सेन्सॉरचा नवा फंडा!

Submitted by मधुरा आपटे on 23 December, 2011 - 02:39

'कोंबडी पळाली' ह्या गाण्याचं हिंदीत रुपांतर झालयं हे पाहून खरचं खूप बरं वाटलं.अजय-अतुल ह्यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं आज बॉलीवूड मध्ये चिकनी चमेली ह्या गाण्याने प्रसिद्ध होतयं पण.....

हल्ली आयटम साँग्जची लाट आलीच आहे.संपूर्ण पिक्चरमध्ये एकही आयटम साँग नसेल तर तो पिक्चर म्हणजे 'अळणी' असचं चित्र सध्या दिसतयं.पण विचार करायला लावणार्‍या आणि बरोबरच मनाला खाणार्‍या गोष्टी घडतायेत एवढं मात्र खरं.सध्याचच उदाहरण घेऊया! चिकनी चमेली च्या व्हिडिओज अगदी न्युज चॅनल्सपासुन ते फेसबूक पर्यंत सगळीकडेच दाखवल्या जातायेत,हिट होतायेत,१०० लोकांचे लाइक्स येतायेत,त्यामुळे हे गाणं कोंबडी.. सारखच हिट होणार ह्यात शंकाच नाही,त्यातही कतरिना अगदी चवीने बघावं अशीच नाचल्यामुळे ते गाणं वाजणारचं.पण इथे एक गोष्ट मात्र स्पष्ट केली पाहिजे की जेव्हा तिने पेटवलेल्या काडीने ती तिच्या बरोबर नाचणार्‍या आर्टीस्टच्या तोंडातली विडी शिलगावते हा भाग एकदम 'ब्लर' करुन दाखवलाय.वा! केवढा हा सुज्ञपणा! प्रशंसाच करायला हवी ह्याची.ती विडी दिसायला नको(ती विडी आहे हे कळत असुनही) म्हणून ब्लर करण्याची काढलेली शक्कल वाखाणण्याजोगी आहे.कारण हे गाणं लहानांनपासुन ते थोरांपर्यत सगळेच बघणार त्यामुळे त्याचा परिणाम व्यसनाच्या रुपात व्हायला नको म्हणून घेतलेली ही खबरदारी असावी! मस्तच!

खर्‍या प्रश्नाची सुरुवात मात्र इथपासूनच होते,ती शिलगावलेली विडीची कृती मात्र ते व्यसन आहे,ह्या नावाखाली ब्लर करायची आणि ती शिलगावण्यासाठी काडी जिथून पेटवली गेली तो भाग मात्र उघड्या डोळ्यांनी पहायचा! वा! विडीची काळजी घेतली गेली पण त्या नाचणार्‍या कतरिनाचं काय? त्यात संजूबाबा ने खास आपल्या शैलीत दिलेल्या एक्सप्रेशन्स चं काय? ब्लर करायचा झाला तर जवळ जवळ सगळं गाणचं ब्लर करावं लागेल.

सेन्सॉर ह्याच्यावर कात्री लावत नाहीत तर तुमचं कुठे घेऊन बसलात? असं म्हणणारे महाभागही आहेत.पण मग स्त्री कडे पहाण्याच्या दृष्टीचा तुम्ही धडा देताय असच म्हणावं लागेल.चिकनी चमेली हे उदाहरण झालं पण त्याआधीचे सगळेच आयटम साँग म्हणायला गेले तर ह्याच माळेत बसणारे मणी!

