पाऊस.. तुझा माझा ( स्फुट )

Submitted by Kiran.. on 4 February, 2012 - 22:42

पाऊस.. तुझा माझा
---------------------------

मुसळधार पाऊस..
गुलजारच्या सिनेमामधला
आपण उभे वळचणीला एका पडवीत
भिजायचं का ?
या प्रश्नावर तुझा नकार असणार..
माहीत असतं,.. मलाही नि तुलाही
पावसाने झालेली नजरबंदी, दमून जमिनीवर टेकलेलं आकाश..दिसू देत नाही..
त्या क्षितिजरेषेपाशी धरेला कुजबुजत दिलेलं वचन हिरवंगार होऊन फुलतं
नजर तुझ्या टिकलीपाशी स्थिरावते..नकळतच
या विश्वासाला मी ही जपलंय
खरंचच...!
कुठुनतरी गाण्याची लकेर हवेवर तरंगत येते
छोटीसी कहानी से.. बारीशों के पानी से... सारी वादी भर गयी
आणि मनात नाजूक घंटा किणकिणतात

तेव्हाही पाऊस असाच असतो.. मुसळधार
भिजायचं का विचारत
ती खिदळत मला ओढते.. भर पावसात
मग नखशिखांत ओलेचिंब.. आम्ही दोघे
आणि डाकबंगल्यावर शिंकत काढलेली एक रात्र
धुंद रात्र, हवासा एकांत
ओलेती शरीरं, ओढाळे श्वास
एक शेकोटी, एक कंदील
व्हरांड्यात कुडकुडणारं कुत्रं आणि
बाहेर खोकणारा वॉचमन
त्याचा खोकला बंद व्हावा म्हणून
त्याला एक हिरवी पत्ती मात्र मी देत नाही
तुझ्या टिकलीला जपलंय मी
माहीत आहे ते.. मलाही नि तुलाही !

अरबीअश्वासारखा पाऊस झुपकेदार होत जातो नि
तुझ्याशी नजरानजर होते..
तू मंद हसत असतेस
कुंडीत फुललेल्या गुलाबासारखी
मनातली चित्रं उमटत असतील का कुठेशी
या पावसाच्या धवलगिरी पडद्यावर
कि या चहाटळ डोळ्यांत
न सांगताच शब्दांची देवाणघेवाण होते
तू मंगळसूत्राशी चाळा करत असतेस
नकळतच !!
माहीत असतं ते.. मलाही नि तुलाही

पौर्णिमेचा चंद्र तुझ्या ओटीत टाकताना
अमावस्येच्या काही रात्री
तिने ओढणीत बांधून नेलेल्या...
तुझ्या माझ्या पायवाटेतून वजा होतात
ऋतू येतात ..जातात
पण कूस बदलत असताना
थोडासा विसावा.. घेतच असतील कुठेतरी
वसंताच्या आगमनाने तुझ्या अंगणात कोकिळा साद घालते
आणि
पानगळ संपतानाच्या एका संध्याकाळची
तिच्या आवाजातली एक...सांजभैरवी तान
ती न्हालेली, केस मोकळे सोडलेली
शूभ्रवस्त्रांकिता...!
जणू कृष्णभक्तीत हरवलेली मीरा
तिचा तो गंध.. धुंद करत असतो
ती मात्र..
डोळे मिटून वीणा छेडत
बेधुंद गात असलेली
मंदिरातली संगरवरी मूर्तीच जशी
बस्स तेव्हाची आसमंतातली सप्तसुरांची दरवळ
तुझ्या काळ्या मण्यांना तडा जाऊ देत नाही
माहीत आहे हे ही.. तुलाही नि मलाही

तुझ्या डोळ्यांत पाहत राहतो...
न भिजता गेलेल्या काही मुसळधार सरी, डोळ्यात साठवलेल्या !
न आळवलेल्या काही ताना.. गळ्यात रूतलेल्या !
गोठ्यात एक मेणबत्ती उगाच जळणारी
वितळत वितळत अस्तित्व हरवत जाणारी
आताही तळहातांचा आडोसा करून
तू तिला जपत असतेस.. मी समजून !!!
छतावरून टपटपणारे टप्पोरे तुषार..
तू पदराने अडवत असताना
केसातल्या थेंबात इंद्रधनु अवतरतं..
दूरवरून ऐकू येणारं गाणं
आता बदललेलं असतं
तेरे मेरे सपने अब एक रंग है..
मी हसतो.. म्हणून तू ही
उगाचच... नाहीच !
माहीत असतं कारण.. मलाही नि तुलाही

पाऊस कमी झालेला असतो
थोडीशी रिपरिप..
तुझ्या चेह-यावरचे टपोरे थेंब मी पुसून घेतो
झाडावरून किलबिलाट सुरू होतो
मृदगंध दरवळतो नि
एक कालवड सुसाट सुटते
राधाकृष्णाचं देऊळ आता दिसू लागतं
पुजा-याची लगबग सुरू होते
आडोशाला थांबलेली बैलगाडी रस्त्याला लागते
गुरांच्या गळ्यातला घंटा ऐ़कू येऊ लागतात
हमरस्त्याला गाड्यांचे कर्कश्श हॉर्न सुरू होतात
निघायची वेळ झालेली असते...
ते विसाव्याचं ठिकाण आपण जोडीने सोडत असतो

पाऊस आता पूर्ण थांबलेला असतो...

- Kiran

गुलमोहर: 

खूप खूप छान मित्रा!! अलगद मनात उतरत गेलं.

पौर्णिमेचा चंद्र तुझ्या ओटीत टाकताना
अमावस्येच्या काही रात्री
तिने ओढणीत बांधून नेलेल्या...>> हे खूप आवडलं! Happy

खरं सांगु मला पुर्ण झेपल नाही .. सो मी हवा तसा अर्थ घेतला ... पण खुप खुप आवडल... सिंपली ऑसम ब्लॉसम Happy
माझ्या निवडक १० मधे Happy

माझ्या निवडक दहात हे आहेच.. एक हे आणि एक काल ना..चैत्रात आभाळ भरून आलेलं.. !!
कोणास ठाऊक कित्तीदाही वाचलं तरी पुन्हा नव्याने काही तरी नवीन जाणवतं...
किरण यू आर ब्लेस्ड... इतर गोष्टीत नको वेळ घालवत जाऊस. हे असलं काहीतरी म्हणजे "किरण"
(लहान तोंडी मोठा घास आहे खर तर.. अनेकदा हे लिहिण्यापासुन रोखलं स्वतःला... उगाच वाद नकोत म्हणुन पण तरीही आज लिहिलंच..)
कमेंट नाही आवडली तर विपुत कळव. मी डिलिट करेन!

किरण एकदा वाचून बघ....
...
बदल हवे असे वाटत आहे....
.
.
एकदा वाचून बघ

अरेच्चा, मागचा एक संपूर्ण पावसाळा गेला तरीही हें असलं न वाचतां मीं सुकाच राहिलो !! Sad
किरण, फारच छान. प्रतिमांचे सहजसुंदर ओघवते ओहोळ ! अभिनंदन.

Pages