राब - मराठी साहित्यातील एक उपेक्षित मानदंड

Submitted by chaukas on 18 January, 2012 - 01:01

'राब' ही अनंत मनोहर यांची कादंबरी. मराठी साहित्याचा एक मानदंड ठरावा अशी. पण दुर्दैवाने आतापर्यंत उपेक्षित राहिलेली. "मराठी साहित्य तोकडे / थिटे / कमअस्सल आहे का?" या सदाबहार विषयावर इरेसरीने चर्चा करताना जे अपवाद झळाळून डोळे दिपवतात त्यापैकी एक.

कथानक तसे सरळधोट आहे.

भिवा मोरे घरातील भांडणांमुळे तडकाफडकी कोंकणातील (चिपळुणाजवळचे आनेगाव) घर सोडून थेट सैन्यात भरती झालेला. तो तिशीतच निवृत्ती घेऊन बंगळुरूला एका उदबत्तीच्या कारखान्यात नोकरी मिळवून स्थायिक होतो. त्याला मुलगा होतो, आणि तो मुलगा लहान (चार महिन्यांचा) असताना भिवा अकाली निधन पावतो. त्याची बायको गुणा त्याच कारखान्यात नोकरी चालू ठेवते. मुलगा शिवा सोळा-सतराचा होतो. आणि कोंकणातून ज्या चुलत्याने शिवाला आणि गुणाला घराबाहेर काढलेले असते त्याचेच परत बोलावणीचे पत्र येते. कारण त्या चुलत्याचा एकुलता उरलेला (तीन निवर्तलेले असतात) मुलगा आजारी होऊन पार मरायला टेकतो. तेव्हा "आपले कुठेतरी चुकले असेल" असा त्या चुलत्याला क्षणभर पश्चात्ताप होतो आणि त्याची बायको (भिवाची चुलती) देखील आयुष्यात एकदा रेटा देऊन नवऱ्यासमोर तोंड उघडते आणि "हे तुमच्या करणीचे फळ" असे माप त्याच्या पदरात घालते.

मायलेक परत यायला निघतात. त्यांचे येथले वास्तव्य (मायलेक येथेच स्थायिक होण्याचा निर्णय घेतात) हा या कादंबरीचा कॅनव्हास. त्यात त्यांना भेटणारी माणसे, त्यांच्या अंतर्गत संबंधातील ताणेबाणे हे त्यावरील रंग. त्याचे अजून तपशील देऊन कादंबरी प्रत्यक्ष वाचण्यातला अर्थ काढून घेत नाही.

या कादंबरीचे वेगळेपण कशात आहे?

एक म्हणजे जवळजवळ संपूर्ण कादंबरी चिपळूणच्या जवळ सह्याद्रीच्या डोंगररांगेत वसलेल्या एका खेड्यात घडते. तिथली माणसे, त्यांची बोलीभाषा, त्यांचे खाद्यपदार्थ, त्यांची जगण्याची पद्धत या आणि अशाच सर्व गोष्टी यात फिरफिरून येतात. त्या अर्थाने ही 'प्रादेशिक कादंबरी' म्हणता येईल. त्या गटात नक्कीच स्वतःचे नाणे पाडणारी अशी ही कलाकृती आहे.

दुसरे म्हणजे यातील बरीचशी कुटुंबे 'मराठा' जातीची, स्वतःला 'राव' म्हणवणारी, पण परिस्थितीने बहुतांशी गांजलेली, मुंबईच्या मनिऑर्डरींवर जगणारी (कोंकणात दुसरे काय घडणार म्हणा!) अशी आहेत. 'मराठा' म्हणजे नावावर पन्नास-शंभर एकर जमीन, त्यात ऊस. मग बुडाखाली फटफटी, जीप, आंबाशिटर आदी वाहने, घरात/भावकीत सरपंच, आमदार, झेड पी अध्यक्ष, राजकारणी, आणि आपापल्या कुळांचा (ब्याण्णव / शहाण्णव/ अठ्ठ्याण्णव आदी) ज्वलंत अभिमान असे साचेबद्ध चित्र उभे करण्यात दुर्दैवाने मराठीतील बहुतेक 'साहित्यिक' यश पावले आहेत. 'राब'मधील हे मराठे 'माणसे' वाटतात. मिशांचे आकडे पिळून खुर्च्या आणि बाया नासवत हिंडणारे हिंदुराव झेंडे पाटील किंवा बंधुराव धोंडे पाटील किंवा तत्सम राक्षस नाहीत. अर्थात कादंबरीत इतरजन - बौद्ध, मुसलमान, भटजी, कुडमुडे जोशी यांचेही यथातथ्य वर्णन आहे. त्यात कुठेही उणेपण नाही.

