अ‍ॅक्शन ....... कट ! कट !! कट !!!

Submitted by cybermihir on 7 October, 2011 - 08:09

दिनांक २ ऑक्टोबर २०११.
रविवार असल्यामुळे दुपारचे जेवण करुन घरी मस्तपैकी पहुडलो होतो. दुपारची झोप महत्वाची होती. सवय ... दुसरे काय? पण झोप येईपर्यंत काहीतरी टाईमपास म्हणून टिव्हीवर चॅनल फिरवीत होतो. एका चॅनलवर सुप्रसिद्ध 'सरफरोश' चित्रपट लागलेला दिसला.

सुरु होऊन थोडाफार वेळ झाला होता. तशी मला चित्रपटाची फार आवड-निवड वगैरे आहे अशातला भाग नाही, किंवा त्यातले फार काही कळते असेही नाही. कुठलाही थर्ड ग्रेड चित्रपट सुद्धा मी अतिशय तन्मयतेने बघत बसतो. समोर पडद्यावर काहीतरी हालचाल चालू असली की झालं !! सरफरोश तर मी आधी बघितला होता, पण चांगला असल्याने पुन्हा बघायला काही हरकत नव्हती. दुसरे म्हणजे बाकी कुठे खास काही बघण्यासारखे नव्हते. म्हणून मग डोक्याखाली उशी घेऊन टिव्हीपुढे पडलो.

चित्रपटामधे, एसीपी अजय राठोडच्या मागावर असलेल्या इसमाला हुलकावणी दिल्यानंतर तो इसम हॉटेलमधे बसलेला असताना आमिर खान आणि सोनाली बेंद्रे बाजुला उभे राहुन त्याच्याकडे बघत असतानाचा सीन चाललेला. आता सोनाली बेंद्रे मधेच पचकणार आणि त्याला जाऊन विचारणार की 'का भाऊ तु आमचा पाठलाग का करत आहेस ?' ... आणि मग आमिर खान आणि त्या इसमाची पळापळी होऊन शेवटी आमिर खान त्याला पकडणार, मग रस्त्यावरच त्यांची मारामारी वगैरे वगैरे .... असा चित्रपटातील पुढचा भाग डोळ्यासमोर उभा राहीला. झालं ... त्याप्रमाणे तो इसम पळायला लागला, आणि अचानक एकदम क्राईम ब्रँचमधला सीन सुरु झाला, आमिर खान सगळ्यांची खरडपट्टी काढतानाचा !! आधी वाटलं कदाचित मधे एखादी डुलकी वगैरे लागली असेल आणि मधले सिन 'मिस' झाले असतील. किंवा कदाचित फिल्म मधेच 'कट' झाली असेल.
असो ... तसाच पुढे बघत राहीलो.

आता, मुकेश ऋषी स्वतःबरोबर काही हवालदार घेऊन पोलिस व्हॅनमधुन 'सुलतान' च्या मागावर जात असतानाचा सीन. दोघांच्या गाड्या समोरासमोर येतात आणि आता धडक होऊन गोळाबारी सुरु होणार याची वाट बघत असतानाच, एकदम 'सुलतान' चालत्या ट्रकमधे चढून पळुन जाताना दिसतो !! आता मात्र डोके सटकले.

अरे ! हे काय चाललय ? काही कळेना !!
... आणि अचानक साक्षात्कार झाला. आज 'गांधी जयंती' ... नाही का ! मग बरोबर आहे. आज चित्रपटातील हिंसा तरी कशी चालेल ? चक्रावलेले डोके शांत झाले आणि मग मात्र आता पुढे काय काय आणि कसे बघायला मिळणार या विचाराने उत्सुकता शिगेला पोचली. नेटाने सगळा चित्रपट बघितला. अपेक्षेप्रमाणे पुढेही अनेक प्रसंगांना कात्री लागली होतीच.
खेडा नाक्यावरची 'अजय राठोड' आणि 'बाला ठाकूर'ची हातापाई, बंदुकीच्या फैरी वगैरे ... कट
हॉस्पिटलमधे आमिर खानवर झालेला हल्ला ... कट
नंतर सुद्धा त्याच्या घरापाशी झालेला हल्ला ... कट
नसिरुद्दीन शाह त्या बकरीचा कान कापतानाचा सीन ... कट
क्लायमॅक्स ला नसिरुद्दीन शाह स्वतःच्या गळ्यात संगीन खुपसून घेतानाचा सीन सुद्धा ... कट !!

