कान उघाडणी

Submitted by दामोदरसुत on 5 January, 2012 - 01:52

कोठेतरी वाचलेली खालील काव्ये [ कि ज्यांचा जन्मदाता माहीत नाही ] रसिक मित्रवर्य शाम कुलकर्णी यांना मेलवरून पाठवली. त्यांनी तात्काळ काव्यातच उत्तर दिले. ते वाचण्याआधी पाठविलेली काव्ये अशी -
[१] एक किंचित कवी म्हणून गेला आहे की:
दारूबंदीवर काव्य वाचुनी, शपथ ईश्वराची घेउनी
तत्क्षणी दिली सोडूनी.... संवय वाचनाची!

[२] दारुमहती दारुदास जाणे - (कवीचे नाव माहित नाही)
दारू-दारू ऐसा, लागलासे ध्यास । शेवटचा श्वास - दारूसंगे //
दारू दारू ऐसे, करोनी चिंतन । ठिबक-सिंचन बसविले //
फुका म्हणे नाही, पीत म्यां फुकट । देतो ज्ञानामृत, लोकांआधी //
बरे झाले देवा, धाडलीत दारू । संगतीला पारू, पाठवावी //
काय सांगू देवा, दारूचे उपकार! स्वर्गाचेच द्वार, उघडले //
कोणी देखिली गा, स्वर्गाची वसती । दृष्टीआड सृष्टी, खरीखोटी //
जाणूनी घ्या बापा, दारूची महती । स्वर्गची खालती, आणियेला //
कृपाळू देवाने, निर्मियली व्हिस्की । भूवरी दु:खी, आता कोण //
दयाळू देवाने, निर्मियली रम । मोक्षमार्ग सुगम, सर्वांसाठी //
देवा दयाघना, निर्मियली ब्रॅण्डी । सानथोरा तोंडी, समभावे //
कृपाळू देवाने निर्मियली जीन । रिझवण्या मन, अबलांचे //
कृपाळू दयाळा, निर्मिली बिअर । अतीव सुंदर सर्वकाळी //
सर्वांसाठी खुले, हातभट्टीचे ज्ञान । आता दारूविण, कोण जगी //
फुका म्हणे देवा, उपकारांचे ओझे । घेऊनिया नाचे, जन्मोजन्मी //
मदर्स डे, फादर्स-डे, वर्षामाजी एक । दारू-डे उदंड, अगणित //
नेकीचा दारूडा कळवळे ओरडे । कशाला ड्राय-डे अधेमध्ये //
बाकी सारे डे, वर्षातून एक । ड्राय-डे अनेक, कैसा न्याय //
फुका म्हणे आम्ही, जातीचे दारूडे । पाऊल वाकुडे, पडो देवा.......... //
मित्रवर्य शाम यांनी प्रतिसाद म्हणून ’दारूच्या आहारी’ जाऊन हा मित्र वाया तर जाणार नाही ना या काळजीने केलेली ही बघा माझी काव्यात्म कानउघाडणी -
अरे अरे भाऊ कैसा बिघडला
दारूच्या काव्याला प्रशंसशी ॥
आता तरी तुला सांगतो ते ऐक
अशी पुन्हा चूक करू नको ॥
ठीक आहे आता दारूच्या काव्याला
हात तू लावला ठीक आहे ॥
पण ध्यानी राहो दारूच्या प्याल्याला
स्पर्श करण्याला जाऊ नको ॥
तुझा मित्र
श्याम

गुलमोहर: 
शब्दखुणा: