माझी कैलास्-मानस सरोवराची यात्रा भाग २ ( दिल्ली ते नारायण आश्रम)

Submitted by अनया on 19 November, 2011 - 04:33

ह्या वर्षीच्या जून-जुलै मला हिंदूंचे पवित्र स्थान असलेल्या आणि निसर्ग सौंदर्याने नटलेल्या कैलास-मानस सरोवराची पवित्र यात्रा करण्याची संधी मिळाली. त्याचे माझ्या तोकड्या भाषेत केलेले हे वर्णन.

आधीचे भाग वाचण्यासाठी इथे टिचकी मारा.

http://www.maayboli.com/node/30416

ओम नमः शिवाय.

माझी कैलास-मानस सरोवरची यात्रा
(भाग-२ दिल्ली ते नारायण आश्रम)
मला जाताना आपल्या बॅचमध्ये कोण-कोण असतील ह्याची खूप उत्सुकता आणि काळजी वाटत होती. एक जरी मैत्रीण मनासारखी मिळाली तरी सगळ्या प्रवासात मजा येते. त्यातून मी काही फार देवभोळी वगैरे नाही. आपल्याबरोबरचे सगळेच लोक अगदी किरकोळ गोष्टीचा संबंधही जर ‘भोले बाबाकी कृपा’ ला लावणारे असतील तर काही खर नाही, अशीही भीती वाटत होती. अशा अनेक काळज्या आणि परस्पर दक्षीण-उत्तर ध्रुवाची सहल करावी लागली तरी पुरेल इतके समान घेऊन मी दिल्लीत पाय ठेवला.

विदेश मंत्रालयाकडून आलेल्या सूचनांप्रमाणे यात्रींची राहण्याची सोय दिल्लीत, सिव्हिल लाइन्स येथील गुजराथ समाज सदन येथे केली होती. मी विमानाने दिल्लीत आणि टॅक्सीने राहण्याच्या जागी पोचले. गुजराथ समाज सदन म्हणजे भलामोठा पसारा आहे. दिल्ली आणि परिसरात फिरायला येणारे बरेच गुजराथी लोक इथे राहतात.

गुजराथ समाज सदनात अक्षरशः उघड्यावर झोपणे ते वातानुकुलीत खोल्यांपर्यंत व्हरायटी आहे. कैलास यात्रींची सोय सुदैवाने वातानुकुलीत डोर्मिटरीमध्ये होती. कारण पुण्याच्या पावसाळी हवेनंतर दिल्लीचा कडकडीत उन्हाळा भाजत होता. डोर्मिटरीमध्ये पोचून स्थीरस्थावर झाले.

gurrath samaj.jpgगुजराथ समाज सदन मधील राहण्याची व्यवस्था

एकापाठोपाठ एक यात्री येऊन धडकत होते. मेडीकलसाठी दिल्ली किंवा जवळपास राहणारे लोक परस्पर येऊ शकतात. बाहेरगावचे लोक आदल्या दिवशीच पोचत होते. महाराष्ट्र, गुजराथ, झारखंड, मध्य प्रदेश, कर्नाटक, केरळ, पश्चिम बंगाल सगळीकडची मंडळी येत होती. महाराष्ट्राचे एकूण ११ लोक होते. मला लगेचच एक छान मैत्रीण मिळाली. पुण्याची, आर्किटेक्ट, एकटी आलेली!!! मी खुष! आता आपला प्रवास मस्त होणार ह्याची खात्री वाटायला लागली. थोड्या थोड्या ओळखी झाल्यावर सगळ्यांच्या बोलण्यात ही मेडीकल परीक्षा आपण पास होऊ का? ही काळजी व्यक्त होत होती. सारखा ‘ ओम नमः शिवाय’ आणि ‘जेकारा ए वीर बजरंगी हर हर महादेव’ हा गजर चालू होता.

