अण्णा, प्लीज जपा..!

Submitted by तात्या अभ्यंकर on 22 August, 2011 - 02:53

प्रिय अण्णा,

सर्वप्रथम तुमच्याबद्दल अत्यंत आदर व्यक्त करतो. तुमचं स्वच्छ चारित्र्य, तुमची साधी राहणी, तुमची सात्त्विकता, तुमच्यातली सादगी, तुमच्यातली निरागसता, तुमचं सेवाव्रत या सर्वांना माझा सलाम. अगदी मनापासून. अण्णा, खूप भावता तुम्ही मला..

आता काही मुद्दे -

१) काही दिसांपूर्वी तुम्ही आणि तुमची टीम असं म्हणत होतात की सरकारनं त्यांच्या लोकपालपदासोबत तुमचंही जनलोकपाल बील संसेदेपुढे किमान सादर तरी करावं; मग संसद त्यावर जो निर्णय घेईल तो तुम्हाला मान्य असेल. किंवा त्यावर आधारीत पुढील वर्चा किंवा आंदोलनाची दिशा ठरवता येईल.

२) पण सरकारने नेहमीप्रमाणे सगळ्यांना धोका दिला आणि फक्त स्वत:चंच बील सादर केलं. त्यामुळे सरकारच्या या फसवणुकीविरुद्ध तुम्ही उपोषणाला बसलात ज्याला माझ्यासकट अनेकानेकांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला.

३) या आंदोलनाच्या दरम्यान तुम्ही हेही म्हणत होतात की तुम्हाला सरकार पाडण्यात वगैरे काहीही स्वारस्य नाही, तुम्ही फक्त भ्रष्टाचाराविरुद्ध एक सशक्त कायदा आणू इच्छिता.

४) परंतु काल तुम्ही सरकारला असा इशारा दिलात की सरकारने ३० ऑगस्ट पर्यंत हे बील पास करावं किंवा जावं! (पायउतार व्हावं), जे 'हे सरकार पाडण्यात मला काहीही स्वारस्य नाही..' या विधानाशी विसंगत ठरतं..!

५) अण्णा, अनेक सरकारांनी गेल्या ४२ वर्षात काहीना काही कारणं, सबबी सांगून लोकपाल बील अस्तित्वात आणलं नाही हे अगदी मान्य. त्याकरता जनतेतल्या प्रचंड असंतोषाला तुम्ही तोंड फोडलंत हेही नक्कीच खूप मोठं काम. परंतु एक गोष्ट मी इथे सांगू इच्छितो की,

अ) जरी एखाद्या कायद्याला ४२ वर्ष उशीर झालेला असला तरी,

ब) किंवा आज प्रचंड लोकपाठिंब्याच्या बळावर तुम्ही लौकरात लौकर हा कायदा करण्यास सरकारला भाग पाडलं असलं तरी,

क) किंवा याच लोकबळावर तुम्ही सरकारच्या सिंहासनाला धक्का लावलेला असला तरी,

येत्या चार आठ दिवसात घाईघाईने एखादा कायदा उरकल्यासारखा मंजूर करणं हे कधीही कधीही उचित होणार नाही, किंबहुना इतक्या कमी काळात भ्रष्टाचारासारख्या कॅन्सर विरोधातला एखादा कायदा मंजूर होणं ही मला तरी अशक्य गोष्ट वाटते. त्यावर निश्चितच समाजातल्या अगदी सर्व बुद्धिवंतांकडून, विद्वानांकडून, वकिलांकडून अधिकाधिक चर्चा व्हायला हवी असं माझं मत आहे.

आणि म्हणूनच ३० तारखेच्या आत आमचंच लोकपाल बील जसंच्या तसं पास करा नाहीतर चालते व्हा, हा मला तरी थोडासा अट्टाहासच वाटतो. परंतु हा केवळ तुमचाच अट्टाहास आहे/असेल असंही मला मुळीच वाटत नाही. या मागचा तुम्हाला पुढे करून आपला अजेंडा मांडणारा बोलविता धनी कोण आहे हे मला माहीत नाही..! असं वाटण्याचं कारण असं की महाराष्ट्रातही तुम्ही अनेक आंदोलनं/उपोषणं केली आहेत आणि आवश्यक तिथे किंवा बहुतांशी वेळेला समजुतीनं घेऊन आवश्यक ती माघार घेऊन संबंधितांना आवश्यक ती स्पेसही दिली आहे असा अनुभव आहे. परंतु या वेळेला मात्र इतर काही मंडळींकडून तुम्हाला मुद्दामून जिवघेण्या जिद्दीला भाग पाडलं जात आहे असा मला संशय आहे..!

६) अण्णा, अजून काही गोष्टी मांडू इच्छितो -

अ) आम्ही तुम्हाला ओळखतो अण्णा, तुमच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. परंतु अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया ह्या गेल्या ३-४ महिन्यातच अचानक उगवलेल्या व्यक्तिंना मी किंवा इतर भारतीय जनता ओळखत नाही. यांच्या अजेंड्याबद्दल, किंबहुना 'त्यांच्यात काहीही हिडन अजेंडा नाही..' असं निदान मी तरी छातीठोकपणे म्हणू शकत नाही..!

