वादळ - भाग १

Submitted by चिमण on 18 August, 2008 - 11:10

अखेर मी विद्यापीठात पदार्थविज्ञान शिकायला दाखल झालो. खरं तर बरीच वर्ष मला पदार्थविज्ञान कशाशी खातात हेच माहीत नव्हतं. पदार्थविज्ञान म्हणजे निरनिराळ्या खाद्यपदार्थांच्या कृतींचे शास्त्र असणार अशी माझी 'जिव्हा'ळ्याची समजूत होती. अर्थात इतर अनेक समजूतींप्रमाणे ही पण यथावकाश निकालात निघाली.

पाळण्यात असताना पाय सतत तोंडात घालण्याच्या माझ्या सवयीमुळे जाणकारांनी मी पुढे लहान तोंडी मोठा घास घेणार असं भाकीत केलं होते म्हणे, जे फारच बरोबर निघालं. पण बाबांचे माझ्याबद्दलचे भाकीत साफ चुकलं. ठीकठाक असलेल्या सर्व गोष्टी मोडण्याच्या माझ्या विध्वंसक उद्योगांमुळे खवचटपणे ते आईला म्हणायचे "चिमाजीअप्पा पुढे डिमॉलीशन इंजीनिअर होणार". बाबा मला प्रेमाने चिमाजीअप्पा म्हणायचे. जेमतेम पाचवी पास असलेल्या आईला मी कुणीतरी मोठा माणूस होणार म्हणून कृतकृत्य व्हायचं. पण त्यामुळं मला मात्र मी इंजीनिअरींगकडे जावसं वाटू लागलं. नंतर हार्डवेअर लिमिटेशनमुळे मला तिकडे प्रवेश नाही मिळाला. शेवटी प्रवाहपतित माणसं जे करतात तेच मी पण केलं - म्हणजे आधी B.Sc. व मग M.Sc. आमच्या कंपूतले काही जण B.Sc. नंतर सूज्ञपणे बँकांच्या परीक्षादेऊन कारकुनी करू लागले. पण इतर मंडळीना कारकुनी करणं below dignity वाटायचं. "बँकेतली नोकरी म्हणजे इतरांनी पैसे कमवायचे आणि आपण त्याचे हिशेब ठेवायचे" असेही टोमणे नवोदित कारकुंड्याना मारले जायचे. असो.

होता होता पहिला दिवस उजाडला. पहिलं लेक्चर सकाळी ८ वाजता होतं. दोन बशी ('बस'च मराठी अनेकवचन) बदलून आणि कँटीनला चहा बिडी मारून डिपार्टमेंटला जायला लागेपर्यंत ८ वाजून गेले होते. जाता जाता डिपार्टमेंटकडून कँटीनला जाणार्‍या काही घोळक्यांची वाक्यं कानावर पडली....
"कॅलशियमसाठी हार्ट्री फॉक equations सोडवली तर ...." एक घोळका.
"If you look at the dipole radiation......." दुसरा घोळका.
...बापरे! म्हणजे ही मंडळी सकाळी सकाळी चहाबरोबर फिजिक्स खातात काय? मला ते ऐन दिवाळीत फराळाबरोबर चिकन खाण्यासारखं वाटलं. आमच्या कॉलेजमधल्या फिजिक्सच्या स्टाफरूम मधे सुध्दा कधी असलं बोलणं ऐकलं नव्हतं. तिथं प्रॉव्हीडंट फंड किंवा इंफ्रास्ट्रक्चर बाँड असल्या अर्थपूर्ण विषयांवर चर्चा चालतं. त्या अभ्यासू वातावरणामुळे माझा inferiority complex बळावला आणि इथं काशी घालायचं काही नडलं होतं का असे खचवणारे विचार पिंगा घालायला लागले. पण निदान ते कुठल्या विषयांबद्दल चर्चा करत होते ते तर कळलं ना असा काडीचा आधार माझ्या बुडत्या आत्मविश्वासाला देत मी डिपार्टमेंटमधे ठेपलो.

