कोई 'लोटा' दे !

Submitted by A M I T on 16 January, 2012 - 04:28

'नदीकिनारे जब हगने को बैठते है, तब पीछवाडे मस्त हवा लगती है' इश्किया सिनेमात असाच काहीसा एक डॉयलॉग आहे आणि त्यात बर्‍यापैकी तथ्य आहे.
पण आजच्या घडीला आमच्या गावात त्या डॉयलॉगमधील ती मस्त हवा त्या तथाकथित अवयवाला लाभण्याचं भाग्य एका सरकारी योजनेनं हिरावून घेतलं आणि गावकर्‍यांनी सरकारच्या नावाने बोटे मोडली.

त्यादिवशी सकाळी पांड्या सुतार आपल्या ओसरीच्या पायरीवर दात घाशीत बसला होता. इतक्यात त्याला समोरून नार्‍या धूमाळ आपल्या घराकडे लगबगीने येताना दिसला. क्षणभर पांड्या सुताराची एका बोटाची बत्तीस दातांबरोबर चाललेली घासाघीस थांबली.

"काय नार्‍या? काय गडबड?" तोंडात जमलेली मंजनमिश्रीत थुंकी मान वळवून दूर थुंकत पांड्या सुतार बोलला.
"घरात काम काढलयं मेस्तरी." ओसरीवरील एका पायरीवर टेकत नार्‍या धूमाळ.
"काय करतईस यंदा?" तोंडातील थुंकी सांभाळीत पांड्या सुतार.
"घरी संडास बांदायचा हाये."
पांड्या सुतार गवंडी कामंदेखील करायचा.
"संडास..!" पांड्या सुतार आश्चर्याने म्हणाला. "तान लागली म्हनुन कुनी हीर खोदत नाय गड्या..! आनि तू नदी आटली म्हनुन घरी संडास बांदाय निगालाईस." इतका वेळ डाव्या तळहातावर सांभाळलेली मंजन झटकत पांड्या सुतार बोलला.
"मेस्तरी, आता येळच तशी आल्यावर काय करावं बरं मानसानं?"
"म्हंजे?"
"पंचायत गावात हागणदारीमुक्त गाव नावाची सरकारी योजना राबवतीय. त्या योजनेबरहुकूम गावातल्या परत्येक घरी संडास असायला हवाय. त्यासाटी पंचायतीकडून संडासचं भांडं आन सिमेंटचा पत्रा फुकट दिला जातोय." नार्‍या धूमाळ हाताची घडी घालून मान डोलवीत बोलला.
"आनि समजा एखाद्यानं संडास नाय बांदला तर..." उजव्या हाताची मुठ डाव्या हाताच्या तळव्यावर आपटीत पांड्या सुतार.
"पंचायत दंड बसवनार हाय." नार्‍या धूमाळ आपले पिळदार 'दंड' थोपटीत बोलला.
"दंड..! बाप रे..! म्हंजे ही नस्ती भानगड..!" पांड्या सुतार तोंडातल्या तोंडात पुटपुटला.
एव्हाना त्याच्या दातांना लावलेली मंजन सुकत चालली होती.
"नंतर तुमी वेंगेज व्हायला नको, म्हनुन आधीच सांगून ठेवलं." कुठूनतरी ऐकलेला एक इंग्रजी शब्द आपल्या बोलण्यात वापरून नार्‍या धूमाळानं आपल्या बोलण्याला वजन आणलं.

एकंदरीत संत गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियानापाठोपाठ गावात हागणदारीमुक्त गाव नावाची योजना दाखल झाली. या योजनेनुसार घरोघरी संडास बांधणे बंधनकारक झाले. तसेच उघड्यावर शौचास बसण्यावरदेखील गदा आणली, म्हणजे त्यावरसुद्धा दंडात्मक कारवाई करण्याची घोषणा फलकावर हुकूमावरून ग्रुप ग्राम पंचायत या सहीनिशी उमटली.
या घोषणेतील विनोदाचा भाग म्हणजे उघड्यावर शौचास बसणार्‍याच्या त्या स्थितीतील फोटोसहीत माहीती देणार्‍यास इनाम दिला जाणार होता.
आता तसले फोटो कोण आणि कशाला काढील? हा एक प्रश्नच आहे.

नार्‍या धूमाळाचा पायगुण म्हणा की पंचायतीची दमदाटी.... पण नार्‍या धूमाळ तिथून गेल्यानंतर पांड्या सुताराला पायरीवरून उठून तोंड धुवायलादेखील सवड मिळाली नाही. संडास बांधण्याचं कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी पांड्या सुताराच्या घरापुढे गावकर्‍यांची एकच झुंबड उडाली. पांड्या सुतार गावात एकमेव गवंडी होता.