मी ह्या यात्रेला जाण्याच नक्की केल तेव्हा मी घरून एकटी जाणार हे नक्की होत. नवऱ्याची येण्याची फार इच्छा नव्हती. शिवाय तो संगणक क्षेत्रात असल्याने महीनाभर सुट्टी मिळणे कठीणच होते. लेकाच्या आणि घर सांभाळण्यासाठी आलेल्या आई-बाबांच्या दृष्टीनेही मला नवरा घरी असणे सोयीस्करच वाटत होते! कामाच्या किंवा ट्रेकिंगच्या निमित्ताने मी पुष्कळ वेळा एकटीने प्रवास केले होते. त्यामुळे ‘एकटीने प्रवास’ ही कल्पना कोणालाच फार धक्कादायक वाटत नव्हती.

पण आमच्या बरोबरच्या मंडळीना मात्र ह्या गोष्टीचे आश्चर्य वाटण्याइतके आश्चर्य वाटत होते. एका हिंदी भाषिक पट्ट्यातील काकांनी पहिला चेंडू टाकला,’ आप क्या अकेलेही आये हो? आपके हसबंड नही आये?’ मी चेंडू सोडून दिला. ‘नहीं, थोडा लिव्हका प्रॉब्लेम था.’ काकांचा दुसरा बॉल,’ अच्छा अच्छा. बढिया है, आपको एकेलीको जानेको उन्होने परमीशन दिया’ आता मात्र मला फटका मारायचा मोह आवरला नाही. ‘ वो कौन होते है मुझे परमीशन देने वाले? मै खुद सोच सकती हुं.’ माझा तीव्र मराठी बाणा! काका नंतर पूर्ण वेळ माझ्याशी जपूनच बोलत होते!!

एक ७० वर्षांचे आजोबा होते. त्यांनीही ‘मुझे जरा अपने हसबंडका नंबर देदो. मै उन्हे डाटनेवाला हुं. कैसे दामाद है. हमारी बेटी को बेचारीको अकेलीको भेज दिया.!’ मी गारच झाले. मी हातापाया पडून त्याना समजावलं की ‘तुम्ही अस केल तर माझ्या नवऱ्याला समजणार नाही की हे काय आणि कोणाबद्दल बोलताहेत? त्यानी नाही पाठवलं, मी आपणहून आले.’

महाराष्ट्रात एकट्या बाईने फिरण इतकही नवीन वाटत नाही. फक्त बायकांच्या ट्रीपपण निघतात. पण भारतात सगळीकडे असे वातावरण नाहीये हे लक्षात आल्यावर मी मनातल्या मनात ‘जय महाराष्ट्र’ म्हणून टाकल.

गुजराथ सदानात पोचल्यापासून जो भेटेल तो एकमेकांना ‘ओम नमः शिवाय’ म्हणत होतं. रोजच्या व्यवहारात वापरले जाणारे ‘नमस्ते’, ‘गुड मॉर्निंग, थॅन्क यू , सॉरी’ हे शब्द खालसा करून सगळीकडे, सगळ्यासाठी ‘ओम नमः शिवाय’!! मग मीसुद्धा ती सवय लावून घेतली.

ह्या यात्रेसाठी एकदम जोरदार मेडिकल घेतात. भारत असेपर्यंत कुमाऊ मंडळ विकास निगम किंवा भारत सीमा तिबेट पुलीस हे वैद्यकीय मदत देतात. प्रत्येक कॅम्पवर डॉक्टर असतात. प्रश्न असतो तो तिबेटमध्ये गेल्यावर. तिथे चीन सरकार कुठलीही वैद्यकीय मदत देत नाही. ह्या यात्रेत समुद्रसपाटीपासून १८६०० फूट इतकी उंची गाठायची असल्याने हृदय, फुफ्फुसे तेवढा ताण घेऊ शकतील का, हे काटेकोरपणे तपासले जाते. त्याचबरोबर हिमोग्लोबीन, लघवी, रक्त, छातीची क्ष किरण तपासणी, स्ट्रेस टेस्ट, पल्मनरी फंक्शन टेस्ट अशा तपासण्या केल्या जातात. ह्यात पास होणाऱ्या यात्रीनाच पुढे जायची परवानगी मिळते. (यात्रेतल्या ‘गुंजी’ ह्या कॅम्पवर पुन्हा तपासणी होते. तेथूनही परत पाठवू शकतात.)

