मला कळलेलं लंडन (२/३)

Submitted by Arnika on 23 January, 2012 - 14:12

...
शाळेच्या पहिल्या दिवसासाठी इंग्लिशची जोरदार तयारी सुरू केली (मनातल्या मनात). प्रत्येकीचं नाव, गाव, वय, छंद असे वरवरचे प्रश्न विचारायची तालीम करून ठेवली. पहिल्या दिवसाबद्दल थोडीशी उत्सुकता आणि भरपूर भीती गाठीशी बांधून मी निघाले होते. आई सोडायला येत होती, दारातून आजी-दादा हात करत होते. शाळा कुठलीही असो, तिचा पहिला दिवस असा सुरू झाला म्हंटल्यावर हायसं वाटतं! वयवर्ष चार असतं तेव्हा आणि चौदा असतं तेव्हाही! शाळेच्या आवारात मिसेस लेनी घ्यायला आल्या आणि त्यांनी मला माझ्या वर्गशिक्षिकांकडे सोपवलं!

वर्ग? भारतातील प्रत्येक वर्ग मधल्या सुट्टीतही याहून जास्त गजबजलेला असायचा. या वर्गात साधारण तीस मुली होत्या, साठ डोळे फक्त माझ्याकडे बघत होते! पहिल्याच टेबलवर मला बसवलं. घाबरत घाबरत मी माझं नाव सांगितलं (नावाचा उच्चार करायच्या कमीत कमी पाच वेगळ्या तऱ्हा पुढच्या दोन दिवसांत रूढ झाल्या!) आणि समोरच्या रिकाम्या खुर्चीत बसले. मला घेराव घालून सगळ्याजणी भरपूर बडबड करायला लागल्या आणि मला रडूच फुटेलसं वाटलं... त्याचं बोलणं मला अजिबातच समजेना! जरा वेळाने बाईंनी त्यांना शांत केलं, आपापल्या जागेवर बसवलं. भारतातून अत्ताच इकडे आल्यामुळे मला इंग्लिश्ची फारशी सवय नसल्याचं सांगितलं, आणि हजेरी घ्यायला लागल्या. एकूण बत्तीस नावांमधे एका वर्गाची हजेरी आटोपली! त्यातलं एकही नाव सहज लक्षात रहात नव्हतं. प्रश्न विचारायचीही भीती, कारण उत्तर कोणाला समजणार होतं?

दोन-चार मिनिटांनी घंटा झाली. राष्ट्रगीत आणि प्रार्थना म्हणायला मी ‘सावधान’ स्थितीत उभी राहिले, पण बाकी सगळ्याजणी उठून वर्गाबाहेर पडल्या! प्रत्येक तासाला वेगळ्या वर्गात जायची ही पद्धत अंगवळणी पडायला कित्येक दिवस लागले. दर क्षणाला काहीतरी नवीन कळत होतं, काहीतरी नवीन कानावर पडत होतं, मधलाच इंग्लिश शब्द समजल्याचा आनंद होत होता, ठाण्याच्या शाळेची अचानक आठवण येत होती आणि नववी दहावीची महत्त्वाची वर्ष कशी पार करायची अशी काळजीही पहिल्याच दिवसापासून वाटत होती. बोलता मात्र फारसं येत नव्हतं. तो किती मोठा फायदा होता हे आज मागे वळून पहाताना जाणवतं. जास्तीत जास्त गोष्टी पहायची, ऐकायची आणि समजून घ्यायची ती सोन्याची संधी होती. आज खूप जण आश्चर्याने विचारतात, “मराठी शाळेत असूनही इंग्लिशचं कसं काय जमलं बुवा?” तेव्हा सहज म्हणावंसं वाटतं, “मराठी शाळेत होते म्हणून जमलं!” त्याची दोन कारणं असावीत बहुतेक. पहिलं म्हणजे मातृभाषा पक्की असेल तर दुसऱ्या कुठल्याही भाषेचा रंग चढायला वेळ लागत नाही, आणि दुसरं असं की कोऱ्या पाटीवर बाराखडी शिकणं जास्त सोपं! इंग्लिश लिहा-वाचायला भारतात सुरुवात झाली असली तरी बोलायची वेळ इंग्लंडमधेच पहिल्यांदा आली...

महिन्याभरात नेहमीच्या मैत्रिणींच्या बोलण्याची सवय झाली. मराठी शाळेत घोटलेल्या इंग्लिश व्याकरणामुळे लिखाणात अडथळे कमी येत असत. पण माणसं समजणं आणि माणसाला समजावणं कोण कुठल्या शाळेत शिकवू शकणार? त्यामुळे बोलत बोलत, चुकत, अडखळत, धडपडतच माझा इंग्लिश आवजही हळुहळू बाळसं धरायला लागला. फ्रेंचच्या तासाला त्या अजब भाषेचा भडिमार मात्र पेलवत नव्हता. केलेल्या अभ्यासाला ‘अपूर्ण’ असा शेरा आठवडाभर मिळाल्यानंतर मी शाळेत नवीन असल्याचं सरांना समजलं. त्यांनी पुष्कळ लक्ष घालून मला परीक्षेसाठी तयार केलं. दरम्यान वाढता अभ्यास, वाढती मित्र-मैत्रिणींची संख्या, अनेक संस्कृतींची माझ्यासमोर उलगडणारी कोडी, आणि आसपासच्या वातावरणाची होणारी सवय यांमुळे लंडनच्या एका लहानशा कोपऱ्याला का होईना, घरपण येत होतं.

