"भय इथले संपत नाही" गाण्याचा अर्थ...

Submitted by पिन्ट्या. on 8 September, 2011 - 11:55

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवली गीते
ते झरे चंद्र सजणाचे, ती धरती भगवी…....

एखाद्या दिवशी कुठलं गाणं आठवावं याला काही नियम आहे का? आज मला वरिल गाणं आठवलं.
खरच याचा अर्थ नाही समजला कधी.....कुणी सान्गू शकाल या बाबत ?

गुलमोहर: 

तू मला शिकवली गीते

तू मला शिकवले जे ते... असे आहे बहुतेक. महाश्वेतात बहुतेक असेच ऐकू यायचे.

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवली गीते

ते झरे चंद्र सजणांचे, ती धरती भगवी
झाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवाया

तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणु अंगी राघव शेला

स्त्रोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दु:ख कुणाचे
हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे

कवी - ग्रेस
संगीत -हृदयनाथ मंगेशकर
गायिका -लता मंगेशकर

@पिंट्या, इथे आणि इथेथोडीफार चर्चा आहे बघा.

@अवल, गाणे इथे लिहिण्यापूर्वी आपल्या त्या ह्यांची आणि आपल्या त्या त्यांची परवानगी घेतलीत का? Proud

ग्रेसचा अर्थ कदआआआआआआआचित जीएंना कळतो. अन vice versa.
ग्रेस सांगतात, की माझा अर्थ मी सांगणार नाही. तुम्हाला जो वाटतो तो तुम्ही घ्या.
ग्रेस ची कविता हा एक विभवानुभव आहे.
विभव = potential
ergo, potential experience. हा त्यांनीच दिलेला एक शब्द. फार कमी मराठी शब्दांचे अर्थ इंग्रजीतून जास्त चांगले समजतात. त्या पैकी हा एक. असो.
मित्रा पिंट्या, तुला जो वाटला, भावला, उमगला, तो अन तोच याचा अर्थ.
ते गाणे ऐकताना जे उरी उमटते, जे दाटून येते, तो याचा अर्थ..
बघ मी काय बरळतो आहे ते समजतंय का

इथे स्वामीजी (स्वामी निश्चलानंद) यांनी या कवितेचा अर्थ दिलेला आहे. तिथेच ग्रेसजींच्या इतर कवितांचं त्ञांनी केलेलं रसग्रहण ही पहायला मिळेल.

Anonymous
भय इथले संपत नाही... रसग्रहण
भय इथले संपत नाही...मज तुझी आठवण येते...
मी संध्याकाळी गातो...तू मला शिकविली गीते...
हे झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया
त्या वेळी नाजुक भोळ्या, वार्‍याला हसवून पळती
क्षितिजांचे तोरण घेउन, दारावर आली भरती
तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातिल जणू राघव शेला
देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबुळापाशी, मी उरला सुरला थेंब
संध्येतील कमल फुलासम, मी नटलो शृंगाराने
देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने
स्तोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख कुणाचे
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे
ते धुके अवेळी होते, की परतायची घाई
मेंदूतुन ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई

-- ग्रेस

9/8/08
Anonymous
"मी संध्याकाळी गातो...." ही संध्याकाळ आयुष्याची संध्याकाळ वाटते. संध्यासमय हा संधिकाल असतो, एक परिस्थिति संपून दुसरी सुरु होण्याचा, एक मनःस्थिति पालटून दुसरीच्या प्रारम्भाचा!
आणि अशावेळी कविच्या मनात एकच गोष्ट वारंवार येते... "भय इथले संपत नाही!"
व्यावहारिक जीवनात आधार नसला की भय वाटते, पारमार्थिक दृष्टिने "द्वितीयाद्वै भयं भवति" या औपनिषद उक्तिनुसार जोवर द्वैत आहे तोवर संसारचक्राचे भय असते, अद्वैत अभय आहे!
जगाच्या संपूर्ण व्यापामध्ये कोणी किती वरकरणीचे आधार शोधले किंवा स्वतःच्या कर्तृत्वाने परिस्थितिला तोंड द्यायचं म्हटलं तरी ते सगळे उपाय तात्पुरते असतात.... मनाला सतत भेडसावत राहणारी भीतिची एक भावना कधीच सरत नाही.... या वस्तुस्थितिच्या जाणीवेतून कविमनाचा हा उद्गार आहे... "भय इथले संपत नाही!"
अशा वेळी कविला "तुझी आठवण" येते... ज्याची आठवण येते त्यानं गीते शिकवली होती, म्हणजे तो बरोबरीचा नव्हता, असं मानायला काहीच हरकत नाही. आणि ती गीते संध्याकाळच्या भयभीत मनःस्थितिमध्ये आठवत आहेत, म्हणजे आठवणारा 'तो' जीवनातला आईवडिलांसारखा कुणी व्यावहारिक आधार मानायचा? पण त्याच्या आठवणीचा संबंध "परतायाच्या घाई"शी लागत असल्याने असा आठवणारा "तो" कुणी व्यावहारिक वडीलधारं माणूस नसून ईश्वरच आहे! मनामनात दडलेला, मनाच्या स्वच्छ शान्त अवस्थेत विवेकाच्या रूपाने योग्य दिशा देणारा असा ईश्वर..... आणि लहानपणापासूनच्या संस्कारातून व स्वतःच्या सारासार विचारातून एकत्र आलेले अनुभवाचे तटस्थ बोल हीच ती "त्या"ने शिकवलेली गीते आहेत!
हा वैचारिक प्रगल्भतेचा ठेवा असला तरी अस्वस्थ मनाला दिलासा देण्याची क्षमता असल्याने कविला ही जणु भयभीत मनाच्या दु:खावर फुंकर घालणारी गीते वाटतात.

