पत्नीशी वाद कसा काढावा - एक डझन उपाय

Submitted by बेफ़िकीर on 12 September, 2011 - 06:38

पत्नीशी मुद्दाम वाद काढल्यामुळे काही घटकांचे स्वातंत्र्य प्राप्त होते हे आपण सर्व जाणतोच! हा वाद परिणामकरकरीत्या व खात्रीलायक पद्धतीने काढता येईल किंवा नाही याबाबत मागे काही विचारमंथन केलेले होते. त्याबाबत काही टिपण्ण्या:

पत्नीशी वाद कसा काढावा -

असा एक लेख 'हसलात तर कळवा' मध्ये लिहीला होता. ३ वर्षांच्या वाढीव अनुभवानंतर काही नवीन टिप्ससह येथे देत आहोत. याचा उपयोग करताना रॉयल्टी द्यावी लागणार नाही मात्र स्वतःच्या जबाबदारीवर या उपायांची अंमलबजावणी करावी लागेल.

मूळ पुस्तक माझ्याकडेच उपलब्ध असून ते फुकट नेणार्‍यास दहा रुपये मिळतील.

-'बेफिकीर'!

=============================================================

उपाय क्रमांक १ - कुटुंबबाह्य घटकांसमोर नामोहरम होण्याचा अभिनयः

समजा घरात पाहुणे आलेले असले (त्यातही तिच्या माहेरचे असले तर हा जालीम उपाय ठरतो) आणि पत्नी म्हणाली की खालून जरा रवा घेऊन या:

प्रचंड घाबरल्याचा अभिनय करत व अभूतपूर्व लगबगीने एक पिशवी घेऊन नेसत्या वस्त्रानिशी जिना उतरून निघून जावे. आलेल्या पाहुण्यांना आपली हतबलता निश्चीतपणे समजावी यासाठी चेहरा 'समोर वाघ उभा असलेल्या' हरणासारखा करावा. रवा घेऊन घरात प्रवेश केल्यावर दम लागल्याचा सामर्थ्यवान अभिनय करून स्वयंपाक घराच्या ओट्यावर रव्याचे पुडके नम्रपणे ठेवून दोन्ही हात एकमेकांत गुंफून पोटाखाली धरत मान खाली घालून उभे राहावे आणि कुजबुजल्या स्वरात म्हणावे "रवा"!

यावर पत्नी आश्चर्याचा धक्का बसल्यामुळे चकीत होऊन पाहात असतानाच घरी आलेल्यांना 'हा बिचारा किती सोसतो' याची सार्थ जाणीव होते. यानंतर पत्नी खालील विधान करू शकते.

"असे काय करताय?? घाबरल्यासारखे?? आणि धावत कशाला गेलात??"

त्यावर जमीनीकडे पाहात आणि दिल्लीच्या सम्राटापुढे आपली व्यथा व्यक्त करत आहोत असे नम्र भाव चेहर्‍यावर ठेवून म्हणावे...

"मला हल्ली.... फ... फ... फार भीती वाटते तुझी... "

असे म्हणून एक एक पाऊल संथपणे उचलत इतर पाहुण्यांकडे धुंकून न बघता स्वतःच्या खोलीत जाऊन बसावे. पाहुणे त्यांच्या कन्येला उपदेशामृत पाजत पाजत उपमा / शिरा आणि चहा असा आहार करून निघून जाताच घरात एक चांगला दमदार वाद उत्पन्न होतो. त्यावेळेस मात्र एक अक्षर न बोलता फक्त टीव्ही पाहात राहावे.

या वादाचा उपयोगः - आपण अनप्रेडिक्टेबल आहोत हे जाणवल्यामुळे पुढच्या वेळेस कामे सांगितली जात नाहीत.

