त्याचे असे झाले... भाग ६

Submitted by chaukas on 16 February, 2012 - 05:00

हुश्श करून बसलो खरा, पण त्याच वेळेस दोन गोष्टी मला अचानक जाणवल्या. एक म्हणजे आतून काहीतरी आवाज येत आहेत. आणि दुसरे म्हणजे बसताना मला काहीसे अडचणीचे वाटत आहे.

त्यातील पहिल्या घटनेने मालूच परत आली आहे असे वाटून माझी हबेलंडी उडाली. बरखा भूतलावरच्या याच विभागात आहे या विचाराने हबकलेले माझे हृदय आत्ता कुठे मिनिटाला बाहत्तर (का तत्सम काहीतरी संख्या) ठोक्यांवर येऊ पाहत होते. त्यात मालूला अचानक सामोरे जाणे, म्हणजे मी सकाळपासून केलेल्या पापांची जंत्री आठवू लागलो. 'मला काम आहे' अशी थाप मारून मालूला घरी येण्याच्या (आणि मला पोहे करून खाऊ घालण्याच्या) विचारापासून परावृत्त करून मी बाहेर कुठे गायब झालो होतो हे एकच आठवड्याभराच्या मूकयुद्धाला (आणी नंतरच्या अतीखर्चिक तहाला) पुरेसे होते. परत त्यात "माझ्या हातचे पोहे नकोत, तर तसे सरळ सांग. मी मुळी स्वैपाकच करणे सोडून देणार आहे. नाहीतरी मला स्वैपाक करता येत नाहीच" असा तिसराच धुमारा फुटला असता तर...

...कल्पनेनेच मला कापरे भरले. ..चोराच्या मनात चांदणे... बाळाने परत येऊन मालूला सगळा (बरखा संबंधीचा) वृत्तांत सांगितला असेल तर... आता मात्र हबकून मी उभाच राहिलो. घाम पुसायला रुमाल काढावा असा विचार केला आणि आतून "फटाक" असा शीतकपाटाच्या दारावर हातातल्या फडक्याने वळ उमटवण्याचा केलेला प्रयत्न स्वच्छ ऐकू आला. नंदाबाई! हुश्श! पहिल्या कोड्याचा उलगडा झाला!

नंदाबाई या आमच्याकडच्या महा-कामवाल्या बाई. (इथे जरा गडबड झाल्यासारखी वाटते, पण 'वेडा खोका' पाहून आणि/किंवा त्यातील कार्यक्रमांवर चर्चा करून विचारशक्तीवर परिणाम झाल्याने मला 'महा' हे विशेषण नक्की कुठे लावायचे हे फारसे समजत नाही). शीतकपाटाचा दरवाजा आणि त्या यांचे जुने वैर. त्यामुळे दिवसातून चारपाचदा तरी त्या दरवाज्याला सटासट फटके (फडके) मारून वठणीवर आणण्याचा त्यांचा आटोकाट प्रयत्न चालू असतो. मालूला त्यात काही गैर वाटत नाही (मी त्याबद्दल तक्रार केली तर मात्र गैर वाटते). कारण कळलेच असेल - नंदाबाई मालूच्या माहेरीदेखील काम करतात.

