''भिकार्‍याची श्रीमंती''

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 18 January, 2012 - 09:19

( रंगमंचावर फाटक्या जुन्या कपड्यांतला ,दाढीची खुंटे वाढलेला आणि हातात वाडगं घेतलेला भिकारी.)

भिकारी : अल्लाह के नाम पे दे दे बाबा...भगवान के नाम पे दे दे. दो दिनों सें भूखा हूं. काही तरी धर्म करा ओ माई. .... ए बाबा, अरी ओ मेमसाब..... भगवान के नाम पे दे दो. आप मुझे दोगी...भगवान आपको देगा. ... आपका हर टेन्शन दूर करेगा.

(रंगमंचावर युनिफॉर्म घातलेल्या इन्स्पेक्टरचा प्रवेश.)

इन्स्पेक्टर : टेन्शन...... ???? अटेन्शन. मी असताना इथे अजून कोण आला टेन्शन देणारा????

भिकारी : च्या आयला.....

इन्स्पेक्टर : काय? माझ्या आयला????

भिकारी. : तसं नाही साहेब... च्या आयला म्हणजे तुम्ही आलात????? पण तुम्ही का आलात?

इन्स्पेक्टर : कुणीतरी इथेच आता भगवान... भगवान म्हणून ओरडत होतं.... म्हणून मी आलो. मी इन्स्पेक्टर भगवान भोसकर.

भिकारी : अबे भोस..... कर साहेब...... तुम्ही इथं काय भोसकाभोसकीचा तपास करायला आलेत?

इन्स्पेक्टर : भोसकाभोसकी नाही.... हुसकाहुसकी करायला आलोय...... ह्या एरियातून तुला हुसकवायला आलोय.भीक मागणं कायद्याने गुन्हा आहे माहीत नाही तुला. थांब तुला आता आतच टाकतो.

भिकारी : टाका टाका.... आतमधेच टाका. मेहनत करुन लै कट्टाळा आलाय. सरकारी पाहुणचार झोडेन म्हणतो जरा आता.

इन्स्पेक्टर : मेहन॑त ?? अरे भीक मागून जगणारा तू??? मेहनत करतोस म्हणायला तुला काही लाज-लज्जा??

भिकारी : लज्जा पिक्चर बघितला ना साहेब. ( ओठावरुन जीभ फिरवत ) माधुरी काय रापचिक नाचलेय त्या पिक्चर मधे.....

इन्स्पेक्टर : शटाप... अरे कसले डर्टी पिक्चर बघतोस???

भिकारी : त्यो नाय बघितला सायेब.( वेडेवाकडे अंगविक्षेप करत ) विद्या बालन ने फारच बहारदार काम केलंय असं ऐकलंय मी.

इन्स्पेक्टर : चूप बस... आवाज नाय पायजेल.... चल मी तुला अटक केलीय..

भिकारी : ओ सायेब...... खुशाल करा अटक..... आपण अटकेला घाबरत नाय.... कारण आपण तुमच्या सारखा चरत नाय.

इन्स्पेक्टर : काय म्हणालास??? परत बोल?

भिकारी : हे बोलणे परत नाय....... अरेच्चा...... घाबरत नाय.....चरत नाय.... परत नाय......
मिसरे का मुखडा हुआ, मुखडे का अंतरा हुआ.... साला मै तो शायर बन गया.

इन्स्पेक्टर : ( छद्मीपणे ) शायर?? हॅ हॅ हॅ.....

भिकारी : हॅ हॅ हॅ काय???? शायर होणं म्हणजे साधी गोष्ट वाटली का तुम्हाला?

इन्स्पेक्टर : शायरं असणं आणी शायर होणं म्हणजे काय? हे तू मला सांगतोस.... अरे भिकारड्या मी स्वताच एक शायर आहे. इस नाचीज को भगवान ''घायल'' कहते है.

भिकारी : घायल????? आता तर तुमचं नाव भोसकर म्हणाला होतात......

इन्स्पेक्टर : अरे घायल हे माझं तखल्लुस आहे ...तखल्लुस. उ-प-ना-म

भिकारी : च्यायला भलताच बदनाम माणूस दिसतोय.

इन्स्पेक्टर : बदनाम बदनाम काय म्हणतोयस. माझं चारित्र्य माखलेल्या तांदळासारखं स्वच्छ आहे.

भिकारी : क्काय???

इन्स्पेक्टर : ( गोंधळून ) म्हणजे..... धुतलेल्या तांदळासारखं स्वच्छ आहे.

