क्षण

Submitted by अगो on 11 December, 2011 - 15:50

किंचित आळोखेपिळोखे देत गिरीजाने विमानाच्या गोल खिडकीला नाक चिकटवून बाहेर पाहिलं. गेल्या सव्वीस तासांतल्या प्रदीर्घ, कंटाळवाण्या प्रवासाचा हा शेवटचा टप्पा होता. पहिल्या परदेश प्रवासाची अपूर्वाई फ्रॅंकफर्ट येईपर्यंत टिकली होती. शिकागोच्या फ्लाईटमध्ये थोडा जेटलॅग जाणवायला लागला आणि फार्गोच्या ह्या छोट्या फ्लाईटमध्ये तर तिचं अंग चक्क आंबलं होतं. मुंबईला टेक-ऑफ घेतला तेव्हा दिव्यांच्या माळा लावल्यासारखी दिसणारी मुंबई दूरदूर जात असल्याचा क्षण आठवून तिला आत्ताही हुरहुर वाटली. तिने परत बाहेर पाहिलं. अजून पाच-दहा मिनिटांत विमान उतरलं असतं. इतका वेळ पायाखाली ढगांच्या पायघड्या अंथरल्यासारखं वाटत होतं, आता अचानक सगळा आसमंत गोधडीखाली शिरल्यासारखा वाटत होता. फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावरचे दिवस. जमिनीवर सगळीकडे बर्फाचे पांढरे गालिचे होते. हाताच्या पंज्याएवढे दिसणारे छोटे छोटे तलाव गोठून शुभ्र झाले होते. तपकिरी,मातकट रंगांच्या टुमदार घरांच्या उतरत्या छपरांवरही हिमाचे थर होते. तिला गंमत वाटली. ह्या आधी विमानात बसली नव्हती असं नव्हे पण असं बर्फ पाहायची पहिलीच वेळ. तिने हळूच पेंगत असलेल्या नवऱ्याला हलवलं, "समीर, बघ ना, काय मस्त दिसतंय बाहेर."
"अजून महिनाभर तरी स्नोच बघत राहायचाय बाईसाहेब." तो हसून म्हणाला आणि डोळे चोळत त्याने खिडकीबाहेर डोकावल्यासारखं केलं.
"त्या छपरावरचं बर्फ बघून काय आठवलं माहितीये ? पिठीसाखर आणि लोणी लावलेली ग्लुकोजची बिस्किटं !"
तो हसतच सुटला, "लोणी लावलेली ग्लुकोजची बिस्किटं ? तू खातेस की काय ?"
"हो,छान लागतात. एवढं हसायला नकोय काही." सांगतासांगताच तिला रात्री जागून अभ्यास करताना आजी कशी ही बिस्किटं बनवून आणून द्यायची हे आठवलं. आत्तापर्यंतचं सगळं सगळं मागे टाकून आपण एकटेच पुढे आलोय ही जाणीव थोडी बोथट झाली होती, त्यांना परत धार चढली.
"अजून कुठली डेडली कॉंम्बो आवडतात तुला, कळू तरी दे." तिच्याकडे थोडं झुकत त्याने विचारलं. ती आपली तिच्याच नादात होती, " अजून ना, ऐकशील तर वेडा होशील. तळलेला पापड आणि पोळी मस्त लागते. नाहीतर मग पुरणपोळी आणि लोणचं, गुळाची पोळी आणि नारळाची हिरवी चटणी ..." आता मात्र त्याला मनापासून हसू आवरेना, "आयला,वल्लीच आहेस तू म्हणजे !"
तिलाही हसू फुटलं.
"अभी बचके कहाँ जाओगे मिस्टर !" ती नाटकीपणे म्हणाली. बोलताबोलता तिचं लक्ष परत बाहेर गेलं. फार्गोच्या रन-वे वर त्यांचं विमान सावकाश उतरत होतं.