डिपार्टमेंटच्या दारात फक्त एक मुलगा दिसला. सावळा वर्ण, हसरा चेहरा, उंची साधारण ५ फूट ८ इंच, सडपातळ बांधा, नीट कापलेले केस, अर्धवट वाढलेली दाढी, तपकीरी डोळे, जीनची पँट त्यात खोचलेला शर्ट आणि खांद्याला शबनम असा त्याचा अवतार! आता नक्की कुठं जायचं या विचारात असतानाच त्यानंच एकदम इंग्रजीत विचारलं - "Excuse me, do you know where the main lecture hall is?".
"या.. नो.. आय मीन..." - इंग्रजी बोलायचं म्हंटल की माझी (अजून) फॅ फॅ होते.
"मेन लेक्चर हॉल कहाँ है?" - माझी अडचण ध्यानात घेऊन त्यानं हिंदीचा आश्रय घेतला.
"मुझे नहीं पता, मुझे भी वही जाना हैं!" - मला एकदम ओळखीची गल्ली सापडल्याचा आनंद झाला.
"चलो आपुन किसीको पूछते हैं" - इतका वेळ शुध्द बोलणार्‍या त्या मॅननं एकदम मुंबई हिंदीच्या गटारात तोंड घातलं... अगदी एखाद्या खडकी हिरोनं युरोपीयन ललनेच्या कमरेवर हात ठेउन 'चल आती क्या खंडाला?' विचारावं तसं. तरी पण त्याला इंग्रजी न अडखळता बोलता येतंय म्हणून एक सूक्ष्म आदर पण होता. इतक्यात एका खोलीतून एक पोरगेलासा तरूण (बहुधा विद्यार्थी संशोधक असावा) आणि एक फाटका माणूस बाहेर पडताना दिसले. अगदीच गबाळे कपडे, हातात एक स्क्रू ड्रायव्हर, कपड्यांना काही ठिकाणी ऑईल लागलेलं, खोचलेला शर्ट एका ठिकाणातून बाहेर पडलेला असा माणूस फार तर फार वर्कशॉपमधला वर्कर असणार असा तर्क करत आम्ही त्यांच बोलणं थांबायची वाट पहात बाजूला उभे राहीलो. बोलता बोलता अचानक त्या फाटक्यानं "अरे, तू ते कालचं श्रॉडिंगर इक्वेशन बघितलस का?" असा त्या तरुणाला सवाल केला आणि आमची दांडी गुल झाली.
"यहाँ वर्कर लोगोंकोभी क्वांटम मेकॅनिक्स आता है क्या?" माझ्या नव्या मित्रानं दबक्या सुरात पृच्छा केली. मी त्याला डोळ्यांनीच गप्प रहायला सांगितलं आणि हळूच इकडे तिकडे कुठे ज्ञानेश्वर दिसतायतं का ते पाहून घेतलं. नंतर कळलं की तो फाटका माणूस कॅलीफोर्नियातला Ph.D. आहे आणि आम्हाला क्वांटम शिकवणार आहे. गबाळ्या संशोधकांबद्दल पूर्वी नुसतच ऐकलं होतं प्रत्यक्ष पहायची वेळ प्रथमच आली!! त्यांच बोलणं संपल्यावर मग आम्ही लेक्चर हॉल कुठे आहे ते विचारून यथावकाश तिथे प्रवेश करते झालो.