संस्कृती ह्या नावाखाली अश्या बुरसटलेल्या विचारांना खतपाणी घालतोय असं अजिबात नाही.पण विभत्स नजरांचा-कपड्यांचा आणि स्वतःच्या अंगावर शहारा आणेल असा डान्स किंवा शृंगार नक्कीच अपेक्षित नाही.स्वतःच्या मुलाला (हल्ली मुलीही मागे नाहीत) गणपती मिरवणूकीत किंवा लग्नात फक्त नाचताना किंवा बाकीच्या मुलाचं अनुकरण करताना बघा आपलाच आपल्याला अर्थबोध होतो. प्रश्न फक्त असा आहे की विडी शिलगावताना दाखवली नाहीत पण शिलगावण्याच्या आधीच्या प्रोसेस पर्यंतच सगळं काही दाखवलत!विडी दाखवली तर मुलं त्याच्या आहारि जातील आणि उन्मत्त डान्स दाखवला तर मात्र बिघडणार नाहीत.
मर्डर,डर्टी पिक्चर ,नि:शब्द अश्या सारख्या पिक्चरना 'ए' 'यु' असं संबोधलं की झालं.पूढे आई-बाबा आणि त्यांच्या मुलांनी ठरवावं काय करायचं ते अश्याच सेन्सॉर बोर्डाच्या भुमिका! पावलं आता आपल्यालाच उचलावी लागणार! आधुनिक पिढी म्हणता म्हणता बरीच मोकळीक मिळाली आणि त्यामुळे बरच काही गमावून बसलोय आम्ही.समथिंग इज पझलिंग! पण आत्ताची पिढी म्हणता म्हणता हे पटत नाही असं म्हणणारे असतील तर आशेला बराच वाव आहे असं म्हणायला हरकत नाही.

गुलमोहर: 

मधुरा,
अगदी माझ्या मनातलं लिहिले आहे.
मूळात या नर्तिकांना नाचाचे अंग नाही. त्यामूळे अत्यंत प्रक्षोभक हालचाली आणि हावभाव केल्याशिवाय त्यांचे निभत नाही.

अजून पाहण्यात नाही आलं गाणं.. लेखाशी सहमत आहे. हल्ली काय वाईट आणि काय चांगलं हे कुणी ठरवायचं हेच समजेनासं झालंय. नापसंती दाखवावी तर बुरसटलेपणाचे शिक्के तयारच आहेत

लेखाशी शंभरटक्के सहमत, चित्रपटातल्या शिव्या म्यूट करतात, पण ओठांच्या हालचालींमुळे त्या प्रेक्षकांपर्यंत व्यवस्थित पोहोचतात.
आजकाल लोकांना स्लँग लँग्वेज, अंगप्रदर्शन, उत्तानपणा यात प्रचंड रस असतो. आय मिन त्याप्रकारचा प्रेक्षकवर्ग जास्त आहे.
अगदी आजकालचं उदा. म्हणजे तो डर्टी सिनेमा निव्वळ विद्याने केलेल्या उत्तान दृश्य आणि नृत्यामुळे प्रदर्शित होण्या अगोदरच खूप गाजला.. Sad आम्ही पण वेगळे नाही. त्याच जाहीरातीला बळी पडून आम्ही ही पहायला गेलो होतो. जेणेकरून चित्रपट गर्दी खेचेल, अशाच गोष्टी ठळक दाखवल्या जातात. सिल्क स्मिता काय २४ तास अंगप्रदर्शनच करत होती? का दारूच पित होती? Angry मी वाचल्याप्रमाणे ती देवभक्त सुद्धा होती, आणि तिच्या घरी एक छोटं मंदिर ही होतं. पण उद्या ती अशी पूजा बिजा करताना दाखवली तर चित्रपट बॉक्स ऑफिसवर मार खाईल म्हणून तिचे निव्वळ कमी कपड्यातले नाच, दारू पिणं इ. दाखवलंय ठळकपणे. Sad

उबग आणि कंटाळा येईपर्यंत असली फालतूगिरी सुरु असते. सेन्सॉर बोर्ड फक्त नावालाच राहिला आहे. दक्षिणाला अनुमोदन.

पटला लेख! गाणही पाहिलय.
>>>नापसंती दाखवावी तर बुरसटलेपणाचे शिक्के तयारच आहेत>>> १००%

>>>नापसंती दाखवावी तर बुरसटलेपणाचे शिक्के तयारच आहेत>>> १००%

+१

आधुनिकता म्हणजेच स्वैराचार हे अत्यंत चुकीचं समीकरण रुढ होऊ पाहतंय......नव्हे झालंय.

