बीना

Submitted by बेफ़िकीर on 23 November, 2011 - 06:03

"का? तू आणि अर्चना जा की? मला जमणार नाही म्हणून म्हणतोय"

जयने टायची नॉट व्यवस्थित करताना आरश्यातून मागे पलंगावर बसून कंटाळलेल्या चेहर्‍याने रिमोट ऑपरेट करणार्‍या बीनाकडे पाहिले.

"तुला जमणार नाही तर मी जायचं याला काय अर्थ आहे? मी नाही जाणार."

"अगं तो माझा खूप जुना आणि जवळचा मित्र आहे. त्याला वाईट वाटेल. फ्री पासेस आहेत. गाजलेला चित्रकार आहे. आवर्जून बोलावलंय. मी पुढच्या प्रदर्शनाला जाईन. पण आजच्या दिवस तू जाऊन ये की? नाहीतरी घरी बसून काय करणार आहेस?"

बीनाच्या मनात उत्तर आले. 'एरवी मी घरी बसून काय करते याच्याशी तुला काहीच देणेघेणे नसते नाही?' पण अर्थातच ते ती बोलली नाही. पुन्हा वाद व्हायला नको होते. तसे तिचे आणि जयचे नीट चाललेले होते. पण तो कामात इतका व्यग्र असायचा की बीनाकडे आणि संसाराकडे पुरेसे लक्ष द्यायला वेळ मिळायचा नाही. मुले बाळे नव्हतीच. बीना कंटाळायची. लग्नाला तीन वर्षे झालेली होती. हे असेच चालणार असेल आणि सप्ताहाचे शेवटचे सुट्टीचे दोन दिवसही असेच जाणार असतील तर ही आर्थिक प्रगती करायची काय असे तिला वाटू लागले होते. नाही म्हणायला तीन वर्षात ते सिमला आणि राजस्थान अशा दोन ट्रीप्स करून आलेले होते. पण त्यालाही आता दिड वर्ष होऊन गेलेलं होतं! जयचं तिच्यावर प्रचंड प्रेम होतं, पण अतिशय उत्तुंग असे व्याव्सायिक ध्येय ठेवणार्‍या जयला स्वतःच्या मनाविरुद्ध तिच्यासाठी वेळ काढता येत नव्हता.

लहानपणापासून कलाकार मनोवृत्ती असलेल्या बीनाची कवितांची एक नाही तर दोन वह्या होत्या. त्या दोन्ही वह्या लग्नानंतर एक वर्षाने जयने सहज म्हणून वाचून नंतर अनेक दिवस तिची खिल्ली उडवली होती. त्याला कवितेत किंवा कोणत्याच कलेमध्ये काहीच रस नव्हता. एक बीनाची पाककला सोडली तर! त्यामुळे तिच्या कवितांची त्याने यथेच्छ थट्टा केली होती. नवेनवे लग्न असल्याने स्त्रीसुलभ स्वभावाप्रमाणे बीनानेही ते गंमतीतच घेतले आणि सोडूनहि दिले. पण आत्ताच्या या बदललेल्या परिस्थितीत तिला तिच्या कवितांची वही जयपेक्षा अधिक जवळची वाटू लागलेली होती. त्या वहीत तिने भर काहीच घातली नसली तरीही ती वही अनेकदा काढून बीना वाचत असे.

त्यातील एक कविता तिला फार आवडायची. तिची स्वतःचीच कविता असूनही ती तीच कविता अनेकदा वाचायची.

आत्ताही शूज घालून जय निघाला आणि निघताना त्याने प्रेम आहे हे दाखवण्यासाठी तिला जवळ ओढले. त्याने नुकत्याच ओढलेल्या सिगारेटचा वास त्याच्या ओठांना येत होता. तिला लग्नाआधी हा वास नकोसा व्हायचा. त्यामुळे हनीमूनला त्याने स्मोक केलेले नव्हते. नंतर त्या वासाची तिला इतकी सवय झाली की तो वास जणू पुरुषत्वाचे लक्षणच असल्याप्रमाणे तिला आवडू लागला. तो वास आपल्याला आवडत नसून तो आपण केवळ स्वीकारलेला आहे आणि आपण जे स्वीकारले ते आपल्याला आवडले असे मानण्याची आपली मानसिकता झालेली आहे हे तिलाही जाणवत होते, पण ते मान्य करायचे साहस तिच्याकडे नव्हते.

जयने तिच्या गालावर ओठ टेकवून प्रेम असल्याचे सिद्ध केले आणि ताडताड निघाला.

"बाय बीना... मला उशीर होईल.. नुसतीच बसणार असलीस तर त्यापेक्षा चित्रे बघून तरी ये... क्काय??"

"बघते... नक्की काही सांगता येत नाही मला... "

"असं नको करूस... राज कबूर एकेकाळचा माझा जुना मित्र आहे.. परवा भेटल्यावर त्याने मला पासेस दिले.. म्हणेल जयला आता आपले काहीच राहिलेले नाही... हं?? निघू मी??"

"ड्रिन्क्स आहेत का पार्टीत??"

"गोव्याहून कस्टमर आला आहे... आजच्या दिवस घ्यावी लागतील.. मग दोन तीन दिवस काहीच नाहीये.."

"खूप चाललंय आता तुझं.... पिणं..."

"इट हेल्प्स मी इन बिझिनेस बीनू... येऊ ???"

"टेक केअर..."

"यू टू हनी... लव्ह यू...."

"हं..."

गॅलरीतून खाली बघताना एक पॉष एलॅन्ट्रा सुळ्ळकन निघून गेली आणि एक हात बाहेर येऊन टाटा करून गेला. जय निघून गेला तसे बीनाने घड्याळात पाहिले. साडे चार! अर्चनाची गॅलरी शेजारीच होती. तिच्याशी गप्पा मारण्याचा आज मूड नव्हता. एकदा बीनाने फ्री पासेस पाहिले.

यू आर कॉर्डिअली इन्व्हाईटेड......

' फिमेल वर्ल्ड '

काय पण नांव होते प्रदर्शनाचे! राज कबूर! हा कोण मित्र उपटला मधेच??

पास तरी अगदी पॉष वगैरे होता. फिमेल वर्ल्ड वर एखादा पुरुष काय चित्र काढणार??

