मार्ग

Submitted by मोहना on 8 December, 2011 - 19:27

"जयला आणून सोड तू आज. मी परस्पर पोचतो."
"अरे, वाटेत तर घर आहे माझं. जाता जाता थांब ना."
"नाही." फिलीपच्या तुसडेपणाला लारा वैतागलीच पण जय उत्साहात होता. त्याच्या चेहर्‍यावरचा आनंद पाहून तिने तोंडातून बाहेर पडू पाहणारे शब्द गिळले.
"ठीक आहे. तू दोन वाजता दरवाज्यापाशी उभा राहा. जयला खूप आनंद झालाय तुझ्याबरोबर सामना पाहायला मिळणार म्हणून. मजा करा."
"नक्कीच."
"आणि परत आणून तू सोडशील ना?"
"छे, असलं काही नाही जमणार. मी बसने जाणार. उलटसुलट होईल."
अधुनमधुन भेटणा‍र्‍या मुलासाठी एवढीही तोशीस घ्यायला नको या माणसाला. आई ती तशी, बाप हा असा. तिने फोन बंद केला. नेहमीप्रमाणे ती आपली कामं मुकाटपणे उरकत राहिली. खूप बडबड करावी. फिलीप, लिलीच्या नावाचा, त्यांच्या वागण्याचा उद्धार करावा असं वाटत होतं. पण तिने स्वत:वर ताबा ठेवला. जयच्या मनात त्याच्या आई वडिलांबद्दल नकारात्मक भावना रुजेल असं तिला काही करायचं नव्हतं. फार अवघड होतं ते. जयला कळत नसेल का हे? नक्कीच कळत असेल. लहान नाही तो आता. आजचा दिवस तर फार महत्त्वाचा होता. बेसबॉलला बाप बेटा एकत्र जाणार होते. त्यासाठीच नाही का तिने पैसे साठवून साठवून हे महागडं तिकीट काढलं. कोवळ्या जीवाला बापाचा सहवास, प्रेम लाभावं ह्याच इच्छेने.

स्टेडियमच्या दाराशी त्या दोघांची वाट पाहत लारा उभी होती. आपण खूप काहीतरी केल्याचं समाधान, जयची खुशी, फिलीपलाही मुलाबरोबर घालवता आलेला वेळ खूप काही मनात घोळत होतं. फिलीप आणि जय येताना दिसले तशी तीच पुढे झाली.
"मजा आली?"
"हो" जयच्या आवाजातल्या थंडपणाने ती अस्वस्थ झाली.
"कंटाळा आला यार. एकट्याचं तिकीट काढलं असतस तर बिअर ढोसत सामना पाहिला असता."
"जयला तुझ्याबरोबर यायला मिळावं म्हणून ठरवलं होतं हे. तुझ्यासाठी नाही." मोठ्या कष्टाने तिने शांतपणाचा मुखवटा घातला.
"चल जाऊ या आपण." फिलीपकडे न बघताच जयने लाराचा हात धरला. जवळजवळ ओढतच त्याने तिला तिथून बाहेर नेलं.

"मावशी, बास झाले हे तुझे प्रयत्न. मला त्या माणसाचं तोंडही पाहायचा नाही."
"अरे पण...."
"मला कळत नाही असं वाटतंय का तुला? संताप येतो परिस्थितीचा, आई, बाबांचा आणि हल्ली हल्ली तुझाही."
"माझा? मी काय केलं. तुला सुख मिळावं म्हणूनच माझी धडपड आहे ना?"
"कशाला? तू कोण आहेस माझी?"
गचकन ब्रेक दाबत तिने रस्त्याच्या कडेला गाडी थांबवली. एकदम दाबलेल्या ब्रेकने तिची जुनीपुराणी गाडी खाडखाड आवाज करत कशीबशी थांबली.
"काय म्हणालास तू? काय म्हणालास? पुन्हा म्हण."
तिचा रागावलेला चेहरा, थरथरणारे हात पाहून जय घाबरला. गप्प बसून राहिला.
"पुन्हा म्हण म्हणते ना." ती तारस्वरात किंचाळली. त्याला एकदम रडावंस वाटायला लागलं. पण त्याने अश्रू आवरले. लहान का होता तो आता.
"सॉरी, चुकलं माझं. मला असं म्हणून तुला दुखवायचं नव्हतं गं. पण ती माझी सख्खी माणसं तरी त्यांना काही फिकीर नाही. तुझे माझे रक्ताचे संबंध नाहीत तरी तू...."
ती त्याच्याकडे पाहत राहिली. डोळ्यातून घळाघळा वाहणारं पाणी पुसण्याचंही भान राहिलं नाही तिला.
"काही नाती रक्तापेक्षा मोठी असतात जय. माझ्या आयुष्यात जेमतेम वर्षा दीड वर्षाचा असशील तू तेव्हा आलास. मी अठरा एकोणीस वर्षाची होते. माझा मुलगा म्हणून वाढवलंय मी तुला."
"मुलगा म्हणून वाढवलं आहेस. पण मुलगा आहे का मी तुझा?" इतके दिवस विचारावासा वाटणारा प्रश्न त्याने बळ एकवटून विचारला. लाराला पेचात पडून तो मुकाट राहिला. गाडीच्या खिडकीतून बाहेर पाहत. उत्तर नकोच होतं त्याला. त्याने फक्त लाराला वास्तवतेची जाणीव करून दिली होती त्याच्याही नकळत. इतक्या वर्षाचा हिशोब मांडल्यासारखंच झालं की हे. मेळ जमत नव्हता. काहीतरी चुकलं होतं. हेच हेच ऐकण्यासाठी केलं का मी या मुलाला मोठं? तिला तो सारा प्रवास घटकेत झाल्यासारखा वाटला. प्रचंड थकवा आला. तीनशे पासष्ट दिवस वर्षातले. कितीने गुणायचं म्हणजे किती आणि कसे दिवस घालवले या मुलासाठी ते कळेल ह्याला. रक्ताच्या नात्याच्या गोष्टी करणार्‍या या मुलाला समजेल मग किती रक्त आटवलं त्याच्यासाठी ते. स्टिअरीगव्हिलवर डोकं टेकत ती तशीच बसून राहिली.

