आवाज कुणाचा..!!

Submitted by Yo.Rocks on 13 December, 2011 - 00:49

१० डिसेंबरची संध्याकाळ मावळत होती.. सुर्य अगोदरच पश्चिमेच्या क्षितीजामध्ये कुठेतरी गुडूप झालेला.. अन त्या पश्चिमेकडील संपूर्ण क्षितीजावर संधिप्रकाशाचे उमटलेले विविध रंगांचे एकावर एक असे थर... ! हे सगळे पश्चिमेकडीला आकाशाच्या पडद्यावर घडत होते.. तर त्याचक्षणी पुर्वेकडे आकाशात सोनेरी रंगाचे वर्तुळ उमटले होते..पौर्णिमेचा चंद्रोद्य हुकला होता.. पण परिधान केलेल्या सोनेरी रंगाची कात टाकताना चंद्राला मात्र बघायला मिळणार होते.. आजचा दिवस चंद्रग्रहणाचा.. चंद्र साहाजिकच डावीकडून खालच्या बाजूने आधीच थोडा डागाळलेला..

पाण्याच्या टाकीच्या एका बाजूस आमची ट्रेकलिडर 'प्रिती' जेवणाच्या सामानाची तयारी घाईघाईने करत होती.. इथेच बाजूला माझ्यासोबतच्या मायबोलीकरांनी इतरांच्या वाहून आणलेल्या सॅक्स टाकल्या होत्या.. ! हो टाकल्या होत्याच म्हणेन.. एकतर आधीच भन्नाट रॉक पॅच सर केल्याने भेदरलेले.. थकलेले.. त्यात मागाहून नवाबशाहीत वावरत येणार्‍या लोकांच्या सॅक्स आम्ही का म्हणून उचलायच्या म्हणून ज्याम भडकलेले.. म्हणून सॅक्स ठेवल्या म्हणण्यापेक्षा टाकल्याच असतील म्हणेन ! आतापर्यंत दोन- तीनदा अपडाउन करत एकावेळी दोन- दोन अवजड सॅक्स वाहून शेवटच्या सॅक्स घेउन आलो तेव्हा बघितले तर माझी सॅक पण या सवंगडयांनी इथेच सोडून पुढे गुहेत आश्रयासाठी गेलेले दिसले.. जल्ला ह्यांच्यातर... ! एकीकडे प्रणव (मायबोलीकर्) आपल्या कॅमेर्‍याची सॅक शोधत इथून तिथून फिरत होता.. बैचेन होत होता.. त्याचा कॅमेरा तर कुठे जाणार नव्हता.. पण वेळ टळून जात होती.. आकाशात देखणीय सोहळा जो सुरु होता..

आता मावळतीचे सगळे रंग अंधाराने गिळंकृत केले होते.. पण पौर्णिमेचा चंद्र प्रसन्नपणे हसत होता.. कात अजून पुर्णपणे न टाकल्यामुळे म्हणावा तसा प्रकाशमान अजून झाला नव्हता.. गडाच्या एका कडयावरून पाहिले तर कसार्‍यानजिकचा व नाशिक हायवेचा सारा प्रदेश हा तेथील विजेच्या दिव्यांमुळे लुकलुकणारे काजवेच जणू भासत होते.. तर दुसर्‍या बाजूस घाटघर धरणाजवळील लुकलुकणारे लख्ख प्रकाशाचे दिवे दिसत होते..

थंडगार बोचरी हवा सारखी अंगाला टोचत होती.. जेवणासाठी चूल पेटवली खरी.. पण या चुलीच्या आगीला जोरकस वाहणारा वारा आपल्या तालावर नाचवत होता.. साहाजिकच बिर्याणीचे जेवण बनवताना फार अडचण येत होती.. काहिजण एकीकडे वेज बिर्याणीसाठी कापण्याचे काम करत होते.. भाज्या म्हणतोय जल्ला वेज होती.. Wink तर काही चुलीवर लक्ष ठेवून होते.. तर काही थकलेभागलेले जीव गळून पडले होते.. तिथेच ऐसपैस झोपले होते.. ! तर मागे राहिलेली मंडळी अजून वरती येतच होती.. !