पाच वाजता तिचे ठरले. घरात बसून टीव्हीवरच्या कंटाळवाण्या सिरिअल्स पाहण्यापेक्षा हा राज कबूर कोण ते पाहू आणि चित्रेही पाहून येऊ! कदाचित तिथे काही कलाकार मंडळी येतील अशा आशेने बीनाने उगाचच दोन्ही कवितेच्या वह्याही बरोबर घेतल्या. एखाद्याशी ओळख झालीच तर आपणही कोणी आहोत हे दाखवता येईल. नाहीतर नुसतेच फुकट पास आहेत म्हणून बया आली असे व्हायला नको.

लेमन कलरचा ड्रेस घालून स्वतःकडे आरश्यात बघताना बीना विचार करत होती. हा ड्रेस तब्बल आठ हजार रुपयांचा होता. त्यावरचे मॅचिंग गळ्यातले आणि कानातलेही आणलेले होते. लास्ट अ‍ॅनिव्हला! नंतर हा ड्रेस तिने एकदाच घातला होता. पण कोणताही ड्रेस घातला तरी जयसाठी आपण त्याच त्या बीना असतो हा विचार तिला पुन्हा निराश करून गेला. मनातील निराशा झटकून टाकण्यासाठी आणि उत्साही दिसण्यासाठी तिने पट्टकन चहा करून घेतला आणि निघाली.

ब्लॅक कलरच्या नव्या कोर्‍या आय टेनची मजा काही औरच होती. सॅड सॉन्ग्ज ऑफ किशोर कुमार ही सीडी बदलून तिने भावगीते लावली. आणि सव्वा सहा वाजता ती भल्यामोठ्या होटेलच्या एका बाजूला असलेल्या एका हॉलमध्ये पोचली. हॉटेलचे रेप्युटेशन सांभाळणाराच तो हॉल होता. अतिशय उंची वस्तूंनी नटलेला!

तिचे स्वागत एका मुलीने केले आणि पास पाहून तिला आत सोडले. एक पास उगाचच फुकट गेला होता. अर्चनाला हे प्रदर्शन पाहायला आणण्यात बीनाला काडीचे स्वारस्य नव्हते.

बीना आत गेली आणि कॉरिडॉरच्या एन्डला असलेला एक माणूस पुढे झाला.

निळा डार्क झब्बा, केस वाढून शेवटी अस्ताव्यस्तपणे चेहर्‍यावर आलेले, परवानगी नसतानाही स्मोकिंग चालू आणि अती स्मोकिंगमुळे होतो तशा त्रासलेल्या चेहर्‍यावरचे डोळे मात्र भेदक आणि थेट वेध घेणारे!

"आय अ‍ॅम राज कबूर... वेलकम टू द एक्झिबिशन मॅम.... मे आय नो यूअर नेम???"

"बी... मिसेस बीना पाटील... आय अ‍ॅम जय पाटील्स वाईफ... "

हसतमुखाने बीनाने उत्तर दिले आणि राजने हस्तांदोलनासाठी हात पुढे करताना त्याच्या चेहर्‍यावर अनंत भावनांची वादळे क्षणात येऊन त्याच क्षणी लुप्तही झाली. त्या वादळांमध्ये सौंदर्याची तारीफ करणारे, धक्का बसलेले, सुखी झालेले आणि आगाऊपणा करणारे अशी चार वादळे तरी नक्कीच ओळखली बीनाने! पण तोल तसाच ठेवून आपला मुलायम हात त्याच्या हातात सोपवत आणि तितकाच अलगदपणे काढूनही घेत ती पुढे निघाली.

"तुम्ही प्रदर्शन पाहण्यापुर्वी... एक... एक विचारू का???"

मागून येताना तिच्या पाठमोर्‍या देहाचे निरिक्षण करणार्‍या राजने घाईघाईत प्रश्न विचारला. मागे वळत काहीसे गंभीर होत बीनाने विचारले...

"येस????"

"तुमचे... तुमची चित्रे ... नाही काही नाही.. सॉरी... "

वरवर खेळकरपणे हासत पण मनात चिडत बीना पुन्हा पुढे निघाली.

भयंकर चिडलेली होती ती! केवळ मित्राची बायको एकटीच आली हे पाहून मित्र कुठे आहे हेही न विचारता हा आगाऊ माणूस केवळ याचे स्वतचेच फंक्शन आहे म्हणून इतका निलाजरा कसा होतो याचा तिला राग आला होता. माझी चित्रे याला का काढायची असावीत?? पण आपणच फंक्शनला आलो आहोत. याच्याच चित्रांचे प्रदर्शन आहे आणि आपण रागावलो आहोत असे होणे गैर आहे हे समजून ती चालत राहिली.

मात्र.....

... पुढचा एक तास कसा गेला .... हे मात्र विचारण्यात अर्थ राहिलेला नव्हता...

अत्यंत वादग्रस्त चित्रे!

भगवान विष्णू, बुद्ध, अल्लाहची खुण आणि येशू ख्रिस्त हे सर्व एका स्त्रीची भक्ती करत आहेत असे पहिलेच चित्र होते. हे प्रदर्शन धर्मवाद्यांनी बंद कसे काय पाडले नाही आणि होऊच कसे दिले हा प्रश्न साहजिकच प्रत्येकाच्या मनात येत होता. ती स्त्री त्या चौघांना लाथाडत होती. तिच्या चेहर्‍यावर क्रूर भाव होते आणि ती थुंकतही होती.

अनाकलनीय असे ते चित्र पाहून काही सेकंदांनी बीना पुढे सरकली. मागून राज कबूर तर येत नाही ना असे वाटून तिने एकदा मागे पाहिले. पण तो लांब तिकडेच उभा होता.

दुसर्‍या चित्रापाशी बरीच गर्दी होती. उत्सुकता चाळवली गेल्यामुळे बीनाही गर्दीत प्रवेशली.

दुसर्‍या चित्रात चौघी स्त्रिया एका पुरुषाला विवस्त्र करत होत्या आणि तो गयावया करत होता.

काही माणसे ते चित्र पाहून हासली तर काही माणसे भांबावून पाहात होती. अर्थातच, तेथे उभे राहण्यात बीनाला अर्थ वाटत नव्हता.

तिसर्‍या चित्रामध्ये एका पुरुषाला जिवंत जाळण्यात येत होते. त्याला जाळणार्‍या दोन स्त्रियाच होत्या.

अशीच सर्व चित्रे होती. कशात पुरुष प्रेग्नंट दाखवला होता तर कशात एखादी स्त्री परग्रहावर यानातून चाललेली आहे असे दाखवले होते. एका चित्रात उच्चस्तरीय बैठकीत एक स्त्री फलकावर लिहिताना दाखवली होती. 'भारतीय संस्कृती आपण नष्ट केली आहे, आता वळू पाकिस्तानकडे' ! एका चित्रामध्ये एक स्त्री आपल्या पाठीवर प्रचंड ओझी घेऊन चालणाया पुरुष गुलामांना फटके मारत होती.