भिकारी : अहो पण मी म्हणतो.... तुमचं चारित्र्य एवढं स्वच्छ आहे...तर ते धुवाच कशाला?

इन्स्पेक्टर : चूप बस... धू म्हटल्यावर धुवायचं..... लोंबतंय काय विचारायचं नाही.

भिकारी : नाहीच विचारत बाबा.... लोंबंव काय लोंबवायचंय ते,..... काय करु???? कसा पिच्छा सुटेल ह्या हलकटापासून ..... हे भगवान वाचंव मला...... नको नको... भ॑गवान म्हटलं की हाच येतो समोर.... मै भगवान घायल करत भोस......कर. या पेक्षा असं करतो याला टपकवूनच टाकतो.

इन्स्पेक्टर : ए भिकारड्या..... टपकवायला मी काय मधाचं पोळं वाटलो की काय तुला?

भिकारी : पोळं नाही पण माजलेला पोळ आहेस खरा.

इन्स्पेक्टर : मी माजलेला पोळ.???... अरे स्वताच्या वाढलेल्या पोटाकडे बघ... मग कळेल कोण माजलंय ते.
( भिकार्‍याच्या पोटाला हात लावत ..) हे पोट काय न खाता पिताच वाढलंय का?

भिकारी : ओ .. ही माझी व्यायामाची बॉडी आहे. रोज तळवलकर्स मधे जातो.

इन्स्पेक्टर : काय?

भिकारी : अहो भीक मागायला.... भीक मागायला जातो. तिथलं न्युट्रीशस्,डाएट कॉन्शस फूड खाउन तयार झाली ही स्टील बॉडी. ( रंगमंचावर विविध कोपर्‍यात जावून शरीर सौष्ठवाच्या पोजेस देतो )

इन्स्पेक्टर : आयला...... मग मला पण गेलं पाहीजे तळवलकर्सला.

भिकारी : तुम्ही जाणार तळवलकर्सला भीक मागायला?

इन्स्पेक्टर : च्यायला भिकार्‍याच्या बायकोला भीकेचेच डोहाळे........ अरे व्यायाल करायला जाईन म्हणतो.. व्यायाम करायला.

भिकारी : अहो त्याला वेळ द्यावा लागतो. तास तासभर मेहनत करुन घाम गाळावा लागतो. पण तुम्हाला कसली फुरसत? तुमचं ''खातं''च असं आहे की तुम्हाला खाण्यापासून फुर्सत मिळत नाही. तुम्ही कसला वेळ
काढणार?...... संतांनी म्हटलंच आहे...... प्यार का पहला खत लिखनेमे..वक्त तो लगता है.... नये परिंदों कों उडने में वक्त ओ लगता है..... वक्त तो लगता है... वक्त तो लगता है...

( रंगमंचावर घाईघाईत '' नेत्याचा'' प्रवेश )

वक्त तो लगता है... वक्त तो लगता है.. पण किती वेळ? अरे माझ्या मागून आलेले युवा नेते वर्षा दोन वर्षातच नगरसेवक झाले..... कुणी आमदार झाले,कुणी मंत्री झाले.पण गेली पंधरा वर्षे राजकारणात...समाजकारणात असूनही मी आहे तिथेच. दरवर्षी ज्येष्ठांना स्वखरचाने अष्टविनायक यात्रेस नेतो.युवकांना क्रिकेट स्पर्धेसाठी रोख रकमा देतो..... गणेशोत्सव म्हणू नका .. नवरात्री म्हणू नका...... सगळीकडे सढळ हस्ते पैसा खर्च करतो.... पण श्रेष्ठींकडे तिकिट मागायला गेलो,की म्हणतात... पक्षकार्य करा... पक्ष वाढवा.... तुम्हाला तिकिट द्यायला अजून वेळ आहे.

म्हणे नये परिंदोंको उडने में वक्त तो लगता है..... अरे हा परिंदा नव्याचा जुना झाला... आता मी उडू की पाण्यात बुडू???? ( पाण्यात बुडायचा अभिनय करतो )

भिकारी : ए थांब थांब.... त्या पाण्यात बुडू नकोस.... आधीच पाणी प्रदूषित आहे,... त्यात तू बुडालास म्हणजे ते विषारीच होईल.... आणि विषबाधा होवून आम्ही हकनाक मरु.

इन्स्पेक्टर : मरु????? मरु वरनं मला एक शेर आठवला. माणूसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमचे सुरु... जिंकू किंवा मरु.जिंकू किंवा मरु.

भिकारी : ओ घायल..तुम्ही शायर आहात ना? गायक कधीपासून झालात?

