नेत्यांवरील हल्ल्यानंतर उमटणा-या प्रतिक्रिया

Submitted by Kiran.. on 24 November, 2011 - 09:42

जगभरात अस्वस्थता आहे. हिंसक आंदोलने होत आहेत. राजवटी उलथून पडताहेत.
भारतात अस्वस्थता असली तरी एक महत्वाचा फरक आपल्या देशात आणि उर्वरीत जगात आहे तो म्हणजे आपल्या देशाइतकं वैविध्य कुठल्याही देशात नाही. वैचारिक, भाषिक, सामाजिक, प्रांतीय, सांस्कृतिक या सर्वच आघाड्यांवर कुठंच एकमत नाही.

अशा वेळी मतभेद असणार यात शंका नाही. मतभेद असले तरी ते चर्चेने सोडवता येतात यावर मात्र बहुतांशी सहमती असलं तरी काहींना ते ही मान्य नाही. हा ही लोकशाहीचाच भाग आहे. अर्थात लोकशाहीचा आधार घेऊन हुकूमशाहीचं समर्थन करणं हा दुटप्पीपणा आहे किंवा कसं हे विशिष्ट अशा चष्म्यातून मांडणं हे ही शक्य नाही.

आपल्या चष्म्यातून पलिकडे पाहता येणं ही एक व्यापक दृष्टी मागच्या पिढीला होती ती हरवत चालली आहे असं वाटतं. मागच्या पिढीपेक्षा आजची पिढी जास्त शिक्षित असली तरी मागच्या पिढीपेक्षा शहाणी आहे असं म्हणता येईल का ?

स्वातंत्र्यापूर्वी होऊन गेलेले नेते आणि आजचे नेते यातही असंच अंतर आहे. त्या वेळच्या नेत्यांबद्दल एक वेगळंच वलय मनात आहे. स्वातंत्र्ययुद्धात भाग घेतेलेले नेते असोत, सामाजिक विकासाचा ध्यास घेतलेले नेते असोत, शैक्षणिक क्रांतीच्या ध्येयाने झपाटलेले नेते असोत किंवा परिवर्तनवादी चळवळीचे अध्वर्यू नेते असोत... विचारांमधे अंतर असलं तरी आजही त्या सर्वच नेत्यांबद्दल मनात आदराची भावना आहे. ही भावना त्या नेत्यांचं आपापल्या उद्दिष्टापोटी असलेलं समर्पण, प्रामाणिकपणा आणि त्या त्या नेत्यांकडून इतर सर्वांना घेता येणारे गुण यापोटी आलेली असते.

आजच्या नेत्यांपैकी बरेचसे राजकारणातून आलेले आहेत. समाजकारणात राहून आदरास पात्र ठरणारे नेते हाताच्या बोटांवर मोजता येण्यासारखे आहेत. उर्वरीत नेते आपापल्या समाजाचे नेते असल्याने इतरांना त्यांच्याबद्दल काही कर्तव्य असणं शक्यच नाही.

अशा पार्श्वभूमीवर नेत्यांवर होणारे शाब्दीक किंवा शारीरीक हल्ले अशा घटना जेव्हा घडतात तेव्हा त्यावर प्रतिक्रिया कशा उमटतात किंवा त्या कशा असल्या पाहीजेत हा खरंच एक महत्वाचा मुद्दा आहे. घटनेवर चर्चा होण्याऐवजी परिणामांवर चर्चा होणं आणि ती ही पुरेशा गंभीरपणे होणं हे जास्त गरजेचं आहे.