===========================================

उपाय क्रमांक दोन - परस्तुती, परस्त्रीची स्तुती

"अहो, जेवायला वाढलंय, चला आता" अशी आज्ञा ऐकू आली की तत्ववेत्त्याच्या गांभीर्याने हात धुवून पानासमोर बसावे. आणि पहिला घास खाण्याआधीच अत्यंत नैसर्गीक वाटेल असे एक विधान करावे.

"शेजारच्या मृणालची आमटी काय टेस्टी होते नाही?"

यावर खालील प्रतिक्रिया संभाव्य आहेत.

१. हो ना, मला कधी जमणार काय माहीत. - यावर 'तुला जमेल अशी मी प्रार्थना करतो' असे म्हणाल्यास 'एक दिवसीय' मुदतीचा वाद उत्पन्न होतो.

२. माझी भुरकून तर बघा आधी - यावर "रोजच ओरपतो की" असे खुशाल म्हणून पाहावे. यावरही एक 'एकाच दिवसाच्या' मुदतीचा वाद उत्पन्न होत असला तरीही त्याचे पडसाद पंधरा वर्षापर्यंत निघू शकतात.

३. तिलाच सांगते रोज आमटी द्यायला - यावर "खरंच?" असे स्वप्नील डोळे करून शुन्यात बघत म्हणावे. याचा परिणाम भांडी आपटणे ते माहेर गमन यातील काहीही असू शकतो. माहेरगमन झाल्यास प्रचंड मोठे फायदे होतात याचा अंदाज सर्वांना असल्यानेच अनेक जण हाच उपाय एकदम अवलंबतात. पण तो 'तिलाच सांगते आमटी द्यायला' याच प्रतिक्रियेवरच योजायचा उपाय आहे.

================================

उपाय क्रमांक तीन - वजन, लठ्ठपणा, दिसणे याबाबत सत्याची कास धरणे

अनेक पुरुष (विवाहीत) आपल्या पत्नीला घाबरून तिचा आकार लाल भोपळ्यासारखा असला तरी तिने विचारले की 'तशी फार जाड काही नाहीयेस' असे म्हणतात. माणसाने एकदाच स्पष्ट सांगितल्यास आयुष्यभर खोटे बोलावे लागत नाही. 'अहो, मी जरा बारीक झालीय की नाही आता' असे पत्नी आरश्यात स्वतःलाच न्याहाळत विचारू लागली की सरळ दुर्लक्ष करून पेपर वाचायला घ्यावा. 'अहो, सांगा ना' यावर पेपरातच डोके खुपसून 'हं' इतकेच म्हणावे. 'तुमचं लक्षच नाहीये' असं म्हंटली की 'हो गं बाई, झालीयस बारीक' असे 'आवाजात वैताग स्पष्टपणे' ओतत म्हणावे. यावर उशीत डोके खुपसून रडणे, स्वतःच्या बहिणीला फोन करून चहाड्या करणे आणि मेहुणे बहिणीला उद्देशून किती गोड बोलतात याची आठवण करून देणे असे प्रकार घडू शकतात. त्यावर आपणही खुशाल 'बारीक म्हणजे मृणाल, तू काही बारीक नव्हेस, तू अगदी जाड नाही आहेस इतकेच" असे म्हणून टाकावे. स्वतःचे दिसणे व शेजारणीला दिलेली काँप्लिमेन्ट हे कॉम्बिनेशन अत्यंत विषारी, घातक व लॉन्ग टर्म इफेक्ट असलेले असते. जोवर दोघेही हयात आहेत व शेजारीण मृणाल आहे (मग त्या मृणालला तीन नातू का असेनात) हे कॉम्बिनेशन वाद उत्पन्न करत राहतेच.

=====================================

उपाय क्रमांक चार - मृणाल - वैवाहिक शांततेचा एक प्रातिनिधीक शत्रू बनवणे

"अहो, काय सारखे खिडकीत उभे राहता?"

या प्रश्नावर बिनदिक्कत म्हणावे.