नुसता बुरसटलेपणाच नाही, तर समाजातले वास्तव, प्राचीन भारतीय संस्कृतीतला मोकळेपणा, कलाकाराचे स्वातंत्र्य, रसिकता, तूम्हाला कलेतलं काय कळतं, विषयाची गरज, प्रेक्षकांची मागणी, मार्केटींग साठी करावेच लागते, इंग्लीश सिनेमातलं कसं चालतं..... यंव नी त्यंव.... असे पण शिक्के बसणारैत.
तैयार रहा.

दक्षिणा अनुमोदन. मी डर्टी पिक्चर बघूच नाही शकले अर्ध्यातून परत आले. उगीच उत्तान व व्हल्गर आहे. मुक्त स्त्री म्हणजे उगीच उत्तान चित्रण असे काहीतरी चुकीचे समीकरण आहे. कत्रिना कैफला तर कोणी मोठे सांगणारे नाही असे माझे मत आहे. सिंग इज किंग मध्ये पण उगीचच फार विचित्र साडी नेसली होती, ते चमेली तर बघवतच नाही. लोकांच्या मनात असल्या अ‍ॅक्षन्स बघून काय विचार येत नसेल हे तिला कळत नसेल का? काहीही असेल पण ही कला नक्की नाही.

लेख पटला.
सरसकट ए किंवा यु ऐवजी बदलत्या काळानुसार इथे अमेरिकेत आहे तशा अजून श्रेणी निर्माण करा म्हणून प्रेक्षकांनीच मागणी केली पाहिजे. इथे टिव्हीच्या कार्यक्रमातही श्रेणी असते. बरेचदा बातम्यातही आधीच फोटो/विडिओ ग्राफिक आहेत वगैरे सुचना देतात.
इथे G,PG,PG13,R, X वगैरे सिनेमासाठी आणि टिव्हीसाठी TV Y, TV Y7, TV Y FV, TV G,TV PG,TV 14, TV M या श्रेणी आणि D,L,S,V असे कंटेंट लेबल येते. लेबल बघून पालकांना आधिच निर्णय घेता येतो.

सिगारेटच्या दृष्यांवरची ही सिलेक्टीव्ह बंदी अत्यंत अयोग्य आहे. अंबुमणी रामदास आरोग्यमंत्री झाल्यानंतर हे सिनेमातल्या बिडी-सिगरेटच्या मागे लागणे वगैरे प्रकार सुरू झालेत. अतिशय नादान प्रकार आहे हा ! एवढीच जनतेला आरोग्यमुक्त करण्याची हौस असेल, तर सिगरेट-मद्य तयार करण्यावर बंदी घालावी. ते जमणार नाही, कारण महसूल मिळतो.

बाकी बीभत्स, उत्तान वगैरे प्रांतात शिरत नाही. (आम्ही सत्यम शिवम सुंदरम पाहिला आहे. ;))

सगळाच बदल होतोय.. किमान सिनेमा बघायचा कि नाही हे ठरवता येतं.. पण

बदल इतक्या वेगाने होताहेत कि दिग्मूढासारखी अवस्था होतेय. बदलाच्या झंझावातात सगळी जुनी झाडं तोडली जातायेत, उंचच उंच इमारती उभ्या राहताहेत. मी राहत असलेल्या सिंहगड रस्त्याला दुतर्फा दाट झाडी होती, आता तिथं काँक्रीट जंगल झालंय.. बकाल ! त्यावेळी ही झाडं तोडू नका म्हणणा-यांना वेड्यात काढण्यात आलं होतं.

काय काय थोपवायचं ? विकासाला विवेकाची जोड देण्यात कुणाला इंटरेस्ट आहे ? मग अशा विकासातून निर्माण झालेली बांडगुळं काढून टाकायची तरी कुणी ?

हो ना ज्ञानेश!
सिगारेटवर बंदी घातली, तर मग इथे त्यांना सिगारेट लागते नैवेद्य म्हणून!
सगळे हे काँगी मंत्री एक नंबरचे निधर्मांध! हो ना?

