एक्सपायरी डेट - भाग ४

Submitted by विस्मया on 12 January, 2012 - 02:33

याआधीचा भाग इथं वाचा.

प्रकरण पाच

"रचना तू काय सांगितलंस जॉनला ?"

" मला खरंच आठवत नाही आता पण राहुलचा उल्लेख वगळून सर्व सांगितलं "

" वेडी आहेस. सांगून टाकायला हवं होतसं. तू एकदा तरी हा विचार केलास कि, ओल्ड कॅसल भागातून तो रात्रीच्या वेळी कसा परत आला असेल ? शोधाशोध केली तेव्हां तुला तो सापडला नाही. मग त्या वेळी तो काय करीत असेल ? कुठे होता वगैरे "

" नंदिनी हे प्रश्न मलाही पडतात. पण त्याच्याकडे लक्षच द्यायचं नाही हे एकदा ठरवल्यावर पुन्हा कशाला विचारायचं ना ? "

" हो पण आता श्री सिंग यांचा हार्ट अ‍ॅटॅकने मृत्यू झाल्यावर हे प्रश्न महत्वाचे नाहीत का ?"

" अगं असं काय करतेस ? त्यावेळी मला माहीत होतं का असं काही होणार आहे ? "

" का बरं ? नव्हतं माहीत ? "

" नंदिनी ! "

" नंदिनी , तुझ्या म्हणण्याचा रोख कळला मला.पण त्याने सिंग सरांच्या बाळाची एक्स्पायरी डेट सांगितली होती. आणि आता तुझ्या म्हणण्याप्रमाणे त्याचा अंदाज चुकीचा निघाला आहे. "

" रच्यु, मलाही हेच नवल वाटतंय. कदाचित तुझ्या ऐकण्यात काही फरक झाला असेल. त्याचे शब्द वेगळे असतील. "

" नाही. मी काही म्हातारी नाही झालेले .. आणि ब-याच जणांनी ते शब्द ऐकलेले आहेत "

" कदाचित ..पण काही असो. हा प्रसंग तू जॉनपासून लपवायला नको होतास "

" हुं , म्हणजे आणखी संशय ओढवून घ्यायला. त्याने विश्वास तरी ठेवला असता का या गोष्टींवर ? "

" ते ही आहेच म्हणा !"

" नंदिनी ! आपल्याला काहीतरी हालचाल केली पाहीजे "

" कसली हालचाल ? "

" अग अस काय करतेस ? हे बघ त्या दिवशी राहुल माझ्याबरोबर आला नाही. तुझ्या म्हणण्याप्रमाणे त्याचे अंदाज खरे व्हायला हवेत म्हणजेच सिंग साहेबांचा मृत्यू झाला याचाच दुसरा अर्थ राहुलचा अंदाज चुकला. आपल्याला राहुलची माहीती काढायला हवी. त्याच्या या विचित्र वागणुकीची माहिती काढायला हवी नाहीतर विनाकारण आपल्या अडचणी वाढतील "

" म्हणजे काय करणारेस तू ?"

" मानसशास्त्राची मदत घेणार आहे मी ! तू मला मदत करणार आहेस याकामी. चल, आपल्याला शहरातल्या टॉपच्या सायकिऍट्रिस्टची यादी बनवायचीय. कामाला लाग "

पुढचे दोन तीन तास आम्ही इंटरनेट, बिझनेस डिरेक्टरीज असं सगळं पालथं घालून दहा बारा नावं निश्चित केली.

" नंदिनी ! आपण पुढचे चार पाच दिवस कामावर येणार नाही आहोत. मायकेलशी मी आताच बोलले "

पुढचे दोन दिवस आम्ही वेड्यासारख्या फिरत होतो. कुणी जर आमच्या मागावर असेल तर दोघींपैकी एकीला काहीतरी मानसिक आजार आहे अशीच त्याची समजूत झाली असती. कारण दोन तरूण मुली मानसोपचार तज्ञाकडे का जात असतील हे कुणाला कसं कळणार ना ?

राहुलचा प्रॉब्लेम ऐकून घेतल्यानंतर आम्हाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. म्हणजे त्यांनी जे काही सांगितलं ते तितकंसं पटत नव्हतं. आमच्या ज्ञानात अनावश्यक भर पडण्यापलिकडे काही झालं नाही, एक दोघांनी मात्र ही पॅरासायकॉलॉजीची केस असल्याचं सांगितलं. एक झालं, सर्वांनी प्रो. डॅनीएल व्हॅटमोर यांचंच नाव सुचवलं. प्रो व्हॅटमोर हे एक नावाजलेले आंतरराष्ट्रीय किर्तीचे मानसशास्त्रज्ञ होते. गेल्या काही वर्षात त्यांनी पॆरासायकॉलॉजीचा अभ्यास केला होता. अनेक रिसर्च पेपर्स, अनेक मानशास्त्रीय कसोट्या ज्यांच्या नावावर आहेत अशा प्रो व्हॅटमोर यांनी पॅरासायकॉलॉजीचा अभ्यास करावा हे अनेकांना रूचलं नव्हतं. वृत्तपत्र आणि सायन्स मॆगेझिन्स यातून टीकात्मक लेखही प्रसिद्ध झाले होते. पण अर्थातच प्रोफेसर कशालाच बधले नव्हते. आणि लवकरच त्यांच्या या योगदानाचं महत्व कळून आलं होतं.

