बेस्ट प्रपोझल

Submitted by बेफ़िकीर on 27 December, 2011 - 01:29

कुटुंबव्यवस्थेची व तिला मानण्याची अपार अपेक्षा असलेल्या या समाजात रिना तीन वर्षे भयानक पोळून निघाली होती आणि शेवटी एकदाचा तिला डिव्होर्स मिळाला होता. त्यानंतरची दोन वर्षे एकंदरच कुटुंबव्यवस्थेची खिल्ली उडवणे, मनातली उद्विग्नता शब्दबद्ध करणे, पुरुषांचा तिरस्कार करणे, एकटीने राहणे आणि केव्हातरी तरी कोणीतरी आपले असायला हवे असे वाटणे यात पसार झाली.

ही दोन वर्षे नात्यातील मंडळी नव्हती असे नाही. माहेरचे नातेवाईक म्हणजे एक मोठा भाऊ आणि वहिनी, जे प्रेमळ असले तरी परदेशात राहात होते आणि एक मावशी जी त्याच शहरात असूनही म्हातारी असल्याने तिच्याकडे मधूनाधून जाऊन तिलाच आधार द्यावा लागत होता. बाकी मैत्रिणी म्हणजे दोनच, श्वेता ही ऑफीसमधली कलिग, जी रिनाबरोबर डबा खाण्यापुरती एकत्र असायची आणि चार गप्पा मारायची आणि दुसरी म्हणजे डुबलुक, जी एक केसाळ गुबगुबीत अशी तांबुस रंगाची मांजर होती जी रिनाचे काहीही ऐकून घ्यायची आणि तरीही पायात घोटाळत राहायची.

डुबलुकला जवळ घेऊनच गप्पा मारत झोपून जायची रिना!

सोसायटीत कोणीही रिनाशी फारसे संबंध ठेवायचे नाही कारण रिना एक घटस्फोटिता आहे हे त्या लोकांना पचायचे नाही.

मात्र या दोन वर्षांनी तिला आणखीही काही दिले होते.

बरेच काही!

वाढता पगार, सलग दोन प्रमोशन्स, राहण्यास नवीन जागा परवडण्याची नशिबाकडून मिळालेली मुभा आणि...

.... दोन मित्र!

दोन पुरुष मित्र! बॉयफ्रेन्ड्स!

नकारात्मक अर्थाने नव्हे, खरेखुरे मित्र!

तीन वर्षे अत्यंत छळवाद करणारे वैवाहिक आयुष्य सोसून सत्तावीस वर्षाची रिना अनुभवी झालेली असली तरी मनात कोठेतरी ओलाव्याच्या खुणा होत्याच!

याच खुणा त्या दोघांनी हेरलेल्या होत्या, पण तिला फसवण्यासाठी किंवा मजा करण्यासाठी नाही तर खरीखुरी मैत्री करण्यासाठी!

पुनित गांधी!

वय वर्षे पस्तीस! रिना काम करत असलेल्या कंपनीचा एक मोठा सप्लायर! एकटाच! अत्यंत सभ्य आणि लाजराबुजरा! प्रचंड श्रीमंत! कामानिमित्त आठवड्यातून दोन वेळा तरी रिनाशी फोनवर बोलणारा! हळूहळू त्यांच्या ऑफिशियल भेटींना एका अनामिक गूढ आकर्षणाची झालर आल्यानंतर मनाच्या कोषात जाऊन हळूच इकडेतिकडे बावरून पाहणारा! आवाजात विलक्षण भारदस्त आणि आश्वासक गोडवा! मर्यादा उल्लंघणे त्याच्या दहा पिढ्यांना जमणार नाही. अती गंभीर मनोवृत्ती! आयुष्याबद्दलच्या पॉलिसीज ठरलेल्या! एकदम सेफ आणि सभ्य पॉलिसीज! इतक्यावेळा भेटल्यानंतरही फोन केला तर विचारणार. "कॅन आय टॉक नाऊ?? फॉर अ मिनिट? आय मीन आर यू फ्री?" आणि विषय काय तर काहीतरी पेमेंट वगैरे थोडेसे लांबलेले आहे तर ते जरा स्वतः लक्ष घालून काढून द्याल का! हासत हासत रिना म्हणायची 'काय हे मिस्टर गांधी, इतक्या कसल्या फॉर्मॅलिटिज'! आजवर ती त्याला दोनच वेळा मिस्टर पुनीत म्हणाली होती. तेही 'मिस्टर' लावूनच! त्या दोन्ही वेळा अतिशय नम्रपणे त्याने तिची काहीतरी खासगी कामे केलेली होती. नम्रपणे याचा अर्थ असा की ऑफिशियली ती त्याची कस्टमर आहे म्हणून लालूच दाखवून एखादे काम करून घेण्यासठी त्याने काहीच केलेले नव्हते. कॉन रॉडच्या सब असेंब्लीज पुरवणारा तो साठ टक्के सप्लायर असल्याने त्याने सप्लाय बंद केला असता तर रिना काम करत असलेल्या कंपनीची हालत पाहण्यासारखी झाली असती निदान दोन महिने तरी! पण त्याने कधीच गैरफायदा घेतला नव्हता. उलट साठ दिवस पेमेंट टर्म्स असतानाही त्याचे कित्येक लाख रुपये नव्वद दिवसांपेक्षाही जास्त काळ पडून असायचे. हा माणुस कंपनीच्या डायरेक्टर्सबरोबर डिनरला जात असला तरी चपराश्याशीही नम्रपणेच वागायचा. रिनाला टू व्हीलरसाठीचे लोन त्याने त्याच्या प्रभावाने लोएस्ट पॉसिबल व्याजदरावर मिळवून दिलेले होते. रिनाला हे नंतर समजले जेव्हा तिने डीलरशी अंतिम बोलणी केली. डीलर म्हणाला होता गांधीसरांनी सांगितल्यामुळे तुम्हाला तीन टक्के कमी रेट लागत आहे. तिने त्याला फोन करून थॅन्क्स मिस्टर पुनीत असे आभार मानले होते. नंतर तिला या नवीन सोसायटीत फ्लॅट घेताना त्याला समजल्यावर त्याने अचानक मित्रच असलेल्या बिल्डरला सांगून ब्लॅक अमाऊंट मध्ये मोठे कन्सेशन मिळवून दिले होते. तेही तिला बिल्डरकडूनच समजले होते आणि घर घेतल्यावर केलेल्या फंक्शनला आपण पुनीतला कसे काय बोलवायचे हा तिला प्रश्न पडला होता. कारण त्या फंक्शनला तिचे बॉसेस येणार होते आणि पुनीतला तेथे पाहिल्यावर कोणालाही शंका आली असती की फ्लॅटच्या व्यवहारात एक सप्लायर म्हणून त्याने मदत केली की काय हिला! ते इम्प्रेशन अजिबातच बनायला नको होते. तिने त्याला बोलावलेच नाही. सरळ दुसर्‍या दिवशी फोन केला की काल फंक्शन केले पण मला बोलावणे योग्य वाटले नाही. तो म्हणाला मी आज येतो. झाला मोठाच प्रॉब्लेम! एक तर सोसायटीत कोणाला असे काही कळायला नको होते तिला! त्यात इतका मोठा माणूस येणार म्हंटल्यावर डुबलुक वगैरे दिसायला नको होती घरात! तिसरे म्हणजे घर अतिशय नीट लावायला लागणार होते आणि ही तर पोचणार होती थेट संध्याकाळी सात वाजता आणि पुनीत म्हणत होता मी साडे सातला येऊन जाईन! काहीतरी कारण काढून ती अक्षरशः ऑफीसमधून तीन वाजता सटकली आणि घरी येऊन नीट घर आवरले. खायला काही गोष्टी आणून ठेवल्या. डुबलुकला समजावून सांगत सांगत एक दोरी तिच्या गळ्यात बांधून तिला टेरेसमध्ये ठेवून दिले. साडे सातला तो आला आणि लाजत लाजत आत आला. त्याने एक मोठे पार्सल भेट म्हणून दिले आणि घरात कोण कोण असते ही नेमकी नकोशी चौकशी केली. त्यावर ठरवलेलीच उत्तरे देऊन तिने डिश त्याच्यासमोर ठेवल्यावर त्याने चक्क सगळे संपवून टाकले आणि तिच्याकडे बघत बसला. तिने विचारले "काय झाले ?"! कसेबसे त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडले. "च... चहा कराल का? आलं घातलेला ?" ! फस्सकन हासत ती लगबगीने आत गेली आणि तिने चहा टाकला. तोवर तो सरळ तिला न विचारता टेरेसमध्ये गेला आणि मांजर पाहून लगबगीने आत आला.

"सॉरी सर... मला मांजर आवडते.. तुम्हाला आवडत नसेल असे वाटले म्हणून तिकडे ठेवली"

"नाही नाही... तसे काही नाही... मलाही आवडते.."

