वाक्यात उपयोग (भाषा १/४)

Submitted by Arnika on 15 February, 2012 - 11:58

भाषा...म्हणजे आपली एक ओळख!
कानी येणारे आवाज, अर्थांचे भास
तोंडचा प्रत्येक शब्द, आणि प्रत्येक श्वास
भावनेचा आकार, शाईचं ओलं वळण;
काना,मात्रा,रफारांचं अर्थवाही वजन.
नाम, विशेषण, क्रियापदे, कविता आणि म्हणी;
खोदाल तितक्या खोल खोल विचारांच्या खाणी...
मौन, वाचन, कथन; परेपासून वैखरी
हृदयांच्या हृदयांशी भेटी उराउरी...

भाषा... अखंडपणे वापरला जाणारा, वाढत्या वयानुसार जास्त सक्षम होणारा आपला एक अदृश्य अवयव. यापुढील चार लेखांची मालिका म्हणजे याच भाषा शिकताना, स्वीकारताना, अनुभवताना, वापरताना आणि विसरताना गाठीशी आलेले काही वेचे आहेत. आयुष्याचा एक रोजचा, नियमित घटक असूनही तितक्याच नियमितपणे अचंबित करणाऱ्या भाषा. कधी जन्मापासून कानावर येत असूनही ऐन वेळेवर नेमकेपणाने ओठावर न येणाऱ्या तर कधी नुकतीच ओळख झालेली असतानाही नकळतपणे अचूक शब्द ओठाशी पाठवणाऱ्या. माणसं जोडणाऱ्या, तोडणाऱ्या; आणि इतर अनेक जीवांच्या रंगीत अस्तित्वात माणसाला ठळक करणाऱ्या...

आपल्या भाषेतला पहिला शब्द उच्चारल्याचा घरभर होणारा आनंद, बाराखडी गिरवताना पहिल्यांदा ‘ज्ञ’ ची वळणं आणि गाठी अचूक आल्याचं समाधान, रिक्षाच्या वेगात रस्त्यावरून जाताना एखाद्या हॉटेलच्या नावाची ‘समुद्रदर्शन’ ही पाटी वाचल्याबद्दल मिळवलेली शाबासकी, वर्तमानपत्रातील मथळ्यांत ‘दृष्टिक्षेप’ हा शब्द असूनही संपूर्ण ओळ न अडखळता वाचल्याबद्दल मिळालेली नवीन पेन्सिल, आणि पहिलीत भाषेच्या अभ्यासाला पहिल्यांदा मिळालेला ‘उत्तम’ असा शेरा, या क्रमानंतर भाषा या अवयवाची जाणीव मावळत जाते. त्यापुढे आपण नकळत आपल्या भोवतालातून भाषा टिपत जातो, आपल्या नकळत तो अवयव बळावत जातो. मग हिंदी, इंग्लिश, किंवा संस्कृत शिकण्याच्या सुरुवातीला पुन्हा एकदा आपल्या ‘भाषेत गोळा’ येतो. जन्मापासून अवती-भोवती असलेल्या आईची खरी जाणीव जशी तिचं बोट पहिल्यांदा सोडताना होते, तसा मराठीचा अभाव तिचं बोट सोडताना पहिल्यांदा जाणवतो. आपापल्या भाषेत सहज व्यक्त होत असणारे आपण इतर भाषा शिकताना तरबेज चमचा लिंबू पटूला बेडूक उड्यांच्या शर्यतीत उभं केल्यागत बावरतो...हळुहळू नव्या भाषांचे दिशाकोन अंगवळणी पडत जातात, गळ्यातली नवसाक्षराची पाटी काढून टाकत त्या भाषांवरही हलकेच अंकुश ठेवायची पात्रता येते. जग आपल्याभोवती मोठंमोठं होत जातं, नवनवीन प्रांतांतील, देशांतील वल्ली भेटतात, भाषांची देवाणघेवाण होते. दोन भाषांमधील अंतर, त्यांचं मूळ पारखताना आपली भाषिक मुळं पुन्हा एकदा आपल्याला मातीशी ओढायला बघतात. आठवणीने व्याकूळ होऊन चार वाक्य स्वतःच्या भाषेत बोलायला जावं तर आता तोही खुंटा बळकट राहिलेला नसतो...