"जशी असशील तशी ये लारा" नीलच्या कुजबुजत्या आवाजाने ती गोंधळली, घाबरली.
"अरे पण काय झालंय? तू ठीक आहेस ना?"
"मी ठीक आहे, पण लिली जयला सोडून निघून गेली आहे."
"अं?" तिला धक्काच बसला.
"लिली जयला सोडून निघून गेली आहे." तो परत म्हणाला.
"जय जेमतेम वर्षाचा आहे. अशी कशी गेली ती सोडून. तिच्या नवर्‍याने अडवलं नाही का तिला?"
"तू येतेस का? जय एवढंसं तोंड करून बसलाय. तुझ्याकडे रमतो तो छान म्हणून तुला विचारतोय."
"हो, पोचते मी दहा मिनिटात." लाराने फोन ठेवला आणि ती निघालीच. काय झालं असेल? अशी कशी ही खुशाल सोडून गेली जयला, तेही नीलकडे. म्हटलं तर ति‍र्‍हाईताकडे. काय संबंध हिचा नीलशी? संबंध काही नाही पण त्यातला त्यात तोच एक हक्काचा तिचा. बाकी कोण विचारतंय? सगळ्यांनी संबंध तोडलेले. उलटसुलट विचारांच्या नादात ती गुरफटली. नीलकडूनच लिलीबद्दल काही ना काही समजायचं तेवढंच तिच्या खात्यात जमा होतं. ती त्याची मैत्रीण, लहानपणापासून हातात हात घालून दोघं वाढलेले. लिली आणि फिलीप एकत्र राहायला लागले तेव्हा नीलने जोरदार विरोध केला होता. फिलीप आणि लिली दोघंही उतावळे, चंचल. त्याचं जमायचं नाही हे त्याला पक्कं ठाऊक होतं. आणि झालंही तसंच. वर्षाच्या आत लिलीला जय झाला. तो झाला त्यानंतर किंवा कधीतरी आधीच फिलीप अमली पदार्थांच्या आहारी गेला. थोडयादिवसांनी लिलीदेखील. हे बरं आहे या लोकाचं, जबाबदारी पेलता आली नाही की सुटकेचे मार्ग शोधायचे, तेही असे. आणि आता तर टोकच गाठलेलं दिसतंय. ती मनोमन वैतागली पण जयची काळजी वाटलीच आणि नीलसाठी तरी तिथे पोचायला हवं होतं लगेच.

नीलच्या घरी ती पोचली तेव्हा दारात उभाच होता तो जयला घेऊन. तिला बघताच जय तिच्याकडे झेपावला. त्याला उराशी कवटाळत लाराने प्रश्नार्थक नजरेने नीलकडे पाहिलं.
"गेला आठवडा माझ्याकडेच राहायला होती. फिलीप गेले आठ दिवस घरी आलेलाच नाही. पैसे मागत होती उसने."
"दिलेस?"
"छे, तिला म्हटलं इथे राहायचं तेवढे दिवस राहा. पैसे दिले की ती राहणार नशेत. परवा दूध आणायला म्हणून गेली ती फिरकलेलीच नाही परत"
"मग लगेच करायचास ना फोन."
"कुठल्या नात्याने तुला पेचात पाडू?"
लारा नुसतीच त्याच्याकडे पाहतं राहिली. नकाराचं दु:ख काळवेळाचं भानही नाही ठेवू शकत?
"हं, तेही खरंच. पण जाऊ दे शेवटी झाली ना माझी आठवण."
"तू बस याच्याजवळ. मी एकदा जाऊन फिलीप तरी घरी आलाय का पाहतो." तिने मान डोलवली. नीलने जयचा गालगुच्चा घेतला आणि तो बाहेर पडला.

बर्‍याच दिवसांनी लारा आज नीलच्या घरी निवांत बसली होती. जयला मांडीवर थोपटत. ती उगाचच त्याचं घर निरखित राहिली. नीलचं मैत्रमैत्रींणींनी गजबजलेलं घर आज भकास होतं, उदासपणा चिकटला होता जिथे तिथे. भितींवरच्या रंगाचे कोपचे निघाले होते. इकडे तिकडे पडलेले कपडे, कागद, खेळणी...पसाराच पसारा. कितीतरी दिवस न आवरल्यासारखं खोलीचं रुप होतं. पंख्यावरच्या धुळीचे थर ती निरखीत राहिली. नीलबरोबर एकत्र राहायचं नाकारलं नसतं तर हे घर तिचं झालं असतं. त्या दोघाचं. कदाचित तिने कायापालट करून टाकला असता, तिला हवं तसं रुप दिलं असतं. पण एखाद्या माणसाचा कायापालट करणं घराचा कायापालट करण्यासारखं थोडंच असतं? ते जमणार नाही हे माहीत असलं की पर्याय शोधावे लागतात. तिनेही तेच केलं होतं. वर्ष झालं होतं या गोष्टीला. तिच्या निर्णयाने तो खूप निराश झाला, अजूनही खपली धरलेली नाही हे त्याच्या वागण्यातून जाणवायचंच वारंवार. लारा त्याच्या विचाराने अंतर्बाह्य ढवळून निघाली, पण तिला त्या दोघांच्या एकत्रित आयुष्याचं चित्र भयावह वाटत होतं. दिशाहीन, तडजोड, निराशा हेच रंग त्यात मिसळतील हे कळत होतं. तो सतत कुठल्यातरी वाद्यात गुंतलेला, कविता लिहून चाली लावण्यात मग्न असलेला. ती मनाने हळवी असली तरी व्यवहारी होती. स्वप्नाच्या दुनियेत रमणारी नव्हती. जगाचं भान नीलला कधी येईल असं तिला वाटलंच नाही. सुरवातीला मनाच्या त्याच हळवेपणातून त्याच्या नादिष्टपणात तीही वाहवत गेली. पण हायस्कूलनंतर शाळा सोडायचं त्याने ठरवलं तेव्हा तिचे पाय जमिनीवर आले. नाकारायचं ठरवलं तरी नील उतरला तिच्या मनातून.
"हे काय काहीतरीच."
"काँलेजचा खर्च झेपणार नाही मला. आणि खरं सांगायचं तर त्या शिक्षणात काही अर्थही नाही."
"पण मग तू करणार काय?"
"कविता लिहिणार, गाणी म्हणणार, त्यात सातत्य दाखवलं तर अल्बम निघतील, नाव होईल, पैसा मिळेल."
ती बघत राहिली. कोणत्या दुनियेत वावरतो हा?
"तिथे अथक प्रयत्न आणि यशाची खात्री नाही हे समीकरण असतं. ज्याचं भलं होतं ते सुखाच्या राशीत लोळतात, पण ज्यांच्या जम बसत नाही ते होरपळून निघतात. विषाची परीक्षा घेण्यासारखं आहे हे"
"यशाची खात्री कुठे असते लारा? पण म्हणून ते करायचंच नाही का? आणि कदाचित त्या सुखाच्या राशीत लोळण्याइतकं माझं असेल नशीब असा का नाही विचार करत? अपयश येईल या शंकेने तिकडे फिरकायचंच नाही का?"
"आधी शीक ना तू. मग नंतर कर काय करायचं ते."
"खूप वर्ष जातील त्यात. आणि माझ्या शिक्षणासाठी मलाच कमवावा लागेल पैसा."
"पण अल्बमसाठी काय करणार आहेस?"
"नँशव्हिल गाठेन लवकरच. गायक म्हणून जम बसवायचा तर जावंच लागेल. तिथे जाण्यासाठी पैसा लागेल. तो एकदोन ठिकाणी कार्यक्रम करून मिळवेन. माझ्या चार पाच मित्रांनाही यातच रस आहे. पण माझं जाऊ दे. तू काय करणार आहेस?"
"काँलेज. आई, बाबा खर्च करायला तयार आहेत. शिष्यवृत्ती मिळेल आणि मी नोकरी करेन जमेल तितके तास."
त्या संभाषणानंतर नीलपासून ती हळूहळू लांब होत गेली. नीलच्या लक्षात ते यायला वेळ लागला नाही.
त्याच्या कवितांमध्ये रस दाखविणारी, तास न तास त्याच्याबरोबर, त्याच्या मित्रमैत्रिणीबरोबर रमणारी लारा हल्ली त्याच्या आसपास फिरकत नाही हे त्याला जाणवलं तेव्हा तो तोंडावर आलेल्या कार्यक्रमात गुंतला होता. गाणी निवडणं, जाहीरात, सराव काही ना काही चालू होतं. लाराच्या मनातलं जाणून घ्यायला निवांत वेळ मिळत नव्हता. जवळजवळ महिनाभर तो भेटलाच नव्हता तिला. तीही फिरकली नव्हती इतक्या दिवसात. आज शाळेचाच कार्यक्रम म्हटल्यावर ती आलेली असेल या आशेवर होता तो. कार्यक्रम संपल्यावर तिच्याशी बोलायचं, विचारायचं त्याने निश्चित केलं होतं.