"चहा घ्या... तुमच्याकडे कोण कोण असते??"

"मी आणि सर्व्हंट्स... "

"मिसेस गांधी ???"

" लग्न नाही केलं मी.."

"ओह..."

"मस्तय चहा... चहाच नाही मिळत चांगला हल्ली.."

"का?"

"हॉटेलचा चहा म्हणजे .... डिप डिप डिप अ‍ॅन्ड इट्स रेडी टू सिप वाला मला नाही आवडत.."

"पण तुमच्या घरी कोणीतरी करतच असेल की चहा मिस्टर गांधी?"

"ओह यू कॅन कॉल मी पुनीत अ‍ॅक्च्युअली... घरी मी.. नसतोच ना फारसा?"

त्या दिवशी तो घरातून निघताना ती दुसर्‍यांदा त्याला 'बाय मिस्टर पुनीत, केव्हाही येत जा चहा घ्यायला' असे म्हणाली होती. टेरेसमध्ये उभे राहून डुबलुकला कुरवाळत खाली बघताना तिच्या अंगावर दहा मुठी मांस चढले होते. कारण पेन्शनरांच्या बाकांवरचे सहा म्हातारे, एकीकडे मुलांना खेळवत गप्पा मारणार्‍या चार ते पाच गृहिणी, तीन ते चार आजी स्वरुपाच्या देवभक्त बायका आणि दहा ते बारा मुलेमुली सर्वजण त्या पॉश काळ्या कुळकुळीत मर्सिडिझकडे एकदा आणि वर उभ्या असलेल्या रिनाकडे एकदा आ वासून बघत होती. हा माणूस रिनाकडे आला आहे हे त्या माणसाने वर पाहात रिनाला हात केल्यावरच समजले होते त्यांना! कडक युनिफॉर्ममधल्या ड्रायव्हरने तातडीने दार उघडून धरत पुनीतसाहेबांना कसे वागवले जाते याचे सर्वांना उदाहरण दाखवले होते. पुनीतचे लक्षच नव्हते कोणाकडे! मर्सिडिझ सुरू झाल्याचा आवजही आला नाही आणि सुळ्ळकन निघूनही गेली गाडी! रिना डुबलुकला घेऊन आत वळताना सर्वांच्या अचंबित नजरांना हलक्या स्मितहास्याने पेलून धरत होती. एवढी भली मोठी आणि महागडी कार त्या सोसायटीत आपल्यामुळेच आली हे तिला जाणवत राहिले होते. पुनीतच्या आफ्टरशेव्हचा लिव्हिंगरूममध्ये उरलेला दरवळ मस्त वाटत होता. डुबलुकशी बोलत बोलत तिने पार्सल खोलायला सुरुवात केली. डुबलुक अचंब्याने भल्या मोठ्या पार्सलकडे बघत होती. यात थोडे उंदिर निघाले तर बरे असे तिला वाटत असावे.

भेटवस्तू पाहून मात्र शॉकच बसला रिनाला! कोणत्यातरी ज्वेलर्सचे सर्टिफिकेट होते बरोबर! एक हात उंच अशी चांदीच्या रंगाची की चांदीचीच राधाकृष्णाची मूर्ती! कित्येक हजारांच्या घरात या मूर्तीची किंमत असेल हे रिनाला जाणवून एकाचवेळेस अपराधी भावना आणि पुनीतचा रागही आला. ही भेट आपण स्वीकारावी कि नाही हे तिला समजेना!

काल फंक्शनला आलेल्यांनी दिलेल्या गिफ्ट्स कुठे आणि ही गिफ्ट कुठे! आजची रात्र असेच राहून उद्या परवा पुनीतचा फोन आला की सरळ सांगून टाकावे की अशी गिफ्ट द्यायला नको होतीत आणि कृपया परत घेऊन जायला कोणालातरी सांगा! पण.........

.... पण कधीही नव्हे... कधीही नव्हे तो कोणतीही फॉर्मॅलिटी न पाळता रात्री सव्वा दहाला पुनीतचाच स्वतःहून एसेमेस आला.....

"होप यू लाईक्ड द गिफ्ट... आय लव्ह्ड मसाला चाय... यूअर हाऊस अ‍ॅज वेल... अ‍ॅन्ड द कॅट टू... हाहा... गुड नाईट... पुनीत गांधी"

आयुष्यात पहिल्यांदाच त्याच्याकडून अनऑफिशियल आणि तोही कोणतीही औपचारिकता नसलेला थेट एसेमेस पाहून काही सेकंद चक्रावून तिने उत्तर पाठवले.

"आय फील आय शूड नॉट अ‍ॅक्सेप्ट सच अ‍ॅन एक्स्पेन्सिव्ह गिफ्ट"

पुन्हा त्याचे उत्तर आले.

"सॉरी.. डिड नॉट वॉन्ट टू हर्ट यू... शॅल सेंड समवन टुमॉरो... टू कलेक्ट इट.. सॉरी अगेन.. होप नो मिसअंडरस्टॅन्डिन्ग्ज..."

कंपनीच्या एका मोठ्या सप्लायरच्या निरागस भावनांची खिल्ली उडवायची की न झेपणारी गिफ्ट स्वीकारून काहीसे मिंधे व्हायचे हे तिला ठरवता येईना!

अगदी दुसर्‍या दिवशी सकाळी आठ वाजेपर्यंत! डुबलूक कुठे आहे हे तिला समजेना! शोधून शोधून दमली होती ती पंधरा मिनिटे! आठ वाजता बेल वाजली म्हणून तिने दार उघडले... तिला माहीत होते की वादळाची चिन्हे वेधशाळेला समजतात... त्सुनामी येणार हेही समजू शकते... काही मिनिटे आधी... पण घराच्या दारातूनसुद्धा वादळ येऊ शकते हे तिला त्या दिवशी प्रथमच समजले...

"हाय लव्हली लेडी... धिस इज अ डेड पिजन यू सी??... ब्रेकफास्ट फॉर यूअर कॅट... शी फर्गॉट इट इनफ्रन्ट ऑफ माय डोअर समटाईम बॅक... कॉन्ग्रॅट्स फॉर हॅविंग सच अ‍ॅन अ‍ॅग्रेसिव्ह कॅट.... दॅट जम्प्स फ्रॉम टेरेस टू टेरेस अ‍ॅन्ड किल्स बर्ड्स... आय अ‍ॅम रॉय... यूअर नेबरर... आय डोन्ट लाईक पिजन्स हेन्स बिंग हॉनेस्ट टू रिटर्न इट बॅक.. हा हा... चलो... बाय... "

आपल्या हातात एक मेलेलं घाणेरडं कबूतर आहे हे रिनाला रॉयने त्याचे दार आपटून बंद केल्यावर समजले व ते तिने झटकून फेकून दिले. त्याच क्षणी तोंडात एक आणखीन कबूतर घेऊन डुबलुक तिथे अचानक अवतरली आणि घरात घुसू पाहू लागली. तिला लाथेनेच दोन दणके देत रिनाने पिटाळले आणि मेलेले कबूतर पायाने आत आणून केराळ्यात घेऊन टेरेसवरून टाकावे की काय करावे याच्या विचारात उभी राहिली. कधी एकदा ते कबूतर टाकून आपण हात स्वच्छ धुतोय असे झालेले असतानाच तिला जाणवले की टेरेसमधून कबूतर सोसायटीतच पडले तर पब्लिक बोंब मारायला लागेल. घाईघाईत ती दार उघडून जिन्यावरून धावत खाली सुटली केराळे घेऊन! खाली एका झाडामगे आणि सोसायटीबाहेर असे ते कबूतर फेकून येताना मात्र लिफ्टने वर आली आणि स्वतच्याच फ्लॅटच्या दाराकडे बघताना हताश होऊन भिंतीलाच टेकली.

लॅच लागले होते.

बोंबललेच! काल परवाच येथे राहायला आलो आणि हा प्रकार! आता काय करावे??

त्या फ्लोअरवर फक्त अजून दोनच फ्लॅट! त्यातला एक अनेक महिने बंदच असावा असा आणि दुसर्‍यावर खणखणीत पाटी! प्रशांतोकुमार रॉय! खाली लिहिलेले होते पाटीच्या! 'बेल बजानेसे पहिले दो बार सोचिये, अंदर एक पागल रहता है'!

तो संदेश वाचून हसावे की अंगावर गाऊन असताना बेल कशी वाजवावी या अडचणीत पडावे हे तिला समजेना! शेवटी पर्याय नसल्याने तिने बेल दाबलीच!

काही सेकंदांनी दार अर्धवट उघडले आणि एक केराची लहानशी बादली बाहेर ढकलली गेली. दार पुन्हा बंद!

आणि तिला हा काय प्रकार आहे ते कळायच्या आतच ताडकन पुन्हा दार उघडले गेले. दारात प्रशांतोकुमार रॉय उभा होता. चेहरा अवाक!