प्रत्येकाला कदाचित याच क्रमाने हे अनुभव येत असतील.त्यातील माझ्या वाट्याला आलेले, सगळ्यांबरोबर वाटून साजरे करावेसे वाटणारे हे काही कडू-गोड आणि आंबट-तिखट घास साकारवर वाढण्याचा मानस आहे. पंगतीचे ‘पार्वतीपतये’ ७ फेब्रुवारीला आणि सांगता जागतिक मराठी भाषा दिवशी, म्हणजेच २७ फेब्रुवारीला आहे.तेव्हा तुम्हाला सगळ्यांना ‘भाषा’ पंगतीसाठी साकारवर आग्रहाचे निमंत्रण !

********

“Oh, that is so very kind of you, thank you for your hospitality” शिरीन मनापासून म्हणाली. पुस्तकातही औपचारिक वाटेलसं इंग्लिश कानावर आल्याने मी गोंधळले, कारण इतके भरभरून माझे आभार मानण्यासारखं काहीच झालं नव्हतं. पहिल्यांदाच घरी आलेल्या शिरीनच्या हातात मी फक्त पाण्याचं भांडं ठेवलं होतं. हे अकारण धन्यवाद कसे स्वीकारावेत मला कळेना! “It’s my pleasure’’ हे माझं अवघडलेलं उत्तर बाळबोध आणि खोटं वाटायला लागलं. पुढे सगळ्याच इराणी मंडळींमधे मिसळताना हा अनुभव आला. ‘कशी आहेस’ ला ‘तुझ्या कृपेने उत्तम’. माझ्या ‘परत भेटू’ ला यांचं ‘देव तुझी काळजी घेवो’ हे भरजरी उत्तर! ‘आज उशीर होणार आहे’ हे सांगताना मेहदीचं इंग्लिश व्याकरण हमखास चुकेल, पण ‘तुझ्यासारखी मैत्रिण मिळणं हे माझं परमभाग्य आहे’ म्हणताना अचूक राजेशाही इंग्लिश!
“इतके मोठाले इंग्लिश शब्द तुम्ही सुरुवातीलाच कसे शिकता?” न रहावून मी अफ़सानेला विचारलं.
“मोठे कसले? नेहमीच्या वापरातले शब्द नाहीत का हे?” अफ़साने आश्चर्याने म्हणाली.
तिच्या म्हणण्याचा अर्थ फारसी शिकायला लागल्यावर कळला. त्या भाषेत जात्याच एक विनम्र आदब आहे पण शब्दांचं इंग्लिशमधे भाषांतर जसंच्या तसं झालं तर आदब मागे पडून जडपणा जाणवतो आणि आदबीचं भाषांतर करायला गेलं तर शब्द बदलतात.

तेव्हापासून वेगवेगळ्या मातृभाषा मिरवणाऱ्या माझ्या अनेक मित्र-मैत्रिणींच्या प्रथमश्रवणी विचित्र वाटणाऱ्या इंग्लिशकडे अधिकाधिक लक्ष जायला लागलं... भाषांतरित होणारा प्रत्येक शब्द एक सबंध संस्कृतीची शेपटी घेऊन येत असल्याने त्याचा परक्या भाषेतील एखाद्या ‘वाक्यात उपयोग’ करताना दूध-ताक एकत्र करावं तसा गोंधळ होत असतो. सवयीने त्यातील काही गोंधळांचं भाषांतर करून घ्यायला कान शिकले, तर काहींशी अजूनही दोन हात करणं चालू आहे! काही ग्रीक आणि इराणी गोंधळ इंग्लिशला बुचकळ्यात टाकतात, पण मराठी ते लगेच समजून घेते. ‘The papers are in my feet’, ‘I did so many mistakes’ आणि ‘I came today morning’ या वाक्यांना इंग्लिश कान बावचळून टवकारतात, तिथे माझ्यासाठी या वाक्यांचा मराठीत साधा-सरळ अर्थ ‘कागद माझ्या पायात पायात येतात’, ‘मी खूप चुका केल्या’ आणि ‘मी आज सकाळी आले’ इतके सोपे असतात.