माझा कंपू आधीपासूनच वर्गात होता... असं कसं झालं? पहिलं लेक्चर म्हणून असेल कदाचित... आम्ही दोघे गुपचुप एका बाकावर बसलो. मास्तर स्वतःची ओळख करून देत होता. मी अमुक अमुक.. अमुक अमुक ठिकाणी शिकलो... इंग्लंडमधे सॉलीड स्टेटमधे Ph.D. केली.... च्यायला.. इंग्लंडमधे?.. इथं एकंदरीत पोचलेली मंडळी दिसताहेत.. मास्तरची ओळख संपली आणि त्यानं आम्हाला आपआपली ओळख करून द्यायला सांगितलं. आली का पंचाईत! मनातल्या मनात दोन ओळी बराच वेळ घोकल्या आणि चेहरा निर्विकार ठेवण्याचा प्रयत्न करत माझ्या पाळीची वाट पहात बसलो. दरम्यान मास्तरनं बिनधास्तपणे वर्गातच एक सिगरेट पेटवली. चला... निदान मोकळं वातावरण तरी दिसतंय...मनाला थोडा दिलासा मिळाला... होता होता ओळख परेड संपली आणि मास्तर निघून गेला. तो जाता क्षणीच माझ्या नव्या मित्रानं पटकन जाऊन टेबलावरून काहीतरी उचललं. ते मास्तरचं सिगरेटचं पाकीट होतं. मनात म्हंटल - आता हा मास्तरला ते परत करून भाव खाणार. तर तो ते पाकीट माझ्याकडे घेउन आला आणि म्हणाला "चलो, अभी एक एक फोकटका बिडी पीते हैं!" मग काय तो, मी व माझा कंपू या सगळ्यांनी दिवसभर ते पाकीट पुरवून पुरवून वापरलं आणि हां हां म्हणता तो आमच्या कंपूचा एक अविभाज्य घटक झाला. हळूहळू त्याच्या बद्दलची माहिती कळत गेली. त्याचं नाव वेंकट होतं. तो आणि त्याचा शाळेपासूनचा मित्र शेखर हे दोन्ही आमच्या वर्गात होते. दोघे रास्ता पेठेत रहायचे. शेखर अर्धवेळ नोकरी करून फावल्या वेळात शिकत होता.

आम्ही त्यांना यंडुगुंडु म्हणायचो..ते दोघे एकमेकात तमिळ भाषेत बोलायचे म्हणून. यंडु म्हणजे शेखर आणि गुंडु..कधी कधी अण्णा सुध्दा म्हणायचो..म्हणजे वेंकट. एकमेकांना सरळ नावांने हाक मारून पुरेशी जवळीक निर्माण होत नाही यावर आमचा ठाम विश्वास होता.. बनकर नावाचा एक मुलगा होता त्याला सगळे बन्या म्हणायचे आणि कधी कधी "यार! तू कुछ बनकर दिखा!" असा टोलाही द्यायचे. मनोज रमेश माने या नावातली आद्याक्षरे उचलून कुणीतरी त्याला मनोरमा म्हणायला सुरुवात केली. कधी कधी त्याच स्वागत "कोई माने या न माने जो कलतक थे अनजाने" या गाण्यानेही व्हायचं. नंतर कुणीतरी उठवलं की तो आमच्याच टोळक्यातल्या विद्या नावाच्या मुलीबरोबर जास्त वेळ गप्पा मारत बसलेला असतो म्हणून मग त्याला विद्याधर नाव पडलं. मुलींना दुय्यम मानणं आमच्या टोळक्याच्या DNA मधे बसत नव्हतं म्हणून त्यांनाही नावं ठेवली होती. प्रियाचा चेहरा कायम चिंताक्रांत असायचा, चेहर्‍यावर आनंद अभावानेच दिसायचा म्हणून तिला नाराजकन्या पदवी देण्यात आली. विद्या प्रचंड बडबडी म्हणून तिची टकळी झाली. मास्तरांना तर सगळेच नावं ठेवतात. मग आमचा अपवाद कसा असणार? इंग्लंडच्या Ph.D. मधे इंग्रजांचा खडूसपणा पुरेपूर मुरला होता. त्याला काही प्रश्ण विचारला की "अहो! एवढं कसं समजतं नाही तुम्हाला?" असं भू भू करून अंगावर यायचा म्हणून त्याचा टॉमी झाला. कॅलीफोर्नीयाचा Ph.D. हा एक नामांकित गोंधळी होता... शिकवायला सुरुवात करायचा अन् मग चुकलं चुकलं म्हणून सगळं खोडून परत पहिल्यापासून सुरुवात करायचा... त्याला कंफ्युशस असं नाव पडलं. आमचा इलेक्ट्रॉनीक्सचा मास्तर कायम हातात सोल्डर गन घेउन इकडे तिकडे फिरताना दिसायचा म्हणून त्याला मॅन विथ द सोल्डर गन अशी उपाधी मिळाली.