"अरे?? कचरावाला तो अभी आके गया था?? मै वही सोच रहा हूं के फिर कैसे आयेगा इसलिये पोलिस आय से देखा तो आप??? आपको सॉरी कहना है तो मेरा सेल नंबर लीजिये... मुझे टाईम नही है.. वैसेभी दरवाजेपे कबूतरही मरा पडा था... कोई फिल्म अ‍ॅक्टर नही.. चलता है चलता है.. आपकी बिल्ली मुझसे म्याँव... ओक्के??"

"मै.. मै सॉरी कहनेके लिये... नही..."

"तो फिर??? वो बिल्ली आपकी हैही नही क्या??"

"प्लच.. बिल्ली मेरीही है... लेकिन घर अंदरसे लॉक होगया है घर "

"और बिल्ली अंदर??"

"च्चच्च... बिल्ली का कोई प्रॉब्लेम नही है... मै बाहर रह गयी हूं..."

"ओह... तो मै क्या करूं??... आप चाहे तो यहाँ बैठिये दिन भर... मै अभी जा रहा हूं थिएटर...रातमेही लौटुंगा.."

"मै अंदर कैसे जाऊं??"

"लो... मतलब आपकी बिल्ली कबूतर मारके रॉयके घरके सामने फेकेगी और आपका घर अंदरसे बंद हो जायेगा... इसमे रॉय क्या करेगा??"

वैतागून आणि चिडून रिना वरच्या मजल्यांकडच्या लोकांकडे मदत मागावी अशा हेतूने जिन्याकडे वळली तर मागून रॉय म्हणाला...

"ठहरिये.... मै खोलता हूं दरवाजा.. अभी आया..."

ती रागाने पण आशेने आत निघून गेलेल्या रॉयच्या उघड्या दरवाज्याकडे पाहात राहिली. तिला वाटले तो काहीतरी हत्यार किंवा मास्टरकीसारखे काहीतरी आणायला गेला असावा. अर्धे मिनिट झाले तरी बाहेर येईना म्हंटल्यावर आणखीन वैतागतीय तर रॉय चक्क बाहेर आला.... चक्क म्हणण्याचे कारण हे.... की तो स्वतच्या नाही तर रिनाच्या दारातून बाहेर आला होता...

"ये क्या??? आप यहाँसे??? खुल गया दरवाजा???"

"तो मै क्या दीवार फोडकर आया हुवा लगता हूं??? बिल्लीजैसेही मै भी इस टेरेससे उस टेरेसपर कूदा... आप जैसी हसीनाके लिये तो नीचेभी कूद जाता मै.. आखिर मै भी एक दिल रखता हूं सीनेमे.. पर आपके हसबंड को मत बताना के मैने आपकी तारीफ की... नही तो वो अच्छा मान जायेंगे..."

आभार मानून दार लावून रिना आत येऊन स्वतःसाठी चहा टाकू लागली तेव्हा तिच्या स्मितहास्य फुललेल्या चेहर्‍यावरचा पुनीत गांधीचा सर्व प्रभाव मिटून गेलेला होता. बिनधास्त काहीही बोलणारा प्रशांतोकुमार रॉय वादळासारखा मनात घुसला होता. हा असा कसा टेरेसवरून इकडे आला आणि असे येता येत असले तर आजपासून टेरेसचे दार लावूनच झोपायला हवे हे तिला जाणवू लागले.

खरे तर उगीचच या माणसाशी संबंध आलेला आहे हेही तिला कळत होते. पण माणूस एकदम भारीच होता. डुबल्कने कबूतर मारून टाकले नसते तर हा माणुस शेजारी राहतो हे आपल्याला कधी कळले असते कोणास ठाऊक असा विचार करत ती चहा घेऊ लागली.

मात्र संध्याकाळी साडे सात वाजता आलेल्या पुनीतच्या माणसाकडे राधाकृष्णाची मूर्ती आपण का परत देऊन टाकली नाही हे मात्र तिचे तिलाच समजले नाही.

उद्या सोमवार म्हणून आलेला वैताग मनाच्या पापुद्र्यांवर पेलत सव्वा दहा वाजता टीव्ही बंद करून रिना आपल्या बेडरूममध्ये आली आणि दोन खिडक्यांपैकी इमारतीच्या आतच उघडणार्‍या एका लहानशा खिडकीतून तिची नजर पलीकडच्या फ्लॅटच्या सिमेट्रिकल बेडरूमच्या खिडकीतून आत गेलि आणि तिला धक्काच बसला.

क्रीम कलरने पेंट केलेल्या त्या बेडरूमच्या रिनाला दिसत असलेल्या भिंतीवर काही देवांच्या तसवीरी होत्या आणि प्रशांतो रॉयच्या घरात देव दिसणे हा तो धक्का नव्हता.

धक्का हा होता की रॉयच्या दोन्ही हातात एक अतिशय म्हातारी बाई होती आणि तो तिला बेडवर टेकवत सांगत होता जे ऐकू आले होते. '

"नानी... आप तो सहीमे नानी हो यार मेरी.. बुढा तो मै हो रहा हूं... अब आपको गिटार सुननी है?? बापरे... चलो... हमारी नानी को गिटार सुनाते है... प्रशांतो... नानीवाली ट्यून सुनाओ यार आज... बहुत दिन हुवे तुमने गिटार नही बजायी... व्हायोलिन बजाते बजातेही जिंदगी जायेकी तुम्हारी... लो सुनो नानी.. आपवाली ट्यून"

खाडकन रिनाने बेडरूममधला दिवा बंद केला आणि पलंगावर बसून ती पलीकडच्या बेडरूममधील ते दृष्य पाहू लागली. रॉय तन्मयतेने गिटार वाजवत असताना ती जख्खड म्हातारी कौतुकाने आणि भिरभिरत्या डोळ्यांनी रॉयला दाद देत होती. तिच्याकडे मधेच पाहताना रॉय हासून आणखीन तन्मयतेने गिटार वाजवायला लागत होता. जवळपास दहा मिनिटे हा प्रकार झाल्यावर इमारतीतूनच कोणाची तरी हाक रिनालाही ऐकू आली.

"ओ सरजी... यार ये कोई टाईम है गिटार बजानेका??? ... बच्चे पढरहे है.. बुढे सो रहे है यार... आप तो मतलब पचास बार बतानेके बावजूद सुनते नही हो यार... कंप्लेन्ट करे क्या अब???"

खट्टकन त्या अतिउल्हासित निरागस आणि प्रामाणिक आनंदाच्या वातावरणावर एक चरा उठला तसा रॉय खिडकीत येऊन वर बघत कोणालातरी म्हणाला...

"सॉरी अंकलजी... जरा नानी के लिये बजा रहा था... बस बंद कर दिया... सॉरी जी.."

अपराधी नजरेने रॉयने त्या माणसाकडे बघत हे वाक्य उच्चारले आणि पुन्हा आत वळत नानीकडे बघत लहान मुलांना 'श्श्श्श' करतात तसे करत म्हणाला..

"लोढा अंकल गुस्सा हो गये नानी... आप तो मरवायेगी बच्चे को... दूध पिलाऊं क्या??"

नानीने मानेनेच नाही म्हंटले.

'ऐसे नही करते नानी... डॉक्टर कहते है हड्डीयोंके लिये दूध जरूरी है... चलो.. ये लो पिलो..."

नानीने हळूहळू दूध पिऊन टाकलेले रिनाला दिसले.

"मै सोजाउं नानी?? कल कही नही जाऊंगा मै.. आपकेही पास बैठुंगा.. हं???"

नानीने कृश हाताने रॉयला पकडून ठेवलेलेही रिनाला दिसले.

"अच्छा चलो यहीं सोजाता हूं... ठीक है??? "

नानीच्या त्या वृद्ध पिळपिळ्या मांडीवर डोके ठेवून रॉय झोपला तेव्हा त्याचा चेहरा नेमका रिनाच्या खिडकीकडे झाला पण अंधार असल्यामुळे त्याला रिना दिसली नाही. नानी रॉयला थोपटत होती. रॉय तिला म्हणाला..

"आप जब ऐसे सहलाती है ना नानी... तो लगता है के बच्चा बन जाऊ छोटासा... सुनो... पडोसमे एक विद्या सिन्हाजैसी सुंदर कोई रहनेको आयी है.. उसके पास है एक बिल्ली... जो कबूतर खाती है... अब हम क्या करे??"

नानीने कराकरा दात ओठ खाल्याचा अभिनय केला व हसू लागली.

"अच्छा.. मतलब हम भी कबूतर खाये?... और वो खायेगी उसके पतीका दिमाग"

नानी जोरात हासली. विचित्रच आवाज होता तिच्या हासण्याचा!