पडदा वर गेला. पहिल्या रांगेत बसलेल्या लाराला पाहिल्यावर त्याला विलक्षण आनंद झाला. सरत्या संध्याकाळी अलगद कार्यक्रमात रंग भरत गेला.
"फार छान आवाज आहे तुझा." त्याच्या आसपास जमलेल्या गर्दीतून वाट काढत ती त्याच्यापर्यंत पोचली. तो नुसताच हसला. तिचा हात हातात धरून बाकीच्यांशी बोलत राहिला. लारा रोमांचित झाली. नकळत त्याच्या आणखी जवळ सरकली. कसं व्हायचं याच्यापासून बाजूला? केवळ त्याला शिकायचं नाही म्हणून ह्या नात्याला कोंब फुटू द्यायचे नाहीत की जे होईल ते होईल म्हणून साथ द्यायची? त्याचा हातात धरलेला हात तिने आणखी घट्ट धरला, आधार चाचपडतात तसा. गर्दीच्या कोड्यांळ्यातून बाहेर पडता पडता त्याने धाडस केलं.
"तुला कधीपासून विचारायचं होतं."
"विचार ना, त्यासाठी वाट कशाला पाहायची? आणि परवानगीची काय आवश्यकता?"
"अपेक्षेप्रमाणे उत्तर मिळेल की नाही याची खात्री नसली की होतं गं तसं."
"मग अशावेळेस विचारूच नये." त्याने चमकून तिच्याकडे पाहिलं. पण तिने ते सहज म्हटलं असावं. निदान तिच्या चेहर्‍याकडे पाहून तरी त्याला तसं वाटलं.
"एकत्र राहूया आपण?"
"नील?" ती चमकली. त्याने विचारलंच तर तो लग्न करू या का आपण असं विचारेल असा अंदाज होता तिचा. तिने त्याचं उत्तर आधीच ठरवलं होतं. शिक्षण संपल्याशिवाय कसं शक्य आहे असं विचारून ती त्यालाच पेचात पाडणार होती. पण असं काय विचारतोय हा.?
"मला वाटलं होतं तू लग्नाचं विचारशील. एकत्र राहूया काय? आपला भाग मोठ्या शहरांसारखा झालेला नाही अजून. एकत्र राहूया म्हणे."
"लग्नाचं विचारलं तर तू शिक्षणाचं कारण पुढे केलं असतंस."
"म्हणून काय एकत्र राहू या का विचारायचं?"
"आपण अमेरिकेतल्या दक्षिण भागातले लोक असेच. पटकन नवं काही स्वीकारत नाही. एवढा काय बाऊ करतेस लारा. एकत्र राहिलं, पटलं, जमतंय असं वाटलं तर करूच ना कधीतरी लग्न."
"नाही तर?"
"व्हायचं मग बाजूला. कुणी कुणाचा अडथळा बनून नाही राहायचं."
तिला हसायलाच आलं. इतकं साधं सोपं समीकरण असेल तर आयुष्यात इतकी गुंतागुंत का होते?
"नील, अशा राहण्याला काही अर्थ नाही. माझ्या किंवा तुझ्या मनात लग्न करायचं असेल तर मग ते व्हायला पाहिजे म्हणून दुसर्‍याच्या कलेने घ्यायचं. सतत त्या विचाराच्या दडपणाखाली वावरायचं, वर्षानुवर्ष. त्यातच मुलंही होवू द्यायची आणि कुणीतरी एकाने कधीतरी जमायचं नाही या निष्कर्षाप्रत यायचं, हे कधीतरी होवू शकतं हे माहीत असलं तरीही या एका निर्णयाने पुढे सारी फरफटच. ती होते आहे हे कळण्याएवढीही उसंत मिळत नाही रोजचा दिवस रेटताना. पाहत नाहीस का आजूबाजूला, शेजार्‍यापाजार्‍यांच्या घरात काय चालू आहे ते?. तुझ्या घरीही तेच. तुला नाही का हे बदलावंस वाटत?. असं नातं नको आहे मला. काहीतरी शाश्वत हवं आहे. आणि तसंही तू लग्नाचं विचारलं असतंसं तर मी ’नाही’ म्हणणार होते." घट्ट धरलेला तिचा हात त्याच्या हातातून निसटल्यासारखा वाटला त्याला.
"का, मी हायस्कूलनंतर शिकायचं नाही ठरवलं म्हणून?"
तिने नुसतीच मान डोलावली.
"तू काय करणार आहेस शिकून?"
"अजून ठरवलं नाही."
"मी पुढे शिकायचं नाही ठरवलं तरी मला काय करायचं आहे ते निश्चित आहे. तुला शिक्षण झाल्यावर काय करायचं ते नाही ठरवता आलेलं अजून पण तरी शिकायचं आहे. त्यातूनही माझ्याबरोबर लग्न नाही करायचं हे माहीत आहे तुला. समजतच नाहीत मला तुझ्या मनाचे खेळ."
"खेळ कसं म्हणतोस तू याला आणि दोन वेगवेगळ्या गोष्टी तू एकत्र करतो आहेस नील."
"मग तू करून दाखव त्या स्वतंत्र."
"मी काय करणार आहे ते माहीत नसलं तरी तुला साथ देणं कठीण आहे नील. कदाचित तू खूप प्रसिद्ध होशील किंवा नाहीही, आत्ताच नाही सांगता येणार. पण तू कलावंत आहेस. स्थैर्य नसतं अशा व्यवसायात. तू मित्रमैत्रिणीत रमणारा, मलाही आवडतं, पण त्यालाच काही मी सर्वस्व समजत नाही. तू आहेस तसा मला आवडतोस. तू बदलावं असं मी म्हणत नाही, तशी माझी अपेक्षाही नाही. असं कुणी कुणामुळे बदलत नसतं. आहे ते स्वीकारायचं की नाही ते ठरवणं महत्त्वाचं." ती गप्प झाली. तोही विचारात पडल्यासारखा पावलं टाकत राहिला. चालता चालता दोघांची पावलं दोन दिशेला वळली. दोघं आपापल्या मार्गाला लागले.

