प्रेम वेडं असतं

Submitted by सुमेधा आदवडे on 7 August, 2008 - 05:26

ह्या कथेचे शिर्षक किती वेळा घासलेलं, सारखं ऐकलेलं वाटतंय ना? पण ह्या तीन शब्दांचा प्रत्यय नेहमीच होत असतो आपल्याला. आता मला आलेला प्रत्यय म्हणजे माझ्या एका मित्राबरोबर घडलेली ही कथा .........
**********************************
शुक्रवारची संध्याकाळ होत आली होती. आता तुम्ही जर कुठल्या आय.टी कंपनीत काम करत असाल तर शुक्रवारच्या संध्याकाळचं महत्त्व आपल्या लोकांसाठी किती असतं हे तर तुम्ही जाणताच. किती अतुरतेने या संध्येची वाट पाहत असतो आपण. या नंतर च्या दोन दिवसांच्या सुट्टीचे बेत आखायला आधीच सुरूवात झालेली असते. लहान मुलांना "गृहपाठ लवकर पुर्ण कर, मग तुला चॉकलेट देते" हे आई कडुन ऐकल्यावर जो काही हुरूप येतो अभ्यासाचा, अगदी तसाच हुरूप आम्हाला शुक्रवारी काम करताना येतो, वीकेन्ड च्या ओढीने!!! तर सांगायचा मुद्दा हा की आता थोड्याच वेळेत आम्ही सगळे घरी जायला निघणार होतो. पण या वेळी वीकेन्ड साठी काही प्लान केलं नव्हतं. ऑफीसमध्ये संध्याकाळचा नाष्टा करूनच आम्ही निघणार होतो. तो आजतयागत कधीच सोडला नव्हता. "जे जे फुकट, ते ते पौष्टीक" असं आमचं ब्रिदवाक्यंच होतं!!

मग शेवटी नाष्टा करून, सर्वांना "हॅप्पी वीकेन्ड " विश करून निघालो ऑफीसमधुन. आमच्या फ्लॅटवर आलो. मी माझ्या ४ मित्रांबरोबर या फ्लॅटवर "बॅचलर’स लाईफ" अगदी स्वच्छंदी जगत होतो. अर्थात, बॅचलर’स म्हटल्यावर हे आलंच. हळूहळू माझा एक-एक मित्र आमच्या अस्त-व्यस्त फ्लॅट मध्ये(बॅचलर’स म्हटल्यावर हेही आलंच) प्रवेश करू लागला. सगळे जमल्यावर चहासोबत गप्पा सुरु झाल्या. कुणाचंही काही प्लॅनींग नव्हतं वीकेंड साठी. मध्येच अचानक एखादा बल्ब पेटावा तसा माझ्या एका मित्राच्या डोक्यात विचार आला आणी त्याने तो आम्हाला सांगीतला. तो शिरडी ला जायचं म्हणत होता. बऱ्याच दिवसांपासुन सर्वांच्या मनात होतं हे. पण प्रत्येकाच्या वेळा जुळून येत नव्हत्या. आता काही प्रॉब्लेम नव्हता. मग सर्वांनी होकार दिला.

मग काय, सर्वांनी झटपट एकेक ड्रेस कसातरी बॅगेत कोंबला, मग पटापट जेवून आम्ही निघालो बस-स्टॅन्ड वर. बस मध्ये बसलो आणी एकदाची बस सुटली. बसने नगरला जाऊन तिथुन मित्राला घेऊन त्याच्या गाडीने आम्ही शिरडीला जाणार होतो. तसं ठरलंच होतं आमचं. थोडा वेळ गप्पा मारुन बाकी सर्व जण झोपुन गेले. मला काही झोप येत नव्हती. कशी येणार, गेल्या ३ दिवसांपासुन फक्त मला भेटण्यासाठी ती लातुरहुन मुंबईला आली होती(सुट्टीत आत्याकडे रहायला यायच्या निमीत्ताने). आणी सर्वात मुर्खपणाची गोष्ट म्हणजे मी अजुन तिला भेटु शकलो नव्हतो. कारणं बरीच होती. माझं ऑफीस, माझं काम, ईतर प्रेमकथेत असतात तसे माझ्या कथेतले "प्रेमाचे शत्रु" वगरे वगरे. पण मुद्दा काय? आम्ही भेटु शकलो नव्हतो. आता वाटलं होतं की वीकेन्ड ला तरी बराच वेळ एकत्र काढता येईल. पण आमच्या प्रेमाचे शत्रु ईथेही आमच्यावर चालुन आले. तिला नेमकं शनीवरीच तिच्या मुंबईतल्या दुसऱ्या आत्याकडुन बोलावणं आलं. झालं,म्हणजे सुट्टी असुनही काही उपयोग नव्हता. एकुण काय, आम्हाला भेटता येणार नव्हतं. आणी रविवारी ती मुंबईहून निघणार होती.
छे! नशीबातंच नव्हतं म्हणायचं.

पहाटे ६ वाजता नगरला उतरुन तयारी करून मित्राच्या गाडीत गप्पा मारत, धमाल करत शिरडीला निघालो. सकाळचे नऊ वाजले होते. शिरडीला पोहचुन छान दर्शन घेतलं साई बाबांचं. तिथे माझ्या ऑफिसमधला एक जण भेटला. आपल्या फॅमिली बरोबर आला होता. म्हणुन मी फक्त थोडा वेळ त्याच्याशी बोलून त्याचा निरोप घेतला. आता दुपार झाली होती. जेवण करुन आम्हाला निघायचं होतं. बीड वरून आमचा आजुन एक मित्र नगरला भेटणार होता. तो रात्री आमच्यासोबत निघणार होता, त्याला पुण्याला जायचं होतं.

जेवण करून शिरडीहुन निघालो. वाटेत शणीसिंगणापुर आणी आणखी एका मंदीराचं दर्शन घेतलं. संध्यकाळी ७-७.३० ला नगरला पोहोचलो. गेल्या गेल्या पहीले प्रथम आमच्या बीडच्या मित्राच्या शिव्या ऐकल्या. बिचारा संध्याकाळी ४ पासुन आमची वाट बघत बसला होता. पुन्हा छान गप्पा रंगल्या. आम्ही कॉलेजनंतर सगळे जण बऱ्याच दिवसांनी एकत्र आलो होतो. कॉलेजचे दिवस आठवले. दुनियाभरची मस्ती, लफडी, आणी दंगे निस्तरायचा तो काळ! पण काय काळ होता. सारं सारं आठवलं गप्पांच्या ओघात.

रात्रीचं जेवण झालं. आणी आम्ही नगरच्या मित्राचा निरोप घेऊन मुंबईला निघालो. रात्री ११.०० ची बस होती. थकल्यामुळे पुन्हा बाकी सगळे जण झोपी गेले. पण मला एवढी मजा करुनही काहीतरी रितं वाटत होतं. आता उद्या ती मुंबईहुन निघुन सुरतला जाणार होती. पुन्हा आमच्यातलं अंतर होतं तसंच होणार. पुन्हा आम्ही आमच्या कामात दंग सोमवारपासुन. मन फार खिन्न झालं ह्या विचारानं. माझा बीडचा मित्र माझ्या शेजारीच होता. तो पण जागाच होता. त्याने ओळखलं माझं काहीतरी बिनसलंय.
"काय झालंय रे? काही प्रॉब्लेम आहे?" त्याने अखेर विचारलंच मला.
मी त्याला सर्व सांगितलं. ती उद्या सुरतला जाणार होती. पहाटे ५.४५ ची ट्रेन होती तिची. आता आम्हाला भेटता येणं शक्य नव्हतं.
एवढ्यात माझा मित्र म्हणतो," यार, पहाटे ५.०० पर्यंत मुंबईला पोहचेल ही बस. मग तु का नाही जात तिला सुरतपर्यंत सोडायला?"
हे ऐकुन माझ्या चेहऱ्यावरची मलूलपणा एकदम गळुन पडला. हे माझ्या डोक्यातंच आलं नव्हतं. मनात म्हटलं, टिकीट मिळालं सुरतचं तर जाऊया सुरत पर्यंत. नाहीतर स्टेशनवर तरी भेटता येईल.पुणं आलं. माझा मित्र उतरला. पण जाता जाता मला फुल चार्ज करुन गेला होता तो. सगळी मरगळ एकदम नाहीशी झाली.
तिची ट्रेन मुंबई सेंट्रल वरुन होती. मी विचार केला की तिथे नको जायला. पुन्हा कुणी पाहीलं तर नस्ता गोंधळ. एकतर आधीच नशीब साथ देत नाहीये. आपण दादरला भेटुया तिला. लगेच तिला फोन केला. रात्रीचे २.३० वाजले होते. आमच्या मॅडम सगळ्या शत्रुंचा धोका पत्करुन आमच्याशी बोलु लागल्या. माझी बाय ती...तिला सांगितलं भेटण्याबद्दल. झोपच उडाली तिची. तिचा बर्थ नंबर वगरे विचारुन घेतला. तिचा उत्साह आणखीनच वाढला. पहाटे ४ वाजे पर्यंत गप्पा मारल्या. खुश होत्या बाईसाहेब. थोडा वेळ का होईना, पण भेटणार होतो आम्ही.