"दोन मुले झाली पण सगळे कसे जिथल्यातिथे आहे"

हे विधान पुलंचे आहे हे सांगू नये.

अत्यंत किमान ठिणगीने कमालीचा हिंसक स्फोट घडवण्याची क्षमता या विधानात आहे. या विधानाने निर्माण झालेली खळबळ तीन आठवडे परिणाम करत राहते. स्वयंपाकाची चव बदलते. भांड्यांचे आवाज वाढतात. सुस्कारे, नि:श्वास आणि नाक उडवणे, आठ्या असे प्रकार सातत्याने होत राहतात. कुणी आले गेले तर त्यांना सहज समजू शकते की येथे तंग वातावरण आहे. घरात लहान मुले असल्यास त्यांना 'बापावर जाऊ नका' असा स्पष्ट व निर्वाणीचा इशारा मिळत राहतो. मृणाल मधला मृ निघाला तरी डोळ्यात अंगार निर्माण होतो. हा वाद निर्माण करण्यास सर्वात सोपा व सुलभ आहे. तो निर्माण होण्यासाठी मृणाल सुंदर असण्याची काही एक गरज नाही व स्त्रीचे नांव मृणाल असण्याचीही!

================================

उपाय क्रमांक पाच - इन्टरमिटन्ट बहिरेपणा

हा उपाय व्यापक प्रमाणावर वापरल्यास 'हे बहिरे झाले आहेत' हे सर्व जगाला आत्मीयतेने सांगण्यात येते व आपण बहिरे ठरल्याने कोणीही आपल्यासमोर काहीही बोलायला लागते.

तेव्हा, हा उपाय अत्यंत काळजीपुर्वक व संधी बघून वापरावा लागतो. म्हणून यास 'इन्टरमिटन्ट बहिरेपणा' असे शीर्षक आहे.

हा एक महाभयानक उपाय आहे. आपण वाचत असताना समजा पत्नी तेथे उगवली व म्हणाली...

"खालून रवा घेऊन या"

ढुंकुन बघु नये.

"अहो........."

ढुंकून बघू नये.

"अहो.....??????"

त्या वेळेस तिची हालचाल डोळ्यांना जाणवल्याप्रमाणे शांतपणे मान वळवून तिच्याकडे पाहावे.

"ऐकू येत नाही का??? रवा आणा रवा"

"काय गं???"

हे 'काय गं' इतक्या भिन्न, थंड व शांत स्वरात असायला हवे की मूळचा संताप काही पटींनी वाढायला हवा. दात ओठ खाऊन पत्नीने पिशवी व पैसे आपल्यासमोर आदळले पाहिजेत.

"र वा आ णा... "

"कुठे चाललीयस का??"

पत्नी हतबुद्ध होऊन पाहते व मागे वळून आपल्या माहेरहून आलेल्यांना म्हणते..

"ह्यांना न?? हल्ली मधमधे ऐकूच येत नाही... "

हे विधान करून ती रवा आणायला जाते. शांतपणे पेपर वाचता येतो. माहेरचे निघून गेल्यावर मात्र पूर्णपणे ऐकू येत आहे हे प्रोअ‍ॅक्टिव्हली भासवत राहावे लागते. सतत बहिरेपणा केल्यास आपली गणतीच केली जाणार नाही हा धोका लक्षात घेऊन मधेमधेच वापरण्याचा हा उपाय आहे.

============================

उपाय क्रमांक सहा - गांधीगिरी

हा उपाय करण्यासाठी मोहावर नियंत्रण व जिभेला लगाम अत्यावश्यक आहे. हा उपाय कोणत्याही वेळेस व कोठेही करता येतो. गांधीझमचे यश यातच सामावलेले आहे की तो कोणालाही कोठेही व कधीही अंमलात आणता येतो.

"अहो... आमटी कशी झालीय??"

"तू जे करशील तेच मीच खातो... अत्यंत आवडीने.. "

"म्हणजे काय?? झालीय कशी पण??"

