एक प्रवास

Submitted by Arnika on 6 October, 2011 - 05:45

मायबोलीवर झालेल्या प्रवासवर्णनाच्या स्पर्धेत वेळेअभावी लिहिता आलं नाही . विषय मात्र खूप खूप जवळचे वाटले होते, म्हणून परीक्षा झाल्यावर arnika-saakaar.blogspot.com वर पहिले त्यांपैकीच एक व्यक्त केला...
.............*...*...*................

पहाटे दीड वाजताच्या शांत अंधारात मी छताकडे टक्क उघड्या डोळ्यांनी पहात होते. किमया उठली की मगच जायचं ठरलं होतं पण गेला पाऊण तास मी ती जागी होण्याची वाट बघत होते. आजचा अख्खा दिवस किती धावपळीत गेला! किमयाच्या आजोबांची पंच्याहत्तरी म्हणून आदल्या दिवसापासून मदत करायला मीही तिच्या घरी तळ ठोकला होता. मग रात्रभर खिदळणं, स्वयंपाकघरात मदत करणं, उशिरा जेवणं, दिवसभर पंगती वाढणं, गप्पा मारणं अखंड चालू होतं.

सहाजिकच आमचं दुपारचं जेवण साडेचारला झालं. आलेल्या पाहुण्यांची श्रीखंड-झोप उतरून, त्यांचे निघायचे इरादे पक्के होऊन, चपला घातल्यावर दारात अजून अर्धा तास गप्पा मारून झाल्यावर ते निघेपर्यंत संध्याकाळचे साडेसात वाजले. घरात तरीही बरीच मंडळी रहायला होती. छोट्या मुक्कामाचे पाहुणे बाहेर पडताक्षणी रात्रीच्या जेवणाचा विषय घरात सुरू झाला. (खरं तर दुपारचं जेवण अजूनही पोटात घर करून बसलं होतं पण समारंभाच्या दिवशी हे असंच होतं! एका जेवणानंतर दुस-या जेवणाची चर्चा). “काssही नको” चा गजर आधी सुरू होतो आणि नंतर हळुहळू सगळे ‘उरलेल्या मसालेभाता’पासून ते ‘वाटीभर खीरी’पर्यंत अनेक गोष्टींची फर्माईश करायला लागतात. पण आज आम्ही दोघींनी ताकभातावर समाधान मानलं होतं (रात्री उठून गुलाबजाम खायचं ठरवल्यानंतर!)

एक तास उलटला... अलगद पांघरूण बाजूला सारून मी एकटीच उठले. किमी मात्र गाढ झोपली होती. आता मी एकटीनेच जाणं काही बरं दिसलं नसतं! पण हे घरही माझंच होतं की, माझ्याच सख्ख्या मैत्रिणीचं! स्वतःची समजूत घालत मी उठले. लहान दिव्याच्या उजेडात चाचपडत शेजारी झोपलेल्या सात जणांचा अंदाज घेत घेत खोलीच्या कडेकडेने चालायला लागले. कितीही जपून चाललं तरी काही मऊ उश्या आणि चादरी चुकून पायाला गुदगुल्या करत होत्या. तेवढ्यात एक ‘हल्ली ना, लवकर डोळाच लागत नाही’ मावशी जाग्या झाल्या. “काय गं, पाणी हवंय का? मी तांब्या भरला होता, आणायलाच विसरले” म्हणत त्यांनी एकदम संभाषणालाच हात घातला. “असू दे, तुम्ही झोपा” त्यांना ताकीदवजा दिलासा देत मी पुढे झाले.

वाटेत लहान बाळ होतं. दिवसभर ‘पासिंग द पार्सल’ झाल्यावर बिचारं शांत झोपलं होतं. एका हाताची मूठ सताड उघडी होती, दुसरी गच्च आवळलेली. तीत त्याच्या आईची करंगळी होती. इतर कोणाशीही ते कितीही वेळ हसतमुखाने खेळलं असलं तरी रात्री त्या एकाच व्यक्तीच्या शेजारी त्याला गोड झोप लागली होती. बाजूला झोपलेल्या त्याच्या आईने दोघांच्या अंगावर एकच पांघरूण ओढलं होतं. त्यांच्या पलिकडे किमीची आई आणि आजी झोपल्या होत्या. “आवरायचं आहे बरंच” म्हणत झोपलेली तिची आई स्व्प्नातही कामच करत होती बहुतेक! “मी काय नटू आता?” म्हणत सुरुवातीला गज-यालाही नको म्हणालेली आजी मोग-याचा सर वेणीतच विसरून झोपली होती. खोलीत तसा अंधार असला तरी भर दुपारी आजोबांना ओवाळताना उन्हापेक्षाही जास्त लकाकणारा तिचा चेहराच माझ्या डोळ्यासमोर येत होता. खोलीच्या दरवाज्यापाशी दोन गाद्यांवर पसरून दादा झोपला होता.

