स्वयंभू श्री चंडिका देवी (दाभोळ)

Submitted by जिप्सी on 28 September, 2011 - 12:22

सर्व मंगल मांगल्ये शिवेसर्वाथ साधिके!
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते!!

गणेशोत्सव नुकताच धामधुमीत पार पडला. पितृपक्षही संपला आता सुरवात झाली ती नवरात्रौत्सवला. गरब्याचे आणि दांडियाचे सूर आता नऊ दिवस घुमणार. गणेशोत्सवानंतर मोठ्या प्रमाणात साजरा होणारा हा अजुन एक प्रमुख उत्सव. आपल्या महाराष्ट्रातही वेगवेगळ्या ठिकाणी देवीची मंदिरे आढळतात. त्यात प्रामुख्याने तुळजापुरची तुळजाभवानी, कोल्हापुरची अंबाबाई, माहुरची रेणुकादेवी आणि वणीची सप्तशृंगी ही देवीची साडेतीन पीठे शक्तीस्थान म्हणून ओळखली जातात. असेच एक जागृत स्थान म्हणजेच आपल्या कोकणातील दाभोळची स्वयंभु श्री चंडीकादेवी.

दापोली भटकंतीच्या दरम्यान दाभोळला भेट देण्याचा योग आला आणि लक्षात राहिले ते तेथील स्वयंभू श्री चंडिका देवीचे मंदिर. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात वसलेले एक निसर्गरम्य गाव म्हणजे दाभोळ होय. "दालभ्य" ऋषींच्या वसतीस्थानाने पावित्र्य झालेले हे गाव. सध्या एनरॉन प्रकपामुळे गाजत असलेले हे दाभोळ बंदर प्राचीन असून त्याचा उल्लेख १५/१६व्या शतकात रशियन वर्णनात सापडतो. एका बाजुला वशिष्ठी नदिमुळे तयार झालेली समुद्रीकिनार आणि इतिहासाची साक्ष देणारा गोपाळगड, बाजुला दाभोळ बंदर तर दुसर्‍या बाजुला असणार्‍या टेकडीवर असलेले श्री स्वयंभू चंडिका देवीचे गुहेतील प्राचीन व जागृत मंदिर. दापोली शहरापासुन साधारण एक तासाच्या (२८ किमी) अंतरावर एका टेकडीवर वसले आहे श्री स्वयंभू चंडिका देवीचे स्थान. टेकडीच्या डावीकडील भागातून खाली उतरल्यावर एकसंघ दगडामध्ये कोरलेल्या भुयारवजा गुहेमध्ये असलेल्या श्री स्वयंभू चंडिका देवीच्या मंदिराकडे आपण येतो. गुहेमध्ये प्रवेश करताना एका छोट्या दरवाजातून वाकून जावे लागते. आत आल्यावर आपल्याला दिसते ती काळ्या कभिन्न पाषाणाच्या गुहेत कोरलेली नंदादिपाच्या प्रकाशात उजळलेली मंगलमय आणि सोज्वळ शेंदुरचर्चित श्री चंडिका देवीची मूर्ती. अशी ही प्रसन्न मूर्ती पाहताक्षणी आपले भान हरपते.

(मंदिरात देवीचा फोटो काढण्यास परवानगी नसल्याने हा फोटो नेटवरून साभार)
मूळ मूर्तीची प्रतिकृती

श्री स्वयंभू चंडिका देवीचे रुप जेव्हढे सुंदर तेव्हढेच रौद्रही भासते. देवीच्या भुवया मोठ्या असून ती आपल्या नयनांनी संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवून असल्याचे सांगतात. देवीला चार हात असून तीच्या उजव्या हातात तलवार आहे. श्री चंडीकेचे मुख नैऋत्य दिशेला असून ती पूर्णपणे शाकाहारी आहे. दाभोळ गावात असलेल्या ईंगळाइ-भैरीदेवी या श्री चंडीकेच्या बहिणी असून दालभ्येश्वर, नवनाथ दत्त मंदिर आदी देवांना तीने आपल्या छत्रछायेखाली घेतले आहे असे स्थानिकांचे मत आहे. अशा या जागृत देवीचे दर्शन घेऊन त्या अंधाऱ्या गुहेतून पणत्यांच्या मंद प्रकाशात प्रदक्षिणा पूर्ण करून आपण बाहेर पडतो. बाहेरील रचनेवरून आत असलेल्या गुहेची अजिबातच कल्पना येत नाहि. फार पूर्वी दालभ्य ऋषींनी या गुहेत तपसाधना केल्याचे सांगितले जाते.

मंदिर परीसर

नवरात्रीत देवीचा उत्सव मोठ्या धामधुमीत साजरा केला जातो. मंदिराच्या मुख्य द्वाराजवळच घटस्थापना केली जाते. पहाटे साडेचार-पाचच्या सुमारास काकड आरतीला सुरुवात होते. दसर्‍याच्या दिवशी सोने लुटून मंदिरावर निशाण चढविले जाते. देवीचे स्वरूप हे स्वयंभू असून ती नवसाला पावणारी जागृत देवी आहे. उत्सवाच्या काळात विविध भागातून भक्त देवीच्या दर्शनाला हजारोंच्या संख्येने येत असतात. चंडिकेवर जेंव्हा मुघलांचे राज्य आले तेंव्हा शिवरायांनी येथे स्वारी केल्याची नोंद आहे.

