मी आणि आमची गाडी

Submitted by कवठीचाफा on 23 December, 2011 - 07:14

"आहो, आज चार दिवस झाले, निदान आजतरी गाडी बाहेर काढाल की नाही?" एव्हाना चैत्राचा पारा थर्मामीटर फोडायच्या प्रयत्नात होता.
हा असा त्रागा गेले पंधरा दिवस माझ्या मागे चालू होता. म्हणजे गाडी घेतली त्या दिवसापासून. तो कुठला अशुभदिन होता कुणास ठाऊक हिच्या आग्रहाला बळी पडून मी नवीकोरी इंडीका घरी आणली.
गाडी घरी आणली खरी पण इथे ड्रायव्हिंग येत कुणाला होतं!
ड्रायव्हर ठेवणं हे माझ्या आवाक्याबाहेरचं आणि एकदा गाडी घरी सोडायला म्हणून आलेल्या मित्राला रोज रोज कसला हैराण करणार? मग गाडी तशीच पार्किंग मध्ये पडून होती. आता दारात सडत पडलेल्या गाडीचे हप्ते भरत बसण्यापेक्षा ती चालवायला शिकणे केव्हाही फायद्याचे होतं. त्यात चैत्राचा आज भडका उडालेला हिला इंडीका चालवणे म्हणजे सायकल चालवण्याइतकं सोपं वाटतं. अरे इथे स्कूटर चालवताना शेवटचा गियर टाकताना माझी मारामार असते वळताना इंडिकेटर बरोबरच हात दाखवत आणि शक्य असेल तर तोंडाने शुक शुक करत गाडी चालवणारा माणूस मी, तिला तर स्टेपनीसकट तीन चाकं असतात इथे आख्खी चार चाकांची असली भलीमोठी गाडी चालवायची तर मनाची तयारी करायला नको?
गेले पंधरा दिवस मी तेच करतोय पण हिला उगीच वाटतं मी घरात झोपा काढतोय म्हणून. पण आताचं या तिच्या भडक्यामुळे मला गाडी शिकणे एकदम गरजेचं वाटायला लागलं. कारण आता आणखी खारट आणि तिखट जेवण जेवणे मला शक्य नव्हते. जुने आजार पुन्हा बळावायची शक्यता होती आणि तसाही हॉलमधला सोफा मला झोपायला बराच कमी पडतो.
गाडी शिकायची म्हणजे एखाद्या ड्रायव्हिंग स्कूलचे दरवाजे ठोकायला हवे होते, ताबडतोब एका ड्रायव्हिंग स्कूलमध्ये नाव नोंदवून टाकले. आता दुसर्‍या दिवशी सकाळपासून माझे तिथले धडे चालू होणार होते.
सकाळी सकाळी मस्तपैकी तयार होऊन बाहेर पडताना चैत्राने मनापासून मला ओवाळले. मला उगीचच कुठेतरी धारातीर्थी पडायला निघाल्यासारखे वाटायला लागले. एक अनामिक हुरहुर लागली होती अशी मला शाळेच्या पाहिल्या दिवशीही वाटली नसेल. गेल्या गेल्या समोरच्या 'चालक शिकत आहे' अश्या पाट्या असलेल्या गाड्या बघून मला उत्साहाचे उधाण आले पण पाहिल्याच दिवशी रस्त्यावरचे नियम आणि गाडीची माहिती इतकंच पदरात पडलं वर
" उद्या हे सगळे नीट लक्षात ठेवून या " अशी प्रशिक्षकाची धमकी कम विनंती बरोबर होतीच.
घरी आल्या आल्या चैत्राची फर्माइश,
"चला शिकलात ना गाडी, आता पहिल्यांदा गणपतीच्या मंदिरात जाऊन नमस्कार करून येऊयात" आयला गाडी शिकणे म्हणजे काय मॅगी बनवणे आहे? बस पॅकेट खोलो और दो मिनटमे तैयार!, पण चैत्राला या गोष्टी बिलकुल समजून घेता येत नाहीत.
थोडा थोडका नव्हे एक आठवडा उलटला पण आमची गाडी काही रस्त्यावर यायचे नाव काढेना.