"काहीही स्वाद नाही आहे... "

"तुम्हाला त्या मृणालचीच आवडणार "

"माझं काही चुकलं का??"

"छे छे... माझंच चुकलं इथे आले लग्न करून ते"

"तुला चूक सुधारायची आहे का??"

"चालती होऊ का?? "

"घर तुझंच आहे.. ये, जा, काय वाट्टेल ते कर.. "

"ही तुपट भाषा कधी शिकलात??"

"बदलू का??"

"पुरुषासारखे पुरुष असून कसले बोलता हो तुम्ही??"

"नम्रतेने जग जिंकता येते..."

"वाढू का आमटी?? "

"इच्छा तुझी"

"तुम्हाला हवीय का नकोय???"

"मला मोह नाही... "

"तरीच खिडकीत उभे राहता तासनतास"

"तो व्यायामाचा एक प्रकार आहे..."

"डोळ्यांच्या का??"

" तुला काही शंका वगैरे आहे का माझी??"

"मला शंका नाही आहे.... खात्री आहे.. "

"कसली??"

"त्या मृणालची एक झलक दिसण्यासाठी तडफडत असता खिडकीत .."

"नाही उभा राहणार आता... एका पतीव्रता व चारित्र्यवान स्त्रीवर असे शिंतोडे उडवले जाणार असतील तर..."

"ती पतीव्रता अन मी काय आहे मग??"

"ते तू ठरवायचंस.. .. "

यावर हुंदके, दोन तीन माहेरी फोन आणि बॅग भरायचा अभिनय व संध्याकाळी मेहुणी येऊन आपलीच बाजू घेऊन पत्नीला काही समजावून सांगणे हे प्रकार घडू शकतात.

आमटीचा प्रश्न बाजूला राहतो व एक वाद निर्माण केल्याचा असुरी आनंद मिळतो तो वेगळाच!

================================

उपाय क्रमांक सात - एकशब्दता

हे करण्यास सराव लागतो. मात्र हा अत्यंत तिखट उपाय असून तो केवळ हिंमत असल्यासच वापरावा.

"अहो.. रवा आणा"

"हाड"

"आं??? काय म्हणालात?? "

"फूट"

"अहो... डोकं फिरलं का काय?? मी बायको आहे तुमची.. "

"होतीस.. "

"म्हणजे काय??? होतीस म्हणजे काय??? देवाब्राह्मणाच्या साक्षीने आलीय इथे नांदायला.. "

"का?"

"हा तुमचा फुटका संसार उभा करायला.. का म्हणे का... काही वाटत नाही?? एकटी सोसतीय"

"सोस"

" अरे वा?? सोस??? काय म्हणून?? माझ्या वडिलांनी सत्तर हजार दिले होते लग्नात... "

"थेरडा"

"खबरदार... माझ्या दादाला सांगेन.. दम भरेल तुम्हाला... "

" फुकट्या... "

"ते सत्तर हजार द्या परत.... "

"संपले... "

" स्वतःवरच उधळलेत... आणि आता संपले म्हणताय... मला कशाला आणलीत इथे मग??"

"चुकलो.. "

"म्हणजे??? जाऊ की काय मी???"

"जा"

या "जा" नंतर बॅग भरणे, शिव्या, दाणादाण असे सर्व होते व दोन दिवस माहेरपणही होते. हे दोन दिवस साजरे करावेत. नंतर माफी मागायला काहीच हरकत नाही.

=============================================

उपाय क्रमांक आठ - प्रकृतीविषयक धक्कातंत्र

हाही एक सोपा उपाय आहे.

"अहो... त्या टवळीकडे काय बघत बसलायत खिडकीतून???"

असा प्रश्न कानावर येताच खिडकीचे गज दोन्ही हातांनी धरून तिथेच मटकन जमीनीवर बसावे. धावपळ होते. पदराने कपाळ पुसत व पाठीवर हात फिरवत "काय झाले, काय झाले" असे विचारले जाते.

