एका लग्नाची............ (१)

Submitted by सु_हा_स on 26 December, 2011 - 05:31

सत्यकथेवर आधारित, काही पात्रांची नावे बदलली आहेत , भाषा संयत करण्याचा प्रयत्न केला आहे, पण आक्षेपार्ह आढळल्यास क्षमस्व !

कोणे एके काळी, जेव्हा लग्न - संस्थेला ' लव्ह मॅरेज' मान्य नव्हते ....

" राक्याSSS, ती जेलरची पोरगी आहे "
" मुख्य तरुंगाधिकारी !! "
" हा येडा झालाय ! "
" चढलीय भें** ला ! "
" माझी तर उतरलीच, अजुन क्वार्टर मागव ! "

पार्टी ऐन रंगात आली होती, आणी राक्या ने प्रस्ताव टाकला की सुमति ला पळवायची !! सुमति !! साक्षात सुमति !! मति भंग झाली राक्याची, साक्षात जेलरची (पुन्हा एकदा, साक्षात मुख्य तरुंगाधिकार्‍याची ) पोरगी पळवायची ?? पार्टीत बसलेल्यांच्या कर्णपटलांना धक्काच बसला.पण त्यातल्या त्यात पाच-सहा जण राक्याचाच अंदाज घेत होते. चार-पाच चाप्टर केस लागलेला तिकडम-बाज परव्या, लहान वयात भाईगिरीत फॉर्म ला आलेला बाळ्या, एल.एल.बी च्या पहिल्या वर्षाला असलेला अभ्यासु प्रमोद, कडक बोलबच्चन टाकणारा रिक्षा ड्रायव्हर टिन्या, पण बोलले कोणीच नाही.

एकुण राक्या बर्‍यापैंकी शांत आणि होतकरु तरूण, एम्.कॉम ला फर्स्ट क्लास घेतले.त्यानंतर अ‍ॅम्युनिशन फॅक्टरी च्या परीक्षा पास झाला, आणि क्लेरिकल ला जॉईन झाला! त्याला आज सगळ्यांनी याच कारणासाठी , चढ्वुन, पार्टी ला कापला होता. एक पेग च्या वर मजल जात नाही लेकाची ! अश्या तरुणाची ,त्या मजबुत बांध्याच्या (पक्षी: वेट-लिफ्टर) तरुणीशी साधी ओळख असण्याचे ही कारण नव्हते. पण खरे होते, राक्या अ‍ॅन्ड सुमति वॉज ईन लव्ह !!

" राक्या, चोरुन प्रेम वगैरै ठीक आहे रे ! पण पळवुन लग्न ?? "
" लेक्या , पोलीस टायर मध्ये घालुन मारणार नाहीत, आख्खा टायर आपल्या *** सारतील ? "
" राक्या बॉस, अप्पुन है तेरे साथ ! "

हा नक्की 'बोक्या राजा' असणार म्हणुन बाळ्याने त्या दिशेला पाहिले, पार्टीत जवळपास १० ते १२ जण होते. पण अश्या वेळी (पिल्यावर व पिलेल्या) दोस्तांना साथ देणारा (आणि नंतर पलायन करणारा) आवाज नक्की त्याच्याच असतो.( या बोक्या राजाची गिनीस बुकात नोंद होण्याजोगती अजब स्टोरी आहे, त्याच्या बापाला कुत्रा चावलाय, मोठ्या भावाला डुक्कर, धाकट्या भावाला उंदीर आणि खुद्द राजाचा बोक्याने चावा घेतला आहे ! त्यात या महाभागाचे आडनाव चावरे आहे, येव्हढेच नव्हे, हे बेण हनिमुन ला महाबळेश्वर ला गेल तर तिथे ह्याच्या बायकोला माकड चावलं...असो..हा बोक्या आणि असे बरेच गुणी पात्र नागपुरचाळीत आहेत, त्यांच्याविषयी पुन्हा कधीतरी !! ) तर.. त्या पार्टीत १०-१२ जण होते. पण त्याला सिरियसली कोणी घेतले नाही.