आता माझी प्रगती बंद गाडीच्या व्हील समोर बसून डाव्या हाताने गियर बदलण्याची सवय करणे आणि पायांना क्लच, ब्रेक, अ‍ॅक्सिलेटर यांच्या गुंतवळ्यात आपले पाय गाठ बसण्यापासून वाचवणे इतकीच होती. एक हात आणि दोन्ही पाय आपापल्या कामात गर्क असताना उरलेल्या एका हाताला काम कमी पडत असावं म्हणून त्या हाताने ड्रायव्हिंग व्हिल सांभाळण्याचे काम करायला लागत होतं, आणि हा सगळा द्रविडी प्राणायाम बंद गाडीत करताना पाहून सोसायटीतले लोक माझ्याकडे जरा चमत्कारिक नजरेने पाहतात असं माझे निरीक्षण एव्हाना झालं होतं, म्हणून हा कार्यक्रम मी घरात सुरू केला.
खुर्चीसमोर टेबल ठेवून त्यावर ताट ठेवायचे, डाव्या हाताला माझी छत्री, पायाखाली चैत्राच्या शिलाई मशीनचा पॅडलस्विच हा अ‍ॅक्सिलेटर आणि जुन्या सायकलची दोन पॅडल क्लच आणि ब्रेक म्हणून.
आणखी एक आठवडा गेल्यावर माझी आणखी प्रगती झाली म्हणजे मी प्रशिक्षकाच्या शेजारी राहून गियर बदलायला लागलो होतो. आता आत्मविश्वास जरा जीव धरायला लागला होता. अखेर प्रशिक्षकाला शेजारी बसवून गाडी थोडीफार चालवण्या पर्यंत मजल गेली. रोजची चैत्राचा तगादा चालू होताच.
...... एक दिवशी मनाचा हिय्या करून माझी गाडी बाहेर काढायचे ठरवले. चैत्रा एकदम खूश दहा मिनिटात बातमी आख्ख्या सोसायटीत पसरली. दुपारी रहदारी जरा कमी असते म्हणून तोच मुहूर्त निवडला होता. गोल्डमेडल मिरवावं इतक्या आनंदाने गाडीची चावी हातात मिरवत एकदाचा खाली उतरलो, माझ्या पाठोपाठ चैत्रा, बाहेर गाडीजवळ येऊन दरवाजा उघडेपर्यंत चैत्राने वर पाहतं हात हालवायला सुरुवात केली. आता ही कुणाला टाटा करते ? म्हणून मी वर पाहिलं, आई गंऽऽ गंऽऽ !.......... सगळी सोसायटी बाहेर गॅलरीत उभे राहून आमच्याकडे पाहतं होती.
ओठाला कोरड पडणे, पोटात गोळा येणे, धाबे दणाणणे हे आणि असले सगळे लहानपणी शाळेत शिकलेले वाक्प्रचार एकदम अनुभवातच आले. आता या टेहळणी पथकासमोरून गाडी बाहेर काढायची म्हणजे उद्याच्या चर्चेला एक नवा विषय पुरवण्यासारखं होतं.
कोरड्या पडलेल्या ओठावरून जीभ फिरवतं एकदाचा गाडीत दाखल झालो, पलीकडच्या दरवाज्याने चैत्रा आत येऊन मी तिच्यासाठी दरवाजा उघडून धरला नाही म्हणून कुरकुरत होती पण माझ्या छातीच्या धडधडीमधुन मला ते ऐकू येत नव्हते. कशीबशी थरथर लपवत मी किल्ली फिरवून इंजिन चालू केलं,पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आला गाडी बाहेर काढायची म्हणजे मागे घ्यायला हवी होती म्हणजे रिव्हर्स गियर, तो मला एका हाताने टाकता येईना, इथे चैत्रा आख्ख्या सोसायटीला हात हालवून टाटा करत होती, तीच संधी साधून मनातल्या मनात देवाचे नाव घेत मी दोन्ही हातांनी मिळून रिव्हर्स गियर टाकला.
