आत्याबाईंच्या गोष्टी

Submitted by उमेश वैद्य on 10 October, 2011 - 11:55

आत्याबाईंच्या गोष्टी

आत्याबाई घरात सगळ्यात वडिल. साहजिकच त्यांना कुटूंबात मान असायचा. पण आपली वडिलकी
त्यांनी उगाचच कुणावर गाजवली नाही. नणंदांशी त्यांचे संबंध कायम सौदाहार्यपूर्णच राहिले.
त्या मुळेच घरातील सगळ्यांना त्या हव्याहव्याशा वाटायच्या. त्या माहेरपणाला कधी येतात याची
मंडळी वाट पहात असायची. आम्ही मुले तर त्यांच्या येण्याची डोळ्यात तेल घालून वाट पहात असू.
नऊवारी साध्या पातळातली, शांत,सोज्वळ, प्रेमळ अशी आत्याबाईंची मूर्ति समोर दिसली की आमच्या
आनंदाला पारावार रहात नसे. याला आणखीही एक कारण होत, आणि ते म्हणजे आत्याबाईंच्या गोष्टी.

आत्याबाईंची स्मरणशक्ति अगाध होती. कितीतरी गोष्टी, किस्से, गाणी, कविता त्यांना पाठ होत्या आणि ती
रंगवून सांगण्याची विलक्षण कला त्यांच्याकडे होती. रात्रीची जेवणे झाली की आत्याबाईंची बैठक बाहेरच्या
खोलीत भरे. मध्यभागी त्या बसत आणि आम्ही मुले त्यांच्या भोवती कोंडाळ करीत असू. मग गोष्टी, किस्से
ईत्यादींची मेजवानी सुरू होई.

आत्याबाईंचा पिंड विनोदी. खरं तर त्यांच्या गोष्टी त्यातल्या वात्रटपणामुळेच आम्हाला आवडत होत्या असं
आज जाणवतं. गोष्टी सांगताना आत्याबाईंनाही वेगळाच आनंद मिळत असावा.
"आणखी एक ...आणखी एक... अस करता करता मध्यरात्र केव्हा उलटून गेली हे देखील कळत नसे.
एरवी नऊ दहाच्या दरम्यान झोपेच्या अधीन होणारी आम्ही मुल झोप विसरून त्यांच्या गोष्टींच्या अधीन होत होतो.

घरातली ईतर वडिलधारी मंडळी सुध्दा आत्याबाईंच्या गोष्टींकडे कान देऊन असत.
"ताई, ती ही सांग ना! " किंवा "तो वशाच्या लग्नातला किस्सा माहित आहे ना तुला?"
असं मधे मधे बोलुन आत्याबाईंना ईंधन पुरवत आणि मग आम्ही मुल, आता आत्याबाई काय सांगतात
हे कानात प्राण आणून ऐकत असू.

आत्याबाईंच्या गोष्टीत कुणाची टवाळी नसे,कुणाचा उपमर्द ही नसे. असे ती निखळ गम्मत आणि
प्रसंग विशेषातील विनोद. गोष्टी रूपातून हे विनोदी किस्से सांगण्याची त्यांची हातोटी मोठी विलक्षण होती. ऐकणा-याला त्या विनोदातली अविट गोडी चाखायला मिळे. गोष्टी त्याच त्याच असत, पण त्यांच्या तोंडातून त्या पुन्हा पुन्हा ऐकण्यातही आनंद असे. "अति परिचययात अवज्ञा" असं या गोष्टींच्या बाबतीत कधी झालं नाही.

लक्ष्मीबाईंची स्मृतिचित्रे वाचताना मनाला ज्या प्रकारच्या संवेदना होतात, तशाच काहीशा आत्याबाईंच्या गोष्टी ऐकताना होत असत. विनोद, उपरोध, प्रसंगाची हुबेहुब वर्णने, व्यक्तिंची शब्दचित्रे ही आत्याबाईंची हुकमी आयुधे होती. कोणत्या वेळी कोणत वापरायच याच उपजत ज्ञान आत्याबाईंना होत म्हणूनच आत्याबाईंचा विनोद मनाला भिडे. या कथनांच्या जोडीला पूरक हावभाव व माफ़क अभिनय देखील असे. त्यांच्या या गोष्टींचा ठसा आजही मनावर ताजा टवटवीत आहे. आज या कथा आठवताना, त्या वेळी न समजलेल्या, न जाणवलेल्या कितीतरी गोष्टी जाणवतात
त्यातून त्या वेळचा समाज,व्यक्ति,मध्यम वर्गीय घरातील चालीरीती, विचार धारणा ईत्यादींच विहंगम दर्शन घडत.

आत्याबाईंनी सांगितलेल्या काही गोष्टी;

एकदा अशाच आत्याबाई आल्या होत्या. रात्रीची जेवण झाली आणि आम्ही मुल त्यांच्या भोवती घोटाळू लागलो. पहाता पहाता गोष्टींचा माहोल तयार झाला.

