झक्कींची काल्पनिक मुलाखत - कॉफी विथ बेफी

Submitted by बेफ़िकीर on 11 January, 2012 - 04:14

आदरणीय झक्कींना कॉफी हाऊसवर मुलाखतीसाठी बोलावले पण त्यांनी नकारही दिला नाही आणि होकारही! या कृतीचा अर्थ आम्हाला समजेना! ज्यांच्या रोखठोक प्रतिसादांच्या किरणांनी मायबोलीची पहाट होते त्यांनी मुलाखतीच्या विचारणेबाबत मौन पाळावे हा प्रथम आम्हाला एक धक्कादायक प्रकार वाटला. नंतर आमच्या प्रतिभासंपन्न मेंदूने निर्वाळा दिला की झक्की म्हणत आहेत की 'मी मुलाखतीत काय उत्तरे देणार हे तर आपल्या सर्वांना ठाऊकच आहे, मग तुम्हीच प्रश्न आणि उत्तरे दोन्ही का लिहून टाकत नाही?'! हा विचार प्रत्यक्षात आणताना आम्हाला झक्कींच्या परवानगीची गरज भासली नाही ती याचमु़ळे!

वाचकांनी व झक्कींनी कॉफी हाऊसतर्फे अनेक दिवे स्वीकारून ही काल्पनिक मुलाखत वाचावी अशी नम्र विनंती!

खेचाखेची डॉट कॉम या उपक्रमाचा सूत्रसंचालक!

-'बेफिकीर'!

==========================================================

बेफी - झक्की, आपण आज येथे आलात त्याबद्दल आम्ही आपले मनःपुर्वक आभार मानतो.

झक्की - आम्ही म्हणजे तुम्ही स्वतःला आदराने म्हणत आहात की एखादा नवीन कंपू आहे जो माझे स्वागत करत करण्याचे साहस करत आहे?

बेफी - झक्की, कोणताही कंपू आपल्यासमोर नम्रपणेच वागणार, अन्यथा त्या कंपूला तुम्ही आपल्या दयाळू प्रतिसादांनी जमीनदोस्त कराल!

झक्की - छे छे? भलतंच? अहो मी एक साधा गरीब माणूस!

बेफी - हा आपला विनय आहे झक्की

झक्की - माझा? या नावाचा मुलगा माझा नाही. बरं कशाला या यकःश्चित पामराला येथे पाचारण केलेत?

बेफी - झक्की, आज आपली मुलाखत आहे येथे

झक्की - माझी मुलाखत? अहो मी काही पैसा खाल्लेला नाही कलमाडीसारखा, किंवा हरविंदरसारखी कोणाच्या श्रीमुखातही भडकावलेली नाही. मी काही मेणबत्या घेऊन दिल्लीच्या रस्त्यावरून टोपी घालून उपोषणाला बसलेलो नाही की आजवर साधी एखादी अर्धवट कादंबरीही लिहिलेली नाही. माझी कसली मुलाखत?

बेफी - झक्की, पहिला प्रश्न! मायबोलीवरील विविध कंपू कोणते?

झक्की - दोनच! एक माझा तिरस्कार करणारा आणि दुसरा मला पाण्यात पाहणारा!

बेफी - झक्की, तुमच्याबद्दल समाजमनात इतका राग का भरलेला असावा?

झक्की - मीही गेली कित्येक वर्षे त्याच प्रश्नाचे उत्तर शोधत आहे. वास्तविक आजवर मी कोणालाही दुखावलेले नाही. मनात येईल ते प्रामाणिकपणे लिहिले. माझ्या मनात काय यावे यावर हटकेश्वराचेही नियंत्रण नाही. पण लोकांना राग आला. आता प्रत्येक माणूस म्हंटला की त्याला एकेक मन असणारच! त्या मनात कोणता विचार येईल हे मी बापडा कसे सांगणार? तरी मी त्रिवार माफी मागून सगळ्यांचा राग घालवायचा मनापासून प्रयत्न केला. पण माझे नांव वाचले कीच तीळपापड होत असेल तर पुढचा माफीचा प्रतिसाद कोण वाचणार?

बेफी - झक्की, तुम्ही अमेरिकेला का गेलात?

झक्की - मला मायबोलीवर लिहायचे होते. मायबोलीवर मी माझे मन मुक्त करू शकतो. पण लिहिण्याआधी असे समजले की प्रशासन उसगावात आहे. तसेच हेही समजले की उसगावातील सदस्यांनी कितीही खोडकरपणा केला तरी प्रशासन एक क्षमाशील स्मितहास्य देऊन पाठ थोपटते. मी विचार केला की एवीतेवी मन मोकळे करणे हेच जर आपल्या आयुष्याचे ध्येय असेल तर ते भारतात राहून कसे साध्य होईल ! शेवटी मी उसगावात आलो.

बेफी - झक्की, मायबोली हे संकेतस्थळ परदेशातील सद्स्यांपेक्षा भारतातील सदस्यांनी केलेल्या लेखनामुळे साहित्यजगतात गाजत आहे असे एक मत मध्यंतरी ऐकल. आपल्याला काय वाटते?

झक्की - हे मायबोली हे संकेतस्थळ कुठे बघायला मिळेल? हे एकदा समजले की मग नीट मतप्रदर्शन करता येईल मला!

बेफी - झक्की, नुकतीच एक 'नग्नता - चित्रातील व मनातील' अशी चर्चा अतिशय गाजली. आपले मत?

झक्की - मी पाहिली ती चर्चा! मासिक निर्मात्यांचा हेतू त्या मासिकाची मायबोलीवर चर्चा गाजवणे हा जास्त असतो व मासिक निर्माण करणे हा कमी हे माझे मत मला पुन्हा पटले.

बेफी - झक्की, आता आपण मायबोलीवरील विविध लेखनप्रकारांचा आढावा घेऊ! प्रकाशचित्रांबद्दल आपले मत काय आहे?

झक्की - प्रकाशचित्रे अतिशय सुंदर व प्रकाशित करायला सोपी असतात. त्यांना विषयाचे बंधन नाही. आपला मुलगा पहिल्यांदाच उभा राहिला येथपासून ते शेजार्‍यांकडे झालेल्या मयतीचे विधि येथपर्यंत काहीही त्यात समाविष्ट करता येते. मोबाईलवरही प्रकाशचित्रे घेता येतात. घराबाहेर दिसणारे एखादे झाड , एखादी गरीब भाजीवाली , भारतातील रस्त्यावरून वाहणारी उघडी गटारे , हॉटेलमध्ये गेल्यावर खाल्लेले पदार्थ येथपासून ते चुकून भीमराव पांचाळे किंवा हरीहरन आपल्या घरी आले येथपर्यंत कोणताही विषय घेता येतो. मध्यंतरी एका सदस्याने 'आमच्याकडील पाली' हा विषयही घेतला होता. खारीचे पिल्लू, उघड्या पाठीने उन्हात बसलेला म्हातारा व कॉर्पोरेशनने तुंबलेले गटार स्वच्छ केल्यावर धबधब्याप्रमाणे वाहणारे ओघळ हे येथील लोकप्रिय विषय आहेत. मला स्वतःला प्रकाशचित्रे अतिशय आवडतात. याचे कारण ती प्रकाशित झाली की तेथे 'प्रकाशचित्रे' हे सदराचे शीर्षक ठळकपणे दिसते व ते सहज ओलांडून पुढे जाणे शक्य होते.

बेफी - सुंदर उत्तर झक्की! आता मला सांगा, चालू घडामोडी या सदराबाबत आपल्याला काय वाटते?

झक्की - अतिशय नावाजलेले व सुंदर सदर आहे ते! याही सदरात कोणताही विषय घेता येतो. या सदराच्या नावातील 'चालू' व 'मोडी' हे भाग अतिशय चपखल आहेत. मायबोलीवर आपले अस्तित्व वर्षानुवर्षे टिकवून ठेवण्यासाठी व वणवे पेटवण्यासाठी असे बाफ उत्तम असतात. म्हंटला तर माणूस आहे, म्हंटला तर नाही अशी भूमिकाही बाफकर्त्यांना घेता येते. या अशा बाफांबाबत वाईट एकच की शेवटी अ‍ॅडमीनना त्यात उतरून तो बंद करावा लागतो. अ‍ॅडमीनना मनस्ताप झाला की मला कसेतरीच वाटते. मी त्यांना आजवर कधीही मनस्ताप दिलेला नाही. हटकेश्वर हटकेश्वर!