एकदाची गाडी बाहेर काढली. दुपारची वेळ, रहदारी कमी त्यामुळे सोसायटी ते हाय-वे फारसा काही उपद्व्याप न करता मी जाऊ शकलो पण जशी गाडी हाय-वे ला लागली तशी माझ्या मागे पनवती लागली. एकतर कासवछाप गतीने गाडी चालत असल्याने मागून येणारे गाडीवाले शक्य तितके शिव्या देत होते, म्हणून गाडी अगदी `सर पे कफ़न बाध के' स्टाइल चालवायला सुरुवात केली तर पाहिल्याच ट्रकला ओव्हरटेक करताना गाडीचा मागचा भाग थोडक्यात बचावला, हो, नेहमी स्कूटर चालवायची सवय, मागे इतकी मोठी गाडी शिल्लक राहते हे लक्षात राहिलंच नाही मग त्या ट्रकवाल्या कडून आपल्या अपशब्दांच्या माहितीत भर घालत पुढे निघालो.
जोपर्यंत एकाच बाजूने गाड्या जात होत्या तोपर्यंत ठीक होतं पण आता समोरून ट्रक, टॅंकर असले महाभाग युद्धात हत्ती चालून यावे तसे चाल करून यायला लागले आणि थोड्यावेळातच माझी अवस्था चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यू सारखी झाली. गाडी पुन्हा मागे वळवायचा प्रयत्न केला तर समोर पोलीस कर कटेवर ठेउनीया उभा ठाकला. मी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं जाण्याचा प्रयत्न करतोय हे बहुदा त्याला रुचलं नसावं, त्याच्या नावाने दोनशे रुपयांचा प्रसाद चढवून एकदाचा परतीच्या प्रवासाला लागलो.
एव्हाना गाडीतल्या ए.सी. ची हवा गरम व्हायला लागली असावी कारण मी पार पाया पासून ते कळसा पर्यंत घामाने भिजलो. एव्हढ्यात शेजारून एका दुचाकीवरून दोन सुंदर अशी प्रेक्षणीय स्थळं गेली जाता जाता त्यांनी माझ्याकडे इतक्या दयाद्र वगैरे नजरेने पाहिलं की मलाच मी आपले स्थायुरुप सोडून द्रवरूपात परिवर्तित होत असल्याचा भास झाला. निदान उरलेली लाज तरी राखावी म्हणून गाडीच्या अ‍ॅक्सिलेटरवरचा पाय जरा जोऽऽरात दाबला. थोडावेळ अशीच हरणाच्या गतीने धाव घेतल्यावर मला एकंदरीत बरं वाटायला लागलं, पण हायSS त्या नादात समोरच्या फुटपाथ जवळच्या पाणीपुरीच्या ठेल्याकडे दुर्लक्ष झालंच, हातातले सुकाणू शक्य तितक्या वेगात उलट्या दिशेला फिरवताना तेहतीस कोटीमधले अर्धे तरी देव मला आठवले. एखादा हूड मुलगा सरळ मार्गाला लागावा तसा मी पुन्हा कासवछापवर आलो.
आता हाय-वे संपून सोसायटीच्या रस्त्याला गाडी लागली त्यामुळे छातीतून कंठापर्यंत आलेले काळीज जरा आपल्या जागी परत जायची तयारी करायला लागले आणि तेवढ्यात इतकावेळ गप्प बसलेली चैत्रा जोऽऽरात किंचाळली "आहो, कुत्रा" आता या शब्दांचे अर्थ कळेपर्यंत गाडी त्या कुत्र्याच्या भेटीला धावली आता पुन्हा एकदा सुकाणू गरगरा फिरवण्यासाठी जोर लावला, गाडी वळली खरी पण आता तिने समोरच्या भल्यामोठ्या झाडाकडे मोहरा वळवला अशावेळी शक्य होती तीच हालचाल मी केली दोन्ही पाय शक्य तेवढे ताणत ब्रेक लावला,