नव फंडा वाचायला आले पाहिलं तर जुनाच फंडा आहे !
'हर फिक्र को धुवे मे उडाता चला गया' म्हणणारा देव आनंद, अशोक कुमार च्या अनेक सिगारेटी, झीनत अमान च्या दम मरो दम मधे गांजे, 'पूरब और पश्चिम' मधे सायरा बानुची फकाफक सिगार - सिगारेटी , राम तरी गंगा मैली, सत्यम शिवम सुंदरम , माधुरी सारख्या टॉप अ‍ॅक्ट्रेसेस ने पण 'मै तुम्हारी हूं' सारखी हिडिस गाणी केलीयेत ( यु सर्टिफिकिट सकट) सगळं वर्षानुवर्षे चालत आलय.. आयटेम गर्ल्स कमी कपडे पण ६०-७० काळापासूनच आहे , 'चढती जवानी' मधे अरुणा इराणी पेक्षा कतरिना जास्त कव्हर्ड असेल कदाचित Happy
टी आर पी वाढवु नका जर हे बघायचे नसेल तर..सिनेमा बघु नका, केबल डिसकनेक्ट करा, यु ट्युब वर अशी गाणी पाह नका, आयपॉड वर ऐकुही नका जर खरच अशी गाणी नको असतील तर... जर कुठल्याही कारणानी तुम्ही ऐकत्/बघत असाल तर तुमची मागणी तसा पुरवठा, बघावच लागेल मग :).

दीपांजली, आधी अपवाद असलेल्या गोष्टी आज सर्वसामान्य होऊ पाहताहेत ही मुख्य टोचणी आहे.

>>'हर फिक्र को धुवे मे उडाता चला गया' म्हणणारा देव आनंद, अशोक कुमार च्या अनेक सिगारेटी, झीनत अमान च्या दम मरो दम मधे गांजे, 'पूरब और पश्चिम' मधे सायरा बानुची फकाफक सिगार - सिगारेटी , राम तरी गंगा मैली, सत्यम शिवम सुंदरम , माधुरी सारख्या टॉप अ‍ॅक्ट्रेसेस ने पण 'मै तुम्हारी हूं' सारखी हिडिस गाणी केलीयेत ( यु सर्टिफिकिट सकट) सगळं वर्षानुवर्षे चालत आलय

जेवणात मीठ हवंच, तशीच ही वर दिलेली उदाहरणं आहेत. पण आता मीठ हाच जेवणातला मुख्य पदार्थ आहे असं आजकाल आपल्या मनावर ठसवलं जातंय, हेच चूक आहे.

>>.. आयटेम गर्ल्स कमी कपडे पण ६०-७० काळापासूनच आहे , 'चढती जवानी' मधे अरुणा इराणी पेक्षा कतरिना जास्त कव्हर्ड असेल कदाचित

दोन्हीची तूलना अयोग्य वाटली. कारण हेलन आणि अरुणा इराणी यांच्या कमी कपड्यातला ग्रेसफुलपणा जो होता, त्यापैकी एक-हजारांश सुद्धा कतरिना मधे दिसत नाही. The way you carry yourself is also very important. जे अगदी एखादी सोडली तर आजकालच्या नट्यांना अजिबात जमत नाही. आणि वर म्हटल्याप्रमाणे जे अपवादाने करायचं तेच पुन्हा पुन्हा सातत्याने केलं गेलं तर उबग येणारच. अती तिथे माती.

लेख पटला. दक्षिणा, अश्वीनी मामी आणि मंदार जोशी - अनुमोदन.

खरंच डर्टी पिक्चर अजिबात बघवला नाही. तरीसुद्धा विद्या बालनला नक्की पुरस्कार मिळतील. हे आपलं दुर्देव.

गणेश आचार्यची आचरट कोरिओग्राफी असल्यावर तसंही कोबंडीच्या हिंदि व्हर्जनचं काय होणार होतं. उद्या ह्याच गाण्याला बेस्ट साँग ई. अवॉर्ड्स मिळतील. मुन्नी-शीला आठवतं ना.

ती शिलगावलेली विडीची कृती मात्र ते व्यसन आहे,ह्या नावाखाली ब्लर करायची आणि ती शिलगावण्यासाठी काडी जिथून पेटवली गेली तो भाग मात्र उघड्या डोळ्यांनी पहायचा! <<<< कायदा गाढव आहे तसच सेन्सॉर बोर्ड उल्लू आहे

मंदार....