आकाशात चांदणे होते खरे.. पण पौर्णिमेचा चंद्र नभात असताना लक्ष दुसरीकडे जाणार कसे.. त्यात चंद्रग्रहणास सुरवात झालेली.. डावीकडच्या बाजूने सावलीची लाट अगदी हळुवारपणे चंद्रावर उमटण्यास सुरवात झाली होती.. तिथे कधी एकदा चंद्र अर्ध्यापेक्षा जास्त झाकलेला दिसतोय ते बघायचे होते तर त्याचवेळी कधी एकदाची बिर्याणी तयार होतेय असे वाटत होते.. जसजसे चंद्रावरील सावलीचा विस्तार वाढू लागला तसतसे आकाशातील तारकामंडळ लक्ष वेधून घेउ लागले.. मान वर करून अगदी ३६० अंश कोनात फिरवली तरी बघून समाधान होणार नाही असे हे विलोभनीय वाटणारे तारकामंडळ.. लवकरच चंद्राचा जवळपास सर्व भाग सावलीने व्यापला नि जे काही दिसत होते ते बघतच रहावे असे.. फोटो काढण्याचा खूप प्रयत्न केला पण डिजीटल कॅमेर्‍याने आपल्या मर्यादा उघडया केल्या नि नाईलाज झाला.. तिकडे खग्रास ग्रहण लागले नि इथे आमचे जेवण सुरु झाले..

आता बोचर्‍या हवेबरोबरच थंडीने पण आक्रमण सुरु केले... नि कधी एकदा जेवून गुहेत जातोय असे झाले.. जेवण आटपले.. तिथे ग्रहण सुटण्यास आरंभ झाला.. आता चंद्र पुर्णतः प्रकाशमान अवस्थेत असल्याने सगळीकडे दुधाळ प्रकाश पसरला होता.. या गडाचे शेजारी 'कुलंग' व 'मदन' हे किल्लेदेखील त्या चंद्रप्रकाशात मस्तपैंकी उजाळले होते.. अलंगचे म्हणाल तर दुरवरचा परिसर नजरेत भरेल असा विस्तार.. गडावरती 'झाड' हा प्रकार नसल्याने जमिनीवर पसरलेला चंद्रप्रकाश अधिकच खुललेला दिसत होता.. आम्ही टॉर्च नावाला लावून गुहेचा रस्ता पकडला.. इथे आलेल्या आमच्या ग्रुपची संख्या ४० च्या आसपास असली तरी फक्त २०-२५ जणच गुहेत परतलेले.. बाकी तिथेच चुलीभोवती मोकळ्या पठारावर झोपले..!

येथील गुहा म्हणाल तर इथपर्यंत चढण पार करून यावे लागते.. उंचवटयावर वसलेली.. गुहा म्हणजे अगदी नावाला असणारी नाही तर एकदम प्रशस्त.. गुहेचा दरवाजा तसा छोटाच.. हवा खेळती रहावी म्हणून की काय लागूनच असलेल्या दगडभिंतीला बर्‍यापैंकी मोठी खिडकी ठेवलेली.. आत प्रवेश केला की अगदी वीस-पंचवीसजण झोपतील इतकी ती जागा हे एक सभागृहच वाटते.. उजवीकडे दोन खोल्या तर एक डावीकडे..त्यांना पण एक खिडकी आणि आत जाण्यासाठी केलेली जागा.... सगळे काही खोदुन केलेले...! या सभागृहाच्या पुढे पण अगदी छोटया उंचीचा बांधलेला कठडा पार केला की आता पुन्हा एक प्रशस्त जागा.. फक्त एवढेच की जमिन ओबडधोबड अन मातीची.. इथे पण मग कातळात कोरलेल्या तीन मोठया गुहा (खोल्या) ! खरच पुर्वीच्या लोकांचे कितीही कौतुक केले तरी कमीच. त्यावेळी काय असेल इथे !