इतका वेळ खिडकीतून बाहेर बघितलंच नव्हतं. अचानक झुळूक आली म्हणून डोकावून पाहिलं तर चंद्राची मोठी टिकली लावून आभाळ पसरलं होतं. एरवी याच खिडकीतून बाहेर बघितल्यावर फक्त उंच इमारती दिसायच्या, आज पहिल्यांदाच वरचा आभाळाचा तुकडाही दिसत होता! दाराकडे सरकायला लागले तसतसा पंख्याच्या घरघरीबरोबरच शेजारच्या खोलीतला घोरण्याचा आवजही जोर धरायला लागला. दार ओढून घेत मी खोलीबाहेर आले, तिथे अजूनही असा ‘सणाचा’ वास येत होता. उदबत्ती, केळीची पानं, गजरे, पंचामृत, पाहुणे, गडबड, लगबग, धावपळ, नंतरची रिकामी शांतता...सगळ्याचा एकत्रित वास!

मधल्या खोलीतल्या टेबलबर आजोबांसाठी आणलेल्या भेटी ठेवल्या होत्या. रात्री झोपायला गेले तेव्हा त्या अगदी नीट मांडून ठेवल्या होत्या, अत्ता जराशा इकडे-तिकडे झाल्यासारख्या वाटल्या. आजोबांच्या लहानपणापासूनच्या फोटोंचं मोठं पोस्टर किमी आणि दादाने मिळून तयार केलं होतं पण ते टेबलवर दिसत नव्हतं. बरेच नारळ, बरेच शर्टपीस आणि सकाळी गळ्यात घातलेले ७५०० रुपये मात्र टेबलावर आळोखे-पिळोखे देत होते. या खोलीचा दिवा रात्री चालू ठेवत नाहीत खरं तर! आज राहिला वाटतं... पुढे जाता जाता मी तो बंद करून टाकला.

आता वाटेत अडथळे कमी होते. किमीशिवाय गुलाबजाम शोधायला निघाल्याचं मला आता फार वाईट वाटायला लागलं. इतकं भरपेट जेवण झालेलं असताना, आग्रहाला दाद देऊन जेवणाचा फडशा पाडलेला असताना आणि तेही ‘काय द्या’ ने सज्ञान असताना दुस-यांकडे रात्री गुलाबजाम चोरून खाणं काही केल्या बरोबर वाटेना. पण एवढा लांबवर प्रवास करून आलो आहे म्हंटल्यावर पाणी तरी पिऊन जावं म्हणून मी स्वयंपाकघराकडे चालत राहिले. दुपारच्या ओवाळणीनंतर घरभर फिरताना मधेच अक्षता पायाखाली येत होत्या. कोणीतरी त्या गोळा करून एका कोप-यात सारलेल्या दिसल्या.

मजल दरमजल करत स्वयंपाकघरात पोहोचले. तिथे सगळी पक्वान्न अजूनही रेंगाळत असल्याचं ठाऊक होतं. नाही नाही म्हंटलं तरी माझ्या ‘शहाण्यासारखं’ वागायच्या बेताला गुलाबजामांचा नुसता विचारही सुरुंग लावत होता. ‘पाणी प्यायला’ म्हणून मी फ्रिजपाशी गेले. कोणीतरी घाईघाईत दार किंचित उघडं ठेवलं होतं. ते आणखी किलकिलं करत मी आतल्या परिस्थितीचा आढावा घेतला. कितीतरी वेळ गुलाबजामांची शोधाशोध केली पण ते काही सापडेनात! शेवटी थंड पाण्यावर समाधान मानलं. बाटली पुन्हा भरून ठेवायला स्वयंपाकघरातील लहान दिवा लावला...

देव्हा-याच्या बाजूला आजोबा खिडकीतून बाहेर बघत बसले होते. त्यांनी दचकून माझ्याकडे पाहिलं आणि मी आ वासून त्यांच्याकडे! त्यांच्या एका हातात किमीने दिलेलं पोस्टर होतं. आणि खुर्चीशेजारी गुलाबजामचं वाडगं! खाऊ की नको च्या वादात मी ज्यांबद्दल इतका विचार केला ते माझे गुलाबजाम! माझ्या चेह-यावरचा प्रत्येक भाव टिपत आजोबा म्हणाले, “बस गं! फक्त पाणीच प्यायलीस??” मी आपली ओशाळून हसले. शेजारी बसवून पोस्टरवरच्या प्रत्येक फोटोची आठवण त्यांनी मला सांगितली...वर म्हणाले, “हे फोटो बघायला दिवसाचा उजेड लागतोच असं नाही, अंधारातही दिसणारे रंग आहेत यातले!” गप्पा मारता मारता १०-१५ मिनिटं गेली. आजोबांनी गुलाबजाम पुढे करत म्हंटलं, “आज मला चोरून गुलाबजाम घ्यावेसे वाटले. पंच्याहत्तरी ओलांडली, अजून किती मोठा होऊ? आता परत लहान व्हायचे दिवस आले! काय?” आम्ही दोघंही खळखळून हसलो...एकेक गुलाबजाम तोंडात टाकला...

आजवर आठवणीत रहाण्यासारखे कित्येक प्रवास झाले...पण आठवणीत रहाणा-या मोजक्या ठिकाणांकडे घेऊन गेला त्यातला हा एक...प्रवास...

गुलमोहर: 

अर्निका, छान लिहिले आहेस गं!! मस्त मस्त!!

रच्याकने, परवा आलिस तेंव्हा गुलाबजाम न खाताच जावे लागले तुला Sad पुढच्या वेळी डब्यात भरुन देईन तुझ्या आईकडे , म्हणजे रात्री चोरुन खाता येतिल तुला Happy

Happy

छान.

Pages