पहिले कोडे सुटल्याचा क्षणिक समाधानातून मी खाडकन जागा झालो. माझा अंक-उच्च मी तसाच सोडून भटक्याच्या भ्रमंतीला (मात्र भर दिवसा) निघालो होतो हे आठवत असेलच. आणि कुठल्याही संगणकाशी संबंधित असलेल्या वस्तूशी नंदाबाईंचे असणारे वैर शीतकपाटाच्या दरवाज्याबरोबर असणाऱ्या वैरापेक्षा किमान तीन पट जहाल होते. एकदा मी कुठल्यातरी मासिकात 'माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना भेडसावणारे आरोग्याचे प्रश्न' हा माहितीवजा लेख वाचला (तो लेखच जास्त भेडसावणारा होता) आणि खुर्ची-मेज वापरणे वाईट असे जाहीर करून भारतीय बैठक मारली. तेवढ्यात आमच्या कार्यालयात कोणीतरी पेटले आणि मी भ्रमणध्वनी वापरून ती आग विझवायच्या प्रयत्नाला लागलो. भ्रमणध्वनीचा 'टप्पा' आमच्या बैठकीच्या खोलीत नीटसा येत नाही, त्यामुळे मी आमच्या पाहुण्यांच्या खोलीला असणाऱ्या सज्जात गेलो. 'कार्यालयात कोणीतरी' कशाला, सांगूनच टाकतो, आमच्या कार्यालयातील शायनी अहुजा नावाची ढळढळीत पंजाबी 'सहायक लेखापाल' माझ्या हाताखालच्या एका सहायकाचा प्रवासभत्ता 'मंजूर करता येणार नाही (कारण भाडोत्री तिचाकी वाहनाने प्रवास केल्याचा काहीही पुरावा नाही)' असा हट्ट धरून बसली होती. तिची समजूत काढताना मालूने ऐकले असते तर पुढच्या पंचनाम्याला तोंड देताना पुरेवाट झाली असती.

तर मी त्या सज्जातून आगीवर पाणी टाकायचा प्रयत्न करत असताना माझा अंक-उच्च (ज्यांना हा संस्कृतोद्भव शब्द खटकू लागला असेल त्यांनी सरळ 'मांडी-वर' म्हणायला हरकत नाही) चालूच ठेवून आलो होतो हे विसरलो. दरम्यानच्या काळात नंदाबाई साफसफाईच्या कामाला लागल्या होत्या. माझा अंक-उच्चाचा पडदा 'पडदा वाचविणाऱ्या'वर गेला होता. ती चित्रविचित्र नक्षी नंदाताईंना फारच मळकट वाटली म्हणून त्यांनी (फिनाईल घातलेल्या) पाण्याने तो पडदा (आणि उगाच शंका नको म्हणून खालचा कळपट) लख्ख पुसून काढला. अर्थात "कामाची वस्तू अशी बाहेर टाकून कशाला जावे? त्या बाईला काय कळतंय, तिला कळत असतं तर ती नसती का तुझ्यापेक्षा जास्त कमावत (हे बोलायची काही गरज होती का?) आत्तापर्यंत?" अशी आकाशवाणी तदनंतर नंदाताईंच्या उपस्थितीतच झाल्याने माझे तोंड गप्प ठेवावेच लागले. तरी जरा बरे. आधी माझ्याकडे 'मेज-उच्च' होता तेव्हा एकदा नंदाताईंनी त्याच्या 'केंद्रीय प्रक्रिया विभाग' दडवलेल्या खोक्यालाच पाण्याने शंभो..ऽ केले होते. आणि माझ्या एका 'अंगठा चालवणे'ला तो मळकट दिसतो म्हणून साबणपाण्यात भिजत घालून घासणीने घासले होते.

तर आज सकाळच्या झपूर्झावस्थेत बाहेर पडताना मी अंक-उच्च चालूच ठेवला होता हे आठवले आणि घाम पुन्हा उफाळून आला. तो पुसायला खिशात हात घातला आणि दुसऱ्या कोड्याचे उत्तर सापडले. बाळाला 'चाल चाल' करताना शिष्टाई करून मी ते मॅकडालची क्वाट्टर माझ्या तुमानीच्या खिशात सरकवली होती आठवते ना? तीच भसकन हातात आली. बावळटासारखी (म्हणजे वेगळे काही केले नाही) मी तिला तिच्या लपणापासून संपूर्ण बाहेर काढली आणि अती-बावळटपणा सिद्ध करण्यासाठी तिच्याकडे आ वासून पाहत राहिलो.

आणि नंदाबाईंचे बाहेरच्या खोलीत आगमन झाले. वा! काय दृश्य होते!