आपापले अंथरुण पसरुन गुहेतील बहुदा सगळेच आडवे झाले.. तर चंद्रप्रकाशाचा झोपण्यापुर्वी आस्वाद घ्यावा म्हणून आम्ही मायबोलीकर (मी, नविन गिलबीले आणि रोहीत..एक मावळा) गुहेच्या तोंडाशी येउन बसलो.. इथूनच अलंगचे मदनपर्यंत जाउ पाहणारे टोक दिसते.. नुसते टोकच नाही तर सगळा परिसर नजरेत भरतो.. मदन, कुलंग तर अगदी नाकासमोरच टिच्चून उभे भासतात..आम्ही तिघे गप्पा मारत सफरचंद खात असतानाच बाजूच्या गुहेकडून खिदळण्याचा आवाज झाला.. माझे नि रोहीतचे एकाचवेळी लक्ष गेले.. पण तिथे कोणीतरी "महत्त्वाची" कामे करण्यासाठी गेले असतील म्हणून दुर्लक्ष केले.. बाजूची गुहादेखील मोठी पण अगदीच पडीक अवस्थेत.. तेव्हा मुक्कामासाठी वापरत नाहीत..

थंडीने जोर वाढवला तसे आम्ही गुहेत सरकलो.. प्रत्येकजण मोक्याची जागा बघून झोपी गेला.. दिवसभरात अलंग-मदन वरील चढाई केल्याने थकलेभागलेले जीव घोरपड बनू लागले.. ट्रेकला झोपायचे म्हटले की माझी झोप कमीच. त्यात सर्दीचा त्रास.. नाक चोंदलेले.. नि असाच जागा झालो... तर कानावर बाईचा आवाज ऐकू आला....!

अगदी शहरात घरी झोपताना कुत्र्यांच्या भुंकण्याचा वा रडण्याचा आवाज येतो तसा.. कुत्र केकाटते तसा .. मनात पटकन तेच आले.. पण लगेच आठवले इथे यायचे तर रॉक पॅच सर केल्याशिवाय ते शक्य नाही.. मग कसलं कुत्र येतय.. लगेच दुसरा ऑप्शन घेतला.. कोणीतरी वेडीबाई आली असेल.. पण पुन्हा तो पॅच आठवला.. लगेच निराशा.. मनात लगेच विचारचक्र जोमाने सुरु झाले.. कारणच तसे होते.. तो आवाज आता गुहेकडे सरकत होता.. भलामोठा ऐकू येत होता.. उच्चार काहीच कळत नव्हते.. रडणे की केकाटणे हेही न सांगता येण्याजोगे.. कोल्हेकुई जणू... म्हटले परिस्थिती गंभीर आहे.. लगेच बाजुलाच झोपलेल्या रोहीतला गदागदा हलवून विचारले 'आवाज येतोय का' तर 'हो येतोय' म्हणत तो पुन्हा झोपला पण ! म्हटले चला म्हणजे मी ऐकतोय ते खरेय.. भास नव्हे !!

हळूहळू आवाज वाढू लागला.. नि सारखे तिकडेच लक्ष जाउ लागले.. शेवटी अगदी न राहवून मी ओरडलोच 'कोण आहे रे' !!! तेवढ्यापुरती आवाज बंद.. क्षणात शांतता.. गुहेत असल्याने दिसत तर काही नव्हते.. जिथे झोपलो होतो तिथून दिसत होते ते फक्त गुहेचे तोंड.. नि त्या गुहच्या तोंडातून फक्त आणि फक्त चंद्रप्रकाशच दिसत होता.. टॉर्चचा प्रकाश बाहेर भिरकावण्याची हिंमत होत नव्हती.. उगीच आपणहून कशाला लक्ष वेधून घ्या म्हणत गुहेच्या तोंडावर नजर ठेवत नुसता पडून राहीलो..