ब) एक कर्त्यव्यदक्ष पोलिस अधिकारी या नात्याने मी किरण बेदींना नक्कीच आदारपूर्वक ओळखतो. परंतु ह्या आंदोलनात मात्र 'त्यांच्याकडेही काहीही हिडन अजेंडा नाही..' असं का माहीत नाही, परंतु मी ते म्हणू शकत नाही..!

तेव्हा अण्णा, लहान तोंडी मोठा घास घेतो आणि इतकंच सांगतो, की अण्णा जपा. स्वत:ला जपा..! आज तुम्ही अरविंद केजरीवाल, सिसोदिया आणि किरण बेदी यांच्या पूर्णपणे नसलात तरी बर्‍याच अंशी कह्यात गेला आहात असं मला जाणवतं आहे आणि भितीही वाटते आहे.

अण्णा, तुम्ही खूप आपले वाटता म्हणूनच इतक्या मोकळेपणाने लिहितो आहे. दिल्ली, आपला देश इत्यादींबद्दल मलाही नि:संशय खूप आदर आहे. परंतु अण्णा, आजही तुम्ही राळेगणसिद्धीला हवे आहात, देशापेक्षाही महाराष्ट्राला प्रथम हवे आहात इतकंच नम्रपणे सांगू इच्छितो..

अजून काय लिहू..?

तुमचाच,
तात्या.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

prachand sahamat.......10000000000% sahamat....je 20000 lok lagnar aahet lokpal bil sathi he 100% swach charitrya chi asanar he kon daava karu shakatach nahi.....
anna dabava pudhe aahet kejariwal chya... MAIN AAZAD HU sarakhya amitabh zalay...

@udayone - प्रतिसादाबद्दल खरंच धन्यवाद. परंतु तुम्ही मराठीतून का लिहित नाही..?

तात्या.

<<<पण सरकारने नेहमीप्रमाणे सगळ्यांना धोका दिला आणि फक्त स्वत:चंच बील सादर केलं. त्यामुळे सरकारच्या या फसवणुकीविरुद्ध तुम्ही उपोषणाला बसलात ज्याला माझ्यासकट अनेकानेकांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला>>>

उपोषणाची १६ ऑगस्ट ही तारीख काही एप्रिलमध्येच जाहीर केली होती, जोवर मसुदा समितीच्या बैठकाही सुरू झाल्या नव्हत्या. उपोषणामागचे कारण वेळोवेळी बदलत राहिले, अजूनही बदलत राहील.
आधी अमुक तारखेपर्यंत कायदा करा, मग आमचा मसुदा चर्चेला घ्या. आता आमचाच मसुदा ३ ऑगस्टपर्यंत पास करा.

सरकारने राजीनामा द्यावा ही बेस्ट आयडिया आहे. मुदतपूर्व निवडणुका घ्याव्यात.

छान.

अण्णांनी यापूर्वी काय म्हटले याला आता (या क्षणी) काही महत्व नाही. अण्णा यापूर्वी बोलले तो सामोपचाराचा काळ होता. पण सरकार मग्रूर होते, त्यामुळे सरकारणे ती संधी गमावली.

आता युद्ध (आंदोलन) सुरू झाले आहे. युद्ध जिंकायचे असेल तर परिस्थितीनुरूप शस्त्र बदलावी लागतात, हा युद्धनितीचा साधा सिद्धांत आहे. अण्णांची वाणी हेच अण्णांचे शस्त्र आहे. ते गरजेनुसार बदलावेच लागेल. त्यामुळे शब्द फिरवल्याचा आरोप आंदोलन संपेपर्यंत तरी त्यांना चिकटवता येत नाही. Happy

"टीम अण्णा" मधिल सदस्य सार्वमताने निर्णय घेतात, असे दिसते. तसे असेल तर ते अजिबात गैर नाही. हे चांगल्या लोकशाहीचे द्योतक आहे. यात बाहुले बनण्याचा प्रश्न निर्माण होतो असे मला वाटत नाही.

सरकार अजिबात पडणार नाही. पण तशी भिती अण्णा जर सरकारच्या मनात निर्माण करू शकले तर ते आंदोलनासाठी फायद्याचे ठरेल. Happy

मी तर म्हणेन की, "अण्णा, प्लीज जपा..! जिवाला" कारण या देशाला असले अण्णा हवे आहेत.

सरकारला विचार करायला पुरेसा वेळ दिलेला असतानाही अण्णांना खूप लाईटली घेतलं गेलं. आता घाई होणार हे खरंय. पण दिलेला वेळ आणि काळाची गरज पाहता उपोषणाची वेळ ही सरकारने लादली अण्णांवर. वेळेत बिल सादर केले असते तर ही वेळ्च आली नस्ती!

तात्या

लेखास अनुमोदन !!!
माफ करा. हा लेख माझ्या पाहण्यात इतक्या उशिरा आला . त्यामुळेच एक नवीन लेख लिह्ण्याचा उपद्व्याप मी करून बसलो. असो. तुम्हाला स्पर्धा करण्याचा कोणताही उद्देश नाही :).