9/8/08
Anonymous
आता "संध्याकाळ"चा विचार करावा लागेल. ही केवळ "भय इथले संपत नाही" म्हणत हताश झालेल्या दुर्बल मनाची केविलवाणी अवस्था नाही! ही वैचारिक स्थित्यन्तराची कलाटणी आहे!
सभोवतीच्या जगाचा विचार करताना कविने अतिशय अर्थगर्भित अशी दोन प्रतीके समोर ठेवली आहेत... एकीकडे व्यावहारिक संबंधांच्या प्रेमाच्या, आपुलकीच्या भावना कवितांमध्ये व्यक्त करण्यासाठी वापरले जाणारे झरे आणि चन्द्र! बारकावा लक्षात घेण्याजोगा हे झरे कधी आटतात तर कधी यांना पूर सुद्धा येतो, चन्द्र कलेकलेने वाढत जातो तसाच कलेकलेने तो क्षीण सुद्धा होतो... म्हणजे माणसामाणसामधल्या भावनांना स्थैर्य नसते, त्या वेगवेगळ्या कारणांनी कमीजास्त होतात, हेच जणु कविने "हे झरे चन्द्र सजणांचे" मधून सुचवलंय! त्यांना "सजणांचे" म्हटलं आहे म्हणजे त्या नक्कीच व्यावहारिक प्रीतिच्या खुणा म्हणून सुचवलेल्या आहेत...
तर दुसरीकडे "ही धरती भगवी माया"..... भगवा रंग हा अग्निशिखेचा रंग असल्याने विरक्तिचे, वैराग्याचे, तटस्थ निष्पक्षतेचे प्रतीक आहे... आणि धरती ही सगळ्यांची आई म्हणून सर्वांवर एकसारखीच माया करणारी म्हणून सुचवलेली दिसते.... किंवा धरतीचे एक नाव आहे "क्षमा"... झालंगेलं सर्व विसरून पुनः पूर्ववत् होण्याची क्षमाशील वृत्ति हे धरित्रीचे महत्त्वाचे लक्षण आहे...
कवि एकीकडे चन्द्रझरे तर दुसरीकडे धरती अशा दोन्ही दृष्टिकोणांचा विचार करत जगाकडे, गतकालाकडे पहातो आहे! संध्याकाळी घेतलेला हा दिवसभराचा आढावा आहे! आणि अशा वेळी तो म्हणतो "झाडांशी निजलो आपण, झाडांत पुनः उगवाया!" बी रुजून त्याचं रोप, त्याचा मोठा वृक्ष, वृक्षाची फळे आणि पुनः त्याचे बी... कविने झाडाच्या रूपात हे संसाराच्या, निसर्गाच्या रहाटगाडग्याचं वर्णन केलं आहे. आणि सामान्य व्यक्तिच्या जीवनाबद्दल कवि म्हणतो की आपण आपल्या आयुष्यात कुणातरी झाडाच्या सावलीत वाढलो, स्वतः झाड बनून इतरांना सावली दिली, कितीही मोठं आयुष्य जगलो तरी संपून पुनः नव्या जीवनात जगू लागलो... हा जणु पुनर्जन्माचा, "पुनरपि जननं पुनरपि मरणम्"चा क्रम इथे सुचवलेला दिसत आहे!

9/8/08
Anonymous
आणि इथून पुढे कविच्या विचारांची दिशा एकदम बदलली!
त्या वेळी नाजुक भोळ्या, वार्‍याला हसवुन पळती
क्षितिजांचे तोरण घेउन दारावर आली भरती
तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनि गेला
सीतेच्या वनवासातिल जणु राघव शेला
आधी वर्णन केलेल्या वैचारिक उद्वेलनाच्या नाजुक मनःस्थितिमध्ये असताना कविला "तो नाजुक बोल" स्पर्श करून गेला. हा बोल स्वतःच्या विवेकपूर्ण विचारमंथनातून झालेल्या चिरंतन सत्याच्या साक्षात्काराचा असू शकतो किंवा कुणा आध्यात्मिक मार्गदर्शकाचा असू शकतो! पण त्या घटनेने मनात भिरभिरणार्‍या भावभावनांच्या वार्‍याला सहज उडवून लावले, हसतहसत पळवून लावले... म्हणजे जगाशी असलेल्या भावनात्मक संबंधांमुळे मनात निर्माण झालेली सर्व आंदोलने संपली!
सामन्यतः तोरण हे घराच्या दाराला बांधतात, पण या मनःस्थितिमध्ये कवि क्षितिजाला तोरण बांधू पहात आहे! ही माऊलींच्या "हे विश्वचि माझे घर"शी जवळीक साधणारी अवस्था नाही का!!
जीवनाच्या सत्याचे असे उद्घाटन करणारा "तो बोल" कविला वनवासातल्या सीतेला आधार देणार्‍या रामस्मरणरूपी शेल्यासारखा वाटतो.... इथे रामायणाचा उल्लेख करताना कविने थोडे स्वातन्त्र्य घेतलेले दिसते... सर्वप्रथम सीतेच्या शोधात लंकेत गेले असताना हनुमंतांनी परिचयाची खूण म्हणून प्रभु रामाची अंगठी सीतामाईला दिली होती... पुढे अशोकवनातील उरलेल्या नास्तव्यात ती अंगठी सीतेला "हो, तुला श्रीराम इथून मुक्त करणार आहे" अशी जणु आधाराची ग्वाही देत गेली.... या प्रसंगाचा संदर्भ घेत बहुधा कविने अंगठीऐवजी कवितेच्या ओघात शेला उल्लेखिलेला वाटतो!
म्हणजे आयुष्याला स्पर्श करून जाणारा तो अनुभवी बोल संसारचक्राच्या बंधनातून मुक्तिची ग्वाही देणाराच होता!

9/8/08
Anonymous
पुढच्या ओळी फारच सांकेतिक असल्याचे दिसते...
देउळ पलीकडे तरिही, तुज ओंजळ, फुटला खांब
थरथरत्या बुबुळापाशी, मी उरलासुरला थेंब
आयुष्याच्या म्हणा किंवा मन:स्थितिच्या म्हणा, संध्यासमयी ईश्वराचे स्मरण करताना व्यावहारिक जीवनात त्या देवाचे प्रतीक म्हणून 'दाखवले गेलेले देऊळ दिसले म्हणून त्याला श्रद्धेची ओंजळ वाहण्याचा भाव मनात आला तर "फुटल्या खांबा"तून प्रकट झालेल्या नरसिंहाप्रमाणे तो परमात्मा चराचरात सर्वत्र आहे या जाणिवेने हात आणि नजर थरथरली (तो खांब जीर्णशीर्ण "फुटका" नसून जणु प्राकट्याच्या स्फोटाने "फुटला" आहे!) ..... ही श्रद्धा व्यक्त करण्यासाठी आता प्रतीकांची काय गरज? "क्षितिजावर तोरण" बांधत असताना मनाच्या दारावर आलेल्या सर्वव्यापकतेच्या जाणीवेच्या भरतीचा उरलासुरला थेंब म्हणूनच स्वतःचं अस्तित्व मानता येईल.... अद्वैत एकत्वाच्या त्या अनुभवाशी तादात्म्य साधताना शिल्लक राहिलेली सीमित "स्व"ची पुसट जाणीव हाच तो उरलासुरला थेंब दिसतो!!
आणि हा एकरूपतेचा कृतकृत्य क्षण कविने असा व्यक्त केला आहे...
संध्येतिल कमलफुलासम मी नटलो शृंगाराने
देहाच्या भवती रिंगण घालती निळाइत राने...
काव्यप्रतिमांच्या संकेतानुसार दिवसाच्या सूर्यप्रकाशात लाल कमलपुष्पे (सूर्यकमल) फुलतात तर रात्रीच्या चांदण्यात नील व श्वेत कमलपुष्पे (चन्द्रकमल) फुलतात.... आता अनुभवाच्या या पातळीवर कविच्या अस्तित्वाचा शृंगार प्रफुल्लित चन्द्रकमलाप्रमाणे नटला आहे (पुढे "चांदणे तुझ्या स्मरणाचे" आले आहे!). योगमार्गात स्वतःच्या चेतनेची जाणीव निम्न पातळीवर असताना लाल, केशरी, पिवळ्या रंगांच्या कमलपुष्पासारखी तर उच्च पातळीवर होताना नील व श्वेत वर्णाच्या कमलपुष्पासारखी असल्याचे अनुभवगम्य आहे!
देहाचे भान हरपत चालले आहे, भोवताली आता असीम आकाशाची निळाई पसरत चालल्याची जाणीव आहे!