जयने चुळबूळ केली. मांडीला रग लागल्याचं तिला एकदम जाणवलं. त्याला आता उठवायला हवं होतं. ती त्याला अलगद हालवीत राहिली. तो जागा झाला पण रडणं थांबेना. लिलीला शोधत असेल? नक्कीच. वर्षाचा आहे. आईचा स्पर्श समजत असेलच त्याला. त्याला उचलून घेऊन ती बाहेर उभी राहिली. नील येताना दिसला तसा तिचा जीव भांड्यांत पडला.
"काय झालं?"
"फिलीपला शोधत फिरत होतो."
"सापडला?"
"हो" तिने आशेने नीलकडे पाहिलं.
"जय ही लिलीची जबाबदारी आहे म्हणतो."
"हं, पण आत्ता न्यायला नाही आला?"
"वेळ नाही म्हणतो."
"मग?"
"मला आत तरी येऊ दे. मी माझं आवरतो आणि आपण बाहेर जाऊन खाऊन येऊ"
"अरे, मला घरी जायला हवं. काही न सांगता बाहेर पडलेय. वाट बघत राहतील घरी. उद्या काँलेजही आहे."
"लारा प्लीज..."
"बरं चल, खाऊन तर येऊ, मग बघू."
जयला सांभाळत खाता खाता दोघांचीही त्रेधातिरपीट उडत होती. जय नुकताच चालायला लागला होता. त्याला एका जागी बसायचं नव्हतं.
"मला परवा कार्यक्रम आहे." पुढच्या कल्पनेने लाराला घाम फुटला.
"कुठे?"
"बाहेरगावी."
"अरे, मग तू काय करणार जयचं?"
"तेच समजत नाही मला. लिली माझी जीवाभावाची मैत्रीण आहे. अशी निघून जाईल अशी कल्पनाही नव्हती केली."
"अमली पदार्थांच्या आहारी गेलेली माणसं कल्पनेपलीकडची असतात. बेभरवशी. आपण असं करू या. इथून फिलीपकडेच जाऊ सरळ. जयला सोडू आणि मग मी जाईन घरी."
"लारा, जयला नाही सोडता येणार घरी."
"का?"
"फिलिप तुरुंगात आहे."
"तुरुंगात?" तिला धक्काच बसला. काय बोलावं हेच सुचेना.
" तू तुरुंगात गेला होतास त्याला भेटायला?." तिने आश्चर्याने विचारलं.
"मग काय करणार? पण भेटीची ठरलेली वेळ नव्हती त्यामुळे भेटूच देत नव्हते. जयचं सांगायचं नव्हतं मला तिथे नाहीतर समाजसेवी संस्था येऊन ताबा घेईल त्याचा."
"मग केलंस काय तू?"
"फिलिपची आई आजारी आहे म्हटल्यावर बोलायला दिलं त्यांनी त्याच्याशी."
"मग आता?"
"तू थांबतेस?. थांब ना." नील एकदम काकुळतीला आला. ती काहीच बोलली नाही.
"लारा..."
"अरे, अशी कशी राहू तुझ्या घरी?"
"पण मी नसेनच. मला उद्या सकाळी निघावं लागेल. दोन दिवसाचा प्रश्न आहे, नाही म्हणू नको."
"इथे येऊन नाही राहता येणार. जयला घेऊन जाते मी पाहिजे तर आमच्या घरी."
"पण तो राहणार नाही. त्यातल्या त्यात माझी सवय आहे त्याला."
"पण तू नसणारच ना? आणि दोन दिवसासाठीच म्हणतोयस ना. तू माझ्याबरोबर घरी ये मात्र. मी असं एकदम नाही घेऊन जाणार जयला माझ्याबरोबर." तो हसला.
"अग एक वर्षाचा आहे तो. तुझा मुलगा आहे का असं नाही कुणी विचारणार." तीही हसली.
ती दोघं खरंच जयला घेऊन लाराच्या घरी पोचली. लाराने जयबद्दल घरी सांगितलं होतं, पण ती अशी त्याला घेऊन घरी येईल याचा अंदाज कुणालाच नव्हता. छोट्या जयकडे पाहून कुणी फारशी खळखळ केली नाही. तिच्या घरात आई वडील आणि पाच भावंडं. ठरवल्यासारखं सगळ्यांनी त्याला दोन दिवस थोडा थोडा वेळ सांभाळलं. फार दिवसांनी त्या घरात लहान मूल आलं होतं. सगळीच रमली त्याच्याबरोबर. जय थोडासा बावरला सुरवातीला. भिरभिरत्या डोळ्यांनी इकडे तिकडे पाहत राहिला. पण मग रडणं विसरला. लाराला तर त्याला परत पाठवूच नये असं वाटत राहिलं. नील त्याला न्यायला आला तेव्हा तिचा जीव थोडा थोडा झाला.
"आपणच ठेवू या का जयला?" अपेक्षेने ती आईकडे पाहत राहिली.
"अगं त्याची आई येईल गं परत. आणि ती नाही आली तर वडील आहेतच ताबा घ्यायला."
"मला नाही वाटत कुणी येईल." चिवटपणे लारा म्हणाली.
"लारा, अगं जेमतेम एकोणीस वर्षाची आहेस तू. जयला ठेवून कसं करशील? काँलेज, नोकरी, लग्न...."
"ते पुढचं झालं. आत्ता त्याला आपली गरज आहे." लारा आपला मुद्दा सोडायला तयार नव्हती. शेवटी नील मध्ये पडला.
"लारा, मी पुढच्या आठवड्यात इथेच आहे. जय राहील माझ्याबरोबर. लिली किंवा फिलीप आला तर जयला घेऊन जातीलच ते. जास्त गुंतून चालणार नाही."
निरुपयाने लाराने त्याचं ऐकलं. काँलेजमधून आल्यावर नीलकडे चक्कर मारायला ती विसरत नव्हती. तिची भावंडं पण एकदोनदा जयसाठी चक्कर मारून गेली.