मी आधी म्हटल्याप्रमाणे भारत सरकार दरवर्षी सोळा बॅचेस यात्रेला पाठवते. प्रत्येक बॅच साठ लोकांची असते. प्रत्येक बातच बरोबर एक लायझन ऑफिसर असतात. हे ऑफिसर भारत सरकारचे अंडर सेक्रेटरी किंवा त्यावरील पदांवर काम करणारे असतात. हे सर किंवा मॅडम त्या-त्या ग्रुपचे नेतृत्व करतात तसच ते भारत सरकारचे प्रतीनिधीही असतात. ग्रुपमध्ये शिस्त ठेवणे, सर्वांची काळजी घेणे, काही बरी-वाईट परिस्थिती उद्भवल्यास त्या वेळेला योग्य असे निर्णय घेणे अश्या भरगच्च जबाबदाऱ्या त्यांच्यावर असतात. एख्याद्या यात्रीचे वर्तन योग्य नसल्यास ते त्याला परतही पाठवू शकतात. आमच्या बॅचचे एल.ओ. कोण असतील ह्याची खूप उत्सुकता होती. मेडीकलच्या वेळेला ते भेटतीलच, असे लोकांचे म्हणणे होते. आलेल्यान्पैकी कोण पुढे जाणार आणि कोण घरी? ही एक काळजी होती. मला माझे हिमोग्लोबिनचे आणि वजनाचे आकडे डोळ्यासमोर आले की पोटात गोळा येत होता. दुसऱ्या दिवशी ह्यातल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतील अशी आशा होती.

दिनांक १० जून २०११

एक चांगली गोष्ट म्हणजे एकदा गुजराथ सदनला पोचलात की प्रत्येक गोष्टीची सोय कुमाउ मंडळवाले करतात. जेवण, चहा-पाणी, राहणे, वैद्यकीय तपासणीसाठी जाता-येता बसची सोय सगळं. अनेक स्वयंसेवी संस्था यात्रींची उत्तम सोय व्हावी म्हणून प्रचंड काम करतात. आम्ही सर्व लोक तयार होऊन, न खाता-पिता (मेडिकलमुळे) दिल्ली हार्ट लंग इंस्टिट्यूटला पोचलो. त्या सगळ्या तपासण्यांसाठी ३१०० रुपये आणि चीनी व्हिसासाठी पारपत्र असे जमा करून घेतल्यावर तपासण्यांची फैर सुरु झाली. निरनिराळ्या तपासण्यांसाठी फिरताना सहयात्रींची ओळखही होत होती. आमच्या बॅचमध्येच दोन डॉक्टर आहेत अस कळल्यावर बर वाटलं.

आजिबात हिंदी-इंग्रजी न येणारी काही गुजराथी मंडळी होती, तर केरळचे एक डॉक्टर फक्त इंग्रजी येणारे होते! अश्या सगळ्या जनतेची मोट आमचे एल.ओ. बांधणार होते. एक महिना हेच मित्र-मैत्रिणी, हेच कुटुंब.

एक-एक करून सगळ्या तपासण्या संपल्या. नंतर त्या हॉस्पिटलच्या प्रेक्षकगृहामध्ये सगळ्यांना बसवून ‘यात्रा आणि त्या दरम्यान घेण्याची काळजी’ अशी माहिती देण्यात आली. आपण समुद्रसपाटीपासून जसे वर वर जातो, तशी ऑक्सिजनची पातळी कमी होते. त्याचा आपल्या मेंदूवर, डोळ्यांवर, पचनसंस्थेवर, स्वभावावर सगळ्यावरच परिणाम होऊ शकतो. हाय अल्टीट्यूड सिकनेसच्या ,अक्युट आय माउंटन सिकनेस, हाय अल्टीट्यूड सेरेब्रल एडीमा आणि हाय अल्टीट्यूड प्लमनरी एडीमा अश्या चार पायऱ्या असतात. ह्यात मृत्यूही ओढवू शकतो. (ही सर्व माहिती प्रथमच मिळत असल्याने सगळे जण मन लावून ऐकत होते. नंतर तिबेटमध्ये पोचेपर्यंत इतक्यावेळा ही माहिती दिली गेली, की आम्ही काही उनाड लोक मागे बसून मज्जा करायला लागलो!!)