रिनाच्या मनावर शहारा आला तो आवाज ऐकून! तिकडे रॉयने लाईट बंद केला आणि आता काहीच दिसेनासे झाले तशी रिना उठली आणि बाथर्ममध्ये जाऊन आरश्यात स्वतःला पाहिले.

आपण सुंदर आहोत! अजूनही! हे तिला पटले. बेडरूममधील लाईट लावून कपाटाच्या आरश्यात मात्र मुद्दाम पाहिले नव्हते तिने स्वतःला! चुकून रॉयला कळले की येथून आपण दिसतो तर प्रॉब्लेम नको व्हायला उगाचच काहीतरी!

जवळपास अर्धा तास रॉयच्या फ्लॅटमधून काहीही आवाज आला नाही तशी तिने उठून तिची खिडकी अलगद बंद करून घेतली. आणि झोपायच्या जस्ट आधी एक एसेमेस आला.

"थॅन्क्स फॉर अ‍ॅक्सेप्टिंग द गिफ्ट... आय वॉज रिअली डाऊन व्हेन यू सेड यू डोन्ट वॉन्ट इट... आय डोन्ट नो हाऊ टू से सॉरी... - पुनीत"

नुकतेच उत्तरध्रूवाला जवळून पाहून निद्रिस्त होणार तर दक्षिण धृवाने स्वतःची आठवण करून दिली.

रिनाने उत्तर पाठवले.

"नॉट अ‍ॅट ऑल... आय लाईक्ड इट... सो थॉट ऑफ कीपिंग इट... व्हाय आर यू सॉरी?.. गूड नाईट मिस्टर गांधी"

"गुड नाईट "

अनेक दिवस काहीच झाले नाही. रिना सगळे विसरूनही गेली. फक्त कृष्णाची मूर्ती पाहिली की पुनीतची आठवण यायची इतकेच! आणि खिडकीतून पलीकडची खिडकी उघडी दिसली तर रॉयची! पण ती बरेचदा बंदच असायची. गिटारच्या तारांचे मधुर झनकार मात्र कानात बसल्यासारखे झालेले होते.

आणि एक दिवस तो प्रकार घडला. नको तो प्रकार! ऑफिसमधून येताना कायनेटिकचा तोल जाऊन रिना पडली ती दोन फ्रॅक्चर्ससकट हॉस्पीटलातच गेली. हे रॉयला कसे कळले असेल ते हॉस्पीटलमध्ये तो आल्याआल्याच रिनाला लक्षात आले. डुबलूकमुळे कळलेले असणार! रॉय जो आला तो हॉस्पीटलचे वातावरण ढवळतच!

"अच्छा हुवा आप गिर गयी... किसीकी नजरोंसे गिरजानेसे तो ये ऐसा गिरना अच्छा है .... कहा कहा लगा है भाई?? .. कमसे कम दो चार हड्डी टूट जानी चाहिये... नही तो आदमीको जो है... आराम नही मिलता... यही मोहोलत है आराम करनेकी.. किसको मार दिया रास्तेमे??.. स्कूटर तो आपकी मैने पहुचा दी शमशान तक.. मतलब सर्व्हीस स्टेशनमे... आपके पती इतनी ज्यादा नफरत करते होंगे आपसे ये मालूम नही था... के देखनोकोभी नही आये... उन्हे पता भी चला है या नही??"

"आपको कैसे पता चला मेरा अ‍ॅक्सीडेन्ट हो गया??"

"दरस्सल मै उसी रास्तेसे जा रहा था तो एक बहुतही बडा गढ्ढा दिखायी दिया... मैने किसीसे पूछा भाई ये क्या चीज है.. कहने लगा कोई मोटी गिर गयी थी शाममे.. अब उस मोटीको कॉर्पोरेशनके अर्थ मूव्हिंग फ्लीटमे लेनेवाले है कहरहा था... पैसे तो है ना आपके पास गिरकर इलाज करवाने जितने... आजकल कोई महंगा डिसीज होना ये शानोशौकतकी बात समझी जाती है.. आपके बिल्लीने आकर बताया के आप गिरगयी हो... म्याँव म्याँव"

" आप ख्वामख्वाही आगये... इतना कुछ नही हुवा है "

"हां हां... दोही तो फ्रॅक्चर्स है... कमसे कम जान तो जानी चाहिये थी यार... ये भी कोई हादिसा है... "

रिना त्या परिस्थितीत हासली अन म्हणाली...

"आपको क्या मालूम?? दो फ्रॅक्चर्स है??"

" पूरे अस्पतालको मालूम है मोहतरमा... विद्या सिन्हा गिरेगी तो पोस्टर्स नही लगेंगे... आप अकेली है क्या??"

"..... हं"

"इसका मतलब आप अकेली नही है... क्योंकी अब मै आपके साथ हूं... "

रिना पुन्हा हासली.

"ये एक किताब लाया हुं आपके लिये... 'न गिरनेके एकसौ एक तरीके'"

आता मात्र रिना जोरात हासली.

पाहिले तर तो हिंदी कथासंग्रह होता. आभार मानून रिना तो वाचू लागली तसा रॉय उठून बाहेर गेला. काही वेळाने आला आणि फळे वगैरे ठेवून म्हणाला हे शहाळं घ्या! रिना नाही म्हणाली व तिने हेही सुचवून पाहिले की तो आता गेला तरी हरकत नाही. त्यावर रॉय म्हणाला......

"जाके क्या करनेवाला हूं? काम तो मिलता नही! एक नानी है जिसको खुष रखना ये मकसद बचगया है! आप आरामसे किताब पढियेगा, मै किसीकिसीको बोअर करके आता हूं"

नर्स आली तसा रॉय उठला आणि बाहेर गेला. तो बाहेरच थांबला आहे की निघून गेला आहे हे रिनाला माहीत नव्हते. रात्रीचे नऊ वाजलेले होते. आता गोळ्या घेऊन एक हात लटकवून झोपून जायचे हे रिनाने ठरवले होते. परदेशातल्या भावाला अणि गावातल्या मावशीला तिने अजून काहीही सांगितले नव्हते. श्वेता मात्र आज रात्री राहायला येणार होती आणि ती साडे नऊला आलीही!

जरा बरे वाटले रिनाला! गप्पा सुरू झाल्या. या अशा अवस्थेमध्ये गप्पा तरी निवांत होतात! दोघींनाही वेळच वेळ होता. वाट्टेल ते विषय निघू लागले. आणि दहा वाजता दोघीही धक्का बसून दाराकडे पाहू लागल्या.

पुनीत मोदी अवघडल्या नजरेने दारात उभा होता.

"आलो तर चालेल का?"

श्वेता अती लगबगीने उठली अन घाईघाईत म्हणाली.

"हो हो या ना सर.. मी इथेच थांबणार आहे आज रात्री.... बसा ना..."

पुनीतच्या मागून त्याचा एक माणूस आला आणि एक मोठ्ठा गुच्छ रिनाला दिसेल अशा पद्धतीने ठेवून निघून गेला. पुनीतला काही बोलताच येत नव्हते. तो नुसताच टुकूटुकू रिना आणि श्वेताकडे पाहा होता. अचानक म्हणाला...

"किती लागलंय??"

"दोन फ्रॅक्चर्स झालीयत सर.... कायनेटिकवरून पडली ही... "

पुनीत अजूनही बावचळल्यासारखाच होता. या श्वेताला तो पाहून ओळखत होता. रिनाला आपण भेटायला आल्याचे ती सर्वत्र सांगत सुटेल की काय असे त्याला वाटू लागले.

"अ‍ॅक्च्युअली... मी इथूनच जात असताना सरकार म्हणाला मला.. की असं असं झालंय... म्हंटलं वाटेवरच आहे तर जाताना भेटूनच जाऊ.."

श्वेता समजूतदारपणे हासली तसा मग पुनीत रिनाकडे पाहू लागला व म्हणाला........

"मी काही... करता येण्यासारखं असलं तर.. प्लीज सांगाल का??.. मला माहीत नाही की मी आत्ता इथे यायला हवं होतं की नाही ते..."

"नो नो मिस्टर गांधी.... उलट खूप सुखद धक्का बसला तुम्ही आलात याचा... मला अजिबात कल्पना नव्हती की कंपनीच्या एका कर्मचार्‍यालाही भेटायला तुम्ही याल असे"

हासत हासत रिनाने उच्चारलेले हे वाक्य श्वेताचा इतर कोणताही समज होऊ नये म्हणून होतं हे श्वेताला स्वतःलाही समजलं! ती गालातल्या गालात जॉभ घोळवत म्हणाली..

"ज्यूस घ्याल का सर?? खाली मिळतो... मी आणते एका मिनिटात..."

"छे छे... अहो काहीतरी काय.. मी एक मिनिट फक्त यांना भेटायला आलो होतो... उलट तुम्हालाच दोघींना काही हवं असल्यास मला सांगा.. माझा माणूस लगेच आणून देईल.."