पुन्हा आवाज सुरु झाला.. जल्ला डोक्याला शॉटच झाला.. पण घाबरण्याचे कारण नव्हते.. निर्धास्त होतो.. कारण काय तर इथे गुहेत घोरत पडलेले हे घोरपडलोक वाघासारखे डरकाळ्या फोडत होते.. ! Happy तेव्हा कोण आत येणार.. आणि समजा कोणी आलेच तर मोठयाने ओरडून इतरांना त्वरित सावधान करायच्या बेतात होतो.. खरच झोपलेल्यांचे कौतुक नि तितकेच हेवा वाटत होता..! इतका आवाज येत असूनही हे सगळेजण झोपण्याचा आस्वाद घेत होते..

जसा आवाज वाढला तशी गुहेत चुळबूळ जाणवली.. म्हटले अजुन दोघे- तिघेजण जागे झालेत खरे.. पण उठतोय कोण.. आधीच दमून गेलेले.. त्यात झोपमोडचा कंटाळा ! मी अजुनही तो आवाज ओळखण्याचा प्रयत्न करत होतो.. पण उमजत नव्हते.. पशुपक्षी आठवू लागलो.. पण छे ! काहीच ताळमेळ बसत नव्हता... अचानक त्याच आवाजात कसलेतरी एक वाक्य पुटपुटल्याचे ऐकू आले... भाषा एकदम वेगळी.. कधीही न ऐकलेली... !! सारेकाही गुहेबाहेरून ऐकू येत होते.. पण आवाज एकदम स्पष्ट वाटत होता... झाले.. वाक्य कानी पडताच पशुपक्ष्यांचे आवाज आठवण्याचे सोडून दिले.. नि जे काही समजायचे ते समजून गेलो.. आता मात्र झोपेचे खोबरे झाले.. भिती वगैरे काही वाटले नाही.. पण परिस्थितीने एकदम गंभीर झालो.. 'जो होगा वो देखा जायेगा' म्हणत बघ्याची भुमिका घेतली..

ते वाक्या पुटपटताच लगेच काही क्षणात आवाज बंद झाला.. ! आणि बैचेनी अजुन वाढली.. आवाज असेपर्यंत माग तरी घेता येत होता... पण शांतता पसरल्यावर कसले काय.. थोडावेळ अंधारातूनच गुहेच्या तोंडाशी दिसणार्‍या दुधाळ प्रकाशाच्या पडद्यावर नजर रोखली.. आता खूपच सावध झालो.. पंधरावीस मिनीटे कसलीच चाहूल लागली नाही.. आजुबाजूला मात्र घोरण्याच्या डरकाळ्या कसलाही खंड न पडता सुरुच होत्या.. म्हटले या आवाजाने तरी आत गुहेत कोणी येण्याचे धाडस करणार नाही... मग मात्र मला कधी झोप येतेय असे झाले.. नशिबाने लवकरच डोळा लागला..

सुर्योद्य बघण्यासाठी पहाटे पाचला आलार्म झाला नि रोहीत, प्रणव यांनी मला झोपेतून हलवून उठवले... उठल्यावर माझा पहिला थेट प्रश्ण हाच की आवाज ऐकलास का ??? प्रणवने नाही तर रोहीतकडून हो.. एकीकडे झोपलेले इंद्रा, गिरि,विन्या, डेविल हे मायबोलीकरदेखील उठले.. तिकडे गिरीचा पण तोच प्रश्ण.. 'आवाज नाही का ऐकलास.. च्यायला कोण ओरडत होत रे..??' बाकीच्यांना मस्करी वाटली.. कोण म्हणाले त्या बाहेर झोपलेल्यांपैंकी कोणी तरी हे किडे केले असतील.. पण मला त्यात जराही तथ्य वाटले नाही.. कारण तो आवाज विलक्षण होता.. अस्वस्थ करणारा होता..

साडेपाचच्या पहाटेच्या अंधारात आमची मायबोली टोळी गुहेबाहेर पडली... लवकरात लवकर प्रार्तविधी आटपून सुर्योद्य होण्याअगोदर आम्हाला अलंगचा टॉप गाठायचा होता.. जो गुहेच्या वरच्या बाजूने मार्ग जातो... अलंगला ही माझी दुसरी भेट असल्यामुळे सर्वांच्या पुढे टॉर्च घेउन मीच पुढे होतो !! दोन तीन तासांपुर्वी काहीतरी घडले याची काहीच भिती नव्हती...अन्यथा सर्वांच्या मागे वा मधोमध चालण्याचे पसंत केले असते.. तरीपण मन थोडे अस्वस्थ होतेच.. नजर चौफेर फिरत होती...शोधत होती.. पण मायबोलीकर संगतीला असताना विनोदच जास्त.. तेव्हा लवकरच मन स्थिरावले..