लारा घाईघाईत पोचली तर लिली परतलेली. चार दिवसांनी. विस्कटलेले केस, तारवटलेले डोळे, सतरा ठिकाणी फाटलेली जीन्स. कशाचंच भान नसल्यासारखं वागणं. फ्रीजमधलं हाताला लागेल ते घेऊन तिने बकाबका घशात कोंबलं. विस्कटलेल्या केसावरून हात फिरवत लिलीने सारखे केल्यासारखे केले आणि सोडयाची बाटली तोंडाला लावून डुलत्या खुर्चीत बसून राहिली. लारा तिच्याकडे ’आ’ वासून पाहत राहिली. जय आत झोपला होता, पण साधी त्याची चौकशी करण्याच्या परिस्थितीतही नसावं या बाईनं?. तिचा जीव जयसाठी तुटला. या क्षणी त्याला घेऊन पळत सुटावं. लांब कुठेतरी निघून जावं इतक्या लांब की तो पुन्हा लिलीच्या दृष्टीलाही पडता कामा नये. पण त्यातलं काहीही न करता लारा नुसती लिलीकडे पाहत राहिली. तिच्या एकटक नजरेने शरमून गेल्यावर किंवा काहीतरी बोलायला हवं म्हणून लिलीने तोंड उघडलं.
"कसा आहे जय?"
"ठीक"
"नील?"
"तोही ठीक." मग बोलणं खुंटलं ते नील येईपर्यंत. लिलीला पाहिलं आणि नील भडकलाच.
"नीघ इथून तू. आणि जयलापण घेऊन जा."
लिली टक लावून त्याच्याकडे पाहत राहिली. खुर्चीत डुलत राहिली. तो पुढे झाला. त्याने त्या डुलत्या खुर्चीला धक्का मारला.
"मी काय सांगतोय ते ऐकू येत नाही का?"
लिली हमसून हमसून रडायला लागली तसा तो वरमला.
"अगं, दूध आणायला म्हणून पडलीस ना बाहेर? पोरगं रडून रडून थकून झोपलं तुझं. लाराच्या घरच्यांनी सांभाळलं म्हणून. मला कसं जमणार गं जयला जपायला? किती लहान आहे तो. लाराही अभ्यास, काँलेज विसरून करत होती सारं. पण बास झालं आता. हा असला प्रकार पहिल्यांदा आणि शेवटचा. यापुढे नाही जमायचं मला. माझे दौरे असतात. अर्धा जीव इकडे आणि अर्धा तिकडे. आणि लाराने का करावं जयचं? केवळ मी विनंती केली म्हणून? आणि माझी तरी ती कोण आहे की मी तिला हक्काने सांगावं?" लाराने चमकून पाहिलं. लिली मात्र बधिर झाल्यासारखी नीलकडे पाहत होती. शेवटी काही न सुचून म्हणाली.
"बरं, घेऊन जाते मी जयला उद्या. आज राहू ना इथे मी? चालेल?."
"राहा गं, पण तू तुझ्या घरी का नाही जात?"
"तिथे जाऊन काय करू?" पुढे लिली काही बोललीच नाही. फिलीप त्रास देत असेल हिला? की दोघं मिळून अमली पदार्थांच्या गुंगीत जयला विसरून जातात म्हणून ही येत असेल इथे? पण आत्ता तर तो तुरुंगात आहे. काय कारण असेल? लारा शक्यता चाचपडत राहिली, लिलीकडून समाधानकारक उत्तर मिळत नव्हतं.
"फिलीपचं घर मोकळंच आहे की. तो तुरुंगात आहे हे माहीत आहे ना?" नील तिला विचारत होता.
"हे बघ नील, मी इथे राहिले तर चालेल की नाही सांग. नाहीतर निघते मी आत्ताच." नील चिडून काहीतरी बोलणार तितक्यात लाराने विषय बदलला. लिली तशीच खुर्चीत झोपली, पाय दुमडून. अवघडल्यासारखी. नीलही काही न बोलता आत निघून गेला. लारा तिथेच बसून राहिली. लिलीवर पहारा दिल्यासारखी. मगाशी नील म्हणाला कोण लागते लारा माझी हक्काने सांगायला? अजून आशेवर असेल का हा इतक्या स्पष्टपणे सांगितल्यावरही? त्याला ’नाही’ म्हटल्यावरही त्यांची मैत्री टिकली होती. निदान तिला तसं वाटत होतं. ती त्याच्या मित्रमैत्रिणीत रमत होती. तो आता तिच्याबरोबर काँलेजला नव्हता. त्याचे गाण्याचे दौरे जोरात सुरू आहेत. कुठल्यातरी कंपनीशी अल्बमच्या संदर्भात त्याचं बोलणंही चालू होतं. पुढे मागे तो नँशव्हिललाच गेला असता हे नक्की. तिनेही शिक्षिका व्हायचं ठरवलं होतं एव्हाना. लाराने नीलला खोट्या आशेवर झुलत ठेवलं नव्हतं. तरी तो असं का बोलला? तोडून टाकायचं तर पूर्ण संपवूनच टाकायला हवं होतं का? दोघं चांगले मित्र होते म्हणून तर गुंतले होते नं एकमेकात? ते नाही जमत तर मैत्रीच मुळापासून उखडून टाकायची? एकदा नीलशी तिने या संदर्भात बोलायचं ठरवलं.