इन्स्पेक्टर : अरे शायर व्हायला घायल व्हावं लागतं.... गायक व्हायला नाही.

नेता : अहो इन्पेक्टर ... लोक घायल व्हायला लागले...जा जरा पंचनामे बिंचनामे करा.

भिकारी : ते नाही करणार..... ते माझ्या इज्जतीचा पंचनामा बाकी बरोबर करतील.

नेता आणि इन्स्पेक्टर : तुझी इज्जत.. हा हा हा !!

नेता : तुम्ही भिकारी म्हणजे आपल्या देशाला लागलेली कीड आहे. नाक्यानाक्यावर... बस मधे,ट्रेनमधे..जिथं पहावं तिकडं सालं भिकार्‍यांचा सुळसुळाट.... परवा अमेरिकेचा मोठ्ठा नेता.... ''ओसामा'' आला होता.

इन्स्पेक्टर : ओसामा?????? अहो ओबामा असेल.

नेता : हो तोच तो..... जागोजागी भिकारी पाहून तो भलताच व्यथित झाला. म्हणे,आमच्याकडे पण भिकारी असतात...पण ते कार मधे बसून भीक मागतात.

भिकारी : आमच्याकडेही कारमधून भीक मागणारे आहेत.... पण ते पाच वर्षांतून एकदाच येतात आणि मतांची भीक मागून निघून जातात.

इन्स्पेक्टर : शटाप..... आमच्या नेताजींना भिकारी म्हणतोस.... थांब तुला आता मोक्काच लावतो...

नेताजी : अरे भिकारड्या... भिकार्‍याने कसं .. भीक मागावी आणि गप गुमान पडून रहावं. आपल्या मर्यादेत रहावं. भिकारडा कुठला.

( रंगमंचावर गंभीर सूर )

भिकारी : मला भिकारडा म्हणताहेत....... हा नेता... हा इन्स्पेक्टर.... म्हणे मी आपल्या मर्यादेत रहावं.... हा हा हा... व्हॉट अ जोक....

अरे.... तपासकाम वेगात व्हावं म्हणून तिम्ही फिर्यादिकडून लाच घेता....... सुटायला वाव ठेवावा म्हणून आरोपीकडून लाच मागता....रिक्षावाले,फेरिवाले ,टॅक्सीवाले......... अनधीकृत गुत्तेवाले यांच्याकडून लाचेची भीक मागता आणि मला भिकारी म्हणता...... अरे... या जगात खरे भिकारी तुम्ही.

हे भ्रष्ट नेते... तिकिट द्यावं म्हणून श्रेष्ठींकडे भीक मागतात.... कार्यकर्त्यांनी आग्रह धरावा म्हणून कार्यकर्त्यांच्या पाठींब्याची भीक मागतात... तिकिट मिळावं म्हणून मतदारांकडे मताचा जोगवा मागता.... अरे हा जोगवा नाही... ही भीकच... भीकच आहे ही.... आणी म्हणे मी भिकारी.

लोक हो..... मी पदवीधर आहे.... नोकरी मिळण्यासाठी लाचेची भीक देवू शकलो नाही..म्हणून दोन वेळच्या पोटाची भ्रांत भागवण्यासाठी भिकारी झालोय....... तुम्हीच सांगा.... परिस्थितीने नाडलेला मी भिकारी..... की आम्हासारख्या पदवीधरांना भीकेला लावणारे हे भ्रष्ट नोकरशहा, नेते आणि पोलिस भिकारी.....

अरे नराधमांनो.... खरे भिकारी तर तुम्ही आहात... खरे भिकारी तर तुम्ही आहात.... तुम्ही आहात.

( प्रेक्षकांकडे पहात हात जोडत सपशेल लोटांगण घालतो.... भिकार्‍याच्या दोन्ही बाजूस येवून नेता आणी इन्स्पेक्टर प्रेक्षकांस अभिवादन करतात ) इतक्यात पडदा पडतो.

टीप : नवी मुंबई महानगरपालिकेच्या २० व्या वर्धापनदिनी ( ३ जाने.२०१२) सदर स्कीट ''एकांकिका' स्पर्धेत आम्ही सादर केले ज्यास प्रथम पुरस्कार मिळाला .

skit.jpgskit1.jpg

--डॉ.कैलास गायकवाड.

गुलमोहर: 

.

एकांकीका(स्कीट) विभाग नसल्याने विनोदी लेखनात टाकले आहे असे समजून वाचले.

संदेशपर आहे.

बक्षिसाबद्दल अभिनंदन