आमचं टोळकं जरी अनेक भाषीक लोकांनी भरलेलं होतं आणि मराठी सगळ्यांना यायचं तरी टोळक्याची प्रमुख भाषा हिंदी..धेडगुज्री हिंदी.. होती. आणि बोलताना हिंदी पिक्चर मधल्या निवडक बोअर डायलॉगची फोडणी दिली जायची. डायलॉग नाही सापडला तर अजित, राजकुमार किंवा देवानंद असल्या एव्हरग्रीन लोकांच्या स्टाईली मारत संभाषण व्हायचं. म्हणजे कधी कुठं जायला उशीर झाला तर कोणी "जल्दी चलो! लेट हो गया!" असं मिळमिळीत बोलायच्या ऐवजी "जल्दी चलो, टाईम बाँबमे टाईम बहोत कम है!" असं बकायचे. किती चहा आणायचे हे विचारायला शोलेतल्या अमजदखानचा आधार घेतला जायचा "अरे ओ सांबा! कितने आदमी है?".
"तू खुदही गिनले जानी!" एखादा राजकुमार त्याला परस्पर कटवायचा.

हळूहळू कळलं की गुंडू एक अस्वस्थ आत्मा आहे. त्याला कायम काहीना काहीतरी सणक यायची. चांगल्या गप्पा चालू असताना मधेच उठून तो कधी "चलो! गच्चीपे जाके पतंग उडाएंगे!" तर कधी "येरवडामे अच्छी पिक्चर लगी है, चलो जाएंगे!" असं काहीही म्हणू शकायचा. पहीले काही महीने बसने आल्यावर त्याला सायकलने यायची सणक आली... त्या काळात स्कूटरनं फिरणं परवडायचं नाही... परवडलं तरी स्कूटरला असणारी waiting list बघता ती मिळवणं दुरापास्तच होतं. गुंड्याला सायकलचा कंटाळा यायला आणि बाजारात रमोना नावाची मोपेड यायला एकच गाठ पडली. ती एकदम जोरात पळते हे ऐकल्यावर यंडुगुंडू तातडीने trial घेऊन आले. "अरे! क्या भागती है! एकदम हवासे बातें करती है!" यंडुगुंडूनी नुसताच जोरदार प्रचार केला नाही तर दोघांनी प्रत्येकी एक एक गाडी बुक पण केली. "गुंड्या, ये सचमुच भागती है क्या?" आमच्यापैकी काहींनी ती रस्त्यात पाहीली होती पण इतकं बारकं यंत्र माणूस घेउन पळू शकेल यावर कोणाचाच विश्वास नव्हता. "हाँ हाँ! बिलकुल भागती है! आनेके बाद देखले!" इती गुंड्या. होता होता एकदाची त्याची गाडी आली पण त्याच्या चेहर्‍यावर म्हणावा तेव्हढा उत्साह दिसत नव्हता.