रिनाला स्वतःला अवघडल्यासारखे झालेले असले तरी श्वेता एक द्वाड मुलगी होती. मिश्किलपणे रिनाकडे बघत पुनीतला उद्देशून ती म्हणाली...

"एम पी लोखंडवालांना हिची रजा तेवढी सॅन्क्शन करायला सांगाल का?? फार तापट आहेत ते"

एम पींची आठवण आल्यावर पुनीत फस्सकन हासला. एम पींच्या वरच्या लोकांशी त्याचे घनिष्ट संबंध होते. त्याला हासताना पहिल्यांदाच पाहिले नसले तरी असे गंमतीशीरपणे हासताना रिनाने प्रथमच पाहिले होते. मस्त हासत होता तो! म्हणाला.......

"एम पी काही म्हणणार नाहीत... बरं मी निघतो... बाय द वे... हा माणूस इथेच थांबणार आहे.. "

"छे छे... कशाला अहो??" रिना त्याही परिस्थितीत म्हणाली... तर श्वेता पुन्हा मधे पडली..

"असुदेत अगं... काही लागलं तर धावपळ करायला पाहिजे ना कोणीतरी... "

तो माणूस पुनीतला एस्कॉर्ट करायला निघाला तसा दोन पावले पुढे गेलेला पुनीत पुन्हा मागे येत म्हणाला..

"हे मी... कसं सांगावं मला माहीत नाही आहे... पण.. डॉक्टर नाग माझे मित्रच आहेत... ही इज गोईन्ग टू इन्व्हॉइस द एक्स्पेन्डिचर टू माय कंपनी... डोन्ट वरी.. वुई हॅव इन्शुअरन्स काईंड ऑफ थिंग.. "

"नो नो.. सॉरी मिस्टर गांधी.. बट... आमच्याकडेही आहेच इन्शूअरन्स.. आय वोन्ट लाईक दॅट.. प्लीज.."

"इट्स ओके रिनाजी... आय हॅव ऑलरेडी मेड दोज पेपर्स नाऊ... बाय..."

अजून खणखणीत विरोध करायला रिना अर्धवट उठत होती तोवरच घाबराघुबरा झालेला पुनीत सटकलेला होता. श्वेताकडे पाहात रिना पुन्हा आडवी झाली तेव्हा श्वेता पूर्णपणे थट्टेच्याच मूडमध्ये आलेली होती...

"काश.... आज मी पडले असते तर....."

"का???"

"व्हॉट अ हॅन्डसम बॅचलर...."

"श्वेते... अक्कल आहे का... मुलगा आहे तुला एक..."

"हो पण फुकटचं हॉस्पीटलायझेशन असलं तर अधेमधे पडायला काय हरकत आहे??"

"उद्या त्याच्याच गाडीसमोर आडवी हो आणि किंचाळ... मग तुलाही भरती करेल तो..."

"ए पण मला सांग ना?... हे सगळं... झालं कसं काय??"

"मला काय माहीत??? मीच हादरलीय हा माणूस अचानक कुठून आला यामुळे..."

"नक्की??"

"म्हणजे???

"की ... येतो अधूनमधून भेटायला.. तूहि तशी बरी दिसतेस...."

"माझी हाडं मोडलेली नसती तर आत्ता मी तुझी मोडली असती..."

खिदळत श्वेताने सफरचंद कापायला सुरुवात केली आणि म्हणाली...

"श्रीमंतांना कसं कापायचं ते नाही मला माहीत... सफरचंदाचं एक ठीक आहे ... नाही का??"

"तू चालती हो... "

"हो आता काय... हक्काचा नोकर आहे दाराबाहेर... नाही का??"

हे वाक्य भिंतीवर आदळतंय तोवर वादळ घुसलं!

"हकका नौकर हाजिर है! आपने इन्हे बताभी दिया के मै आया था? नानीको मैने बताया की विद्या सिन्हा गिरगयी है.... तो कहती है.. तुम वही जाओ... इतनी सुंदर पडोसन अस्पतालमे होते हुवे शरम नही आती घरपे बैठते??? आपकी बिल्ली सौ चुहे खाकर हजको चली है... मतलब हमारे नानीके पास सोगयी है.. आपको पता है?? मेरी एक नानीभी है.. गुंगी है बेचारी... फल कौन लेके आया मेरे लिये?? इतना थोडेही मै अकेला खा सकता हूं??... लो... आपभी लीजिये... ये सहेली है क्या?? "

श्वेता आ वासून रॉयकडे पाहात असताना थिजलेली रिना दोघांकडे आळीपाळीने बघत होती. शेवटी तिने ओळख करून दिली.

"ये श्वेता है... मेरे ऑफिसमे है.. इसिने फल लाये... आप खालीजीये... आप वापस क्यूं आये???"

"वापस क्यू आये मतलब??? पहिली नजरमे प्यारव्यार नही हो सकता है क्या मुझे??"

निवांत सफरचंद तोंडात कोंबत तो म्हणाला. श्वेता हसायला लागली. रिनाने विचारले.

"आप क्या बोलरहे है आप खुद समझरहे है क्या??"

"बिलकुल.... मै आज रात यहीं रहनेवाला हुं.... "

"क्यूं???"

"टाईमपास... "

"हॅलो... सॉरी.. लेकिन ये यहाँ रहरही है... आप प्लीज घर जाईये..."

"अरे आप तो सब सच मानलेती है यार??? मुझे कुछ प्यारव्यार नही है! मै बातेही इस तरहाकी करता हूं!"

"फिरभी आप घर जाईये... "

" वो तो हो नही सकता... वैसे मै बाहर ठहरजाऊंगा रातभर... ये थोडे फल लेके जाता हूं साथ मे.. ओक्के??"

अक्षर बोलायची संधी न देता तो निघून गेला. आता श्वेता हसायलाच लागली.

"काय झालं??? हसतेस काय बावळटासारखी??"

"हे कोण???"

"शेजारी राहतो... रॉय नांव आहे... "

" कसली पॉप्युलर आहेस गं तू..."

"अगं काय बोलतीयस??? हा माणूस कोण आहे हेही मला माहीत नाही आहे.. दोनतीनवेळा बोललो असू आम्ही फक्त... आला लगेच.... काय एकेक असतात...."

"काय थाट आहे गं तुझा... बाहेर एक नोकर चोवीस तास दिमतीला... बिल पुनीतसरांची कंपनी भरणार... हा बंगाली रात्रभर दिमतीला आहे तो आणखीन वेगळाच... मी एक आहेच इथे बसलेली बावळटासारखी... आणि ही फळं फुलं वगैरे.... कसं काय जमतं तुला हे?? "

"मी बरी झाल्यावर तू याच हॉस्पीटलमध्ये अ‍ॅडमीट होणार आहेस हे नक्की.."

खिदळत श्वेताने झोपण्यापुर्वीची औषधे तिला दिली आणि झोप लागण्यापुर्वी दोघी थोडेसे बोलत बसल्या.

"डुबलूकला ती म्हातारी कशी काय सांभाळत असेल काय माहीत.. तिला तर स्वतःलाही उठता येत नाही..."

"मांजर ना?? ती काय... खेळेल इकडेतिकडे..."

" उगीच काहीतरी होत असतं... आता ह्या दोघांचे उपकार माझ्या डोंबल्यावर आले.."

" सिरियसली रिना... मला सांग... तुला पुन्हा लग्न नाही करावसं वाटत??"

क्षणभर श्वेताच्या नजरेत नजर गुंतवून रिनाने आढ्याकडे नजर वळवली. समवयीन आणि समजून घेणारी अशी आपल्याला फक्त श्वेताच आहे हे लक्षात आल्यानंतर तिने बोलायला सुरुवात केली.

"रवी तसा ठीक असायचा. पण त्याला वेडाचे झटके यायचे. ते झटके आले की घरातून सरळ रस्त्यावर जायचा. काहीही करायचा. कोणाशीही कसाही वागायचा. लग्नाआधी आम्हाला हे सांगण्यात आलेले नव्हते. त्याला झटके आल्यावर तो कधीकधी मला मारायचाही... आणि त्याला.. त्याला 'त्याच्यात' काहीही इन्टरेस्ट नव्हता... माझ्याकडे बघायचाही नाही कधी तसा... पण शांत झाला की खूप हासवायचा... मजा मजा करायचा... एकदम नॉर्मलच वाटू लागायचा... पण या गोष्टीला काहीही अर्थ नव्हता... त्याला ते झटके येणे वाढू लागले... मग त्याचे सगळेच मला करायला लागू लागले.. सासरचे लोक म्हणजे फक्त त्याची आई जी म्हातारी होती... ती मला शिव्या द्यायची... रवीसाठी मी ते सहन केले असते... पण एकदा त्याने मला वेडाच्या भरात मारले आणि मी स्वभावाने तापट... मी त्याच्या ट्रीटमेन्टचे सगळे पेपर्स गोळा केले आणि सरळ डिव्होर्सचीच केस केली... असला नवराकोणाला हवा जो मला कधी स्त्रीत्वाची जाणीवही देणार नाही आणि उलट त्यालाच वेडाचे झटके येत असल्यामुळे मला आयुष्यभर त्याचे करावे लागेल??? शेवटी मिळाला घटस्फोट! त्याला तेव्हाही काही वाटले नाही. म्हणजे त्याला समजलेच नाही की काय झाले आहे. तो तसाच वागत होता आणि त्याची आई मात्र टुकूटुकू बघत होती कारण ती हारली होती.