तिसरे म्हणजे अनंत मनोहरांची सर्वस्पर्शी प्रतिभा या परिसरातील बोलीभाषा बिनचूक टिपते. त्यातील विशेषणे, म्हणी, सर्व सर्व कसे तंतोतंत उतरले आहे. त्यातील सूक्ष्म भेदही ते हळुवारपणे टिपतात आणि तसेच ठेवतात. उदाहरणार्थ, या परिसरातील मराठा वर्ग "ळ" हा उच्चार करत नाही. त्याजागी "ल" येतो (सकाली, खेल इ). हेच तिथल्या मुसलमानांचेही होते. पण कोंकणी मुसलमान "ड" हा उच्चार न करता त्या जागी "र" वापरतात. (होरी, परला इ). हे भेद जेव्हा गावातील 'राव'लोक मुसलमानांशी बोलतात तेव्हा झकास अधोरेखित होतात. भाषेची नोंदच करतो आहे तर हेही टिपतो, की सुरुवातीला बंगळुरूतील पात्रे दाखवताना त्यांचे कानडीमिश्रीत मराठीही हुबेहूब उतरले आहे.

चौथे म्हणजे ह्या कादंबरीत जरी प्रमुख पात्रे कथानक पुढे नेत असली तरी लेखकाचा वनजीवनाचा (जंगलातील प्राणी, झाडे-झुडुपे, औषधी इ), पर्यावरणाचा (जंगलतोड, धो-धो पडून समुद्रात वाहून जाणारे पावसाचे पाणी इ), शेतीचा (पारंपरिक शेती, नवीन शेतीच्या संकल्पना, छोटे बंधारे इ), खगोलशास्त्राचा (आकाशातील नक्षत्रांचे मनोरम वर्णन) गहिरा व्यासंग जाणवतो. पट्टीच्या गवयाला चांगल्या जुळलेल्या तंबोऱ्याची जशी अव्याहत (पण अजिबात अंगावर न येणारी) साथ असते तसे मूळ कथानकात या वर्णनांचे धागे हळुवारपणे गुंफले जातात.

(येवढी प्रत्ययकारी वर्णने वाचून असे वाटून जाते, की मनोहर जर वनजीवनावरच्या लिखाणावर लक्ष केंद्रित करते तर मराठीला अजून एक चितमपल्ली किंवा तात्या माडगूळकर मिळाले असते. शेतीवर लक्ष केंद्रित करते तर अजून एक श्रीपाद दाभोळकर मिळाले असते. असो. हे दुखणे कादंबरीच्या रसग्रहणाच्या आड येऊ नये म्हणून वेगळ्या परिच्छेदात घातले आहे. आणि त्यांनी असे काही लिहिले असेलच तर ते न वाचल्याची चूक माझी आहे.)

पाचवे म्हणजे, आयुष्यात आणि पर्यायाने साहित्यात, सुष्ट आणि दुष्ट यांचा संघर्ष नेहमीच चाललेला असतो. आयुष्यात ह्या व्याख्या फारच व्यक्तीकेंद्रित असतात. मला 'मी सुष्ट आणि सोमाजी गोमाजी कापशे दुष्ट' असल्याची खात्री असते. याच्या बरोबर विरुद्ध खात्री सोमाजी गोमाजी कापशे यांना असते. साहित्य हे आयुष्याचीच प्रतिमा असल्याने बहुतेक ठिकाणी खलनायक रंगवताना डावभर डांबर जास्त पडते आणि नायकाला एक चुन्याचा हात जास्त बसतो. त्यामुळे खलनायकाचे पात्र हे ज्याला 'पायतानानं ईस हानून येक मोजावी' अश्या लायकीचेच रंगवले जाते. 'राब'मधले खलनायक फारच माणसातले आहेत. फारच 'आपल्यातले' आहेत. त्यांचे जीवन, त्यांचे मरण हे आपल्याही मनात कुठेतरी एक आंदोलन नादवून जातात.

सहावे म्हणजे कुठल्याही कलाकाराला ' (तत्कालीन) रसिकांच्या पसंतीस उतरणे' ही अग्नीपायरी ओलांडणे भागच असते. तसे न झाल्यास 'जगताना विपन्नावस्था आणि मृत्यूनंतर जागतिक प्रसिद्धी' अशी व्हॅन गॉगसारखी परिस्थिती होते. आप मेला आणि जग बुडाला. आपण मेल्यावर प्रसिद्धी मिळाली(च) तर काय फायदा? म्हणून बरेचसे कलाकार तत्कालीन रसिकांना आवडेल अश्या आशेने मसाला वैरतात. मग गायक दीडदोन मिनिटे एकच स्वर लावून धरतात, कवी चार ओळीत जीवनाचे सार सांगितल्याचा आव आणतात आणि लेखक प्रणयाचे गुलाबी रंग निर्लज्जपणे उधळीत बसतात. अनंत मनोहरांनी हे 'झटपट विद्ये'चे आकर्षण झिडकारून लावले आहे. मुळात 'राब' मध्ये नायक आणि नायिका ही पात्रे पारंपरिक पद्धतीने रंगवलेली नाहीत. त्यांच्या जीवनात येणारी इतर पात्रेही आपापले 'फूटेज' खाऊनच मग रवाना होतात. नायक-नायिकेत फुलत जाणारी प्रेमभावना कमळ फुलते तितक्या हळुवारपणे उमलवली आहे. त्यांच्यातील शृंगारिक भावना दाखवण्यासाठी जे काय शब्द वापरले आहेत ते साक्षात कृष्णराव मराठ्यांनाही आक्षेप घेता येणार नाहीत असे आहेत.

सातवे म्हणजे कुठलीही कलाकृती ही 'कालसापेक्ष' किंवा 'कालातीत' या दोन्हीपैकी एकात बसवता येते. 'कालसापेक्ष' कलाकृतीत एकतर विषय फारच त्या कालापुरता मर्यादित असतो, किंवा ती कलाकृती घडते तो काळ फारच ठळकपणे आणि पुनःपुन्हा मांडला जातो. कालातीत कलाकृतीत विषय किंवा मांडणी कालाचे बंधन उधळणारी असते. 'राब' एक कालातीत कलाकृती आहे. त्यात कालसापेक्षतेचे एखाद-दोन ठिपके आहेत, पण ते अजिबात अंगावर येत नाहीत. पोस्टमन गमरे हा व्यक्ती पहिल्या महायुद्धात सहभागी झालेला. त्याच्या वयाचा अंदाज वर्तवताना एक कालसापेक्ष बिंदू मिळतो. दुसरा, जेव्हा मुंबईचे चाकरमानी सुटीला येतात, तेव्हा त्यांच्या गप्पांत 'जार्जसाहेब (जॉर्ज फर्नांडिस) दिल्लीला गेल्यापास्नं' असा उल्लेख येतो तेव्हा एक बिंदू मिळतो. पण एकंदरीत विचार करता 'राब'चा जो परिणाम वाचकाच्या मनावर होतो तो 'कालातीत' या सदरात निःसंशय टाकता येतो.

असो. माझ्यातील सात 'आंधळ्या'ना काय 'दिसले' ते वर मांडले आहे. हत्ती प्रत्यक्षात कसा आहे हे चोखंदळ वाचकांनी स्वतः अनुभवलेले बरे!

