहेतच, इथेच कुठेतरी.
चार दिवस सगळी मोठी माणसं नाहीशी होऊन, अख्खं घर आपल्याला एकट्याला मिळणार म्हणून जरा अती उत्साहात मुलगा आपल्यामते सुचना देऊन आणि सामान भरायला लागून ’मदत’ करतोय.
’ह्याला मदतीला घे आणि हा सगळा पसारा आवर. आपण एकच नेतोय, गाडी ... ट्रक नाही. आम्ही पटकन बाजारात जाऊन येतो....’, मी आधी रडकुंडीला आणि मग चिडून हातघाईवर येण्याआधीच हे पुढे म्हणाले, ’का मी हे भरू आणि तुम्ही तिघी जाताय?... बाहेर?’.
एखाद्या सरळ वाक्यालाही केवळ एका ऐतिहासिक प्रमाणाची जोड असली की कसा एकदम कुत्सितपणाचा वास मारायला लागतो.... त्यातलं हे एक सरळसोट वाक्य!
ह्यांनी एकदाच आवरलेल्या स्वयंपाकघरात, माझ्या माहेरून आलेली सांडशी मी अजून शोधतेय. सांडशी वापरायच्या प्रत्येक वेळी तिच्या आठवणीने आता माझे डोळे भरत नसले तरी ह्यांचे कान उतू जातील इतपत तरी मी बोलते.
ह्या दोघी दोन पायांवर (प्रत्येकी एक), तय्यार व्हायच्या आधी मीच पांढरा झेंडा हलवला आणि विजयी मुद्रेने ते दोघेही बाहेर पडले. ज्याला ’घे मदतीला’ म्हणून दिला होता, तो मावशीचं बीपीचं मशीन आणि उघडं आमटीचं पातेलं एस्कीत ठेवत होता, मगाशी.
मग मी आधी त्या उपद्रवी मदतनिसाला पकडला आणि ब्रेकफास्ट बारच्या स्टूलावर त्याची प्रतिष्ठापना केली.
’हललास इथून तर याद राख. ही यादी. ह्यातलं एकेक वाचून दाखवायचं. आमच्यापैकी एकीने तोंडाने जोरात हो म्हटलं तरच त्यावर काट मारायची. मग पुढची वस्तू. कळ्ळं?’
’कळतला नाय तर काय? मराठी वाचुक येता त्याका!’, मावशी-आई मालवणीत बोलतात बरेचदा घरात.
ती यादी बघून तो म्हणाला, ’थांब! मी, आधी टॉयलेटला जाऊन येतो, मग पाणी पितो, मग काहीतरी खायला घेऊन इथे बसतो.’
त्यानंतर सुरू झालं ’माझं’ एकेक मराठी अक्षर लावत, त्याचं यादी-वाचन, आई आणि मावशीची त्यावर मालवणीत चर्चा, त्यातून माझ्या अक्षराला नावं ठेवणं, आणि लिस्टमध्ये अधिक वस्तूंची भर करीत त्याचं एकेक अक्षर लावीत लिहिणं.
लिलाव चालल्यासारखं चाललं होतं.
लेक: कॉफी
आई: घेतलय.
लेक: हो म्हण. तरच खोडणार.
मी: ए, खोड रे
लेक: ’चहा पावडर’
मावशी: ’हो’
लेक: बरोब्बर. मावशीआज्जी बघ कशी शाणी आहे, नायतर तू.
मी: ए, पुढे
लेक: साखर. आई, साखर अजून कशात घालणार?
मी: कशात नाही... का?
लेक: मग चहा साखर का नाही म्हणायचं? चहा पावडर सारखं?
मी: ए, चल रे बाबा पुढे.
मावशी: गो, आमचा इक्वल घेतलं मा?
लेक: मावशीआज्जी, आज्जीआई तुम्ही अजून इक्वल शेअर साठी भांडता?
मी: नाही रे. साखरेच्या ऐवजी... इक्वल.
लेकानं एकेक अक्षर लावीत ’इक्वल’ मराठीत लिहिलं.
त्याचं इतकं लावून लावून चाललं होतं की आम्हीच उतावीळ होऊन ’ता’ वरून ताकभात ओळखत होतो. त्यानं ’मी’ म्हटलं की मावशी ’मीठ’ उचलत होती आणि त्याने ’गू’ म्हटलं की आई ’गूळ’.
ह्यात पदार्थांची जातीने विचारपूस, मधे मधे माझ्या अक्षराला नाव ठेवणं चालूच होतं. आई-मावशी न गाळलेल्या जागा भरत होत्या.
लेक: सबूदाण्याच्या पाप्या... नाय थांब. सबूदाण्याच्या पाड्या... पापड्या. आई, हे कसं लागतं?
आई: काय गो अजून साबूदाण्याच्या पापड्या खाल्ल्यान नाय ह्याणा? शिरा पडो. आमच्या घराक व्हावान जातत पापड्यो आणि लेकराक अजून चव नाय?
मावशी: ह्या खेपेक घराक केल्लय, मी. विकतचे नाय हा. ह्या धुमशान संपला काय तळाया दुपारच्याक.