काहीसे चुकते आहे असे वाटते तुमच्या प्रतिवादात. तुम्ही हेलेन, अरुणा ईराणी (तसेच पद्मा खन्ना, फरियाल इ.इ.) यांची तुलना आजच्या जमान्यातील बाहुल्यांशी ज्यावेळी करता त्यावेळी आजच्यापेक्षा 'त्या' काळातल्या या नृत्यांगनांचे सादरीकरण सौम्य वाटणार हे मान्य (ग्रेसफुलदेखील म्हणू या). पण ६०/७० च्या दशकात त्यावेळेच्या प्रेक्षकांना/पालकांना (ज्यानी आज सत्तरी ओलांडली असेल) ती अदा 'बोल्ड' च वाटली असणार आणि त्यानी त्या त्या वेळेच्या बंटी, चंटी, मंकी, सोनू मोनू आदी आपापल्या बछ्ड्यांनी 'हेलेन, अरूणा एट ऑल' ना पडद्यावर पाहू नये असेच मानले असणार. कालाय: तस्मे नमः च्या उक्तीवर अशी मतेमतांतरे प्रत्ययी उमटत असतातच.

दूरदर्शनच्या जमान्यात सेन्सॉरने 'जॉनी मेरा नाम' दाखविताना टीव्हीवर दाखविताना पद्मा खन्नाचे 'ते' गाणे पूर्णपणे उडविले होते, ज्याचे वैषम्य कुणालाच वाटले नव्हते. आज 'चिकनी चमेली' च्या हवेत जॉनीचे गाणे शाकाहारी वाटेल.

एक जमाना असा होता की, लताने "गोरे गोरे वो बाके छोरे, कभी मेरी गली आया करो" हे गाणे गायल्याबद्दल खेमचंद प्रकाश, नौशाद यांची बोलणी खाल्ली होती. 'तुझ्यावर असली गाणी गायची वेळ यावी ?" या त्यांच्या प्रश्नाला लताने खाली मान घालून मौन राखले होते (हा किस्सा खुद्द लतादिदीनीच सांगितला आहे). हे असे उदाहरण पाहिल्यावर मग आजच्या घडीला आपल्याला 'असे शब्द चालत नव्हते त्यावेळी?" असाच प्रश्न पडेल. राजकपूरच्या आग्रहास्तव 'संगम' मधील 'मै क्या करू राम मुझे बुढ्ढा मिल गया' हे गाणे लताने गाईले खरे पण त्याअगोदर त्या दोघांत आणि एस.जे. मध्ये बराच वितंडवादही झाला होता. लताने हताशपणेच ते गाणे म्हटले आणि त्यानंतर त्यानी देशात व परदेशात शेकडो स्टेज शो केले, पण एकदाही 'क्या करू राम' हे गाणे म्हटले नाही. तसे न करण्यासारखे एवढे काय आहे त्या गाण्यात ? असा प्रश्न आजच्या पिढीतील युवक्/युवतीला पडू शकतो.

वर दक्षिणाने अशा संदर्भातील सद्यस्थिती छान टिपली आहे.

अशोक पाटील

अग्निरेखा नावाचा संजीवकुमार व शारदा यांचा एक १९७३ ला आलेला सिनेमा होता. त्यात सुरेश चटवाल (त्यावेळी तो देखणाही होता आणि त्याचा एअरपोर्ट झालेला नव्हता )हा नायिकेवर रेप करतानाचा सीन होता. त्यात त्याने तिचा हात पिळवटून तो दरवाज्याच्या फळीवर आपटून तिची कांकणे फुटतात , असे दाखवून तिथेच तो शॉट फ्रीज केला होता. या संयत दृश्याने जो जायचा तो मेसेज काही जास्त तमाशा न करता गेलाच होता. दिग्दर्शकाला स्टोरीत रस होता ढोंगीपणात नव्हता...

दिग्दर्शक होते महेश कौल... (भट नव्हे..)