बेफी - झक्की, ही मुलाखत प्रकाशित होणार आहे ही अट तुम्हाला सांगायचीच राहिली

झक्की - असे झाले होय? मग मला उत्तरे बदलूद्यात जरा! नाहीतर राहूदेत, मी खोटे कधीच बोलत नाही.

बेफी - झक्की, गुलमोहर या विभागात रोज भर पडत आहे.

झक्की - होय! मला याची दु:खद जाणीव आहे. पण त्याचे काय आहे! अमेरिकेत आलेले सदस्य हे कामाशी काम ठेवतात. एखाद्या पेटलेल्या बाफावर ठिणग्या टाकणे, गप्पांच्या पानांवर हासणे इतकेच! भारतीय सदस्यांचे तसे नाही. त्यांना ऑफीसमध्ये असल्यामुळे वेळही चिक्कार असतो. कनेक्शन तर फुकट असतेच असते. त्यामुळे मग त्यांची प्रतिभा जागृत होऊ लागते. प्रतिभा जागृत होण्याचे टायमिंग ऑफीस टायमिंगशी मॅच करते हा केवळ योगायोग! तर त्यांना व्यक्त होण्याची मुभा मिळावी व तीही प्रचंड प्रमाणात मिळावी यासाठी मीच मागच्या समीतीला म्हणालो की गुलमोहरात ही प्रतिभा दिसत राहूदेत! माझ्या त्या निर्णयाचा आज मला पश्चात्ताप होत असला तरी मी तो मान्य करत नाही.

बेफी - कादंबरी विभागावर आपल्याला काही म्हणायचे आहे?

झक्की - अतिशय सुंदर व सर्वांगीण प्रकारच्या लेखनाने हा विभाग नटलेला आहे. या विभागात पहिल्या दहा पानांवर एकाच सदस्याच्या कादंबर्‍या असून नंतर इतरही नावे वाचायला मिळतात. या विभागातील कादंबर्‍या वाचताना काही महिला सदस्या ऑफीसमध्ये रडण्याची मुभा नसल्यामुळे बाथरूममध्ये जाऊन रडल्याचे दाखले वाचायला मिळतात. नवीन मायबोलीवरील सर्वोत्कृष्ट साहित्यीक वाद - यांना भांडणे म्हणणे योग्य नाही - याच विभागात आहेत. काहींनी लेखकाला मनाच्या देव्हार्‍यात स्थानापन्न करून त्यावर चामरे ढाळलेली आहेत तर काहींनी शाब्दिक वहाणांनी त्याची उत्तरपूजा बांधलेली आहे असा असीम विरोधाभास या भागात दिसतो. या विभागात लेखन करणार्‍यास दर सहा महिन्यांनी एक भाग टाकणे, कादंबरी अर्धवट सोडणे या मायबोलीवरील काही खास सुविधांचा लाभ मिळू शकतो. सर्वाधिक कंबरेखालील साहित्य याच विभागात निर्माण झाल्याबाबत चिंता व्यक्त करण्यात येते हे मला ऐकून माहीत आहे. एखाद्या जिल्ह्यातील वासनाकांड येथपासून ते भूतभुतावळ यातील कोणत्याही विषयावर या विभागात लेखन झालेले दिसते. याच विभागामुळे सर्व्हरवर सर्वाधिक लोड येत असूनही अ‍ॅडमीन विचारपूस डिलीट करतात याचा सखेद निषेध व्यक्त करायचा राहूनच गेला माझा!

बेफी - झक्की, काही जण तुम्हाला काका म्हणतात, ते का?