"हे आरोप तू जे करतेस ना?? त्याचे हल्ली मला प्रेशर यायला लागले आहे... जा.. जा आता गोळ्या आण.."

हे विधान करताना चार आवंढे गिळणे, थडथड उडणे आणि डोळे फिरवणे या क्रिया एकदम कराव्यात.

"अं?? हो हो... आ... आणते आणते... तुम्ही पडा जरा... पण... तुम्हाला काही झालं तर मी गेल्यावर???"

"अं?? अगं त्या मृणाल वहिनींना सांग जरावेळ बसायला... "

हा उपाय दुप्पट फायद्याचा आहे. पण तो सहा महिन्यातून फार तर दोनदा करावा. हा उपाय खोटा असल्याचे समजल्यावर एक डेंजरस वाद उत्पन्न होऊ शकतो.

=====================================================

उपाय क्रमांक नऊ - ऐतिहासिक दाखले

हजरजबाबी व्यक्तींनीच यात पडावे. इतरांसाठी हा उपाय कुचकामी ठरू शकेल. हा उपाय योजण्यासाठी अभ्यास लागतो. रोजनिशी लिहीत असल्यास उत्तम!

"अहो... रवा आणा"

" १२ नोव्हेंबर १९६७ ला दिवाळसणाला तुझ्या माहेरी गेलो होतो त्याची आठवण झाली..."

"का????"

"तुझी आई तुझ्या बाबांना म्हणाली केळी घेऊन या... "

"... मग???"

"ते कसले जातायत??? त्यांनी बाणेदार उत्तर दिले.. आपल्या खानदानात पुरुष असली कामे करत नाहीत"

"..... ह्यॅ... "

"ह्यॅ काय ह्यॅ??"

'किंवा'

"अहो... खिडकीत नका उभे राहू सारखे... काय त्या नटवीला बघता??"

"ही तुमचीच परंपरा पाळतोय "

"आमची??? कसली??"

"१२ मार्च १९८४ ला तुझी वहिनी तुझ्या थोरल्या भावाला हेच म्हणाली.. "

"काय??? "

" इतके वय झाले तरी शेजारच्या वहिनींकडे कसले बघत बसता??? त्यावर तुझा दादा म्हणाला की राहायचे तर नीट राहा... डोके पिकवू नकोस... मी तुला असे काहीही म्हणत नाही आहे... "

हा उपाय योजताना संदर्भ देण्याची तयारी ठेवावी लागते.
========================================================

उपाय क्रमांक दहा - मंदतेतून आविष्कृत होणारी असंबद्धता

या उपायाने भयानक वाद निर्माण होऊ शकतात. अत्यंत कुशलपणे असंबद्ध वागावे लागते. थोडे जरी प्रयत्न कमी पडले तरी माणूस नकळत सुसंबद्ध वागू शकतो. म्हणून हा उपाय आधी इतरांवर करून पाहणे इष्ट ठरते. तसेच, हा उपाय केवळ घरी कोणी पाहुणे आले तरच वापरावा. एरवी वापरल्यास जिथल्या तिथे भांडणे झाल्यामुळे योग्य तो फायदा होत नाही. पाहुण्यांसमोर असंबद्ध बोलणे ऐकल्यामुळे (ऐकावे लागल्यामुळे व पाहुण्यांनाही ते समजल्यामुळे) झालेली भावनिक घुसमट नंतर जेव्हा बाहेर पडते तेव्हाच ती योग्य ती फळे देते.

"अहो... रवा आणा"

"हो हो... बँकेचा संप आहेच नाहीतरी... "

हे विधान सर्व पाहुण्यांकडे बघत म्हणावे.

"रवा, रवा..... रवा आणा रवा..."

(येथे 'दे पिशवी' असे शब्द तोंडात येऊ शकतील, ते टाळावेत)

येऊन अर्धा तास झालेल्या पाहुण्यांना विचारावे.