पहाटे ५ ला बस दादरला पोहोचली. पण तिथे थांबलीच नाही! वाटलं डोकं आपटावं ह्या नशीबापुढे. मी जाऊन कंडक्टर ला विचारलं बस का नाही थांबली. तो म्हणाला, ही बस थेट मुंबई सेंट्रल ला थांबते. मी हुश्श केलं. मुंबई सेंट्रलवरुन दादरला जाऊ. फास्ट लोकलने लगेच पोहचु आपण दादारला.
५.१० ला मुंबई सेंट्रल ला उतरलो. तिच्या बरोबर तिचा भाऊ येणार होता तिला सोडायला. मला ह्या स्टेशनवर पण जपुन रहायचं होतं. जर लढाई करुनच गड जिकांयचा होता तर ठीक आहे. तसंच करुया. पण आता माघार नाही घ्यायचा. भेटायचं म्हणजे भेटायचंच. पावसाची रिमझीम चालु होती. हवेतल्या गारव्यामुळे थंडी फार होती. म्हणुन एक कप चहा घेतला. मग तिथल्या एका हमालाला लोकल टिकीट काउंटर कुठे आहे ते विचारलं. उशीर झाला होता.

ट्रेन सुटायला थोडाच वेळ बाकी होता. जर मी काही वेळात दादरला पोहचलो नाही तर आणी गाडी दादर वरुन ही सुटली तर......प्लॅटफॉर्म वर च्या पुलावरुन धावत पळत टिकट काऊंटर जवळ पोहोचायला वळलो तर काय.......समोर ती उभी होती. माझं मलाच कळेना काय करावं. मला बघुन ती पण गोंधळली होती. मी तिला दादरला भेटु असं म्हटलं होतं. आता जर हिच्या भावानं मला बघितलं तर काही खरं नव्हतं. पण तो काही तरी आणायला गेला असावा बहुदा. कारण ती एकटीच दिसली मला. मग कुणास ठाऊक आम्हा दोघांनाही काय सुचलं आम्ही दोघं एकमेकांना ओळखही न दाखवता पुढे निघुन गेलो. म्हटलं चला, आता देव आपली साथ देतोय. आता तर त्याला ही मला मदत करावीशी वाटतंय.

टिकीट घेऊन फास्ट ट्रेन च्या प्लॅटफॉर्म कडे धाव ठोकली. इंडीकेटर बघतोय तर काय, ५.४६ ची फास्ट लोकल होती. जर मी त्या गाडीने गेलो तर आमची भेट होणं शक्यंच नव्हतं. मग ठरवलं स्लो ने जाऊ. . हिची गाडी दादरला पोहोचेपर्यंत जाऊ आपण दादरला.५.२५ झाले होते. स्लो ट्रेन पकडली. सारखी हुरहुर लागुन राहीली होती, वेळेवर पोहोचु की नाही आपण. सारखं घड्याळाकडे लक्ष जात होतं. ५.३०, ५,३५, ५.४३ आणी ५.४५ झालं...पोहोचली एकदाची गाडी दादरला.