********

आतपर्यंत वळत गेलेल्या नागमोडी रस्त्याच्या शेवटून तिसर्‍या बिल्डिंगसमोर कॅब थांबली. प्रवासभर पेंगणारा समीर आता चांगला फ्रेश वाटत होता. तिला मात्र अमेरिकेत पाऊल टाकल्यापासून अचानक लग्नाचा,प्रवासाचा, हवेचा नवखेपणा अंगावर आल्यासारखं वाटू लागलं होतं. गिरीजा आणि समीरचं पंधरा दिवसांपूर्वीच लग्न झालं होतं. खाली उतरुन घराकडे चालताचालता तिच्या लक्षात आलं की आत बसून वाटलं त्यापेक्षा बाहेर खूपच जास्त थंड आहे. तरी बरं त्यानेच आणलेला एक भरभक्कम विंटर कोट एअरपोर्टच्या बाहेर येतानाच घातला होता. बॅग ओढत त्याच्यामागून चालताना ती आजूबाजूचा परिसर निरखत राहिली. एखादं निसर्गचित्र पाहतोय असं वाटलं तिला ... सुंदर आणि स्तब्ध, थंड आणि परकं !
"वेलकम होम, माय डियर वाईफ !" त्याने अभिमानाने आजूबाजूला आणि मग तिच्याकडे पाहिलं. "हे आपलं अपार्टमेंट. समोर दिसतंय ना ते लीजिंग ऑफिस. त्याच्या पलिकडे जिम आणि स्विमिंगपूल. ही सगळी झाडं आहेत ना त्यांना इतकी सुंदर फुलं येतात आणि फॉलमध्ये पानं रंगीबेरंगी होतात. त्या समोरच्या पाऊलवाटेवर दहा मिनिटं गेलं की एक छोटा लेक आहे. समरमध्ये फिरायला जायला एकदम छान." पुढे चालताचालता तो उत्साहात सांगत राहिला.
दार उघडताना कुठे त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं. ती खूप दमल्यासारखी वाटत होती. घरातल्या सगळ्यांना मागे सोडून ती आपल्याबरोबर एकटीच आली आहे, होमसिक झाली आहे हे त्याला जाणवलं. तो पहिल्यांदा आला तेव्हा त्याचे रुममेटस बाहेर गेले होते आणि रिकामं अपार्टमेंट त्याला खायला उठलं होतं. प्रेमाने तिच्या खांद्यावर थोपटत तो म्हणाला, "फ्रेश होऊन घे तू आता. तो पर्यंत मी खायचं काढतो थोडं. भूकही लागली असेल ना ?" तिने मान हलवली.
ती तोंड धुऊन, कपडे बदलून येईपर्यंत त्याने बॅगेतल्या पुरणपोळ्या, बाकरवड्या, ठेपले असं बरंच काही डायनिंग टेबलावर काढून ठेवलं होतं. प्लेटस काढून ठेवल्या होत्या. पुरणपोळीचा पहिला घास घेतल्यावर तिला एकदम भरुन आलं. आता ह्याने "काय होतंय ?" असं विचारलं तर नक्की रडू फुटणार. तशी ती अजिबात रडूबाई वगैरे नव्हती. लग्नाच्या आधीही तिने सगळ्यांना दमात घेतलं होतं की बिदाई करताना कुणीही गळे काढायचे नाहीत म्हणून. आत्ताचं हे फीलिंग तिच्यासाठी अगदी नवं होतं. त्याचं लक्ष होतंच तिच्याकडे. "नारळाच्या चटणीशिवाय घास उतरणार का खाली ? ...नाही,नाही. पुरणपोळी आणि लोणचं नाही का ? आहे माझ्या लक्षात !" तिला खुलवण्यासाठी तो मिश्किलपणे म्हणाला. पण तिच्या डोळ्यांत भरुन येणारं आभाळ त्याला जाणवलं आणि मग जास्त न ताणता तो हळुवारपणे म्हणाला. "चार घास खाल्लेस की थोडं झोपूनच घे. भारतात नाहीतरी रात्रीचे अडीच-तीन झालेत. त्यांच्या पहाटेच करु फोन."
"नको, नको. आत्ता लगेच करु. तसंही आपल्या काळजीने त्यांना झोप लागलीच नसेल. फोनची वाटच बघत असतील सगळे."
"ओके.ओके. तू म्हणशील तसं." तो समजुतीने म्हणाला. "पण मग थोडी चिअर अप हो पाहू. तुझा रडवेला,थकलेला आवाज ऐकला तर किती काळजीत पडतील सगळे."
ती मुकाट्याने खाली मान घालून पोटात घास ढकलत राहिली. काय होतंय नक्की ? तिने स्वत:लाच विचारुन पाहिलं. कुठल्याही प्रकारची अस्वस्थता आली की मन खणून बघायची सवयच होती तिला. विमानात अजिबात झोप लागली नाही त्याचा परिणाम हा बहुतेक. त्या आधीही महिनाभर खरेद्या, पाहुणे ह्यात दगदग खूप झालीय. तोच थकवा बाहेर येतोय आता. नाहीतर इतकं सगळं छान मनासारखं झालंय. इट्स लाईक अ ड्रीम कम ट्रू ! मनासारखा नवरा मिळाला तेही चहा-पोह्यांच्या कार्यक्रमाशिवाय. एवढं ’लो’ वाटायला झालंय काय ? तिने हळूच त्याच्याकडे पाहिलं. पुरणपोळीचं जेवण तो अगदी चवीचवीने जेवत होता. प्रत्येक घासाला मचक-मचक आवाज येत होता. बाकी सारं कसं शांत शांत. येस्स ! तिला एकदम जाणवलं की घरात भलतीच शांतता आहे. जन्मापासून चाळ-टाईप घरात वाढलेली ती. चाळ टाईप म्हणजे छोटं तीन खोल्यांचं घर पण सगळ्यांचा व्हरांडा कॉमन. शेजारीपाजारी सगळ्यांशी संबंध इतके चांगले की दुसरं घर घेतलं तरी तिचे आई-बाबा तिथे राहायला गेले नाहीत. इथेच राहिले. त्यांची सोसायटी म्हणजे जणू नांदतं गोकुळच. दिवसभर कुणीही कुणाच्या घरात डोकवावं. गप्पाटप्पा कराव्यात. सासरची लोकंही मोकळीढाकळी, हौशी. लग्न झाल्यावर पंधरा दिवस घर कसं नातेवाईकांनी भरलेलं होतं. अखंड बडबड, हशा, चेष्टामस्करी ह्यांना उत आलेला नुसता. त्यानंतर एअरपोर्टवर अठरापगड लोकांची संदर्भहीन गजबज. तिच्यासाठी नसली तरी तिला वेढून असलेली. एकटंएकटं वाटू न देणारी. मग सतत कानात घुमत राहिलेला विमानाच्या इंजिनाचा आवाज. आणि आता त्या कोलाहलानंतरची ही नीरव शांतता. रस्त्यावर चिटपाखरु नाही, घरात साधा पंख्याचाही आवाज नाही. एखाद्या चित्रपटात ढॅण-ढॅण संगीत वाजत असताना सगळा आवाज अचानक शोषला जाऊन त्या अनपेक्षित शांततेनेच डोकं भणभणून जावं तसं झालंय. गोंगाटात शांत बसणं सोपं पण शांततेत मनातला गोंगाट थांबवणं महाकठीण. आता जास्त विचार करुन मूड अजून बिघडवायचा नाही. घरी फोन करुन खुशाली कळवायची. मुख्य म्हणजे घरच्यांना आणि समीरलाही उगीच टेंशनमध्ये टाकायचं नाही. मनाशी असं ठरवून घेतलं तेव्हा कुठे तिला जरा बरं वाटलं.

*********

सकाळची झोप उघडली तेव्हा घड्याळ्यात नऊ वाजलेले बघून तिला धक्काच बसला. इतका वेळ झोपलो होतो आपण ? तिला आठवलं रात्री तीनलाच टक्क जाग आली होती. घरात उगीचच एक चक्कर मारुन झाली, पुस्तक चाळून झालं, टिव्हीवर चॅनल्स बदलून झाले. मग थोड्या वेळाने नाईलाजानेच ती डोळे मिटून आडवी झाली. लहानपणी झोप येत नसली तरी आईच्या दटावणीने डोळे गच्च मिटून पडून राहायची तशी. असं सक्तीने झोपेचं अ‍ॅक्टिंग करताकरता कधीतरी खरीच झोप लागून जायची तशीच आत्ताही लागून गेली होती. बाहेरचं मळभ बघून नऊ वाजलेत असं बिलकूल वाटत नव्हतं. काहीशी आळसावूनच ती पांघरुणात गुरफटून पडून राहिली. पडल्यापडल्या समोरच्या फ्रेंच विंडोतून दिसणारं दॄश्य बघत राहिली.
"गुड मॉर्निंग.कसं वाटतंय आज ?" तो ऑफिसला जायला तयार झालेला पाहून ती गडबडीने उठून बसली.
"ठीक वाटतंय. इथे कधी ऊन पडतच नाही का रे बाहेर ?" विचारुन विचारुन हा प्रश्न आपल्या तोंडातून बाहेर यावा ह्याचं तिलाच आश्चर्य वाटलं.
तिचा प्रश्न ऐकून तो तिच्याजवळ येऊन बसला, " आय गेस, तुला दिवसभर एकटं राहणं थोडं कठीण जाणारे आज. मी लवकर यायचा प्रयत्न करेन.ओके ?" कालपासून त्रास देणारं परकेपणाचं फिलींग परत एकदा घेरु पाहतंय ह्याची तिला जाणीव झाली.
"तुला नाही का आलाय जेटलॅग ? " काहीतरी विचारायचं म्हणून तिने विचारलं.
"पाचला जाग आली होती. तू झोपली होतीस मग नाही उठवलं. अ‍ॅंड स्वीटहार्ट, आय हॅव टु गो बॅक टु वर्क. जेटलॅगचा विचार करायला वेळच कुठे आहे ? आधीच तीन आठवड्याच्या सुट्टीमुळे खूप बॅकलॉग झालाय."
त्याच्या तोंडातून वाक्य अगदी सहज निघून गेलं होतं पण तिला मात्र अगदी जखमेवर मीठ चोळल्यासारखं झालं. इथे यायचं म्हणून तिने तिच्या चाळीस हजाराच्या नोकरीवर पाणी सोडलं होतं. एकदा निर्णय घेतला ना मागचे दोर कापायचा. आपल्या इच्छेने नोकरी सोडली, देश सोडला मग का हाकललेल्या माशीसारखं लोचटासारखं निगेटिव्ह विषयांकडे येतोय आपण. छे,छे. काय चाललंय हे. ती स्वत:वरच वैतागली. ते विचार झटकून टाकण्यासाठी मग तिने जराश्या बेपर्वाईनेच स्वत:शीच खांदे उडवले. "आय अ‍ॅम सॉरी समीर. कालपासून काय होतंय कळतंच नाहीये. खूप डल वाटतंय. जस्ट गिव्ह मी सम टाईम.आय विल बी फाईन !" हे बोलल्यावर तिला आतून खूप बरं वाटलं. नुसते डोक्यात राहिलेले विचार म्हणजे ठसठसणाऱ्या गळवासारखे असतात. त्यांना शब्दांची सुई लावून फोडलेलंच बरं. निचरा तरी होऊन जातो.
त्याने मायेने तिच्या विस्कटलेल्या केसांतून हात फिरवला. "दॅट्स लाईक अ गुड गर्ल. मला माहिती आहे की तुझं आयुष्य आत्तापर्यंत खूप बिझी होतं. निवांतपणाही झेपत नाही गं एकदम आणि असं कायम थोडीच घरी बसून राहणारेस तू ? पण नव्याने सगळं सुरु करायला वेळ तर लागणारच." तिने समजूत पटल्यासारखी मान डोलावली आणि त्याला अजून काळजी वाटू नये म्हणून मग शहाण्या मुलीसारखं हसत बाय सुद्धा केलं.