काही झाले तर आजवर माझ्या आईवडिलांनीही कधी माझ्यावर हात उचललेला नाही. मी मार खाऊन राहू शकत नाही. फसवून एका वेड्याबरोबर आयुष्य काढू शकत नाही. मला पुरुषांचा राग येतो तो यामुळेच! सगळेच थोडेफार असेच विकृत असतात."

कितीतरी वेळ रिनाला थोपटत श्वेता जागीच होती... रिनाला मात्र झोप लागलेली होती...

पंधरा दिवस याच हॉस्पीटलमध्ये काढून नंतर सव्वा महिना घरात फिजिओथेरपीचे उपचार घ्यायचे होते..

आयुष्याला विचित्र वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली होती... कारण जवळपास दोन महिन्यांच्या रजेनंतर तिचे महत्व ऑफीसमध्ये किती राहील हा एक प्रश्नच होता... काही असले तरी शेवटी... कोणाचेच काहीच कधीच अडत नसते...

==========================

फिजिओथेरपीस्ट पुनीतच्याच पैशांनी यायला लागल्यावर मात्र रिना भडकलीच. तिने सरळफोन उचलून पुनीतच्या सेलवर त्याला कॉल केले. तो मीटिंगमध्ये असतानाच तिने त्याला सरळ सांगून टाकले.

"प्लीज डोन्ट डू ऑल धिस फॉर मी... आय कॅन मॅनेज इट ऑन माय ओन"

पुनीत खरे तर मनातून हादरलाच. त्याचा स्वभावच तसा होता. आपल्या उपकारांखाली तिला दबायचे नाही आहे हे त्याच्या लक्षात आले आणि त्याला स्वतःचीच चूक वाटू लागली. त्याने एक सॉरी ग्रीटिंग पाठवले संध्याकाळी!

गेल्या दिड महिन्यात रॉयची नानी, डुबलूक आणि रिना असा मस्त ग्रूप जमलेला होता. रॉयला काम मिळालेले असल्याने तो फक्त हॉस्पीटलमध्ये येऊन जायचा एकदाच! पुनीतचा माणूस मात्र रोज राहायचा. श्वेता अधूनमधून रात्री राहायला यायची, शेवटी तिलाही संसार होताच! मग कंपनीतील इतर एक दोन बायका एक दोन वेळा रात्रीच्या राहून गेल्या. मावशी म्हातारी असल्याने एकदोनदा फक्त येऊन गेली इतकेच! मात्र रिना घरी आल्यानंतर मावशी तिच्याचकडे येऊन राहिली आणि जमेल तितके करू लागली. एकदा रिनाला बहुतेक सर्वच करता येऊ लागल्यावर मग मावशीही आपल्या घरी गेली आणी मग नानी, डुबलूक आणि रिना संपूर्ण दिवस रिनाकडेच काढू लागल्या. नानींना सरपटत सरपटत बाथरूमला जाता यायचे. रिनाला त्यांचे विशेष काहीच करावे लागायचे नाही. डुबलूक सहसा पोळी आणि दूध इतक्यावरच जगायची. बाहेर पाठवले की मग उंदिर शोधू लागायची. या दिड महिन्यात पुनीतने एकदाही फोन केला नाही. एकही एसेमेस नाही. रॉय तर रात्री अकराला येऊन नानीला उचलून घरी घेऊन जाताना रिनाला फक्त हाय करायचा.

एकदाचे ऑफीस सुरू झाले. आता डुबलूक नानीकडे आणि रॉयने ठेवलेली एक मदतनीस मुलगी नानी आणि डुबलूकचे पाहू लागली.

आयुष्यात एक रिकामेपण आले. नवल म्हणजे ऑफीसमधल्या कोणीच रिनाला 'तू नसलीस तरी कामे होतच होती' असे दाखवल नाही हे त्यातल्यात्यात चांगले! पण आता पुनीतचा कामासाठीही ऑफीसमध्ये फोन येत नव्हता.रॉय तर दिसतही नव्हता. ऑफीसमधून घरी आल्यावर रिना नानीला भेटून थोडा वेळ बोलून डुबलूकला उचलून घरी आणायची आणि झोपून जायची.

एक विचित्र पोकळी निर्माण झालेली होती. अचानक सुगंधी झुळ्का येऊन गेल्या आणि आता निर्वात पोकळी राहावी तसे आयुष्य होऊ लागले होते. कोणत्या ताठ्यात आपण पुनीतला झिडकारले असे वाटू लागले होते. आता स्वतःहून त्याला संपर्क करण्याइतका तो सामान्य असामी नव्हता. त्याची अपॉईंटमेन्ट मिळावी यासाठी भलेभले प्रयत्न करायचे आणि आपण त्याला कसा काय एखादा एसेमेस करायचा? तो चांगला आहे म्हणून काहीही?

इकडे नानीने डुबलूक आणि रिनावर प्रेमाचा वर्षाव सुरू केलेला होता. नानीचे प्रेम म्हणजे काय? तर बसल्या जागेवरून डोळे गोल गोल फिरवून खूप आनंद व्यक्त करायचा आणि केअरटेकर मुलीला रिनासाठी चहा करायची खुण करायची! पण रिनाला तोही ओलावा प्रचंड वाटायचा.

मात्र हळूहळू रॉय वेळेवारी घरी येऊ लागला. आला की रिनाची बेल वाजवून दारातूनच दोन मिनिटे बोलायचा आणि घरी जायचा.तो आल्यावर ती मुलगी निघून जायची. मग रात्री खिडकीत कधी रॉय नानीला खूप हासवताना दिसायचा तर कधी हळूच गिटारवर एक ट्यून वाजवताना!

आपलेपणाला ठुकरावून आपणच त्याचे रुपांतर परकेपणात केले हे रिनाला जाणवू लागले. पण ते फक्त पुनीतच्या बाबतीत! रॉयच्या वागण्यात 'तसा' आपलेपणा नव्हता. तो सरळ बिनदिक्कत तिला सुंदर म्हणायचा! तुम्हे देखके कुछ कुछ होता है म्हणाला एकदा! मग म्हणाला 'पण डुबलूक जास्त अ‍ॅट्रॅक्टिव्ह आहे'! त्याच्या बोलण्याला नसलेल्या ताळतंत्राला एक अतिशय लाघवी ताळतंत्र होतं! पण त्यात कोठेच 'तसे' आकर्षण वाटत नव्हते.एकदम दिलखुलास!

आणि आज सकाळपासून रिनाला अस्वस्थच वाटत होते. काहीतरी विसरतो आहोत, काहीतरी मोठ्ठे विसरतो आहोत असे तिला सारखे वाटू लागले.

आणि आंघोळ उरकतानाच बेल वाजली. घाईघाईत आवरून तिने दार उघडले तर माणूस कोण ते दिसलेच नाही. कारण एक अजस्त्र बूके धरून तो माणूस उभा होता आणि त्या बूकेवर मोठ्या अक्षरात लिहिलेले एक कार्ड होते.

'विश यू मेनी हॅपी रिटर्न्स रिनाजी - फ्रॉम पुनीत गांधी'

इश्श्श्श्श्श् ! आपलाच बर्थडे आहे की! काय हे!

मनात सुखद कारंज्यांचे तुषार उडले! हे कारंजे नवीनच होते! पुनीत अजून आपली आठवण काढतो या सुखाचे कारंजे होते हे! चेहर्‍यावरचा आनंद लपवता येत नव्हता. बूके दोन्ही हातात पेलत नव्हता.बूके देणार्‍या कंपनीने पूनीत गांधी हे त्यांचे खूप मोठे कस्टमर असल्याने रिनासाठी एक स्वतंत्र, कंपनीचा असा वेगळा बूके पाठवला होता छोटासा! एक केकही आला होता सोबत!

कसाबसा तो बूके आत ठेवून आलेल्या माणसाचे आभार मानून दार लावून ती आत वळली आणि पुनीतला फोन करायला सेलफोन हातात घेतला तोच त्यावर पुनीतचा एसेमेस!

"समथिंग इम्पॉर्टन्ट- कमिंग टू यूअर प्लेस धिस इव्हिनिंग अ‍ॅटाबाऊट सेव्हन थर्टी - लेट्स मेक अ पार्टी अ‍ॅन्ड देन वुई विल डिस्कस - ओके? - पुनीत"

तीनतीनवेळा तो मेसेज वाचून पुनीतला फोनच करावा या विचाराने त्याचा नंबर डायल करतीय तर पुन्हा दाराची बेल!