नाश्तापाण्यासाठी संपुर्ण ग्रुप पुन्हा सकाळी सात-आठच्या सुमारास चुलीभोवती जमला.. घडलेली गोष्ट इथेच उघडयावर झोपलेल्यांच्या कानावर घातली. पण प्रिती,सुन्या, झीनत हे लीडरलोक्स विश्वास ठेवेनात.. उलट तुम्ही मायबोलीकरांनी काल रात्री काहितरी प्लॅन करून ठरवले असावे असा आरोप झाला ! मायबोलीकरांमध्ये आवाज फक्त मी, गिरीविहार, रोहीत आणि डेवील यांनीच ऐकला होता.. त्याचवेळी गुहेत इतर झोपलेल्यांपैंकी दोघांनी देखील या घटनेला दुजारा दिला.. सगळ्यांनी मी 'कोण आहे रे' हे विचारलेले पण ऐकले होते.. गुहेत दोघे तर अगदी गुहेच्या तोंडाजवळच झोपले होते..त्यांची मात्र टरकली होती.. एकाने तर उठून बाहेर डोकावले सुद्धा ! पण लख्ख चंद्रप्रकाशात कोणीच दिसले नाही.. तोपण गुहेबाहेर पडण्याचे धाडस न दाखवता शिस्तीत पुन्हा येउन झोपला..

हे सगळे ऐकले तरी काहीजणांना मस्करीच वाटत होती.. जे अपेक्षित होते.. प्रिती,सुन्याने तर विचारले टॉर्च घेउन बाहेर का नाही आलात.. याबद्दल काय म्हणावे.. उठायलाच जीवावर आले होते त्यामुळे गरज वाटली नाही.. गुहेत येउदे मग काय ते बघू असेच सगळ्यांनी (ज्यांनी ज्यांनी अनुभवले होते) मनोमनी ठरवले होते.. गोष्ट कितीही गंभीर असली तरी यावरून आमच्या नाश्तापाण्याचा कार्यक्रम एकदम फर्मास झाला.. एकापेक्षा एक जोक्स मारू लागले.. त्यात एकजण बडबडला की अरे मी झोपलो असताना सारखा खाली सरकत होतो... वरती येउन झोपलो तरी पुन्हा खाली !!!! इंद्राची पण हीच अवस्था झाली होती..या गोष्टीवरून तर नुसती धमाल.. पण कदाचित हे इतकी दमछाक झाल्यावर गाढ झोपेत होउ शकते..

पण आम्ही ज्यांनी हा आवाज ऐकण्याचा अनुभव घेतला त्यांना हा प्रकार चांगलाच लक्षात राहील..तो अर्धापाउणतास खूप बैचेन करणारा होता.. मनात म्हटले गुहेत झोपायला वीसजण तरी होते.. हेच जर पाच सहाजणच असतो तर मग मात्र नक्कीच घाबरगुंडी उडाली असती !!

आमच्याच गुहेत झोपणर्‍यांपैंकी दोन मदतनीस म्हणून असणारे गावकरी होते.. शेवटी मी त्यांना गाठून घडलेला प्रकार सांगितला.. तेव्हा तो म्हणाला
' पौर्णिमा आणि अमावस्या या दोन्ही दिवशी इकड अशा घटना होतच असतात.. आम्ही लक्ष देत नाही.. गुपचूप झोपून राहतो' !!!!

'तू कधी स्वतः असे अनुभवले आहेस का.. की कोणी सांगितले म्हणून..'

'नाही.. बर्‍याचदा अनुभवलेय' !!