आफ्रिका खंडच तसा काळ्या जादूसाठी बदनाम नाही का? युरोप, अमेरिकेतही आफ्रिकन काळ्या जादूची चांगलीच दहशत होती. ज्या ज्या ठिकाणी शिक्षणाचा प्रसार कमी त्याच ठिकाणी काळी जादू ,भूत बगैरे गोष्टींवर विश्वास ठेवला जातो. एखाद्याच्या मानसिक आजाराला काळ्या जादूच्या दृष्टिकोणातून पाहणं ही नित्याचीच बाब झाली होती. म्हणूनच मांत्रिकांचा धंदा तेजीत होता. जे काही लोक वेळेत सायकिऍट्रिस्टकडे जात त्यांना फायदा होत होता. पण प्रत्येक वेळी असं होत नव्हतं.

ब-याचशा केसेसमधे त्यांच्याकडे समाधानकारक उत्तरं नसल्यानं सुशिक्षितांनाही मानसोपचार तज्ञांपेक्षा मांत्रिकांकडे गेलेलं बरं असं वाटून जायचं. वैज्ञानिक दृष्टीकोण बाळगायचा तर या गोष्टींना विरोध करायचा आणि काळ्या दुनियेचा आसरा घ्यावा तर विज्ञानवाद्यांची साथ सोडावी असं काहीसं होऊन बसलं होतं. मध्यममार्ग असा नव्हताच. हल्ली हल्ली पॅरासायकॉलॉजीच्य़ा अभ्यासकांनी ही उणीव दूर केली होती. प्रो व्हॅटमोर यांच्या या अभ्यासाची आफ्रिकेत खूपच गरज होती. लवकरच सर्वांनी ते मान्य केलं होतं.

प्रो. व्हॅटमोर या नावाबद्दल इतकी माहिती मिळाल्याने त्यांच्याबद्दल विश्वास वाटू लागला. प्रत्यक्षात जेव्हां भेट झाली तेव्हां तो अधिकच दुणावला. त्यांचं ऑफीस वगैरे काही नव्हतंच. एका साध्याशा प्लॅटमधेच त्यांचा संसार आणि मानसशास्त्र दोन्हीही नांदत होते. प्रोफेसरांच व्यक्तिमत्व खूप साधं होतं. ट्रान्सटेलच्या ओल्ड फॉक्स या गाजलेल्या मालिकेतल्या डिटेक्टीव्हसारखेच ते दिसायला होते. प्रसन्न हसत त्यांनी माझं स्वागत केलं. यावेळी नंदिनीने यायचं टाळलं होतं.

मी नाव सांगितलं. राहुलचा संदर्भ दिला तसे ते खुलले.

"तुझ्या त्या राहुलला नाही आणलंस ?"

" सर...मी लिहीलं होतं ना त्याबद्दल !"

" अरे हो ! तू लिहीलं होतंस नाही का त्याबद्दल ? " मिस्कील हसत प्रोफेसर म्हणाले.

" सर.. तुमचा विश्वास बसलाय ना मा़झ्यावर ? "

यावर पुन्हा एकदा ते प्रसन्न हसले. विश्वासदर्शक.

" विश्वास न ठेवण्याचा प्रश्नच येत नाही. प्रश्न विचारायच्या आधी काही गोष्टी तुला स्पष्ट करतो. अधून मधून तू ही प्रश्न विचारू शकतेस. काय आहे प्रोफेसर असल्याने एकदा बोलायला सुरूवात केली कि तासभर बोलल्याशिवाय थांबायची सवयच नाही बघ " डोळे मिचकावत प्रोफेसर म्हणाले तसं मला हसायला आलं. त्याच्याबद्दलचं दडपण क्षणात नाहीसं झालं. हा मला रिलॅक्स करायचा प्रयत्न असावा. शेवटी एका नावाजलेल्या मानसशास्त्रज्ञाकडे मी आलेले होते !

" ज्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत त्याला एकदा तरी भेटणं माझ्यासाठी आवश्यक आहे. अर्थात तुझा प्रॉब्लेम तू व्यवस्थित समजावून सांगितलेला असल्याने तुला अपॉइण्ट्मेंट दिली. रचना नाही का तुझं नाव ?
सुंदर नाव आहे हे. तुम्ही भारतीय लोक अर्थपूर्ण नाव ठेवता. भारतात खूप फिरलोय बरं का मी. बंगाल, महाराष्ट्रातलं कोकण वगैरे भाग पायी हिंडलोय ! "

"तर रचना, मला तुझ्या कथेवर अविश्वास दाखवायचं कारणच नाही. शेवटी विज्ञान काय असतं ? विज्ञान कशालाच नाकारत नाही. एखादी गोष्ट समजली नाही म्हणून ती अवैज्ञानिक म्हणणं हा दृष्टीकोण म्हणजे एक प्रकारची अधश्रद्धाच नाही का ? मी पूर्वी फक्त मानसशास्त्राचा संशोधक होतो. पुढे अशा काही केसेस माझ्याकडे आल्या आणि असे काही अनुभव आले कि माझ्या विचारात बदल झाला. पॅरासायकॉलॉजी म्हणजे अतींद्रीय शक्तींबद्दलचं शास्त्र ! दुर्दैवाने वैज्ञानिक जगताने अद्याप या शास्त्राला म्हणावी तशी मान्यता दिलेली नाही. ४ % लोक मान्यता देतात फक्त ! " त्यांच्या स्वरात विषाद उमटला होता.