तीही एकदा नाही,सलग नऊ वेळा!

धावत दार उघडले तर एका चाकाच्या खुर्चीवर नानी आणि तिला घेऊन रॉय उभा!

"आपको और थोडी बुढ्ढी होनेपर बहुत सारी शुभकामनाये... धिस इज फ्रॉम नानी... अ‍ॅन्ड धिस इज फ्रॉम रॉय.... अ‍ॅन्ड धिस इज... फॉर अवर डुबलूक..."

"ये क्या कररहे हो रॉय???इसकी क्या जरूरत है???? अंदर आओ नानी...."

आनंदाच्या शिखरावर असलेल्या रिनाने नानीची खुर्ची आत घेण्याआधी तीनही गिफ्ट्स हॉलमध्ये ठेवल्या.

नानीतर्फे भरपूर फुले, डुबलूकसाठी एक लिटर दुधाची पिशवी आणि.... रॉयतर्फे ... रिनासाठी....तिला अतिशय शोभेल अशी लालभडक बंगाली कलरची साडी.... ! महागडी असणार हे दिसतच होते.

"मै सिर्फ फूल रखती हू रॉय... ये सारी मत देना मुझे...."

गालांवर साडीच्याच रंगाची लाल लाल फुले फुललेल्या चेहर्‍याने रिना रॉयला म्हणाली...

"ठीक है...फिर सारी डुबलूक पहनलेगी..."

फिस्सकन हासून रिना चहा टाकायला वळली...

"आज चाय नही चाहिये..."

"तो???"

"आज... आज कुछ मीठा चाहिये..."

"रॉय बिलिव्ह मी आय हॅड फरगॉटनमाय बर्थ डे.... कुछ भी लायी नही हूं..."

"तो पार्टी रख्खो शाममे???"

"ओह शुअर...लेकिन अभी चाय तो लो??"

"हां हां... बिलकुल..."

चहा घेत असताना रिनाने रॉयला वाढदिवस कसा कळला वगैरे विचारले. पुनीतला कळण्यात काही विशेष नव्हते. हॉस्पीटलच्या कोणत्यातरी कागदपत्रात किंवा कशाततरी त्याला समजणे सहज शक्य होते. तो त्या लेव्हलला होता. रॉयला मात्र तिच्या स्कूटरमधे असलेल्या पॅनकार्डवरून समजले होते.

रिनाने रॉयलाच विचारले.

"तुम केक लाकर रख्खोगे क्या?? मै लेट होजाऊंगी"

"लो कर लो बात नानी... मतलब आप ऑफीस जा रही है आज???"

"मतलब?????"

"पागल होगयी हो क्या???? हमलोग तुम्हे क्या ऑफीस जाने देंगे आज??? आज तो भैय्या सेलेब्रेशन होगा... मै बझारसे राऊ ला रहा हूं... राऊ पसंद करती है आप?? नदीकी मछली होती है... "

"छ्छी... मै नही खाती नॉनव्हेज..."

"तो फिर आप हरी सब्झी खाईयेगा... फिर आईसक्रीम आपकी तरफसे और जलेबी मेरी तरफसे और रसमलाई नानीकी तरफसे... क्यों???"

"ये सब खाउंगी तो मोटी हो जाऊंगी..."

"तो अब क्या बहुत पतली हो ?? एक मै हूं बडे दिलवाला जो कहता रहता है के पडोसन बडी सेक्सी है.. नही तो तुम्हे कौन पतली कहेगा???"

"श्शी... नानी... इसको बताओ गंदी बाते नही करेगा...."

"चलो चलो आप बझार जाओ पहले... कुछ नाश्तेकेलिये लेकर आओ..."

"रॉय... सहीमे मैने ऑफीस जाना जरूरी है... "

"तुम जो हो यार बकवास बहुत किया करती हो... आज कोई सुननेवाला नही है... दरवाझेसे बाहर नही जाओगी तुम.. मैही लेकर आता हूं कुछ.. पैसे निकालो...."

एक दिवस!

एक पूर्ण दिवस!

एक संपूर्ण दिवस!

एक दिवस आनंदाच्या नशील्या वातावरणात!

सकाळी नऊ पासून नुसता आवाज आवाज आवाज! धांगडधिंगा! डुबलूकला तर रेशमी ओढणी घातली होती सर्वांगावर! आणि उंदिर मिळेल का हेही शोधून आला रॉय खाली. हसून हसून तिघे दमले होते. कोण काय करतंय आणि कोण काय खातंत याला काही सुमारच राहिलेला नव्हता. आयुष्यातील एकही वाढदिवस इतका छान नव्हता...

संध्याकाळी नुसतीच पार्टी ठरवून तयारी चालू केली होती, पण येणार कोण आहे तेच ठरवलेले नव्हते.

नंतर रॉयला तिने सांगितले की एक साहेब येणार आहेत कंपनीतले! रॉय म्हणाला त्यांना आपण डुबलूकचा वाढदिवस आहे असे सांगू! रिनाच्या स्वयंपाकघराचा ताबा रॉयने घेतला होता. डुबलूकचा नानीने आणि नानीचा रिनाने!

एक क्षण असा नव्हता ज्यात वास्तव जगाची आठवण यावी!

आणि तिन्हीसांजा झाल्या! एरवी या वेळेस मनावर येणारी निराशेची पुटे आज योजने दूर होती. रॉय म्हणज खळाळत्या उत्साहाचे मूर्तीमंत प्रतीकच! कित्येक क्षण असे आले जेव्हा रिनाला वाटून गेले की खरे तर पुरुष किती सुंदर असतात मनाने! आपला नवरा असाच असता तर??

आणि.... संध्याकाळी सात वाजता रॉयने दिलेल्या साडीला फॉल नाही म्हणूनती दुसरी साडी नेसून बाहेराली तेव्हा नानी खाणाखुणा करून रॉयला काहीतरी आग्रह करत होती...

"क्या खुसरफुसर हो रही है??? नानी... कैसी लग रही हूं मै इस सारीमे??"

एरवी रॉय म्हणाला असता की 'सफेद चिपकली लग रही हो'! आज काहीच बोलला नाही. नानीने कुंकवाचा करंडा मागवला हे रॉयलाच समजले. त्याने देवाजवळची कोयरी आणली आणि नानीला दिली. नानीने पुढ झुकलेल्या आनंदी रिनाच्या गोर्‍यापान कपाळावर एक ठसठशीत बंगाली वर्तूळ काढले कुंकवाचे! नानीला नमस्कार करून रिना डुबलूकला मांडीत घेऊन एका खुर्चीवर बसली तसा रॉय नानीकडे बघत म्हणाला...

"नानी...आप कहरही हो इसलिये... हिम्मत कर रहा हूं..."

"क्या हुवा रॉय???" - गंभीर होत रिनाने विचारले.

"रिना... मतलब.. नानी कहरही है... के... मै आपको... प्रपोझ करू... "

खळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ!

सुंदर काचपात्र बघण्यात दिवस जावा आणि संध्याकाळी ते हातातून पडून फुटावं तसं झालं रिनाला!

जमीनीवरून नजर हटेना तिची! नानी मात्र चित्रविचित्र आवाज करत रिनाला हो म्हणायचा आग्रह करत होती...

काहीतरी बोलायला लागणारच होते... या प्रसंगातून सुटका कशी होणार????

... झाली...

बेल वाजली...

दार उघडताच उंची आफ्टरशेव्हचा सुवास दरवळला!

त्याहून उंची सूट घालून पुनीत गांधी हसर्‍या, पण ओशाळलेल्या नजरेने आतल्या सगळ्यांकडे पाहात होता...

.. त्याच्या हातात कोणा ज्वेलर्सकडची एक अगदी लहानशी बॉक्स दिसत होती... ती पुढे करून तो रिनाला म्हणाला...

"हॅपी बर्थ डे रिनाजी... धिस इज फॉर यू... अ‍ॅक्च्युअली... मला जरा एका मीटिंगला जायचे असल्याने... मी जरा निघतो आत्ता.. सॉरी टू डिस्टर्ब यू...."

रॉय उठला आणि म्हणाला...

"दोस्त...हमलोग सिर्फ पडोसी है बॉस... इन्तेझार तो आपकाही है मियाँ... जा कहां रहे है आप??? आईये आईये... तशरीफ रख्खिये... केक काटना बाकी है अभी... "

तसा दिलखुलास हासत पुनीत आत आला आणि रॉयशी ओळख करून घेतली. तेव्हा रिनाला पहिल्यांदा समजले की रॉय ऑर्केस्ट्रात गिटार वाजवतो आणि फिल्मलाईनमध्ये त्याला जायचे आहे. पुनीतने नेहमीच्या सवयीने लगेच सांगितले की रुणवाल हे निर्माते त्याच्या ओळखीचे आहेत आणि तो लगेच त्यांच्याशी बोलून ठेवेल.