"काय बाई तरी पूर्वींची लग्न, आतासारख नव्हतऽऽऽ लग्नसोहळा चांगला आठ आठ दिवस चालायचा. घरात पाहूणे रावळ्यांचा सुकाळ असे. खूप गमती जमती असत मुलांनो", आत्याबाई सांगु लागल्या.. आम्ही कान टवकारले.

"काकूंच्या वसंताच्या लग्नात गम्मतच झाली. ही मुल अगदी लहान होती. बिगरीच्या वयाची असतील". वडिलधा-यांकडे निर्देश करीत त्या म्हणाल्या.

"बाहेर होम हवन चाललेल! घरातल्या बायका कामात मग्न. तेंव्हा जेवणाची कंत्राट वगैरे हा प्रकार नसायचा. फ़ार तर आचारी बोलावला जाई. बाकी सारी कामे घरातील नातेवाईक स्त्रीयाच करायच्या. तर एकीकडे लग्नाचे विधी चाललेले आणि दुसरीकडे मंडळींची कामे चाललेली. ही मुल तिथेच खेळत होती. त्या मुलांत वहिनीचा ‘तातू’ ही होता. तातू बोबड बोलायचा. झालं काय, की खेळता खेळता ही मुल माजघरात गेली. तिथं काकूनं ‘झालीची’ तयारी केली होती. झाल म्हणजे काय ते माहित आहे का मुलांनो? अरे ब्राम्हणांच्या लग्नातला तो एक विधी असतो. कणकेत हळद घालून ती घट्ट भिजवायची आणि त्या कणकेचे दिवे करायचे. एका टोपलीत ते दिवे ठेउन त्यात वात घालून ते पेटवायचे, मग ती टोपली वधुपक्ष व वरपक्षा कडील एकेक वडिल मंडळींच्या डोक्यावर ठेवायची. नवदंपतींच्या वैवाहीक आयुष्याकडे तुमच लक्ष असूद्या असा काही अर्थ यात असावा.

काकूनं सगळी तयारी केलेली. छोटे छोटे पिवळे दिवे करून त्यात वाती घालून टोपलीत ठेवलेले.
ऐनवेळी ते पेटवायचे फ़क्त बाकी होते. मुलं खेळत खेळत माजघरात गेली, पहातात तो काय ते छोटे छोटे पिवळे दिवे! मुलांना वाटल पेढेच! आजूबाजूला कोणी नाही हे पाहून मुलांनी एक एक उचलला आणि बोकाणा भरला. पण चव कळल्यावर बाहेर जाऊन हळूच थुंकून टाकला. पण ‘तातू‘ न पेढा खाल्ला तोच काकू तिथ आली. तिला कळेल या भितीने त्यान तो भराभर खाऊन टाकला. चव न आवडल्यामुळे तातूच तोंड कसनुस झाल. पण सांगतो कुणाला! काकू मारेल ही भिती."

"पण खरी गम्मत पुढेच आहे मुलांनो. तातूने दिवा खाल्ला तो वातीसकट. दिवा पोटात गेला पण त्याची वात तातूच्या अर्धी तोंडात अर्धी घशात अशी चिकटून बसली. श्वासोच्छवासाच्या रेट्याने ती वात आत हले आणि मग तातूला पडजिभेजवळ हुळहुळे. गुदगुल्या झाल्यागत होई. तातू अस्वस्थ झाला. काही बोलावे तर मार ठरलेला असं वाटून बिचारा गप्पच राहिला. तेवढ्यात "झाल आणाऽऽ झालऽऽऽ" असा बाहेरून भटजींचा पुकारा झाला. काकूनं दिवे पेटवले तेंव्हा तातू तिथेच होता. ते पाहून ही वातच आपल्या नाका-तॊंडाच्या सांध्यात अडकलेली आहे म्हणून हुळहुळत आहे हे तातूला कळलं ! ते हुळहुळणे असह्य होऊन तातू रडू लागला. आपल्या तोंडाकडे बोट दाखवून वाटऽऽऽ वाटऽऽऽ असं सांगु लागला. तातू बोबडा असल्यानं ‘वात’ या शब्दाचा उच्चार तो ‘वाट’ असा करी.

तातूच रडं ऐकून माजघरात बायका जमल्या. तातू का रडतोय अशी जी ती चौकशी करू लागली. काही केल्या तातू रडायच थांबेना. मग वहिनी त्याला मांडीवर घेऊन बसली. तरी त्याचं ‘वाऽऽट वाऽऽऽट’ असं चालूच होतं. तेवढ्यात छबी मावशी तिथं आली. "छबी मावशी म्हणजे तुझ्या बाबांची मावशी बरं का.. " आत्याबाईंनी नातं सागितलं.

"वयस्क अनुभवी बाई". बाबांनी पुस्ती जोडली.

"तिने तातूचा ‘वाऽऽट वाऽऽट’ हा धोशा ऐकला आणि एकदम म्हणाली, "अग्गोबाई..याच्या पोटात वाट सरली वाटतं! दुखत असेल हो पोट पोराच!!"