"मी या वृत्तीविरूद्ध लढतोच आहे पण आज जर हे शास्त्र म्हणून प्रस्थापित झालं असेल तर त्याचं श्रेय आपल्याला प्रोफेसर फ्रेडरिक मायर्स आणि जे बी -हायेन या शास्त्रज्ञांना द्यावं लागेल. प्रोफेसर मायर्स यांना मानवी मर्यादेपलिकडच्या, म्हणजे आपल्या ज्ञानेंद्रियाव्यतिरिक्त इतर काही सोर्सेसने प्राप्त होणा-या जाणिवांची कल्पना आलेली होती. त्यांनी या अतींद्रिय शक्तींना, Extrasensory perception (ESP), मान्यता दिली आणि ही कल्पना जे बी -हायेन यांनी स्विकारली. -हायेन यांनी त्यावर पुढे बरंच काम केलं. Extrasensory perception (ESP) ला वैज्ञानिक जगतात मान्यता मिळवून दिली. "

" टेलिपथी बद्दल ऐकलंच असशील तू. नेहमीच्या भाषेत आपण त्याला सिक्स्थ सेन्स असं म्हणून जातो. इतकी वर्षं मानव याचा अनुभव घेत आला आहे. कुठलंही शास्त्र त्याचा गैरफायदा घेणा-या व्यक्तींमुळं बदनाम होत असतं. शेवटी शास्त्र म्हणजे तरी काय असतं ? एखादी गोष्ट विशिष्ट स्टेप्स फॉलो करीत गेल्यानंतर त्याचे रिझल्ट्स मिळत असतील, अनुभूती येत असेल तर ती विज्ञानाने सिद्ध झाली असं आपण म्हणतो. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर डेटा जमवणे, प्रयोग करीत राहणे आणि त्यातून सिद्धता सिद्ध करणे या प्रोसेसेस मधून गेल्यावर एखाद्या शास्त्राला मान्यता मिळते. त्यासाठीची शिस्त ही केवळ वैज्ञानिक दृष्टिकोणातून येते. "

" याचा अर्थ असा नाही कि विज्ञानाने जी गोष्ट सिद्ध झालेली नाही ती अस्तित्वातच नाही. मी तुला आधीच याबद्दल सांगितलं. मी याच भूमिकेतून गेली कित्येक वर्ष झगडतो आहे. जे बी -हायेन यांनी या लढ्याची सुरूवात केली. एखादं शास्त्र अशिक्षित लोकांच्या ताब्यात गेलं कि त्यातलं शास्त्र बाजूला राहतं आणि त्यामागचं विज्ञान न समजल्याने किंवा समजून घेण्याची कुवत नसल्याने त्याला चमत्कार, जादू असं काहीसं स्वरूप प्राप्त होतं. "

"समजावून सांगतो. गाडी बंद पडली कि आपण गॅरेजमधे देतो ना ? तिथल्या मेकॅनिकला फ्युएल म्हणजे काय, केमिकल रिअ‍ॅक्शन, कॅलेरीफिक व्हॅल्यू, त्यातून मिळणारी उर्जा, टॉर्क यांच्याशी देणंघेणं नसतं. त्याला इतकंच माहीत असतं, ठराविक आवाज येत नाही म्हणजे काहीतरी बिघाड आहे. मग एक्स्परिमेंटसमधून हा पार्ट बदलला कि गाडी ठीक होते हे त्याला माहीत होतं. स्किल येतं. पण त्यामागचं शास्त्र त्याला कळालेलं असतं का ? नाही ना ? तसंच थोडंसं " त्यांनी डोळ्यात रोखून पाहत सांगितलं.

"तसं पहायला गेलं तर मानवी शरीर हाच एक चमत्कार आहे. आपला जन्म हा ही एक चमत्कारच आहे. नाही वाटत ? असंच असतं. जन्माचं रहस्य आपल्याला कळालंय. आपण शाळेत शिकलो , पुस्तकातून आपल्याला ही माहिती मिळाली म्हणून आज माणसाचा जन्म ही एक साधारण गोष्ट वाटू लागते. आपल्या मेंदूत उमटणारे विचार, त्याप्रमाणे बोलले जाणारे शब्द, ते व्यक्त करण्यासाठी आवाज आणि ग्रहण करण्यासाठी असलेली ज्ञानेंद्रियं हे आपल्याला सगळं सहज वाटतं. अर्थात हे सर्वांच्या बाबतीत घडत असतं ज्याला आपण सर्वसामान्य बाब म्हणतो. याशिवाय काही वेगळं घडलं कि मग आपलं कुतूहल जागं होतं , नाही का ? "

इतकं बोलून प्रोफेसर थांबले. त्यांना हे प्रत्येकवेळी इतकं सगळं बोलावं लागत असेल का ? यातल्या ब-याचशा गोष्टी कानावरून गेल्याच होत्या. पण आता प्रोफेसरांच्या तोंडून एका विशिष्ट फ्लोमधे ऐकताना त्यांचे नवे अर्थ उलगडत होते.

" तेव्हां तुझ्या त्या राहुलला मनातलं ऐकू येणं ही असाधारण असली तरी अशक्य गोष्ट नाही म्हणता येणार. आ़णखी काय म्हणालीस तू राहुलबद्दल ? पुन्हा सांग एकदा .."

हे राम ! हे विसरले कि काय ? मग त्यांना पुन्हा एकदा सगळं रामायण सांगितलं. ते मधे मधे प्रश्न विचारत राहीले. मधे मधे प्रश्न विचारल्याने गोंधळ उडत होता इतकंच. मला एकदा त्याला भेटव.. ते पुन्हा पुन्हा म्हणत राहीले.