अशोक,
एग्झॅक्ट्ली .. एकदम मान्य.
मंदार,
तुलना २ नट्यंची नाही , पण सरसकट 'कपडे' हा कायदा सेन्सॉर ने लावायचा म्हंटला तर मग्त्या काळा पासून अनेक मुव्हीज येतील कात्रीत !
त्या काळत ते बोल्ड वाटलेच असणार, ते सेन्सॉर कट झाले नाही हा मेन मुद्दा.
हेलन ग्रेसफुल होतीच, पण अरुणा इराणी-बिंदु बायका काही मला ग्रेसफुल वाटत नाहीत, कोण डिगनिफाइड वाटतं कोण नाही , कोणाला काय बोल्ड्-चीप वाटतं कोणाला नाही हे व्यक्तिसापेक्ष आहे पण सेन्सॉर ने तेंव्हाही बोल्ड सीन्स, गाणी, सो कॉल्ड बोल्ड कपडे इ. पास केले.. अताही करतात.
फरक काही झाला असेल तर हिरो एक्स्पोझ फारसे करत नसत्,अता बॉडी कमावलेले हिरो करतात .( असो, त्या 'कोणता हिरो आवदतो' नावाच्या मायबोली वरच्याच पोल वर जाऊन पहा, जॉन अब्राहम ला बच्चन वगैरे अनेक हिरो पेक्षा जास्त व्होट्स आहेत Proud मागणी तसा पुरवठा करतात फिल्लम वाले )

दीपांजली
मागणी तसा पुरवठा का? कारण पुरवठाच इतका केला जातो की त्याचीच मागणी होऊ लागते. असाही प्रकार चालू आहे एकंदरित.

लेख पटला. सेन्सॉर् बोर्ड असा उल्लूपणा करतं कारण त्यांच्यावर बसलेले लोक महाउल्लू असतात. ती बिडी ब्लर करून काय पुण्य कमावले देव जाणे. अर्थात लेखाखाली आलेल्या प्रतिक्रिया वाचून गंमत वाटली. Happy

मायबोलीवरच्याच् कुठल्यातरी एका लेखावर (त्या लेखामधे शिव्याच शिव्या होत्या. गरजूनी शोध घ्यावा) तिथल्या काही प्रतिक्रिया बघितल्यावर आणि इथल्या त्याच लोकाच्या प्रतिक्रिया वाचल्यावर बरीच करमणूक झाली.

डर्टी पिक्चरला अ‍ॅडल्ट सर्टिफिकेट मिळाले होते. त्यामुळे तिथे बालमनावर विपरित परिणाम व्हायची गरज नव्हती. पिक्चर काय आहे याचा सुरूवातीपासूनच जाहीरातीमधे दाखवले गेलेले होते.


अगदी आजकालचं उदा. म्हणजे तो डर्टी सिनेमा निव्वळ विद्याने केलेल्या उत्तान दृश्य आणि नृत्यामुळे प्रदर्शित होण्या अगोदरच खूप गाजला.. आम्ही पण वेगळे नाही. त्याच जाहीरातीला बळी पडून आम्ही ही पहायला गेलो होतो.
या वाक्यातला विरोधाभास जाणवतोय का? चित्रपटामधे उत्तान दृश्य आणि नाच आहेत हे माहित असून तुम्ही बघायला गेला होतात. (त्याबाबतीत कुणाला काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही १८+आहात..) मग अशीच दृश्ये आहेत हा आरडाओरडा कशाला? इन फॅक्ट सिनेमामधे नक्की काय आहे याचा तुम्हाला अंदाज होता. तुमच्या मानसिकतेला पटत नसेल तर तुम्हाला जायचे काहीच कारण नव्हते. सिल्क स्मिताचे पूर्ण आयुष्य तीन तासाच्या सिनेमामधे येणे शक्य नाही, हे कुणीही मान्य करेल. मात्र, त्या दिग्दर्शकाने त्याला काय हवे होते ते चित्रपटात दाखवले. सेन्सॉर बोर्डाने तो पिक्चर (अनेक कटसह) पास केला. असे असताना त्याने अमुक दाखवायला हवे होते किंवा अमुक दाखवले नाही कारण पिक्चर पडेल असे म्हणणे ही गंमतच आहे. याआधी देवपूजा करत असलेल्या सर्वच हिरविणीचे पिक्चर फ्लॉप गेलेत असे काही लॉजिक आहे का यामागे? तसं असेल तर मा संतोषी मा हा सर्वाधिक यशस्वी सिनेमामधे कसा काय आला असेल??

