डॉन २

Submitted by बेफ़िकीर on 30 January, 2012 - 06:08

डॉन टू हा चित्रपट आल्याचे मला मायबोली या एका मराठी संकेतस्थळावर समजले. त्या संकेतस्थळावर एक धागा आला होता की डॉन टू हा चित्रपट भिकार, सुमार व टुकार या विशेषणांचे रासायनिक मिश्रण आहे. (त्या संकेतस्थळावर किमान तीन विशेषणे लावल्याशिवाय कशाचेही वर्णन करण्यास मज्जाव आहे). त्यावर झालेली हमरीतुमरी व त्यात माझा अत्यल्प सहभाग यावर मी खरा तर थांबलोही असतो. पण काही नातेवाईकांच्या आग्रहामुळे प्रत्यक्ष याची देही याची डोळा तो चित्रपट पाहावा लागला. खरे तर चित्रपट पाहून झाले असतील पंधरा दिवस. पण आपण अठ्ठेचाळीस तासात काहीच लिहिले नाही याचे वैषम्य घालवण्यासाठी डॉन टू वर येथे लिहायचेच असे ठरवले.

थंडीचे दिवस, संध्याकाळचे साडे सात वाजलेले. बायकोचे आवरणे संपेना, त्यामुळे माझे संपणे आवरेना.

चुलत भाऊ आणि वहिनी निलायमपाशी राहतात. आम्ही कोथरुडला. पुण्यातील सूज्ञ नागरिकांचे कोथरुडला मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले आहे. पुण्यात फक्त सूज्ञच नागरिक असतात असे विधान कोणास करायचे असल्यास डॉन टू या चित्रपटाला असलेली गर्दी पाहिल्यावर ते विधान कपोलकल्पीत असल्याचे लक्षात येईल.

तर थंडीचे दिवस होते.

मी एका टीशर्टवर एक स्वेटर घातला आणि आरश्यात पाहून स्वतःला आरश्यात पाहणार्‍या व मलाही आरश्यातच पाहणार्‍या बायकोला म्हणालो.

"तुम्हारा आवरना मुश्कीलही नही, नामुमकीन है"

आरश्यात पाहणे हे पाण्यात पाहण्यासारखे असावे असा ग्रह करून तिने कपाळावर दोन आठ्या चढवल्यामुळे तिचे कपाळ थोडे अरुंद झाल्यामुळे मला तिने आज नवीन हेअर स्टाईल केल्यासारखे वाटले.

थंडीच्या दिवसात रात्री चित्रपटाला जाणे म्हणजे भर उन्हाळ्यात पिशव्या सावरत बायकोबरोबर मॉलमध्ये फिरताना इतर सुंदर स्त्रियांकडे अजिबात न बघता येण्यासारखे वेदनादायक असते. थंडीच्या दिवसात मी थंडी न वाजणारी अशी काही विशिष्ट प्रकारची औषधे मिळतात ती घेऊन झोपून जातो. रात्री सगळेच झोपतात हे मला माहीत झाल्यामुळे मीही झोपतोच. सर्वांप्रमाणे वागलेले बरे पडते.

निलायमपाशी चुलत भाऊ व वहिनी यांचे गाडीत स्वागत करून मी भकास चेहर्‍याने सातारा रोडकडे वळलो.

मल्टिप्लेक्सेसची नावे मला सारखीच वाटतात. सिटी प्राईड आणि आयनॉक्स यातला फरक मला समजत नाही. पूर्वी भानुविलास आणि अलका यातील फरक समजायचा तरी. हल्ली पेपरात चित्रपटांच्या जाहिरातीही येत नाहीत. पूर्वी निदान चित्रपटात काय असेल हे तरी जाहिरातींवरून समजायचे. गरम धरम आणि नरम मुमू यांचा धसमुसळा प्रणय, पद्मा खन्नाचा सुपरहिट कॅब्रे, रेखाचा कामूक अभिनय, अशी वाक्ये लहानपणी आम्हाला भुरळ पाडत. कधी एकदा केसरी येतो आणि आपण त्याचे शेवटून तिसरे पान वाचायला घेतो असे व्हायचे. हनुवटी त्या पानाच्या सर्वात वरच्या दिशेला करून आपण जणू राजकारणाच्याच बातम्या वाचतोय असा अभिनय करत करत डोळे मात्र पानाच्या खालच्या भागावर केंद्रीत करून मूळ डॉन या चित्रपटाच्या जाहिरातीत लिहिलेला मजकूर वाचल्याचे आजही आठवते. सुपरस्टार अमिताभची खतरनाक अ‍ॅक्शन, झीनतची दिलखेचक अदाकारी वगैरे. गणपतीत एक लाख माणसे खईके पान बनारसवालावर नाचली होती. गणपतींना पुण्यात त्यांचे विसर्जन व्हायच्या आधी जे सहन करावं लागतं ते पाहून वाईट वाटतं.

