पाएया, पाएया!!!

Submitted by मामी on 30 October, 2011 - 14:50

दक्षिण फ्रान्समध्ये स्थित असलेल्या नीसमध्ये फिरताना, त्यातल्या एक रेस्टॉरंटमध्ये हिरव्या न्युऑन साइनने चमकणार्‍या अक्षरातला 'Paella' (पाएया) असा जादुभरा शब्द पाहिल्ला आणि एकदम "या अल्ला" असा उद्गार निघाला. मग नवर्‍याच्या मागे धोशा. 'राया मला शालू आणा पैठणचा' च्या चालीवर माझं आपलं सुरू - 'राया मला पाएया खिलवा ना!'. पण या ना त्या कारणाने ते नीसमध्ये राहूनच गेलं.

नीसचं पाएया हुकलं ते डायरेक्ट जेव्हा शेवटच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोचलो तेव्हा पुन्हा उसळी मारून वर आलं. मार्सेइलमध्ये मी पणच केला की इथे पाएया खाणार म्हणजे खाणारच.

बरं आमच्याकडे ते तसं सोपंही नाही. नवरा कट्टर शाकाहारी आणि मी बर्‍यापैकी मांसाहारी. त्याला मांसाहाराबद्दल मेंटल ब्लॉकच आहे म्हणानात. म्हणजे, तसं मी त्याच्या शेजारी बसून चिकनचा रस्सा ओरपला तरी त्याचं काही म्हणणं नसतं. पण जर चुकून 'खा रे एकदा तरी चिकन. बरफी सारखीच लागते ती जवळजवळ' असं म्हटलं की तो अपसेटच होतो. आता हे अपसेटणं 'चिकन खा' असं म्हटलं म्हणून असतं की चिकनला 'बरफी' म्हटलं म्हणून असतं हे मला आजतागायत कळलेलं नाहीये.

मत्स्याहाराबद्दल तर त्याची एक फारच कटू आठवण आहे. ती आठवून आठवून मी अजूनही खदखदा हसत असते म्हणजे ती त्याच्याकरता किती कटू असेल ते लक्षात घ्या. गजालीमध्ये एका निवांत रविवारी तब्येतीत मासे खाण्याची मनिषा बाळगून मी आणि शाकाहार मिळणार ना? हे पुन्हा पुन्हा विचारून खात्री करून घेतलेला तो असे पोचलो. मेन्यु न्याहाळण्यात दंग असलेल्या माझ्या नवर्‍याला मागे गनिम येऊन पोहोचलाय याची कल्पनाच नव्हती. शेजारून अचानक आवाज आला "साहेब हा बघा एकदम मस्त, ताजा खेकडा!" म्हणून त्याने (आणि मी) दचकून वर पाहिले आणि तोंडासमोर आणलेला तो जिवंत अगडबंब खेकडा, त्याचे ते काळे मण्यासारखे डोळे आणि फाकवलेले नांगडे असे ते रूप पाहून तो आधीपेक्षा किमान शंभरपट अधिक दचकला. जीवनात हे असं काही टॅकल करावं लागेल याची पुसटशी कल्पनाही नसताना अचानक समोर हे संकट बघून तो इतका अपसेट झाला की, सरळ उठून दुसर्‍या रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवला. (मी टिच्चून गजालीतच जेवले हे सांगायला नकोच. Proud ).

तर ते पाएयाचं......

या माझ्या पा. प्रकरणाला एक छोटासा, अगदी पातळ सुताचा संदर्भ होता. एकदा टिव्हीवर श्रीमती पद्मलक्ष्मी यांना खास इटली की स्पेनमध्ये हा मासे-बिसे घालून बनवत असलेला भाताचा स्पॅनिश प्रकार खाताना पाहिलं. त्यात त्यांनी पाएया बनवतानाचं जे चित्रण दाखवलं होतं, जे रसभरीत वर्णन केलं होतं आणि बनवून झाल्यावर चाखून पाहताना पदार्थ तोंडात असतानाच जे हातवारे करून आणि मग तोंडाने 'ऑस्सम","अमेझिंग" असे जे आनंदोद्गार काढले होते त्यामुळे माझी उत्सुकता पार छताला भिडली होती. ते कुठेतरी मनात राहिलं होतं आणि नाव वाचल्याबरोबर मग डोक्यात जाऊन घुसलंच.

