कविता वाचन...... स्वतःशी
एखादी कविता एकदम काळजाचा ठाव का घेते कळत नाही....... मग मी ही फार चिकित्सा करत बसत नाही - ते शब्द छान आहेत म्हणून.... का आशय उत्तम आहे म्हणून.... का अगदी लयीत आहे म्हणून......
पण तरी ही असं होतंच की...
एखादी कविता गुणगुणायला भाग पाडते....
एखादी विचार करायला भाग पाडते....
एखाद्या कवितेत इतका सुंदर विचार मांडलेला असतो की आपले विचारच बंद होतात - जणू ती आपल्यावर एक गारुड करते.
एखाद्या कवितेत मन आपलंच प्रतिबिंब शोधू लागतं....
कधी कवितेतील अनुभवाशी मन समान धागा जोडू पहातं.....
खरं तर कविता मला एकट्यालाच वाचायला आवडते - अगदी आवडती व्यक्तीदेखील शेजारी नको
कधी कधी प्रतिसाद / अभिप्रायातून आपल्या विचारांपेक्षा वेगळाच विचार / परसेप्शन वाचायला मिळतं - पण हे फार फार क्वचित...
कविता वाचायच्या आधी माझी पाटी कोरी आहे ना हे मी आवर्जून पहातो.
फार संभ्रमित अवस्था, संतप्तता, खूप उत्साहितता, मनाचं इरिटेशन, मिश्किलपणा असे भाव मनात असतील तर माझ्याबाबतीत तरी काव्यवाचन होउ शकत नाही.
काव्यवाचन हे एकट्यानेच करायचे या मताचा मी आहे. (जाहीर काव्यवाचन करु नये व तेथे रसिकाने जाउ नये असा मात्र भाव अजिबात निर्माण करु इच्छित नाही) कविता वाचनात - मधेच कुणाची हाक, फोन, डोअरबेल हे सगळे व्यत्यय पूर्ण रसास्वाद नष्ट करु शकतात. वर म्हटल्याप्रमाणे आपली अगदी आवडती व्यक्ती ही तेव्हा शेजारी नको असे वाटते.
फारच क्वचित असं होतं की आपला सगळा मूडच ती कविता बदलवू शकते. मनस्तापही दूर करुन अगदी सुगंधी गारवा देऊन जाते. असा क्षण किंवा अशी कविता भाग्यानेच लाभते.
आवडलेली कविता किती काळ आपल्या स्मरणात रहाणार, पुढे केव्हाही ती तेव्हढीच आवडती रहाणार का असा विचारही मग मनात येत नाही.
खूपदा त्या कवितेशी एकरुपच होण्यात अतिआनंद असतो. शक्य असेल तर वाचनानंतर शांत बसून अथवा डोळे मिटून तो आनंद उपभोगत रहावा अशी मनस्थिती होते.
त्या आनंदातून बाहेर आल्यावर मग तो कोणाबरोबरतरी शेअर करावा असे वाटू लागते.
बरेच वेळा आपली मनस्थिती अनुकूल नसेल किंवा कवितावाचनाला अनुकूल अशी परिस्थिती नसेल तर खूप चांगल्या कवितेवरही अन्याय होउ शकतो.
कधी एखाद्या कविचं नावंच असं मोहिनी घालणारं असतं की ती कविता सगळ्यात आधी वाचायला घेतली जाते. दुसरं असं की त्या नावाला जोडून काही अपेक्षाही सुरु होतात. अर्थात कधी या अपेक्षा पूर्ण होतात किंवा कधी अपेक्षाभंग......
किती किती परिमाणं, वेगवेगळी परिस्थिती, आपली मनस्थिती....अशा अनंत गोष्टी - या सगळ्यातून घडणारं कवितावाचन..... हे नेहेमीच जमलेलं थोडंच असणार .... यावर कडी म्हणजे हे "मला" वाटणारं, "दुसर्याला" वाटेलच असं नाही......नाही का..... ?
एखाद्याच्या अभिव्यक्तीशी दुसर्यानं एकरुप होणं ....... किती अवघड गोष्ट जणू एक आश्चर्यच (क्वचित घडणारी गोष्ट) !
शब्दातून / कवितेतून कोणी अभिव्यक्त होउ पहातो....... काय करणार.....त्याचं अभिव्यक्तिचं साधनंच ते आहे नं....
आणि...
दुसरा घटक म्हणजे रसिक....... त्या अभिव्यक्तीशी कधी कधी चक्क एकरुपच होतो आणि त्याच्याकडून नकळत शब्द येतात - वा, बहोत खूब, क्या बात है.....
हे शब्द ऐकायला त्यावेळेस कवि थोडाच तिथे हजर असतो ?
पण या मनाचे त्या मनाशी सूर जुळतात ते असेच..... कधीतरी....भाग्यानं....एक आश्चर्यच !
(No subject)
बहोत खूब...