*********

दारावर टकटक झाली तेव्हा गिरीजाला थोडं आश्चर्य वाटलं. इथे कोण येणार असं दुपारच्या वेळेला दार वाजवून ? समीरचाही नुकताच फोन येऊन गेला होता. थोडंसं बिचकतच तिने पीपहोलला डोळा लावून पाहिलं. बाहेर पंजाबीड्रेस आणि हातभर बांगड्या घातलेली एक भारतीय मुलगी उभी होती. साधारण तिच्याएवढीच असावी वयाने. तिने चटकन दार उघडलं.
"हाय, मेरा नाम नैना है । तुम समीरकी वाईफ हो ना ? हम भी इसी बिल्डिंगमें रहतें हैं । मेरे हजबंड और समीरभैय्या एकही कंपनीमें काम करते है ।" तिचं ते समीरभैय्या ऐकून गिरीजाला हसूच येत होतं पण ते दाबून तिने म्हटलं, "मेरा नाम गिरीजा है । आओ ना अंदर ।"
"नहीं,नहीं. इन फॅक्ट मैं ही आपको बुलाने के लिये आयी थी । यहाँ रहनेवाली लडकिया दोपहरमें किसी एक के घर मिलतीं है हररोज । भैय्या इनको कह रहें थे के तुम्हे थोडा अकेला लग रहा था तो मैनें सोचा तुम्हारीभी पहचान करवाऊँ सबसे ।" नाही म्हणायला काही कारण नव्हतंच. दार ओढून घेऊन गिरीजा लगेचच नैनाबरोबर बाहेर पडली.
"यहाँ बहुत ज्यादा देसी लोग नहीं हैं लेकिन अपने अपार्टमेंटमें दस-बारा फॅमिलीज हैं । हजबंड लोग कामपे जाते हैं तो घरमें बैठे बैठे पक जाते हैं । साथमें बैठे तो टाईमपास हो जाता है ।" बोलताबोलता नैना तिच्या अपार्टमेंटचं दार उघडून घरात शिरली. घरात चार-पाच मुली, दोन-तीन छोटी पोरं बघून तिला थोडं माणसांत आल्यासारखं वाटलं. सगळ्या तिच्याकडे काहीशा कुतुहलाने बघत होत्या. एखाद्या नवीन कैद्याला तुरुंगात ढकलल्यावर बाकीचे कैदी जसे बघतील तशी ही नजर आहे की काय असा एक पुसटसा विचार उसळी मारु पाहत होता पण तिने निग्रहाने त्याला बांध घातला. पण पाच मिनिटांतच तिचं तिथे असणं त्यांना सवयीचं झालं आणि परत त्या गप्पांत गुंगून गेल्या. एकीकडे अगदी मनापासून आणि काहीशा भोचकपणे तिची चौकशीही करु लागल्या. ती सुद्धा त्यांच्याबद्दल मतं बनवत होतीच. सौम्या थोडी अबोल वाटली पण हसतमुख होती. विधीला गप्पा मारायचा खूपच उत्साह होता पण जुळ्या मुलांच्या मागे धावण्यातच तिचा निम्मा वेळ खर्ची पडत होता. पूजा भयंकर आगाऊ वाटत होती. रेडियो लावल्यासारख्या मोठ्या आवाजात तर बोलत होतीच पण मस्ती करणाऱ्या मुलाकडे खुशाल दुर्लक्षही करत होती. अजून अर्धा तास हिचा आवाज ऐकत राहिलं तर खात्रीने डोकं कलकलायला लागणार अशी तिची खात्रीच पटली. अमिताला स्वत:चं काही मतच नव्हतं. पूजाचं वाक्यनवाक्य तिला पटत होतं असं एकंदर वाटत होतं. पण तिची घार्‍या डोळ्यांची छोटी बाहुली खूपच गोड होती. तिच्याशी खेळत बसलं तर पूजाच्या बोलण्याकडे सहज दुर्लक्ष करता येईल, गिरीजाला वाटलं. त्यातल्यात्यात नैनाच बरी वाटली.
"तो तुम इंडियामें जॉब करती थी क्या ?" कुकिंग, रेसिपीज, हवापाणी, कपडे, दागिने हे निरुपद्रवी विषय सोडून पूजाने मधूनच तिच्याकडे रोख वळवला.
"हाँ । ... एचडीएफसी एच.आर. डिपार्टमेंटला. "
"फिर यहाँ H4 पे आयी हो क्या ?"
तिने नुसतीच मान हलवली. आता हिने डिपेन्डन्ट व्हिसाचा विषय सोडून दुसर्‍या कुठल्यातरी विषयाकडे वळावं असं गिरीजाला अगदी तीव्रतेने वाटलं.
"फिर तो तुम बहुत बोअर हो जाओगी यहाँ । कोई बात नहीं, हमारे साथ आना शुरु करो । हमारे पॉटलक होतें रहते हैं । कभी किसी एक के घरपें मिलके साथमें खाना बनातें हैं । कभी चायपे मिलते है । समरमें साथमें वॉक लेने जातें हैं ..."
"अरे,अरे । उसको क्यूँ हमारे साथ घसीट रहीं हो ? ... तिचं आत्ताच तर लग्न होतंय. तिला जरा नवर्‍याबरोबर रोमॅन्स करु दे." पूजाला मध्येच थांबवत विधी हसतहसत म्हणाली.
तिला सारखी कॉलेजमधल्या, ऑफिसमधल्या मैत्रिणींची आठवण होत होती. ह्या जगाहून ते जग किती वेगळं होतं. गप्पा, गॉसिप्स, चेष्टामस्करी होतच होती पण त्याचं स्वरुप किती वेगळं होतं.
तुम्ही पुस्तकं वाचत नाही का, वाचलेल्या पुस्तकावर चर्चा करत नाही का, इथली प्रदर्शनं, मैफिली, नाटकं असं काही बघायला जात नाही का ? की फक्त कोण कुठल्या पार्टीत कसं दिसलं होतं, कुणी कुणाला कशी ओळख दिली किंवा दिली नाही, कोण फ्लर्ट करत होतं, आज जेवायला छोले करायचे की राजमा इथपर्यंतच तुमची धाव असं काहीतरी खरमरीत बोलायचं तिला सुचत होतं. पण मग विधीचं बोलणं ऐकून ती नुसतीच नववधू हसेल तशी हसली. तसंही आपल्याला त्यांच्या गप्पांचा राग आलाय की ज्याला आपण इतके दिवस ’टिपिकल’ समजत होतो त्याच गटात आपणही भरती होऊ घातलोय ह्याचा हे तिला नीटसं कळलंच नव्हतं.
"हाँ,हाँ । अभी मजें कर लो गिरीजा । नहीं तो फिर ..." अमिताने जाणूनबुजून वाक्यं अर्धवट सोडत तिच्याकडे पाहून डोळे मिचकावले.
"नहीं तो फिर क्या ?" विधीने हसत विचारलं.
"अरे मैं बताती हूँ ! ... कल रिषभ जल्दी सोया तो इन्होंने कहाँ चलो आज करतें है, आजकल मौका नहीं मिलता । ...पण कसचं काय, तेवढ्यात ह्याचं झोपेतून उठून चालू ...’मम्मी’ " सगळ्या जोरजोरात हसल्या. गिरीजा थक्कच झाली. किती निर्लज्ज, उघडंवाघडं बोलतात ह्या बायका. तिला एकदम कानकोंडं झालं. ह्यांच्या उथळ गप्पांपेक्षा कालपासून छळायला उठलेली शांतता पुष्कळच बरी होती हे जाणवलं आणि तिला अजूनच उदास वाटलं. नाईलाजाने फुटकळ गप्पा अंगावर घेत समुद्रातल्या बेटासारखी ती अलिप्त बसून राहिली.