त्याच संध्याकाळी गावच्या सरपंचांनी पांड्या सुताराच्या घरी एक विषेश भेट देवून संडास बांधण्याच्या कॉन्ट्रॅक्टमधील एकूण रकमेपैकी काही टक्के आपल्याकडे राखण्यात यश मिळवले.

या योजनेने गावाचं भलं झालं असेल - नसेल, परंतू पांड्या सुताराची भरभराट मात्र नक्की झाली.
सरपंचाच्याही ढुंगणाखाली नवी बाईक आली होती.

गावात संडास बांधण्याच्या कामाला एकच वेग आला. पांड्या सुताराची तर कोण गडबड उडाली होती ! एक श्वास सोडलं तर त्याला इतर काही घ्यायला अजिबात फुरसत नव्हती.
गावातल्या नाक्यांवर चर्चा करायला 'संडासचं बांधकाम कुठपर्यंत आटोपलयं?' या विषयाखेरीज दूसरा कुठलाही विषय नव्हता.

सबंध गाव 'संडास' या एकाच ध्यासाने पछाडला होता आणि त्यातच गावचे पाटील गणपतराव हरवल्याची बातमी एका सकाळी सबंध गावभर वार्‍याच्या वेगाने पसरली.
गणपत पाटलाच्या घरापुढं गावकर्‍यांची एकच गर्दी झाली. गावकर्‍यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देताना पाटलीनबाई तोंडात पदराचा बोळा खुपसून हमसत होत्या. गावातल्या जाणत्या मंडळीनी बराच वेळ तर्क - वितर्क करून गावातल्या काही तरूण पोरांना संशयित स्थळी पिटाळले.
कालच मुंबईहून आलेल्या दिल्यानं "पाटलांना कुणी किडनॅप तर केलं नसेल?" अशी शहरी शंका उपस्थित केली.
जाणत्या मंडळींनी काही क्षण आपापली डोकी खाजवून नकारार्थी माना हलवित ही शंका दूर केली.

या पाटलीन बाईंच्या शोक आणि पाटलांच्या शोध सभेमुळे पांड्या सुताराचं काम खोळंबलं होतं. दोनच दिवसांपुर्वी त्याने पाटलांच्या संडासचं बांधकाम हाती घेतलं होतं. तो लागलीच उठून पाटलांच्या घराच्या पाठीमागे गेला आणि संडासच्या टाकीसाठी खोदलेल्या आठ - नऊ फुटी खड्यात त्याने एक नजर टाकली मात्र...
तो पळतच सभेकडे आला.
"पाटील खड्यात हायेत." पांड्या सुताराच्या तोंडून कसेबसे शब्द बाहेर पडले.
सगळी सभा घरामागे धावली आणि खड्याभोवती जमली. कुणीतरी एक लांबलचक शीडी शोधून आणली तिला खड्यात सोडण्यात आली. त्यावर चढून पाटील सुखरूप बाहेर आले. त्या दिवसापुरते ते गावचे 'प्रिन्स' होते.

पाटलांना झोपेत चालण्याची सवय आहे, म्हणून ही दुर्दैवी घटना घडली असा गौप्यस्फोट दस्तुरखुद्द पाटलीनबाईंनी जमलेल्या मंडळीत पान-सुपारीचं ताट फिरवताना केला.

मग गावात घडलेल्या अशा मजेदार घटनांची चर्चा तोंडात चघळत असलेल्या पानासोबत रंगू लागली.

एकदा तर म्हणे पाटील झोपेत चालत चालत तालुक्याला पोचले होते. आता यातलं खरं-खोटं ते एक पाटीलच जाणोत.

आमच्या गावाच्या मागच्या बाजूने स्मशानाजवळून एक नदी पावसाळ्यातील चार आणि थंडीतील चार असे आठ महीने वाहते. हे आठही महीने सबंध गाव आपापली पोटं इथं या नदीजवळच साफ करायचे.

मार्च अखेरीस नदी आटली म्हणजे आम्ही चांग्या गुरवाच्या शेतात जे तळं होतं, तिथं थोडंफार पाणी शिल्लक असायचं तिथं विधी उरकायला जात असू. पण तिथं पाणी कमी चिखलच फार असे. त्या पाण्यात म्हशी तासनतास डुंबत बसलेल्या असल्यामुळे ते पाणी सदैव गढूळच असे.
"ढवाकडे येतोस का रे?" पक्या या तळ्याला 'ढव' संबोधित असे.
पक्याच कशाला? आम्ही सारेच.
'ढव' हा शब्द 'डोह' या शब्दाचा अपभ्रंश असावा, असा माझा आपला प्राथमिक अंदाज की काय म्हणतात? तो आहे.
"ढव काय रे म्हणतोस पक्या त्याला? गा'ढव'च आहेस.!" मी पक्याची थट्टा करण्याच्या मुडमध्ये होतो.
"मग काय म्हणू? लेक?" पक्या म्याट्रीक पास आहे.
"लेका, त्याला लेक म्हणणे म्हणजे मुंबईला शांघाय म्हणण्यासारखं आहे."
"मग?"
"शांघायचा आयमीन सांगायचा मुद्दा हाच की फार फार तर आपण त्याला म्हैशींचं स्विमींग पुल म्हणू शकतो."
यावर पोट आणि त्यात आलेली कळ दोन्ही दाबून पक्या कितीतरी वेळ हसत होता.