"अरे??? कधी आलात?? कधी आल्या गं ह्या दोघी??"

त्यां दोघींच्यातील एक स्वतःच "म्हणजे काय?? इतका वेळ बोलतोय की आपण??" असे उत्तर देईल. तिच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करावे व पत्नीकडे व्याकूळ नजरेने पाहात बसावे.

"अहो... रवा आणायला जाताय का कसं??"

"तू गेली नाहीस अजून??"

"कुठे??"

यावर घरी आलेल्या पत्नीच्या मैत्रिणिच्या सासूच्या गालावर हलकी थप्पड मारून म्हणावे

"बबडी माझी"

धुमसत धुमसत हे प्रकरण पराकोटीला न्यावे.

पत्नी रवा आणते. पत्नीबाबत सहानुभुती व्यक्त करत व उपमा / शिरा व चहा असा आहार घेऊन दोघी निघून जातात. नंतर खरा वाद पेटतो. तेव्हा मात्र सुसंबद्ध वाद घालावा.

====================================

उपाय क्रमांक अकरा - फकीरगिरी

हा क्रोध निर्माण करण्यास अत्यंत उपयुक्त असा सुलभ उपाय आहे.

"अहो... माझी मावशी वारली"

"जिवंत होती??"

या प्रश्नावर पत्नीला 'मावशी वारण्यापेक्षा' मोठा धक्का बसू शकतो.

"आपल्याला गेलं पाहिजे.. "

"जा"

"जा काय जा?? आपण दोघांनी गेलं पाहिजे.. "

"का?? "

"अहो... मावसभावाला भेटायला जायला नको का??"

"मला भेटायला कोण आले होते???"

पत्नी धसका घेऊन खाली बसते आणि विचारते...

"तुम्हाला???... तुमचे कोण गेले???"

"शरीर कधीतरी मरणारच.. भेटायला यायला नको??"

"तुम्ही कामातून गेलेले आहात... "

" सगळेच जातात... जाणारच असतात... "

"येणारात की नाही???"

"कुठे राहते मावशी??"

"मावशी गेली .."

"जे जिवंत मानतात स्वतःला... ते कुठे राहतात??"

"उंब्रज... "

"जाऊन ये... "

"एकटी???"

"होय..."

"अहो काय म्हणतील सगळे???"

" काय म्हणणारेत ??"

"नावं ठेवतील... "

"मी एका अटीवर येईन... "

"अट??? काय अट??"

"मावशी गेल्याच्या आनंदात मी खदाखदा हासणार... "

अर्थातच भांडण होते व त्यात आपण कायम 'शरीर हे जिवंत असलेले प्रेतच असते' इत्यादी अभद्र विधाने करून पत्नीला एकटीला जायला भाग पाडायचे असते... मावशीच्या मरणामुळे मिळालेले दोन स्वातंत्र्याचे दिवस आनंदात घालवता येतात.

============================================

उपाय क्रमांक बारा - हासणे

हासणे इतके सोपे नसते. हे हासणे 'विनोद झाल्यावर' हासणे नसून 'विनाकारण हासणे' आहे. अश्या हासण्यामुळे अजरामर वाद होतात. त्यांची आयुर्मर्यादाही बरीच असते. तसेच, हासणे आरोग्यालाही उपायकारक असल्याने हळुहळू आपल्याला त्याची आवडही निर्माण होतेच. हा खरे तर तसा अतिशय सोपा उपाय वाटू शकेल. मात्र वापरायला गेल्यास त्यातील अडचणी कळतात. फार तर पहिल्या तीन विधानांवर हासणे शक्य आहे हे जाणवायला लागते. नंतरचे हासणे प्रचंड साहसानंतरच जमू शकते.

