ग्रहण-३

Submitted by प्रसन्न अ on 30 September, 2011 - 11:27

ग्रहण-१
ग्रहण-२

आता कोण आलं असेलं? रंगा आला असेल गड्याला घेऊन.! मनात विचार आला.

उठुन दार उघडलं आणी पुर्ण शरिराचा थरकाप उडाला...

जणू काही वेगळ्याच मितीत पोचलो होतो
समोर अतिशय किळसवाणा माणूस उभा होता....त्याने तोंड न उघडताच आवाज आला...

मी..!!...शेळके!!!

***********************************
दरवाजा उघडताच समोर ते अमूर्त स्वरूप आकार घ्यायला लागल. बाहेर अनैसर्गिक अंधार दाटून आला .. जणू मिळेल
त्या प्रकाशाला गिळंकृत करण्याची धडपत करत असल्यागत , त्या भयंकर अंधाराच्या लाटा आदळायला लागल्यावर मी हादरलो. आणि समोरच ते भयानक सावट !
ते जागेवरच लडबडत होत , अजून काय म्हणू मी? कस वर्णन करू ?खरच तसं होत कि मेंदू या अश्या अभद्र वेड्या कल्पना करत होता , काहीच कळत नव्हत,तोंडवजा असलेल्या त्या विचित्र आकारातून मानवी आवाजाची हुबेहूब नक्कल येत होती.
माझ्यात झालेला बदल त्यालाही जाणवला असणार ते झपाट्याने आत यायला लागल. मेंदूच्या वेदना एका मर्यादेनंतर विस्कळीत व्हायला लागतात, समोर जे काही होत त्याने सार अवकाश आता व्यापलं होत, माझ्यात मी आता उरलो नव्हतोच, सारखा त्याच्याकडे खेचला जात होतो, खोलीतली हवा संपल्यात जमा होती, कशी बशी त्याच्या त्या भयंकर नजरेतून माझी नजर मी काढून घेतली. अचानक एखादा धक्का बसावा , तसा मी मागे फेकला गेलो , आता दाराच्या आत ते आल होत, आणि दार बंद झाल होत, आत आता पूर्ण अंधार, आणि जवळ जवळ ४ फुटावर ते !
मी थरथरत मागे सरकलो, त्याच्या डोळ्याची विवर मला परत तिकडे खेचायला बघत होती, मोठ्या प्रयत्नाने मी नजर चुकवत होतो, हाताला एक कंदील लागला , आतल्या रागाने भीतीवर मात केली, आणि जमेल तितक्या जोराने त्याच्या डोक्यात हाणला. पण कंदील बसताच भलतंच घडल, त्याच डोक, मेणाप्रमाणे खाली खाली घसरायला लागल , आधी ते काळे काळे डोळे खाली पडले , बुळबुळीत जीभ बाहेर पडून खाली वळवळायला लागली, शेवटी डोकंही खाली पडल, भयानक दुर्गंधी पसरली , आतून चिकट द्रव, जमिनीवर पसरायला लागल..,
एवढ होऊनही, ते पुढे पुढे सरकत होत, लडबड्त्या हातानी मला धरायला बघत होत, मी मागे सरकून जिन्यावरून वर आलो, तसं तेही जिना चढायला लागल, त्याची गती अतिशय संथ होती.. पण ते मला पकडणार हे निश्चित, मी गच्चीत येऊन कोपर्यापाशी थरथरत उभा राहिलो, प्रचंड पाऊस पडत होता , भयाण अंधार होता. मी जोरात मदतीसाठी हाक मारल्या, पण हाय रे कर्मा, माझ्या हाका त्या अंधारात जणू शोषल्या गेल्या होत्या.. तेवढ्यात ते वर पर्यंत पोचलं..
विकृतीची परिसीम होती ती शीर नसलेलं... लटपटत तसंच पुढे पुढे येत होत, मी आजूबाजूला बघितल, वेळ फारच कमी होता , एक जुना लोखंडी गज दिसला , तिकडे लक्ष जाताच, भीतीच रुपांतर रागात झाल, जीव खाऊन, तो गज मी त्याच्यावर हाणला....
हृदय आता बंद पडेल कि काय अस वाटत होत, त्याचा प्रत्येक अवयव. पिचपिचीत होऊन जमिनीवर पसरलेला होता , त्यातून हिरवट रंगाच्या चिळकांड्या उडत होत्या.. पण कोणाच्या तरी भेसूर हसण्याचा आवाज यायला लागला , आणि क्षणात तो गोळा समोरून नाहीसा झाला, वातावरणात पूर्वीचा गारवा आला, मी भानावर आलो, खाली कोणीतरी जोरजोरात हाका मारत होत, मी वरतून वाकून बघितल.. तो रंगा होता