मला थिएटरबाहेर ताप आला. आधीपासूनच तसे वाटत होते, पण त्याक्षणी फारच वाटू लागले. डॉन टू प्रदर्शीत होऊन अनेक दिवस लोटल्यामुळे तिकीटे विकणारे गेटवरच थांबलेले होते. फूटपाथवरून चाललेल्या एका भिकार्‍यालाही ओढून आत नेण्यात आले व त्याच्याकडील मिळालेली तीनपाच सुट्टी नाणी घेऊन एक तिकीट त्याला देण्यात आले. पण तो भिकारी रडला नाही. तो म्हणाला की मी ज्या चित्रपटाला फायनान्स केला तो चित्रपट मलाच काय दाखवता? हे वाक्य ऐकून त्याला सोडून दिले गेले. तो युगायुगांची निराशा मनात दडवत निघून गेला व मी चुलत भावाकडे पाहिले. माझा चुलत भाऊ स्वभावाने चांगला असल्याने त्याने भिकार्‍याबद्दल दु:ख व्यक्त केले. हे पाहून मला भिकारी होण्याची इच्छा झाली. तोवर आम्हाला तिकिटे मिळाली होती.

आत प्रवेश केला आणि एक सुगंधी थंड झुळूक अंगाला चाटून गेली असे मी नुसतेच म्हणालो. म्हणायला पैसे लागत नाहीत. अवश्य म्हणावे की मी आणि ओबामा सांगलीच्या बसमधून एकत्र जात असताना तो कर्‍हाड फाट्याला उतरला. एसी चालू आहे असे वाटून घेण्यावर एकमत झाल्यावर स्वयंचलीत जिन्यावरून आम्ही उंची गाठू लागलो.

चित्रपट हा एक सुरू न होणारा प्रकार आहे यावर माझे डोअरकीपरशी एकमत झाले. डोअरकीपर, लाह्या विकणारा, एक प्रेक्षक आणि पोस्टरमधील शाहरूख हे मला एकसारखेच दिसत होते यावरून मनात असलेली भीती वाचकांना जाणवावी.

नो स्मोकिंगची पाटी असली की स्मोकिंगची चोरून सोय केलेली असते याचा पुन्हा पडताळा आला. बिडी मारून पुन्हा लॉबीत आलो तर बायकोने लाह्यांचे दोन पुडे विकत घेतले होते व शंभरची नोट काउंटरवर ठेवलेली होती. ती ते पुढे घेऊन वळताच मी तिला म्हणालो की अगं सुट्टे परत तर घे? त्यावर तिने एक पुडा पन्नास रुपयांना आहे असे सांगून लाह्या खाण्याचे कारण माझ्या मनात निर्माण केले. दातखीळ बसलेल्या माणसाच्या ओठांतून लाह्या कोंबतात असे ऐकून आहे.

तेवढ्यात काही बेशुद्ध वाटणार्‍या आणि माना मुरगाळल्यासारख्या निपचीत पडलेल्या वीस एक उलट्या लटकणार्‍या कोंबड्या असलेली एक टोपली घेऊन एक माणुस तेथे आला. मी माझे प्रामाणिक मत भावाला सांगितले. डॉन टू पाहिल्यानंतर लोक अशाच अवस्थेत बाहेर पडत असणार. ह्या कोंबड्या आधीच्या शो च्या असाव्यात. तो विनोद वाटून भाऊ माफक हासला. तो माणुस म्हणे कोंबड्या न खपल्यामुळे निराश होऊन येथे आला होता. येथून निघाल्यावर तो कुठे जाईल हे मला कळेना.