medical-1.jpgmedical-2.jpgयात्रेची माहिती घेताना यात्री

आमचे एल.ओ. श्री.मनमीतसिंग नारंग हे गृह खात्यात काम करणारे आय.पी.एस. ऑफिसर आहेत असे कळले. ते मेडीकल दरम्यान काही जणांना भेटून गेले. पण माझी भेट होऊ शकली नाही.
माझा एक शाळेतला मित्र दिल्लीत राहतो. संध्याकाळी त्याच्याबरोबर फिरून, गप्पा मारून मस्त मजा केली. शाळेतल्या दिवसांच्या आठवणी काढून भरपूर हसलो, खिदळलो. मेडिकलच सगळ दडपण निघून गेल. आता दुसऱ्या दिवशी भारत सीमा तिबेट पुलीसच्या इस्पितळात मी यात्रेला जाणार की परत घरी, हा निर्णय होणार होता.

दिनांक ११ जून २०११

आम्ही सर्व लोक तयार होऊन, आणि आज व्यवस्थित नाश्ता-पाणी करून भा.ति.से.पोलीस हॉस्पिटला पोचलो. आज सगळेजण ‘किस्मत का फैसला’ मोड मध्ये होते. एव्हाना माझी आणि नंदिनीची (पुण्याची मैत्रीण) मस्त मैत्री झाली होती. तेवढे सूर बॅचमधल्या कोणाशी जुळतील अस वाटत नव्हत. दोघीतल्या एकीला जर परत जायला लागलं तर फारच पंचाईत होणार होती! कारण बाकीच्या सगळ्याच बायका नवऱ्याबरोबर आल्या होत्या. दोघींना जायला मिळाव नाहीतर दोघींना परत तरी पाठवाव अस वाटत होत. नेहमीप्रमाणे तिथेही यात्रेत घेण्याची काळजी, पाळावयाची शिस्त, नियम, हवामान ह्या विषयांवर माहिती दिली.

नंतर एकेकाला बोलावून फैसला सुरु झाला. आम्ही सगळे मिळून ६२ लोक होतो. प्रत्येकाला बोलावून त्यांचे सर्व रिपोर्ट्स तीन डॉक्टर मिळून बघत होते. आपण जास्त उंचीवर जाऊ, तसा बऱ्याच जणांचा रक्तदाब वाढतो. त्यामुळे आधीच जास्त रक्तदाब असलेल्यांना परत-परत तपासत होते. निरनिराळ्या कारणांमुळे एकूण दहा लोक नापास झाले. दोन लोक काठावर पास, किंवा नापास होये. दुर्दैवाने त्यात नंदिनी होती. तिचा इ.सी.जी. नीट नव्हता, अस डॉक्टरांच म्हणण होत. पण हे सांगणाऱ्या डॉक्टर मॅडम चक्क प्रसुतीतज्ञ होत्या! हृदयविकार तज्ञ नव्हत्याच! मग त्यानी नंदिनी आणि अजून एकीला जवळच्या बात्रा हॉस्पिटलमध्ये जाऊन परत इ.सी.जी. काढायला सांगितला. त्या दुसऱ्या मीनाचा नवरा स्वतः डॉक्टर होता. त्याच्या म्हणण्याप्रमाणे काहीही प्रश्न नव्हता. तिथल्या हृदयविकार तज्ञाने ‘ SHE IS FIT FOR ANY KIND OF TRAVEL’ असे लिहून दिले. परत आमची वरात भा.ति.से.पोलीस हॉस्पिटलला. तिथले डॉक्टर म्हणाले ,’SHE IS FIT FOR ANY KIND OF TRAVEL AND TREKKING AT HIGH ALTITUDE’ अस लिहून आणा. पुन्हा बात्रा. पुन्हा भा.ति.से.पोलीस हॉस्पिटला. अशी सगळी सव्यापसव्य करून दोघींना परवानगी मिळाली! हुश्य!