तळटीप : इथे कुठेही तिखटमीठ लावून स्टोरी नाही बनवलीय.. गडावर असताना जे घडलेय ते लिहीलेय.. सत्य वाटत असेल तर ठिक.. नाही वाटत असेल तर अशा अनुभवाची वाट पहावी !! Proud पण असा अनुभव वाटयाला न येवो... लोक म्हणतात आत्मा-भूत प्रकार सगळे झूठ असते.. मानसिक असते... असे मी पण म्हणत होतो.. पण अंदाजे ४८०० फुट उंची असलेल्या अलंगवर असा हा एक "अमानवीय" प्रकार अनुभवला..अन आता अशा गोष्टींवर विश्वास ठेवणे मला नाईलाजाने भाग पडणार.. Sad वासोटा ट्रेकला 'हिस्स्स्स' प्रकरण अनुभवले होते.. नि इथे अलंग-मदन ट्रेकला 'तीचा आवाज' प्रकरण !!! शेवटी याला पण मी ट्रेकमधील एक जबरी अनुभवच म्हणेन..!

गुलमोहर: 

नविन जागेत सहसा मला ही गाढ झोप लागत नाही... पण त्या एका दिवसात दोन गड केल्याने साहजिकच थकल्यामुळे गाढ झोपी गेलो. त्यामुळे या अमानविय अनुभवा पासून वंचित राहिलो.

ऐकलयं की ज्यांचा 'मनुष्यगण' असतो त्यांनाच अश्या अद्भुत प्रकाराची प्रचती येते. :p
जल्ला बाकिचे घोरपडे म्हणजे काय 'राक्षसगण' म्हणायचे का?

यो मला वाटले आधी तु ग्रहणाचे फोटो टाकतोयेस. मग वाटले ट्रेक चा अनुभव, मग वाटले एखादी रहस्यमय कथा लिहायला घेतलीस, पण हे भलतेच प्रकरण निघाले.

हे अमानविय वर पण लिहिणे.

खतरनाक.

ते बाहेर चुलीजवळ झोपले होते त्यांचा काय अनुभव? त्यांनाही आला होता का आवाज?

आनंदयात्री, घ्या! कोणाचं काय तं कोणाचं काय. तुम्हाला त्या वाक्याची पडलीये! Rofl

आनंदयात्री, घ्या! कोणाचं काय तं कोणाचं काय. तुम्हाला त्या वाक्याची पडलीये!
त्या वाक्यानंतर तो आवाज बंद झाला असं योने लिहिलंय. म्हणून उतसुकता! Wink

ते बाहेर चुलीजवळ झोपले होते त्यांचा काय अनुभव? त्यांनाही आला होता का आवाज? >> नाही.. त्यांनाच दुसर्‍या दिवशी सकाळी सांगितले तर विश्वास ठेवेनात.. ते चूलीजवळ झोपले होते ते अगदीच जवळ अंतरावर नव्हते.. नि ही गुहा वरच्या बाजूस एका डोंगरात खोदलेली आहे..

ते वाक्य काय होतं?>> जल्ला ती भाषाच समजली नाही.. पण ते वाक्य ओरडून म्हटले गेले.. तेव्हा समजून गेलो की नक्कीच अमानवीय प्रकार असावा..

बाहेर पडून फोटो घ्यायला हवे होतेस रे. >> मामी.. Lol जिप्स्या आला असता तर त्याला नक्कीच धाडले असते पुढे... Biggrin

गुहेचे वर्णन सुंदर... आम्ही गेलो होतो तेंव्हा उजवीकडच्या सर्वात मागच्या गुहेत मुक्काम केलेला.