चित्रपट गृहात आत सोडल्यावर नेहमीप्रमाणे धक्काबुक्की करत आम्ही खुर्च्या शोधल्या.

चारही बाजूला पसरलेला समुद्र असलेल्या एका होडीवजा गलबतात अगम्य भाव चेहर्‍यावर घेऊन काही जण बसलेले होते. त्यांच्या चर्चेचा हेतू होता डॉनला मारणे. त्यांच्या देहबोलीवरून त्यांच्यात्यांच्यातही बेबनाव असल्याचे दिसत होते.

यानंतरही दोन सव्वा दोन तास काही प्रसंग होत राहिले.

चित्रपट मला कळला नाही. दिवसही थंडीचे होते.

आठवतील तसे प्रसंग लिहित आहे.

शाहरूख खान नावाचा एक अभिनेता यात डॉन म्हणून काम करताना दिसतो. तो सिगारेटी ओढणे, चमकीले संवाद बोलणे व एका अर्धनग्न युवतीला कुरवाळणे यात त्याचा बहुतांशी वेळ घालवताना दिसतो.

या इसमाला आपण आता खान असे लहान नाव देऊ.

तर हा खान निडर असतो. आजूबाजूला अत्यानुधिक गोळीबार करणारी अस्त्रे घेऊन चार चौघे त्याला जीवाची धमकी देतात तेव्हाही त्याला आत्मविश्वास असतो की तो उलट त्यांनाच मारेल. त्यामुळे आपल्यालाही आत्मविश्वास वाटू लागतो की हा खान काही आता मरत नाही. तो त्यांना कसा मारेल इतकेच पाहायचे राहिले आहे हे आपल्याला जाणवत राहते.

सामान्य माणसाला प्रयत्नपूर्वकही जमणार नाहीत अशा हालचाली करून खान त्या चौघापाचजणांना लोळवतो. एक सांगायचे राहिलेच. ते म्हणजे तो एका विमान स्वरुपी वाहनातून मलेशिया की थायलंड यातील एका बेटावर उतरून कृष्णकृत्ये करणार्‍यांच्या वस्तीत एकटा व नि:शस्त्र जाऊन ही कामगिरी बजावतो.

इकडे ओम पुरी निवृत्त होण्याचा प्रयत्न करतो. तो चांगल्या माणसांचा प्रतिनिधी असतो. डॉन म्हणजे खान हा चांगला आहे की वाईट हे शेवटपर्यंत समजत नाही. समजत नाही म्हणजे प्रेक्षकांना समजत नाही नव्हे, हे दिग्दर्शकालाच समजत नाही. ओम पुरी निवृत्त होणे हा जगातील सद्प्रवृत्तींना बसलेला एक गंभीर तडाखाच जणू. त्या आनंदात लारा दत्ता की कोण ती टिचभर कपड्यात आनंदात नाचते. डॉन समोर आल्याचा ब्रह्मानंद तिच्या प्रत्येक अवयवाला कॅमेर्‍याच्या अगदी जवळ आणून ती व्यक्त करते. एकदा पेटवल्यावर तोंडातून एकदाही हातात ने घेता सिगारेट ओढणे अशी एक अशक्यप्राय कृती करत डॉनही तिच्यासोबत नाचून तिला सांस्कृतीक धीर देतो.

इकडे प्रियांका चोप्रा सुंदर सुंदर दिसत बसते. मला या चित्रपटातील अगदी नक्की समजलेल्या काही जेमतेम बाबींपैकी एक ही की प्रियांका चोप्रा ही या चित्रपटातील एक अनावश्यक बाब आहे. गार्निअरच्या जाहिरातीत एका स्पॉट असलेल्या कुत्र्याला उचलून घेऊन ती स्वतःला त्याच्याकडून गुदगुल्या करून घेताना जशी वागते तशीच ती एक पोलिस अधिकारी म्हणून वागते. टेक केअर. एक गट पुढच्या जन्मी डाग असलेल्या कुत्र्याचा जन्म मिळावा म्हणून प्रार्थना करू लागला आहे हे या निमित्ताने आठवले म्हणून नोंदवले इतकेच.