१५ ऑगस्ट चा तो दिवस !! प्रमुख पाहुणे म्हणुन नागपुरचाळीतल्या झेंडा-वंदना ला जेलर साहेबांना आमंत्रित केले होते. 'येरवडा जेल' चे सारे कार्यक्रम आटोपुन ' जेलर आहेबांनी जेव्हा नागपुरचाळीत प्रवेश केला तेव्हा त्यांना सारेच बघत राहिले. आकडेबाज मिश्या, गोरा रंग, एखादा उंच आडवा-तिडवा पैलवान दिसावा तशी अंगकाठी, चेहर्‍यावर हास्य वगैरै नावाचा प्रकार नाही, चेहर्‍यावर एक-दम दगडी भाव !! आणि त्याला सोबत घोगरा आवाज, भाषणामध्ये त्याच घोगर्‍या आवाजात त्यांनी युवकांना मार्गदर्शन केले. (पोडियम शेजारी बसलेली त्यांची कन्यका आणि पहिल्या रांगेत बसलेला राक्या यांना वेगळेच 'मार्ग' आणी 'दर्शन' झाले हा भाग वेगळा !)

जेलर साहेबांच्या घरी दररोज फुले/माळा घेवुन जाणारी (सार्‍या नागपुरचाळीची) सुगंधा मामी, राक्याच्या कामी आली. चिठ्ठ्या - चपाट्या सुरु झाल्या आणि ..........असो त्यानंतर चार वर्षे चालु होते.....पण पळवुन लग्न ?? पण त्याला कारण ही तसे च घडले होते. एक दिवस राक्याला संध्याकाळी आठ च्या सुमारास चिठ्ठी आली. " सकाळी पाच वाजता परेड ग्राऊंड वर ये " सकाळी पाच वाजता ??? राक्या फुट टु टेन्शन मध्ये आला. नेमक काय घडलं ? घरी कळाले की काय ? त्याच्याबरोबर असलेल्या बाळ्या तर रात्रभर एका मागोमाग सिगरेट मारत होता.

पहाट झाली , नागपुरचाळीतली काही पोर पोरं परेड ग्राऊंड च्या भिंतीच्या मागे दोन व्हॅन घेवुन तयारीत उभे! राक्या भिंतीवरुन उडी मारुन ग्राऊंडवर गेला, धाक-धुक ! धाक धुक !! अर्धा तास झाला तरी पत्ता नाही, सरते शेवटी एकाने जावुन बघीतले तर हे दोघे ( जितेंद्र - हेमामालिनी स्साले ! ) ग्राउंडवर जॉगिंग करत होते. परतल्यावर विचारल तर म्हणे ती राक्याला म्हणाली मी ' जॉगिंग ' ला जाते, तु पण येत जा !! च्यायला !!! याची जॉगिंग आणि पोरांची जागिंग !! आणि एक दिवस जॉगिंग ला तिच्या बरोबर दोन हवालदार यायला लागले. राक्या ला चिठ्ठी आली " घरी कळाले आहे " काय करायचे त्याचा लवकर निर्णय घे. त्यामुळे राक्याचे प्रकरण सिरियस झाले होते. आणि त्याच मुळे सहसा साध्या भांडणा-तंट्यात न पडणारा राक्या येव्हढी मोठी डेयरिंग करायला तयार झाला.

पार्टीच्या दोन-एक दिवसांनी राक्याने, अभिजीत हॉटेलवर (बरेच मोठे कट शिजण्याची आणि शिजवणारर्‍यांची खास बैठक) परव्याला पकडला. परव्या ला अश्या गोष्टीं ची पहिल्यापासुन महा प्रचंड आवड !! त्याच्या डोक्यात राक्याच्या लग्नाची गेम वाजवायचा पिलान शिजत होता, पण तो संपुर्ण(पक्षी : फुलप्रुप नव्हता, एल्.एल्.बी. पम्या शिवाय ते शक्य नव्हते, पळवायच होतं पण कायद्याने, कायद्याच्या चौकटीत ! राक्या सरकारी नोकरी ला लागला होता आणि त्या नोकरीची रिस्क घ्यायला परव्याच मन मानत नव्हत. तेव्हढ्यात चौकातुन बाळ्या अभिजीत मध्ये शिरला. परव्या ने त्याला बोलावुन घेतले, थोड्या चर्चेनंतर प्लान बाळ्याच्या पण डोक्यात बसला. प्रश्न होता पम्याचा ! पम्याच पहिल्यापासुन " क्लॅरिटी ऑफ थॉट्स " ! एखादा विचार पसंत आणि पदरी पडला तर त्याच्या सारख त्या विचारावंर काम करणार नागपुरचाळीत कोणीच नव्हतं. पण त्या मांजरीच्या गळ्यात घंटा कोण बाधणार. सरते शेवटी बोल बच्चन टिन्या च नाव निघाल. पण त्या आधी टिन्या ला तयार करण्यासाठी,त्या दिवशी संध्याकाळी परव्या टिन्या ला घेवुन बसणार होता.......

क्रमश ..

गुलमोहर: 
शब्दखुणा: