बालपणाच्या एकत्र घालवलेल्या काही मोजक्या वर्षानंतर आपण काहीही विशेष प्लॅन न करता कुठेतरी अचानक भेटत राहीलो. पूर्वी कधी पत्राने, तर कधी दोन-चार वर्षानी प्रत्यक्ष! यावेळेला तर तब्बल २५-२६ वर्षानी भेटलो आपण. ध्यानी-मनी नसताना! म्हणजे तशी ओढ होतीच मनात पण बाकीच्या कामापोटी, कर्तर्तव्यापोटी ती जरा बाजूला सारली होती. माझ्या बालपणीच्या आठवणीतला एक डॅशींग तरुण (एक ताजेतवाने व्यक्तिमत्व). ज्याला मी जवळून पाहिला होता... दोस्ती वगैरे शब्दांचा अर्थ समजण्याआधीचा दोस्त! मस्ती करणारा, विनोद सांगणारा, आपल्याला आवडत्या रचना म्हणून अथवा वाचून दाखवणारा एक सख्खा शेजारी! काय होतं आपलं नातं? 'काका' म्हणायचे मी तुम्हाला पण आपण बर्याच लोकांना काका म्हणतो, ते थोडेच पुढे स्मरणात राहतात? त्यांना थोडच धडपडून भेटावसं वाटतं? मग काय नक्की होत आपल्यात? तो देवच जाणे. पण आज सख्ख कोणी गेल्यावरही डोळ्यात येणारं नाहीत एवढे अश्रू दाटतायत.
माझ बालपण खरतर 'लहानपण देगा देवा' म्हणण्याइतकं रम्य होण्याचा काहीही संभव नसताना तुम्ही माझ्या आयुष्यात आलात. आणि कुठल्याही परिस्थितीत रडत बसायच नाही, प्रयत्न सोडायचे नाहीत याच पहिल उदाहरण डोळ्यासमोर उभ केलत. कदाचित तेंव्हा तुम्हालाही कळल नसेल, माझ तर कळायचं वयच नव्हतं. पण कळत-नकळत मी तुमच्याकडून बरचं काही शिकले. तडफदार, रसिक, हरहुन्नरी बॅचलर तरी सज्जन, दुसर्याच्या भावनांचा आदर करणारा, सडेतोड स्पष्ट स्वभाव असला तरी प्रेमळ भावनाप्रधान माणूस ही आणि अशी अनेक तुमची रुपं मी अनुभवलेली! कधी आमच्यासारखे लहान होउन दंगा करणारे, खेळ खेळणारे, विहिरीवर सामुदायिकरित्या आम्हा पोरांबरोबर अंघोळ करणारे... तर कधी अभ्यास घेणारे, गणित शिकवणारे असे 'ऑल इन वन' काका! कधी 'चल माझ्याबरोबर' म्हणुन काका वझेंच्या खानावळीत नेणारे तर कधी 'रस्त्यात दिसलो तर हाक नाहीहं मारायची' असं बजावणारे! मदत लागली की आमच्या दारासमोर 'मदत करो संतोष की माता' असं गाण म्हणणारे (माझ्या भावाचं नाव संतोष म्हणुन आईला ते 'संतोष की माता' म्हणायचे) तर कधी खिडकीतून तरुण मुली फिरायला चाललेल्या पाहून ' बदन पे सितारे ' हे गाणं गुणगुणणारे! भांडण झालं की मला 'काय करंदीकर' म्हणुन हाक मारणारे, नाहीतर चिडवण्यासाठी माझ्या धाकट्या भावाला 'कानविंदे' म्हणुन हाक मारणारे. (मला अजुन आठवतं तुमच्याशी भांडण झाल की मी गॅलरीच्या भींतीवर बारीक अक्षरात 'काका वाईट आहेत' असं लिहून ठेवायची) राखी पौर्णिमेला पोस्टाने बहिणीची राखी आली की 'चला स्मिताताई आज बहिणीचा रोल अदा करा' म्हणुन राखी बांधायला लावणारे. माझ्या सर्व नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींनाअगदी हल्लीच्या मित्रमैत्रिणींनाही तुमच्याविषयी माहिती होती. त्यानी स्वतः तुम्हाला पाहिल नसेल पण माझे 'रानडेकाका' त्यांच्या चांगल्याच ओळखीचे झाले होते. अगदी आजही असा एकही महिना जात नाही की मी तुमची कुठलीतरी आठवण कोंणाला तरी सांगितली नाही. माझ्या अबोध, फाटक्या झोळीत तुम्ही बरचं काही टाकलं आणि आजही त्या आठवणी मला ताजतवानं, फ्रेश करतात, हसायला लावतात. I will always remember you for your great wit ! वयाने मोठ्ठी किंवा शिकलेली माणसं नेहमी गंभीर असतात असं नाही rather त्यांनी तसं असू नये हे मी नकळत तुमच्या कडून शिकले. you were not my kaka you were my childhood best friend!