9/8/08
Anonymous
अशा वैचारिक पातळीवर सहज मनात येत की हे देवा,
स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दु:ख कुणाचे
स्वतःच्या अस्तित्वाला केवळ शरीराच्या सीमित पातळीवर मानून इंद्रियांच्या माध्यमातून होणार्‍या जाणीवेलाच खरं मानलं तर तिथे फक्त दु:खच जाणवते आणि अशी इंद्रिये देवासमोर सुद्धा दु:खाचं गार्‍हाणंच सांगत राहतात! पण शरीरनिरपेक्ष असीम अस्तित्वाच्या अनुभवाच्या स्तरावर
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे!
परमात्म्याशी एकत्वाचा परिपूर्ण बोध झाल्यावर शरीराची जी काही किंचित जाणीव उरली (उरलासुरला थेंब), त्यात केवळ त्याच्या स्मरणाचं मंद स्निग्ध चांदणं शीतलता देत रहातं!
या सर्व वैचारिक परिवर्तनाचा समारोप करताना कवि म्हणतो
ते धुके अवेळी होतो, की परतायाची घाई
मेंदूतुन ढळाली माझ्या निष्पर्ण तरूंची राई
सगळ्याचा पुनर्विचार करताना एक मार्मिक प्रश्न समोर येतो.... हा सगळा विरक्त विचार कसल्या तरी तात्कालिक कारणातून उद्भवलेलं स्मशानवैराग्य आहे की आता खरोखरच "आम्ही जातो अमुच्या गावा"चेच वेध लागल्याचा परिणाम आहे?
आणि या प्रश्नावर विचार करताना कविला शेवटची जाणीव होते की झाडांवरच्या सुकल्या पानांप्रमाणे मेंदूतून सर्व विचार गळून पडले, सर्व चित्तवृत्ति निमाल्या! चित्तवृत्तिंचा असा सर्वथा निरास म्हणजेच "समाधि"!
शेवटच्या ओळीत कविने जणु तोच अनुभव सुचवला आहे!
9/8/08

धन्यवाद सर्वानां....
@ डॉ.कैलास गायकवाड => उत्तम रसग्रहण केलयं आपण. मला माझे शालेय दिवस आठवले (मराठी च्या पेपर मधे कवितेचं रसग्रहण असायचं, असो.....) धन्यवाद...
@इब्लि@, << ते गाणे ऐकताना जे उरी उमटते, जे दाटून येते, तो याचा अर्थ..>>
एकदम सहमत.
मला शेवटाची कड्वी ऐकून नेहमी आतून दाटून येतं....
----स्तोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख कुणाचे
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे

ही कविता वाचुन मला असे वाटते. हे या कवितेमागची मला वाटणारे भाव आहेत. याला रसग्रहण म्हणाता येइल का ते महित नाही:

>>भय इथले संपत नाही...मज तुझी आठवण येते...
>>मी संध्याकाळी गातो...तू मला शिकविली गीते...

आज या कातरवेळी मला अनामिक भीती वाटते आहे. (येथे सोबत कुणीही नाही) मला तुझी आठवण येते आहे. तू आज माझ्या जवळ नाहीस पण तू शिकवलेल्या गीतांच्या सहवासात, तू सोबत असल्यासारखे वाटून कदाचित माझे भय दूर होईल.

>>हे झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया
>>झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया

हे झरे, हा चंद्र आणि लालीमा पसरलेल्या आकाशात गुरफटलेली धरा मला तुझी आठवण करून देत आहेत. तू जशी राख होऊन झाडांन मध्ये विखुरलीस तसा मी पण लयास जाईन पुन्हा या जगात यायला. (**दोन ओळी स्वतंत्र वाटताहेत पण त्या तश्या नसाव्यात. त्यातला संबंध लक्षात येत नाही आहे**).

>>त्या वेळी नाजूक भोळ्या, वारयाला हसवून पळती
>>क्षितीजांचे तोरण घेऊन, दारावर आली भरती
या सांजवेळी हा गुदगुल्या करणारा वारा आज स्वतःच हसतो आहे असे वाटते (तुझ्या आठवणीने मन प्रफुल्लीत झाल्यामुळे चोहुकडे आनंदमय वाटते आहे.) वितळणार्या सूर्याचा रसरशीत रंग लेऊन ही समुद्राची भरती जणू आकाशच घेऊन आली आहे.
>>तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
>>सीतेच्या वनवासातील जणू राघव शेला

मैथिलीला श्रीरामाच्या शेल्याच्या नुसत्या स्पर्शानेदेखील ज्याप्रमाणे वनवासाचा विसर पडावा त्या प्रमाणे तुझ्या हळव्या आठवणी माझ्या रुक्ष आयुष्यात हिरवळ आणतात.

>>देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ फुटला खांब
>>थरथरत्या बुबूळापाशी, मी उरला सुरला थेंब

आयुष्याचा संपूर्ण टप्पा न गाठता तू मधेच अशी निघून गेलीस (देऊळ म्हणजे वार्धक्य जेथे आपल्या कर्माचे, आयुष्याच्या फळाचे अर्घ्य ओंजळीतून वाहून स्वाः म्हणत स्वतःला मोकळे करायचे असते तसे न करता ते देऊळ यायच्या आधीच तुझ्या ओंजळीने अर्घ्य वाहून टाकले). तुझ्यावीण मी एकटा आणि हळवा झालो आहे.
>>संध्येतील कमल फ़ुलासम, मी नटलो श्रृंगाराने
>>देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने

(परंतु) तुझ्या आठवणींनी मला आज तृप्त केले आहे. सायंकाळी फुलून येणार्या कमळासारखा मी पण फुललो आहे. या निशेच्या निळ्या शाईत माखलेली वनराई हळू हळू माझा देह लपेटून घेते आहे.

>>स्त्रोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख्ख कुणाचे
>>हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे

जरी समाधानी मी आज तुझ्या आठवणीत तरी माझे गात्रन्गात्र तुझ्यासाठी झुरते आहे (ते फक्त तुझाच जप करतात). तुझ्या आठवणी जरी शीतल असल्या तरी तुझी कमतरता सतत जाणवते आहे. (तुझ्या शिवाय हे आयुष्य म्हणजे एक काळी रात्र आणि तुझ्या आठवणी म्हणजे शीतल, चमचमत्या चांदण्या. ही रात्र सरता सरत नाही आहे).

>>ते धुके अवेळी होते, की परतायची घाई
>>मेंदुतून ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई

कातरवेळी वाटणाऱ्या हुरहुरीचे ते क्षणभंगुर धुके होते की माझ्या रमलेल्या जीवाला आयुष्याचे (दैनंदिन कामाचे) वेध लागले आहे? पण जी भीती मला वाटत होती ती (तुझ्या आठवणींमुळे) कुठेशी पळून गेली आहे. त्या भकास निष्पर्ण झाडांचे भेडसावणे आता थांबले आहे.

मला ही कविता म्हणजे एक विरह गीत जाणवते...त्यात वेडं प्रेम जाणवतं. वरिल आणि इतर रस ग्रहणात गॅप आहेत .. बर्‍याचदा एक कडवं/ओळ आणि त्या नंतरच्या कडव्यात/ओळीत कवि ट्रॅक चेंज करतो असं लिहीलं आहे. पण ही एक कविता आहे, गझल नाही. कविता स्फुरताना असं होत नाही. कविता पहील्या ओळी पासुन शेवटच्या ओळी पर्यंत एक विचार उलघडत जाते.. त्यात भावनेचा ओघ असतो, त्या प्रत्येक कडव्यात प्रत्येक ओळीत भावनेची गुंफण असते. एका ओळी मागे किती मोठी कहाणी असते हे कवीच सांगु शकतो. प्रचंड एकवटलेल्या भावनांनी एक ओळ स्फुरते, ती तुमच्या पर्यंत पोहचली तर ठीक, नाहीतर ती निर्बोध होते. अशा एकवटलेल्या भावना उलगडुन सांगणं कवीला जड जातं, जे म्हणायच आहे ते पुर्ण एकाच वेळी सांगता येईल हे सांगता येणे अवघड. आणि येवढं उलगडुन सांगायचं होत तर मग कविता कशाला लिहीली असती? Happy
कवि जे लिहितो ते त्याच्या अनुभवातुन, ती त्याची अनुभुती ती वाचकाच्या अनुभवाशी जुळेल का? आणि नाही जुळली तर तिची गोडी कमी होईल. जसं "गोड आवडतं" म्हंटल की तुम्हाला साखर सुचेल, कुणाला बासुंदी, तर कुणाला जिलेबी, इथे सगळेच गोड आवडणारे एकमत होतात, तरी प्रत्येकाच्या संकल्पना वेगळ्या, पण "जिलेबी हे गोड आवडत" म्हटल की बाकी तुटले. म्हणुन कविने कविता उलगडुन सांगु नये म्हणतात ते ह्याच साठी.. मग ती काहीं साठी निर्बोध ठरते तर काहीं साठी अर्थपुर्ण पण मग तित अनुभुती नाही. ती कविता वाचणार्‍याची होत नाही ती कविचीच रहाते. जी ओळ अनुभुती देते ती कविता आणि जे अर्थ स्पष्ट करते ते गद्य... अस मला वाटतं. पण ज्यांना अनुभुती मिळत नाही आणि जेंव्हा इतर शहाणे त्यांना हेटाळतात तेंव्हा लोक कविते पासुन दुर जातात. म्हणुनच बरेच लोक मला कवितेतल काही कळत नाही, कविता माझा प्रांत नाही, म्हणत कविते पासुन दुर जातात, अशा साठी कविता दुसर्‍यांनी उलगडुन सांगण गरजेच असत. किंवा कविने हिंट देणं गरजेचं आहे. पण जो तो आपल्या अनुभवाने समृद्ध असतो, माझा अनुभव तुम्हाला द्यावा कसा? त्यात अध्यात्म हे असं आहे की ते सगळी कडे फिट होतं, पण अध्यात्म सगळ्यांन झेपत नाही आणि रुचतही नाही. आकाशा कडे बोट दाखवलं तरी अध्यात्म जमिनी कडे बोट दाखवलं तरी अध्यात्म.. जो देवाशी एकरुप झाला त्याला चोहीकडे तोच दिसतो. पण तो आम्हाला कसा दिसावा? .. तसंच कवितेच.. पण तरी काही ठिकाणी उलगडुन सांगणं गरजेच.. आपला आनंद शेअर करावा.. Happy तोच मीही करतो आहे..

ही ग्रेसची कविता एका प्रियकराच मनोगत आहे... हे एक विरह गीत आहे. ज्यांना काहीच अनुभुती मिळाली नाही त्यांच्या साठी मी माझी अनुभुती प्रकट करण्याचा प्रयत्न करतो, कदाचीत इतर कविता वाचताना त्यांना अनुभुती कशी घ्यावी हे कळेल... Happy

भय इथले संपत नाही...मज तुझी आठवण येते...
मी संध्याकाळी गातो...तू मला शिकविली गीते...

किती काळ लोटून गेला, किती वर्ष उलटुन गेली तरी तुझी आठवण आली की श्वासांचा वेग वाढतो, काळिज धडधडु लागत. माझ्या मनातल कुणाला कळेल का याची भीती वाटू लागते. ते क्षण डोळ्या समोर तसेच उभे रहातात. अजुन किती वर्ष मी हे ओझं घेउन जगायचं? आणि तू आताही समोर आलीस तर... छे.. भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते.

किती संध्याकाळी आपण एकत्र घालवल्या. दिवस रेटारेटीत निघुन जातो पण सांज उतरलीकी त्या सार्‍या आठवणी सध्याकाळी एकवटतात. प्रेमाच खरा अर्थ तुच तर मला शिकवलास, तु नेहमी म्हणायचीस, प्रेम हे बंदीशी सारख आहे, एकदा का ती बंदिश आपण आळवू लागलो की मग कुणाच भान रहात नाही. गात रहावं आणि भान विसरुन एकरुप व्हाव. जे आळवलं ते प्रेम कसलं, जे एकरुप होऊन आळवलं जातं तेच प्रेम.. तेच तुझे शब्द मनात रेंगाळत रहातात एखाद्या बंदीशी प्रमाणे. मी संध्याकाळी गातो...तू मला शिकविली गीते...