बारावीच्या सुट्टीत दिल्लीला दोन आठवडे राहून आलेल्या हॅनाला मात्र तत्सम वाक्यांबद्दल अनेक प्रश्न पडले होते. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पाठीवरचं दप्तर न उतरवता ती म्हणाली, “I loved it there! Funny language though. Don’t you say one-one plate for one-one person?” मी चेहऱ्याचं प्रश्नचिन्ह करून तिच्याकडे बघत राहिले... अधीरपणे हॅना म्हणाली, “That’s what Rashmi used to say when we were in restaurants. She also tells me to walk slowly-slowly when it’s raining. You speak Hindi, don’t you?” मग (अर्ध्या मिनिटाच्या शांततेनंतर) माझ्या डोक्यात ‘उजेड पडला’. दिल्लीच्या रश्मीने ‘एक-एक थाली’ आणि ‘धीरे धीरे चलना’ हे वाक्‍प्रचार इंग्लिश गिरणीतून काढले पण त्यांचं ‘one plate each’ आणि ‘walk carefully’ असं पावाच्या मैद्यात रुपांतर होण्याऐवजी त्या वाक्यांना कणकेचा वास तेवढा राहिला होता.

बाकी भाषांबद्दलच्या कुतुहलात भिजताना हे विसरायला होतं की जिला ‘आपली’ म्हणतो तीही कोणासाठीतरी ’बाकी’च्या भाषा या गटात मोडते. आपल्या भाषांबद्दलही इतरांना असे प्रश्न पडू शकतात ही गोष्ट मला कायम नवीनच वाटत रहाते. मग सुरळीत चालू असलेल्या संभाषणात मधेच एखादी लटकी रस्सीखेच होते. बहीण-भावंडांबद्दल अशाच गप्पा चालू असताना एकदा आंदोनीयाने विचारलं, “How old was your mum when she made children?” (यावर आईची प्रतिक्रिया- Made you? म्हणजे मला मातीचा गणपती केल्यासारखं वाटतं).
“अगं made children काय वेडे? असं नाही म्हणत! मुलं म्हणजे काय केक आहेत का? इंग्लिशमधे had children म्हणतात.” मी हसत म्हणाले. माझ्या वाक्याची मिनिटभर मनात उजळणी करत आंदोनीया म्हणाली, “शी! Had children काय? मुलं म्हणजे काय कांजिण्या आहेत का? इंग्लिशची कैवारीण मोठी!”
चार वर्षांपूर्वीचा ही गोष्ट आठवून आम्ही परवा हसत होतो. आंदोनीया म्हणाली, “होतं काय सांगू का? मी कुठल्याही भाषेत बोलले तरी मनात मला ग्रीकच ऐकू येतं, आणि ग्रीकमधे ह्या वाक्यात काहीच चूक नाही!” (तिला मनात ग्रीकच ऐकू येत असल्याने गेल्या चार वर्षांत माझ्या काकांना तिने ‘आत्या’s man’ अशी उपाधी दिली आहे, ती माझ्या‘शी’ बोलण्याऐवजी माझ्या‘बरोबर’ बोलते, आणि खोलीत दिवा ‘लावण्या’ऐवजी तो ‘उघडते’!)

ओळख झाल्यावर पहिल्यांदा निकोलास घरी आला तेव्हाही मी अशीच गांगरले होते. कोवळ्या उन्हात छोटंसं स्टेशन माखलं होतं. निकोलास अवती-भोवती बघत गाडीतून उतरला आणि म्हणाला, “I’m not coming here again.” इतक्या सुंदर भागात, छान हवेत पाय ठेवल्या ठेवल्या पुन्हा येणार नसल्याचं जाहीर करण्यासारखं याला झालं तरी काय, ते मला समजेना. मी म्हणाले, “इतकं वाईट नाही आमचं गाव!” निकोलास चमकला. काहीतरी गडबड झाल्याचं त्याच्या लक्षात आलं होतं, पण नक्की काय ते त्याला समजेना. विचार आणि शब्द गोळा करत तो म्हणाला, “Bad? Of course not! I love it here. That’s what I meant. I am coming here for the first time, I’m not coming again!” त्याची भाषा अजूनही उकलत नव्हती पण चेहऱ्यावरून समजलं. “I haven’t been here before” म्हणायचं होतं त्याला! ‘मी पुन्हा येत नाहीये, पहिल्यांदाच येतोय’ असं त्याच्या मनातल्या ग्रीकचं शब्दशः भाषांतर मला पटवून देता देता बिचाऱ्या निकोलासच्या नाकी नऊ आले.