अशोक, तुमची पोस्ट आवडली. काहीकाही गोष्टी कालानुरूप ठरतात. अजून वीस वर्षानंतर कदचित कतरीना काय ग्रेसफुल दिसायची त्यामानाने ज्यु, कतरीना अगदीच व्लल्गर आहे असे आम्हीच म्हणत असू. Happy

बोल्ड सीन्स, गाणी चित्रपट हे मागणी पुरवठ्याचे चिन्ह आहे. त्याचा आणि संस्कृती अथवा सज्जनतेशी काहीही संबंध नाही. मुळात बोल्ड म्हणजे काय हेच मुळात व्यक्तीसापेक्ष आहे. काही समाजामधे स्त्रीचे केस दिसले तरी बोल्डपणा होतो, आणि काही समाजामधे बिकिनी घातली तर. कामुक गोष्टीकडे आकर्षिले जाणे हा मानवी स्वभावाचा एक पैलू आहे. आपल्याला इतर जनावरापेक्षा वेगळं डीफाईन करणारा एक फॅक्टर कामशास्त्र आहे. त्यामुळे यानात्या स्वरूपामधे कामुकता येतच राहणार. याहीआधी एरॉटिक आर्ट्स होतीच की जगामधे. त्यामुळे हे अस्लं काय नव्हतंच किंवा नसतंच आणि आताच हे असलं सर्व वाढलय असं मानणं म्हणजे स्वतःला शहामृग बनवून घेणं. त्यामुळे डर्टी पिक्चरपासून जंगली जवानीटाईप ते जय हनुमान टाईप सिनेमे बनत राहणार.

सिनेमा हे माध्यम येऊन जास्त दिवस झाले नाहीत, त्यामधे अजून बदल घडत राहतील. (तांत्रिकदृष्ट्या आणि कलात्मक दृष्ट्या). पण तरी सिनेमा हे एक व्यवसाय देखील आहे. आणि जी गोष्ट बाजारात चालते तीच विकायला ठेवली जाईल. तुम्हाला घ्यायचं नसेल तर पुढच्या दुकानात जाणे योग्य. पण इथेच मला हवी ती वस्तू हव्या त्या दर्जामधे आणि हव्या त्या किमतीमधे मिळायला हवी असा हट्ट धरून काही हासिल होइल का?

माझे मतः

१. सिगारेट ब्लर करणे हे क्षुल्लक सावधानता याच सदरात मोडते व त्यामुळे ते विनोदीच ठरते.

२. बाकी लेखातील मुख्य मुद्दा लक्षात आला नाही. म्हणजे स्त्री देहाचे आज होत असलेले प्रदर्शन हे ग्रॅज्युअली झाले असते तर जाणवलेही नसते का असा प्रश्न पडतो. मुळात हेलन ग्रेसफुल होती हेच पटत नाही. हेलन अत्यंत घाणेरडे हावभाव करायची व खरे तर समकालीनांपेक्षाही खूपच घाणेरडे हावभाव! केवळ आज ती सिनियर झालेली आहे म्हणून तिला मोठे म्हणण्यत अर्थ नाही. मंदिर तर काय, हेलनच्याही घरात असेल आणि वेश्येच्याही घरात देव्हारा असू शकतो. सिनेमावाले तेच दाखवणार जे विकले जाते! खरे तर समजलेच नाही काय म्हणायचे आहे ते! क्षमस्व! म्हणजे त्या सर्वांच्या तुलनेत सिगारेट ब्लर करणे विनोदी आहे हे लक्षात आले, पण बाकी काय म्हणायचे आहे ते खरच लक्षात आले नाही.

-'बेफिकीर'!

एरॉटिक आर्ट वेगळी. मी कालच व्हिक्टोरिआज सिक्रेट शो पाहिला. इतक्या सुरेख मॉडेल्स, अंतर्वस्त्रे ही मेन कन्सेप्ट व बरोबरीने रॉक पर्फॉर्मन्स इत्यादि. ते कुठे ही व्हल्गर दिसत नाही. पूर्ण फॅशन शो अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात तसेच आनंदी मॉडेल्स नी उत्तम साजरा केला. पूर्ण प्रॉडक्षन फ्लॉलेस होते.