गुजरात सदनमध्ये संमिश्र वातावरण होत. नवरा-बायकोच्या जोडीतील कुठे नवरा तर कुठे बायको नापास झाली होती. त्यांची रडारड, समजावणे चालू होते. मला आणि नंदिनीला मात्र आता गुंजीपर्यंत नक्की जाणार ही खात्री वाटायला लागली. ह्याच खुशीत झोपून गेलो.

दिनांक १२ जून २०११

आज तस फार गडबडीचा दिवस नव्हता. सकाळी निवांत १० वाजता साउथ ब्लॉकला विदेश मंत्रालयाच्या कार्यालयात माहिती देणार होते. नारंग सर सगळ्यांना भेटले.

तेथेच भारतातील यात्रेसाठी २२००० रुपयांचा धनादेश, इंडेमिनीटी बॉन्ड तसेच इतर कागदपत्रे द्यावी लागतात. ते सगळ्याचं झाल्यावर, तिबेटमध्ये गेल्यावर जे विदेशी चलन लागत ते घेण्यासाठी सेंट्रल बँकला घेऊन गेले. मी आणि नंदिनी डॉलर पुण्याहून घेऊन आलो होतो. त्यामुळे वेळ वाया न घालवता सरोजिनी मार्केटला भटकणे, बाहेर अबर-चबर खाणे अश्या अत्यंत महत्वाच्या कामांना लागलो!!

संध्याकाळी दिल्ली सरकारतर्फे ‘बिदाई’ कार्यक्रम असतो. भजन, भाषण, पूजा, जेवण असत. त्याच बरोबर दिल्ली सरकारकडून एक भली मोठी सॅक, रेनकोट, पूजा साहित्य, टोपी, (track) ट्रॅक सूट, टॉर्च अस भेट म्हणून देतात. दिल्लीच्या नागरिकांना तर रोख वीस हजार रुपये पण मिळतात. गुजराथ, कर्नाटक, झारखंड अशी काही राज्य पण मदत देतात. महाराष्ट्र सरकार मात्र काही देत नाही.

आत्तापर्यंत निरनिराळ्या व्यक्ती आणि संस्थांकडून भेटवस्तूंचा अक्षरशः वर्षाव चालू होता. वैद्यकीय अहवाल ठेवायला मोठी प्लास्टिक पिशवी, लहान सॅक , कमरेचा पाऊच, पारपत्र जवळ ठेवण्यासाठीचा पाऊच, जमा करायच सामान ठेवायला पोती, त्यांना गुंडाळायला दोऱ्या, चालताना आधाराला काठ्या, लोकरी मोजे, बिस्कीट !! आधीच्या भव्य सामानाला अतिभव्य रूप येत चालल होत. दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता निघायच होत. कसबस सामान कोंबल. बरोबर नेण्याच आणि गुजराथ सदनला जमा करायचं सामान वेगळं करून झोपून गेलो.

दिनांक १३ जून २०११ (दिल्ली ते अल्मोडा)

आज आम्हाला दिल्ली ते काठगोदाम असा ३६० कि.मी.चा प्रवास वातानुकुलीत बसने आणि पुढे अल्मोद्यापर्यंतचा प्रवास साध्या बसने करायचा होता.