ज्या नेत्यावर हल्ला झाला म्हणून त्यांचे समर्थक अस्वस्थ आहेत त्यांची इतर अशा घटनांच्यावेळी असलेली वर्तणूक हा ही एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय ठरू शकेल. एखाद्या हत्याकांडानंतर अशाच प्रकारच्या आंदोलनाचा नेतृत्वहीन आगडोंब उसळला असता घराघरात पोलीस घुसवून कारवाई करणारे गृहमंत्री आताही असाच दृष्टीकोण ठेवणार किंवा कसे हे ही पाहणे गरजेचं ठरेल. अशा प्रकारचा आगडोंब, मालमत्तेचं नुकसान याचं समर्थन हे होऊच शकत नाही. पण एखादं हत्याकांड गाजत असताना अत्यंत असंवेदनशील भूमिका घेणं आणि त्यातून त्याचं पर्यवसान अशा आंदोलनात होउ शकतं याची जाणीव असणारे लोक सरकारात आहे किंवा कसं हे या नेत्यांना ठाऊक असतं का ? अशा हिंसक आंदोलनावर कारवाई व्हायलाच हवी.. पण ती होत असताना लहान मुलांवर झालेला लाठीचार्ज हा पोलीस कारवाईचा एक भाग असू शकतो का ?

आता आपल्या नेत्यावर झालेल्या हल्ल्याने जी वेदना रस्त्यावर दिसते आहे ती याआधी का दिसली नाही असा जनतेचा प्रश्न असेल त्याला उत्तर काय असेल ? कदाचित हा दृष्टिकोनातला फरक असेल. पण असं असेल तर आता कडक कारवाई का नाही हा ही उपप्रश्न तयारच असेल... तेव्हां कुठे गेला होता तुझा धर्म राधासुता हा प्रश्न अनुत्तरीत राहतोच. असो.

अशा घटनांमागे राजकारण होतं का, षडयंत्र होतं का या मुद्यांवर इथं चर्चा अपेक्षित नाही. आपण ज्या चष्म्यातून अशा घटनांकडे पाहतो त्या चष्म्यातून पाहताना दुटप्पी भूमिका घेतली जाते किंवा कसे याचं अवलोकन व्हावं, आत्मपरीक्षण व्हावं असं या निमित्ताने वाटून गेलं...

चु.भू.दे.घे.

धन्यवाद.

गुलमोहर: 

आपल्या चष्म्यातून पलिकडे पाहता येणं ही एक व्यापक दृष्टी मागच्या पिढीला होती ती हरवत चालली आहे असं वाटतं. मागच्या पिढीपेक्षा आजची पिढी जास्त शिक्षित असली तरी मागच्या पिढीपेक्षा शहाणी आहे असं म्हणता येईल का ?

मागच्या पिढीने देशासाठी काही केले नाही, नुसता भ्रष्टाचार वाढवला. सगळे गोर्‍या लोकांचे नोकर. भारताबद्दल चांगले बोलणार नाहीत.

त्या उलट नवीन पिढीने जगातून परकीय चलन आणून भारताची आर्थिक परिस्थिती सुधारली. आजकाल जातिभेदहि शिक्षित तरुणात दिसत नाहीत, आंतरप्रांतीय, आंतर्जातीय विवाह होतात. बर्‍याच तरुणांत आत्मविश्वास आहे, भारताचा अभिमान आहे. आता एकदाचे हे जुन्या पिढीतले राजकारणी मेले तर भारताला चांगले दिवस येतील.

झक्कीकाका

मला मनापासून माफ करा. लेखात खूपच मोठ्ठी त्रुटी राहून गेली आहे. मूळ लेख न बदलता इथं स्पष्टीकरण देतो.

मागची पिढी हा शब्दप्रयोग वापरताना मला स्वातंत्र्यपूर्व काळाच्या आसपासची पिढी असं म्हणायचं होतं. शरद पवार आहे आजी पिढीचे नेते आहेत. आत्ता तरूण असलेल्या पिढीपुढे ते मागची पिढी या संज्ञेला पात्र होतात हे ध्यानातच आलं नाही..

त्या काळची सगळीच माणसं ही मतांतर असतानाही विरोधी मताचा आदर करत असत हे दिसून येतं.. ( नागपूरचं मला माहीत नाही Proud )