"हो गई क्या हवासे बातें?" बन्यानं बहुतेक दुखर्‍या भागावर बोट ठेवलं.
"अरे, नहीं यार, गाडीमे कुछ तो भी प्रॉब्लेम है! बिलकुलही नहीं भागती!" गुंड्या आयुष्यात निराश झालेला दिसत होता.
"तूने गिअर बदलके देखे क्या?" एक एक जण रेशन घ्यायला लागला.
"यंडूकी गाडी मैंने चलाके देखी, वो एकदम तेज चलती है!".. गुंड्यानं प्रश्णाकडे दुर्लक्ष केलं.
"गुंड्या इसको दो दो स्टँड क्यूं है?" मनोरमानं साळसूदपणे विचारलं.
"वो स्टँड नहीं है! वो किक है! थोडी नीचे आयेली है!" गुंड्या.
"ये क्या है?" मी सीटच्या पाठीमागे असलेल्या एका उघड्या नळकांडीकडे बोट करून विचारलं.
"अरे, ये तो टूलबॉक्स है! आते आते टूल्स सब गिर गये, लगता है!" गुंड्याला वेग सोडता बाकीचे प्रश्ण क्षुल्लक वाटत होते.
"चलो मैं एक चक्कर मारता है!" मानेनं गाडी घेतली आणि मला मागे बसण्याची खूण केली. खरच गाडीला काही वेग नव्हता. कुठल्याही गिअरमधे १० च्या वर काही स्पीड जात नव्हता. सायकलवाले हसत हसत आमच्या पुढे जात होते. मग मधेच मानेला काय सण्णक आली कुणास ठाउक. त्यानं खाड्खाड सगळे गिअर ४-५ वेळा बदलले आणि अचानक स्फोटासारखा फाSSट असा मोठा आवाज आला. मला गाडीची वाट लागल्याची शंका आली. पण काही क्षणातच गाडी वेगाने धावू लागली. सायलेंसरमधे पॅकींगचा बोळा तसाच राहीला होता तो मानेच्या उपद्व्यापामुळे फाडकन उडाला होता.
"अरे यार! तू तो एकदम जिनीअस निकला! डीलरके लोगोंकोभी ये प्रॉब्लेम नही समझा था!" गुंड्याचा आनंद गगनात मावत नव्हता.
"वो जिस स्कूलमे पढते है ना, उस स्कूलके हम हेडमास्टर रह चुके है!" मानेच्या फुशारक्या लगेच सुरू झाल्या. बँड लावायची संधी मिळाली की मुळीच सोडायची नाही असा आमचा दंडक होता.