सकाळी ठरलेल्या वेळेला आम्ही सर्व जण आवरून, सामान जमा करून बाहेर पडलो. बाहेर आलो तर काय, आम्हाला निरोप द्यायला मोठा जमाव जमला होता!! दिल्लीतल्या यात्रींचे कुटुंबीय, कुमाऊ मंडळाचे लोक, खूप गर्दी होती. सगळे यात्रीन्च्या पाया पडत होते,. हातात खाऊ, पाण्याच्या बाटल्या कोंबत होते, अगदी डोळ्यात पाणी आणून ‘ ठीकसे वापस आना’ असा निरोप देत होते. लोकांच प्रेम, श्रद्धा पाहून सगळ्यांनाच भरून येत होत. समारंभाने हार-तुरे घालून, गंध लावून दिल्लीच्या लोकांनी आम्हाला निरोप दिला.
bus-1.jpgbus-2.jpgदिल्लीकरांचा विधीवत निरोप

बस निघाल्यानंतर, एल.ओ. सरांनी सगळ्या बॅचची ओळख परेड सुरु केली. (तसेही ते पोलीसवाले होतेच!) आमच्या पन्नास जणांच्या बॅचमध्ये ३८ पुरुष आणि १२ बायका होत्या. सर्वात लहान यात्री १८ आणि सर्वात मोठे कालराजी ७० वर्षांचे होते. नवरा बायको, आई-मुलगा, भाऊ-भाऊ अश्या जोड्या होत्या.

kathgodam-1.jpg

हा असाच कौतुक समारंभ गाझियाबादमध्ये नाश्त्यासाठी थांबलो तिथे, जेवणाला काठगोदाम थांबलो तिथे सगळीकडे झाला. सगळ्या ठिकाणच आदरातिथ्य, श्रद्धा, यात्रींना सगळ्या प्रकारची मदत करण्याची धडपड बघून भारावून जायला होत होत. अस करत करत रात्री अल्मोड्याला मुक्कामाला पोचलो.

दिनांक १४ जून २०११ (अल्मोडा ते धारचूला)

group.jpg

आमची बॅच

आज अल्मोडा ते धारचूला असा ११ तासांचा बस प्रवास होता. त्यामुळे लवकरच निघालो. आता हिमालयात आल्याची जाणीव होत होती. रस्ता वळणा-वळणांचा होता. प्रत्येक वळणानंतर नवीन नयनरम्य दृश्य दिसत होत. आमच्या नशिबाने हवा छान होती. मजा येत होती. असा सुंदर प्रवास करत आम्ही पिथोरगढला दुपारच्या जेवणाला पोचलो.

road-1.jpgroad-2.jpgroad-3.jpgroad-4.jpgdharchula-1.jpg

महाराष्ट्रात कैलास-मानस बद्दल फार लोकांना माहिती नाहीये. मी जाण्याचे ठरवल्यावर बऱ्याच जणांनी ‘ म्हणजे अमरनाथ का?’ ‘हे चारधाम जवळ आहे का?’, ‘ तिथे मोठ देऊळ असेल ना?’ वगैरे प्रश्न विचारले होते. इथे उत्तराखंडमध्ये मात्र स्थानिक वर्तमानपत्रातून, निरनिराळ्या वाहिन्यांवरही यात्रेच्या बातम्या येतात.

pithoragad.jpgpithoragad-1.jpg

पिठोरागड येथील वार्ताहार व छायाचित्रकार ह्यांची गर्दी

पिथोरगढ पासून काही अंतरावर मीरथी येथे भारत सीमा तिबेट पोलीस ह्याच कॅम्प हेडक्वार्टर आहे. ह्या यात्रेची सुरक्षा, वैद्यकीय मदत, काही वाईट परिस्थिती ओढवल्यास तशी मदत ही सगळी जबाबदारी भा.ती.से.पोलीस घेतात. तिथला कौतुक समारंभ सगळ्यात भारी होता. बसमधून उतरल्यावर दोन्ही बाजूंना जवान स्वागताला उभे, नाचणारे लोक, उत्तम अल्पोपहार, शाळेच्या विद्यार्थ्यांचे कार्यक्रम अशी बडदास्त होती.