बीनाला या कोणत्याच चित्रात काहीच वाटले नाही. हा केवळ एक चित्रकाराचा कल्पनाविलास असून एखाद्या स्त्रीला अगदी फार बरे वगैरे वाटेल असेही काही त्यात नव्हते. पुरुषप्रधान संस्कृतीचा आत्यंतिक तिटकारा चितारणे हा कल्पनाविलास इतक्या प्रामाणिकपणे नोंदवणे यापेक्षा त्या चित्रांमध्ये तिला काहीही जाणवले नाही. ठीक आहे की स्त्री अजूनही एक उपभोग्य वस्तूच मानली जाते, पण हा कल्पनाविलास असा काय विशेष आहे आणि चित्रकाराने अशी चित्रे काढणे यात तरी विशेष काय आहे?

एक मात्र होते की कल्पनाविलास अतिशय प्रखरपणे नोंदवला गेला होता. काय म्हणायचे ते मनावर आदळत होते. पण कलाकारांमधील एखादा कलाकार इतपत संवेदनशील मनाचा असणे यात काहीही फार विशेष नव्हते.

जवळपास सर्वच चित्रांमध्ये निळ्या रंगाला अधिक प्राधान्य दिलेले दिसत होते. एका चित्रामध्ये चार हंसांनी ओढलेल्या नावेत एक स्त्री पहुडलेली होती.

एका चित्रात शाळेतील वर्गात बसलेल्या सव विद्यार्थिनीच होत्या आणि दोन विद्यार्थी मात्र दाराबाहेर ताटकळत उभे होते.

चित्रांना काहीही क्रम नव्हता. लाईफ सायकलप्रमाणे चित्र नव्हती. कोठेही काहीही होते. मुळात चित्रकलेची फार मोठी रसिक नव्हतीच बीना! पण तरीही सातत्याने जाणवत होते ते म्हणजे क्रम नसलेली चित्रे आणि अंगावर येणारा संदेश!

आणि शेवटच्या दालनाकडे वळताना तिला ती पाटी दिसली.

'द फिमेल वर्ल्ड'

लास्ट पेंटिंग बघायचे म्हणून ती उत्सुकतेने तिकडे वळली. आत बरीच गर्दी दिसत होती. बहुतांशी पुरुषच होते. हळूहळू गर्दीतून प्रवेश करून बीना चित्रासमोर आली तेव्हा मात्र तिचे डोळे उघडले.

त्या चित्राचे तीन भाग होते. पहिल्या भागात पुरुष एका पुरुषाला जन्म देत असताना आजूबाजूच्या बायका त्या नवीन अर्भकाला मारायला टपलेल्या आहेत. दुसर्‍या भागात एका मरणासन्न पुरुषाला वाचवण्यासाठी बायकांची तारांबळ उडालेली आहे. आणि तिसर्‍या चित्रात सर्व बायका एकमेकींना संतापाने नष्ट करत आहेत. असे ते तीन भाग होते.

हे सरळ सरळ स्त्रीवर्गाची खिल्ली उडवण्यासारखे होते. स्त्री पुरुषाशिवाय जगूच शकत नाही असे म्हणण्यासारखे होते. प्रथम पुरुषाच्या तिटकार्‍याने पुरुष अर्भकाला मारायला टपणार्‍या स्त्रीला शेवटी जगात पुरुषच नसला तर कसे काय होईल असे वाटलेले दाखवणे हे आत्तापर्यंतच्या चित्रांचा संदेश मनात ठेवला तर स्त्रीला हास्यास्पद बनवण्यासारखे होते.

बीनाला खरे तर राग आला होता. पण जयचा मित्र म्हणून काही बोलायचे नाही असे तिने ठरवले होते. जाताना तो भेटलाच तर 'छान होती चित्रे' असे म्हणून निघून जायचे असेही तिने ठरवले होते. बाकी काही बोलायचेच नाही. दिड दोन तास बरे गेले असे म्हणायचे आणि घरी जायचे. इतका विचार करून ती मागे वळली आणि.....

..... थक्क... !!

'भूमिका बदलून पाहू आपल्या

एक वस्तू हो स्वतः तू
खेळते आयुष्यभर मी
टाकते तू मोडल्यावर
आणते वस्तू नवी

मग तुलाही जाणवावी
खेळणे होण्यातली अवहेलना
मोडतानाची विषारी वेदना
ती विवशता
असहाय्यता
लाचारता
कारुण्य ते
मग वाक पायाशी
पण तुला ठेवेन मी
जोडेन मी, खेळेन मी
पण तुलाही खेळ तो भावेल बघ
रुणझुणेलच दिव्यतेने ही धरा
एकदा पर्याय हा स्वीकार तू

भूमिका बदलून पाहू आपल्या'

एका उंचच्या उंच चित्रावर एका सुंदर तरुण स्त्रीच्या देहावरील लेमन कलरच्या ड्रेसवर निळ्या अक्षरात ही कविता लिहिलेली होती. आणि स्त्री होती....

.... बीना!

तोच ड्रेस, जो तिने मागे एका फंक्शनला घातला असताना ही कविता ऐकवली होती. ती पाठ होती तिला. तेव्हा जय तिथे नव्हता. त्यामुळे राज कबूर तिथे आहे हे तिला जाणवलेच नव्हते. आणि राज कबूरला माहीत नव्हते की ही जयची पत्नी आहे.

कमालीची थक्क होऊन ती मागे वळली आणि लगबगीने प्रवेशद्वाराकडे जाऊ लागली. कोणी मोठे समीक्षक आले असावेत, राज कबूर आदराने त्यांना पहिले चित्र दाखवत होता. मात्र त्याचे लक्ष मागेच होते.

चेहर्‍यावर आश्चर्याचे भाव उघडपणे घेऊन चालत येत असलेल्या बीनाला पाहून तो तात्का़ळ तिला सामोरा गेला. ती तशीच त्याच्याकडे पाहात थांबली आणि तिने आश्चर्य व्यक्त करण्यासाठी ओठ हालवताच राज कबूरने जोरात टाळ्या वाजवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

"अटेन्शन... अटेन्शन प्लीज... लेडिज अ‍ॅन्ड जन्टलमेन.. लेट मी इण्ट्रोड्यूस टू यु... मिसेस बीना जय... माय फ्रेन्ड्स वाईफ... गिव्ह हर अ बिग हॅन्ड प्लीज... "

लोकांना काहीच माहीत नसल्याने सर्वांनी टाळ्या वाजवल्या.

राज पुढे बोलायला लागला.

"आता मी सांगतो की टाळ्या का वाजवायला सांगितल्या... माझ्या सर्व चित्रांची प्रेरणा आहे यांची कविता... जी 'फिमेल वर्ल्ड'च्या अपोझिट लावलेली आहे... या कोण तेच मला माहीत नव्हते... आज अचानक प्रदर्शन पाहायला आल्या.. आणि मला समजले की माझ्याच मित्राची ही पत्नी आहे... ही सर्व चित्रे खरे म्हणजे यांचीच आहेत... मी फक्त कवितेचे अतिशय धक्कादायक, अती भावनिक आणि साहसी असे चित्ररुपांतर केले... मी उलगडलेला अर्थ त्यांच्या नाजूक आणि तरल कवितेला अर्थातच अभिप्रेत नसणार... पण अतिरंजित रुपांतर करण्याचाच माझा हेतू होता... मिसेस बीना... मी... सर्वांसमक्ष आपले धन्यवाद मानतो... "

थक्क झालेली बीना कोणता भाव चेहर्‍यावर आणावा हेच कळत नसल्याने सर्वांच्या स्तुतीपर टाळ्या नुसत्याच ऐकत राहिली.

अर्थातच निघताना एकमेकांचे नबर्स घेतले गेले आणि दुसर्‍या दिवशी दुपारी भेटण्याचे ठरलेही! राजच्या स्वतःच्या घरातील चित्रकार्यशाळेत!

त्या रात्री जय दोन वाजता आला आणि सकाळी अतिशय घाईत साडे आठला निघून गेला. त्यातही बीनाने त्याला हे सांगितले. त्यावर त्याची प्रतिक्रिया:

"काय सांगतेस??? राजच्या चित्रांची प्रेरणा तुझी कविता?? ओह माय गॉड... मग रॉयल्टी आपल्याला मिळायला पाहिजे स्साली... चित्रेबित्रे मला नाही आवडत म्हणा इतकी... पण तुझी कविता कशी का असेना जगात पोचतीय हे काय कमी आहे का?? आय थिंक बीना यू डेव्हलप धिस हॉबी... मीही काहीजणांना सांगेन... एखादे पुस्तक काढू आपण... काय??? हे काय?? जॅम संपला???... जाऊन ये बर का राजकडे?? ... ही इज नाईस आर्टिस्ट... चल्ल... बाय"

पॉश एलॅन्ट्रा गेली तेव्हा सुन्न झालेली बीना नुसतीच बसून राहिली.

'भूमिका बदलून पाहू आपल्या'

उद्या मी जर जयसारखी वागायला लागले, त्याला वेळच दिला नाही, तर त्याला ते कसे स्वीकारावेसे वाटेल??

डोन्ट नो!

जगात एक जमात अशी आहे, जी माझ्या कवितेवर चित्रे काढते, प्रदर्शन भरवते, प्रदर्शन बघते, दिलखुलासपणे मान्य करते की माझ्या कवितेवरची चित्रे आहेत, इतकेच नाही तर ती कविताही चितारते, टाळ्या वाजवायला लावते, टाळ्या वाजवते, मला भेटायला बोलावते, माझे नांव सन्मानाने घेते...

आणि जगात एक जमात अशी आहे... जी रॉयल्टी मागते... जिला संवेदनशील मन नाही... पण मी त्या जमातीला एक माणूस म्हणून मात्र नक्कीच हवी आहे... मी नसल्याची उणीव नाही सहन होणार त्या जमातीला...

मला दोन भूमिका जगायच्या आहेत... या जमातीचे खेळणे ही एक.. आणि त्या टाळ्या वाजवणार्‍या जमातीच्या आदराचे स्थान ही दुसरी...

===================================

धुराने कोंडलेले चार खोल्यांचे बैठे घर, अस्ताव्यस्त पसारा, एक कुबट घाणेरडा वास, सिगारेटच्या वासात मिसळलेला, उष्ट्या कपबश्या आणि जे दिसू नये ते सगळे! अगदी राज कबूरच्या अंतर्वस्त्रापासून ते डेबोनेर मासिकापर्यंत काहीही पलंगावर पडलेले!

किळस आली बीनाला! तातडीने निघायला हवे हे तिने मनातच ठरवले.

"निघावेसे वाटते आहे ना??"

".. अं??.. नाही.. म्हणजे अ‍ॅक्चुअली... मला जरा लवकर जायचेच आहे तसे..."

"अवश्य.. घाण कोणाला आवडणार??"

"अं?? छे छे... तसं काही नाही.. "

"पसारा सगळीकडेच असतो असे म्हणू नका... प्लीज... "

बीना अचानक मोकळी मोकळी हासली. ती अगदी तेच वाक्य बोलणार होती. काल इतक्या पॉष हॉटेलमध्ये प्रदर्शन भरवणारा हा इसम इतका घाणेरडा का राहतो हे तिला समजत नव्हते.

" कोण कोण असतं घरी???"

"हा पसारा... चित्रे... माझा कल्पनाविलास , सिगारेटी , थोटकं आणि रंग... मी सोडून सगळे असतात..."

'मी सोडून सगळे असतात' हे विधान बीनाला एकदम 'आपलेसे' वाटले. खरंच की, आपल्याही घरात 'आपण सोडून' सगळे आहे नाही?? असे काहीतरी!

"जय तुमचे खूप कौतुक करत होता... तुमच्या चित्रांचे... "

"नक्कीच करणार तो कौतुक... ज्या माणसाचा कलेशी सुतराम संबंध नाही अशा माणसाची बायको कलाकाराकडे निघाल्यावर तोंडदेखले कौतुक नक्कीच करावे लागणार..."

खाड!

एकदम चेहराच पडला बीनाचा! एकाच दगडात काही पक्षी मारले होते राजने! जयचा कलेशी सुतराम संबंध नाही, राज कलाकार आहे, बीनाला कलेत स्वारस्य आहे आणि तिचे राजकडे येणे हे तिच्या नवर्‍याला आवडलेच नसणार असे अनेक पक्षी!

"छे छे... तो मला म्हणाला उलट रॉयल्टी माग म्हणे तुमच्याकडे"

"आयुष्य हे मानधनच आहे मिसेस बीना...."

मजाच वाटत होती त्याच्या बोलण्याची! बोलता बोलता तो जमेल तितके आवरत होता. आयुष्य मानधन असण्यावर बीना हासली.

"तुम्हाला तुम्ही का आला आहात असा प्रश्न पडत नाही आहे ना??"

"म्हणजे?? ठरलंच होतं ना आपलं?? भेटायचं??"

"होय... पण स्त्री जेव्हा बोटांनी कशाशीतरी चाळा करते तेव्हा ती अस्वस्थ असते... "

"छे छे.. काहीतरी काय.. मला चित्र पाहायची आहेत.... निरिक्षण चांगलंय तुमचं..."

"माझं तसं सगळंच चांगलंय... माझं असं कुणीच नाही आहे हे तर सगळ्यात चांगलंय... "

खाड! पुन्हा एकदा!

खरंच की! आपलं कोणीतरी असतं हा त्रास असतो की सुख?? सध्या तरी आपल्याला... असं म्हणावसं वाटत नाहीये म्हणा... पण सध्या तरी आपल्याला... आपलं वैवाहीक आयुष्य म्हणजे एक त्रासदायक प्रतीक्षाच वाटत आहे की??

"या.... चहा करू चहा... "

"नाही... चहा वगैरे नको... मला जायचंय जरा लवकर... "

"चहाला मोजून तीन मिनिटे लागतात... तुमच्याकडे किती वेळ आहे??"

"बरं करा.. माझ्या कवितेवर कशी काय इतकी चित्रे काढलीत तुम्ही???"

"तुमची कविता??? तुमची कुठे आहे ती कविता?? माणूस व्यक्त झाला की संपलं.. "

"म्हणजे... माझ्या मी न ऐकवलेल्या कविता याच माझ्या??"

"तुमच्या लक्षात नाही आलं... तुम्ही कागदावर कविता उतरवलीत की ती तुमची नाही... "

"मग.. ती कालची सगळी चित्रंही तुमची नाहीतच की??"

"नाहीच आहेत माझी ती... चित्र पहिल्यांदा डोक्यात तयार होतं... कागदावर उतरवणे हे केवळ भाषांतर... "

"खरंय... मी करू चहा??"

"माझ्या घरातल्या भांड्यांना सुंदर स्त्रीच्या स्पर्शाची वाईट सवय नाही लागलेली..."

बीना एकदम ओशाळलीच! घरात ते दोघेच! अर्थात दार उघडे होते बाहेरचे! आणि आपण एकट्याच आलो आहोत म्हंटल्यावर हा थेट सुंदर वगैरे म्हणून मोकळा! मनाने कसा आहे काय माहीत!

पण काहीतरी बोलायला तर लागणारच होते. राज ते वाक्य बोलताना तिच्याकडे पाहातही नव्हता.

कसेनुसे हासत बीना म्हणाली...

" भांड्यांना सवय?? गंमतच वाटली.. "

राजने एक सिगारेट पेटवली तशी ती बाहेर आली. मगाचपेक्षा खोली बरी दिसत असली तरी या वासात इथे बसायची इच्छाच नव्हती. जयचा मित्र म्हणून थोडा आदर ठेवून लगेच निघालेले बरे असेच तिच्या मनात होते. आपण येणार हे माहीत असूनही हा असाच कसा काय खोली न आवरता राहिला हे तिला समजेना!

"खरे तर तुम्ही याल असे वाटलेच नव्हते... हा घ्या चहा..."

राजने पुढे केलेला कप हातात घेत कसेबसे हासत तिने 'का' विचारले.

"इतकी ऑब्व्हियस घाणेरडी चित्रे काढणारा इसम कसा असेल असे वाटून"

कालची चित्रे आठवली बीनाला!

काहीतरी म्हणायचे म्हणून ती पुन्हा म्हणाली..

"कला ही कला असते.. नाही का??"

"होय... चहा बरा आहे का??"

"हं...चांगला आहे.. खिडक्या... जरा उघडायच्या का??"

"अरे हो.... तुम्हाला स्मोकिंगचा त्रास होत असेल नाही का??"

राजने फटाफट दोन खिडक्या उघडून पंखा लावला. थोड्या झुळुकीने बरे वाटले बीनाला!

"तुम्हाला माझी कविता लक्षात कशी राहिली इतकी?? "

"आवडते ते सगळेच लक्षात राहते.. "

"कालचे प्रदर्शन कोणी स्पॉन्सर केले होते???"

"होय... राठी म्हणून एक आहेत त्यांनी... त्या निमित्ताने काल मी चार पाच दिवसांनी आंघोळ केली... हा हा हा "

किळसच आली बीनाला! इतके सगळे सांगायची तरी गरज काय या माणसाला?? पण वागायला सज्जन दिसत होता.. तिच्याकडे बघतही नव्हता... डोळ्यात कसलीतरी भिन्नच चमक होती... जणू एक चित्रच काढायला बसलाय..

"चला.. बघायची चित्रे??" - बीनाने विचारले..

"ओह येस्स... चला... "

त्याच्या पाठोपाठ ती आतल्या खोलीत गेली. तेथे तो झोपत असावा. ती खोली आणखीनच गचाळ होती. आणि सर्वात शेवटच्या खोलीत प्रवेशताना तिला जाणवले... त्या खोलीत साचलेला सिगारेटचा धूर जर सोडला... तर ती खोली प्रमाणाबाहेर गचाळ होती... रंगांचा तर सडाच होता... पण काहीही वस्तू पडलेल्या होत्या... घाणेरडेपणाचा कळस... मात्र... एक गोष्ट लक्ष वेधून घेत होती... त्या बर्‍याच मोठ्या असलेल्या खोलीतील चित्रे!

चित्रे मात्र अप्रतीम होती अप्रतीम!

काही अनाकलनीय तर काही सहज समजण्याजोगी!

एक एक पाऊल टाकत ती त्याच्या मागे गेली तेव्हा तिला आणखीन एक धक्का बसला...

मागच्या एका भिंतीवर अनेक चित्रे लटकत होती... किमान दहा... आणि प्रत्येक चित्र.... प्रत्येक चित्र तिचेच होते... बीनाचेच!

बघतच राहिली ती! त्याला ते अपेक्षित असावे... तिची चित्रे फार म्हणजे फारच सुंदर होती... मात्र सगळी त्याच लेमन कलरच्या ड्रेसमधील होती...

एका चित्रात ती कुंड्यांना पाणी घालत होती... एकात कविता वाचत असावी... एकात मांजराशी खेळत होती...

काहीही!

"माझी??? मा...झी चित्रे... कशी काय??"

"कारण मला तुम्ही त्या दिवशी थक्क केलेत... यू आर टू ब्युटिफुल.. आय स्टार्टेड लव्हिंग यू... ड्रीमिंग ऑफ यू.."