पहिल्या दिवशी भरपूर चालून झाल्यावर एक भारतीय जेवणाचं हाटेल सापडलं होतं तिथे नवर्‍याला आणि लेकीला जेवायचं होतं. मग दमलो असताना दोघांकरता एका रेस्टॉरंटमध्ये आणि मग माझ्याकरता दुसर्‍या रेस्टॉरंटमध्ये कुठे जाणार? म्हणून मीही शाकाहारी भारतीय आणि अतिशय चविष्ट जेवण जेवले.

मग दुसर्‍या दिवशी आदल्या दिवशीच शोधलेलं पाएयाचं रेस्टॉरंट गाठलं. तर तिथल्या मेन्युत केवळ सीफूडच. मग असं ठरलं की मी आणि लेक एक पाएया शेअर करू आणि मग दुसर्‍या भारतीय रेस्टॉरंट मध्ये जाऊन नवरा आणि लेक जेवतील. लेकीनं आधीच जाहीर केलं होतं की जर तिला पाएयाचा 'लुक' आवडला तरच ती तो खाणार. लुक हं, चव नाही!

मी 'एक प्लेट पाएया विथ किंग प्रॉन्स' अशी झक्कास ऑर्डर दिली. तर तो प्राणी त्याच्या बोबड्या आणि तोकड्या इंग्रजीत केवळ एक प्लेट ऑर्डर चालणार नाही असं सांगायला लागला. पद्मलक्ष्मीबाईंच्या कृपेनं पाएया मोठ्या प्रमाणावर बनवला जातो वगैरे भौतिक ज्ञान बाळगून होते. त्यामुळे वाटलं की बनवता बनवता जरा जास्तच बनत असेल कदाचित म्हणून किमान दोन प्लेटिंची ऑर्डर द्यायला हवी असं सांगत असावा. पण आता दोन प्लेट कोण खाणार? लेकीकडनं काहीही अपेक्षा बाळगण्याचा भाबडेपणा करण्यात अर्थ नव्हता. म्हटलं चला, दुसर्‍या हाटेलात जाऊन चोक्सी करू.

मग नवर्‍याने प्रकरण हातात घेतलं. आधी त्याने वेटरला बोलावलं आणि तो कसा व्हेजिटेरीयन आहे. त्यामुळे खरंतर एकच व्यक्ती खाणार आहे, आणि उगाच अन्नाची नासाडी होईल असा भारतीय दृष्टीकोन त्याला ऐकवला. तर त्याचं म्हणणं असं की हा निर्णय त्याच्या 'बोस'नी सांगितला असल्याने तो काहीच करू शकत नाहीये. हात पसरून आणि खांदे उडवून त्याने त्याची असमर्थता व्यक्त केली. पण तेवढ्यात पठ्ठ्या बोलून गेला की, आम्ही चार लोकांचं टेबल अडवून केवळ एकाच प्लेटीची ऑर्डर देणं ही बाब त्यांना खटकत होती.

आता ही वेगळीच पंचाईत होती. एक तर मी आधी पाएया खाल्ला नव्हता त्यामुळे तो कितपत आवडेल याबद्दल काहीसा संदेह होता. (काहीसाच. कारण सहसा मी कोणत्याही नवा प्रकार खाऊ शकते आणि ९९.९९% वेळा मला तो आवडतो.) शिवाय, किंमतही चांगलीच दणदणीत होती. त्यामुळे दोन प्लेटस, ज्या संपणार नाहीत याची पूर्ण खात्री आहे, त्यावर इतके पैसे खर्च करायचे या विचाराने मला त्रास व्हायला लागला होता.

मग नवर्‍याने शेवटचा खडा टाकून पाहिलं. त्याने त्या वेटरला सांगितलं जर तुम्हाला टेबलाबद्दल आक्षेप असेल तर मी बाहेर जातो. या दोघींकरता एक टेबल दे आणि एक प्लेटची ऑर्डर घे. पण त्याकरताही 'बोस' नाही म्हणाला.