वास्तुशांतीच्या एका कार्यक्रमात एका छोट्याशा (दहा वर्षाच्या) मुलाची खाण्या-पिण्याची नाटकं चालू होती. त्याच्या भाजीतील गाजरं, सारातली कढीपत्त्याची पानं, आणि पानातला चटणीचा घास काढून घेतल्यावर ‘पानात फार आहे, मला जाणार नाही’ अशी त्याची आईकडे तक्रार सुरू झाली. आईच्या विनवण्या चालू झाल्या. आंजारून-गोंजारून कंटाळल्यावर तिने मुलाला दमात घेतलं. “तुला जाईल इतकंच दिलंय पानात, खायला लाग.” वैतागून ती गुजरातीत म्हणाली. इंग्लिशपुढेच कान उघडणारा मुलगा मख्खासारखा तिच्या चेहऱ्याकडे पहात राहिला. ती पुन्हा एकदा (यावेळी इंग्लिशमधे) कडाडली, “Look, I have only given you how much you can eat!” आईच्या या तंतोतंत शब्दशः भाषांतरापुढे मुलाचा अजूनच मख्ख चेहरा... आणि माझ्या गालात हसू!

अमुक एक माणूस अगदी बांडगुळासारखा जगतो हे जेसिकाला सांगताना पट्‍कन माझ्या तोंडून, “He’s like a weed feeding off other plants” असं वाक्य साकारलं. तिच्या नावडत्या व्यक्तीला दिलेल्या या उपमेवर ती भलतीच खूष झाली.
“That’s a brilliant way to put it. I wouldn’t have thought of that actually. I say he’s like a cuckoo bird, they lay their eggs in others’ nests and rid themselves of the responsibility of looking after their offspring.”
“नाही नाही, कल्पना माझी नव्हे, आम्ही मराठीत असंच म्हणतो” उगाचच बसलेला हुशारीचा शिक्का बाजूला सारत मी म्हणाले.
“वा! हे छान आहे. तू मराठीत विचार केल्याने इंग्लिश भाषेतले वाक्‍प्रचार वाढताहेत तर!” जेसिका अजूनच आनंदून म्हणाली...

भावनांऐवजी शब्दांचं भाषांतर करणारी अशी हजारो उदाहरणं रोजच्या बोलण्या-ऐकण्यात येत रहातात. एकेक पाकळी उमलल्यागत ती एकेक संस्कृती उमलून दाखवतात; भाषा कधी विचारांनी समृद्ध करतात तर कधी विनोदांनी. भाषांतर करायचं असतं भावनेचं, होतं शब्दांचं, आणि नव्याने झालेलं वाक्य वापरताना पुढे येते ती संस्कृती! म्हणूनच फ्रेंच मुली परीक्षेत चांगले ‘मार्कं करतात’, ग्रीक मंडळी ‘मुलं बनवतात’, तर इराणी पाणी मागण्यासाठीही औपचारिक प्रस्तावना करतात. म्हणूनच इंग्लिश कवितेतील वाटसरु sunshine च्या शोधात फिरतो तर मराठी वाटसरुला झाडाची सावली हवीहवीशी वाटते. म्हणूनच हिंदीला सरावलेली माणसं मराठीत तुम्हाला हसण्याऐवजी तुमच्या‘वर’ हसतात आणि एखाद्याच्या स्मृतीसाठी टाळ्या वाजवण्याऐवजी स्मृतीमधे टाळ्या वाजवतात. म्हणूनच ‘I’m here only’ चा अर्थ इंग्लिश माणसाला कधीच समजत नाही... आणि म्हणूनच ''please आणि sorry ला तुम्ही मराठी शब्द का वापरत नाही'' या प्रश्नासमोर मला हात टेकावे लागतात. कारण या शब्दांचे मराठी जुळे कधी वापरलेच जात नाहीत! मराठीत किंचित मऊ आवाज म्हणजे please असतो... आणि sorry वगैरे म्हणायची गरज आपल्याला फार फार कमी वेळा वाटते, नाही का?