थेट! काहीही आडपडदा नाही. आणि हे सगळे बोलताना कोणताही भावनिकतेचा मुखवटा नाही. नाना पाटेकर स्टाईलने काहीतरी वेगळेच करत असताना स्वतःशीच बोलल्यासारखे बोलणे! बीनाकडे लक्षच नाही.

"आर... आर यू इन यूअर सेन्सेस ???"

"अ‍ॅबसोल्यूटली ... का?? आपल्या समाजात एखाद्या पुरुषाला एखादी स्त्री किंवा एखाद्या स्त्रीला एखासा पुरुष आवडला तर तसे सांगण्यात इतकी भीतीबीती का वाटावी म्हणे?? माझ्या मनात तुमच्याबद्दल काहीही गैरभाव नाहीत... मी तुम्हाला हातही लावणार नाही ... तुम्ही येथे आलेल्या आहात म्हणून गैरफायदा घेणे तर दूरच... तुम्हाला तसे काहीही कोणत्याही क्षणी वाटले तर तुम्ही ताबडतोब निघून जाऊ शकता... जयची बायको म्हणून मला मित्राचा विश्वासघात केल्यासारखे वाटत नाही... मी काल सगळ्यांदेखतही हेच म्हणालो असतो.. पण ते तुमच्यासाठी योग्य झाले नसते म्हणून म्हणालो नाही इतकेच.... आवडणे हा गुन्हा आहे??"

हेही बोलताना तो चित्रेच आवरत होता... बीनाला आता भीती वाटू लागली.. खरे तर निघायलाच हवे होते...

"चला.. चित्रे पाहिली... छान आहेत... येऊ मी??"

"अवश्य... त्यातले हवे ते चित्र तुम्ही घेऊन जाऊ शकता.. माझ्यातर्फे गिफ्ट... जयला ते आवडणार नसेल असे वाटत असले तर... राहूदेत... "

"नाही नाही... चित्र नको मला.. चला... निघते.. "

"बाय... "

"बाय..."

तो तिथेच काहीतरी करत थांबला. बीना निघाली. तिने मागे वळूनही पाहिले नाही आणि त्यानेही!

"सेल्फिश"

अचानक तो त्राग्याने काहीतरी पुटपुटला तसे तिने दचकून मागे पाहिले. तो तिच्याचकडे पाहात होता. निघायला हवे हे कळत असूनही बीनाला तो तिला स्वार्थी म्हणाला याचा राग आला होता. संबंध संपवायचेच आहेत तर त्याला चार गोष्टी ऐकवूनच जावे असा तिचा विचार झाला.

"व्हॉट डू यू मीन बाय सेल्फिश?? अं?? काय बोलताय कळतंय का घरी आलेल्या बाईशी??"

"तुम्ही का आला होतात माहीत आहे तुम्हाला ?? मी सांगतो. तुम्हाला हे पाहायचे होते की तुमची कविता माझ्यासाठी किती महत्वाची आहे. मी किती चित्रे काढली आहेत त्यावर! त्यामुळे तुम्ही सुखावणार होतात. तुम्हाला कवितेची आणि पर्यायाने स्वतःची स्तुती ऐकायची होती. तुमची अशी अपेक्षा होती की तुम्ही येणार म्हंटल्यावर मी घर आवरून ठेवेन. नीट वागेन. एक स्त्री म्हणून तुम्हाला अतिरिक्त आदर देईन. या सर्व अपेक्षा भंगल्या तुमच्या. कारण तुम्हालाच तुमची कविता पटलेली नाही. भूमिका बदलायला तुम्हीच तयार नाही आहात. तुम्ही कविता जगत नाही आहात. माझ्या चित्रांचा आत्मा तुमचे लावण्य आहे. आणि मी ते स्पष्ट सांगितले. हवे तर केस करू शकता. वादग्रस्तच नसला तर कलाकार कसला?? पण तुम्ही खरे बोलायला, खरे जगायला तयार नाही आहात. तुम्हाला तुमची भूमिका बदलायचीच नाही. 'द फिमेल वर्ल्ड' तुम्हाला मान्यच नाही आहे. विचार करा. आजच्या जगात एखाद्या स्त्रीने एखाद्या पुरुषाला सांगितले की तू मला आवडतोस, तर तो झेपावेल तिच्यावर! तुम्हाला मी ते सांगितल्यावर तुम्ही बुजलात. तुम्ही भूमिका बदलु शकत नाही."

"एक मिनिट.. एक मिनिट... व्हॉट डू यू मीन?? मी इथे आले आणि तुम्ही मला सांगितलेत की तुम्हाला मी आवडते की ते ऐकून मी तुमच्यावर जीव उधळावा??"

"छे?? काहीतरीच काय! पण तुम्हाला ते ऐकवलेही नाही. तुमच्यामते माझा हेतूच वाईट होता. तुम्हाला हे मान्यच नाही की निखळपणे कोणी कोणाला असे सांगू शकते. तुमचा फोन वाजतोय. नक्कीच जयचा असेल. विचारणार असेल की झाली का राजशी भेट! कारण तोही सामान्य आणि तुम्हीही! कसल्या कविता करता??"

बीनाने नंबर पाहिला तर खरच जयचा होता. एक प्रकारे तिला बरंही वाटलं! सुरक्षित वाटलं! पण आत्ताच ती जयला फोनवरून काही सांगणार नव्हती. पण फोनच घेतला नाही तर जय काय म्हणेल हेही सांगता येत नव्हते.

"हॅलो?? जय?? बोल.."

"काय गं भेटला का तो??"

"हो.. निघतीय आता... तू कधी येणारेस??"

"मी येईन... अकरापर्यंत.."

"ओके... बाय..."

"दे ना जरा त्याला.. "

"अरे मी बाहेर आले आता... चल.. बाय..."

"बाय..."

तिने फोन ठेवल्यावर खदाखदा हासला राज कबूर! आणि म्हणायला लागला.

"खोटे बोलून लोक कसे जगतात आणि कसा संसार करतात माहीत नाही... "

"गो टू हेल... आय अ‍ॅम गोईन्ग.. "

"शुअर... हे एक चित्र फक्त पाहून जा... "

नैसर्गीक उर्मीने ती मागे वळली आणि...

.... मटकन खालीच बसली...

ते त्याचे आणि तिचे चित्र होते... संभोग करतानाचे... विवस्त्र...