" सर ! राहुलमुळे मी अडचणीत येणार आहे हा माझा मुख्य प्रॉब्लेम आहे. राहुलची अडचण दूर करणे हा नाही "

" आय अंडरस्टँड ! पण एकदा मी त्याला भेटू शकलो तर पुढे तुझ्यासाठी कायदेशीर बाजू भक्कम होईल असं नाही का तुला वाटत ? "

हा विचार मी केलाच नव्हता. मी पुन्हा विचारात पडले. पण त्याला आणायचं कसं ? मुळात त्याला फसवणं शक्य तरी होतं का ? आणि मनातले विचार एखाद्याला कळतात म्हटल्यावर मनातल्या विचारांना दूर सारणं शक्य तरी आहे का ? विचारांना जितकं बाजूला सारण्याचा प्रयत्न करावा तितके ते उसळी मारून वर येतात. मी हे सगळं प्रोफेसरांसमोर ठेवलं.

" ठीक आहे. म्हणजेच आता तू जी माहिती मला देशील त्यावरच मी तुला मदत करू शकेन, नाही का ? माझा सोर्स किंवा मध्यस्थ म्हणून तूच आहेस आता. "

इतकं बोलून आम्हाला बसायची खूण करून ते आत गेले. ते पुन्हा बाहेर आले तेव्हा त्यांच्या हातात काही पुस्तकं आणि एक पत्त्यांचा कॅट होता. टीपॉयवर ते सगळं ठेऊन ते पुस्तकात गढून गेले. काही पानं चाळत, काहींमधे बुकमार्क्स टाकत ते काही तरी शोधत होते.

" रचना मृत्यूची आगाऊ सूचना. याबद्दल ज्या काही केसेस आजवर अभ्यासल्यात त्या स्वतःबद्दल आहेत. त्यातही स्वप्नात अशा सूचना मिळाल्याच्या केसेस आहेत. पण दुस-याच्या मृत्यूचं प्रेडिक्शन ते ही इतक्या अचूक, तारीखवार सांगणं ही केस खरंच नवीन आहे. आपल्या या राहुलची भेट झाली असती तर एका अद्भुत अशा शक्तीचा वैज्ञानिक खुलासा करण्याची संधी आपल्याला मिळाली असती. "

मी काय बोलावं हे न समजून फक्त ऐकत राहीले. जेव्हां एखाद्या विषयातली अधिकारी व्यक्ती समोर असते तेव्हां काहीही न बोलणं हेच योग्य धोरण असतं. उत्तम श्रोता असणं हे केव्हाही चांगलंच. त्याने दोन शब्द कानावर पडतात, माहितीत भर पडते, विचार समृद्ध होतात असे झाले तर फायदेच होत असतात. उत्तम वक्ता होण्यासाठी आधी उत्तम श्रोता असणं गरजेचंच नाही का ?

" म्हणजे राहुलला या ज्या शक्ती आहेत त्या ख-या असाव्यात कि नाही ? "

" मी तुला आधीच म्हणालो ना, कि विज्ञान काहीच नाकारत नाही. त्याचबरोबर जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत ते स्विकारीतही नाही. आपण ज्याला पूर्वाभास म्हणतो तसंच काहीसं असावं हे. अर्थात आता काही बोलणं योग्य नाही. जे बी -हायेन यांनी पूर्वाभ्यासाला मान्यता दिलीच आहे. इतकंच नाही त्यांनी या अभ्यासाला मान्यता मिळावी म्हणून खूप कष्ट घेतले. मुख्य म्हणजे डेटा जमा केला. प्रश्नावली बनवल्या. अनेक लोकांच्या मुलाखती घेतल्या. त्यातून आज त्यांच्या नावावर आज ३३ मानसशास्त्रीय चाचण्या जमा आहेत. तुला माहीतच असेल मानसशास्त्रामधे चाचण्यांना मान्यता मिळण्याची प्रोसेस किती किचकट आहे. त्यातूनच आ़ज पॅरासायकॉलॉजी ही शाखा अस्तित्वात आली. हे नाव देखील -हायेन यांनीच दिलंय "

" तुला हे सगळं सांगायचा उद्देश लक्षात आलाच असेल. नाही का ? राहुलची केस स्टडी करण्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागणार आहे. तुला त्याला इथे आणण्यात अडचण येत असेल तर मी त्याला भेटायलाही जाईन. यासाठी तुझी परवानगी आवश्यक आहे "

"त्यात काय सर ! तुम्हाला हवं तेव्हां तुम्ही राहुलला भेटू शकता. अडचण इतकीच आहे कि त्याच्यापासून लपून काहीच राहत नाही. "

" अच्छा ! आता मला हे सांग, त्याचे किती अंदाज आजवर अचूक ठरलेत असं तुझं म्हणणं आहे ? "

" दोन तर नक्कीच. आणखीही घटना असू शकतील. "

" तुला कसं कळालं ते ? "

" इतरांकडून "

" तुझ्यासमक्ष झालेली घटना नाही का एखादी ? "

" श्री. सिंग, भारतीय उच्चायुक्त यांच्याबाबतची. पण तिथं त्याचा अंदाज साफ चुकला. त्यांच्या बाळाबद्दलचं भविष्य त्याने सांगितलं. प्रत्यक्षात मृत्यू झाला तो सिंग सरांचा "

" हे कदाचित, ज्या पूर्वसूचना मिळतात त्याचा नेमका अर्थ लावता न आल्याने झालं असावं "

" पूर्वसूचना ?"