झक्की - त्या दोन का मध्ये त्यांना अंतर ठेवायचे असते, पण संताप इतका असतो की त्या भरात ते दोन्ही का चुकून पटापटा उच्चारून टाकतात व लोकांना वाटते मला काकाच म्हणाले. अर्थात, मला आजोबा म्हणाले तरी मला काही फरक पडणार नाही कारण मला आता कशानेही फरक पडत नाही. भर थंडीत मी तीन तीन ब्लॅन्केट्स घेऊन झोपलेलो असताना लोक बागराज्यावर माझ्या नावाने टाहो फोडत असतात, पण मी नाही म्हणजे नाही उठत!

बेफी - कविता या....

झक्की - थांबा थांबा! थांबा! तुम्हाला असे तर विचारायचे नाही ना? की कविता या विभागाबद्दल मला काय वाटते?

बेफी - होय, अगदी तेच!

झक्की - शुद्ध फसवणूक करत आहेत प्रशासन समीतीतील सदस्य! मला एकट्यालाच सुगावा लागला आहे त्यांच्या कृत्यांचा!

बेफी - इथे त्यांचा काय संबंध?

झक्की - इथे फक्त त्यांचाच संबंध आहे. एखादा सदस्य आपले लेखन कविता या सदरात प्रकाशित करतो. त्याला कल्पनाच नसते की मदत समीतीने केवढा मोठा कट रचलेला आहे. मदत समीतीने एक मेकॅनिझम बसवला आहे. त्याचे बटन सदस्याला दिसतच नाही. त्याने प्रकाशित केल्या केल्या त्या समीतीचा जागा असलेला सदस्य ते लेखन पाहून स्वतःच त्याचा प्रकार ठरवतो व तो बदललेला प्रकार घेऊन लेखन प्रकाशित झालेले दिसते. याचमुळे तुम्हाला काही कविता ललिताप्रमाणे तर काही ललिते कवितांप्रमाणे वाटतात. मध्यंतरी या मेकॅनिझममध्ये बिघाड झाल्याने ललित हे ललित म्हणून तर कविता ही कविता म्हणून प्रकाशित व्हायला लागली. पण तोवर रसिकांच्या अभिरुचीत त्या मेकॅनिझममुळे झालेल्या बदलामुळे रसिकांनी 'हे लेखन त्या ह्या विभागात हालवा' असे प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. एकदा तर एक काकाक लेख म्हणून प्रसिद्ध झाली व त्यावर हिरीरीने मुद्देसूद चर्चाही झाली.

बेफी - झक्की, गझलेबाबत तुम्हाला काही म्हणायचे आहे?

झक्की - होय! नक्कीच म्हणायचे आहे. हा एक संख्येने अतिशय लहान असलेला समुदाय असूनही यात होणारे वाद हे भल्या भल्या धार्मिक किंवा सावरकरांवरच्या लेखावर होणार नाहीत असे असतात. हे वाद अधिक पेटावेत म्हणून एक व्यवसायाने वैद्य असलेला माणूस अधूनमधून स्वतःच काही काल्पनिक ओळी प्रकाशित करतो. त्या ओळी घेऊन गझल रचण्याची अहमाहमिका कमाल मर्यादा गाठते. काही वेळा तर नवीन लेखन फक्त याच विभागात झाल्यासारखे वाटते. ही ओळ येऊ नये म्हणून अनेक गझलविरोधी सदस्य सकाळी घरातून निघताना देव पाण्यात ठेवून निघतात असे समजलेले आहे. या समुदायात 'उ' चा 'ऊ' झाला तरी 'ध' चा 'मा' झाल्यासारखी ओरड होते व ती अनाकलनीय असते. हा वैद्य मध्यंतरी निघून गेला होता, पण त्याला धरून पुन्हा आणण्यात आले असेही एका गटाचे म्हणणे आहे.

बेफी - झक्की , विविध गप्पांची वाहती पाने आहेत. कशी वाटतात ती?

झक्की - कुठे आहेत अशी पाने?

बेफी - झक्की, अहो तुम्ही स्वतःच नसता का बागराज्यावर?

झक्की - ते वाहात असते होय? तरीच मला समजत नाही की माझे आधीचे प्रतिसाद कुठे गेले? अ‍ॅडमीननी डिलीट केले की मूळ सदस्यानेच धागा अप्रकाशित केला! मी आपला लिहीत जातो. पान वाहिले तर वाहिले! जिथे अख्खे आयुष्यच मायदेशापासून दूर वाहात गेले तिथे पाने वाहिली तर काय वाटणार!