आणि प्रसंगावधान का काय ते कशाशी खातात ते मला कधीच उमगले नाही. नंदाबाईंचे चित्त विचलित करण्यासाठी काहीतरी बोलून त्यांना परत स्वैपाकघरात पिटाळावे की नाही? तर मी त्यांना विचारले "नंदाबाई, आजचे वर्तमानपत्र पाहिलेत का कुठे?". वर्तमानपत्र ही स्वैपाकघरात सापडणारी गोष्ट नसते हे ध्यानात राहिले असते तर कशाला पाहिजे होते? (आणी माझ्या ताब्यात घर असले तर वर्तमानपत्र स्वैपाकघरातच सापडते).

माझ्या हातातल्या त्या 'क्वाट्टर'कडे डोळे भरून पाहत माझ्या उजव्या कोपरापासून तीन इंचांवर असलेल्या मेजावरचे वर्तमानपत्र नंदाबाईंनी माझ्या हातात दिले (खुपसलेच म्हणा ना; 'चपटी हातात दिसतीया, येकांदी तरी प्वॉटात ग्येली आसलच. प्येपर हातामंदी पकडायाबी जमनार न्हाई' हा विचार मला लख्ख ऐकू आला) आणि सज्जाच्या दिशेने प्रयाण केले.

पुढचे पुढे पाहू म्हणून मी आधी स्वैपाकघरात कूच केले. आज नंदाबाई खुशीत होत्या वाटते. माझ्या अंक-उच्चाला पाण्याचे बोटदेखील लागले नव्हते. मी घाईघाईत तो उघडायला गेलो. आत्तापर्यंत माझ्या हातात ती बाटली होती हे मी विसरूनसुद्धा गेलो होतो. पण ती बाटली नव्हती विसरली. अंक उच्च उघडण्याच्या नादात माझी तिच्यावरील पकड सैल होताच तिने सरळ खालच्या फरशीवर उडी घालून कपाळमोक्ष करून घेतला. नंदाबाई खरेच बाहेर सज्जात गेल्या होत्या असे वाटत नाही. कारण बाटलीच्या आत्मघातानंतर तीनेक सेकंदांतच त्यांचे घटनास्थळी वेगाने आगमन झाले आणि रमच्या घमघमीत वासाचा भपका माझ्या नाकात पोचेस्तोवर त्यांचे "आसूं द्या, म्या साप करती" हे तुटक (पण भलतेच ताकदवान) शब्द पूर्ण क्षमतेने प्रक्षेपित झाले. मी मुकाट अंक-उच्च उचलला आणि बाहेरच्या खोलीत गेलो. ("येक सबूद नाय निंगाला त्वांडातून, मान खाली घालून ग्येलं मुकाट... आन मालूताए, चालबी सशी सरळ न्हवती बरं का"... मला भविष्यवाणी ऐकू येते हे मला तेव्हा समजले).

निदान इ-पत्रांच्या आघाडीवर तरी शांतता असेल आणि नंदाबाई असेतोपर्यंत काम केल्याचा देखावा करावा म्हणून अंक-उच्च उघडला. इ-पत्रे फार नव्हती. दोनच होती. पण ती पाठवणाऱ्यांचे नाव पाहून (आणी त्यातल्या एकावर लागलेले 'लाल निशाण' पाहून) मला आता घाम पुसायला रुमालासारखा टीचभर कपडा पुरणार नाही हे समजले.

पहिले इ-पत्र पेगीचे होते. "प्रयत्नले बोलवावयास तुला. कृपया संपर्क साध ताबडतोब" हा त्याचा गोषवारा. दुसरे लालबावट्याचे निशाण मिरवणारे इ-पत्र नवीनासुराचे. "कुठल्या नरकात आहेस तू? कुठल्या नरकात आहे तुझा भ्रमणध्वनी? बोलाव मला जि. श. ति. लौ. (जितक्या शक्य तितक्या लौकर; इंग्रजीत ASAP)".