नेमकी माझं सातवी - स्कॉलरशीप परिक्षेचं वर्ष आणि काका, तुमची बदली झाली. आता माझा गणिताचा वांदा होणार एव्हडचं तेव्हा कळलं होतं. कधीतरी वाटतं.. तेंव्हा कळतं नव्हतं फार हेच बरं होतं. त्यानंतर स्कॉलरशीपमधे आल्याच मी तुम्हाला कळवलं होत आणि तुम्ही ५० रु.ची मनीऑर्डर केली होती मला! केवढा आनंद झाला होता मला म्हणुन सांगू - आयुष्यात माझ्या नावावर आलेली पहिली मनीऑर्डर! कोण कुठले तुम्ही, चार दिवस शेजारी राहिलात.... त्या गावात आम्हीही नवीन आणि तुम्हीही ... त्यामुळे कदाचित एक्मेकांच्या जवळ आलो. ते सुद्धा फक्त दोन-सव्वा दोन वर्षच! विचार केला तर कधीतरी गंमत वाटते. साधले वाड्यात असे किती शेजारी आले आणि गेले.. पुढे आयुष्यातही असे किती जण आले आणि गेले. पण कोणी आठवणीत कायमचं घर करुन राहिल नाही की पुढे संपर्कातही आलं नाही.
सातवी नंतर कधी सुट्टीत मी पुण्याला आले तर भेट व्हायची . पूर्वी संपर्काचीही साधन पुरेशी नव्हती, तुमचे पत्ते, फोन नंबरही सारखे बदलायचे, त्याकाळी फोन असणं ही देखील लक्झरी होती आमच्यासाठी. मग काही वर्षानी मीही मालवण सोडल तरीही आपण भेटत राहिलो. चमत्कारच वाटतो आता! लहान असताना माझ्या लांबसडक वेण्या होत्या म्हणुन तुम्ही मला नेहमी 'शेपटीला गोंडा मालवणकरणी' अस चिडवायचात .. किती आणि कुठल्या आठवणी सांगू... तुम्ही जस मला मोठ्ठ होताना पाहिलतं तसच मीही तुम्हाला मोठ्ठ होताना पाहिल... तुमची पहिलीच नोकरी... मालवणसारख्या अनोळख्या ठिकाणी पोस्टिंग, आईवडिलांना सोडून एकट्याने रहायची पहिलीच वेळ, बदली साठी धडपड, पुण्याला बदली, मग इन्क्रिमेंट ..लग्न, मुलं! पावसला भेटलो तेव्हा तुम्ही ब्रँचमॅनजर होतात. मला पण हे सगळे बदल पाहून मजा वाटायची. माझही जग हळूहळू बदलत होतं... मीही मास्टर्स केलं, लग्न केलं.. परदेशी गेले, मुलं झाली... इतरांसारखचं घर-संसार, मुलं, नोकरी सांभाळताना किती वर्ष मधे गेली समजलच नाही. आणि मी मायदेशी परत आले. इथे सेटल व्हायला परत एक-दोन वर्ष गेली. मग जरा निवांत वेळ मिळाला. तुमची आठवण यायची अधुनमधुन, मी आईला म्हणायचे कुठे असतील ग रानडेकाका आता? पण यापुढे संभाषण जायचं नाही.