उतरलो तर समोरच चौकशी काऊंटर होतं. त्याला विचारलं, "गुजरात एक्सप्रेस " कुठल्या प्लॅटफॉर्म वर येते. तो म्हणाला प्लॅटफॉर्म नं.३ वर. मग लगेच त्या प्लॅटफॉर्मकडे धावायला लागलो. प्लॅटफॉर्मवर पोहोचलो. तिथे अनाऊंस्मेंट झाली. "गुजरात एक्सप्रेस ही गुजरात वरुन येणारी..... ....प्लॅटफॉर्म क्र. ५ वर" मी फक्त गुजरात एक्सप्रेस आणी प्लॅटफॉर्म ५ ऐकलं . पुढचं ऐकण्याचं मला भान राहीलं नाही ह्या गोंधळात... झालं.पुन्हा धाव ठोकली प्लॅटफॉर्म नं. ५ वर. मध्येच स्टेशन मास्टर ऊभा होता. त्याला विचारलं तर तो म्हणाला, त्या प्लॅटफॉर्म वर गुजरातवरुन येणारी गाडी लागते. गुजरातला जाणारी गाडी प्लॅटफॉर्म नं.३ वरच येईल. मी परत धावत प्लॅटफॉर्म ३ वर आलो. तिची ट्रेन अजुन आली नव्हती.५-७ मिनीटे उगाच वाया गेली होती माझी..आणी धावताना दमछाक झाली ती वेगळीच.. पण तिला भेटल्यावर मला हे सगळं काही लक्षात राहणार नव्हतं.

प्लॅटफॉर्म वर येऊन तिथल्या लोकांना विचारु लागलो, ए.सी २ डब्बा कुठे लागेल. तर एक जण म्हणाला एकदम सुरुवातीला. तेवढ्यात ट्रेन येताना दिसली. धावत पोहोचलो सुरुवातीच्या डब्ब्याजवळ. बघतो तर काय..तिथे जनरल डब्बा होता....माझा पुन्हा गोंधळ उडाला. तेवढ्यात आमच्या मॅडमचा फोन...कुठे आहेस तु...मी परत मागे चालायलो लागलो.. ती म्हणाली माझा डब्बा शेवटला आहे...पुन्हा पळायला लागलो...गाडी फक्त ५ मिनीटे थांबणार होती.... तीचा आवाज रडवेला झाला होता...कसातरी पोहोचलो...ती डब्ब्याच्या दरवाजात उभी होती. पटकन उडी घेतली डब्ब्यात...मला पाहुन तिने निश्वास टाकला. मिठीच मारली मला....बस्स...आता वाटलं..एवढी धावपळ करत ईथे आलो त्याचं सार्थक झालं. ट्रेन सुरु झाली..ती मला जाऊ देईना..म्हणे सुरत पर्यंत चल माझ्या बरोबर...पुन्हा रडवेली झाली...मी म्हणालो बघतो आणी उतरु लागलो...

उतरुन पुन्हा जनरल डब्ब्यात चढलो...आता आणखी गोंधळ..एकतर टीकीट नाही जवळ..दुसरं मॅडमचा रडका चेहरा सारखा डोळ्यांसमोर येऊ लागला...म्हटलं ठीक आहे..बोरिवली पर्यंत जाऊ..मग तिच्या डब्ब्यात जाऊन तिला समजावु आणी तिचा निरोप घेऊ. बोरिवली ला उतरलो तर टी.सी तिच्याच डब्ब्यासमोर उभा!!!!! मला काय करावं सुचेना . मग कुणास ठाऊक काय झालं मला...त्याला दिलं ठोकुन माझी नातेवाईक आहे ह्या डब्ब्यात.. मला तिला सोडायला जायचं आहे सुरत पर्यंत...नशीबाने तो म्हणाला जा आत..मी टिकीट बनवायला येतो...त्या क्षणी मला तो टी.सी अगदी देवासारखा वाटला..मग काय...गेलो आत...मॅडम पुन्हा खुश झाल्या मला बघुन...गाडी चालु झाली.......
**********************************************
खरंच!!! किती वेडं असतं ना प्रेम.....त्याच्या कडुन हे ऐकताना माझ्या डोक्यात हेच आलं..मग विचार केला आपण हे लिहुनच काढु एका कथेच्या रुपात..... मंडळी कशी वाटली ते नक्की सांगा.

गुलमोहर: 

आवडली. Happy
सगळया धावपळीचं व्यवस्थित वर्णन केलंय. कथा वाचल्यावर "प्रेम वेडं असतं" हे पुन्हा एकदा पटलं.

मस्तच गं! शेवट गोड, मग अजून काय हवं!! Happy

प्रेम'वीर'! मी धावपळतच वाचली कथा. Happy

ह्म्म.. interesting. खरेच प्रेम 'वेड' असते............

खरं आहे, प्रेम वेडंच असतं अगदी...