" हो ! म्हणजे हे बघ, कित्येकदा आपल्याला स्वप्नं पडतात. त्या स्वप्नांचा तसा आपल्या बाबतीत घडलेल्या घटनांशी कसलाही संबंध नसतो. स्वप्नं हे देखील मानसशास्त्राच्या दृष्टीने एक आव्हानच आहे. स्वप्नांचा अर्थ सांगणा-या काही वेबसाईटस आहेत. आणि तिथं लोक स्वप्नांचे अर्थ विचारत असतात. काही लोकांना त्याप्रमाणे अनुभव आल्याच्या देखील घटना आहेत "

" ही स्वप्नं म्हणजे पूर्वसूचनाच. राहुलच्या बाबतीत या पूर्वसूचना मिळण्यासाठी त्याला स्वप्नं पडण्याची गरज नसावी असं तुझ्या माहीतीवरून वाटतंय. "

बोलता बोलता प्रोफेसरांनी त्यांच्याकडचे कार्डस टेबलावर ठेवले . ठेवताना त्यांनी त्याच्या दोन ओळी केल्या. पहिल्या ओळीतले कार्डस झाकलेले म्हणजे क्लोज्ड या अवस्थेत ठेवले होते तर खालच्या ओळीतले कार्डस उलटे (ओपन) करून ठेवले होते. क्लोज्ड कार्डसची संख्या दहा होती तर ओपन कार्डसची संख्या फक्त पाच होती. त्या कार्डांवर प्रत्येकी वर्तुळ, स्टार, चौकोन, स्पायरल लाईन्स आणि क्रॉस होते.

" हा नेहमीचा पत्यांचा कॅट नाही. याला झेनर कार्डस म्हणतात. ही एक ईसपी टेस्ट आहे. खाली दिलेल्या कार्डांमधे जे आकार आहेत तेच वरच्या कार्डांवर आहेत. अर्थात ते खालच्या बाजूला असल्याने आपल्याला दिसत नाहीत. एकंदर पंचवीस पत्ते प्रत्येक सेट मधे आहेत. त्यातले दहा पत्ते आता आपण वरच्या ओळीत ठेवले. खालचे आकार पाहून आपण त्या आकाराचा पत्ता वरच्या लाईनमधे कुठे आहे हे सांगायचं. "

"कर सुरूवात रचना "

" म्हणजे ? मी नाही समजले मला काय करायचंय ते "

" हे बघ , या वरच्या ओळीत कुठले पत्ते आहेत हे तुलाही माहीत नाही आणि मलाही. आता तू अशी समोर बस बघू. ठीक . हे बघ, हा पत्ता मी उघडला, पाहीला आणि ठेवला. आता तुला तो पत्ता कुठला त्याचा अंदाज करायचा आहे "

" क्रॉस ? "

" आता दुसरा पत्ता "

" क्रॉस ? "

"तिसरा "

" सर्कल "

या पद्धतीने दहाही पत्ते प्रोफेसरांनी पाहीले आणि मी त्याचा अंदाज सांगत राहीले.

"दहापैकी दोन पत्ते बरोबर ओळखलेस " प्रोफेसर हसत हसत म्हणाले " आता आपण जो प्रयोग केला त्यात मी सेंडर होतो आणि तू रिसीव्हर. आपल्या दोघात कुठली अतींद्रिय शक्ती आहे का, टेलीपथीचं कनेक्शन आहे का हे या प्रयोगाद्वारे सिद्ध करता येतं. आपल्यात २०% टेलीपथी आहे. म्हणजेच नाही . आता तुझ्या जागी तुझा तो राहुल असता आणि माझ्या जागी तू असतीस तर मात्र रिझल्ट्स वेगळेच आले असते. "

" पण आपल्याला हे नाही पहायचं ना ? "

" रचना ! हे सगळं सांगण्याचा उद्देश इतकाच आहे कि तुला या शास्त्राच्या मर्यादा आणि उपयुक्तता या दोन्हीची माहिती व्हावी. यानंतर तू या मार्गाने जायचं किंवा नाही याचा निर्णय तू घेऊ शकतेस. "

वेळ संपल्याचीच ती सूचना होती. मला विचार करायला वेळ हवा होता आणि पुढच्या वेळेला अपॉइण्टमेण्ट घेऊन मी येणार होते.

मी अचानक मागे वळून विचारलं "सर ?"

"येस !"

"सर , राहुल तर ते पत्ते एकटाच अचूक सांगेल ना ? "

त्यावर कसानुसा चेहरा करीत हसायचा प्रयत्न करीत प्रोफेसर बाय बाय म्हणत राहीले. त्यांना काही सुचत नसावं किंवा त्यांच्या डोक्यात अन्य काही विचार असावेत. मी मग तिथून बाहेर पडले. या भेटीचा उपयोग झालाच. आतापर्यंत गूढ असं एक दडपण मनावर होतं ते हळूहळू कमी होत चाललं होतं.

------------------------------------------------------------------------------------

इथपर्यंत वाचता वाचता अचानक जॉन मोठमोठ्याने हसू लागला. संदीपाने विचित्र नजरेने त्याच्याकडे पाहीलं.

"काय झालं जॉन ? "

" अगं तुझे ते प्रोफेसर.... "

" माझे ?"

"म्हणजे तुमच्या सायकॉलॉजीचे "

" बरं मग ? "

"त्यांनी इथं नोट लिहीलिये. इथून पुढच्या मजकुरावर रचनाने रेघ मारलेली असल्याने तो विचारात घेता आला नाही. "

" मग ?"

" मग काय मग ? मी डायरी पाहिली. तो मजकूर वाचता येण्यासारखा आहे. तिने रेघ मारली म्हणजे बाद होतो का ? हे जीनियस प्रोफेसर लोक पण ना " असं म्हणून तो पुन्हा हसू लागला. तसं संदीपाला पण हसू आवरलं नाही. पण जॉनला काहीतरी झणझणीत ऐकवायचं म्हणून ती म्हणाली

" कसं आहे ना जॉन, तुम्हा पोलीसवाल्यांचे सभ्य लोकांशी संबंध कमीच येतात. येतच नाहीत म्हण ना . मग हे असं हसायला येतं "

ही मिर्ची त्याला चांगलीच झोंबली असणार

" पोलीसवाला मी ? आणि तू कोण ?"