****
यापुढील लेख ‘यथा बाधति बाधते’ इथे वाचू शकाल.
http://arnika-saakaar.blogspot.com/2012/02/blog-post_14.html

गुलमोहर: 

छान लिहिलयस. Happy
अनेक वर्षांपुर्वी मी "कितनी थंडी बज रही है!" असे म्हणून हशा ओढावून घेतल्याचा किस्सा आठवला. Lol

क्या बात है! Happy
माझी मातृभाषा मराठीच आहे,पण लेख वाचल्यावर उत्स्फूर्तपणे हिंदी प्रतिक्रिया आली डोक्यात Happy

अर्निका>>अर्निका... मी तुझी जबरदस्त फॅन (पंखा???) झालेय......... हां आठवलं फॅन= चाहती !!
तू लिहिलेलं कधी संपूच नयेसं वाटत राहतं..
माझ्याही आवडत्या दहात जमा Happy

मस्तंय लेख. Happy

पहील्यापासून हिंदी भाषिक मैत्रिणी असल्यामुळे माझ्या मुलीच्या बोलण्यात पण पहील्यांदा एखादा शब्द्/वाक्यरचना वापरताना त्याचे असे साचे असतात जे नियमाने चूक असले तरी चूक म्हणता येत नाहीत, कारण त्यांच्यावर हिंदीचा प्रभाव असल्याने त्यांच्या द्रूष्टीने ते बरोबर असते.

'गिराया' चं भाषांतर करुन 'तिने मला पडवलं' असं म्हणतात किंवा 'निकाल दो' प्रमाणे 'मला ते निघवून दे' असं म्हणतात. प्रत्येक वेळी त्यांना 'मराठीत सांगताना असं नाही असं म्हणायचं' असं सांगितलं जातं, त्या ही लक्षात ठेवतात, पण पहील्यांदा वापरताना हमखास हिंदी/इंग्रजी चा प्रभाव असलेली वाक्यरचना केली जाते. पुण्याला गेल्यावर घरी एखादी मावशी वगैरे आली की 'मी तुझ्या घरी येऊ शकते का ?' असं मुलीने विचारलं की त्यांना खूपच हसू येतं आणि तिला कळत नाही की 'कॅन आय कम टू युवर हाऊस टूमोरो' तर आपण नेहेमी मैत्रिणींना विचारतो, मग इथे हे लोक का हसतायत ?
बाकी तिच्या हिंदी मैत्रिणी हीच्या काही शब्दांचं शब्दशः भाषांतर न जमल्याने तसेच त्यांच्या वाक्यांत वापरतात, तेव्हाही धमाल येते .. एका अर्थी आपले शब्द पण हिंदीत जाऊन मराठीचा प्रसार होत आहे म्हणायला हरकत नाही. Wink

छान लिहिले आहे. आता या नवीन भाषांची एवढी सवय मला झाली आहे कि असे प्रश्न डोक्यात येतच नाही.
उदा. स्वाहिली मधे मझिवा म्हणजे दूध, ते लाला होतं, म्हणजे झोपतं.... म्हणजेच त्याच ताक होत.( मझिवा लाला = ताक )

मस्त लिहिलयं.. पहिल्यांदा वाटलं शळेतल्या सारखं वाक्यात उपयोग करा असं काहितरी आहे म्हणुन इथे येण्याचं टाळतच होते...

मस्तं जमलय... पुढले लेख कधी? drop them quickly... लवकर टाका म्हणायचय मला Happy

....भाषा... अखंडपणे वापरला जाणारा, वाढत्या वयानुसार जास्त सक्षम होणारा आपला एक अदृश्य अवयव... क्या बात है!