बहोत खूब...
अतिशय प्रामाणिक लिखाण-
अतिशय प्रामाणिक लिखाण- अभिनंदन, शशांकजी!
फार संभ्रमित अवस्था, संतप्तता, खूप उत्साहितता, मनाचं इरिटेशन, मिश्किलपणा असे भाव मनात असतील तर माझ्याबाबतीत तरी काव्यवाचन होउ शकत नाही.>> अनुमोदन
आपला कवितेचा अभ्यास वाचून
आपला कवितेचा अभ्यास वाचून आपल्यासमोर माझी अडचण मांडतो आहे.
सावरकरांनी यमक जुळणे आवश्यक नसलेले 'वैनतेय वृत्त' शोधून बरेच काव्य त्यात लिहिले आहे. त्यात आधिची ओळ पुढच्या ओळीतही घुसून अर्थ पूर्ण करते. पण त्या कवितेचे प्रकट वाचन समाधान होईल अशाप्रकारे करणे मला जमलेले नाही. या काव्याचे वाचन वक्तृत्वाच्या अंगाने एका विशिष्ट पद्धतीने केल्यास त्या वृत्ताचे अंगभूत सामर्थ्य कळून येते असे मी एका विश्वासार्ह पुस्तकात वाचले आहे. पण या विशिष्ट पद्धतीची प्रत्यक्ष माहिती असणारी व्यक्ति मला अजून भेटली नाही. आपल्याला याबद्दल कांही माहीत असेल तर कृपया सांगावे.
"दामोदरसुत" - मला या "वैनतेय"
"दामोदरसुत" - मला या "वैनतेय" वृत्ताबद्दल काही ही माहिती नाही, क्षमस्व.
माझा कवितेचा अभ्यास - विशेष काय अजिबातच नाही - काव्यातील छंद, वृत्त, मात्रा वगैरेही मी जाणत नाही. मराठी साहित्याविषयी खूप कुतुहल आहे, वाचायला आवडते व विशेषकरुन - कवितेविषयी जास्तच कुतुहल आहे..... कविता वाचायला व करायला आवडतात एवढेच.
अलगदपणे अनेक मुद्यांना स्पर्श
अलगदपणे अनेक मुद्यांना स्पर्श करून गेलेलं व कोणत्याही अनुभवाबाबत फार विस्तृत असण्याचा हेतू नसलेलं लेखन वाटलं! आवडलं! पण आपल्याला कोणत्या प्रकारच्या कविता आवडतात त्याची दोन चार उदाहरणे असायला हवी होती असेही वाटले. असे म्हणण्याचे कारण म्हणजे मला आजवर एकही मराठी कविता वाचून अतिशय आवडणे किंवा डोळे मिटून शांत बसणे असे झालेले नाही. मात्र उर्दू गझलेचे काही शेर वाचल्यावर मात्र मला असे काही वेळा (आजवर पाच ते सहा वेळा असेल) झालेले आहे.
मराठी काव्य व उर्दू काव्य यांची तुलना एकदा लिहायची आहे या इच्छेला या निमित्ताने एक नवीन ठिणगी प्राप्त झाली. अर्थात, आपण विशिष्ट भाषेच्या काव्याबाबत लिहिले आहेत असे म्हणायचेच नाही.
चिंतनीय ललित!
-'बेफिकीर'!
सर्वांचे मनापासून
सर्वांचे मनापासून आभार.....
बेफिकीर - पण आपल्याला कोणत्या प्रकारच्या कविता आवडतात त्याची दोन चार उदाहरणे असायला हवी होती असेही वाटले. >>>> इथे "आपल्याला" म्हणजे सापेक्षता आलीच - त्यामुळेच कोणतेही उदाहरण देणे अवघड वाटले... पण प्रतिसादाकरता मन:पूर्वक आभार....
मस्तच्..........मलाही बर्याच
मस्तच्..........मलाही बर्याच कविता आठवल्या माझ्या मनाच्या ठाव घेनार्या आणि मन परत गुनगुनायला अधीर झाले त्या कविता परत एकदा..........
सजातीय आहे माझीही
सजातीय आहे माझीही आस्वादप्रक्रिया, खूप आत वळत जाणारी ..एक कालिदासाचे भाष्य आठवले.कुणीतरी लिहिलेलं ,बोललेलं दुसर्याच कुणालातरी वेगळ्या स्थळकाळात का आवडतं?कुणाबद्दल/कशाबद्दल तरी अकारण आपलेपण का वाटतं ? तर त्याचं उत्तर 'भावस्थिराणि जननांतरसौहृदाणि'!
जन्मजन्मात साथ करणारे स्थिर असे सौहार्दाचे भाव.. जे अंधुकपणे जागे असतात..
वैनतेय वृत्ताबद्दलही उत्सुकता वाटली.
सुंदर लेखन.खूप विचार करायला लावणारे.
gud 1
gud 1