mirthi-1.jpgmirthi-2.jpgmirthi-3.jpg

मिरथी मधील स्वागत-समारंभ

तिथल्या कमांडंटसाहेबांनी चीनमध्ये गेल्यावर सुरक्षिततेची कशी काळजी घ्यायची हे सांगितले. तिबेटी भाषेतले रोज लागणारे शब्द असणारी पुस्तिका सर्वाना दिली. पूर्ण बॅचचा एक फोटो काढून त्यांनी आम्हाला निरोप दिला. हे सगळ स्वागत बघून जरा संकोचच वाटत होता. आम्ही काही एवरेस्टवर स्वारी करणार नव्हतो किंवा एखाद युद्धही लढणार नव्हतो. ज्या सैनिकांच आपण स्वागत करायला हव, ते आमच्या सोयींसाठी केवढीतरी धडपड करत होते. तिथे नागपूरचा एक मराठी जवान भेटला. त्याच्याशी मराठीत गप्पा मारून पुन्हा एकदा तो दमवणारा बसप्रवास सुरु केला.

मध्ये एका ठिकाणी एक खूप साऱ्या घंटा टांगलेल मंदीर होत. तिथे थोड थांबलो.

temple-1.jpgtemple-2.jpgtemple-3.jpgtemple-4.jpg

आता पाऊस सुरू झाला होता. मोबाईलवर गाणी ऐकत पावसाची मजा घेत होतो. घर सोडून आता चार दिवस झाले होते. हा मोबाईलचा शेवटचा दिवस. नंतर जर एस.टी.डी.ची सोय असेल तरच घरी बोलता येणार.

धारचूला ह्या सुन्दर गावात संध्याकाळी उशीरा पोचलो. हे गाव नेपाळच्या सीमेवर आहे. काली नदीच्या अल्याड नेपाल आणि पल्याड भारत.

धारचूलाला गेल्यावर दिल्लीत दिलेलं मोठ सामान तीन दिवसांनी मिळाल. पुन्हा सगळ्या खोल्यान्मधून समानशी झटापट सुरु झाली. आपल्याला पोर्टर तसच पोनी हवा असेल तर इथे सांगाव लागत. मला मिळालेल्या सल्ल्यानुसार मी दोन्ही करणार होते. ह्यांचे दर तेथील सोसायटी ठरवत असल्याने ‘ तुळशीबाग पद्धतीने’ घासाघीस करायला काही वाव नव्हता!!

ह्या यात्रेत सामानाची पद्धत अशी असते की, वीस किलो सामान वाहून नेण्याची जबाबदारी कुमाऊ मंडळ घेते. जिथपर्यंत वाहन जाऊ शकत तिथपर्यंत ट्रकने आणि नंतर खेचरांवर लादून सामान नेतात. हे मोठ सामान भिजू नये म्हणून ते तरटाच्या गोण्यांमध्ये घालून, दोरी बांधून, त्यावर आपल नाव घालून द्याव लागायचं. आमच्या नंतरच्या बॅचमधल्या एका यात्रीच सामान नदीत पडून हरवल. पण बाकी यात्रीनी मदत केल्यामुळे त्यांची यात्रा पूर्ण झाली.

dharchula_0.jpg

आमचे भव्य सामान!

पण ह्या सामानाची रोज भेट होण्याची खात्री नसते. त्यामुळे एका लहान सॅक मध्ये थोडे कपडे, थोडा खाऊ,रेनकोट अस सामान ठेवायचं. आपल पारपत्र, रोख पैसे, डॉलर हे सदैव आपल्या अंगावर वागवायचे. शिवाय कॅमेरा, टोपी इत्यादि असतच. अश्या बऱ्याच लेव्हलच सामान असल्याने पुढे कॅम्प वर एखादी वस्तू आपल्याच सामानात शोधणे म्हणजे गवतात सुई शोधण्यासारख असायच. त्यातही साबण शोधताना मेणबत्ती, रुमाल शोधताना पेन असे गमतीदार प्रकार व्हायचे. (पुढे पुढे आपली वस्तू शोध्ण्यापेक्षा दुसऱ्याची मिळत असेल तर वापरून मोकळे व्हायचो!! ट्रेकमध्ये एक वस्तू सातच काय पण पन्नास लोकही वाटून घेऊ शकतात!!)