मी वैतागून उठलेही होते. पण मग नवर्‍यानेच बसवलं. दुसरीकडेही हीच स्थिती असेल तर? गपचूप बसा आणि इथेच ऑर्डर द्या. आणि हवं तेवढंच खा. शिवाय इतर रेस्टॉरंटपेक्षा इथे जास्त गर्दी दिसतेय. म्हणजे इथलं जेवणही चांगलं असणार असा त्याचा हिशोब. (पण खा एकदाचा तो पाएया आणि माझ्यामागची भुणभुण बंद करा - हे मला आपसूक ऐकू आलं.) मग काय? दिली दोन प्लेटींची ऑर्डर. तोवर लेकही खाण्याबद्दल उत्साह दाखवायला लागली होती त्यामुळे मनात आशांकूर फुटू लागले होते. बघताबघता आजूबाजूची टेबलं भरायला लागली. मग टेबलाची किंमत पुरेपूर वसूल करण्यामागचं कारण लक्षात आलं आणि पटलंही.

तब्बल ४० मिनिटांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर दोन बर्‍यापैकी मोठ्या आणि खोलगट प्लेटस समोर आल्या आणि टेबलावरच्या दोन मंडळींची दाणादाण उडाली. कारण प्लेटमधल्या पाएयांवर प्रत्येकी ६-७ किंग प्रॉन्स आणि ४ काळ्या मोठ्या शिंपल्या दिमाखात मिरवत होत्या. आणि ते प्रॉन्स आपल्यासारखे कवचातून बाहेर काढल्याने शरीराची गुंडाळी करून निपचित पडलेले नव्हते तर पूर्ण संरजामासहीत होते. त्या मोठ्या मिशा, ते मोठे काळे डोळे आणि उकडल्यामुळे केशरी रंग ल्यालेलं त्यांचं कवच! संदर्भानुसार त्या फारच विलोभनीय (मला), भितीदायक (लेकीला) आणि आश्चर्यचकीत करून सोडणार्‍या (नवर्‍याला) अशा भासल्या. सौंदर्य बघणार्‍याच्या आणि खाणार्‍याच्या डोळ्यात, डोक्यात आणि पोटात असतं असं म्हणतात ते खोटं नाही. कारण झिंग्यांचं ते रूपडं पाहिल्यावर लेकीनं भूक नसल्याचं डिक्लेअर केलं आणि खबरदारीचा उपाय म्हणून ती सरळ माझ्या खुर्चीमागे जाऊन उभी राहिली.

आता लढाई मला एकटीला लढायची होती. सगळ्यात आधी मी तो गरमागरम पाएया चाखला. अप्रतिम चव होती. समुद्रातले ३-४ प्रकारचे खाद्यप्रकार आणि शिवाय भरपूर मटारही घातली होती. कोलंबीची आणि मटारची खिचडी याचा संकर असावा असा लागत होता. मला आवडलाच. मग मस्तपैकी दोन्ही हात वापरून एकाएका बादशाही झिंग्याचं कवच काढून मी मनसोक्त झिंगे आणि शिंपल्या खाल्या. मग माझ्यासमोरची प्लेट बाजूला करून दुसरी प्लेटही झिंगे आणि शिंपल्या विरहीत केली. आणि दोन्ही प्लेटीतला थोडा थोडा पाएया, त्यातले वेचक आणि वेधक समुद्री प्राणी निवडून घेत खाल्ला. दोन्ही मिळून एक प्लेट उरला असेलच तरीही. आणि समोरच्या छोट्या प्लेटमध्ये कवचांची एक छोटीसी टेकडी उभी राहिली होती.

बाजूच्या टेबलावरच्या लोकांकडे बघायची माझी हिंमत नव्हती. त्यांना काय अजब दृष्य दिसत असेल त्याची मी कल्पना करू शकत होते. एक बाई नवर्‍याला आणि लेकीला काहीही न देता दोन-दोन प्लेटस मधून नेमके पदार्थ उचलून खातेय. मुलगी भेदरून खुर्चीमागे दडलेय. समोर नवरा बसून आपल्या बायकोच्या या सर्वभक्षी रूपाकडे काहीसा आश्चर्याने तर बराचसा प्रचंड उत्सुकतेने पाहतोय ...... वा! काय पण दृष्य!!!