हे झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया

हा चंद्र म्हणजे तुच ना.. हे चांदण तुझा झरा होउन वाहतं आहे आणि हे तुझ्या जाणिवांचं स्नान मला घालतं आहे. ही माझ्या आजुबाजूची धरती, हे जग ही सारी माया आहे. तू सत्य आहेस, तू शास्वत आहेस... माझं जगण ही जगणं नसुन एक विरक्ती आहे. तू माझं सर्वस्व आहेस ....हे झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया

तुला आठवतंय किती तास झाडा खाली हातात हात गुंतवुन बसायचो, किती स्वप्न रंगावायचो. कधी मी तुझ्या मांडीवर डोकं ठेउन निजायचो तर कधी तू माझ्या, कधी डोळे मिटले जायचे, कधी मिठी विरघळायची, कधी अधरांना अधर मिळायचे..मग जाणवायची ती फक्त स्पंदन... मग तिही एकरुप होत विरघळून जायची. जगाच भान आणि स्वत:ची जाणिवच नाहीशी व्हायची, जशी योग्याची योग निद्राच.. असा किती वेळ निघुन जायचा कुणास ठाऊक पण भानावर येताच.. हाताच्या मुठी पुन्हा घट्ट व्हायच्या... विलगण्या साठी. उद्या पुन्हा इथेच भेटायचं वचन देत आपण पुन्हा मिठीत विरघळुन जायचो, नुसतं शरिराने वेगळं व्हायला.. झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया

त्या वेली नाजुक भोळ्या, वार्‍याला हसवून पळती
क्षितिजांचे तोरण घेउन, दारावर आली भरती

किती भोळे होतो आपण, सारी स्वप्नं खरी होतील असं वाटायच ना आपल्याला. हे जग आहे, त्याच्या प्रथा आहेत, त्या प्रथांची कुंपणं आहेत ह्याची जाणिवच नव्हती... ते क्षण नाजुक होते खरे पण ते नाजुक का ते आत्ता कळत आहे, लोकं नाजुक वय का म्हणायचे तेही आत्ता कळतय, त्या नाजुक वयातिल घाव खोल होतात हेच खरं.. . मन अस वार्‍या सारखं सैरभैर किंवा वार्‍या पेक्षाही चंचल की वार्‍यचीही खोडी काढुन पळुन जाता येईल इतकं चंचल, पण तितकच भोळं.. त्या वेली नाजुक भोळ्या, वार्‍याला हसवून पळती

तारूण्यांचा जोश असा की क्षितीजं ही पदाक्रांत कराता येतिल असा विश्वास, आणि त्यातच हे वेडं वय प्रेमाची जाणिव घेउन येत. भरतीच पाणी जसं किनारे व्यापत खोलवर शिरतं तसच हे प्रेम तारुण्याच्या दारावर भरती होऊन येत आणि अयुष्य व्यापुन जातं.. क्षितिजांचे तोरण घेउन, दारावर आली भरती

तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातिल जणू अंगी राघव शेला

"माझं तुझ्यावर प्रेम आहे..." येवढ हे हळवं वाक्य सारं अयुष्य व्यापुन गेलं. "जे कधीच संपणार नाही, जे कधीच सरणार नाही अस आपलं प्रेम..सार्‍या जगाशी भांडुन, कुणाची पर्वा न करता मी तुझा/तुझी होईन" हे वचन त्या चार शब्दात होत. आता सारं सारं तू होतिस, श्वासातिल वारं तू होतिस....तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला

पण तेंव्हा समाजची भीती होती, रुढी आड येणार ह्याची कुठे ना कुठे जाणिव होतिच. परिस्थिती मुळे प्रभुरामा पासुन विलगलेल्या सितेला प्रभूरामांचा शेला हा विश्वास देत होता की , "राम येणार, सार्‍या विपदा पार करुन येणार, समुद्र लांधुन येणार, सार्‍या अडचणींवर मात करत येणार.. फक्त माझ्या साठी, आमच्या प्रेमासाठी.. राम येणार... याच विश्वासाने प्रभुरामाचा शेला तिने पांघरुन घेतला असेल, त्यात रामाच्या प्रेमाची उब तिला मिळाली असेल.. तसेच तुझे शब्द ... सीतेच्या वनवासातिल जणू अंगी राघव शेला

देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबुळापाशी, मी उरला सुरला थेंब

जसं भाविकांस देवाच दर्शन होण्या पुर्वी देऊळ दिसत असतं, तेच त्याच ध्येय असतं. त्याला विश्वास असतो की देउळ गाठलं की देव हा भेटणारच. तस प्रत्येक प्रेम करणार्‍याच लग्न हे ध्येय असतं एक मंदिर असतं जेथे प्रेमाची पुर्ती होणार असते. ह्या मंदिराची वाट किती खडतर असली तरी एकमेकांच्या साथीने मंदिर गाठुच येवढा दृढ निश्चय होता पण आपण मंदिर गाठण्या पुर्वीच खांब फोडुन आलेल्या दानवाला तू देव समजुन बसलिस तो नृसिंह नाही गं, तो तुझा देव नाही तु जेथे जातेस ते तुझे देऊळ नाही.... देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ फुटला खांब

तुझ्या ओंझळीत जे आहे तो देव नाही हे तुला ही माहीत आहे, तुझे कावरेबावरे डोळे, आक्रोश करते अश्रू मला सांगत आहेत की तू माझी आहेस आणि मी तुझा... हा आक्रोश, हा आवेग, हे तुफान परिस्थिती पुढे इतक हतबल झालं आहे की मी तुझ्या पापणी वरला एक उरला सुरला थेंब होउन राहीलो आहे. एकदा का तो पापणीवरुन घरंगळला की त्याचं त्या डोळ्यांशी काही नातं नाही, तो उरतो फक्त पाणी होऊन.. थरथरत्या बुबुळापाशी, मी उरला सुरला थेंब

संध्येतील कमल फुलासम, मी नटलो शृंगाराने
देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने
तू नाहीस... तू माझी नाहीस म्हणजे मीही नाही. मला अस्थित्वच नाही. झाडापासुन विलगलेलं फुल, पाण्या पासुन विलगलेलं कमळ आता फक्त देवावर वाहण्या पुरतं उरतं आणि मग निर्माल्य होतं, मी तर संध्येच्या पुजेतल कमळ त्याच निर्माल्य होण्यास आता कितीसा वेळ, तरीही मी शृंगार केला आहे कुणाच्या चरणी वाहण्यासाठी... संध्येतील कमल फुलासम, मी नटलो शृंगाराने

काय करणार? जगावं तर लागलच, मी ही लग्नाच्या बेडित अडकलो, मीही कुणाचा झालो.. पण फक्त देहाने.. मी मनाने तुझा होतो आणि तुझाच आहे. हे भोग, हा आनंद फक्त देहा पुरता, ह्या जाणिवा ही फक्त देहा पुरत्याच... देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने

स्तोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख कुणाचे
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे

लग्न झालं, मुल झाली, संसार सुखात आहे.. पण ही पंचेंद्रीये आजुन तुझ्या जाणिवा कुरवाळत आहेत, तुझा स्पर्श, तुझा गंध, तुझ रुप, तुझ्या अधरांची चव, तुझा आवाज अजुनही ह्या इंद्रीयांत तसाच जिवंत आहे. छान गाणं संपल तरी मन ते गुणगुणत रहातं तशी माझी इंद्रिय तुझी संवेदना गुणगुणत आहेत तरीही दु:ख आहेच... स्तोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख कुणाचे