मस्तच लिहिलयस. भाषेला गंध संस्कृतीचा!!!

माझ्या लेकीच्या मेंदुतल्या भाषाकेंद्राचं वायरींग विंग्रजीत झालं असल्यानं ती नेहमी "ममा, तू मला बड्डे 'वर' काय आणणार?", "संडे'वर' आपण कुठे जायचं?", "तु मला आंघोळ देशील का?" असलं माझ्या दृष्टीनं भीषण मराठी बोलते.

हिंदी भाषिकांबरोबर ट्रेकिंगला वगैरे गेलात तर कितीही दमला असाल, पाय भरून आले असतील तरी चुकूनही "मेरे पैर भारी हो गये है|" असं बोलू नका. त्या तुमच्या 'गुड न्युज' चा यथोचित सत्कार केला जाईल. Proud

छानच लिहीलंय ! मराठी जागतिक दिवसासाठी औचित्यपूर्ण !!
<< वाढत्या वयानुसार जास्त सक्षम होणारा आपला एक अदृश्य अवयव >> मानलं !!!

चूक झाल्यास स्वतःचे कान हलकेच पकडणं, पुस्तकाला किंवा इतराना पाय लागल्यास हलकासा नमस्कार करणं असे "सॉरी"ला यथार्थ पर्याय आपल्याकडे आहेतच; "जरा तें पुस्तक दाखवाल का " या 'जरा'तून "प्लीज' पण डोकावतोच. पण इतरांचं इतर सगळं चांगलं तें घ्यावं मग चांगले शब्दच कां नकोत, असं मलाही वाटतं. इंग्रजानी तर जगभरातले शब्द वेंचून आपली भाषा समृद्ध केलीच ना ! 'जगरनॉट' हा शब्द 'जगन्नाथाच्या रथा'वरून उचलल्याचं वाचून तर मी उडालोच होतो !!

जबरी. आवडलंच. Happy
Jinglish मात्र परेशान करतं अगदी. Water under construction Proud अशा पाट्या (!!) पाहिल्या की काही नकोय वडगाव बुद्रुकच्या इंग्रजीला हसायला असं वाटतंच.
सध्या chinglish ने ही जेरीला आणलं आहे.

मामी Lol

अनेक देशांतील लोकांनी, इंग्लीश हवी तशी वाकवली आहे. नायजेरियात तर त्याला ब्रोकन इंग्लिशच म्हणतात. त्यातले शब्द इंग्लीश असले तरी त्याचा अर्थ लावणे अवघडच जाते. शिवाय फ्रेंच भाषेच्या प्रभावाने ती जरा बोबडीच बोलतात.

एक नमुना देतो.

वाय्यू नो दे एंत मशीन ? - हे ब्रोकन (स्पोकन) इंग्लीश

Why you no de enter machine ? हे लिखित इंग्लीश

तू बाईकवर का बसला नाहीस ? हे त्याचे भाषांतर !!

चीन मधील आधिकांश साईन बोर्ड्स वर चुकीचे इंग्लिश लिहिलेलं असतं.याचं कारण हे लोकं संपूर्ण चायनीज वाक्याचं तसंच्यातसं डिक्शनरीत पाहून लिटरल ट्रांसलेशन करतात.
उदाहरणार्थ काही मासले

१)आमच्या अपार्टमेंट च्या एका लिफ्टबाहेर : "The lift is being fixed for next day. During that time we regret that you will be unbearable."
२)शांगहाय च्या हॉटेल च्या लिफ्टमधे : "Please leave your values at the front desk."

३)एका टेलर शॉप च्या बाहेर : "Order your summer suits quick. Because of big rush we will execute customers in strict rotation."
४)हांग चौ च्या झू मधला साईन बोर्ड : "Please do not feed animals. If you have suitable food give it to the guard on duty."
५)हायनान एअरलाईन च्या तिकिट ऑफिसबाहेर: "We take your bags and send them to all directions."
आजच खाली गार्डन मधे एका झाडावर बोर्ड टांगलाय- 'don't touch for medicines'
या वाक्याचा अर्थ मात्र अजिब्बात लागत नाहीये...

Pages