अण्ण्याची ही गळित गात्र गाडी रोज काहीतरी ..कधी मडगार्ड तर कधी सायलेंसर.. गाळून आमची चांगलीच करमणूक करायची. पण गुंड्याला याचा कधीच वैताग आला नाही. त्याला त्यात गंमतच वाटायची.
"चल, उतर" एकदा यंडू स्कूटर कँटीनच्या बाहेर थांबवता थांबवता म्हणाला. मला त्याच्या स्कूटरच्या मागे कुणीच बसलेलं दिसलं नाही. मग हा बंब्या कोणाला उतर म्हणतोय हे मला कळेना. तेवढ्यात तो परत "हां चल, उतर" असं म्हटल्यावर मात्र मी न राहवून म्हंटल - "अरे गुंडू, हवासे बाते कर रहा है क्या? तेरे पीछे तो कोई है नहीं!". अजूनही 'हवासे बाते'ला एक ऐतिहासीक महत्व होतं.
"मेरे पीछे टकळी बैठी थी, पता नही कहाँ गई! चल, हम उसको ढूंढते हैं!"तो आता पुरता भंजाळलेला होता.
"अबे अकलके अंधे! मै तेरे साथ आया तो तू उसको किधर बिठाएगा?" हे त्याला पटलं व तो लगेच तिला शोधायला निघाला. थोड्या वेळाने तो आणि लंगडणारी विद्या आल्यावर सगळ्या प्रकाराचा उलगडा झाला.
"काय टकळे? अशी ठुमकत ठुमकत का चालतेयस?" बन्यानं तिला डिवचलं आणि आम्ही सगळ्यांनी दात काढले.
"अरे, तुमचं काय जातय रे दात काढायला? इथं मी पडलेय, तुम्हाला काय त्याचं सुखदु:ख. सहानुभूती दाखवायची सोडून दात काढताहेत. तुम्हीच तोंडावर पडायला पाहीजे होतात म्हणजे चांगले दात घशात गेले असते." विद्या पिसाळली की तिची फिल्डींग करायला २-३ जणं तरी लागतात पण आज थोडक्यात आवरलं.
"तू तोंडावर पडलीस तर लंगडत का चालतेयस?" मानेनं आगीत तेल घातलं.
"जब बडे बात करते है तब बच्चे बीचमे बोला नही करते!" विद्याने एका बोअर डायलॉगचा आधार घेउन बाजी उलटवली.
"पण काय झालं ते सांग ना!" प्रियाची उत्सुकता शीगेला पोचली होती.
"अगं! गुंड्या मला रस्त्यात भेटला आणि म्हणाला लिफ्ट देतो! म्हणून मी त्याच्या मागे बसले. एका चौकात गुंड्यानं दोन सायकलवाल्यांना लॅप टाकून भसकन overtake केलं आणि मी पडले, माझा पाय मुरगळला. मी थांब थांब ओरडले पण त्या ठोंब्याला कळलंच नाही, तो तसाच निघून गेला. आजुबाजुचे लोक फिदीफिदी हसायला लागले. शेवटी मी लंगडत लंगडत निघाले आणि थोड्यावेळाने तो परत येताना दिसला. मला पडल्याचं दु:ख नाही, तो थांबलाच नाही याच आहे." विद्येची खरी चिडचिड बाहेर आली. गुंड्या कधी कधी पिसाटासारखा ओव्हरटेक करायचा. एकदा मी मागे बसलेलो असताना त्यान उजवीकडे वळणार्‍या ट्रकला उजवीकडून ओव्हरटेक केलं होतं. आ वासून अंगावर येणारा ट्रकचा जबडा पाहून मला स्वर्ग दोन बोटं उरणं म्हणजे काय ते उलगडलं होतं.
"गुंड्या, इतके दिवस तू गाडीचे पार्ट पाडत होतास, आता माणसं पण पाडायला लागलास का?" मी गुंड्याकडे मोर्चा वळवला.
"और तेरेको टकळीकी बडबड अचानक बंद हो गई, ये भी नहीं समझा?" माने परत सुटला.
"हाँ! मुझे लगा के गाडी थोडी लाइट लग रही है! मगर मैने आज सर्व्हीसींग किया था शायद इसलिए..." अण्णाचं विश्लेषण बर्‍याच वेळेला तर्काशी विसंगत असायचं. म्हणून आम्ही त्याला analysis च्या ऐवजी ANNA-lysis (अण्णा लिसीस) असा वेगळा शब्दच केला होता.
"तेरा अण्णा लिसीस बंद कर और सबको चाय लेके आ!" मानेनं सुचवल्याप्रमाणे अण्णा लगेच चहा आणायला गेला आणि प्रकरण तिथेच थांबलं.