प्रचंड शीण आल्याने मी जवळपास कोलमडलोच.रंगाने आत झोपवलं. बरोबर आलेला गडी किचनमध्ये जेवणाच्या तयारीला लागला. झालेला सर्व प्रकार मी रंगाला सांगितला.
आता इथुन लवकरात लवकर हलणंच योग्य होतं. गावातच कुठेतरी भाड्याने घर घेऊन राहणंच अधिक चांगलं, इथे राहण्यात माझ्या जिवाला प्रचंड धोका होता. पुढ्च्या मिनिटाला काय होणार हे सांगता येत नव्हतं. प्रत्येक क्षणाला मनातलं भय वाढतच चाललं होतं.

"रंगा रे, मी बरा झालो कि गावात बघुया जागा कुठेतरी."

रंगाने मान डोलवली. जेवण तयार झालेलं आणी गडी घरी जाण्यासाठी निघाला होता. दरवाज्यातून तो बाहेर पडताच रंगाने पटकन उठून दरवाज बंद करून घेतला. आणी उगाच चुळ्बूळ करत बसला. इथे राहण्याचं प्रचंड दडपण आलेलं त्याच्या चेहर्‍यावरनं जाणवतं होतं. हाड गोठवणारी थंडी, पावसाची जराही उघडीप झाली नव्हती. आभाळ फाटल्यासारखा तो कोसळत होता सोबतीला विजांच तांडवनॄत्य.

आम्ही जेवून उठतानाच पठारावर प्रचंड असा गडगडाट होऊन वीज कोसळली आणी गुडूप्प....परत लाईट गुल्ल झाली होती.

रंगाने सगळी तयारी करूनच ठेवली होती. पटापट चार मोठे कंदिल पेटवून त्यातला एक त्याने किचनमध्ये जाऊन ठेवला आणी उरेलेले तीन बाहेरच्या खोलीत ठेवले. बेडरूमचं दार मी बंदच करून ठेवलं होतं. अतिशय मंदगतीने घड्याळातले काटे पुढे सरकत होते, हा क्षण हि वेळ पुढे सरकायलाच तयार नव्हती. अजून अख्खी रात्र जायची होती. सालं माझं आयुष्य त्या बंगलीत कैद झाल्यासारखं वाटत होतं. एका आठवड्यात एवढी उलथापालथ..! लहानपणी भुताच्या गोष्टी ऐकल्यावर मजा यायची कारण त्या गोष्टीच असायच्या. अशी अमानवीय शक्ती जगात असते याचा कधी अनुभवच आला नव्हता.

मानवी मन हे वेडं असतं. प्रत्येक गोष्टींवर ते अनुभवानंतरच विश्वास ठेवतं. इथे जी भयानक शक्ती आहे ती जाणवलीय हे मात्र खरं. सर्वच विचित्र आहे. रंगाच्या सांगण्याप्रमाणे गंगीने तीचा तर सुड घेतला होता पण अजूनही तीचा आणी त्या मुलींचा आत्मा इथेच घुटमळतोय. जोडीला किसन, दादासाहेब आणी शेळके यांचे आत्मे आणी भयानक मांजरं..

उद्या मी हि जागा सोडून जाईन. दुसरा कोणीतरी इथे येईल. पण हि जागा तशीच राहणार शापीत, पछाडलेली, अतॄप्त.!
जो कोणी या ग्रहणात सापडला तो कायमचा याच चौकटीत बंदिस्त होणार. भयानक आहे हे.
या वास्तूवरची काळई सावली वाढत चालली आहे. याला अंत कधी? मनाच्या विचारांचे घोडे चौखूर उधळले होते.

रंगा काहितरी पुटपूटत होता. मी विचारलं "काय रे, काय म्हणतोयस?"