बेफी - कथा विभागावर आपले मत काय आहे?

झक्की - यात लोक वाटेल ते लिहितात. अमेरिकेत पहिल्यांदाच आलेली विवाहिता कशी रडली, सीमा गैलाड का दारू पीते, नाशिकहून मुंबईला निघाल्यावर अपघाताच्या जागी अचानक भीती कशी वाटते वगैरे! मला काही वाईट वाटत नाही. लोक अनुबव घेतात आणि तो इथे फेकतात. इतरांना ती कथा वाटते. ते उभे राहून टाळ्या पिटतात. या सर्वात हानी होते ती नीतीमूल्यांची! पण ती जपतो कोण? मग आम्ही इकडून भारतातील नीतीमूल्यांचा र्‍हास या विषयावर घाबरत घाबरत एखादे मत मांडले की हे पुन्हा आम्हालाच ऐकवणार! तुमच्या अमेरिकेत तर काय काय चालते वगैरे! जसे काही ते आम्हीच इकडे येऊन सुरू केले.

बेफी - गटग! गटग बद्दल?

झक्की - गटग हा एक अत्यंत उपयुक्त उपक्रम आहे. यात जुने शत्रू नष्ट होऊन नवीन तयार होतात. किंवा शत्रूसंख्येत एकंदरच वाढ होते. याला आम्ही इकडे एवेएठि म्हणतो. आम्ही कशालाही काहीही म्हणू! आम्ही स्वतंत्र आहोत. भारताच्या दळभद्री व्यापारउदीमावर आमचा उदरनिर्वाह अवलंबून नाही. जगातील सर्वात प्रगत लोकशाहीचे आम्ही घटक! भारतातील लोकस्वतः काहीही करत नाहीत. यांना फक्त शिव्या द्णे माहीत आहे. दुसर्‍याने भ्रष्टाचार केला की हे शिव्या देणार आणि उपोषणे करणार! नंतर सिग्नल तोडल्यावर स्वतःच पोलिसाला शंभरची नोट देणार! सत्यानाश केला देशाचा तो यांनीच! त्यांच्या मनात कर्तव्याबाबत काहीही आदर नाही. इतर देशांमधील नागरिकांसकट ते अमेरिकेच्या अध्यक्षालाही शिव्या देतील. पण घरी बायकोसमोर यांचे चालणार नाही. टिंगल टवाळी, निष्क्रीयता आणि भ्रष्टाचार यांचे नैतिक अधःपतनाबरोबरचे मिश्रण म्हणजे भारतीय लोक!

बेफी - झक्की, पण याचा गटगशी काय संबंध??

झक्की - वादातीत असंबद्ध बोलणार्‍यालाच नावाजण्याची मायबोलीची परंपरा आहे.

बेफी - हल्ली माबोच्या कोणत्याही पानावर दिसणार्‍या ज्या जाहिराती आहेत...

झक्की - त्यांचे पैसे अजून यायचे आहेत. भाजणीचे पीठ , आठ आसनी मारुती कार, लग्नातला रुखवत आणि नंतर फ्लर्टिंग करण्यासाठी सुंदर तरुणी अशा वाट्टेल त्या जाहिराती टाकून कसे चालेल?

बेफी - वर्षाविहार याबद्दल काय वाटते?

झक्की - लोक बायकापोरांसमोर उघडेनागडे होऊन पोहतात अणि येथे फोटो टाकतात. व्यथित होते माझे अंत:करण ते पाहून! पण सांगणार कोणाला?

बेफी - भारतीय क्रिकेट संघाबाबत काही?

झक्की - उगीच अपेक्षा ठेवतात लोक! अहो त्या बिचार्‍यांना एखाददिड कोटी मिळतात फक्त मॅच खेळण्याचे! बिचार्‍यांना किती कामे! जाहिराती असतात, नाईट क्लब्ज असतात. हे कधी करायचे त्यांनी? आणि जिंकले की एकदा विश्वचषक? आँ?अजून काय करायचे? म्हणूनच आम्ही उसगावात क्रिकेट येऊ दिले नाही. रिकामटेकडा खेळ नुसता!