जाग आली तेंव्हा आजूबाजूच्या पसरलेल्या तीव्र वासाने "मै कहा हूं" असला काही प्रश्न न पडता आपण हॉस्पिटलात आहोत हे आपसूकच कळले. आणि इथे कसा आलो त्याची अंधुक आठवण मनात होतीच आता करकच्चुन दाबलेल्या दोन्ही पायांपैकी एक पाय अ‍ॅक्सिलरेटरवर आणी दुसरा चैत्राच्या पायावर दाबल्यावर दुसरे काय होणार होते?

आता दोन महिन्यांनी माझ्या हाताचे प्लॅस्टर निघालेय, मोडलेला घोटा पुन्हा दुरुस्त झालाय, आणि चैत्रा?? तिच्या पडलेल्या पुढच्या चार दातांच्या जागी नकली दातांची स्थापना झालीये.
पण एक बरं झालंय की त्या नकली दातांच्या प्रदर्शनात ती इतकी गुंग झाली आहे की आता गॅरेजला सडत पडलेल्या माझ्या गाडीची तिला मुळीच आठवण येत नाही. हे एक बाकी तिच्या बाबतीत बरं आहे एखादी नवीन वस्तू मग ते दात का असेनात त्यांचे तिला फार कौतुक, त्यामुळे माझ्या मोडक्या हातासकट मी आणि गॅरेजमध्ये पडलेली गाडी दोघेही सुखी आहोत.

गुलमोहर: 

Happy छान लिहिलंय कवठीचाफा....
मी पण तुमच्याच कॅटेगिरीतली.... मी गाडी चालवताना सगळी जगदुनिया मध्ये मध्ये येते असं वाटतं

छान! Happy

"आहो, कुत्रा" आता या शब्दांचे अर्थ कळेपर्यंत गाडी त्या कुत्र्याच्या भेटीला धावली >>>>"आहो,त्या कुत्र्याच काय झाल"?
छान आहे.

Lol भारी

NFS >>>:)

धन्यवाद सर्वांनाच आणि .....
माफ करा वाचक जन Happy ही नवीन कथा नाही पुर्वी एकदा प्रकाशीत झालेली होती मुळ कथा http://www.google.com/url?q=http://www.maayboli.com/node/396&sa=U&ei=Z7v... इथे आहे Happy
बहुदा माबो वरचं हे माझं दुसरं लेखन होतं

कवठी चाफा मस्तच
माझा पण असाच अनुभव आहे ड्रायव्हिंग शिकण्याचा फक्त मी माझी म्हणजे आमची म्हणजे माझा परमपूज्य पिताजींची गाडी अजून तरी कुठे धडकवली नाहीये.
आणि सोसायटीतले लोक तर आसे काही बघत असतात जणू काय मायकल शूमाकर चा बाप गाडी चालवतो तमाम जनता आपण गाडीत बसलो कि धावत ग्यालरीत येऊन थांबतात. Lol
यांनी तर अजून टेन्शन येत. त्यावर जालीम उपाय म्हणजे काचा खाली करणे आणि मुझिक सिस्टीम जोरात चालू करून त्यावर कोंबडी पळाली(चिकनी चमेली ) सारखी गाणी लावणे. आस काही घाण कटाक्ष मिळतो कि वाह क्या बात हे.
आणि तमाम पब्लिक घरात आणि आपण टेन्शन फ्री???
Proud

पुन्हा एकदा धन्यवाद दोस्तकंपनी Happy

मंदार, भावना पोहोचल्या Happy पण वर दिलेल्या माझ्या प्रतीसादातली लिंक पहा Happy

Pages