मधेच कधीतरी घरची कडकडून आठवण यायची. अशाच एका सर्द दिवशी भारताचं कौतुक मित्र-मैत्रिणींना सांगत होते. “मला ताबडतोब घरी परत जावंसं वाटतंय! पण काय करणार?” मी मंद्रसप्तकात तक्रारीला हात घातला. झिंबाब्वेच्या टेमी ने दुजोरा दिला, “हो गं, मलाही... पण कसं जाणार? आमच्या गावात दंगली सुरू झाल्या तेव्हा आम्ही कसाबसा देश सोडून पळून आलो. कुठली तयारी नाही, निघायच्या आधी कोणाची भेट घेणंही झालं नाही. आता घर आहे की नाही तेही माहिती नाही, घरी जायची स्वप्न तरी काय बघू?” जेसिका तिच्या खांद्यावर हात टाकत चेह-यावर हसू आणून म्हणाली, “मी नशीबवान आहे म्हणायचं तर! माझी याच शहरात दोन दोन घरं आहेत. आईचं एक, आणि बाबांचं एक! त्या दोघांबरोबर एकाच वेळी रहाता येत नाही एवढीच काय ती तक्रार! असो... निघूया? सायन्सच्या तासाला उशीर होईल ना?” मी सुन्न! पुढचा दिवसभर काय झालं हे लक्षात नाही, पण रात्री झोपताना फक्त समाधान वाटत होतं. माझं ठाणं शांत असल्याचं, परत जाण्याचे बेत रचण्याचं, संध्याकाळी नातलगांशी बोलल्याचं, रात्रीचं जेवण आई आणि बाबांच्या मधोमध बसून जेवल्याचं...फक्त समाधान!

जिथल्या शाळा कधी माझ्या वाटूच शकत नाहीत असं गृहित धरून चालले होते तिथे चार वर्षांत दोन शाळांनी चांगलाच जीव लावला होता. अकरावी-बारावीसाठी मार्कांच्या जोरावर उत्तम शाळेत प्रवेश मिळाला. अभ्यासाचा, इंग्लिशचा आणि एकूणच सांस्कृतिक फरकांचा लगाम हातात येत होता त्यामुळे या शाळेत तोंडी लावायला एक choir (समुहगान) आणि वादविवाद स्पर्धा पानात वाढून घेतल्या.

पाश्चात्य शास्त्रीय संगीताचा अजिबात गंध नव्हता. स्वरावटीची चिन्ह कागदावर बघून म्हणण्याची कला अवगत काय, ठाऊकही नव्हती. पहिल्यांदा गाताना फार धाप लागली म्हणून सरांना जाऊन विचारलं, “मिस्टर मॅक, इतकं दमवतं प्रत्येक गाणं?” त्यांना आश्चर्याने हसू आलं. “हे तर सोपं आहे! दमलीस कशी? म्हणून दाखव बघू!” तालीम झाल्यावर मी एकटीने संपूर्ण गाणं म्हणून दाखवलं तर सर खळखळून हसले.

“मी ऐकतानाही दमलो. तीन लहान गट आहेत ना तुम्हा २४ जणांचे? त्यातला एक गट मध्यसप्तकात, दुसरा मंद्रसप्तकात आणि तिसरा तारसप्तकात एकाच वेळी गातो. त्याला ‘हार्मनी’ म्हणतात. तू मध्यसप्तकातली आहेस, आणि अत्ता मला तीनही गटांच्या ओळी एकटीने म्हणून दाखवत होतीस!” पहिल्याच दिवशी दणदणीत फजिती झाल्यामुळे पुढे कुठलीही छोटीशी चूक होईल अशी भीती वाटली नाही. तीन महिन्याच्या रियाज़ानंतर आम्ही चोवीस जण आणि सर बसमधून दिव्यांच्या लखलखाटात पसरलेल्या एका लहानशा गावात कार्यक्रमासाठी गेलो. बैठ्या घरांमधून एक सुळका वर आलेला दिसला. इंग्लंडमधील सगळ्यात जुन्या चर्च पैकी हजार वर्षांचं ते रॉचेस्टर चर्च! थंडी कापत चर्चच्या आत गेलो मात्र, पण कशासाठी आलो होतो त्याच्याच विसर पडला. मान झुकत झुकत पाठीला टेकली तरी चर्चचं छप्पर नजरेस येईना. मेणबत्त्यांच्या उजेडात, भल्यामोठ्या ऑर्गनच्या सुरांत आणि जमलेल्या गर्दीच्या हजेरीत त्या रात्री गायलेल्या गाण्यांचा आवाज पुढचे कित्येक दिवस कानांत घुमत राहिला! अकरावीच्या वर्षात या गाण्यांची सवय होते आहे, गोडी लागते आहे असं वाटत असताना बारावीच्या निमित्ताने हा नवा उपक्रम सोडणं अगदी जीवावर आलं होतं...

उन्हाळी सुट्टीनंतर आम्ही सगळे बारावीच्या पहिल्या दिवशी जीवाचे कान करून शाळेच्या सभागृहात एकत्र आलो. शिक्षक अभ्यासाचं ‘चाटण’ देतील अशा खात्रीनेच गेलो होतो म्हणा! भाषण सुरू झालं...

गुलमोहर: 

मस्त लिहीलंय!!

पहिलं म्हणजे मातृभाषा पक्की असेल तर दुसऱ्या कुठल्याही भाषेचा रंग चढायला वेळ लागत नाही, आणि दुसरं असं की कोऱ्या पाटीवर बाराखडी शिकणं जास्त सोपं!
>>
अगदी पटलं.

अशीच लिहीत रहा. Happy