विनाकारण व्हल्गॅरिटी, चीप चित्रण व मुक्त स्त्रीची चुकीची कल्पना हेच फक्त मला पट्त नाही. माझी मानसिकता प्रूड, संस्कृतीसंरक्षक नाही. चित्रपटाची कथेची डिमांड असू शकते हे मला कळते. चक्र मधील स्मिताची अंघोळ, चांदनीबार मधील नाच इत्यादी. पण हे पव्वा लगाके आई म्हणणारी चमेली भंपक वाट्ते. असली गाणी बघून कोणी एक्साइट होते व त्याच्या इच्छेला बळी पड्ते एखादी घरकाम करणारी मोलकरीण, कामावरून परतणारी ललना, क्लासला जाणारी किशोरी. तसे शक्यतो होउ नये असेच वाट्ते. ही चंपाचमेली/मुन्नी शीला गाणी कुठे कुठे बार मध्ये भारताच्या कोपर्‍यात वाजतात. त्याचे दूरगामी परीणाम बनविणार्‍यांनी लक्षात घ्यावेत.

बेफिकीर हेलन बद्दल अनुमोदन.

अवांतर -

<<<<<मी कालच व्हिक्टोरिआज सिक्रेट शो पाहिला. इतक्या सुरेख मॉडेल्स, अंतर्वस्त्रे ही मेन कन्सेप्ट व बरोबरीने रॉक पर्फॉर्मन्स इत्यादि. ते कुठे ही व्हल्गर दिसत नाही. पूर्ण फॅशन शो अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात तसेच आनंदी मॉडेल्स नी उत्तम साजरा केला. पूर्ण प्रॉडक्षन फ्लॉलेस होते.>>>>>

माफ करा, पण आपला हा मुद्दा पटला नाही. अंतर्वस्त्रे या कमोडिटीची अशी जाहिरात करणे हेही प्रदर्शन आहे जे (कदाचित) स्त्रियांनी अ‍ॅसेप्ट केलेले आहे. (येथे आठवते. लहान असताना आई व मावशीबरोबर रिक्षेतून लक्ष्मी रोडवरून जात असताना दुकानाबाहेरील अनावश्यक प्रदर्शन पाहून मावशी आईकडे बघत म्हणाली होती की काय प्रदर्शन करतात हे लोक) (हे केवळ मुद्याच्या पुष्ट्यर्थ लिहिले) आता जर बायकांनीच स्वीकारले असेल की अशा कमोडिटीजची जाहिरत अशीच होते तर काहीशी कमाल वाटते. खरे तर असे शोज निदान आपल्याकडच्या बायकांना आवडू नयेत अशी कल्पना होती. (फर आवडतात असे म्हणायचे नसून केवळ वरील मुद्याच्या प्रतिक्रियेपुरतेच हे विधान). येथे नीधप यांच्या लेखाची पुन्हा आठवण होते .

हा प्रतिसाद अवांतर आहे. क्षमस्व!

चित्रपटामधे उत्तान दृश्य आणि नाच आहेत हे माहित असून तुम्ही बघायला गेला होतात. >> काही चित्रपटात अशा सिनची गरज असते हे कोणी नाकारलं नाहिये. पण जिथे तिथे तेच तेच?

आत्ता ते गाणे पाहिले यू ट्यूबवर! http://www.youtube.com/watch?v=KH8TpOLROOQ हेच का?

फार काही विशेष नाही वाटले, यापेक्षा उत्तानबित्तान दृष्ये आधीच येऊन गेलेली दिसतात. अर्थात, तेही चूकच आहे म्हणा! Happy

>> काही चित्रपटात अशा सिनची गरज असते हे कोणी नाकारलं नाहिये. पण जिथे तिथे तेच तेच?

अनुमोदन दक्षे. अगोदरच्या प्रतिसादात मी हेच म्हणालो होतो. अती तिथे माती.

Pages