पुस्तकाचे मुखपृष्ठ (राजेंद्र तोडमल) सुंदर आहे. 'ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा' अशी काहीशी भावना जागविणारे.

प्रकाशक - कॉंटिनेंटल प्रकाशन प्रथमावृत्ती - १९८१

परीक्षण पूर्वप्रसिद्धी: मनोगत

गुलमोहर: 

आपण ओळख तर पुस्तक वाचावंच असं वाटायला लावावी इतकी सुंदरच करून दिली आहे!


मग गायक दीडदोन मिनिटे एकच स्वर लावून धरतात, कवी चार ओळीत जीवनाचे सार सांगितल्याचा आव आणतात आणि लेखक प्रणयाचे गुलाबी रंग निर्लज्जपणे उधळीत बसतात. अनंत मनोहरांनी हे 'झटपट विद्ये'चे आकर्षण झिडकारून लावले आहे.
आवडलंच!

माझ्यातील सात 'आंधळ्या'ना काय 'दिसले' ते वर मांडले आहे. हत्ती प्रत्यक्षात कसा आहे हे चोखंदळ वाचकांनी स्वतः अनुभवलेले बरे!
हेही झक्कास!

कुठलीही कलाकृती ही 'कालसापेक्ष' किंवा 'कालातीत' या दोन्हीपैकी एकात बसवता येते. 'कालसापेक्ष' कलाकृतीत एकतर विषय फारच त्या कालापुरता मर्यादित असतो, किंवा ती कलाकृती घडते तो काळ फारच ठळकपणे आणि पुनःपुन्हा मांडला जातो. कालातीत कलाकृतीत विषय किंवा मांडणी कालाचे बंधन उधळणारी असते. 'राब' एक कालातीत कलाकृती आहे. व्वा !

भन्नाट लिहिलाय हा परीचय. Happy

चौकस, तुमची परीक्षण करण्याची हातोटी जबरदस्त आहे. पुस्तक ताबड्तोब मिळवून वाचावेसे वाटते. फार छान झाले आहे परीक्षण!!

बहुतेक ठिकाणी खलनायक रंगवताना डावभर डांबर जास्त पडते आणि नायकाला एक चुन्याचा हात जास्त बसतो. Happy खूप उत्सुकता निर्माण केली आहे परिक्षणाने.

चौकस परिक्षण आवडले.
एक विनंती आहे. तुमची पुस्तक परिक्षणे वाचू आनंदे या ग्रुपमध्ये लिहीणार का? म्हणजे मग शोधायला सोपे जाते. धन्यवाद !

चौकस तुम्ही परिक्षण फारच छान नव्हे, उत्कृष्ट लिहिले आहे. आजपर्यंत असे डिटेल्ड परिक्षण मायबोलीवर वाचले नाही.

मस्त चौकस, एकदम मस्त! आयला, तुम्ही पुस्तकाच्या रसग्रहण स्पर्धेत भाग घेतलेलात का हो? जिज्ञासा म्हणून विचारतोय.
आ.न.,
-गा.पै.

तुमची शैली मस्तच आहे.
कालातीत आणि कालसापेक्षचे विश्लेषण मात्र पटले नाही. एखाद्या लेखनात ते कोणत्या काळात घडते याचा संदर्भ येतो का नाही याचा आणि ते कालातीत असण्याचा काही संबंध आहे असे मला वाटत नाही. तुम्ही फारच ढोबळ व्याख्या करीत आहात असे वाटते. प्रेमचंद-चेकॉव्हच्या कथा त्यांच्या देश-काल-परिस्थितीची सर्व वैशिष्ठ्ये दाखवतात पण म्हणून त्या कालसापेक्ष होत नाहीत, त्या कालातीत आहेत यात शंकाच नाही.
माझ्या मते एखाद्या साहित्यकृतीमधला मूलभूत संघर्ष कालातीत आहे का कालसापेक्ष हा विचार करायला हवा.