मी काही केल्या तुला विसरु शकत नाही... हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे

ते धुके अवेळी होते, की परतायची घाई
मेंदूतुन ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई

माझी कर्तव्यं मी पार पाडली आहेत, आता वाटतंय की पुरे झालं हे आता जिवन. पुन्हा एकदा जन्म घ्यावा आणि तुझं होऊन जावं. बस झालं ना.. आता लवकर लवकर हे अयुष्य संपू दे, पुढल्या जन्मी मी तुझा होईन, तु माझी होशील.. हे खरच होईल? का कुणास ठाउक, सारं धुसर आहे.. पण मला परातायची घाई लागली आहे मला विश्वास आहे तू मला भेटशील, हे अवेळी असेल कदाचीत.. पण मला परतु दे..
ते धुके अवेळी होते, की परतायची घाई

हे जिवन हे एक जंगल आहे, भरपुर झाडं आहेत इथे, पण तुझ्याविना ती सारी निष्पर्ण आहेत. तू नाही तर वंसत नाही फक्त आहे ती पानझड... मेंदूतुन ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई

पुढल्या जन्मी आपण पुन्हा एकमेंकांचे होऊ कधीच न विलगण्या साठी..

भय इथले संपत नाही...मज तुझी आठवण येते...
मी संध्याकाळी गातो...तू मला शिकविली गीते...

-- ग्रेस

अपनी अनुभुती अपने पास.. नंथींग व्रॉंग इन इट.. हॅप्पी कविता रिडींग..!!!
-सत्यजित.

धन्यवाद सांजसंध्या आणि डॉ कैलास गायकवाड..

आपण दोघांनी ऑर्कूटवरची ही चर्चा इथे शेअर केलीत. स्वामीजी मायबोलीचे सदस्य आहेत... पण सक्रिय नाहीत असं दिसतंय. त्यांनी त्यांच्या दृष्टीकोणातून केलेले रसग्रहण आणि प्रतिमांचे तर्कदुष्ट विश्लेषण केवळ थक्क करणारे आहे.

चांगली चर्चा....

@मंदार , पिंट्या
आज अचानक ही कविता वर आलेली दिसली म्हणून आठवलं..
प्रतिसाद दिल्यानंतर माबोवर येणंच झालं नाही... असं काही लिहीलं होतं हेच लक्षात राहीलं नाही. सॉरी.. पण स्वामीजींची परवानगी घेतली नसल्यानं कॉपी पेस्ट केलं नाही..

एखाद्या कवीला समजून घेताना तो कुठल्या प्रतिमा कशा पद्धतीने वापरतो हे त्याच्या समग्र साहीत्याचा अभ्यास केल्याशिवाय सांगणं अतिशय अवघड आहे. कवीने हाच अर्थ सांगितलाय हे म्हणणंही योग्य ठरत नाही. विंदांच्या वेडी या कवितेचं मंगेश पाडगावकरांनी केलेलं रसग्रहण हे एका प्रतिभावंत कवीला जवळून ओळखणा-या दुस-या प्रतिभावंत कवीने केलेल्या रसग्रहणाचा उत्तम नमुना आहे. विंदांनी केलेला प्रतिमांचा वापर पाडगावकरांना सहज उलगडंत आला. विंदांनी बापटांच्या कवितेवर भरभरून लिहीताना त्यांच्या कवितांची शक्तिस्थळं, उणिवा आणि प्रतिमा याबद्दल नेमकं लिहीलं. कवीला जवळून ओळखता येण्याचा हा फायदा आहे. त्याचं व्यक्तिमत्व कवितेत प्रकट होत असल्याने जवळच्या कवीमित्राने केलेली समिक्षा हे महत्वाचं ठरतं

पण हे सगळ्यांना शक्य नाही. अशा वेळी प्रतिमा उलगडून पाहताना आपल्याला काय वाटतं महत्वाचं. रसग्रहण म्हणजे अर्थ सांगणे नाही. कवितेतला रस रसिक कसा ग्रहण करतो ते सांगणे.

ग्रेस यांच्या कवितेचं रसग्रहण करताना काही सौंदर्य स्थळांचा उल्लेख इथं करावासा वाटतो. विलक्षण गेयता आणि शब्दरचना हे त्यांच्या कवितांचं वैशिष्ट्य मंत्रमुग्ध करून टाकतं. दुर्बोधतेवर मात करणा-या या गुणांमुळे आपण त्या कवितेला बाजूला सारूच शकत नाही..

ग्रेसजींच्या कवितांमधून दिसणारे दु:ख काय आहे हे माहीत झाल्यावर या सगळ्या प्रतिमांचे अर्थ समजणे अवघड नाही..

स्वामीजींनी प्रतिमांचा उलगडून सांगितलेला अध्यात्मिक अर्थ आणि त्या अर्थाने केलेलं विश्लेषण हे खूप काही शिकवून जाणारं आहे. याच पद्धतीने इतरांना नव्या कोनातून या कवितेकडे पाहता येईल.

>>झाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवाया>>
>>हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे >>

आपल्या बोलण्यात येणारे नेहेमीचे शब्द, त्यांची रचना एका विशिष्ट प्रकारे केल्याने इतका सखोल परिणाम कसा काय साधला जातो. ग्रेस यांच्या अशा ओळी वाचल्यानंतर नेहेमी हा प्रश्न पडतो.

चांदणे तुझ्या स्मरणाचे .. वा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते

संध्याछायेचं भय आता दाटून राहीलं आहे. आयुष्याच्या या संध्याकाळी तुझ्या आठवणी, तुझी शिकवण हेच आता उरलं आहे.

हे झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया

झरा हा मुक्त स्त्रोत आहे. चंद्र हे प्रियकर किंवा प्रेमाचे प्रतिक असावे. भगवा रंग हा संन्यस्ताचा तर माया म्हणजे मोह. धरती अशी विरक्त संन्यासिनी आहे जिच्यामधे प्रेम, आसक्तीचे झरे वाहतात. त्यातूनच जन्माचं रहाटगाडगं चालू राहतं झाड हे जीवन आहे तसच झाड हे देहालाही म्हटलं जातं.

झाडातूनच झाड जन्म घेतं आणि ते जमिनीतून उगवतं .. ही पुनरूत्पादनाची प्रक्रियाच. जमिनीचा रोल हा अगदी तटस्थपणे त्या झाडाला जन्म देण्याचा आहे आणि लगेचच त्याबद्दल त्रयस्थ होण्याचा आणि तरीही धरून ठेवण्याचा आहे. कदाचित माझा जन्मही असाच.. असं कवीला सुचवायचं आहे असं वाटतंय इथं. जन्मदात्री कदाचित जन्म देऊन धरतीप्रमाणे कवीच्या बाबतीत विरक्त झाली असं काहीतरी म्हणायचं आहे असं वाटतं..