चित्रपटाचा वेग इतका आहे की दिग्दर्शकाची दाढी वाढायच्या आत शुटिंग संपले असावे.

खान स्वतःच्या चॉईसने एका तुरुंगात येऊन बोमन इराणीला कुत्र्यासारखा मारतो. याचवेळी मागच्या डॉनमधील, म्हणजे डॉन १ मधील एक शेवटचे दृष्य फ्लॅशबॅक म्हणून दाखवले आहे. स्तुत्य बाब ही की अमिताभच्या डॉनमधील एकही दृष्य दाखवलेले नाही.

बोमन इराणी खूप मार खाऊन खानचे म्हणणे मान्य करतो. ते म्हणणे काय असते हे मला अजूनतरी समजलेले नाही. पण काहीसा प्लॅन असतो. हा चित्रपट भारतात होतच नसल्याने योजना या शब्दाऐवजी मला प्लॅन हा पर्यायी शब्द सुचला. बोमन इराणी हा मुन्नाभाईच्याच मूडमध्ये चेहरे वेडेवाकडे करतो यावरून पहिल्या मुलावर आईबापाचे जास्त प्रेम असते हा वादग्रस्त कौटुंबिक सिद्धांत प्रस्थापित व्हावा.

खान स्वतःच्या मर्जीने तुरुंगात येणारा एकमेव कैदी असतो. त्यामुळे त्याला विशेष स्वातंत्र्य प्राप्त होते व तो इतर कैद्यांच्या अन्नात वीष मिसळतो. इतर कैदी उलट्या जुलाब होऊन आपापल्या बरॅकमध्ये आडवे तिडवे कोसळू लागल्यावर एकच धूमश्चक्री होते. हे सर्व कैदी केवळ बोमन इराणीला जेलबाहेर काढण्यासाठी मारले जातात हे दृष्य पाहून मी अंधारात व्यथित झालो हे कोणाला कळलेच नव्हते.

डॉक्टरचे व मेल नर्सचे पोषाख करून खान आणि इराणी जेलमधून पळून जातात. या घटनेमुळे निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या ओम पुरीला एक्स्टेन्शन मिळते व त्याचे कुटुंब आनंदीत होते. कुटुंबाला झालेला हर्ष मात्र चित्रपटात दाखवलेला नाही. एक्स्टेन्शन मिळाल्यामुळे ओम पुरीला प्रियांकाबरोबर आणखी काही दृष्ये देता येतात याचा आनंद त्याच्या डोळ्यात सहज दिसतो. प्रियांका चोप्रा डॉन पळाला असला तरीही डॉन पळाल्याचे तीन फायदे आपलेच एकेक बोट आपल्याचे चेहर्‍यावर आडवे, तिरके व उभे धरून सांगताना आढळते. हे तीन फायदे म्हणजे चेहर्‍यावरील स्पॉट जातात, तेलकटपणा नाहीसा होतो व चेहरा उजळतो. तिच्यावर प्रेम करण्यासाठी तिच्या ऑफीसमध्ये एक स्वतंत्र तरुण कर्मचारी ठेवलेला आहे. मुळात प्रियांकाचीच आवश्यकता नसल्यामुळे त्याची आवश्यकता काय हा प्रश्न मला पडलाच नाही. तो कर्मचारी तिला रिपोर्ट करतो व तिच्यावरच लाईनही मारतो.

कोणत्यातरी बॅन्केत नोटा छापण्याचे साचे जपून ठेवलेले असतात व ते खानला पळवायचे असतात. खुद्द बोमन इराणीला पळवण्यासाठी जो स्वतःहून तुरुंगात जातो, कैद्यांना वीष घालतो आणि पुन्हा तुरुंगातून निसटतो त्याला ते साचे मिळवण्यासाठी बोमन इराणी का हवा असतो हा एक अभ्यासाचा विषय आहे.

मी ज्या क्रमाने घटना लिहीत आहे त्या क्रमाने त्या घडलेल्या नसून त्या क्रमाने त्या मला आठवत आहेत. बॅन्केच्या एका प्रेसिडेन्टला फसवण्यासाठी खान ऋत्विक रोशन होऊन तेथे जातो. या सर्व गदारोळात आता ऋत्विकही सोसावा लागणार की काय असे भय मनास व्यापू लागेपर्यंत खान सापाची कात काढावी तसा चेहर्‍यावरचा एक चेहरा काढतो. तो वरचा ऋत्विकचा चेहरा काढल्यावर कोण आश्चर्य!! तो तर चक्क खान असतो खान. प्रचंड धक्का बसतो प्रेक्षकांना. चित्रपटगृहात पसरलेल्या शांततेवरूनच मी ते ओळखले. भावाला उगीच वाटले की केवळ कोंबड्यावाला आणि आपण चौघेच फक्त असल्याने शांतता आहे की काय!

या चित्रपटाच्या रिळांच्या बांगड्या घालून हल्ली लहान मुली भोंडल्यात नाचतात असे समजले आहे.

चित्रपटातील अगदी खात्रीलायकपणे समजल्ली दुसरी गोष्ट म्हणजे लारा दत्ता की कोण ती, ती कंप्लीट अनावश्यक आहे. केवळ डॉनभोवती सुंदर तरुणी असावी या एकाच विचाराने तिला घेतलेले आहे. ती खानच्या मांडीवर बसून त्याच्याकडे वासनिक नजरे बघणे, उत्तान नृत्य करणे व एक खोकं कुरिअरवाल्यांना देणे ही कृत्ये करताना दिसते. हे सर्व करताना ती प्रियांकावर असलेल्या डॉनच्या प्रेमाबाबत नाराज असते हेही दाखवत राहते. मुळात कथानक नोटाच्या साच्यांचे असल्याने खानला प्रियांका मिळते का लारा यात प्रेक्षकाचे मन लागत नाही.

बॅन्केचा अध्यक्ष एकाला खानची सुपारी देतो आणि तीही भर दुपारी देतो. ज्याला सुपारी देतो तो भारतीय वंशाचा आहे की गोरा आहे हे मला समजलेलेच नाही आहे. तो सुपारी खानला मारायला निघतो. खान लिफ्टने वर जातो आणि सुपारी जिन्याने वर जातो. यातून वाईट हेतू असणार्‍यांना नशीब साथ देत नाही हे सिद्ध होते. पण तरी तो सुपारी खानच्या समोर येऊन ठेपतो. खान त्याला काहीतरी भयाण वाक्य ऐकवून इमारतीवरून खाली उडी मारतो व कसल्याश्या यंत्रणेने , जी त्याच्याकडे मुळातच अस्तित्वात आहे हे दाखवायचेच राहिलेले आहे, तो जमीनीवर पडून मरत नाही. खान जिवंतच राहिल्यामुळे चित्रपट चालूच राहतो.

नंतर एकदा सुपारीला खान एका गाडीत चिरडताना दिसतो. यामुळे खानला त्या सुपारीला मारायची सुपारी मिळाली की काय असे माझ्या मनात आले.

येथपर्यंत सर्व बर्‍यापैकी नॉर्मल असते.

नंतर एकदम खान एका संगणक तज्ञाशी वाटाघाटी करतो व त्याला फितुर करून बॅन्केची संगणकीय यंत्रणा हायजॅक करतो. या दरम्यान सुपारी खानच्याच योजनेत सामील होतबोअबोमन इराणी आणि सुपारीचे संबंध चांगले असतात.

संगणक तज्ञाच्या पत्नीला दिवस गेलेले असल्याने तिचे उघडे पोट दाखवून घेतले गेले आहे. पुरुष दाखवला की शौर्य दाखवायलाच हवे आणि स्त्री दाखवली की सौंदर्य, हा नियम या चित्रपटात पेनफुली सातत्याने पाळला गेला आहे. लारा दत्ताचे मात्र खानशी वारंवार शरीरसंबंध येत असूनही ती गर्भवती होत नाही. मात्र तिचे पोट तसेही दिसतेच.

बॅन्केच्या अध्यक्षाला ब्लॅकमेल करता येईल अशी एक चीप हाताहातातून फिरत असते. हा प्रकार मी मनावर घेतला नाही. आपल्याला काय करायचंय. असेल काही रहस्य.

इकडे बोमन इराणी आणि सुपारी यांचे संगनमत होते. त्यांचे खानला मारायचे ठरते. खान मात्र मरणार नसतो. पण हे आपल्याला आधीच समजत नाही. आपल्याला वाटतं की खान मरतो की काय. खूप टेन्शन आल्यामुळे आपण स्तब्धपणे चित्रपट पाहात राहतो.

एका मोठ्या बिल्डिंगमध्ये क्लायमॅक्स होतो. बाहेर त्या देशातील सर्व पोलिस आलेले असतात. तेही क्लायमॅक्स व्हायच्या आधीच आलेले असतात. हे दाखवून कित्येक दशकातील हिंदी चित्रापटांनी पोलिस खात्याची जी बदनामी केलेली आहे ती धुवून निघते. पण ती भारतीय पोलिसांची नाही धुवून निघत , ती धुवून निघते तिकडच्या देशातील पोलिसांची. खान पाणबुड्याचा वेष धारण करून इमारतीत शिरलेला असतो. तो तेथून प्रियांकाशी प्रणयचर्चाही करत असतो. तिच्याही मनात खूप वादळे निर्माण होत असतात की आपले खानवर प्रेम आहे की नाही. पण फरहान अख्तरला ते मान्य नसते.

नंतर प्रचंड वेगाने, म्हणजे आत्तापर्यंतच्या वेगाची सर्व रेकॉर्ड्स मोडत काहीही होत राहते. कोणीही कोणालाही कधीही मारत असतो. काही ओलिस माणसे खूप घाबरल्यामुळे आक्रोशताना दिसतात. मधेच सगळे जण त्या साच्यांच्या तिजोरीपाशी येतात आणि फोनवरून संगणक तज्ञाला कोड म्हणजे पासवर्ड विचारतात. तिजोरी उघडते हे अतिशय प्रेडिक्टेबल झालेले आहे. खान तिजोरीत जाऊन ते साचे हस्तगत करताना तिजोरी बंद व्हायला लागल्यामुळे बोमन इराणी अणि सुपारी सुंठेवाचून खोकला जाणे आणि हाती धुपाटणे राहणे यातील कोणती म्हण खरी होईल या उत्सुकतेने पाहात राहतात.

पण तिसरीच म्हण खरी होते. सुबहका भुला शामको वापस आता है तो वो भुला नही रहता या म्हणीला अनुसरुन संगणक तज्ञाला चांगल्या वाईटाची ऐनवेळी जाण येते. तो एक वेगळंच काहीतरी करायला लागतो.

यामुळे पोलिस आत येऊ शकतात. त्यातच खानला मारायचा प्रयत्न सुपारी आणि इराणी करतात. नंतर खान निसटतो. निसटण्यापूर्वी तो एक बॉम्ब फोडून दाखवतो. कोणत्याही वेळी अती सुसज्ज अवस्थेत असलेला खान थोडीशी दाढी ठेवत असल्याने चित्राटात चुंबनाचा प्रसंग मात्र नाही. आपण थक्क झाल्यामुळे व नि:शब्द झाल्यामुळे आपलाच वरचा ओठ आपल्याच खालच्या ओठावर दाबून धरून आपलेच स्वतःचे चुंबन मात्र घेतो.

नंतर प्रियांकाशी फोनवर बोलून खान अवास्तव धमक्या देतो. त्या अवास्तव वाटल्यामुळे चलबिचल होऊ नये म्हणून तो हातातील घड्याळ्याचे एक सूक्ष्म बटन दाबून बाह्य जगात एक अतिशय शक्तीशाली स्फोट घडवून आणतो. खानचे ते महान कृत्य पाहून त्याच्या मागण्या मान्य करणे सुरू होते.

नंतर प्रियांका आणि खान हे बोमन आणि सुपारीच्या ताब्यात जातात. कोणाला काय हवे आहे हेच समजेनासे होते. खानला साचे, सुपारीला खानचा जीव, इराणीला खानहीन जग, प्रियांकाला खान , ओलिसांना स्वातंत्र्य, ओम पुरीला एक्स्टेन्शन, लारा दत्ताला कपडे आणि संगणक तज्ञाला सत्यवाद. असे आपले अंदाज.

नंतर काहीतरी होते, काय होते हे माहीत नाही, माहीत नाही म्हणजे समजलेच नाही, पण खान निसटतो. तो जो निसटतो तो थेट मोटरसायकलवरून एका जहाजापाशी जातो. तेथे मादक हासत लारा दत्ता उभी असते आणि संगणक तज्ञ हा सत्य वागलाच नाही व त्याने प्रत्यक्षात खानला मदतच केली हे धक्कादायक सत्य उघड होते.

यानंतर आपण आणि काही कोंबड्या चित्रपटगृहाबाहेर पडून रडत रडत घरी जातात.

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

खपल्या गेलो आहे
वाक्यावाक्याला सांडलो खुर्चीतून Lol

Rofl

धन्य आहे तुमची. मुळात असला सिनेमा पाहायला तुम्ही गेलात, अनेक गोष्टींचा बोध होत नसतांनाही तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात आणि सिनेमावर अभ्यासपूर्ण लेख पाडलात!
आम्हीही पैसे खर्चून सिनेमा पाहण्याऐवजी आपला लेख वाचून मनसोक्त आनंद लुटला.
"तो माणुस म्हणे कोंबड्या न खपल्यामुळे निराश होऊन येथे आला होता. येथून निघाल्यावर तो कुठे जाईल हे मला कळेना" तुमचा चुलत भाऊच का मलाही हा विनोद वाटला.
किती 'पंचे'सचा उल्लेख करावा?
वा!वा!

खुद्द बोमन इराणीला पळवण्यासाठी जो स्वतःहून तुरुंगात जातो, कैद्यांना वीष घालतो आणि पुन्हा तुरुंगातून निसटतो त्याला ते साचे मिळवण्यासाठी बोमन इराणी का हवा असतो हा एक अभ्यासाचा विषय आहे.
>>>
सही , आवडले!

बायकोचे आवरणे संपेना, त्यामुळे माझे संपणे आवरेना.

ह्या वाक्यालाच हसतोय अजून.
बाकीचं वाचून व्हायचंय Proud

बेफिजी, आपण लेख लिहीलात आणि डॉन्टु ला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला यावर आपले मौलिक विचार ऐकायला आवडतील. Wink

धमाल लिहीले आहे! Lol

डॉन समोर आल्याचा ब्रह्मानंद तिच्या प्रत्येक अवयवाला कॅमेर्‍याच्या अगदी जवळ आणून ती व्यक्त करते. >>>
खान त्याला काहीतरी भयाण वाक्य ऐकवून इमारतीवरून खाली उडी मारतो>>> हे जबरी!

येथपर्यंत सर्व बर्‍यापैकी नॉर्मल असते. >>> हे वाचल्यावर हे जर नॉर्मल होते तर पुढे काय असेल असे वाटलेच Happy

मला थिएटरबाहेर ताप आला. आधीपासूनच तसे वाटत होते, पण त्याक्षणी फारच वाटू लागले. डॉन टू प्रदर्शीत होऊन अनेक दिवस लोटल्यामुळे तिकीटे विकणारे गेटवरच थांबलेले होते. फूटपाथवरून चाललेल्या एका भिकार्‍यालाही ओढून आत नेण्यात आले व त्याच्याकडील मिळालेली तीनपाच सुट्टी नाणी घेऊन एक तिकीट त्याला देण्यात आले. पण तो भिकारी रडला नाही. तो म्हणाला की मी ज्या चित्रपटाला फायनान्स केला तो चित्रपट मलाच काय दाखवता? हे वाक्य ऐकून त्याला सोडून दिले गेले. तो युगायुगांची निराशा मनात दडवत निघून गेला व मी चुलत भावाकडे पाहिले. माझा चुलत भाऊ स्वभावाने चांगला असल्याने त्याने भिकार्‍याबद्दल दु:ख व्यक्त केले. हे पाहून मला भिकारी होण्याची इच्छा झाली. तोवर आम्हाला तिकिटे मिळाली होती.>>>>>:हहगलो:

Pages