त्यानंतर हे असंच चालू राहिलं. कधी लिली एक दोन दिवसात परतायची तर कधी महिना उलटून गेला तरी तोंड दाखवायची नाही. जय आता दोन वर्षांचा झाला होता. त्यालाही समज येत चालली होती. कळायला लागलं होतं. नीलने नँशव्हिलला जायचं पक्कं केलं तेव्हा लाराचं काँलेजचं शेवटचं वर्ष होतं. जयचा प्रश्न होता. पण नीलला त्याच्याकडे चालून येणार्‍या संधी भुरळ पाडत होत्या. त्याला आता जयमध्ये गुंतून पडायचं नव्हतं. त्याने त्याच्या परीने प्रयत्न केले. फिलीपला जाऊन भेटला. तो तुरुंगातून बाहेर आला होता, पण नुसता बसून राहायचा. मनात आलं की जयला भेटायला यायचा. लिलीला घरी येऊन राहायचा आग्रह करायचा. ती बरी असली तर जायचीही. पण सगळं तात्पुरतं. दोघांच्याही बाबतीत तेच. लहर फिरली की पुन्हा पाढे गिरवल्यासारखं सुरू. एक दिवस लिली आली की नीलने नँशव्हिलला निघून जायचं पक्कं केलं. तो तिथे नाहीच म्हटल्यावर कुणाच्या भरवशावर ती सोडून जाणार जयला. ठरवल्याप्रमाणे तो खरंच निघून गेला तेव्हा लाराला हातातून काहीतरी निसटल्याची हुरहुर लागून राहिली पण आता तरी लिली मार्गाला लागेल, जयमुळे तिचं आयुष्य बदलेल याचीही आशा वाटली ती लिली जयला तिच्याकडे सोडून जाईपर्यंत.
"नाही म्हणू नकोस लारा. मी आता तुझ्याच भरवशावर आहे."
"अगं माझा जीव तुटतो गं या मुलासाठी. पण मला नको का माझं पाहायला. आत्तापर्यंत घरातल्यांचा पाठिंबा होता म्हणून जयचा खर्च त्यांच्या मदतीने भागवत होते. म्हणून स्वतंत्र न राहता त्यांच्याबरोबरच राहत होते. मला आता स्वतंत्र राहायचं आहे. माझा काँलेजचा खर्च, कपडेलत्ते. तू कधीतरी पुढे केलेले किरकोळ पैसे नाही पुरत जयसाठी. माझ्या घरातल्यांनीही पत्कर नाही घेतलेला जयचा. तुझ्या नातेवाईकांकडे का नाही सोडत तू. नाहीतर आता तरी शहाणी हो, तुझा मार्ग बदल." लाराच्या जीव तोडून बोलण्यावर लिली हसली.
"माझे नातेवाईक? कुणी मला दारात पण उभं नाही करत."
"फिलीपचे?"
"त्याचेही. त्याचं तरी कुठे धड चालू आहे?"
"पण मग तुझं तू ठरव बाई आता. मी शिक्षिका म्हणून काम सुरू करतेय पुढच्या महिन्यापासून. दिवसभर जयला बाहेर ठेवायचं तर इतका पैसा कुठून आणू?."
"रात्री ठेवते तुझ्याकडे. मी दिवस कुठेतरी काढेन. जयला रात्री तुझ्याकडे राहू दे. माझा भार नाही टाकणार तुझ्यावर."
"एक विचारु लिली तुला?" कितीतरी दिवस मनात घोळत होता तो प्रश्न आता विचारावा असं वाटून गेलं लाराला. लिलीने नुसती तिच्याकडे बघत राहिली.
"तू दत्तक का नाही देत जयला?"
"कुणाला देऊ? आणि मग मी अधूनधून त्याला भेटते तेही बंद होईल."
"हो पण त्याच्या दृष्टीने तेच भलं असेल तर करायला हवं."
ती काहीच बोलली नाही.
"हे बघ लिली, अजून पर्यंत आम्ही काय किंवा इतर कुणीच जयला तुम्ही दोघं असे सोडून जाता त्याबद्दल तक्रार नोंदवलेली नाही. पण पुढे मागे कुणी तसं केलं तर जय हातातून जाईल तुझ्या. मुलाकडे दुर्लक्ष या कारणाने तुला आणि फिलीपलाही खडी फोडायला जावं लागेल आत. जयचं आणि तुझं नातं अळवाच्या पानावरच्या थेंबासारखं होईल गं. धरून ठेवण्याच्या प्रयत्नात निसटून जाईल तो हातातून. अशीच वागलीस तर तो हाती कधी लागणारच नाही तुझ्या. अशी मुलं फक्त या घरातून त्या घरात टोलवली जातात, क्वचित त्यांना खरं घर, प्रेम, जिव्हाळा लाभतो, भवितव्य बदलून जातं. पण फार क्वचित. त्यांचे तात्पुरते आई, वडील तात्पुरतेच राहतात, कधी सरकारकडून मिळणार्‍या पैशात त्यांचा स्वार्थ दडलेला असतो, तर कधी घरकामाचं माणूस एवढाच हेतू असतो. खायचे प्यायचे हालच होतात. काहीवेळेला दान त्या मुलांच्या बाजूने पडलं तरी या मुलांमधल्या असुरक्षित भावनेला मानलेल्या आईवडीलाचं प्रेम पुरं पडत नाही, ही मुलं अठरा वर्षाची होईपर्यंत सरकार मर्जीनुसार त्यांच्यावर प्रयोग करत राहतं आणि मग जाणतेपणाचा शिक्का मारून रस्त्यावर सोडून मोकळं होतं. असं झालं की त्यांच्या मनावरचे ओरखडे कधीच बुजले जात नाहीत. हे सगळं टाळायचं असेल तर दत्तक द्यायचा विचार कर लिली तू. तिथे निवडीचा अधिकार तुला असेल, नाहीतर या तुझ्या व्यसनातून बाहेर पडायचा मार्ग शोध. पण जयची झाली तेवढी परवड पुरे झाली."
"मला काही कळत नाही लारा, तूच ठरव काय ते." एवढा मोठा डोस पचवणं लिलीच्या आवाक्यांपलीकडचं होतं.
"कळत नाही म्हटलं की संपली का जबाबदारी? समजावून घ्यायचा प्रयत्न कर."
"तूच का नाही घेत दत्तक जयला?" लिलीच्या अनपेक्षित प्रश्नाने लाराच्या काळजाचा ठोका चुकला.
"शहाणीच आहेस तू. हे म्हणजे मऊ लागलं की उकरता येईल तितकं उकरणं झालं लिली." काहीतरी उत्तर द्यावं तसं लाराच्या तोंडून निघून गेलं.
लिली ओशाळली.
"तो नाहीतरी तुझ्याकडेच असतो म्हणून म्हटलं मी. तुझाच झाला तर मला काळजी नाही. भेटताही येईल कधीही. तुटणार नाही गं तो माझ्यापासून."
"हा विचारही नव्हता डोकावला माझ्या मनात. लगेच नाही सांगता येणार मला. मला आत्ता कुठे नोकरी मिळतेय. नीलनंतर मला कुणी भेटलं नाही पण लग्न करायचं आहे. जयची जबाबदारी स्वीकारली की सगळं अवघड होत जाईल. आई, बाबांशी आणि भावंडांशी बोलू दे मला. पण लवकरच काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. तेच हिताचं होईल जयसाठी." लारा जयला दत्तक घ्यायचा निदान विचार तरी करेल या आश्वासनाने लिलीची पाकळी खुलली.

लारा तिच्या नोकरीमध्ये रुळली. लिलीही थोडीफार मार्गावर आल्यासारखी वाटत होती. ती नीलच्याच घरी राहत होती. नीलच तिला लागतील तसे पैसे पाठवत असावा. जयला अचानक सोडून जात नव्हती आताशा. अधून मधून लहान सहान कामं मिळवत थोडाफार पैसा तिच्याही हातात खेळत होता. त्या एका वर्षात फिलीप पण सुधारल्यासारखा वाटत होता. जयला लिली आणि फिलीप बरोबर पाहिल्यावर लारालाच भरुन येत होतं. नीलच्या आणि लाराच्या भेटीही फार क्वचित होत होत्या. तो कधी गावाकडे फिरकला तरच. नीलही एकटाच होता पण लाराचा नकार त्याने उशीरा का होईना पचवला होता. त्या वाटेला पाऊल टाकायचं नाही असं काहीतरी मनाशी ठरवल्यासारखं त्याचं वागणं होतं. ती त्याला टी. व्ही. वर पाहत होती. त्याच्या कार्यक्रमांच्या बातम्या वाचत होती. पण आता तो तिचा नव्हता. कुणाचाच नव्हता. यशाने त्याला फार वरच्या पायरीवर नेवून उभं केलं होतं. दृष्टिक्षेपात न येणार्‍या पायरीवर. लाराला जोडीदाराची उणीव भासत होती पण नीलची उणीव भरून काढणारं कुणी पुन्हा आयुष्यात येईल असं तिला वाटत नव्हतं. सगळं सुरळीत पार पडतंय म्हणेपर्यंत फिलीपने पुन्हा एकदा तुरुंगाची वारी केली. लिली जयला घेऊन लाराकडेच राहायला आली. आता तशीही लाराची स्वतंत्र जागा होती. लहान पण शाळेजवळ. जयही पूर्ण दिवस शाळेत जायला लागला होता. लाराकडे आल्यावर तोही आनंदात होता. तिने त्याची शाळा बदलली. ती होती त्याच शाळेत तोही जायला लागला. लिली मात्र पुन्हा दिवसचा दिवस घरात बसून घालवायला लागली. तिला पुन्हा मार्गावर आणण्याचे लाराचे प्रयत्न तोकडे पडत होते. कंटाळून लाराने लिलीच्या बाबतीत जे होईल ते होईल म्हणून दैवावर भरवसा टाकला. नाहीतरी कधीतरी ती पुन्हा जाणारच. आता काळजी करायची ती फक्त जयच्या मनाची, भावविश्वाची.