निसर्गाच्या कुशीत वसलेले हे गाव सध्या एनरॉन प्रकल्पामुळे गाजत आहे. तरीसुद्धा आपली एक परंपरा व खास कोकणी ठसा अजुनही या गावात जाणवतो. दाभोळ बंदर हे सतत नौकांनी गजबजलेले असते. या बंदराच्या पलिकडे असलेल्या अंजनवेल, वेलदुर परिसरापर्यंत लाँचसेवा उपलब्ध आहे. येथील समुद्रकिनाराही सुरुंच्या झाडामुळे अधिकच आकर्षक वाटतो. खास कोकणी निसर्ग सौंदर्याबरोबर स्वयंभू दालभ्येश्वर मंदिर, नवसाला पावणारा सय्यद अमिरूद्दिन बालापीर, अंडा मशिदहि आपले वैशिष्ट्ये जपून आहेत. अंडा मशिद हा प्राचीन वास्तुशास्त्राचा अप्रतिम नमुना मानला जातो.

निसर्गरम्य दाभोळ
दाभोळ खाडीतुन दिसणारी अंडा मशिद

अशा या दाभोळ परिसराला एकदा भेट द्या आणि त्या चंडिकेच्या मंदिरात येणारा शांततेचा आणि प्रसन्नतेचा अनुभव जरूर घ्या.

गुलमोहर: 

सुंदर.

जिप्सी,

नवरात्रीच्या मुहूर्तावर देवीदर्शन घडवल्याबद्दल आपले सादर आभार! Happy

आ.न.,
-गा.पै.

व्वा! सुंदर दर्शन!

नवरात्रीची सुरुवात छान केलिस Happy

जिप्सी पुन्हा एकदा धन्स रे .. कुठे कुठे फिरवून आणतोस आम्हाला<<< +१ Happy

मस्त माहिती फोटो..

मला नक्की आठवत नाहिये मी या देवीला गेलेय की नाही.. तो पिंडांचा परिसर ओळखीचा वाटत आहे..

तिथे देवीच्या मूर्तीकडे जाताना थोडासा बोगदा टाइप आहे का रे?

तिथे देवीच्या मूर्तीकडे जाताना थोडासा बोगदा टाइप आहे का रे?>>>>येस्स, तेथे वाकुन जावे लागते. Happy

मस्त.. पाहिले आहे हे ठिकाण.. इथे मंदिरातच कोकम सरबत सुद्धा मिळते ना? शांत आहे परिसर एकदम. इथुनच जवळ केशवराजचे मंदिर आहे ते सुद्धा अप्रतिम आहे..

सुंदर.. आम्हीही इथे आधी जाऊन आलो आहोत
अंडा मशिदीची अवस्था अतिशय वाईट आहे...

पण तिथली कोरीवकामे पाहण्यासारखी आहेत

सुवर्णदुर्ग किल्ल्याला भेट दिली नाहीस का ?>>>>नाही जमलं Sad पुढच्या भेटीत नक्कीच Happy

इथे मंदिरातच कोकम सरबत सुद्धा मिळते ना? >>>>येस्स्स Happy

शांत आहे परिसर एकदम. इथुनच जवळ केशवराजचे मंदिर आहे ते सुद्धा अप्रतिम आहे..>>>>+१

कोकणातली सगळीच मंदिरे मस्त असतात Happy आत गेल्यावर शांत, थंड वाटायला लावणारी Happy

धन्यवाद जिप्सी ह्या सुखद फोटोसहलीसाठी! Happy

मस्त माहिती. या अंडा मशिदीसमोरच ओशन व्ह्यु नावाचे हॉटेल आहे, माझे वडिल तिथे रहायला असतात. (हॉटेल भारती शिप यार्डने कायमस्वरूपी भाड्याने घेतलय)

दाभोळ एन्रॉन प्रकल्पामुळे हे गाव फार वेळा बातम्यामधे येतं. आसपास गुहागर दापोलीइथे भरपूर पर्यटक येतात. पण चंडिका मंदिरामधे त्या मानाने पर्यटकाची वर्दळ कमी असते. खूप शांत परिसर आहे.

दाभोळची एक नविन ओळख इथे मुद्दाम करून देतेय. भारतातली पहिली प्रायव्हेट ऑइल रिग येथे बांधली जातेय. तसेच थोड्याच दिवसात वॉर शिप्स (भारतातल्या तसेच विदेशातल्या)च्या बांधणीची देखील येथे सुरूवात होणार आहे. (भारती शिप यार्ड). ऑइल रिगचे प्रोजेक्ट मॅनेजर् माझे वडिल आहेत. Happy

सुंदर फोटो. गुहागर हे माझ आजोळ त्यामुळे लहानपणी दर वर्षी मे महिन्यात गुहागर ला मुक्काम आणि चंडिका देवी च्या ( आम्ही चंडकाई म्हणतो म्हणजेच चंडिका आई ) देवळाला दरवर्षीची भेट ठरलेलीच. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. फोटो अप्रतिम.:)

सुरेख लेख. Happy प्र.ची.बद्दल बस नाम ही काफी हे जीप्सी . निवेदनात मिलिंद गुणाजी ला मागे टाकलयसं.