त्या वेळी नाजुक भोळ्या, वार्‍याला हसवून पळती
क्षितिजांचे तोरण घेउन, दारावर आली भरती

वारा हे लबाड मनुष्याचं प्रतिक म्हणून ग्रेस यांनी एका कवितेत वापरलं आहे. इथं नाजूक भोळा वारा अर्थात लहान बाळ जसं लबाडपणे हसतं तसा अर्थ असावा. बाळाच्या जन्माच्या वेळी क्षितिजांचे तोरण घेऊन, दारावर आली भरती असंच काहीसं होत असतं ना ? इथं क्षितज हे अमर्याद शक्यतांचं तर भरती हे आनंदाच्या भरतीचं प्रतिक आहे हे सांगायला नकोच..

तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातिल जणू राघव शेला

त्या वेळचा तुझा हळुवार, प्रेमाचा, ओलेता स्पर्श, बोल आयुष्य भरून व्यापला. कदाचित तितकंच नशिबात असाव. तीच आठवण राहीली आता. ते बालपण आता कसं आठवतं हे काव्यात सांगताना पुढची समर्पक ओळ येते.. सीतेच्या वनवासातिल जणू राघव शेला !!!! क्या बात है
सध्या इतकंच..


देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबुळापाशी, मी उरला सुरला थेंब


संध्येतील कमल फुलासम, मी नटलो शृंगाराने
देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने


स्तोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख कुणाचे
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे

ते धुके अवेळी होते, की परतायची घाई
मेंदूतुन ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई

च्च्च
मैत्रेयी,
का शिणवतेस मेंदू?
अनुभूती घे ना?
उग्गा शब्दातून अर्थ शोधायलाच हवा का? परिक्षेत येणारे का?
बाकी ग्रेस वाचला आहेस का? असो.

ज्या कवितेच्या वाचनाने मेंदूच्या जाणीवा जाग्या होतात त्याचा अर्थ आपला आपण लावायचा असतो कुणाला ही कविता प्रेयसीसाठी लिहिलेली वाटेल कुणाला ईश्वराच्या जवळ नेणारी .......कवितेच्या अश्या वाटण्यात त्या कवीचे मोठेपण आहे आज ते आपल्यात नाहीत पण ते नेहमीच आपल्यात असतील याची काळजी घेऊन ते खरच दूर निघून गेले......

भय इथले संपत नाही या कवितेचा अर्थ शोधण्याचा ऑर्कुट समूहावर मी एक प्रयत्न केला होता.

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली गीते

या ठिकाणी भय म्हणजे हुरहूर असावी. एकटेपणाची जाणीव असावी. ज्यामुळे व्यक्त होण्यासाठी हक्काचे असणारे जे माणूस होते त्याची आठवण येते. ग्रेस किंवा आरती प्रभू यांच्या कवितेत संध्याकाळ म्हणजे कातरवेळ. आयुष्याची उतरण चालू झालेली असताना घराच्या अंगणात त्यांची कविता खुलते. आता सारं संपत आल्याची जाणीव. मग लेखाजोखा. हे सुचवणारी ही ओळ. आयुष्यभर जे शिकवलं त्याची उजळणी म्हणजे शिकवलेली गाणी. गुरूने गाणं एकदा शिकवलं की आयुष्यभर आपण ते त्या पद्धतीने म्हणतो. तसंच आयुष्याचं गाणं ज्या गुरूने शिकवलं त्याची आता आठवण येते.

ते झरे चंद्रसजणांचे ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण झाडांत पुन्हा उगवाया

ग्रेस झ-याची उपमा अनामिक दाता, देऊन जाणारा या अर्थाने करतात. घेणा-याच्या ओंजळीला झ-याचे पाणी असते. चंद्रासारख्या शीतल साजन दाता आहे आणि तो धरतीला देणं देतो जिचे बाह्यरूप मोहवणारे आहे, पण ती स्वत: मनाने विरक्त आहे. किंवा तिला विरक्तीची आसक्ती आहे. अशी ती प्रेयसी आणि तिचा प्रियकर. झाड म्हणजे देह. देह देहाशी रमला, पुन्हा त्यातून देह जन्मला. जन्मतो तो देह, ते कर्तव्य पार पाडून देहाचा मालक असलेला तो/ती कुणी तरी आता यातून बाजूला होऊ पाहतोय.

तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणु अंगी राघव शेला

हे कडवे खूप स्पष्ट आहे. ज्या कुणाच्या विरक्तीबद्दल कवी इथे सांगतो, त्याचं कवीच्या आयुष्यातलं महत्त्व अनन्यसाधारण आहे. कदाचित कवीला त्या व्यक्तीचा सहवास पूर्णपणे मिळालेला नाही. त्या गुरूपासून, प्रिय व्यक्तीपासून विरह सहन करावा लागला आहे. पण जो काही सहवास लाभला त्या वेळचे हळवे बोल असे लक्षात आहेत जसे वनवासातल्या सीतेसाठी रामाचा शेला . त्या आधारे वनवास पार पडेल ही आशा.

स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे
हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे

कवीचे तेच दु:ख असावे. ते आतमधे भिनले आहे. रक्तात भिनलेले आहे. बाह्य जगाला ते ठाऊक नाही. वरकरणी कवी करायची सर्व जगरहाटी पार पाडतो हे दाखवण्यासाठी स्तोत्रांची योजना केली आहे. स्तोत्रं म्हणत असताना रंध्रारंध्रातून वेदना उमटते, सर्व ज्ञानेंद्रिये त्या दु:खाला स्पर्शतात, पाहतात, ऐकतात. स्तोत्र वरकरणी म्हणत असताना इंद्रिये दुंखं गुणगुणतात. असं हे स्मरणरंजन सरता सरत नाही. ते स्मरण तुझे म्हणजे कवितेतल्या त्या प्रिय व्यक्तीचे आहे. ती व्यक्ती आता कवीच्या आयुष्यात नाही हे दुंख आहे आणि आठवण कधीही पिच्छा सोडत नाही.

आज हा अर्थ वाचताना एक गोष्ट जाणवली की ग्रेस यांनी ही कविता कुठल्या हेतूने लिहीली असावी याचा विचार करून मी तेव्हां लिहीले होते जे चूक आहे. ही कविता वाचत असताना त्यातल्या प्रतिमांमुळे माझ्या मनात कोणते चित्र उमटते हे लिहायला हवे. माझ्या अनुभवविश्वाला ही कविता कशी दिसते हे वाचक म्हणून महत्वाचे असले पाहीजे. कवीला काय वाटते हे कळण्यासाठी कवी एखादी प्रतिमा कशा पद्धतीने वापरतो याचा वर्षानुवर्षाचा अभ्यास असायला हवा. एक दोन कवितेंमधे कवी कधीच उलगडत नाही.