पण सगळ्यावर कडी म्हणजे काही काही गाणीसुद्धा 'कट' केली होती. आता लोकलज्जा बाजुला ठेवून हे कबुल करायला हरकत नाही की सोनाली त्या भिजलेल्या कपड्यांमधे 'काय दिसते !' ... पण हे ही सुख आज नशिबात नव्हते. कारण आमिर खानला वाढदिवसाचे सरप्राईझ देऊन, केक वगैरे कापल्यावर अचानक ... मुकेश ऋषीने 'बाहिद' मधुन आलेल्या रिपोर्टबद्दल चर्चा सुरु होते. एकदम मूड चेंज !!

अखेरीस चित्रपट संपला !! प्रथमच बघणार्‍या लोकांसाठी अनेक प्रश्न अनुत्तरीत ठेवून संपला. जवळ जवळ तीन तासांचा चित्रपट पावणेदोन तासातच संपला. अर्थातच, मनात काही प्रश्न उभे राहीले ...
१. मुळात 'सरफरोश' सारखा चित्रपट ... ज्यात हिंसाचार ठासून भरलेला आहे, असा चित्रपट गांधी जयंतीच्या दिवशी दाखवण्याचा अट्टाहास का ? असा चित्रपट निवडला कसा जातो ? कारण ज्या अर्थी एखादी गोष्ट 'कशी' असावी हे ठरवणारी एखादी संस्था किंवा व्यक्ती उपलब्ध आहे, त्या अर्थी ती गोष्ट 'काय' असावी हे सुद्धा ठरवणारी एखादी संस्था / व्यक्ती असणारच ना?
२. बरं, असा चित्रपट दाखवताना उधळपणे काटछाट करुन दाखवण्यामधून काय साध्य होते ?

अर्थात असला विरोधाभास ज्या चॅनलवर बघायला मिळाला, तिथे एरवी आपल्या नेतेमंडळींची भांडणे आणि मारामार्‍या बघायला मिळतात - भारत सरकार च्या राष्ट्रीय सूचना-विज्ञान केंद्र संचालित 'लोकसभा' चॅनलवर !!! त्यामुळे मला वाटते, ह्या प्रश्नांची उत्तरे मिळण्याची अपेक्षा ठेवणेच चूक आहे आपल्या 'महान भारत' देशात. आणि हे असलं काही बघणारे आम्ही मात्र 'हे असच चालायचं !' अशी मनाची समजूत घालून घेणार.

असो, त्या दिवशी दुपारची झोप झाली नाहीच, पण मी मात्र डोळ्यावर झापड ओढून घेतली.

* * * *
टिप : सदर लेखातून कुणाच्याही वैयक्तिक भावना दुखवायचा हेतू किंवा महात्मा गांधी यांच्याबद्दल कोणत्याही प्रकारचा अनादर करण्याचा प्रयत्न नाही. उलटपक्षी, हा असला काहीतरी आचरट प्रकार करुन, आपण त्या थोर माणसाचा आणि त्यांच्या नीतीमुल्यांचा अनादर तर करत नाही ना, असे वाटते. सरफरोश हा चित्रपट एक कलाकृती म्हणुन चांगला आहेच आणि महात्मा गांधींची अहिंसावादी तत्वे पण तितकीच महत्वाची आहेत. पण ह्या दोन्हीची सरमिसळ केली की असला काहीतरी विनोदी प्रकार घडतो. कदाचित यातही मतमतांतरे असू शकतील, पण मला जे प्रामाणिकपणे वाटले, ते सांगितले.

गुलमोहर: 

+१

आमिर खान आणि सोनाली कुलकर्णी>>> सोनाली बेंद्रे Happy

बाकी लेख छान. 'सरफरोश' माझ्या आवडत्या सिनेमांपैकी एक आहे.

मिहिर, बर्‍याच दिवसांनी दिसलास रे. छान लिहिले आहेस.

अशीच एक आठवण, राजेश खन्ना, पद्मिनी कोल्हापूरे, टिना मुनीम चा सौतन दाखवत असताना, त्यात बर्‍याच वेळेला आलेला अछूत हा शब्द उच्चारला गेला कि दूरदर्शन तो म्यूट करायचे.
-------आणि ओठांच्या हालचालीवरून तो काहीतरी भयानक शब्द वाटायचा.

सायबरमिहिरा, एवढे सिन कट केलेला चित्रपट पहाणे म्हणजे कटकटच की. हा कोणाचा कट असावा ?
(खुप काळानंतर माबोवर येणे झाले काय ? कुठे आहेस ? कसा आहेस ? )