यापेक्षा ती अख्खी क्वाट्टर (पाणी वगैरे क्षुद्र गोष्टी न मिसळता) मारली असती तर बरे झाले असते. आणि ती फुटली नसती तर मी तेही केले असते. कारण एव्हाना मला डोके आहे, असल्यास ते जागेवर आहे, जागेवर असल्यास ते चालू आहे यावरचा माझा विश्वास उडत चालला होता. मानवी मेंदू 'पुनर्चालू' करण्याची काही युक्ती का नाही शोधून काढत हे जैवतांत्रिक शास्त्रज्ञ? उगाच त्या मेंढ्यांच्या मागे कशाला लागता?

मी भ्रमणध्वनी बाहेर काढला. अजून एक कोडे सुटले - नवीनसुर का उधाणला होता ते कळले. माझा या आधीचा भ्रमणध्वनीचा वापर त्या चिकट्याच्या तावडीतून सुटण्यासाठी त्या पत-पत्र विकणाऱ्या कन्येशी गुलुगुलू बोलण्यासाठी झाला होता हे आठवत असेलच. आणी भ्रमणध्वनी वापरण्याच्या बाबतीत माझे घोर अज्ञानही मी उघड केलेच आहे. त्याचे असे झाले होते, की माझ्या त्या भ्रमणध्वनीला संभाषण बंद करण्यासाठी जी कळ होती तीच कळ अंमळ अधिक काळ दाबली तर ते यंत्र बंद होत असे. आणि तसे ते झाले होते. थोडक्यात, माझ्या त्या सुंदरीबरोबरच्या संवादानंतर ते बंदच होते. कोणत्या पर-पीडनात (पुरू-पीडनात) आनंद मिळवणाऱ्या हलकटाने त्याचा तांत्रिक आराखडा केला असेल बरे... पण विचारात फार काळ गुंतून राहणे शक्य नव्हते. अन्यथा नवीनासुराने कायमचा घरीच बसवले असते. घाईघाईत त्याच्याशी भ्रमणध्वनीवरूनच संपर्क साधला (आता तरी चालू आहे बघ लेका). तो नेहमीप्रमाणे कुठल्यातरी ग्राहक-बैठकीतच होता (असे म्हणाला; घरी बायकोने कशालाही बोलावल्यावरदेखील असेच म्हणत असेल). त्याने उडवलेले बरेचसे फटाके भारतीय दंड विधानाच्या कुठल्या ना कुठल्या कायद्याखाली अश्लील ठरतील, त्यामुळे त्यांचा गोषवारा देतो.

प्रथम त्याने मी शुद्धीवर आहे ना, माझे डोके ठिकाणावर आहे ना (मला ब्रिटिश सरकार आणि स्वतःला लोकमान्य टिळक समजतोस काय रे?) याची मन लावून चौकशी केली. मी जेव्हा सर्व काही आलबेल आहे असे पटवायचा प्रयत्न केला तेव्हा "दीपक होता म्हणत काहीतरी वेगळे" असे जाहीर केले. त्या चिकट्यासमोर घडलेल्या पहिल्या प्रसंगाचे (बाळाचा भ्रमणध्वनी खिशात घेऊन हिंडणे, तो (भ्रमणध्वनी) बेंबाटायला लागल्यावर तो डकाव डकाव करीत येणाऱ्या बाळाच्या हातात देणे) स्पष्टीकरण देणे माझ्या (या क्षणी तरी) कुवतीबाहेरचे असल्याची मला खात्री असल्याने मी गप्प बसलो. {तू भेटच रे चिकट्या... आमच्या 'ताज्यां'ना 'कमावण्यायोग्य' करतोस काय? तुला कायमचा 'कमावण्याअयोग्य' करून ठेवतो बघ..... अर्थातच निष्फळ स्वप्नरंजन}