बेफी - ड्यु आय असतात काही जणांचे!

झक्की - चालायचंच बेफिकीर! अहो तुम्हाला पिडायला तो एकच मार्ग उपलब्ध आहे त्यांच्याकडे! स्वतःच्या नावाने तुम्हाला प्रतिसाद दिलात तर काय जाणे, करायचात एखादा शेर एखाद्या गझलेत आणि तुमचा लहानसा समुदाय त्यावर खोखो हसायचा! वास्तविक आम्हाला त्यांच्या त्या हासण्याचे हसू येते, पण नाही हासत आम्ही! तुमचं कसं आहे! मराठीचे तुम्हाला नाही कौतुक! तुम्हाला आवडणार सुखनवीर वगैरे! ते कसे चालेल मायबोलीवर?

बेफी - रंगीत पानाबद्दल काय म्हणायचे आहे?

झक्की - बंद करायला सांगितलं तर ऐकतच नाहीत. पैसेही नाही भरले मी! दहा वेळा फोन केला की अहो माझे रंगीत पान बंद करा! काय उपयोग त्या पानाचा?

बेफी - तुमच्यावर अ‍ॅडमीनचे विशेष प्रेम असल्याच्या अफवा मध्यंतरी उठल्या होत्या...

झक्की - नाही हो, काही कंटकांचा हा डाव असावा. माझ्यावर प्रेम करावे असे आहे काय माझ्यात? वय काय माझे!

बेफी - शेवटचा प्रश्न झक्कीसाहेब, कॉहाबद्दल काय वाटते?

झक्की - हा एक निराळाच कंपू अस्तित्वात आल्याचे नुकतेच समजले. यात असलेली नावे पाहून आम्ही चक्रावून गेलो. एक उद्योजक, एक क्वॉलिटी मॅनेजर, एक टेलिकम्युनिकेशनमध्ये कामाला असलेल्या महिला, एक मायबोलीकरांच्या नाकी नऊ आणणारे प्रतिसाद देणारे भले गृहस्थ व एक कादंबरीकार येथे अनेकदा दिसतात. पण त्यांच्यातही काही विशेष सहृदयता असल्याचे जाणवत नाही. प्रवासात कोणीही कोणालाही भेटतो तसे हे एकमेकांशी बोलत असतात. येथे अनेक महामहोपाध्याय पहिल्या दिवशी येऊन गेलेले दिसले. पण नंतर काय झाले हे माझ्या वृद्ध चक्षूंना समजलेच नाही. असो! आम्ही झोपून उठतो आणि पहिला चहा घेतो तेव्हा येथे सामसूम झाल्याचे जाणवते. म्हणून आही एकदा अपरात्री उठून पाहिले तर तेव्हाही सामसूमच होती. म्हणून संध्याकाळी पाहिले तर कोणात तरी भांडणे चाललेली होती आणि बरेचसे ड्यु आय खदाखदा हासत होते. म्हणून काही जणांना विचारले तर म्हणे झक्की तुम्ही कशाला या वयात नाही तिथे बघताय! म्हणून शेवटी या कंपूला आम्ही 'नाही तिथे' असे नांव ठेवले.

बेफी - मुलाखत कशी वाटली?

झक्की - खरे तर अनावश्यक! मी व्यक्त होतच असतो. खास करून मला इथे बोलावून सापळे लावण्यात काही अर्थच नव्हता. पण उपक्रम बरा आहे. हळूहळू काही सन्माननीय व्यक्तींना बोलवायला लागा. म्हणजे माबोबाहेरच्या! मायबोलीलाही उपयोग होईल आणि चापील साहित्याच्या अंध विश्वाला याचीही जाग येईल की इन्टरनेटवर फार सुंदर लेखन होत आहे. माझ्या जुन्या माणसाच्या सर्वांना शुभेच्छा!