"अहो... माझी मावशी वारली"

प्रथम हे विधान ऐकून अतिशय गंभीर चेहरा करावा. आणि दुसर्‍याच क्षणी पोटावर दोन्ही हात ठेवून हासणे असह्य होत असल्याप्रमाणे हसावे.

या एकाच क्रियेवर भयानक वाद होऊ शकतात. हे पाहुण्यांसमोर केल्यास तर त्याची तीव्रता अतिशय वाढते.

रवा आणणे, मृणालकडे बघणे अशा कोणत्याही वादोत्पादक विधानांवर हा उपाय तितकाच योग्य लागू होतो. इतकेच नाही तर त्यानंतर खरे हसूही येऊ शकणे शक्य आहे. इतर काही माणसे आजूबाजूला असल्यास तीही हसू लागण्याची काही उदाहरणे आहेत. भावनेतील गांभीर्याचा समूळ नाश करण्याची क्षमता या उपायात असल्याने तो या लेखातील सर्वात महत्वाचा व कळसाचा उपाय आहे.

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

एक शब्द आहे :-
माझं काय संबंध

हे ब्रह्मास्त्र चं काम करतं Wink

Disclaimer : स्वतः च्या जबाबदारी वर वापरावे

Rofl Lol Rofl

अत्यंत उपयोगी असा हा लेख लिहून बेफिंनी तमाम नवरे जमातीवर केलेल्या उपकारांबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करीत आहे. पहिले शीर्षकात अंमळ गल्लत झाली आहे असे लिहिणार होतो कारण एक म्ह्णजे स्वतः हून पत्नीशी वाद काढण्या इतके हिम्मतवान फारच दुर्मिळ!! व दुसरे म्हणजे आपण पुरुष कधी पत्नीशी वाद घालतो का? ते फक्त मतभेद व्यक्त करणे असते!! वादाची सुरुवात ही नेहमीच.... जाउदे सगळेच काय लिहित बसायचे. सगळ्याना माहित आहे ते.

Rofl Lol Rofl

१३ वा उपाय - पोकळ भविष्यकालीन आश्वासन देऊन वेळ मारून नेणे.

पत्नी - हा आपला सोफा आता खूप जुना झालाय. नवीन बघायचा का?
पती - दिवाळीला बघू.

पत्नी - या मे महिन्याच्या सुट्टीत आपण कुलु, मनालीला जायचं का?
पती - नक्कीच. मार्च एप्रिलमध्ये ठरवू.

पत्नी - आज संध्याकाळी बाहेर जेवायला जायचं का?
पती - चालेल की. संध्याकाळी ठरवू.

पत्नी - या दसर्‍याला मला नवीन नेकलेस घ्यायचा का?
पती - साधा नेकलेस नको. दसर्‍याला एखादा हिर्‍यांचाच नेकलेस बघू.

पत्नी - संध्याकाळी "सिंघम"ला जायचं का?
पती - चालेल की. पण त्याऐवजी पुढच्या आठवड्यात "बॉडीगार्ड" लागतोय. त्याचा फर्स्ट डे फर्स्ट शो बघू.

.
.
.
काही काळानंतर . . .
.
.
.

पत्नी (कुठलेच आश्वासन पूर्ण न झाल्यामुळे चिडून) - तुमचं सारखं बघू बघू ऐकून कान किटले माझे. काहिही विचारलं तरी नुसतं बघू, बघू, बघू. करायचं तर काहिच नाही. वीट आलाय मला या संसाराचा. तुमच्यावर माझा अजिबात विश्वास राहिलेला नाही.

पती (मनातला आनंद लपवित चेहर्‍यावर गंभीर व चिडखोर भाव आणून) - ठीक आहे. नाही ना विश्वास. राहिलं तर मग. विश्वासच नाही म्हणल्यावर आता काहि बोलायचंच शिल्लक नाही.