मग त्याने सकाळच्या बैठकीची अगदी खोदून चौकशी केली तेव्हा कळले, की लांडगा आला रे आला ही आवईच आहे म्हणून मी जो निवांत (ढेकरा देत) बसलो होतो, ती आवई नसून अचानक घडामोडींनी वेग घेतला आहे. दस्तूरखुद्द पेगीजी (हा नवीनासुर कुणालाही बिनधास्त 'जी' लावून मोकळा होत असे. आमच्याकडे एकदा 'जो' नामक अवतार आला होता त्याला 'जोजी, जोजी' करून नवीनासुराने दिवसभर जोजवला होता) रविवारी रात्री भारतात अवतीर्ण होणार असून तोपर्यंत ते 'बिंदू-जाळ्या'खेरीजचे तंत्रज्ञान या प्रकल्पाला किती योग्य आहे याचा नवीनासुराला अभ्यास करून त्याचा सविस्तर अहवाल सादर करायचा होता.

आज सक्काळी सक्काळी मी जो नवीनासुराशी माझ्या पेगीबरोबरच्या बैठकीचा वृत्तांत सांगण्यासाठी संपर्क साधला होता त्यात 'दुसऱ्या तंत्रज्ञानाची माहिती गोळा करण्याचे काम एक दिवसात करायचे आहे' असे मी धडकावले होते हे आठवत असेलच. मग नवीनासुराला एवढा आरडाओरडा करायचे काय कारण? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुम्ही माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्राबाहेरचे दिसता.

ग्राहकाशी बैठक करताना वायफाट गमजा मारायच्या असल्या की वरिष्ठांनी पुढे व्हायचे आणि त्या गमजा पूर्ण करण्यासाठी पाठीचा काटा कनिष्ठांनी ढिला करायचा असा इथला नियम आहे. हा ज्येष्ठताक्रम मी उलटवला होता हे एक कारण. आणि त्या बैठकीला मी बसावे ही नवीनासुराचीच सूचना होती, त्यामुळे मी माझ्या अधिकारांच्या बाहेर जाऊन घुसखोरी केली असे त्याला म्हणता येत नव्हते हे दुसरे कारण. तसेही रेटून म्हणाला असता तो, पण गधड्याने 'त्या बैठकीला पुरु हजर राहील' असे इ-पत्रच पेगीला पाठवले होते (असे पेगी सकाळच्या 'बार्शी लाईट'च्या वेगाने झालेल्या संभाषणात केव्हा तरी म्हणाली होती). त्यामुळे अद्वातद्वा बरळण्याखेरीज (आणी खरोखर तो अहवाल तयार करण्यासाठी कुणीतरी बकरा 'आजच्या आज, आत्ताच्या आत्ता' पकडण्याखेरीज) त्याच्याकडे दुसरा कार्यक्रम असणे शक्य नव्हते.

त्यातूनही सकाळी त्याने माझे बोलणे खरेच गंभीरपणे घेतले असते तर एवढी पळापळ झाली नसती. पण उमटलेली हाक खरी नसून ती आवई आहे असे मानणारा मी एकटाच नव्हतो. आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे कनिष्ठाचे बोलणे वरिष्ठांनी (विशेषतः 'वरिष्ठ व्यवस्थापकांनी') गंभीरपणे घेणे हा आमच्या क्षेत्रात दखलपात्र गुन्हा मानला जातो.

थोडक्यात, 'राजाने मारले आणि पावसाने झोडले' यात 'वरिष्ठ व्यवस्थापकाने झापले' अशी भर घालून गप्प बसण्यावाचून गत्यंतर नव्हते. पेगीचे इ-पत्र अगदी साधे होते, 'आपल्या बोलण्याचा गोषवारा नवीनासुराला कळवलाच असशील' अशा धाटणीचे. पण ते पेगीकडून आल्याने खरे असल्याची खात्री पटली आणि नवीनासुर तुमानीत निखारे पडल्यासारखा पिसाटला. आणि त्यात त्या चिकट्याने वरून त्याचा पावशेर ओतला.