*********

लॅच-की ने दरवाजा उघडून समीर आत आला. घरातले दिवेही न लावता गिरीजा तशीच अंधारात सोफ्यावर पाय वर घेऊन बसली होती. त्या अंधारात बाहेर साकळलेला जांभळट संधीप्रकाश अजूनच डिप्रेसिंग वाटत होता. थोडंसं धसकूनच त्याने पटापट सगळ्या खोल्यांतले दिवे लावले. गिरीजाने मान वर उचलून त्याच्याकडे पाहिलं. रडून तिचे डोळे लाल झाले होते.
"तू का सांगितलंस त्या नैनाच्या नवर्‍याला मला एकटं वाटतंय असं ?"
गिरीजाचा प्रश्न ऐकून त्याला कसलाच अर्थबोध होईना.
"तो विचारत होता तुझ्याबद्दल. सहजच म्हटलं त्याला की रुटिन बसेपर्यंत थोडा कंटाळा येणार म्हणून. का काय झालं ? आणि तू फोन का उचलत नव्हतीस ? किती घाबरलो मी माहितीये."
"वेल, तुझ्या असं सांगण्यामुळे ती नैना मला तिच्याकडे घेऊन गेली. किती टिपिकल एच-फोर हाऊसवाईव्ज आहेत त्या सगळ्या. काय त्यांचं ते पसरट वागणं, आचरट बोलणं. आय कान्ट बिलिव्ह, तुझ्याशी लग्न करुन मी ह्या अशा बायकांच्या पंक्तीत जाऊन बसलेय."
तिचा एकंदर मूड पाहून आधीच विरस झाला होता. हे वाक्य ऐकल्यावर हसावं की रडावं असा त्याला प्रश्न पडला.
"हाऊ कॅन यु से दॅट ? त्यांची आणि तुझी तुलना कशाला करते आहेस उगाच ? फक्त तू ही एच-फोर व्हिजावर इथे आलीयेस म्हणून ?"
"हो,ही आणि नाही ही. इथे आल्यापासून काय होतंय हे मलाच समजत नाहीये समीर. मी खूप वेगळ्या वातावरणात वाढलीय. इतक्या शांततेची सवयच नाही मला. मला माणसं आवडतात पण ... पण ती ह्या आज भेटलेल्या बायकांसारखी नाही. आय अ‍ॅम फीलिंग सो आऊट ऑफ प्लेस हिअर. इथलं आयुष्य वेगळं असेल ह्यासाठी मी मनाची तयारी केली होती समीर पण हे मला वाटलं होतं त्यापेक्षा खूप वेगळं आहे. इथली जीवघेणी शांतता, ढगाळ हवा, बंदं घरं, तुझ्या कलीग्जच्या बायका. कालपासून जे जे पाहतेय त्यातलं काहीच मला आवडत नाहीये."
तिचं बोलणं ऐकता ऐकता तो स्वत:शीच पुटपुटला, "तरी मावशी सांगत होती ...."
त्याच्या मावशीचा उल्लेख ऐकून ती एकदम थांबली. त्याच्या मावशीची दोन्ही मुलं अमेरिकेत होती. वर्षातले सहा महिने त्या इथेच असत. तिला पहिल्यांदा पाहिल्यावर ’अगं बाई, फोटोपेक्षा प्रत्यक्षात बरीच बरी दिसते की !" असं नाक फेंदारुन म्हणणाऱ्या मावशी तिला जरा स्नॉबिशच वाटल्या होत्या. समीरचंही मत फार वेगळं होतं असं नाही त्यामुळे आत्ता हे बोलून आपलं ’परि तू जागा चुकलासी’ झालेलं आहे हे लक्षात येऊन त्याने जीभ चावली.
"काय म्हणाल्या मावशी ? कळू तरी दे.."
तो गप्पच राहिला.
"आता बर्‍या बोलाने सांगतोस की ..."
एकेक शब्द जपून उच्चारत तो हळूच म्हणाला, "मावशी म्हणाली होती की ही मुलगी माणसांचा राबता असलेल्या घरात वाढलीय. तिला कठीण जाईल ..."
"चाळीत वाढलीय असंच म्हटल्या असणार त्या ? हो ना ? उगीच गुळमुळीत कशाला बोलतोयंस ?"
"गिरीजा, तू विपर्यास करते आहेस."
"मी विपर्यास करते आहे ? मी ?" बोलता-बोलता तिला पुन्हा रडू यायला लागलं.
तिला कसं हॅंडल करावं हे त्याला कळेचना. लग्न केल्यावर पुरुषांना जोखडात अडकल्यासारखं होतं म्हणे पण इथे तर ....! त्याला एकदम धास्तावल्यासारखं झालं. नुकतंच लग्न झालेलं. म्हटलं तर ओळख होतीही, म्हटलं तर नव्हतीही !
तसं तिचं म्हणणं त्याला कळत नव्हतं असं नव्हे पण म्हणून तिच्यासारख्या हुशार मुलीने अशी रडारड करावी. सुरुवातच ही अशी तर पुढे कसं निभावणार आपलं असं काहीसं मनात येऊन त्याला अचानक खूप टेंशन आलं. कालपासून राखून ठेवलेला संयम आता अगदीच संपलाय असंही वाटलं. "यु नो व्हॉट ? तू आत्ता खरंच अगदी टिपिकल एच-फोर बायकोसारखं वागते आहेस."
म्हणजे कसं ? रडतारडताच तिने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं.
"माझ्या ऑफिसातले देसी कलीग्ज सांगत असतात ना. घरी बसतात आणि मग आपापल्या नवऱ्यांची डोकी खातात... हेडस्ट्रॉंग हेनपेकिंग हाऊसवाईफ हूज अ कंप्लीट हेडेक !"
ती अवाकच झाली. "ओह, लग्न होऊन पंधरा दिवस नाही झाले आणि ही डेफिनिशन तयार आहे हं तुझ्याकडे."
"हे मी नाही, तू ज्या बायकांना आज भेटलीस त्यांचे नवरे ..."
"ते बोलतात आणि तू इतकं छान लक्षात ठेवतोस ह्यातच आलं सगळं." ती दार उघडून तरातरा बाहेर पडली. तो घाईघाईने तिच्यामागे धावला. ती कॉरिडॉरच्या टोकाशी पोचली होती पण बाहेरच्या थंड हवेत जाणं प्रॅक्टिकल नाहीये हे उमजून तिथेच दारापाशी थांबली होती.
"घरी चल. आपण शांतपणे बसून बोलू." तो दबत्या आवाजात म्हणाला.
"आय डोन्ट वॉन्ट टु !"
"गिरीजा, प्लीज तमाशा करु नकोस, इथली घरं बंद असली तरी इथेही भिंतींना कान आणि खिडक्यांना डोळे असतात."
हे ऐकून मात्र ती थोडी वरमली आणि मुकाट्याने परत फिरली.
त्याने हाताला धरुन तिला सोफ्यावर बसवलं. हातात पाणी आणून दिलं आणि थकलेल्या आवाजात तो तिला म्हणाला, "आय अ‍ॅम रियली सॉरी. शब्दाने शब्द वाढवायला नको होता मी सुद्धा. आणि तो एच-फोरचा लॉंगफॉर्म. दॅट वॉज क्रुएल ! मलाही कळलं नाही मी असं का बोललो."
ती गप्पच राहिली. खाली मान घालून हळूहळू रडत राहिली.
त्याने तिचे हात हातात घेतले, "गिरीजा, अगं सगळं सेटल होईपर्यंत थोडा त्रास होणारच. व्हाय आर यु सडनली अ‍ॅक्टिंग लाईक अ किड ? किती प्लॅन्स केले होते आपण. किती आनंदात होतीस तू आणि आता काय झालंय तुला अमेरिकेत पाऊल टाकल्यापासून ... आत्ता कुठे फक्त आपल्या दोघांचं असं आयुष्य सुरु होतंय. व्हाय आर वि स्टार्टिंग ऑन सच अ रॉंग नोट ?"
कालपासून दाटून गच्च झालेलं तिच्या मनाचं आभाळ ही सर येऊन गेल्यावर बरंच मोकळं झालं होतं पण त्याच्याकडे बघून आता कुठे तिच्या लक्षात आलं की ह्या पावसाने त्याला फारच भिजवलंय. दुखावला गेलाय तो ! तिला खूप खूप वाईट वाटलं. "आय अ‍ॅम सॉरी टु ! खूप वेड्यासारखं वागतेय मी. मला समजून घे समीर." ती पडलेल्या आवाजात म्हणाली.
"ऑफ कोर्स, तुला समजून घेतोच आहे मी. ह्यापुढेही घेणार आहे." त्याने एक सुस्कारा सोडला. "मला वाटलं होतं की तुझा जेटलॅग जाईपर्यंत थांबावं पण आता आपण उद्याच लायब्ररीत जाऊ. तुझी मेंबरशिप करुन टाकू. काही व्हॉलंटरी वर्क मिळवता येतंय का ते ही बघूया लवकरात लवकर."
आपण पहिल्याच दिवशी फार घायकुतीला आलो हे जाणवून तिला चक्क लाज वाटली स्वत:ची. पण आता काही सफाई द्यायला जाणं म्हणजे अजूनच बालिशपणा. त्याच्या बोलण्यावर तिने मग मुकाट्याने मान हलवली.
तिच्यापासनं उठून तो आत निघून गेला तेव्हा त्याला तसं पाठमोरा पाहताना तिला जाणवलं की एका दिवसात ह्याचे खांदे किती झुकल्यासारखे दिसतायंत.

*********

"व्हाय आर वि स्टार्टिंग ऑन सच अ रॉंग नोट ...." त्याचं ते वाक्य आठवून तिला कससंच झालं. कुठे सुरु झाली आपली नोट ? काल ह्या घरात पाऊल टाकल्यावर. छे ! मग मुंबईत विमानात चढलो तेव्हा ? देवाब्राह्मणांच्या साक्षीने लग्न केलं तेव्हा ? आपल्याला भेटायला तो पहिल्यांदा आपल्या घरी आला तेव्हा ? की आमच्या मुलासाठी आम्ही गिरीजाला मागणी घालतोय असा त्याच्या आईचा फोन आला तेव्हा ? ... ती सावकाश रिळं उलगडून पाहू लागली. समीर तिच्या भावाच्या मित्राचा आत्येभाऊ. त्यांच्या सोसायटीच्या गणेशोत्सवात, मित्राच्या लग्नात असं कुठे कुठे भेटून दोघेही एकमेकांना थोडंफार ओळखत होते. पण ते तितकंच. इंजिनियरिंगनंतर तो अमेरिकेला एम.एस. करायला आला, मग नोकरी धरली त्या पाच-सहा वर्षांत ती जवळजवळ विसरलीच होती त्याला. त्याच्या मात्र ती चांगलीच लक्षात होती. त्याच्या भावाकडून तिने कुठे लग्न ठरवलं नाहीये ना ह्याचा अंदाज घेऊन त्याने आई-वडिलांकरवी तिला रीतसर मागणीच घातली. तिला तर तो नीट आठवत सुद्धा नव्हता. एक बारीक, उंच, सावळासा मुलगा एवढीच तिची आठवण. त्याचा फोटो पाहून मात्र ती इंप्रेस झाली. आधीच्या पोरगेल्या रुपापेक्षा आताचा समीर खूपच वेगळा होता. रुबाबदार, अंगाने भरलेला, डोळ्यांत आत्मविश्वास झळकत असलेला. इट वॉज नॉट अ लव्ह अ‍ॅट फर्स्ट साईट पण पुढे जायला, त्याला भेटायला हरकत नाही ह्यावर तिचं आणि घरच्या सगळ्यांचंच एकमत झालं. बाकी सगळं चांगलंच होतं पण त्याच्याशी लग्न करायचं तर छान बस्तान बसलेली नोकरी सोडावी लागणार होती. आणि सगळं जुळलं तर महिनाभरात लग्न करुन त्याच्याबरोबर अमेरिकेला जावं लागणार होतं. त्यासाठी तिच्या मनाची तयारी होत नव्हती. त्याच्याशी फोनवर बोलताना, चॅट करताना, त्याने पाठवलेले मेल्स वाचताना मात्र तिला ह्या घालमेलीचा विसर पडायचा. असं का बरं होत होतं ? मग एक दिवस तो तिला प्रत्यक्ष भेटायला आला. घरी मोकळेपणाने बोलता येणार नाही म्हणून दोघं मरीन ड्राईव्हला फिरायला गेले. ती संध्याकाळ आठवून आत्ताही तिच्या मनावर मोरपीस फिरलं. खूप बोलले होते दोघेही. आत्तापर्यंतच्या आयुष्याबद्दल, स्वप्नांबद्दल, भविष्यातल्या बेतांबद्दल. आवडत्या गाण्यांबद्दल, वेड्या क्रशेसबद्दल. मह्त्वाचं आणि बिनमहत्वाचं, दोन्ही ! पिवळंधम्मक ऊन केशरी झालं आणि सूर्य बुडाला तरी बोलणं संपेचना. कधीतरी मध्येच मग गप्पा अस्पष्ट होऊन आजूबाजूच्या आवाजात विरुन गेल्या. आपल्यातल्या नात्याची तार तेव्हाच छेडली गेली होती का ? ... डोळे मिटून ते क्षण जगत असलेल्या गिरीजाने एक मोठ्ठा श्वास घेतला. समुद्राचा खारा वारा अगदी तसाच आतपर्यंत झिरपला. ... तोच तो क्षण ! निर्णयाचा. समीर एकीकडे आणि जगातल्या बाकी गोष्टी दुसरीकडे ह्याचा साक्षात्कार होण्याचा. त्या क्षणी कुठलीही चलबिचल झाली नाही, विकल्प आले नाहीत, क्षुल्लक किंतु-परंतुंनी पाय मागे खेचले नाहीत. पुढची वाट कशी लख्ख दिसली होती त्या क्षणी. असा कसा निसटू दिला आपण तो क्षण मुठीतून ? का नाही पकडून ठेवला घट्ट ? की शहाणपण एका क्षणाचंच असतं ? आणि मग बाकीच्या असंख्य वेड्या क्षणांखाली तो एक क्षण गाडला गेला म्हणजे ? नाही, नाही असं नाही होऊन चालणार.
गेल्या चोवीस तासांतल्या नकोशा क्षणांची धूळ निग्रहाने झटकून ती उठली. बेडरुममध्ये आरामखुर्चीत डोळे मिटून बसलेल्या समीरच्या पायाशी बसून तिने हळूच आपलं डोकं त्याच्या मांडीवर टेकवलं. त्या स्पर्शातून तिचं मन शांत झालंय हे त्याला जाणवलं. गिरीजाला वाटलं हा आश्वासक स्पर्श अनुभवत असंच बसून राहावं. उठूच नये. त्यानंतरचे कित्येक क्षण मग नुसतेच नि:शब्द ठिबकत राहिले.