" मी अजून तुझ्याइतकी निर्ढावलेले नाही रे "

"हं ! जरा नीट बोलत जा खात्याबद्दल "

" आणि हे बघ ,प्रोफेसरांना फोन लावून ताबडतोब नोटस काढायला सांग. आणखी एक, हा मधला सगळा भाग सोड आणि हे वाच. आपल्याकडे वेळ कमी आहे. "

*****************************************************

प्रोफेसर व्हॅटमोर यांनी ऑक्टोबर महिन्यात घडलेल्या एका घटनेबद्दल सांगितलं होतं. त्याने माझं विचारचक्र जोरात सुरू झालं होतं. याआधीचे सात आठ महीने शांततेत गेले होते. आमचे बरेचसे सेशन्सही झाले होते. आता प्रोफेसर कमी बोलत. ते प्रश्न विचारत आणि मला बोलतं करत. नंदिनी एकदाही फिरकली नव्हती त्यांच्याकडे.

अधून मधून जॉनचं माझ्यामागे सिंग सरांच्या मृत्यूबद्दल तर नम्रताच्या मागे तपास चालू आहे असं टुमणं चालूच होतं.

राहुल नीट वागत होता. मला असं वाटत होता कि त्याला आणखी कुणाची तरी एक्सपायरी डेट सांगायची आहे पण माझ्या मनातल्या विचारांमुळे तो थांबत होता. मात्र तो जवळपास असलास कि डोक्यात घण घातल्याचा अनुभव नित्याचा झाला होता. कुठेतरी ढोल वाजल्याचा आवाज आणि मग ते स्वप्न ! स्वप्न कि भास ?

मन बुद्धीला फसवतं कि बुद्धी मनाला फसवते ? बाबांच्या संस्कारामुळे ब्लॅक मॅजीक वगैरे ची माहिती घेतली नव्हती अद्याप. पण या त्रासातून सुटकाही होत नव्हती.

नंदिनीची तर भुणभुण चालू होतीच.

आपण "बाहेर" दाखवू एकदा .

ब्लॅक मॅजीक ! जॉन मला फ्ली मार्केटमधल्या त्या बा‌ईबद्दल विचारत होता. त्याने तसं का विचारावं ?

" रच्यु ! मला ही तसंच वाटत होतं.. आफ्रिकेत ब्लॅक मॅजीक खूप चालतं. एखाद्या जाणकाराकडे एक दोन दिवसात जाऊयात आपण "

घटना अशा घडल्या होत्या कि मलाही राहवत नव्हतं.

" ठीकै तर नंदिनी, चल, आपल्याला फ्ली मार्केटमधे जायचंय. "

" अगं पण.. "

" चल म्हटलं ना ! आज गेलो नाही तर पुढच्या आठवड्यातच आपल्याला ती भेटेल. चल आधी "

मी नंदिनीला जवळजवळ फरफटतच गॅरेजमधे नेलं. गॅरेजमधे आता एकही कार नव्हती. मायकेलची हार्ले डेव्हीडसनची क्रूझर बा‌ईक तिथं होती ! एक कार तो घेऊन गेला होता. मी फोन केल्यावर चावी वॉचमनकडे असल्याचं त्याने सांगितलं. वॉचमनने चावी आणून दिल्यावर आम्ही दोघी त्या प्रचंड बा‌ईकवर बसलो. एयरपोर्ट रोडकडून वाहणा-या त्या प्रशस्त रस्त्यावर आम्ही दोघी हार्ले डेव्हीडसन वर चाललो होतो, रस्त्याने जाणा-या येणा-यांच्या नजरा झेलत !

फ्ली मार्केट फुललं होतं. पण मला ती लांबूनच दिसली.

"हाय ल्युसी ! "

मला पाहताच ती तोंड भरून हसली. ल्युसी ! ही असली नावं खोटी असतात हे आता माहीत झालं होतं. तिचं मूळ नाव खूप विचित्र असणार होतं. ओडोंबो, मोगांबो असं काहीतरी ! आपल्या नावाची कदाचित त्यांना ला़ज वाटत असणार किंवा धंदा म्हणून कदाचित पण ल्युसी, मायकेल अशी नावं या लोकांनी धारण केल्याचं दिसून येतं. डिटेक्टीव्ह जॉनसारखे काही धर्मांतरामुळे नाव बदललेले पण कमी नाहीत. जॉनची आठवण होताच मला आठवल.. त्या दिवशीही न्यू इयरला तो माझी गाडी पाहून आलेला आणि नंतर फ्ली मार्केटमधे मी कशाला येते असं विचारून गेला. हा माझ्यावर पाळत वगैरे ठेवतो कि काय ?

मी चहूबाजूला पाहीलं. जॉनचा सहाफुटी देह दिसला नाही. अर्थात इथं सहा फुटी‌ उंची अगदी कॉमन असल्याने तो गर्दीत उठून वगैरे दिसण्याचा प्रश्नच नव्हता. पण किमान आमच्या पाठलागावर तो नाही याची खात्री करून घेणं आवश्यक होतं.