असो, माहिती तंत्रज्ञानात माझे काळ्याचे पांढरे (खरे तर काळ्याचे थेट 'नाहीसे') होत आले असल्याने हे एवढे गंभीर नाही हे कळले. फक्त 'जाताना पुरोगामी' अशा गोष्टी होणार नाहीत याची काळजी घेईन असे शब्दांचे बुडबुडे काढणे गरजेचे होते. तेवढे केले आणी मुख्य समस्येवर विचार सुरू केला.

या सगळ्या भानगडीत नवीनासुराचे बरे नाक ठेचले गेले होते, मग समस्या ती काय? तर मी पेगीचा जो लिंगबदल केला होता, तो आता कसा निभावायचा याचा 'मालक आराखडा' आतापासूनच तयार करायला हवा होता.

आणि दारावरची घंटी वाजली. कोण आहे म्हणून पाहायला गेलो तर आमच्या शेजारची मैत्रेयी. ही व्यवस्थापनात पदव्युत्तर शिक्षण घेणारी 'आज'च्या पिढीतली कन्यका. तिच्याबरोबर एक छाकटी (खोटे का बोला?) तरुणी. "काका (प्रथम ही हाक ऐकली त्यावेळी काळजाला डसलेल्या इंगळ्या आता जरा नांग्या बोथाटून बसल्या होत्या, तरीही, काका....!), ही श्रुती मल्होत्रा, (पंजाब्यांची लोकसंख्या अचानक एवढी वाढली?) माझी प्रकल्प सहचरी. आम्ही 'माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रापुढील आव्हाने' यावर प्रकल्प करीत आहोत. त्यासाठी तुमच्याशी जरा बोलायचं होतं, तर कधी वेळ आहे?"

आता "काका" म्हणून (वाढत्या) वयाची जरी जाणीव करून देत असली तरी ही मुलगी मला आवडे, कारण (जवळजवळ शुद्ध) मराठीत ती बोलत असे. पण नंदाबाई अजून आत होत्या. "मालूताए, तुमी नसतानी दोन पोरी आल्या व्हत्या आनी बसल्या व्हत्या चांगल्या तासभर...म्या भाईर गेली तरी त्या बसलेल्याच...काय ती कापडं..." हा संवाद प्रक्षेपित होणे टाळणे गरजेचे होते. आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे रमच्या वासाचा भपकारा अजून चांगलाच दरवळत होता. आणि या आजच्या पिढीला "औषधाची बाटली फुटली" हे सांगण्यात अर्थ नव्हता. 'असले' औषध लागणारा रोग कुठला हे त्यांना लख्ख उमगले असते.

"अं मैत्रेयी, आपण दुपारी भेटू या का? आत्ता मला जरा काम आहे (उदबत्त्या लावतो, धूप जाळतो...) मी बोलावू तुला नंतर?"

"हो..ऽ काहीच हरकत नाही. मी नसले तरी ही श्रुती असेल माझ्याच घरी. मला कदाचित बाहेर जायला लागेल"

अशा रीतीने त्यांना निरोपाचे विडे देऊन परतलो. नंदाबाईंचे उरकतच आले होते. काय करावे बरे? कामाची वाटणारी फालतू कागदपत्रे पाठवून पाठवून नवीनासुराला शांत करायला अर्धा तास लागला असता जेमतेम. आणि बाकीची नैमित्तिक कार्यालयीन कामे करायला अजून एक तास. म्हणजे बाराच्या सुमारास मी अगदी मोकळा झालो असतो. तेव्हा बरखाला भेटायचेच (होऊन जाऊदे तिच्या मायला) असे ठरवून मी कामाचे गटार उपसायला लागलो.

भाग १: http://www.maayboli.com/node/32726
भाग २: http://www.maayboli.com/node/32727
भाग ३: http://www.maayboli.com/node/32728
भाग ४: http://www.maayboli.com/node/32729
भाग ५: http://www.maayboli.com/node/32730
भाग ७: http://www.maayboli.com/node/32732

गुलमोहर: