मला कळलेलं लंडन (३/३)

Submitted by Arnika on 23 January, 2012 - 14:17

“तुमच्या अभ्यासाचे विषय सोडून इतर गोष्टींकडेही लक्ष द्या. चांगली पुस्तकं वाचा, उत्तम नाटकं बघा आणि सिनेमाच्या पटकथा वाचा! राजकारणाकडे थोडंफार लक्ष असू द्या... समाजसेवेची लहानशी संधीसुद्धा दवडू नका, झालंच तर शाळेतल्या कार्यक्रमांच्या आयोजनात भाग घ्या, नेपथ्य-प्रकाश विभागात आवर्जून काम करून बघा. मनातले विचार कागदावर उतरवण्याची सवय ठेवा. खेळांमधे, स्पर्धांमधे भाग घ्या, लोकांशी संवाद साधण्याची कला जोपासा...हे सगळं सांभाळून जर पुढे गेलात तरच युनिव्हर्सिटी तुमच्या बुद्धीच्या सर्वांगीण विकासाची किंमत करेल.”

बारावीच्या सुरुवातीला ‘आ’ वासून आम्ही शाळेची पहिली सभा ऐकत होतो. शाळेतील सगळ्यात महत्त्वाच्या वर्षीसुद्धा हा उपदेश करणा-या एकच शिक्षिका मला आजवर भेटल्या, त्या माझ्या शाळेच्या मुख्याध्यापिका मिसेस हचिन्सन! पडत्या फळाची आज्ञा स्वीकारत आम्ही अभ्यासासोबत बारावीच्या वर्षाचा पुरेपूर आनंद घेतला. शेवटच्या दिवशी बक्षीस हातात ठेवत मिसेस हचिन्सन म्हणाल्या, “कुठून आलीस दोन वर्षांपूर्वी आणि अगदी दुधातली साखर झालीस...मोठी हो!” अनेक आठवणींचं गाठोडं घेऊन मी कॉलेज प्रवासाला सज्ज! Imperial College, London. अत्तापर्यंत एक देश, चार घरं, आणि तीन शाळा बदलून झाल्या होत्या पण प्रत्येक वेळी निरोप घेणं अधिकाधिक जड गेलं हीच प्रत्येक ठिकाणच्या प्रेमाची पावती!

कॉलेजला गेल्यावर आई-बाबांचं घर सोडून हॉस्टेलवर रहायला गेले आणि तेव्हा लंडन एकटीने पालथं घालावं लागलं. रोजचा स्वयंपाक करण्यापासून ते बिलं भरण्यापर्यंत, परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यासाला सुरुवात करण्यापासून ते हॉस्टेलवर २५ जणांना दिवाळीच्या पंगतीला बोलावण्यापर्यंत, आणि जवळच्या संग्रहालयात जाण्यापासून ते पहाटे तीन वाजता नदीवर फिरायला जाण्यापर्यंत सगळे प्रयोग करून झाले. शहराच्या हृदयाचा प्रत्येक ठोका ऐकू यावा इतक्या मध्यवर्ती केन्सिंग्टन परिसरात कॉलेज होतं. प्रवासी, शास्त्रज्ञ, गणिती, कलाकार, व्यापारी, खेळाडू आणि लंडनवासी अशा मिसळ गर्दीत तीन वर्ष वावरता आलं. हॉस्टेलमधे असलेली १४५ मुलं-मुली तब्बल २७ वेगवेगळ्या देशांतून शिक्षणासाठी लंडनला येऊन थडकली होती. आमच्या एका मजल्यावरच तर इंग्लंड, भारत, वेल्स, मलेशिया, मॉरिशिअस, ऑस्ट्रेलिया आणि इथिओपिया नांदत होते!

रात्र रात्र गप्पा चालत रहायच्या. विषय लागायचे नाहीत, कारणं लागायची नाहीत, फक्त कॉफीचे कप लागायचे. कोणी इंग्लंड फिरायचे बेत करायचं तर कोणी लंडनची सायकल वारी आखायचं. मधेच कधी लहर आली की रात्री अपरात्री उठून राणीच्या राजवाड्यापर्यंत फेरी मारून यायचो. कधीतरी बातम्या झाल्यावर अंतरराष्ट्रीय राजकारण रंगायचं. प्रत्येक देशाच्या इतिहासाची एक वेगळीच दुखरी नस आणि तिचं वर्णन करणा-या जितक्या व्यक्ती तितक्याच गोष्टी! सकाळी दमलेल्या डोळ्यांनी लेक्चरला जायची वेळ आल्यावर 'आपण कोण? कुठे आलो आहोत, कुठून आलो आहोत?' याचा क्षणभर विसर पडायचा. आठवायच्या त्या वसंत बापटांच्या दोन ओळी...
‘दहा दिशांचे तट कोसळले ध्रुव दोन्ही आले जवळी
मीही माझे बाहु पसरुनी अवघ्या विश्वातें कवळी’

कित्येक संस्कृतींच्या रंगात रंगलेलं कॉलेजचं रूप फार गोमटं होतं. तिथे क्रिसमस, दिवाळी, ईस्टर, ईद, हानुका, नौरूझ, आणि असंख्य इतर सण तितक्याच जोशात साजरे व्हायचे. कॉलेजच्या गरब्याला कृष्णाभोवती बेभान होऊन नाचणाऱ्यांमधे प्रत्येक रंग, धर्म, देश आणि भाषेचा सहभाग असे. कशी गंमत असते ना, जग बघायला भारताने जो रंगीत चष्मा दिला आहे त्यातून आपण जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी भारतच शोधतो, घर उभं करतो... तसं कॉलेजमधे सापडलेलं माझं अजून एक घर म्हणजे ग्रीक आणि सिप्रियट सोसायटी.

पहिल्या दिवशी लेक्चर आटोपल्यावर शेजारच्या मुलीशी ओळख झाली. नेहमीप्रमाणे पुढच्या मिनिटाला संभाषणाने भाषांचं स्थळ गाठलं. ग्रीक बोलणारी मला भेटलेली ही पहिलीच मैत्रिण. चार शब्द शिकव असा मी आग्रह धरला आणि उत्साहमूर्तींनी कागद-पेन्सिलच बाहेर काढली. रोज थोडं थोडं बोलणं व्हायला लागलं, हळुहळू ती लिपी शिकायला सुरुवात झाली. महिन्याभरात तिने माझी ३०-३५ ग्रीक मंडळींशी गाठ घालून दिली! ग्रीकमधे रांगायचा माझा प्रयत्न पाहून त्यांनी त्यांच्या नाचात भाग घेण्यासाठी बोलावलं आणि हो-नाही करता करता जी पहिल्या तालमीला गेले ती तीन वर्ष तिथेच रमले!

पहिल्या महिन्यात जेमतेम दहा वाक्य बोलता येत होती आणि संपूर्ण कारभार शुद्ध ग्रीक मधे चालायचा. घरापासून लांब असताना आपल्या माणसांचा आणि भाषेचा सहवास मिळावा म्हणून एकत्र येऊन ग्रीकमधे बोलणाऱ्या मित्र-मैत्रिणींना फक्त माझ्यामुळे इंग्लिश बोलायला लावणं अजिबात रास्त वाटेना. आता खोल पाण्यात उडी घेतलीच आहे म्हंटल्यावर तरंगणं तरी भाग होतं, म्हणून मित्राची मदत घेऊन ग्रीकमधे दोन मिनिटांचं एक मनोगत तयार केलं. बरोबर परातभर तिळगुळ घेतले, सगळ्यांना ते वाटले, आणि संक्रांत ग्रीकमधे साजरी करण्याचा एक नवीन पायंडा पडला. पुढची तीन वर्ष दर जानेवारीत, ‘तिळगुळ कधी आणणार यंदा?’ हा प्रश्न ऐकून जो आनंद व्हायचा त्याची तुलना फक्त आणि फक्त तिळगुळांच्या ऊबदार गोडीशी होऊ शकते! याच मंडळींनी मला त्यांच्या भाषेच्या रंगात माखवलं, त्यांच्या गाण्यावर ताल धरायला लावला, त्यांच्या पारंपारिक पोषाखात नटवलं, त्यांचा देश दाखवून आणला, आणि माझ्याबरोबर गुढी पाडव्याचा नैवेद्य दाखवला, दस-याला सरस्वती-पूजन करताना आपापल्या पुस्तकांना मनापासून फुलं वाहिली, दिवाळीची रांगोळी काढली, पुन्हा पुन्हा शिरा खाण्याचा हट्ट केला, आणि मराठी शिकायचाही!

लंडनला घरपण आणण्यात जसा खूप ठिकाणच्या मित्रपरिवाराचा वाटा आहे तसंच ते जपण्यात सिंहाचा वाटा अर्थातच घरच्यांचा आहे. प्रत्येक सण, वाढदिवस, कार्यक्रम, आणि प्रत्येक साध्या दिवसाला घरपण आणणारे माझे आई-बाबा आणि भाऊ, त्यांच्या आपुलकीने जोडली गेलेली मित्रमंडळी, लंडन फिरून झालं असलं तरी फक्त आमच्या सोबतीला म्हणून घरी रहायला येणारे आजी-आबा, आत्या, मामा, ‘कुठेही गेलीस तरी मित्र-मैत्रिणी मिळवता आणि टिकवता येतील’ असा विश्वास देणारी मावशी, आणि जिथून आलो त्या देशाशी, घराशी आम्हाला कायम जोडणारी सगळी भावंडं!

बघता बघता या आठ वर्षांमधे ‘खऱ्या लंडनवासींप्रमाणे’ रेल्वेच्या वेळा रक्तात भिनल्या. पूर्वी अचूक वाटणाऱ्या इथल्या बस आणि गाड्यांची दिरंगाई आता उगीचच जाणवायला लागली. शिस्तशीर रांगेत उभं रहाण्याची खोड लागली. बी.बी.सी च्या बातम्यांचं आणि राणीच्या नाताळच्या भाषणाचं व्यसन लागलं. लंडनच्या गर्दीबद्दल आणि लंडन कसं बदलत जातंय याबद्दल नकळत तक्रार नोंदवायला लागले, दुकानांमधे भाव करता येत नसला तरी स्वस्त आणि मस्त जागांचा सुगावा लागला... तरी आजही शहराची न पाहिलेली एखादी घडी रोज उलगडत असते. ती कधी नवीन माणसं दाखवते, कधी इतिहास दाखवते, कधी वास्तू दाखवते तर कधी नवीन वस्तू. शहराचा एक कोपरा समजतोय असं वाटायच्या आत दुस-या कोप-यातील चुण्या दिसायला लागतात. लंडन कायम काहीतरी म्हणतंच असतं...त्यापैकी काय सांगायचं आणि किती सांगायचं?

लंडनमधे पहिल्यांदा अवतरलो तेव्हाची चिंता, ताजी उत्सुकता आणि अखंड चलबिचल आज आठवते तेव्हा लंडनलाही ती ‘ऐकू’ येते. गर्दीच्या वेगात गुरफटलेलं लंडन मग क्षणभराचा वेळ काढून म्हणतं, “काय मग? रुळलीस ना आता?”

समाप्त

गुलमोहर: 

अरे वा! मी वाचुन प्रतिसाद देईपर्यंत तिसरा भाग आला पण Happy
हा मी उद्या निवांत वाचुन प्रतिसाद देइन.

दुसरा आणि तिसरा दोन्ही भाग वाचले. मस्तच लिहिलं आहेस. खूप आवडलं Happy
शालेय वयात इथे येऊनही इतकं मराठी जपलंय त्याचं खरंच कौतुक वाटतं.

वा!! . खुप छान लिहिलंयस.
शालेय वयात इथे येऊनही इतकं मराठी जपलंय त्याचं खरंच कौतुक वाटतं.>> अनुमोदन.

अर्निका
कौतुक, कौतुक आणि फक्त कौतुक. खरच काय लिहिलयस तु. अप्रतिम. मराठी माध्यमातिल होतीस म्हणुन टीकलीस. मला वाटत भाषा देवी प्रसन्न आहे तुला. अनेक भाषांची आवड आहे तुला. फक्त तुझ्या ह्या प्रवासात तुझ्या घरच्यांची भाषेच्या बाबतीत तुला काय मदत झाली ते कळलं तर मजा येईल. तसेच भाषे मुळे झालेली एखादी गंमत इथे देता आली तर मजा येइल.

शालेय वयात इथे येऊनही इतकं मराठी जपलंय त्याचं खरंच कौतुक वाटतं.>> > अगो +१ . खरच इतकं चांगलं मराठी कसं काय जपु शकलीस ?

मालिका मस्त आहे. माझी भाची ह्या अनुभवातून आता जाते आहे. तिचे पण ग्रीक मित्र मैत्रिणी आहेत.
असे मल्टिकल्चरल डायवर्स अनुभव मुलांना मिळणे ग्रेट.

आभारी आहे मायबोलीकर Happy भाषेचं सांगायचं झालं ना, तर माझं असं मत आहे (अनुभवावरून सांगत्ये) की तुम्ही कुठलीही नवीन भाषा चांगली शिकलात, वापरलीत, तर तुम्हाला येत असलेल्या भाषा जास्त बळकट होतात, खिळखिळ्या नव्हे!

आणि मीरा, भाषेबद्दल चार लेखांची एक मालिका मी फेब्रुवारीत लावते आहे `साकार' वर (७ ते २८). मग मायबोलीवरही लावेन!

अर्निका,
सगळे भाग वाचले खूप छान लिहिले आहेस. तुझ्या पुढच्या लिखानाच्या प्रतिक्षेत आहे, लवकर चालू कर पुढची लेख मालिका Happy

छान. मराठी भाषेवरच्या प्रभुत्वासाठी कौतुक वाटले. अभिनंदन.

पण तरुण मुलांकडुन विचार करण्याबाबत आणि ते बेधडक मांडण्याबाबत अजून अपेक्षा होती हाँ. हे जsरा 'पोलिटिकली करेक्ट' होतय. आम्ही कधी परदेशी शिकलो नाही. बरंच काही होत असणार, कदाचित रुततही असणार. तरूणपणी जग जसं दिसतं, ते तसं लेखनातूनही दिसायला हवं. योग्य नसलं तरी चालेल. जग कुठे चाललय हे तुम्हीच तर आम्हाला सांगायचं ना? Happy

रैना, मुद्दाम वगळायचं म्हणून लिहीताना काहीच वगळलं नाही किंवा भावनेला बांध घालूनही लिहिलं नाही. या लेखामध्ये मला खटकलेल्या गोष्टी फारशा नाहीत हे मात्र खरं...पण पुढच्या वेळी लिहीताना तुमचं म्हणणं नक्की लक्षात ठेवीन Happy

पुनश्च आभार सगळ्यांचे!

छान लिहीलय. सगळे भाग आवडले Happy

शालेय वयात इथे येऊनही इतकं मराठी जपलंय त्याचं खरंच कौतुक वाटतं.>>>> अगदी अगदी Happy

मस्त अनुभव मांडलेय्त
शालेय वयात इथे येऊनही इतकं मराठी जपलंय त्याचं खरंच कौतुक वाटतं. >>> अगदी खरय

व्वा! तीनही भाग ऊत्कृष्टच ऊतरलेत.. काही काही प्रसंग, निरीक्षणे, अनुभव तर ईतके प्रातिनिधीक वाटले की ऊसगावच्या विद्यार्थी आयुष्यातील सर्व आठवणी जाग्या झाल्या. त्यातही आमच्या Wink ठाण्याचा ऊल्लेख आल्याने लिखाण 'थेट' भिडलेच..!
लंडन ईतके जागतिक सर्वसमावेश़क शहर दुसरे नसेल, आणि त्याचमूळे बहुदा, लिखाणातही तो वैश्विक दृष्टीकोन व अनुभव सहज प्रकट झाला आहे.

दुसरा आणि तिसरा दोन्ही भाग वाचले. मस्तच लिहिलं आहेस. खूप आवडलं .शालेय वयात इथे येऊनही इतकं मराठी जपलंय त्याचं खरंच कौतुक वाटतं.>>>>> अगदी! तुमच्या लिखाणात एक सहजता आणि
ताजेपणा (तुमच्या फोटोप्रमाणे) आहे,तो खूप छान आहे.

मजा आली तुमचे अनुभव वाचायला. वाचकाला त्या वातावरणात घेऊन जाते तुमची लेखणी.
तुमचे अलीकडचे ताजे लेख फेसबुकवर वाचले होते. आज मायबोली चाळताना अचानक त्यातल्या एकाचे शीर्षक इथेही नजरेस पडल्यावर इथले बाकीचे लेखही वाचत आहे. आवडले!

अर्निका,
खुप सुन्दर लेख.
तुझी लेखन शैलि मनापासुन आवडली.