ल्युसीच्या कानाला लागून मी माझ्या कामाची कल्पना दिली. तिच्या चेह-यावर काही क्षण विचित्र भाव आले पण तसं काही न दाखवता ती ग्राहकांचं लक्ष आकर्षित करत राहीली. मला तिने थांबायचीही खूण केली. तिला बराच वेळ लागणार असं दिसताच मी नंदिनीसोबत फ्ली मार्केटमधे फिरत राहीले. स्वस्तात वस्त खरेदी करण्याची हौस असलेले कॉलेजकुमार, निम्नवर्गीय लोक, दुर्मिळ वस्तू शोधणारे हौशी पण श्रीमंत लोक अशा सर्वांची पसंती या मार्केटला होती. पण आठवड्यातून ठाराविक दिवसच फ्ली मार्केट इथं भरत होतं. या शिवाय सुट्टीच्या इतर दिवशी असायचं.

दीड दोन तास असेच घालवल्यावर मी पुन्हा परतले तेव्हां ल्युसीचा चेहरा गंभीर दिसत होता. तिने तिचं "दुकान" आवरतं घेत असल्याची खूण केली.

" चल , कुठेतरी निवांत बसूयात "

नेमकी आज बा‌ईक आणलेली असल्याने तिघी कशा मावणार ?

आम्ही मग स्टेडीयमच्या मागच्या बाजूला जा‌ऊन बसलो. ही काही चांगली जागा नव्हती. बरेच कपल्स इथं ये‌ऊन बसायचे. आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पाय-यांवर बसलो. आमच्या गप्पांना सुरूवात झाली. आवाज कुणाला ऐकू जाणार नाही अशा पद्धतीने आम्ही बोलत होतो.

ल्युसीला आतापर्यंतच्या सगळ्या घटना सांगितल्यावर जेव्हां डोक्यात वाजणारे ढोलाच्या आवाजाबद्दल सांगितलं तेहा ती सावध झाली. माझा हात हातात घे‌ऊन तिने नीट तपासणी केली. कान, केस सगळं काळजीपूर्वक पाहीलं. मग खूप वेळ मान नकारार्थी हलवत राहीली.

"काय झालं ल्युसी ? "

" उद्या माझ्या घरी येशील ? "

प्रश्न नव्ह्ता तो. एक प्रकारे सूचना होती. निदान मला तरी तसंच वाटलं. मी नंदिनीकडे पाहीलं. तिने फक्त खांदे उडवले. कदाचित दुसरं काय हातात आहे असं तिला म्हणायचं असेल. तिचा नीट पत्ता घे‌ऊन आणि उद्या न‌ऊच्या सुमारास येतो असं सांगून आम्ही तिचा निरोप घेतला. नम्रताला तसं लगेच कळवूनही टाकलं.

ए‌अरपोर्टकडून केपटा‌ऊनला येणा-या रस्त्यावर एका ठिकाणी डाव्या हाताला पत्रे आणि कापडी बॅनर यांच्या सहाय्याने झाकलेला एक प्रचंड मोठा भूभाग आहे. पूर्वी मला नवल वाटायचं त्याबद्दल. नंतर कळालं ती कृष्णवर्णीय लोकांची वस्ती आहे म्हणून. शहरात प्रवेश करण्यापूर्वीच त्या विद्रूप झोपडपट्टीचं दर्शन नको म्हणून पूर्वीच्या ब्रिटीश प्रशासनाने ती झाकून टाकली होती. त्यांना हटवलं नव्हतं हे विशेष ! हटवण्याचा प्रश्नच येत नव्हता. घरकामाला, चतुर्थ श्रेणीच्या नोक-यांसाठी माणसं कुठून मिळाली असती मग ? आणि त्यांना हटवावं तर राहण्याची सोय करायचीही तयारी नव्हती त्यांची. स्वतः नरकात राहून दुस-यांची घरं चकचकीत करण्यासाठी अशांची गरज पडतेच. नकळत मुंब‌ईतल्या झोपडपट्ट्या डोळ्यासमोर ये‌ऊन गेल्या.

सकाळी पावणेन‌ऊलाच ल्युसीच्या घरी मी पोहोचले. पत्ता सापडायला विशेष कष्ट पडले नाहीत. इथं आल्यापासून देजावू चं फीलिंग येत होतं. पूर्वी कधीतरी इथं ये‌ऊन गेल्यासारखं. पण कालच्या गप्पांचा तो परिणाम असावा असं वाटत होतं.

ल्युसीचं घर दोनमजली होतं. अशा ठिकाणी बोलावल्यावर येणारं ओशाळेपणाचा लवलेशही तिच्या चेह-यावर नव्हता. तिच्याकडे बरेच जण येत असावेत असं आजूबाजूच्या लोकांच्या देहबोलीतून जाणवलं. तिचा पत्ता माझ्यासारखी मुलगी विचारतेय याचं आश्चर्य कुणाच्या चेह-यावर दिसलं नव्हतं. खरंतर काम माझंच असल्यानं तिला का अवघडल्यासारखं वाटावं ? तिला या वस्तीची सवय नसेल का ?

तिने जिन्यावरून वरच्या खोलीत जा‌ऊन बसायची खूण केली. ती एक खास खोली होती. बरंचसं पूजेचं साहीत्य, बाहुल्या, मुखवटे यावरून ल्युसीच्या धंद्याची कल्पना येत होती. ल्युसी ब्लॅक मॅजीक करत होती हे जॉनचं म्हणणं खरंच होतं.

जिन्यावर पावलं वाजली आणि चित्रविचित्र दर्प नाकात शिरले. पाठोपाठ ल्युसीचा थुलथुलीत देह वर आला. तिच्या हातात वेगवेगळ्या रंगाच्या उदबत्त्या होत्या. त्या तिने खोलीभरून फिरवल्या. मग एक म्र्ती काढून तिच्यापुढे कसलेसे विधी केले. यावेळी ती खूपच वेगळी दिसत होती. मी हे असं या ठिकाणी येणं एरव्ही माझ्याच बुद्धीला पटलं नसतं. पण एकतर ना‌ईलाज होता आणि दुसरं म्हणजे मनाचे इशारे ! मन बुद्धीला फसवतं कि बुद्धी मनाला ?