(या उपायाला "मनमोहन सिंग" उपाय असे सुध्दा म्हणतात. त्यांची काहि विधाने पाहिली तर याची प्रचिती येईल. उदा. "३ महिन्यात महागाई कमी करू", "दहशतवादाचा नि:पात करू", "देशाच्या सीमा बळकट करू", "भ्रष्टाचाराचा नायनाट करू", "शेतकर्‍यांची परिस्थिती सुधारू" . . . )

लई भारी !
Rofl
हे झाले पत्नीसाठीचे उपाय

बाहेरच्या.... आय मीन ...बाह्य....आय मीन ...२४
जाऊ द्या

.

या बाफ वर प्रतिक्रिया देणार्‍या पुरूषांच्या बायका माबोकर नाहीत याची खात्री... Biggrin

अर्थात ह्या उपायांची काहीही गरज नाही.. यातले काहीही न करताही भरपूर वाद उपस्थित होतात..

उपाय क्रमांक दोन - परस्तुती, परस्त्रीची स्तुती - याचे काही उपप्रकार -

दोन अ). शेजारी स्तुती करण्यायोग्य मृणाल नसली अथवा शेजारी कोणी मृणालच नसली, तर "आईनी केलेली आमटी जास्त छान असते" हे म्हणावे.

ह्याचा परिणाम म्हणून पुढील प्रत्येक वेळी आमटी केल्यावर बायको "बघा जमलीये का तुमच्या आईसारखी" असं कुत्सित्पणे म्हणते आणि आपल्याला दर वेळी "नाही" म्हणून नवनवीन वादांना खतपाणी घालता येते.

दोन ब). सर्व बायकांना बाजारात मिळणारे पदार्थ घरी करून ते बाजारपेक्षा कसे जास्त चांगले झाले आहेत हे दाखवायला आवडते. उदाहरणार्थ पाव भाजी, पनीर बटर मसाला, रगडा पुरी ई.
अशा वेळी "बाजारच्या पाव भाजीची मजा वेगळीच असते" किंवा "गणेश भेळच्या सारखी रगडा पुरी कोणालाच जमत नाही" अशी वाक्ये टाकावीत.
ह्यावर बायको "तुम्हाला माझी काही किंमतच नाही" पासून "तुमच्यासाठी कितीही केलं तरी तुम्हाला कचराच खायला आवडतो" अशी कोणतीही प्रतिक्रिया देते आणि हा वाद अजून वाढवल्यास नंतर बाहेरचंच आणून खाण्याची मूभा पण मिळते.

उपाय क्रमांक चौदा - साधारणतः बाहेर जायचे असल्यास पुरुष १० मिनिटात तयार होतात (लागतय काय, एक सदरा आणि एक पँट तर चढवायची असते) पण बायकोला मात्र अर्धा तास तरी लागतो.

अशा वेळी मग आपण आधीपासून तयार होऊन बसण्याऐवजी बायको तयार होईपर्यंत थांबावे. ती तयार होत असताना "झालं का तुझं?" "किती वेळ लावतेस तू!" असे सारखे म्हणत रहावे. आणि ती तयार झाल्यावर आपण खांद्यावर टॉवेल टाकून शांतपणे अंघोळीला जावे आणि १५ मिनिटे 'साधना' करूनच बाहेर यावे. बाहेर येईपर्यंत बायकोचा पुतळा झालेला असतो आणि मग गाडीत / स्कूटरवर बसल्या बसल्या वादाला सुरुवात होते. तेव्हा मग तिच्याचमुळे आपल्याला कसा उशीर झाला हे सांगत राहिल्याने "वादाचा" पारा अजून चढत जातो आणि तो नंतर घरी परत आल्यावरसुद्धा चालु राहतो.

टीप - बायकोच्या माहेरी एखाद्या समारंभाला जाताना हा उपाय वापरल्यास विशेष परिणामकारक ठरतो.

लग्न झाल्यावर वापरुन बघतो.......... लग्ना आधी नको...आता सध्याच्या परीस्थिती हे प्रयोग करु शकत नाही.... Happy

Pages