समाप्त.

गुलमोहर: 

अगो,

कथा चांगली आहे. आवडली. एक वेगळा दृष्टीकोन म्हणून आवडली. मात्र दोन किरकोळ निरीक्षणे..

१.
>> ...ज्याला आपण इतके दिवस ’टिपिकल’ समजत होतो...

इतके दिवस असं म्हणायला वाव नाहीसं दिसतंय. केवळ एकंच दिवस झालेला गिरिजाला. बहुधा हा प्रसंग तीनेक महिन्यांनंतर घडलेला असू शकतो.

२.
>> लॅच-की ने दरवाजा उघडून समीर ...

इथपासून पुढील कथा सहा महिन्यांनी घडलेली वाटते.

असो.

पुढील लेखनास शुभेच्छा! Happy

आ.न.,
-गा.पै.

कथा थोडी अर्धवट वाटली. पुढे गिरीजा कशी adjust होते, तिचा outlook कसा बदलतो(library, social work, school, काहीतरी artistic करतेय) अस काहीही वाचायला आवडल असत.

छान लिहीलस अगो. घालमेल अचूक टिपलीस. Happy
पण आत्ता सुरवात झाली असं वाटत असताना एकदम समाप्त केलीस. बी एस म्हणतायत तसं पुढे वाचायला आवडलं असतं. Happy

कथा थोडी अर्धवट वाटली. पुढे गिरीजा कशी adjust होते, तिचा outlook कसा बदलतो(library, social work, school, काहीतरी artistic करतेय) अस काहीही वाचायला आवडल असत..>>> मलाही पुढे वाचायला आवडेल. कदाचित ती सुध्दा टीपिकल एच फोर हाऊसवाईफ झाली असेल.

प्रामाणिकपणे सांगतो की तीन दिवस झाले, पहिल्या पॅरामधील जेटलॅगच्या उल्लेखापुढे जाऊच शकत नव्हतो. जावेसे वाटत नव्हते. आज वेळ होता आणि पेशन्सनी सगळे वाचले.

प्रामाणिक मते:

========================

१. ओव्हरऑल इफेक्ट अतिशय सुंदर

========================

२. तीन वाक्ये अत्यंत आवडली.

- कुठल्याही प्रकारची अस्वस्थता आली की मन खणून बघायची सवयच होती तिला.

- नुसते डोक्यात राहिलेले विचार म्हणजे ठसठसणाऱ्या गळवासारखे असतात. त्यांना शब्दांची सुई लावून फोडलेलंच बरं. निचरा तरी होऊन जातो.

- की शहाणपण एका क्षणाचंच असतं ? आणि मग बाकीच्या असंख्य वेड्या क्षणांखाली तो एक क्षण गाडला गेला म्हणजे ? नाही, नाही असं नाही होऊन चालणार.

========================

३. प्रथमच गामा पैलवान यांच्याशी असहमत आहे. टाईम एलिमेन्टचे परफेक्शन नोंदवणे ही या व अशा कथांची तितकीशी गरज नसावी वा तशी अपेक्षा नसावी असे वाटते.

=======================

४. तीन दिवस ही कथा वाचायचा उत्साह न वाटण्याचे कारण म्हणजे कथा काय आहे व कोठे सुरू होते हा अंदाजच येत नाही. शेवटि समजते की कथानायिकेची मनस्थिती हाच कथेचा आत्मा आहे. या कोनातून पाहिल्यास कथा पहिल्या काही वाक्यात पकड घेतच नाही असे मला वाटते. किंवा भरपूर वेळ असलेल्या व खूप वाचन करून झाल्यानंतर आता काय वाचावे असा प्रश्न पडणार्‍यांना असा उत्साह ठेवता येईल असेही वाटले.

=======================

५. मला तरी असे वाटते की या कथेतून अनेक प्रश्नांना स्पर्श केला गेलेला आहे. कळत वा नकळत! ते प्रश्नः

- लग्नसंस्थेत समाजरचना, प्रतिष्ठा व धनसंपदेच्या आवरणात एका स्त्रिची होऊ शकणारी मानसिक फरफट

- निर्णय घेण्याच्या क्षणी वाहवत जाण्याची किंवा निर्णय क्षमता जारी न करण्याची काही लोकांची प्रवृत्ती

- जे हवे आहे किंवा हवे होते असे वाटत होते त्याचे वास्तव जाणवल्यानंतर त्याबाबतचा दृष्टिकोन बदलणे

- आपल्या संस्कृतिशी अजिबात मिळतीजुळती नसलेल्या संस्कृतीत धन, प्रतिष्ठा या कारणांसाठी जाणे व त्यातून उद्भवलेले व कुटुंबातील काहीच घटकांना जाणवणारे प्रश्न

=======================

६. वातावरणाचे व मनस्थितीचे समांतरत्व कुशलतेने मांडले गेले आहे. जांभळट प्रकाशामुळे अधिकच डिप्रेसिंग वाटणे हे त्यातीलच एक उदाहरण!

======================

७. कथा म्हणून कथेत काहीही दम नाही असे एक शेवटी वाटू शकते. कारण ही केवळ एक प्रातिनिधिक मनोवस्था वर्णिलेली आहे व त्याला कथानकाचे स्वरूप आहे हे का मान्य करावे असेही (उगाचच?) वाटून गेले.

======================

८. तरीही जे काही आहे आपल्याला भेडसावणारे नसले तरीही अस्वस्थ करणारे नक्कीच आहे व त्यामागे शब्दांची ताकद उभी आहे हे पटते.

अधिक उणे बोलले गेल्यास क्षमस्व!

-'बेफिकीर'!

>>>>ही कथा अमेरिकेला येउ घातलेल्या लग्नोत्सुक मुलिंसाठी मार्गदर्शक Dos & donts सांगायला किंवा h4 housewives बद्दल अनुमानं काढायच्या उद्देशाने लिहिलेली वाटत नाही>>>><<
अगदी बरोबर!

पण वरती ज्याला कोणाला उगीच अशी भिती वाटते ती निरर्थक आहे. उगीच उतावळी कमेंट वाटली.
असे लेख/ललित आले रे आले की, अग बाई, समाजाच्या मनावर काय परीणाम होतील अशी काहींना उगीच नैतिक जबाबदारीच वाटत असते की काय? व अश्या नैतीक जबाबदारीचा कैवार घेतलाय टाईप वरची एक उतावळी प्रतिक्रिया वाटली. Proud

>> हे व्यक्तिसापेक्ष आहे. सत्यपरिस्थिती वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळी असू शकते पण तरी एच-फोर म्हणजे वाईटच असा समज होऊ नये म्हणून मी माझा पहिला प्रतिसाद बदलत आह>><

Happy

----------------------

मी h4 आलेले नाही. पण नोकरी नसलेल्या काळात अश्या विभिन्न बायकांशी अगदी थोडाकाळ झालेला संवाद जो खरे तर एकाच भेटीचा होता पण लगेच कळले की they are not my types.. त्याच त्या पॉटलक पार्ट्याचे विषय , तुझ्या नवर्‍याचा प्रॉजेक्ट मोठा की माझ्या, मी तुझ्या आधी आले की तू... आणी बरेच कंटाळवाणे विषय.
आता "अनायासे"(म्हणजेच मराठीत Coincidentally) मला भेटलेल्या त्या बायका सुद्धा H4 वरच आलेल्या होत्या. ह्यात त्या बायकांचे H4 स्टॅटस नसून त्या व्यक्तींचा स्वभाव गुणधर्म व मिळालेला फुकट वेळ नक्की कसा घालवावा माहीत नसलेल्याने उडालेला गोंधळ कारणीभूत असावा असे वाटते.
( मलाही आधी खरे तर हाच प्रश्ण पडला की, रोज रोज दुपारच्या काय त्याच त्याच गप्पा मारतात..पण विचार केल्यावर वाटले empty mind.. devil's house.. असे असते अश्यांच्या बाबतीत...असो.)

दुसरे म्हणजे, खरे तर dependant visa(H4 म्हणण्यापेक्षा) वर आलेल्या बर्‍याच मुली "स्वेच्छेने" डोळसपणे तोलून मापून निर्णय( म्हणजे अमेरीकेतील नवरामुलगा आहे ह्याची पुर्ण कल्पना व जाणीव असून घेतलेला निर्णय) घेतात व निभावतातही शेवटी थोडा काळ इथे राहिल्यावर.

हा इथला विषय नाही पण अश्या मुली सुद्धा पाहिल्यात ज्या रोज अश्या वादात असतात नवर्‍याबरोबर की तुझ्यासाठी नोकरी सोडली, घर सोडले... जरी त्या स्वेच्छेनेच आल्या असल्या तरी.
काही मुली उगाच आपल्या ह्या (depedant visa वर यायच्या निर्णयाची)निर्णयाची महानता रेटत बसतात... की मी किती त्याग केलाय ६०,००० नोकरी सोडलीय वगैरे. जाणून बुजून अपराधी भावना वाढवत ठेवून दुसर्‍याला(इथे नवर्‍याला ) रोज अपराधी भावनेच्या फासावर चढवणार्‍या बायकाही(इथे बायकांचा विषय आहे म्हणून depedant visa वर आलेल्या काही 'बायका') कमी नसतात हे ही नसे थोडके.

मान्य आहे की प्रत्यक्षात इथील अमेरीकेतील परीस्थिती वेगळी असते व तिला सामोरी प्रत्येकालाच जावे लागते, मग तो H4 असो की H1, L1 अथवा F1 आलेला कोणीही माणूस.
सुरुवातीला त्रास हा सर्वांनाच होतो व स्वभावानुसार त्याची प्रतिक्रिया असते. पण हे उमजून सावरणे व स्वतःचा शोध घेणे ही तर गरज असते इथे अमेरीकेत आल्यावर.

मला तरी कथेतील नायिकेचे 'सावरणे' आवडले. तिला कमीतकमी शेवटी जाणीव (मराठीत self- realization) तरी झालीय की तिचे हे वागणे बरोबर नाही. तिने तिचा शोध घेवून ठरवलेय की कसे सामोरे जायचेय ते. कथेत काहीच नाविन्य नसले तरी पात्र चांगले उभे केलेय गिरिजाचे.

ही कथा वाचायची राहूनच जात होती.. आज वाचली.
अगो.. मस्त लिहीली आहेस. डीटेलींग आणि वातावरण निर्मिती मस्तच !!

ते वातावरण मी व्यवस्थित रिलेट करू शकले >>>> मैत्रेयी.. मी पण.. फक्त दुसर्‍या भुमिकेतून.. Happy

सीमाचा प्रतिसाद अजिबात आवडला नाही.. (पटला नाही असं नाही) कारण कथेकडे कथा म्हणून न बघता नको तो किस पाडल्यासारखं वाटतय! मुद्दे बरोबर असतीलही पण म्हणून कथानायिकेच्या बाबतीत हे घडूच शकत नाही किंवा घडू नये असं नाहीचे.. आणि शिवाय "ही कथा अमेरिकेला येउ घातलेल्या लग्नोत्सुक मुलिंसाठी मार्गदर्शक Dos & donts सांगायला किंवा h4 housewives बद्दल अनुमानं काढायच्या उद्देशाने लिहिलेली वाटत नाही" ह्यालाही अनुमोदन!
अश्विनीमामींचा प्रतिसादही खोडसाळ वाटला.

वर कथेत लिहीलं आहे त्याप्रकारे (हेडस्ट्रॉंग हेनपेकिंग हाऊसवाईफ हूज अ कंप्लीट हेडेक) ridicule केलं जातं ते दुर्दैवी आहे .. >>>>> विचार म्हणून अनुमोदन पण म्हणून कथेत खटकू नये असं मला वाटतं.. कारण वास्तववादी अ‍ॅंड ऑल साहित्यात आपल्याला न पटणार्‍या, आवडणार्‍या बर्‍याच गोष्टी येत असतात पण जर त्या साहित्याच्या पार्श्वभूमीवर वापरलेल्या असतील तर ठिके की...

असो.. लिहीत रहा.. Happy

कथा मस्त !
तिच्या जीवाची घालमेल, हरवणाऱ्या स्वः त्वाची जाणीव आणि अचानक झालेले साक्षात्कार...... सगळे मस्त उतरलेत.

अवांतर:
च्यायला देशाबाहेर राहून तिथे भारतीय मित्र मैत्रीण कशाला करतात तेच मला समजत नाही.
उगाच पाठीवर एक 'मिनी इंडिया' लादून फिरतात लोक.

>>>अवांतर:
च्यायला देशाबाहेर राहून तिथे भारतीय मित्र मैत्रीण कशाला करतात तेच मला समजत नाही.
उगाच पाठीवर एक 'मिनी इंडिया' लादून फिरतात लोक.>>> भारतीय लोकच भारतीय मित्र शोधत फिरतात असं नव्हे, सगळ्यांनाच आपली भाषा बोलणारी, आपल्यासारखं कल्चर असणारी कम्युनिटी हवी असते.