जयने अभ्यास करण्यासाठी पुस्तक उघडलं पण त्याचं त्यात लक्ष लागेना. काल रात्रभर त्याने लाराबरोबर आईची वाट पाहिली होती. संध्याकाळी ती फिरुन येते म्हणून बाहेर पडली ती परत आलीच नव्हती. लाराने अकरापर्यंत वाट पाहून त्याला झोपायला लावलं.
"हे नवीन नाही आपल्याला नील. ती येणार नाही आज हे कळत नाही का तुला?." खरंच होतं ते. तो काही न बोलता निमूट झोपायला गेला. दुसर्‍या दिवशी शाळेतही गेला. अभ्यासात मन रमवायचा प्रयत्न केला त्याने. पण घरी आला तो अधीर मनाने. आल्या आल्या कदाचित सोफ्यावर बसलेली आई दिसेल अशी भाबडी आशा मनात ठेवूनच त्याने दार उघडलं. समोर कुणीच नव्हतं. घाईघाईत जाऊन त्याने कुणाचा फोनवर निरोप आहे का पाहिलं. लाल रंगाचा दिवा चमकत नव्हता. निराश मनाने त्याने फ्रीज उघडला. हाताला लागेल ते त्याने तोंडात कोंबलं. खूप राग आला होता त्याला आईचा. गेले सहा महिने ती घरीच होती. असून नसल्यासारखी असली तरीही तिचं अस्तित्व हाच त्याचा आधार होता. लारा आणि आई हीच दोन माणसं त्याचं जग होतं. लाराच्या वाटेकडे तो डोळे लावून बसला. ती आल्यावर मात्र त्याने चिडचिडच केली.
"किती वेळ लावलास. मला कंटाळा आला."
"अरे, शाळेतून असं येता येतं का? अभ्यास करून टाकावा अशावेळेस."
"केला पूर्ण शाळेतच."
"मग खेळायला जायचं बाहेर."
"हं." त्याच्या हं... मधल्या रागाने तिला हसू फुटलं. तिच्या हसण्याने त्याचा आणखी पापड मोडायला नको म्हणून तिने घाईघाईत म्हटलं.
"चल, काहीतरी खायचं बघू या."
मला नको आहे काही खायला. तो तिला येऊन बिलगला.
"अरे, काय झालं तुला एकदम?" त्याला कुशीत घेत तिने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला, तसं त्याला एकदम रडू फुटलं.
"रडू नकोस रे असा. काय झालं ते सांग ना." तिने त्याला आपल्या बाजूला बसवलं आणि त्याची हनुवटी आपल्याकडे वळवली.
"तू आई, बाबासारखं सोडून नाही ना जाणार मला?" त्याला एकदम घट्ट कुशीत घेतलं तिने. तोही तिला बिलगला.
"मी तुला सोडून कुठेही जाणार नाही."
"प्राँमिस?"
"प्राँमिस." तिने त्याच्या हातात हात दिला.
"पळ आता इथून. मला कपडे तरी बदलू दे. आले ती इथेच बसले. जय खुशीत तिथून गेला तसं तिला बरं वाटलं. अधून मधून जयचा अस्वस्थपणा त्याच्या वागण्यातून डोकावत राही. कधी खूप चिडचिड, आदळआपट करे तो. काहीवेळेस दिवसच्या दिवस काही न बोलता राही. त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला की घुम्यासारखा कुठेतरी एकटाच जाऊन बसे. मध्येच केव्हातरी लारा त्याला सोडून निघून जाणार नाही ना याची त्याला खात्री करून हवी असे. लाराला या परिस्थितीतून तोडगा म्हणून लिलीने सुचवलं त्याप्रमाणे त्याला दत्तक घ्यावं असं वाटायला लागलं होतं. पण धीर होत नव्हता.
आत्ताही हातात चहाचा कप घेऊन ती डुलत्या खुर्चीत बसली. काचेच्या खिडकीतून बाहेर खेळणारा जय तिला दिसत होता. एकेक घोटाबरोबर तिला दत्तक घेण्याच्या मार्गातले, त्याला वाढविताना येणारे अडथळे दिसत होते. निर्णयाकडे झुकणारं मन हेलकावे खात होतं. स्वत:च्या भविष्याचे पंखच तर कापून टाकत नाही ना आपण या निर्णयाने, या शंकेने तिचा हात थरथरला. हिंदकळलेल्या कपातून पडलेला गरम चहाचा डाग कपड्यावर उठून दिसत होता. असंच असेल का आयुष्य? अविवाहित मुलीने दत्तक घेतलेला मुलगा म्हणजे डाग? ती दचकली. विचारातल्या संकुचितपणाने शरमली. घाईघाईने तिने तो डाग पाणी लावून चोळला, पुसट केला. मनातल्या वादळाला शांत केल्यासारखी ती खुर्चीवर रेलली. बराचवेळ.