"काय नाय सायेब, मारूती स्तोत्र म्हनतोय. जशी वाईट शक्ती असते तशीच चांगली बी असतेच कि.! मारूतीराया मुखात असला म्हंजी कोनीही माजं काय बी वाकडं करू शकणार नाय."
गेल्या कित्येक वर्षात मी देवाला साधे हातही जोडलेले नव्हते. स्वतःला विज्ञानवादी म्हणवून घेत होतो. आस्तिक लोकांना हसायचो, त्यांची टिंगल करायचो. विज्ञानाचे नियम तोंडावर फेकून माझी बाजू तावातावाने मांडायचो आणी त्यांना सांगायचो दाखवा आता तुम्ही देव.. ती बिचारी काही बोलायची नाहीत, आपल्याच मस्तीत दंग होती. पण आज अक्षरश: काकुळतीला आलो होतो. जे घडलयं त्यावर विश्वास ठेवणं अजुनही अवघड जात होतं. विचार करता करता रात्रीचे ११ वाजायला आलेले. रंगाचे डोळे मिटायला लागले होते. माझी मात्र पुर्ण झोप उडाली होती. लाईट येण्याचा पत्ता नव्हता . पण आता त्या पठारावर धुकं पसरलेलं असतं. बाहेरच्या रातकिड्यांच्या किरकिराटाने डोक उठलेलं असतं.
रंगा खाली वळकटी टाकून आडवा झाला . मी कॉटवर अंग टाकून विचार करायला लागलो , मगासच्या घटनेचे सावट अजूनही मनावरून गेलेलं नव्हत.. पण आता रंगाने लावलेल्या उद्बत्त्यांमुळे खोलीतल तापमान नियमित होत , तो अजूनही काहीतरी पुटपुटत होताच . अंगात अशक्तपणा खुपच आलेला होता . आजच्या रात्री काय होणार हि चिंता काळजाचा थरकाप उडवत असते. पण नाही! मी हळुहळू निद्राधीन होत होतो.

पक्ष्यांच्या चिवचिवाटाने सकाळी जाग आली . आता जरा तब्येत बरी वाटत होती. रंगाने नाश्ता तयार केलेलाच होता तो खाऊन मी कोर्टात जायलो निघालो. जाता जाता रंगाचेही आभार मानले. त्याच्या मारूती स्तोत्रानेच काल वाचवलेलं होत .

कामात काही केल्या लक्ष लागत नव्ह्तचं. उर्मिलेची फार आठवण येत होती. आल्यापासुन एक-दोनदाच काय ते बोललो असू. हा भयानक प्रकार अर्थातच तिला सांगितला नव्हता. आणी कोण कितपत विश्वास ठेवेल हा प्रश्न होताच. या सगळ्या त्रासामध्ये घरातल्या मायेच्या माणसांची आठवण सारखी येत होती. शेवटी मनाशी निश्चय करून या शनिवारी-रविवारी घरी जाऊन त्यांना भेटून यायचं हे नक्की केलं. उद्या शुक्रवार, दुपारी जेऊनच निघायचं म्हणजे रात्री उशीरापर्यंत का होईना घरी पोहचू. या पछाडलेल्या वास्तूत आता अजिबात मन रमत नव्हतं.

*********************************************************************************

गजबजलेलं डोंबिवली!!!

हुश्श. मागच्या महिन्यात या गर्दिला शिव्या घालणारा मी..आज या गर्दित स्वतःला खुप सुरक्षित समजत होतो. पण......अचानक जीव घाबरा-घुबरा झाला. सारखं वाटायला लागलं, कोणीतरी आपल्या अगदी जवळून चिकटून चाललयं. मी दचकलो, पटापट पावलं उचलून चालायला लागलो. आजुबाजुला असलेली गर्दी आणी मी यात काहीच संबध नाही असं वाटायला लागलं. हे काय होतय. रिक्षात बसून घराचा पत्ता सांगितला. घर तसं शहराबाहेरच एम्.आय्,डी.सी भागात. इथेही पावसाला सुरूवात झालेली.

माझी बैचेनी काही संपत नव्हती. कधी एकदा घरी पोचतोय अस झालेलं .तेवढ्यात दुसर्‍या बाजुलाही कोणीतरी बसलयं असं वाटायला लागलं. मान वळवून बघायचही भान उरलं नव्हतं. हळुहळू त्या भासाला आकार यायला लागला. समोरच बघत होतो पण डोळ्यांच्या कडांनी बाजुला काय घडतयं ते व्यवस्थित जाणवत होतं. एक थंड स्पर्श खांद्यावरून हुळहूळत गेला. तसा मी खुप मोठ्याने ओरडलो. रिक्षावाला घाबरला, त्याची चांगलीच बोबडी वळली होती. त्याने पटकन रिक्षा बाजुला घेतली."क्या हुवा साहब?"