गेल्या वर्षीच काय बुद्धी झाली मला कोण जाणे? मी आईबरोबर महाराष्ट्र बँकेत पेन्शन काढायला गेले आणि तिथल्या एका ऑफिसरला विचारलं तुम्ही रानडेंना ओळखता का? तो माणूस चक्क हो म्हणाला पण पत्ता, फोन नंबर त्याच्याजवळ नव्हता पण एव्हढ कळल की काकानी रिटायरमेंट घेतलेय आणि ते पुण्यातच आहेत. मग काय घरी आल्या आल्या 'भारत संचार निगम'च्या डिरेक्टरी सर्वीसला फोन केला. त्यांच्या कडून 'पी एन' इनिशियल असलेल्या रानडेंचा फोन नं मिळाला, नाव 'प्रभाकर नरहर रानडेच होतं. लगेच फोन केला तर काकांनीच उचलला. तब्बल २५ वर्षानंतरही काकांनी बरोबर ओळखलं... म्हणाले "आत्ताच घरी ये' मी म्हंटल ' मी काही आता शाळेत जाणारी स्मिता नाहीये, माझी शाळा, कॉलेजमधे जाणारी मुलं घरी आल्याशिवाय मी येऊ शकत नाही पण ती आली की लगेच निघते' मी शब्द दिल्याप्रमाणे आईला घेऊन लगेच निघाले. गाडी अरण्येश्वर कॉलनीत आल्यावर एका खुणेच्या ठिकाणी थांबवली आणि काकांना मोबाईल लावला. म्हणाले 'थांब तिथचं मी आलो'. काका समोरुन रस्ता क्रॉस करुन येईपर्यंत माझ्या डोक्यात अनेक विचार - मला त्यांना ओळखता येईल का? काका म्हातारे दिसत असतील का? टक्कल पडलं असेल का? जाडजूड झाले असतील का? ... पण तसं काहीही झालेलं नव्हतं.. I was so happy to see him काका झपाझप चालत आले. 'करंदीकर फॉरेनातसून येऊनपण पुण्यात चारचाकी चालवायला डरत नाही...व्हेरी गुड!' असं त्यांच्या परिचित लकबीला साजेसं म्हणाले आणि गाडीत बसले. आम्ही घरी पोचलो. २५ वर्षाचा बॅकलॉग भरून काढायचा होता.. तीन-साडे तीन तास झाले तरी आमचं पोट भरलच नाही. काका काकूला म्हणाले 'बघ इतक्या वर्षानी हीने मला शोधून काढल, खर प्रेम आहे आमचं!" तीच शेवटची भेट ठरली. काका २९ नोव्हेंबरला अचानक गेले... त्यांच्या आवडत्या लायब्ररीत पुस्तक वाचता वाचता..! ऐकुन डोकं सुन्न झालं.... वाटलं ... का भेटले मी एव्हढी धडपडून तुम्हाला? का शोधून काढला तुमचा पत्ता फोन नंबर? कदाचित मला हे काही कळलच नसत... तर .. काका तुम्ही कुठेतरी आहात असंच मी समजत राहेले असते. पण खरचं तुमचं माझ्यावर खरोखरीच प्रेम होतं म्हणुन जायच्या आधी मला भेटून ते व्यक्त करून गेलात. कोणाचं काही देणं ठेवलं नाहीत. मला मात्र बरचं काही राहून गेल्यासारखं वाटतय.
माझे काका
Submitted by abhishruti on 3 January, 2012 - 02:38
गुलमोहर:
शेअर करा
सुंदर !! मनापासून आवडले काका
सुंदर !! मनापासून आवडले काका
बर्याच दिवसांनी तुझ लिखाण
बर्याच दिवसांनी तुझ लिखाण वाचल.. छान !!
श्रुती खुsssप सुरेख लिवलस
श्रुती खुsssप सुरेख लिवलस गो.. तुजे काका शब्दरुपान डोळ्यासमोर इले. खुप दिवसान इलस मायबोलीर तीपण अशी काकांका शब्दरुपी श्रध्दांजली घेवन... अशे बंध कधी तुटणत नाय ह्या खरा.
श्रुती ; ' काका ' च्या
श्रुती ; ' काका ' च्या आठवणीचा लेख वाचला. ह्या कप्प्यातील आठवणी उत्तर आयुष्यात खूप अनुभव देऊन जातात.छान !! असेच लिहित जा .
परत भेट झाली, ते छानच.... मला
परत भेट झाली, ते छानच.... मला अनेक माणसं न भेटताच सोडून गेली.
सुरेख!
सुरेख!
छान मस्त! आवडले लेखन.
छान मस्त! आवडले लेखन.
धन्यवाद दोस्तहो! कालच मला
धन्यवाद दोस्तहो! कालच मला काकांची बातमी कळली आणि मी दिवसभर अस्वस्थ होते मग मन मोकळं करण्यासाठी मायबोलीची मदत घेतली. बर्याच दिवसात काहीच लिहिल नव्हतं .. आणि तुम्ही एव्हढी छान साथ दिलीत.. अशावेळी कोणीतरी बरोबर असाव असं वाटतं...थँक्स!
कित्ती दिवसानी ग!!! एकटाकी
कित्ती दिवसानी ग!!!
एकटाकी लिहून काढलं असणारेस नक्कीच, काही वेळेला हे असं लिहून घेतलं जातच, छान लिहिलयस.
सुंदर!
सुंदर!
तुमच्या भावना थेट पोहोचल्या!
तुमच्या भावना थेट पोहोचल्या! रानडे काका अगदि डोळ्यासमोर उभे केलेत. त्यांनाही तुम्हाला भेटल्यावर जो आनंद झाला असेल तो केवळ अवर्णनीयच असेल.
छान लिहिलं आहेस..
छान लिहिलं आहेस..
सुरेख.
सुरेख.
प्रज्ञा +१ छान लिहिल आहेस...
प्रज्ञा +१
छान लिहिल आहेस...