साधना

मंडळी!!!प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद Happy माझा मित्र आणी त्यांच्या 'मॅडम' ना सगळं चित्र डोळ्यांसमोर आलं हे वाचताना .
खुश झाले दोघे 'प्रेमवेडे' Happy

खूपच छान,
मला आम्च्या वेड्या प्रेमाचि आटवण झलि, आणि प्रेमविरांच्या लेटलतिफिचि,
सुंदर वर्नण.

मस्तच वाटलं वाचताना. सगळी धावपळ डोळ्यासमोर उभी राहिली.

छानच!!!
आवडली एकदम!
"प्रेमाचं दुसरं नाव हृदयाची नाती
प्रेम म्हणजे फक्त तो अन ती!!!!!"

सुमेध, सहज सुंदर लिहिलसं. त्या दोन प्रेमवीरांना माझ्याकडून ढीगभर शुभेच्छा सांग.

सर्वांचे मनापासुन आभार!!!! bee तुझ्या शुभेच्छा पोहोचल्या त्या प्रेमवीरांपर्यंत.....त्यांनीही तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रियांबद्द्ल आभार व्यक्त केले.....:)

वा वा छानच .. एका दमात वाचली ...नगर शिरर्डी दादर सेंट्रल परत दादर प्लॅटफॉर्म किती दमछाक झाली आमची पण Happy
पण ३ दिवसासाठी लातुर वर आली अन सुरत ला कशाला चालली काही कळ्ळ्ल नाही बुवा Happy

अथका, तीन दिवस लातूरहून मुंबईत रहायला आली आणि तेथून सुरतला गेली. तिने परत लातूरलाच जावं हा तुझा का आग्रह? Happy

चांगले निरीक्षण आहे हो अथक साहेबांचे....तुम्हाला म्हणुन सांगते, ती सुरतला तिच्या मामाकडे चालली होती..सुट्टी होती ना मॅडमना....:)

प्रेमा तुझा रंग झकासच.
अनघा

सुमेधा...

मस्त कथा आहे एकदम. प्रेमवीराची धावपळ वाचताना माझी ही धडधड वाढली होती एक क्षण... पण डब्यात पोचला हे वाचल्यावर मी नकळतपणे हुश्श! केलं. Happy अतिशय सुंदर आहे कथा...आणि प्रेम वेडं असतं हे मनोमन पटलं. आपल्या जवळच्या माणसाला भेटण्याच्या ध्येयाने पछाडलं की संपलं, शिर्डी तो सुरत व्हाया मुंबई, फाSSSर काही लांब नाही.... Happy
सुंदर लिखाण, पुढच्या लेखनासाठी शुभेच्छा!

दक्षिणा

दक्षिणा.... मनःपुर्वक आभार Happy खरंच ..प्रेम वेडं असतं.....:)

सुमेधा , तुम्ही स्त्री असुनही एका प्रेमवीराच एवढं तंतोतंत वर्णन कसं काय हो केलतं... छान आहे कथा आणि वेगही उत्तम आहे , विशेषतः बारीकसारीक तपशील खुपच ताकदीने उभे केलेतं.

५.३०, ५,३५, ५.४३ आणी ५.४५ >>> मला वाटत होतं की ह्या काऊट अप मधे कुठे ती सुरत ची ट्रेन सुटते की काय ?
अप्रतीम .........

धन्यवाद श्री Happy
इतकं तंतोतंत वर्णन करण्यामागचं रहस्य म्हणजे, मी बर्‍याच प्रेमवीरांच्या संबंधात आले आहे आणि मला मैत्रीणींपेक्षा मित्रच जास्त आहेत. त्यामुळे, मुलांची विचारसरणी बर्‍यापैकी कळते Happy
पुन्हा एकदा आभार!

सर्वांच्या प्रतिक्रीया आणि शुभेच्छा दोन्ही प्रेमवीरांपर्यंत पोचले आहेत Happy आणि दोघांनी मनापासुन आभार कळवले आहेत ...दोन्ही कथांसाठी Happy

माझीही धडधड वाढली होती.. म्हटले मिळतेय की नाय ट्रेन प्रेमवीराला...>>खरच माझी सुध्हा,छान आहे लेख्,प्रेम खरच वेड असत्,पण तुमच्या लेखन शेली(कस लीहायच) मुळे ते मनाला भीडल अगदी.(नवर्याची लग्ना आधी ची अशी च धावपळ आठवली) Happy

सुमेधा, आज परत वाचली कथा...
धडधड जाणवलीच परत... Happy
मस्तच आहे कथा, एव्हरग्रीन... Happy