तिने कसल्याशा राखेने एक मोठं वर्तुळ जमिनीवर काढलं. मग त्यावर सावकाश एकेक करून मेणबत्त्या लावल्या. काही न बोलता आमच्यावर कसलंसं द्रव्य शिंपडून त्या गोलात बसायची खूण केली आणि ती स्वतःही त्यात ये‌ऊन बसली.

" आता सांग मला सविस्तर "

" पण हे सगळं काय आहे ? "

" इथं आता आपल्या व्यतिरिक्त कुणीच नाही. या वर्तुळात आपण सुरक्षित आहोत. आपण बोललेले शब्द त्यांच्यापर्यंत जाणार नाहीत कि त्यांचे कसलेही सिग्नल्स आपल्यापर्यंत पोहोचणार नाहीत "

वर्तुळात आल्यापासून खरंच एक शांतता मिळत होती. डोक्यातला कोलाहल थांबला होता. आता ते ढोलाचे आवाज ऐकू येणार नाहीत..का कुणास ठा‌ऊक याची खात्री वाटत होती.

तिला पुन्हा राहुल आणि इतर घटनांबद्दल सांगितलं. तिने ते लक्षपूर्वक ऐकलं. मग माझे हात हातात घे‌ऊन कसलेसे मंत्र म्हणायला सुरूवात केली. थोडाच वेळ.

" काही नाही. अजून कसलाही विधी केलेला नाही. तुझी परीक्षा आहे ही "

" माझी ? का ?"

" पोरी ! तुला धोका आहे. तुझ्यावर नकळत चेटूक झालंय या‌आधी. तू ब्लॅक मॅजीकची शिकार झालेली आहेस. आणि माझा अंदाज खरा असेल तर तुझ्यावर व्हुडू चे प्रयोग झालेत. "

" व्हुडू ? "

" सगळ्यात घातक चेटूक ! "

अरे देवा !

खूप वेळ शांततेत गेला. मग ल्युसीने परिस्थिती आपल्या नियंत्रणात घेतली.......!!!

गुलमोहर: 

ओह, मला वाटलं हा शेवटचा भाग असेल ...... आता पुढचा भाग लगेच टाका बुवा.

>>>> प्रो. व्हॅटमोर या नावाबद्दल इतकी माहिती मिळाल्याने त्यांच्याबद्दल विश्वास वाटू लागला. प्रत्यक्षात जेव्हां भेट झाली तेव्हां तो अधिकच दुणावला. त्यांचं ऑफीस वगैरे काही नव्हतंच. एका साध्याशा प्लॅटमधेच त्यांचा संसार आणि मानसशास्त्र दोन्हीही नांदत होते. प्रोफेसरांच व्यक्तिमत्व खूप साधं होतं. ट्रान्सटेलच्या ओल्ड फॉक्स या गाजलेल्या मालिकेतल्या डिटेक्टीव्हसारखेच ते दिसायला होते. आम्हाला पाहून प्रसन्न हसत त्यांनी माझं स्वागत केलं. नंदिनीने यायचं टाळलं होतं. >>>>>> मैत्रेयी, इथे मला कर प्लीज.

मामी थँक्स लक्षात आणून दिल्याबद्दल.
सर्वांचेच आभार..

यावेळी ब-याच चुका झाल्या टंकताना.. सॉरी ! पुढचा भाग रविवार पर्यंत नक्की. Happy नेमकी कामं पण आलीयेत Sad

मैत्रेयी,
हा देखील भाग आवडला......
आत शेवटचा भाग लिहिताना या सर्व भागांपेक्षा चांगला होईल एव्हढी काळजी घ्या प्लीज......
खूप उत्सुकतेने वाट बघतोय....... Happy

मस्त जमलीय आतापर्यन्त!! इन्टरेस्टिंग... सायोला धन्यवाद इथला पत्ता दिल्याबद्दल!!ब्लॅक मॅजिक वरून मला जरा जरा "स्केलेटन की" ची आठवण येत आहे या भागात. तोही जाम टरकावणारा सिनेमा होता!
निवंत लिही मैत्रेयी, शेवट गुंडाळू नको! Happy

ओह मी शेवट आहे ह्या उत्सुकतेने वाचत गेले Sad , प्लीज रविवारी नक्की Happy

वा. एका दमात चारही भाग वाचून काढले. थांबताच नाही आल . इतक जबरी लिहिलय.

अजिब्बात गडबड नाही शेवटाची. गडबड करु नका.

खुप मस्त चालु आहे आतापर्यंत्...आणि खुप वेगळं लिहिलयं...पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत...

मैत्रेयी ताई .. फार फार आवडलंय लेखन.. सगळेच भाग आवडलेत.. पहिल्या भागात वाटलं.. नारायण झारपांची कथा आहे एक.. छोटा मुलगा असंच मरण सांगत असतो लोकांचं.. मग कळतं.. तो मेलेलाच आहे अगोदर..

पण तुमची कथा वेगळी आहे.. अंतीम भागाच्या प्रतिक्षेत.. पुलेशु.. Happy

हो हो. आहे लक्षात. लिखाणच चालू आहे Happy

(अंतिम भाग लगेचच पोस्टून नंतर सावकाश कादंबरीही प्रकाशित करावी असा विचार चाललाय )