"अगोबाईऽऽ हो का?" वहिनी म्हणाली आणि तातूच पोट चोळू लागली.
"कालपासून चिवडा लाडवांचा सपाटा चालवलाय मेल्यानं , झाले असतील गॅस" काकू करवादली.

मग कुणी बाम आणून तातूच्या पोटाला चोळू लागली. कुणी पोट शेकू लागली तरी त्याच ‘वाऽऽट वाऽऽट’ हे पालुपद सुरूच!"

" अरे तातू.. काही लागत नाही बरं वाट, आत्ता मोकळे होतील गॅस. धीर धर बाळा जरा" इति सुशी मावशी.

आता काय कराव बाई? बायका माजघरात विचार करू लागल्या. जिला जे सूचेल ते ती सांगत होती.
कुणाला तर, तातूला भूत झोंबल की काय अशी शंका आली.
"द्रूष्ट काढा बाई त्याची" एकीची सूचना. वहिनी रडकुंडीला आली.

तेवढ्यात हे प्रकरण बाहेर पुरूषांच्या कानावर गेलं. लग्नघरात हाऽऽ गोंधळ. बायका रडू लागल्या. ते ऐकून, लग्नाला आलेले गुलाबराव म्हणून एक होते. गुढग्यापर्यंत धोतर, वर सदरा, काळी बंडी, डोक्यावर रूमाल, असा वेष. शिवाय डोळ्याने तिरळेही होते. पोट हेऽऽऽ सुटलेल. त्याना समजल्यावर ते म्हणाले,"हातिच्या एवढच ना? माझी नेहमीच अशी वाट सरते, त्यावर आम्ही एक उपाय करतो. त्याने सरलेली वाट तात्काळ जाग्यावर येईल". सारीजणं त्यांच्या कडे आशॆने पाहू लागली. मग गुलाबरावांनी एक पणती पेटवून आणायला सांगितली. तातूला जमिनीवर निजवला. ही सगळी तयारी बघून भेदरलेला तातू जोरजोराने रडू लागला. ती पणती त्याच्या बेंबीवर हळूच ठेवली आणि त्यावर मोठ्ठ पितळी फ़ुलपात्र उपडं टाकलं. आत तयार झालेल्या पोकळीमुंळे पोटाला म्हणॆ ओढ बसते आणि बरं वाटतं.

असं अनेकदा करूनही काही फ़रक पडेना! आता मात्र सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळाल. तातूचं तारस्वरात रडण ओरडण चालूच होत. त्याच्या रडण्यापेक्षा ईतरांचा कालवा वाढत होता. तो ऐकून तातूचा स्वर एक एक पट्टी वर चढत होता.

शेवटी सदामामा उठला. सदा आमचा हुषार! त्यानं ईतर मुलांजवळ चौकशी केली. त्यांना खाऊ दिला. मुलांनी सारी हकिकत सदाला सांगितली. हा सगळा प्रकार त्याच्या लक्षात आला. सदा हसत हसत तातू जवळ आला. त्यानं सद-याच्या खिशातून तपकिरीची डबी काढली. त्यातली चिमूटभर तपकिर तातूला हुंगवली. तातूला एक जोरदार शिंक आली आणि काय आश्चर्य! त्या सरशी तो ‘वाट’ नामक कापसाचा तंतू तातूच्या नाकपुडीतून लोंबू लागला.

उमेश वैद्य

गुलमोहर: 

छान आहे किस्सा!

खालच्या वाक्याचा अर्थ वेगळा होतो आहे असं वाटतंय.. जरा बघणार का?

>> आत्याबाईंची स्मरणशक्ति अगाध होती. कितीतरी गोष्टी, किस्से, गाणी, कविता त्यांना पाठ होत्या आणि ती रंगवून सांगण्याची विलक्षण कला त्यांच्याकडे होती.

मला वाटतं स्मरणशक्ति 'अगाध असणं' म्हणजे स्मरणशक्ति कमजोर असणं!

>>मला वाटतं स्मरणशक्ति 'अगाध असणं' म्हणजे स्मरणशक्ति कमजोर असणं!

@चिमण. अगाध ह्या शब्दाचा अर्थ खालील प्रमाणे होतो. हा शब्द जेंव्हा उपरोध अर्थानं वापरला जातो
तेंव्हा आपण म्हणता त्या प्रकारे वापरण्याची पध्द्त आहे.

(R)(H)(E) अथांग, अगाध, सखोल, गहन - थांग लागत नाही असा "आईच्या हृदयात अथांग माया असते" " स्वामींची लीला अगाध आहे" (मराठी शब्दरत्नाकर पहावा)

आणखी काही उदाहरणे:

सामान्य अर्थाने: देवाची करणी अगाध आहे.,
उपरोध अर्थाने: "तुमच्या अगाध कर्तुत्वावर बिसंबले तर माझी मुले उपाशी मरतील"