योजनेतील संडास बांधण्याची मुदत आता संपली होती. गावात 'संडास' नावाचं वादळ शमलं होतं.

नंदू चोरगेला सायकलवरून स्मशानाच्या दिशेने जाताना आम्ही तिघांनी पाहीला. सायकलच्या मागे कॅरीयरला पाण्याने भरलेली बिस्लरीची बाटली अडकवलेली होती.
"हा पाणी प्यायला स्मशानात जातो?" मी.
"मी ह्याला रोजच बघतो ह्या टायमाला." पक्या.
"ए चला. बघूया तरी काय भानगड आहे?" गोपाळनं धावण्याच्या शर्यतीत घेतात तशी पोझिशन आधीच घेतली होती.
नंदूचा पाठलाग करत आम्ही तिथे पोचलो, तेव्हा नंदू एका झुडूपाआड आपल्या शरीरातील काही ग्रॅम वजन मलमुत्राच्या रूपाने कमी करताना दिसला.
कुणाला संशय येवू नये, म्हणून त्याने बिस्लरीच्या बाटलीत पाणी आणले होते. मी मनोमन नंदूच्या अकलेला दाद दिली.
"च्यायला ह्याने पंचायतीचा नियम तोडला." इति गोपाळ.
"हायला..! हा यवढा श्रीमंत कधी झाला, बिस्लरीच्या पाण्यानं बुड धुवायला?" पक्याची समस्या निराळीच होती.
"बिस्लरीची फक्त बाटलीच आहे. आत पाणी विहीरीचच आहे." मी पक्याच्या बिन'बुडा'च्या समस्येचं निराकरण केलं.
"आत्ता ह्याचा फोटो काढतो आणि पंचायतीत दाखवतो. इनाम तर भेटंल." एव्हाना पक्याने आपल्या चायना मोबाईलचा कॅमेरा ऑन केला होता.
"पक्या लेका तूला ठावूक नाही. ह्याच्या मेव्हण्याची एका वकीलाशी ओळख आहे." प्रसंगावधान राखत गोपाळने माहीती पुरवली.

मघाशी मी नंदूच्या अकलेला उगाच दाद दिली, असं मला वाटलं. बिस्लरीच्या बाटलीतून पाणी नेण्याची आयडीया त्याला याच ओळखीच्या वकीलाने सुचवली नसेल कशावरून?
नंदूच्या अकलेचा 'चालविता' धनी कुणी वेगळाचि होता तर...!

"असु देत असली तर. मला काय?" आपल्या दोन्ही मांड्यांत डोके खुपसून मातीवर निवांत रेघोट्या काढत बसलेल्या नंदूला मोबाईलमध्ये कॅप्चर करण्याची धडपड करीत पक्या बोलला.
"अरे, उद्या ह्या फोटोतला इसम नंदू चोरगेच आहे, हे सिद्ध करण्यात तू अयशस्वी झालास तर तो त्या वकीलामार्फत कोर्टात तुझ्यावर अब्रु नुकसानीचा दावा करील." माझ्यावर असलेली हिंदी सिनेमाची कृपा.
शेवटी नंदूला पिवळ्या सोन्यासकट मोबाईलमधून डिलीट करून आम्ही घराकडे परतलो.

आज गावात घरोघरी संडास आहेत
आणि त्यांच्याच कृपेने मोठ्या संख्येने 'डास'पण आहेत.

शेवटी एक सरकारी योजना गावकर्‍यांचं रक्त पिण्यात यशस्वी झाली.

* * *

http://kolaantudya.blogspot.com/

गुलमोहर: 

पांड्या सुताराची तर कोण गडबड उडाली होती ! एक श्वास सोडलं तर त्याला इतर काही घ्यायला अजिबात फुरसत नव्हती.>>>>> Rofl अशक्य!

आभार Happy

योग्य शब्द सुचवल्याबद्दल नन्नाजींना माझं जाहीर 'लोटां'गण.

"तान लागली म्हनुन कुनी हीर खोदत नाय गड्या..! आनि तू नदी आटली म्हनुन घरी संडास बांदाय निगालाईस." सॉलीड......

Pages