(जेवताना विचारायची हिंमत नसल्याने) बाहेर पडल्यावर नवर्‍याला विचारलं की काय रे बघत होतास एवढं? तर म्हणे ते प्रॉन्स जिवंत आहेत आणि तू ते तसेच खातेयस असं वाटत होतं. पण तरीही तो अपसेट-बिपसेट नव्हता. भले शाब्बास! गजाली ते मार्सेइल बरीच प्रगती झाली होती तर! या सगळ्या भानगडीत मी मात्र मत्स्याहाराबद्दलची नवर्‍याची पुरोगामी आणि सुधारीत आवृत्ती बघून सुखावले. Happy

***********************************

साधारण असाच दिसत होता :

paella.jpg

(प्रचि आंतरजालावरून साभार.)

गुलमोहर: 

.

Rofl शेवटचं दृश्य भारीच असणार!
पाएला भारीच लागतो हे मात्र खर.
मला ते डोळे, पाय असलेले प्रॉन्स बघुन जरा कसेतरीच होते म्हणुन ते तेवढे हक्काच्या माणसाकडुन साफ करुन घेते. तेवढच खायचे कष्टही कमी.

Rofl सह्हीच Happy
मामी, पाएल्लाचा फोटो तरी टाकायचा ना Happy

पण जर चुकून 'खा रे एकदा तरी चिकन. बरफी सारखीच लागते ती जवळजवळ' असं म्हटलं की तो अपसेटच होतो. आता हे अपसेटणं 'चिकन खा' असं म्हटलं म्हणून असतं की चिकनला 'बरफी' म्हटलं म्हणून असतं हे मला आजतागायत कळलेलं नाहीये.>>>>>:हहगलो:

मस्त Happy

ते वरती स्वातीने लिहील्याप्रमाणे पाएआच असावा उच्चार. मेक्सिकन स्पॅनिशमधे डबल एल आला की उच्चार य/अ होतो, मूळ स्पॅनिशमधेही तसेच असेल (टॉर्टिया, एल पोयो लोको ई.). पण कदाचित तुम्ही तो उच्चार तेव्हा जसा वाटला तसा लिहीला असावा. तसे असेल तर हा फु.स. दुर्लक्षित करा Happy

उच्चार पाएल्ला असाच आहे. पद्मलक्ष्मीही असाच करत होती. आणि विकीपिडीयाआजोबाही तेच बोलतात. (roughly like million)

Paella (Valencian: [paˈeʎa], Spanish: [paˈeʎa]) is a Valencian rice dish that originated in its modern form in the mid-19th century near lake Albufera, a lagoon in Valencia, on the east coast of Spain.[1] Many non-Spaniards view paella as Spain's national dish, but most Spaniards consider it to be a regional Valencian dish. Valencians, in turn, regard paella as one of their identifying symbols... वगैरे वगैरे.

त्यातूनही काही रीजनल उच्चार असेल तर बुवा आपल्याला माहित नाही. कोणाला नक्की माहित आहे तर सांगावे प्लीज.

'चिकन खा' असं म्हटलं म्हणून असतं की चिकनला 'बरफी' म्हटलं म्हणून असतं हे मला आजतागायत कळलेलं नाहीये. >>

माझी उत्सुकता पार छताला भिडली होती. >>

Rofl Lol

मस्तच आहे. डोळ्यापुधे दृश्य आले आणि ऑफिसमधे हसू आले.
तस्मात..डिस्क्लेमर गरजेचा आहे Happy

पण पाएया खूप आवडतो हे अगदी खरं!!

मामे, आता मामांसाठी व्हेजीटेरियन पायेल्ला करायची जबाबदारी माझ्यावर !!
मस्त लिहिले आहे.