"नालायक .... "

इतकेच बोलून बीना अत्यंत घाईघाईने घाबरून घराबाहेर जायला धावली. आणि पुन्हा थांबली. मनातच चरकली. या राक्षसाने हे चित्र प्रदर्शनात लावले तर?? आता तर जयला आणि कित्येकांना माहीत झाले आहे की तिच्या कवितेमुळे तो काही चित्रे काढतो हे! काय होईल आपले??? आपल्या संसाराचे !

ताडताड चालत आत आली पुन्हा! तो ढुंकूनही बघत नव्हता.

"हरामखोरा... ते चित्र मला दे आत्ताच्या आता.. तू गजाआड जाणारेस नाहीतर... "

"हे घे... "

त्याने शांतपणे ते चित्र तिच्यासमोर फेकले. तिच्या लक्षात आले. तो असले चित्र हजारवेळा काढू शकतो. हतबल झाली ती! तो बघतही नव्हता तिच्याकडे! ते चित्र घेऊन तिने फाडून टाकले.

"पुन्हा असलं काही केलंस तर जन्मभरची अद्दल घडेल... "

"गेले दिड वर्षं हे चित्र माझ्याकडे आहे... तेव्हा तुला जगताना काहीच वाटत नव्हते... आज हे चित्र तुला दिसल्यावर मात्र तुला वाटू लागले आहे की या किंवा अशा चित्रामुळे तुझे जगणे अवघड होईल... " तो चित्राचे तुकडे गोळा करत म्हणाला...

" मला तुझ्याशी काहीही बोलायचे नाही आहे... मी सरळ चौकीत चाललीय... आणि जयला बोलावून घेत आहे.."

"भूमिका बदलून बघ तू आपली! खूप आनंद मिळेल!"

ताडताड बाहेर पडलेल्या बीनाने ते वाक्य ऐकले असले तरी संताप इतका होता की लक्षच जात नव्हते. सरळ घरी आलि आणि मुसमुसत पलंगावर पडून राहिली. हे सगळे जयला सांगावे की सांगू नये हेच तिला समजत नव्हते. त्याला तिने दोनवेळा फोन केला. एकदा त्याने फोन न घेता मेसेज पाठवला की मीटिंगमध्ये आहे आणि दुसर्‍यावेळेस म्हणाला की थोड्याच वेळात फोन करेल. त्याने पुन्हा फोन केलाच नाही. झालेला प्रकार विस्मृतीत टाकायचा आणि जयला इतकेच सांगायचे की माणुस काही फार चांगला वाटला नाही असे तिने ठरवले.

आणि रात्री साडे बारा वाजता आलेला जय फक्त हसून आणि गुड नाईट म्हणून झोपून गेल्यावर मात्र तिला ती आकृती आठवू लागली. ते किळसवाणे घर आठवू लागले. जय ओढत असलेल्या सिगारेटपेक्षा स्वस्त सिगारेटचा कोंडलेला वास आठवू लागला. आपण कविता जगत नाही हे वाटू लागले. एका माणसाला आपण हक्काच्या वाटत असल्यामुळे नकोच आहोत असे वाटू लागले आणि एका माणसाला आपल्याशिवाय काहीच नको आहे असेही! ते विचार कितीही झटकले तरी ती बेहोषावस्थेतील आकृती पुन्हा पुन्हा डोळ्यासंमोर येऊ लागली. जयच्या महत्वाकांक्षी आयुष्यात असलेले आपले स्थान आणि आपण हे एखाद्याचे आयुष्यच असणे यातील फरक जाणवू लागला. 'भूमिका बदलून पाहू आपल्या' ही ओळ घणाघात करत राहिली मेंदूवर!

शेवटी तिच्यातील पत्नी झोपली आणि कवयित्री स्वप्ने पाडत राहिली.

दुसर्‍या दिवशी सकाळपासून तिने 'राज कबूर' हा विषय गाडून टाकला. जयने फारसे विचारलेही नाही की काल काय काय झाले. याचे मात्र तिला वैषम्य वाटत राहिले. सगळेच हळूहळू मागे पडले.

आणि चार पाच महिन्यांनी पेपरात पुन्हा जाहिरात दिसली. राठी इन्डस्ट्रीजतर्फे राज कबूर यांच्या चित्रांचे प्रदर्शन! यावेळेसचा विषय 'स्त्री - पुरुष'!

धसकाच घेतला बीनाने! आपली कवितेची वही काढून एक्केक कविता तपासली. कोणत्याही कवितेत असा कोणताच विषय तिने हाताळलेला नव्हता. याचाच अर्थ बहुधा अनावृत्त चित्रे दाखवणार आणि कदाचित...

... कदाचित.... आपलीच??

जावे की जाऊ नये?? कळणार कसे?? गेलो तर तो पुन्हा जवळीक करू लागणार! कदाचित सर्वांदेखतही म्हणेल की या घाणेरड्या चित्रांची प्रेरणा हीच बाई आहे. आणि नाही गेलो तर कोणीतरी ती चित्रे पाहणार! कोणालातरी समजणार!

काय करावे हे समजेना! शेवटी तिने निर्णय घेतला. मागच्या वेळेस जशी साडे सातला सर्वाधिक गर्दी झालेली होती तशीच साडे सतला आत एन्ट्री मारायची. त्याच्या नकळत चित्रे पाहून घ्यायची.

तर नेमका पास घरी येऊन पडला. ती पास न वापरताच तिकीट घेऊन जायचे ठरवू लागली.

आणि चक्क गेलीसुद्धा! गर्दीत कोठेतरी राज कबूर दिसला की लांब होत होत तिने प्रत्येक चित्र पाहिले.

काय अप्रतीम चित्रे होती ती! अक्षरशः अप्रतीम!

एका चित्रात बीनासारखीच - म्हणजे बीनाला एकटीलाच समजले की हे चित्र तिचे असावे - पब्लिकला बीना तेथे असूनही कळू नये इतके कौशल्य वापरलेले होते - एका चित्रात ती कविता वाचत होती आणि समोर एकच दाढीवाला इसम दाद देत होता. एका चित्रात ती चहा घेत होती आणि तोच इसम तिच्यासमोर उभा राहून हात जोडून उभा होता. तशी चित्रांची थीम पब्लिकसाठी अनाकलनीय असली तरी बीनाला समजत होतीच.

तिसर्‍या चित्रात एका स्त्रीभोवती माश्या घोंघावत होत्या आणि तो इसम त्या माश्यांना हाकलून देत होता. मधमाश्या! त्या माश्या त्यालाच चावत होत्या. स्त्रीच्या मनावरील विचारांची पुटे काढण्याच्या प्रयत्नात तो जखमी होत होता. चित्रविचित्रच चित्रे होती सगळी! राज कबूरच्या नेहमीच्या स्टाईलप्रमाणे शेवटचे चित्रे त्याच शेवटच्या दालनात होते. त्या चित्रासमोर उभी राहिल्यावर मात्र बीनाला काहीही समजेना!