दिवस भराभर चालले होते पण फिजिक्स काही फारसं झेपत नव्हतं. सामान्य बुध्दिमत्तेमुळे ते आपल्याला कधीच सुधरणार नाही हेही सगळ्यांना माहीत होते. मग उगीच शिकण्यात वेळ फुकट घालवण्यापेक्षा खेळण्यात घालवलेला काय वाईट असा सूज्ञ विचार करून आम्ही कॅरम टीटी क्रिकेट अशा खेळांना उदार आश्रय दिला होता. सकाळपासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आम्ही टीटीचं एक टेबल आणि कॅरमचा एक बोर्ड कायम अडवून ठेवलेला असायचा. त्या नंतरसुध्दा आमची खेळायची तयारी असायची पण विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे ६ वाजता recreation hall बंद व्हायचा म्हणून आमचा नाईलाज होता. मामा काळे या कर्मचार्‍यावर त्या हॉलची जबाबदारी होती. त्याला पटविण्यासाठी तो आला की आम्ही
"मामा काळे, ओ, मामा काळे अब तेरी गलीतक आ पहुंचे" या ओळी
"दिलवाले, ओ, दिलवाले अब तेरी गलीतक आ पहुंचे"या गाण्याच्या चालीवर गाऊन त्याचं जोरदार स्वागत करायचो. पण त्या लाडीगोडीचा काही परीणाम त्याच्यावर झाला नाही. शेवटी एकाला आयडिया सुचली. त्याला आम्ही रोज एक चहा-बिडी पाजायला सुरवात केली. मग तो ६ वाजता असलेल्या सगळ्यांना हाकलून, हॉल बंद करून किल्ली आम्हाला आणून द्यायला लागला. थोडी सामसुम झाली की आम्ही जे खेळायला लागायचो ते रात्री १० लाच थांबायचो. एकदा असच रात्री उशीरा घरी जायला निघालो. गुंड्या त्याची गाडी आणायला गेला पण बराच वेळ झाला तरी येईना म्हणून आम्ही त्याला बघायला निघालो. रस्त्याला चांगल्यापैकी अंधार होता. विद्यापीठातल्या कर्मचार्‍यांचा मंद कारभार संध्याकाळी दिवे चोख चालवत असत. थोड्यावेळाने भांडण्याचा आवाज यायला लागला. गुंड्या आणि एक टांगेवाला यांच्यात जुंपली होती. नेहमीप्रमाणे हवासे बाते करण्याच्या नादात गुंड्याची लॅप सरळ टांग्यात गेली होती. गाडीचे काही अवयव गळाले होते, पुढच्या चाकाचा द्रोण झाला होता.
"चल चौकीवर! दिवा न लावता टांगा चालवतो. माझं नुकसान दे भरून!" गुंड्या तणतणत होता. खर म्हणजे गुंड्याच्या गाडीला पण दिवा नव्हता. त्याच्या दिव्याने काही दिवसापूर्वीच मान टाकली होती. टांग्याचं पण थोडं नुकसान झालेलं दिसत होतं.
"ए चल शाणा बन! तुझ्या गाडीला पण दिवा नाहीये. मला काय सांगतो?" टांगेवाला सोडायला तयार नव्हता.
"तुला नाय तर काय घोड्याला सांगू काय?" गुंड्या सरकला तरी त्याची विनोदबुध्दी शाबुत होती. दादापुता करून कसंतरी ते भांडण मिटवलं. गुंड्याच्या पायाला बरच लागलं होतं त्याला शेखर बरोबर घरी पाठवून दिलं आणि आम्हीपण घरी गेलो. दुसर्‍या दिवशी पायाला बँडेज बांधून गुंड्या लंगडत लंगडत आला.
"पतली दोरीपर चलनेवाला बाजीगर जेजे आज जमीनपरभी सीधा नही चल सकता!" डॉन मधल्या प्राणच्या डायलॉगने मी स्वागत केलं.
"काय तैमुरलंग, तू काल घोड्यावर चढाई केली असं ऐकलं".
"तो घोड्याचा मुका घ्यायला गेला होता".
"नाही नाही खरतर त्याला टांगेवालीचा मुका घ्यायचा होता पण घोडा मधे आला" कुणीतरी टांगेवाल्याचं लिंग सोयीस्करपणे बदललं. दिवसभर असल्या विनोदांना ऊत आला होता. हसून हसून पोटं दुखायला लागली. मधे थोडीशी गॅप पडली की कुणीतरी घोड्यासारखं खिंकाळून चावी मारून द्यायचे की परत सुरू! दुपारपर्यंत बर्‍याच वेळा कालचं पुराण सांगून सांगून त्याचा पेशन्स संपला. नंतर मग "काय लागलं?" या प्रश्णाला तो तिरसटपणे फक्त "घोडा लागला" असं सांगायला लागला आणि ऐकणार्‍याचा भांबावलेला चेहरा बघून आमचं काय होत असेल ते तुम्ही समजून घ्या.