'बाजूच्या टेबलावरच्या लोकांकडे बघायची माझी हिंमत नव्हती. त्यांना काय अजब दृष्य दिसत असेल त्याची मी कल्पना करू शकत होते. एक बाई नवर्‍याला आणि लेकीला काहीही न देता दोन-दोन प्लेटस मधून नेमके पदार्थ उचलून खातेय. मुलगी भेदरून खुर्चीमागे दडलेय. समोर नवरा बसून आपल्या बायकोच्या या सर्वभक्षी रूपाकडे काहीसा आश्चर्याने तर बराचसा प्रचंड उत्सुकतेने पाहतोय ...... वा! काय पण दृष्य!!!'
मामी, निदान या दृष्याचा तरी फोटू पाहायचाय .. नुस्तं इमॅजिन करून हसून हसून पोट दुखलं

मामी, मजेशीर लिहिलं आहेस Happy ते वरच्या फोटोत काळे शिंपले आहेत का या लेखात लिहिल्याप्रमाणे? माझी कल्पना होती की शिंपले थोडे त्रिकोणी असतात. मला पटकन त्या चिकूच्या बिया वाटल्या.

मी ऑफिसमधल्या मैत्रिणींबरोबर "तिथे शाकाहारी मिळतं" या अमिषावर भुलून 'हायवे गोमांतक'मध्ये जाऊन जेमतेम कसेबसे दोन घास सोलकढीभात खाऊन उपाशी परत आले होते, ते आठवलं. तुझ्या अहोंची काय अवस्था झाली असेल ते पुरेपूर समजू शकले Proud

निदान या दृष्याचा तरी फोटू पाहायचाय .. नुस्तं इमॅजिन करून हसून हसून पोट दुखलं
>>> अगदी अगदी. तरी नशिब दोन्ही प्लेट्स वेगवेगळ्याच ठेवल्या. एकत्र केलं असतं तर अजूनच... Rofl तिकडे पार्सल करुन मिळण्याची सोय नाही का इकडल्यासारखी? म्हणजे अन्न फुकट न जाता तुला आवडलेला पदार्थ तुला जरा पोटात जागा झाल्यावरही खाता आला असता :कंजुष बाहुली:

ते वरच्या फोटोत काळे शिंपले आहेत का या लेखात लिहिल्याप्रमाणे? माझी कल्पना होती की शिंपले थोडे त्रिकोणी असतात. मला पटकन त्या चिकूच्या बिया वाटल्या.

>>>>> चिकूच्या बिया! ख्यँ... ख्यँ....ख्यँ .......

अग ते उकडून भातात खुपसून ठेवलेत म्हणून त्यांचा त्रिकोणी आकार लपलाय. उकडले की ते उघडतात. आणि चिकूच्या बियांपेक्षा निदान तीनपट मोठे असतात. Happy

दिनेशदा, नक्कीच! मलाही आवडेल तुमच्या हातचा पाएल्ला खायला.

वर्षुताई, अगदी फोटो काढण्यायोग्यच सिच्युएशन होती. पाएल्लाचा, माझा, लेकीचा, नवर्‍याचा आणि शेजारच्या टेबलावरच्या जोडप्याचा असे अनेक ..... Proud

एक बाई नवर्‍याला आणि लेकीला काहीही न देता दोन-दोन प्लेटस मधून नेमके पदार्थ उचलून खातेय. Lol

त्या पद्मालक्ष्मीकाकु म्हणजे काही काळ सौ रश्दी होत्या त्या? ती बाई तर हाच का, कुठलाही पदार्थ कधी खात असेल असे वाटत नाही. Proud

मामे, दोन प्लेट पाएल्ला ! Uhoh अचाट, अचराट आणि भयंकर आहेस तु अगदी. कारण पाएल्ला थोडक्यात बनवणं म्हणजे कठीणच. Quantity & Quality food मधे पाएल्ला हि डिश बघायला मिळते. मी एकदा एका continetal food fest. मधे पाहिली होती हि डिश. खाल्ला तर खाल्ला वरून इथे त्याबद्दल लिहून केलेला 'कल्ला' मस्तच.

आवडलं. नेहमीसारखंच खास !

Pages