एक स्त्री एका खोलीतून दुसर्‍या खोलीत वेगात निघून चाललेली होती. तिच्या चेहर्‍यावर एकाचवेळी घाबरलेले आणि संतापाचे भाव बेमालूमपणे आणण्यात आलेले होते. आणि तिच्या परतीची याचना करणारा माणूस मागे नमाज पढताना बसतात तसा बसून बोटे नसलेल्या हातांनी दुवा करत होता. त्याच्या मागच्या भिंतीवर त्याच स्त्रीची अनेक चित्रे लटकत होती. जणू त्या चित्रकाराची चित्रांमागची प्रेरणाच कायमची निघून चाललेली असावी.

काहीही समजलेले नसल्याने आणि आपण त्याला दिसू नये या भीतीने बीना सभागृहाच्या बाहेर लगबगीने निघाली तेव्हा तिला इतकेच समाधान होते की कोणत्याच चित्रात ती असूनही ती आहे असे कोणालाच वाटू शकणार नव्हते.

फक्त जाताना कोणातरी समीक्षकाचे बोलणे कानावर पडत होते इतकेच...

"राज कबूर यांनी समस्त रसिकांवर केलेल्या अन्यायाने हतबुद्ध होऊन आम्ही सारेच तीव्र दु:खी झालेलो आहोत... चित्रकलेची प्रेरणा संपत आहे असे लक्षात आल्यावर त्यांनी आपले दोन्ही हात एका मशीनमध्ये घातले. ही तीव्र दु:खद घटना आहे. राज कबूर... का केलेत असे??? या जगाला तुमच्या प्रतिभेचा आविष्कार अजूनही हवा होता"

मागे वळून बघताना बीनाला राज कबूरच्या चेहर्‍यावर हास्य आणि दोन्ही हातांच्या पंजांवर बॅन्डेज दिसत होते.

=============================

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

शब्दच नाहित माझ्याकडे.....भन्नाट लिहलेय एकदम Happy

कथा नाही आवडली मला...
फक्तं तुमचं "सुट्या"वर किती प्रेम आहे ते लक्षात आलं... I don't mind tht.. कारण मी पण ओढतो : )

अतिशय अप्रतिम कथा!! खूपच आवडली.

कथेच्या प्रवाहातून जीवनातील अनेक कटू सत्यांची वाचकाला जाणीव करून देण्याची आपली हातोटी विलक्षण आहे. त्यामुळे आपल्या कथा निव्वळ मनोरंजनात्मक न राहता ते जीवनाचे भाष्य ठरते.

आपल्या कथांमधेही 'गझलियत' आहे.

धन्यवाद!!

बेफिकिर,
तुम्ही लिहिलेल्या समस्त कथांपैकी अत्यंत उल्लेखनिय कथा असं म्हणेन मी.
वाक्यागणिक डोळे उघडणारी. राज हा माणूस किती मनस्वी होता ते त्याच्या वाक्या वाक्यातून कळतंय.. शिवाय कोणत्याही भौतिक सुखात न अडकता स्वत: खरं जगणारा, आणि त्याच प्रकारे खरं जगण्याचा विचार दुसर्‍या माणसाच्या मनात प्रव्होकेट करणारा... तरिही शेवटी तितकाच भावनाविवश...

>>"नक्कीच करणार तो कौतुक... ज्या माणसाचा कलेशी सुतराम संबंध नाही अशा माणसाची बायको कलाकाराकडे निघाल्यावर तोंडदेखले कौतुक नक्कीच करावे लागणार..." >> हे सॉलिड सडेतोड, तोंडफोडी उत्तर.. मला जाम आवडलं...

कथा आवडली.. Happy

पुलेशु!

(एक नम्र प्रश्न- तुमच्या कथेत, सिगरेटी, बायका यांचा उल्लेख मस्ट(च) आहे का? :अओ:)

दक्षिणा, बहुतेक आपल्याला 'जय' ऐवजी 'राज' लिहायचे होते ना?

खूप आभार सर्वांचेच ! Happy

दक्षिणा -

आपले विशेष आभार! Happy

सिगरेटी, बायका यांचा उल्लेख - माहीत नाही, बहुधा प्रत्येकच लेखनात येत असावा. तसे असल्यास तसेच म्हणावे लागेल. Happy

-'बेफिकीर'!

बेफिजी.. एका स्त्री ला काय कुठल्याही प्रसंगी नक्की काय वाटु शकत हे तुम्ही इतक्या प्रभावीपणे कसं काय लिहु शकता?? सॉरी मला (म्हणजेच एका स्त्रीला) पडलेला एक साधा प्रश्न्न्..
बाकी कथा खुप छान.. मी तर ऑलरेडी तुमच्या लिखाणाचा पंखा आहेच..

काय पण भन्नाट लिहिताराव भाऊ! जब्बरदस्तच!

राज मधिल कलेविषयीच प्रेम आवडलं!
त्याने बिनाचे भावपूर्ण चित्रे काढणे ठिक आहे पण ते संभोगाचे चित्र बिनाला दाखवणारा राज नाही आवडला माणुस म्हणून! मग कलेवर त्याचे किता का निष्ठा असेना.तुम्ही रंगवलेला राज हा कलानिष्ठतेबरोबरच बाईलवेडा वाटतो.जयचा स्वार्थीपणा देखील राजच्या या अवगुणाला झाकाळत नाही.

हे वाचक म्हणून माझे वैयक्तिक मत आहे. चू.भू.दे.घे. कथा एकदम छान. बेफिकिर स्टाईल.

बेफी शेवट नाही आवडला कथेचा!
नॉट बिकॉज आय लव्ह हॅप्पी एन्डिंग ओर सो... पण वास्तववादी नाही शेवट म्हणून!!

अतिप्रांजळपणे मत नोंदवलय!

वादग्रस्तच नसला तर कलाकार कसला??>> भावलं!

आवडली कथा............ !!!

काही प्रसंग आणि नायिकेच्या मनात उमटणारे विचार अगदी वास्तव. Happy

थोडक्यात संपवलीत..... क्रमशः ची सवय झाली होती Wink

vaah

मस्त ... अप्रतिम..!!!

उध्वस्त होणंही प्रचंड सुखावह असू शकतं यावर विश्वास आहे माझा....!!
त्यामुळे शेवट मनातून आवडला.

Pages