वादळ - भाग २ इथे वाचा: http://www.maayboli.com/node/3235

गुलमोहर: 

मस्तचं जमली आहे !!! दुसरा भाग कधी लिहिताय?? लौकर लिहा!!!

चिमाजीआप्पा झक्कास लिवतायं.
>>ANNA-lysis Lol

भट्टी जमलीये झक्कास एकदम... हसून मुरकुंडी वळली.. भरभर येऊ द्या पुढचे भाग..

मस्तचं जमली आहे !!!
भरभर येऊ द्या पुढचे भाग..

फर्मास जमलाय पहिला भाग..
LOL
-----------------------------------------------
शरीर बारीक अन् मन मोठं करायला कधी जमणार????
Happy

भन्नाट लिहलय एकदम. "मनोरमा" सगळ्यात जास्त आवडलि पण तुम्हि अजुन "डिमॉलीशन इंजीनिअर" च नाव नाहि सांगितलत :). पुढचे भाग लवकर येउ द्यात.

मस्तच लिहिलय!! पुढचा भाग कधी? rofl.gif

प्रचंड म्हणजे प्रचंड मस्तं चाललय. पुढचा भाग लग्गेचच येऊदे, चिन्मय. खूप हसले.

भन्नाट लिहलय एकदम. प्रचंड म्हणजे प्रचंड मस्तं चाललय. पुढचा भाग लग्गेचच येऊदे, चिन्मय. खूप हसले.

सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद! अपेक्षेपेक्षा जास्तच प्रतिक्रीया आल्यामुळे पुढचा भाग लगेच लिहायला घेतला आहे. पहीला भाग सुमारे १० दिवस लिहीत होतो. पुढचा त्यापेक्षा लवकर लिहीण्याच्या दृष्टीने हालचाल सुरू आहे. परत एकदा धन्यवाद!

-- चिमण्या

Lol सही आहे ! शेवटची ओळ वाचून तर जाम हसलो Happy त्याचा वैताग डोळ्यांसमोरच आला !

  ***
  ...s a Moebius signature. This is a Moebius signature. Th...

  जबरी लिहीलंय.
  नवीन असल्यामुळं जास्त प्रतिक्रियांची अपेक्षा नव्हती का? पण इतकं चांगलं लिहीलं की जनरली प्रतिक्रिया मिळतात मायबोलीवर Happy
  भाषा सॉलीड आहे एकदम. सही टिपी आहे. लिहीत रहा..

  अरे चिमण..
  हसून हसून मेलो रे... Lol
  गाडी आणल्यानंतरचे डायलॉग्स.. स्फोटासाराखा आवाज वगैरे.. तुफान..
  स्वर्ग दोन बोटे उरणे Lol
  ~~~~~~~~~~~~~~~~~
  आलो कुठून कोठे तुडवून पायवाट
  काटे सरून गेले उरली फुले मनांत

  चिमण.. खल्लास रे.. Rofl

  छानच! छोटे छोटे प्रसंग चांगल्याप्रकारे खुलवले आहेत.. हसुन हसुन पुरेवाट. Happy

  मस्त जमलीये कथा चिमण्या गोखले.
  घोडा लागला.. Lol
  ---------------------------------------------------------------------------
  The only thing you take with you when you're gone is what you leave behind.

  Lol चिमण एकतर खुप दिवसांनी वाचायला मिळाले तुझे..अणि एकदम सही!!! दोनदा वाचुन काधले..( एकदा वाचुन कळाले नाही का? हा प्रश्न नको हं)..पण दोनदा वाचुन पहिल्याम्दा नजरेतुन सुटलेले विनोद कॅच केले..:)..