===========================

(ही संपूर्णपणे काल्पनिक मुलाखत असून कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही, अनवधानाने किंवा अवधानाने तसे झाले असल्यास माफी! झक्कींसकट सर्वांची) Happy

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

छान

Happy

आम्हाला आवडली ही मुलाखत.
झक्की द ग्रेटना आवडते का ते बघायला पाहिजे.

यात आजकाल पुण्यातला माणसांना मराठी कसं येत नाही आणि झक्कींना भारतातलं मराठी कसं कळत नाही हे आलेले नाही.

मुलाखत चांगली आहे. काहीकाही उत्तरात अगदी झक्कीच अस वाटतयं. Proud
पण फक्त झक्कींविषयी झाली असती तर जास्त आवडली असती. कथा कविता गझलां वगैरेच्या प्रश्नांमध्ये तर फारच इतर मसाला घुसडल्यासारखा वाटला.

सगळीच मुलाखत मजेशीर.

>>याचमुळे तुम्हाला काही कविता ललिताप्रमाणे तर काही ललिते कवितांप्रमाणे वाटतात. मध्यंतरी या मेकॅनिझममध्ये बिघाड झाल्याने ललित हे ललित म्हणून तर कविता ही कविता म्हणून प्रकाशित व्हायला लागली. पण तोवर रसिकांच्या अभिरुचीत त्या मेकॅनिझममुळे झालेल्या बदलामुळे रसिकांनी 'हे लेखन त्या ह्या विभागात हालवा' असे प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. एकदा तर एक काकाक लेख म्हणून प्रसिद्ध झाली व त्यावर हिरीरीने मुद्देसूद चर्चाही झाली.

अ श क्य हसलोय हे वाचून. बेफी, मधेच अचानक आठवून फिस् कन हसून येतंय. आत्ता एक ट्रॅफिक पोलीस माझ्याकडे विचित्र नजरेने बघत होता नळ स्टॉपवर. मला वाटलं पकडणार की काय कशावरून तरी.....मग लक्षात आलं मी हे आठवून एकटाच गाडी चालवताना एकटाच हसत होतो म्हणून तो तसं बघत होता. hahagalomany.gif>>गटग हा एक अत्यंत उपयुक्त उपक्रम आहे. यात जुने शत्रू नष्ट होऊन नवीन तयार होतात. किंवा शत्रूसंख्येत एकंदरच वाढ होते. याला आम्ही इकडे एवेएठि म्हणतो...............बेफी - झक्की, पण याचा गटगशी काय संबंध?? smiley_laughing_01.gif
>>'नाही तिथे'

Lol

झक्कींचा आवडता विषय "पुणे" राहिलाच. ७० च्या दशकात आलो, गीतेचा अभ्यास, लग्न, बायको व तिच्या मैत्रीणी वगैरे गप्पा सुद्धा राहिल्याच.... Wink

आईगं....:खोखो: कसली भारी मुलाखत आहे! बेफि, तुम्ही कोणाची मुलाखत घेऊच नका! अशाच काल्पनिक मुलाखती छापा. तुमची प्रतिभा भन्नाटच आहे. खुपच मनोरंजन झाले. झक्कीकाका स्वतःच उत्तर देत आहेत, असे वाटत होते. तुमच्यात नकलाकाराचेपण स्किल आहे, हे या निमित्ताने समजले. Happy टॅलेन्टेड पर्सन Happy

ओब्जेक्शन ! झक्कींचे बेपत्ता शिष्य आणि झक्कींच्या चाहत्या एक विदुषी यांच्या उल्लेखाशिवाय ही मुलाखत अपूर्ण तसेच उथळ आणि पांचट आहे.... Proud

झक्की अजुन कसे नाही इथे.
झक्की पेक्षा पुर्वीचे झकासराव नाव चांगले होते.
झकासराव म्हणजे सर्व लेखन झकास चालु आहे असे नावातुन प्रतित होते.
झक्की म्हटले की झक मारली नी इथे आलो असे नावातुन प्रतित होते.
मला वाटते त्यांनी पुर्वीचे नाव परत घेउन प्रतिक्रिया लिहिल्यात की वाचणार्यांचा पण द्रुष्टीकोन बदलुन त्या सर्वांना आवडु लागतील.
झकासराव हलकेच घ्या.

.