थक्क झालेला रॉय कृतज्ञ नजरेने पुनीतचा श्रीमंती थाट बघत राहिला आणि अबोल झाला. आपण कोणासमोर बसलेलो आहोत याची सार्थ जाणीव त्याला झाल्याचे त्याच्या देहबोलीत स्पष्ट दिसत होते . पण पुनीतला त्याची काहीच कल्पना नव्हती.

केक कापून झाल्यावर आणि स्नॅक्स चहा झाल्यानंतर पुन्हा कृतज्ञता व्यक्त करून रॉयने शहाणपणाने रजा घेतली. या माणसासमोर आपली बडबड निरर्थक तर ठरेलच पण तिचा भलताच निगेटिव्ह प्रभाव पडेल हे त्याला जाणवलेले होते.

मात्र दारातून निघताना त्याने एकदाच मागे वळून रिनाकडे अबोलपणे पाहिले. बरेच काही होते त्या नजरेत! त्याला वाटू लागले होते की रिनाला त्याच्या आणि नानीच्या दिवसभर तेथे राहण्यात नव्हे तर या माणसाच्या येण्यात खरा इन्टरेस्ट होता. आपण वेडेपणाच केला आज! कदाचित तिचे या माणसाबरोबर ठरलेलेही असेल! आणि ..... त्याच्यासमोर आपण ... आपण म्हणजे काय! जस्ट नथ्थिंग!

लाजर्‍या स्वभावाच्या पुनीतने नेहमीप्रमाणे सर्व डिश संपवली तेव्हा त्याने न मागताच आल्याचा चहा त्याच्यापुढे आला.

"मिस्टर पुनीत... प्लीज... मला अशा गिफ्ट्स का देता तुम्ही????"

खूप खूप धाडस करून पुनीतने जमीनीकडे बघत ते वाक्य टाकले...

"अ‍ॅक्च्युअली... रिनाजी.... आय डोन्ट नो... आय मीन... बट... आय मीन.. कॅन आय... कॅन आय प्रपोझ यू??"

केवढा फरक होता दोन्ही प्रपोझल्समध्ये???

एक होते निरागस मत्री आणि खळाळत्या उत्साहातून आलेले निखळ प्रेमाचे पपोझल!

दुसरे होते अत्यंत भारदस्त, उंची तरीही लाजरेबुजरे आणि स्त्रीचा पूर्ण सन्मान ठेवून केलेले प्रपोझल!

आणि रिनाला ही दोन्ही प्रपोझल्स अत्यंत आकस्मिकरीत्या ऐकायला मिळाली होती.

एका प्रश्नामुळे हृदयाचा बर्फ झालेला असताना दुसर्‍या प्रश्नामुळे बर्फाचे पाणीपाणी झाले होते.

यातील काही विशिष्ट तिला हवे होतेच असे मुळीच नाही. पण नकोच होते असेही नाही. पण विचार करायला तरी वेळ पाहिजे ना!

वेडी नव्हती रिना! लग्न एकदा केलेले होते तिने! पुन्हा त्यावर विचार करताना हज्जार प्रकारे विचार करणार होती ती!

अबोल होऊन पुनीत निघून गेला. हो नाही की नाही नाही! काय समजायचे हेच माहीत नसल्याने तो नुसताच अपराधी वाटून निघूण गेला.

त्याला टेरेसमधून हात करताना रिनाने पाहिले. शेजारच्या टेरेसमधून उदास नजरेने रॉय पुनीतच्या उंची मर्सिडिझकडे बघत होता.

पुनीतही निघून गेल्यानंतर भण्ण मनस्थितीत ती लाल साडी आणि ती सोन्याची रिंग या दोन्ही गिफ्ट्सकडे खिन्नपणे कितीतरी वेळ बघतच बसली रिना!

सगळेच संपलेले होते. एक चांगला शेजार आणि मित्र एक तर सासर तरी होणार किंवा कायमचे दुरावणार तरी! एक साम्राज्य आपल्याला राणीतरी म्हणणार किंवा अबोलपणे वाट तरी बघत बसणार!

आणि मी कोण? मला काय हवे आहे? काय बघितले दोघांनी माझ्यात्? हे शरीर? जे गोरेपान नसते तर कदाचित नसतेही प्रपोझ केले कोणीच?????

जी नाती जशी आहेत तशीच ठेवायला काय हरकत आहे? त्यातील एकच मिळेल आणि दुसरे दुरावेल असेच पर्याय का समोर आले आहेत?

मला माझे आयुष्य कोठे न्यायचे आहे?

श्रीमंत राणीपदाकडे की धबधब्यासारख्या कोसळत्या आनंदाकडे? परिपक्वतेकडे की अल्लडतेकडे? मुळात मला हे प्रश्न पडावेतच का???????

उघडेच असलेल्या दारात पुन्हा चाहुल लागली तसे तिकडे बघायचेही कष्ट घेतले नाहीत रिनाने!

रॉयच आलेला असणार!

त्याला आत्ताच उत्तर हवे असणार! आपण वेळ् मागणार! त्याची तडफड होणार! तिकडून पुनीतचा एसेमेस येणार! त्याची तडफड होणार!

दाराकडे पाठ फिरवून रिना टेरेसमध्ये जाऊन उभी राहिली.

मागून कुजबुजता आवाज आला.

"मी पूर्ण बरा झालो आहे... ही बघ त्यावेळेसच मिळालेली मेडिकल सर्टिफिकेट्स.. पण मला कोणी कामावर घेत नाही...भाडे थकल्यावर मला हाकलून दिले मालकांनी आपल्या उन्या घरातून... . तुला मारायचो म्हणून हे मी मला चटके लावून घेतले आहेत... खूप शिक्षा घेतली आहे... आई वारली.... तुझ्या पाया पडतो... नाक घासतो.... हवे तर ... पुन्हा माझ्याकडे कधी बघूही नकोस ... पण... मला काही वाटले तर... मी तुला नुसता भेटायला आलो तर चालेल का रिनू??? आज तुझा वाढदिवस आहे म्हणून.... हे एक फूल विकत घेता आलं तेवढं आणलंय.... मला.... म्हणजे.. जातो मी लगेच... पण...थ.. थोडं खायला देतेस का गं???? काहीच नाहीये माझ्याकडे आता...., देतेस???? "

आजच्या दिवसातले सर्वात चांगले प्रपोझल! दोन्ही हात फैलावून तिने मायेने रवीला जवळ घेतले. अश्रूंचे पाट वाहिले दोघांच्या डोळ्यांमधून!

दुसर्‍या दिवशीची सकाळ रवीच्याच मिठीत झाली रिनाची!

============================================

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

छान कथा, आवडली......
अगदी हसत खेळत कथा संपली.....
कथेचा शेवट बरोबर केलात.
त्या दोघांनी नाराज व्हायचे कारणच नाही.

mast...

मोहन कि मीरा,

हा सर्व विचार लेखकाने आगोदरच्या संदेशात मांडला आहे. मी केवळ त्याचा विस्तार केला. Happy

तुमचं बाकीचं म्हणणंही बरोबर आहे. मी केवळ पुढे काय घडू शकेल याची झलक दाखवली. विचारबिचार वगैरे लिहून दाखवायचं म्हणून केला.

आ.न.,
-गा.पै.

अहो एक कथाय ही Proud (दिवा) >>> Lol किती गुंतलेत सगळे तुमच्या कथेत! इतकी समरसून चर्चा करतायत की तुम्हाला हे असे सांगावे लागतेय... Happy

सानी Happy

छान कथा...शेवट थोडा अनपेक्षित पण हॄदयस्पर्शी Happy . महागातली साडी कि॑वा सोन्याच्या रिन्ग पेक्षा निरागस मनाने आणलेल॑ साध॑ फुल रिनाला नक्कीच आवडल॑ असेल...आयुष्यातला प्रत्येक निर्णय Practical असु शकत नाही, प्रत्येकाच्या मनात भावना॑ना थोड॑फार स्थान असतच. त्यानुसार तिने रवीचा स्विकार केला...पटल॑

शेवत अज्जिब्बात नाही आवडला. मानसिक रुग्ण कायमचे कधीच बरे होत नसतात आणि मानसिक रुग्णाची बायको म्हणून राहण्यापेक्षा त्याच टेरेसवरून उडी मारून जीव दिलेला चांगला. अर्थात हे माझे मत आहे.

दोन सकारात्मक गोष्टींमधून निवड करायची असली, तरीही ती अवघडच होती. त्यातून एका बाजूने का होईना, दु:खच पदरी पडलं असतं, त्यामुळे नायिका काय निर्णय घ्यावा या संभ्रमातच होती.

>> आणि आपणही संभ्रमातच होतो कि..

Pages