झंपी आणि परागचे प्रतिसाद आवडले.
कथा परत वाचली काल. तेव्हा जाणवलेलं एक. शहाणपणाचा, चांगला, सोन्याच्या क्षणाशी कथा संपते हे ठीकच. पण ते किंचित अजून विस्तारलं असतं किंवा तो क्षण वाचकांसाठी अजून २-४ ओळी रेंगाळला असता तर आधीच्या सगळ्या तगमगीनंतर अजून बॅलन्स झाला असता कदाचित. पण हे कदाचितच.

गा पै यांचा वेळेचा मुद्दा पटला नाही. आज उत्तम शिक्षण आणि करीअर असलेल्या मुली या काही H4 जगताशी पूर्ण अनभिज्ञ नसतात. प्रत्यक्ष अनुभव नसला तरी दुरून माहित असतंच. आणि ठोकताळे, आडाखे हे झालेलं असतंच. पूर्वग्रह बनलेला असतो. आणि कितीही समजून उमजून सगळे निर्णय झालेले असले तरी प्रत्यक्ष त्यात पडल्यावर अंगावर येणं किंवा क्वचित थोबाडित मारल्यासारखं वास्तव समोर येणं हे होऊ शकतंच.

त्यात बर्फाळ थंडी. पुण्यामुंबईकडून एकदम थंडीत तेही बर्फाळ थंडीत गेलेल्या कुणाही व्यक्तीला डिप्रेशन येऊ शकेल जर सतत हाताला आणि डोक्याला दुसरं काही काम नसेल तर. जेटलॅग पण असतोच त्यातून तोंडी लावायला. युनिव्हर्सिटी टाउन्समधे थॅन्क्सगिव्हिंगच्या आणि क्रिसमसच्या सुट्टीत जी काय स्मशानशांतता असते ती मी अनुभवलेय. ८ दिवसांपुरतेच आहे हे. मग आहेच शॉप, लेक्चर्स, असाइनमेंटस असं जेवायलाही वेळ मिळणार नाही असं रूटीन हे पुरतं माहित असतं पण तरी ते कमालीचं डिप्रेसिंग असतं. इथे तर तिला घरात एकटं राहणं या गोष्टीशीच अ‍ॅडजस्ट करायचंय. हे सगळे वेडे विचार आणि क्षण ही पहिली शॉकची रिअ‍ॅक्शन आहे. (असं आपलं मला वाटतंय!)

परत एकदा सर्वांना धन्यवाद Happy
नीरजा, दिवसभराच्या वेड्या विचारांमध्ये अचानक मनात स्फुरलेला एक शहाणा विचार हेच अपेक्षित असल्याने शेवट आत्ता आहे तितका ठेवला. कथेच्या बाकी फ्लो आणि थीमशी सुसंगत. ती तगमग बॅलन्स व्हायला नकोच. काळोखात प्रकाशाची तिरीप दिसण्याइतपतच पॉझिटिव्ह नोट हवी.
बाकी प्रतिसादासाठी + १ Happy

कथा छानच्...आवडली.
कालच आलेला अनुभव्. एक इंडियन मुलगी दिसली पहिल्यांदा घराजवळ्,तिच्याशी बोलताना आलेला.
ती; do you work?
मी: no, i am a stay at home mom.
ती: oh..that means you are just having fun.
मी(थोडी गोंधळून): well, my daughter takes a lot of my time.
ती: that means you are just enjoying.

पुढे मी बोलणे वाढवले नाही.एक तर इथे असं आहे की नोकरी नसली तरी घरकाम असतंच. शिवाय इथे करायच्या म्हटलं तर खूप गोष्टी असतात्. घरकाम, ग्रोसरी,मुलं असली की त्यांचे क्लासेस, होमवर्क,
लायब्ररीत नेणे,शाळेतले फंक्शन्स्,आणि अजून काढायच्या म्हटलं तर हजार गोष्टी असतात.

मी सहसा इतक्या मोठ्या पोस्टी कधी टाकत नाही.आज का टाकली माहित नाही Happy

अगो, कथा मस्तच... काहीही नवीन असे कथेत वाचायला नाही असे म्हटले, तरीही कथाबीज फारच मस्त पद्धतीने खुलवले आहे. मी याच्याशी रिलेट करु शकत नसले, तरीही आजूबाजूच्या डिपेन्डन्ट व्हिजावर आलेल्या मुलींची अगदी अश्शीच झालेली/ होत असलेली घुसमट आठवली. खरं सांगू का? ह्या सगळ्या मुलींचा मला फार राग यायचा. काय उगाच नाटकं करतात, असं वाटायचं. मी शिक्षणासाठी म्हणून आले, इन्डिपेन्डन्ट व्हिजावर आणि आजतागायत- लग्नानंतरही तोच व्हिजा आहे. शिकण्यासाठी एकटीने येणं, स्वतः सगळं समजून घेणं, भाषा आणि वातावरणाशी जुळवून घेतच अभ्यासाचा ताण सांभाळणं, हे सगळं स्ट्रगल केल्यानंतर जेंव्हा आजूबाजूच्या लग्न करुन आलेल्या, आयतं सगळं मिळाल्यावरही कटकट करणार्‍या आणि नवर्‍याचं डोकं खाणार्‍या मुलींविषयी सहानुभूती वाटणं अवघडच आहे. उलट असूयाच वाटायची कधी कधी. पण मग एक वाक्य वाचनात आलं, डोन्ट एन्व्ही एनीबडी, बिकॉज यु नेव्हर नो, व्हॉट देअर जर्नी इज ऑल अबाऊट... आणि त्यानंतर एक वेगळाच दृष्टीकोन मिळाला.
बाकी देशी बायका इकडेही डिट्टो. त्यांच्या गप्पा अगदीच न आवडण्यासारख्या. मध्यमवर्गीय आणि साहित्यिक पार्श्वभूमी असलेल्या घरातून आलो असल्यास फारच ऑड वाटते त्यांच्यात. पण मायबोली सापडल्यापासून वैचारिक एकटेपणा मात्र बराच दूर झालाय, हे ही नसे थोडके! Happy

कथा लिहिण्याची शैली सुरेख! आवडली.

"तु घरीच असतेस ना?" किंवा "काय करतेस दिवसभर" किंवा "तुमचा काय..आराम" असे प्रश्न कोणी कधी विचारले त्याना द्यायला ही लिंक पहा..
http://www.coeinc.org/Articles/HousewifeWorth.pdf

छान आहे कथा. आवडली. वर कुणी तरी लिहिलंय, डिटेलिंग आवडलं.

परागचा प्रतिसाद पटला.

थोडं आणखी नियमीत लिहित जा की. तू लिहिलेलं नेहमीच आवडलं आहे.

आज वाचली पहिल्यांदाच.

डिटेलिंग खरच मस्त आहे. आणि फार्गो मध्ये ६ वर्ष काढल्यामुळे एच ४ काय नुसत्या एफ १ वरच्यांना पण असे डिप्रेशन येऊ शकते. अ‍ॅक्च्युअली आमच्या काही मित्रांची लग्न झाल्यावर त्यांना पण बायकांना समर किंवा फॉल मध्ये घेऊन या असे सल्ले दिले होते. कॅली किंवा साऊथ मधल्यांना ते वातावरण नाही कळणार इतके.

Pages