आता उद्यापासून खरी खरी यात्रा सुरु होणार. व्होल्व्हो बस, साधी बस, जीप अश्या पायऱ्या उतरत उतरत आता चालायला सुरवात करायची होती. वर्षानुवर्ष मी ह्या यात्रेची स्वप्न बघितली होती. पण आत्ता मात्र डोक्यात असंख्य शंका आणि प्रश्न होते. हवामान, आपली तब्येत, चालायला जमेल ना, सामानाची गडबड तर नाही ना होणार? बापरे. किती काळज्या, शंका आणि चिंता! पण बस प्रवासाचा एव्हाना खूप कंटाळा आला होता. हात-पाय आंबून गेले होते. उद्यापासून चालल की मोकळ वाटेल ह्या विचाराने छान वाटत होत. घरी सगळ्यांशी पोटभर गप्पा मारून घेतल्या आणि कैलासाची स्वप्न बघयला लागले!!

ह्या पुढचे भाग वाचण्यासाठी कृपया इथे टिचकी मारा!

भाग ३: नारायण आश्रम ते लीपुलेख खिंड: http://www.maayboli.com/node/30799
भाग ४: मुक्काम तिबेट : http://www.maayboli.com/node/31261
भाग ५: महाकैलासची परिक्रमा : http://www.maayboli.com/node/31407
भाग ६: मानस सरोवराची परिक्रमा : http://www.maayboli.com/node/31704
भाग ७: तकलाकोट ते लीपुलेख खिंड : http://www.maayboli.com/node/31889
भाग ८: लीपुलेख खिंड ते गाला : http://www.maayboli.com/node/32246

गुलमोहर: 

धन्यवाद दिनेशदा. परत मी ‘ललित’ मध्येच लिहिलंय. ते ‘ प्रवासाचे अनुभव’ मध्ये हलवायला सांगाल का प्लीज!

खूपच सुंदर लिहिलंय ......... पुढचे भाग लवकर लवकर येऊ द्यात, खूप उत्सुकता दाटलीये मनात.....

अनया, चालतंय इथेही. या शब्दांवरुन कधीही शोधता येईल.
आणि हे प्रवासातल्या अनुभवांपेक्षाही खुप अनोखे असणार आहे.

झक्कास..

मलाही लवकरच ह्या यात्रेचे बुकिंग करायची अदम्य ईच्छा होतेय.

लवकरच आणि नक्की करणार...

मार्गदर्शनाची गरज पडेलच.. नक्कीच संपर्क करणार

छान लिहिलय. पुढचे भाग लवकर लिहा

नावाला जागायला हव! - गवतात सुई शोधण्यासारख ? मायबोलीवर बरोबर नाही वाटत

अनया, तुमची लिहिण्याची शैली खूप छान आहे. वर सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे पुढचे भाग लवकर येऊ देत.

फोटो पिकासावर टाकलेत तर त्यांची लिंक इथे देता येईल, जेणेकरून मोठ्या साईझमध्ये बघता येतील.

वा ! हा भागही ऊत्तम!! पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत .
(विशेष विनंती : फार वाट पाहायला नका लावू. :डोमा:)

लवकर लवकर लिही अनया,छान चालु आहे.तुझी लिखाणाची शैली ईतकी सहज आहे की ते वाचुन मला पण मानसरोवर यात्रेला जायची ईच्छा व्हायला लागली आहे.
दिल्लीच्या नागरिकांना तर रोख वीस हजार रुपये पण मिळतात>>>>>>> हे खरंच माहित नव्हतं.पण वाचून बरं वाटलं !!

Pages