जल्ला डोक्याला शॉटच झाला.. पण घाबरण्याचे कारण नव्हते.. निर्धास्त होतो.. कारण काय तर इथे गुहेत घोरत पडलेले हे घोरपडलोक वाघासारखे डरकाळ्या फोडत होते.. ! >>> डोळ्यासमोर आणून प्रचंड हसलो... Lol

घोरपडे म्हणजे घोरायण आणि घोराख्यानात पारंगत असलेली माणसे... त्यांच्यापासून खरेतर दूरच झोपावे पण गुहेत कुठेही झोपले तरी आवाज घुमत राहतो... Happy

आणि हो धागा 'अमानवीय' मध्ये हलवा... Lol

रच्याकने... गेल्यावर्षी आम्ही गेलो होतो तेंव्हा आमच्याबरोबर असणाऱ्या ऐश्वर्याला तिथेच सोडून आलो होतो... तिचाच आवाज असेल... Wink Lol

त्यात एकजण बडबडला की अरे मी झोपलो असताना सारखा खाली सरकत होतो... वरती येउन झोपलो तरी पुन्हा खाली !!!! इंद्राची पण हीच अवस्था झाली होती..>>>

चायला तो एकजण मीच..... एकदा नाही तर दोनदा मी खाली सरकलो गेलो होतो... जर झोपेत सरकलो म्ह्णायचं तर ति जागा सपाट होती... उतरणीची नव्हती... पण कुणी खेचत होतं असही नाही...
माझा देव गण आहे म्हणुन बहुदा मी त्या रसिल्या आवाजा पासुन अलिप्त राहीलो वाटतं.. Wink

भयानक आहे

जल्ला डोक्याला शॉटच झाला.. पण घाबरण्याचे कारण नव्हते.. निर्धास्त होतो.. कारण काय तर इथे गुहेत घोरत पडलेले हे घोरपडलोक वाघासारखे डरकाळ्या फोडत होते.. ! .... :ड :ड

एकदम जबरदस्त अनुभव रे. Happy

धारप कथा वाचतोयेसा भास झाला.. अगदी अगदी Happy

पौर्णिमा आणि अमावस्या या दोन्ही दिवशी इकड अशा घटना होतच असतात.. आम्ही लक्ष देत नाही.. गुपचूप झोपून राहतो' !!!! >>>>>>२४ डिसेंबरला जायचं का पुन्हा? Wink

माझा देव गण आहे म्हणुन बहुदा मी त्या रसिल्या आवाजा पासुन अलिप्त राहीलो वाटतं.. >> मलाही तसंच वाटतंय... देव गणामुळे एक अनुभव मिसला... Lol
पण या सर्व गोष्टीमुळे नाश्त्याला मजा आली. Wink

खरच ते एखादं रानमांजर किंवा तरस असावे त्यांचे आवाज बरेचदा माणसासारखे येतात किंवा मग मास हिस्टेरीया झाला असावा तुम्हाला.

येउकामी, तरस असु शकते, कारण तरसाचा आवाज मानवाच्या रडण्यासारखा असतो...
पण एवढ्या उंचावर दोन रॉक पॅच पार करुन ते वरती कसे येउ शकेल...

गुहेच्या दगडी भिंतीला चर किंवा फट पडलेली असेल तरी त्यातून येणार्‍या वार्‍यामुळे असा आवाज येऊं शकतो. आमच्या घराच्या खिडकीच्या 'स्लाईडींग' तावदानाच्या फटीतून येत असलेल्या वार्‍याच्या अशाच आवाजाने घरात असूनही मी टरकलो होतो !! अर्थात हा आपला एक अंदाजच.

येउकामी, तरस असु शकते, कारण तरसाचा आवाज मानवाच्या रडण्यासारखा असतो >>
ते ठिक आहे पण ज्या भाषेत ते बोलत होत ..त्यामुळे विश्वास ठेवावा लागतोय..
अन मी सुध्धा तो आवाज अनुभवलाय... काहितरी ते वेगळच होत..

पौर्णिमेची रात...
धुंद चंद्रप्रकाश .....
आली अवचित गुहेच्या दारी ..
आवाज आला मंद ...
आम्ही झालो थंड ....

ढिला झाला डोक्याचा स्क्रू..
"यो अन रो " म्हनतायत आता मी काय करु ......... Happy

एखादं रानमांजर किंवा तरस असेल तर ती गुहा त्यांची झोपण्याची जागा असावी.. आणि ती तुम्ही बळकावली म्हणुन ते रडत असतील.. एक तर्क.. Happy

जोक्स अपार्ट सुन्दर वर्णन आणि सुन्दर अनुभव..

Pages