काय नव्हेच ते. ह्या पद्धतीने आपण आठ दिवस फक्तं सामन भरू. मीच शेवटी म्हटलं त्याला की प्रत्येक शब्दाचा पहिलं अक्षर वाच, आम्हाला कळतय. म्हणजे ’पुरण पोळ्या’ असं अख्खं न वाचता ’पू च्या पो’ असं. मग सुरू झाला जो ओळखा पाहूचा गोंधळ.....
लेक: सा च्या पा.
मावशी: ते कळ्ळं हं... पापड्या. हो.
लेक: फो च सा आणि कंसात हिंजीहमो.
मी: ऑ? हा हा. मला माहितीये... फोडणीचं सामान, हिंग, जीरं, हळद, मोहरी. घेतलं. पुढे.
लेक: फो चं ते
मी: फोडणीचं तेल. हो. पुढे.
मावशी: कोणतं वापरतेस गं? माझी न्यू जर्सीची पुतणी सांगत होती की ती सगळं कसल्या त्या ऑलीव्ह तेलात करते म्हणून? कोलेस्ट्रॉलला चांगलं म्हणे? तू खोड रे. तोंडाकडे नको बघत बसूस.
लेक: खो
आई: त्याचो कित्या शॉर्ट्फॉर्म करूक होयो? तुजा कायतरीच असता. खोड तू.
लेक: नाही गं. ते खोडलं. आता... खो. खो.
मावशी: काय?
लेक: ’काय’ नाय म्हणायचं. ’हो’ म्हण तर खोडतो.
आई: खोकल्याचा औषध असतला... खो गो?
मी: खो? हा हा खोबरेल तेल. घेतलं. हो.
लेक: ऊ शी र
मी: तर? काय सांगतेय मगापासून गधड्या? भरभर सांग.
लेक: उशी चा र. इथे लिहिलयस ते वाचतोय.
आई: उशीचा ’अ’ असेल. उशीच्या अभ्र्यातला ’अ’. उशीचा अभ्रा. तो कशाला? हा हा, खोबरेल तेल उशीला लागेल म्हणून असेल....
लेक: नाही ऊशी चा ’र’ च.
मी: गाढवा, ते उपमा, शिर्याचा रवा! भाजून ठेवलेला.
लेक: नाही. भाजून ठेवलेला नाही लिहिलय. मग मी ’उ शी र भा ठे’ म्हटलं नस्तं का?
मी: कळ्ळं. हो. पुढे.
आता त्याला जरा वेळ मिळायला लागला आजूबाजूला बघायला. त्यामुळे आम्हाला काही मिळत नसल्यास शोधूनही देत होता. एव्हाना आम्हाला प्रत्येक गोष्टीचं हसूही येत होतं.
लेक: पू च्या पो
मावशी: मिळ्ळ्या. हो.
लेक: खा
मावशी: अत्ता नाही त्या उद्याक. सकाळी तिथे पोचल्यावर.
लेक: नाही गं. खा.
मावशी: किती प्रेमान सांगता बघ, गो. अरे, आमची वया झाली आता. आत्ता दुपारचा जेऊचा असा. आत्ता पोळ्यो कशे खातलो? तू खा हो, भूक लागली असेल....
मी: बघू?... अरे खाकरा. खा काय खा?
लेक: मग पूर्णं वाचू?
मी: नको नको. तुझं चालू दे.
लेक: पो चं पी... नाही नाही थांब खोडलय ते.
मी: तिथे कोण पोळ्या करत बसणारय? म्हणून खोडलय. पुढे.
लेक: माझ्यासाठी पोळ्या नका करून ठेऊ. मी पिझ्झा आणणारय...
मी: काय आठ दिवस?
लेक: हो. आता... तू, ती....
आई: अरे काय चल्ला तुझा त त प प? सांग काय होया तुका? आवशिक मुळ्ळीच घाबरा नको. माका सांग. काय होया?
लेक: अगं, तू, ती!
मी: तूप, तिखट?
लेक: बरोबर.
आईने कपाळावर हात मारला.
लेक: भो चे घा
मावशी: खुय? ठेवल्यानी ह्यांनी? हुयसरच आणून ठेऊक सांगलय त्यांका. भोपळ्याचे घारगे.... भोपळ्याचे घारगे....
लेक: ते काय! टॉ च्या कोच्या बाजूला आहेत.
वैतागवाडी कधीच विसरून आता खेळ खंडोबा झाला होता... हसून हसून मुरकुंडी वळून झाली होती. त्या पसार्यातच आम्ही पसरलो.
तितक्यात दार वाजलं आणि लेकानं विचारलं कोण?
आई आणि मावशी दोघी एकाच वेळी म्हणाल्या, ’तुझ्या आ चो घो’!
(आवशीचो घो)!
समाप्त!
जायले, ड्रुव...
जायले,

ड्रुव... :फिदीफिदी:
लवान्या... (लावण्या)...
ह ह पु वा
ह ह पु वा
दाद मस्त मजा आली वाचून . माझी
दाद मस्त मजा आली वाचून .
माझी आई पण याच brand ची आहे . भन्नाट विनोदबुद्धी.
टोटल.
(No subject)
Pages