मी थरथर कापत होतो, बाजुला बघायची हिंमत नव्हती. मी घाबरत घाबरत बाजुला बोट दाखवले तसं त्याने तिकडे बघितलं आणी मख्खपणे म्हणाला "साहब, वहाँ तो कुछ भी नही है. बारीशका पाणी अंदर ना आये इसलिये जो कवर लगाया है उसका रस्सी तुट गया होगा."

बापरे!! माझा जीव भांड्यात पडला. प्लास्टिकचं कवर होतं म्हणायचं, मी उगाचच एवढा घाबरलो. भितीने जीव अर्धा झाला होता. घर दिसल्यावर परत उत्साह आला. लिफ्ट मध्ये शिरलो...
लिफ्ट हळू हळू वर जायला लागली, पहिला मजला, दुसरा मजला ......
लिफ्ट तर सरकत होती.. पण आता तिथे मजला कितवा आहे ते कळतच नव्हत.
मी पटापट बटन दाबली पण छे ,
अचानक परत तापमान कोंदट...
लिफ्ट मधल्या दिव्यांच्या आतल्या तारा दिसतील इतका अंधुक प्रकाश पसरला ....आपण तुटलेल्या काचेतून बघतो तसं दिसायला लागल... धूसर, तुकड्या तुकड्यात ....
आणि
आणि ते सर्व तिथे होते. माझ्या बाजूला....... माझ्याकडे टक लावून बघत. त्यांची मजल आता त्या वास्तुच्याही पुढे गेली होती तर.. . दोन्ही हात तोंडावर घेऊन मी ओरडलो.
लिफ्ट उघडल्याचे मला अंधुक दिसले.. आणि शुद्ध हरपली
जाग आली तेंव्हा घरी होतो , उर्मिलाच भयंकर रडून झालेलं दिसत होत , आई बाबा बाजूलाच होते. शेजारचे भाटे काका सुद्धा होते. त्यांनीच मला घरी आणलेलं दिसत होत.. थोड्यावेळात ते निघून गेले.. बाबांबरोबर त्याचं काय बोलण झाल ते समजल नाही .ती रात्र उर्मिला बाजूलाच बसून होती... तिच्या कुशीत खूप उबदार वाटत होत...
आपल्या घरातली सकाळ काही वेगळीच वाटली मात्र.. खूप उत्साह वाटत होता. पण कालचा प्रसंग आठवल्यावर.. परत मनावर काजळी चढली ..
मला आता घरच्यांपासून काहीही लपवायचं नव्हत.
नाश्त्याला बसलेले असताना.. मी सर्व हकीकत सांगून टाकली
उर्मिलाचा चेहरा. भयाने पांढरा फाटक पडलेला .. आई पण हादरलेली.. बाबांच्या कपाळावर आठ्या पडलेल्या..
मग कोणीच काही बोललं नाही.
मग बाबाच म्हणाले, काल भाटे सांगत होते.. त्यांनी लिफ्ट उघडली तेंव्हा तू खाली पडलेला होतास.. आणि तुझ्या अंगावर ३, ४ काळी मांजर होती.. ती नंतर जिन्यातून पळून गेली .
मी मान खाली घालून बसून राहिलो.. त्यांनी मला पूर्ण झपाटलेल होत हे निश्चित !!!
बाबा मग उठून बाहेर गेले, ते दुपारीच परत आले, आल्या आल्या त्यांनी मला सांगितल..
चल आपल्याला आता एकाच व्यक्ती मदत करू शकेल... आपल्याला त्यांना लवकरात लवकर भेटायला हव
मी विचारल.. कोण बाबा ?
बाबांच्या डोळ्यात कसलीशी चमक आली , ते म्हणाले

समर्थ ...
अशोक समर्थ !!!

टीप : कै. नारायण धारप यांच गाजलेलं पात्र 'समर्थ' आता या मालिकेत आणण्याचा प्रयत्न केला आहे. नायकाच्या आयुष्याला लागलेलं अभद्र ग्रहण समर्थ आणि त्यांचा सहकारी अप्पा सोडवतील का?
शापीत वास्तू मुक्त होईल का?
कदाचित पुढच्या भागात याची उत्तर मिळतील

.तोपर्यंत क्रमशः

गुलमोहर: 

आवडला हा भाग. आता रात्री काय भीती वाटायची ती वाटो. Happy

एका ठिकाणी 'एक जुना कदाचित पुढच्या भागात याची उत्तर मिळतील लोखंडी गज दिसला' असं झालंय तेव्हढं नीट करा प्लीज.

मस्त