त्यावेळी मनात डोकावलेला विचार आज जयच्या बोलण्याने पुन्हा वर काढला. घ्यावं जयला दत्तक? तिने गाडीतच सुन्न बसून राहिलेल्या जयकडे पाहिलं. तो शांतपणे रस्त्यावर नजर लावून बसला होता. मनातलं वादळ लपवण्याच्या प्रयत्नात.
"तुला दत्तक घेऊ मी?"
तिच्या अचानक प्रश्नाने तो दचकला.
"काय?"
"तुला दत्तक घेऊ मी? तू आत्ताच म्हणालास ना की तुझं माझं रक्ताचं नातं नाही. खरंच आहे ते. पण तुला दत्तक घेतलं की माझा होऊन जाशील."
"खरंच? खरंच विचारते आहेस की गंमत?" तो चांगलाच गोंधळला.
"अशी कशी गंमत करेन जय, पण वाटतं तितकं सोपं नाही हे लक्षात ठेव. तुझी आई खूश होईल पण फिलीप त्याला जेवढे अडथळे आणता येतील तितके आणणार हे नक्की. मला मनस्ताप होईल, तुला त्रास, प्रचंड त्रास. यातून निभावशील तू? तुझं वय अडनिडं आहे. आपल्याला एखाद्या समाजसेवी संस्थेची मदत घ्यावी लागेल. त्यांच्या मदतीने कोर्टात तुझी, माझी बाजू मांडता येईल. पण तिथे तुला उलटसुलट प्रश्नाच्या कचाट्यात अडकावं लागेल. आहे तुझी तयारी?" तो काही कळत नसल्यासारखा बराचवेळ तिच्याकडे पाहत राहिला.
"अरे असा बावचळू नकोस. तू नाही म्हटलंस तरी माझ्याकडेच राहशील. फक्त विचार कर मी काय म्हणते आहे त्याचा."
जयने अलगद तिच्या खाद्यांवर डोकं टेकलं. डाव्या हाताने तिने त्याच्या खांद्यावर थोपटलं. त्याच्या केसातून हळुवारपणे हात फिरवला. काळोखाने घेरलेल्या त्या गाडीत लांब अंतरावरचे रस्त्यावरचे दिवे तिला प्रकाशाच्याच दिशेने मार्ग दाखवत होते. गाडी सुरू करून आता तिला त्या दिशेनं मार्गस्थ व्हायचं होतं.

(लॉरा निकोलसन या माझ्या मैत्रीणीच्या आयुष्याची ही सत्यकथा)

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सर्वांना धन्यवाद.
सावली <<<सत्यकथा? बापरे खरच कठीण आहे . तुमच्या मैत्रिणीला शुभेच्छा.>>>
लॉरा सध्या कोर्टाच्या फेर्‍या मारते आहे. लिलीने स्वखुषीने ताबा सोडला आहे पण फिलीप,,,,मध्यंतरी त्याच्या त्रासाने ती हा देशही सोडून गेली होती. पण आता परत आली आहे. कासा (कोर्ट अपाईंटेड स्पेशल एडव्होकेट) संस्था तिला यासाठी मदत करते आहे. माझी तिच्याशी ओळख झाली तेव्हा गोरी मुलगी, काळा मुलगा म्हणजे मिश्र विवाह एवढचं वाटलं होतं आणि फार लवकर झाला असावा मुलगा असं. हे सगळं तिने सांगितलं तेव्हा तिच्याबरोबरच तिच्या घरच्यांचंही कौतुक वाटलं.

मोहना, Happy लाराला लवकर जयचा ताबा मिळो. सगळ्या अडचणींना तोंड तिने आत्तापर्यंत धैर्याने दिलय. नक्कीच चांगल होईल.

लॉराला शुभेच्छा!
कथा खुप भावली! तिला जयचा ताबा मिळाला की नक्की लिहा. तेव्हढेच वाचुनही बरे वाटेल!
माझी एक मैत्रीण आहे . भारतीय वंशाची (तमिळ) पण साऊथ अफ्रिकेत जन्मलेली आणि मोठी झालेली, आता गेली १५ वर्षं मेलबर्नला स्थायिक झालेली. तिने बर्‍याचदा 'फोस्टर पॅरेंटींग' केले आहे. रात्री बेरात्री पोलिस येऊन तिच्याकडे मुलं देऊन जात. एक मुलगा तर आठ महिन्याचा असताना आला होता. तो ४-५ वर्षं तिच्याकडे होता. काही काळाने त्याची आई दुसर्‍या शहरात चांगली सेटल झाली आणि मुलाला घेऊन गेली. अजुनही तो मुलगा 'फोस्टर' आईलाच आई म्हणतो. तिला फोन करतो वाढदिवसाला. इतर मुलेही आठवण आली की भेटायला येतात.
मैत्रीण जेव्हा फोस्टर पॅरेंटिंग करत असे तेव्हा तिला एकच मुलगी होती. ती मुलगी १२ वर्षांची झाल्यावर तिला एक मुलगा आणि एक मुलगी असं जुळं झालं. त्यानंतर तिने फोस्टरिंग बंद केलं.
तिला ही कथा नक्की सांगणार!
विषयांतराबद्दल क्षमस्व! पण अगदीच रहावलं नाही तिचा उल्लेख केल्याशिवाय. Happy

माझ्या मुलाच्या मैत्रिणीची आई चाइल्ड प्रोटेक्शन मधे कामाला आहे. आबाळ झालेल्या मुलांचा ताबा घ्यायचे काम ती करते. आई-वडिलांसाठी रडणारी मुले,त्यांचे नशेच्या अमलाखाली असलेले पालक, हताश आजी-आजोबा सगळं खूप तणावपूर्ण असतं. Sad

तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा मी पोचवते लॉरापर्यंत.
वत्सला<<<तिला जयचा ताबा मिळाला की नक्की लिहा. तेव्हढेच वाचुनही बरे वाटेल!>>>नक्की लिहेन. पण अजून चार पाच वर्ष तरी जातील, कदाचित जास्तही. <<<<फोस्टर पॅरेंटींग....>फार छान अनुभव आहे तुमच्या मैत्रीणीचा. माझीही इच्छा आहे फोस्टर पॅरेंटींग करायची. पण भिती वाटते. जितके चांगले तितकेच वाईटही अनुभव ऐकले आहेत ना त्यामुळे.
स्वाती२ - <<<<चाइल्ड प्रोटेक्शन....आजी-आजोबा सगळं खूप तणावपूर्ण असतं.>>>
अगदी खरं आहे. मी कासाचं ट्रेनिंग घेतलं तेव्हा कोर्टात असे खटले पहाणं हा एक भाग होता. मी पाहिलेली केस अजून विसरता येत नाही. फिलीप लिलीसारखंच जोडपं. पण बाबा चांगला आणि मुलीची आई नातवंडांचा ताबा घ्यायला आलेली. बाबा अधूनमधून पैसे देतो मुलासाठी त्यातच ती खूश होती. किती पैसे तर महिन्याला वीस डॉलर्स. आजीची कमाईही फार नाही. पण जावई चांगला म्हणून मुलीकडून ताबा काढून ती आणि जावई असा दोघांना मिळावा म्हणून आली होती ती आजी. जावईपण होता. वीस डॉलर्स खूप झाले म्हणणार्‍या आजीबद्दल अतीव जिव्हाळा वाटला मला.

<<<ही मुलं अठरा वर्षाची होईपर्यंत सरकार मर्जीनुसार त्यांच्यावर प्रयोग करत राहतं आणि मग जाणतेपणाचा शिक्का मारून रस्त्यावर सोडून मोकळं होतं.>>>

योग्य निरिक्षण. पण सरकारचीही काही चूक नाही.

नुसती कथा वाचायला आवडलीच पण सत्यकथा आहे हे कळल्यावर कित्येक पटींनी आवडली Happy
लॉरा आणि जयला मनःपूर्वक शुभेच्छा !

Pages