कविवर्य ग्रेस म्हणतात " मी एक प्राचीन काव्य पुरुष आहे ."I am an ancient man belonging to your modern time."त्यामुळे एकाच वेळेला प्राचीन सभ्यता आणि प्राचीन अविष्कार शैली यांचा मिलाफ आधुनिक काव्यशैलीशी झाला आहे 'भय इथले संपत नाही' .या कवितेत आईचा उल्लेख कोठेच नाही परंतु पूर्ण कविता व त्यातील संदर्भ समजल्यावर हे स्पष्ट होते की कवितेचा संबंध प्रेयसीशी नसून आईशी आहे. या कवितेत कवीचा कल अध्यात्माकडे वळलेला वाटतो.या कवितेत आदिकवी वाल्मिकी डोकावलेले आहेत.
"भय इथले संपत नाही...मज तुझी आठवण येते...
मी संध्याकाळी गातो...तू मला शिकविली गीते...
ते झरे चंद्र सजणांचे, ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया
तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू राघव शेला
स्त्रोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख्ख कुणाचे
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे"
भय हा कवीचा ,किबहुना जागाच स्थायी भाव आहे. जगातील दैनंदिन घटनांमुळे उत्पन्न होणारे निरंतर भय संपत नाही परंतु संध्याकाळच्या शांत वातावरणात आईने त्यास बालपणात शिकवलेली गीते गायल्यानंतर त्याला मनःशांती लाभते.बालपणी आई बरोबर वनात घालवलेली एक दुपार व नंतरची संध्याकाळ कवीस आठवते. दिवसाच्या उन्हात वनात झर्यांच्या जवळ विसावणे शक्य नव्हते .ते झरे रात्रीसाठी प्रेमी युगलांकरता चंद्राने राखून ठेवले आहेत. त्याची शीतलता कदाचित चंद्र उगवल्या नंतरच जाणवते . दुपारी आई व मुलाला झोपण्यासाठी मिळालेले स्थळ म्हणजे ईश्वराच्या मायेने उत्पन्न झालेलेली भूमाता व त्यावर उगवलेले वृक्ष. त्या दिवशीची आठवण आता जेह्वा येते तेन्ह्वा असे वाटते की झाडाखाली झोपणे व उठणे या विधीनिर्मित जीवन आणि मृत्यू या निरंतर चक्राचाच एक भाग असावा. हे चक्र असेच चालणार आहे.त्या दिवशी संध्याकाळी वृक्ष्याच्या खाली बसून आईने हळुवारपणे म्हटलेले रामरक्षा स्तोत्र अजून ही त्याच्या स्मरणात आहे. त्या वेळचे आईचे मंद व हळुवार बोल कवीच्या संपूर्ण आयुष्या साठी इतके प्रभावी झाले जसे वनवासाच्या वेळी सीतेस रामाचे स्मरण झाले असेल.रामरक्षा स्रोत्रात शिरापासून पायापर्यंतच्या सर्व इंद्रियांचे रक्षण करण्याची प्रार्थना आहे पण सर्व मानव जाती कुठल्या न कुठल्या दुक्खाने पीडित आहे. ती प्रार्थना कोणासाठी होती ?त्या दिवशीची आई ची स्मृती अजूनही चांदण्याच्या मंद व शीतल प्रकाशाप्रमाणे कवीच्या मनात बिम्बलेली आहे.
[माझ्या 'ग्रेसच्या कविता धुक्यातून प्रकाशाकडे' या पुस्तकातून]

कविवर्य ग्रेस म्हणतात " मी एक प्राचीन काव्य पुरुष आहे ."I am an ancient man belonging to your modern time."त्यामुळे एकाच वेळेला प्राचीन सभ्यता आणि प्राचीन अविष्कार शैली यांचा मिलाफ आधुनिक काव्यशैलीशी झाला आहे 'भय इथले संपत नाही' .या कवितेत आईचा उल्लेख कोठेच नाही परंतु पूर्ण कविता व त्यातील संदर्भ समजल्यावर हे स्पष्ट होते की कवितेचा संबंध प्रेयसीशी नसून आईशी आहे. या कवितेत कवीचा कल अध्यात्माकडे वळलेला वाटतो.या कवितेत आदिकवी वाल्मिकी डोकावलेले आहेत.
"भय इथले संपत नाही...मज तुझी आठवण येते...
मी संध्याकाळी गातो...तू मला शिकविली गीते...
ते झरे चंद्र सजणांचे, ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया
तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू राघव शेला
स्त्रोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख्ख कुणाचे
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे"
भय हा कवीचा ,किबहुना जागाच स्थायी भाव आहे. जगातील दैनंदिन घटनांमुळे उत्पन्न होणारे निरंतर भय संपत नाही परंतु संध्याकाळच्या शांत वातावरणात आईने त्यास बालपणात शिकवलेली गीते गायल्यानंतर त्याला मनःशांती लाभते.बालपणी आई बरोबर वनात घालवलेली एक दुपार व नंतरची संध्याकाळ कवीस आठवते. दिवसाच्या उन्हात वनात झर्यांच्या जवळ विसावणे शक्य नव्हते .ते झरे रात्रीसाठी प्रेमी युगलांकरता चंद्राने राखून ठेवले आहेत. त्याची शीतलता कदाचित चंद्र उगवल्या नंतरच जाणवते . दुपारी आई व मुलाला झोपण्यासाठी मिळालेले स्थळ म्हणजे ईश्वराच्या मायेने उत्पन्न झालेलेली भूमाता व त्यावर उगवलेले वृक्ष. त्या दिवशीची आठवण आता जेह्वा येते तेन्ह्वा असे वाटते की झाडाखाली झोपणे व उठणे या विधीनिर्मित जीवन आणि मृत्यू या निरंतर चक्राचाच एक भाग असावा. हे चक्र असेच चालणार आहे.त्या दिवशी संध्याकाळी वृक्ष्याच्या खाली बसून आईने हळुवारपणे म्हटलेले रामरक्षा स्तोत्र अजून ही त्याच्या स्मरणात आहे. त्या वेळचे आईचे मंद व हळुवार बोल कवीच्या संपूर्ण आयुष्या साठी इतके प्रभावी झाले जसे वनवासाच्या वेळी सीतेस रामाचे स्मरण झाले असेल.रामरक्षा स्रोत्रात शिरापासून पायापर्यंतच्या सर्व इंद्रियांचे रक्षण करण्याची प्रार्थना आहे पण सर्व मानव जाती कुठल्या न कुठल्या दुक्खाने पीडित आहे. ती प्रार्थना कोणासाठी होती ?त्या दिवशीची आई ची स्मृती अजूनही चांदण्याच्या मंद व शीतल प्रकाशाप्रमाणे कवीच्या मनात बिम्बलेली आहे.
[माझ्या 'ग्रेसच्या कविता धुक्यातून प्रकाशाकडे' या पुस्तकातून]