ताडदेवची आजी

Submitted by चिनूक्स on 26 July, 2008 - 19:17

माझ्या लहानपणी आई, आजीकडून मुंबईच्या एका आजीबद्दल बरेचदा ऐकलं होतं. ही आजी ताडदेवला राहायची. नातं म्हटलं तर तसं बरंच लांबचं. म्हणजे माझ्या एका मामेआत्याच्या सासूबाईंची ती भाची. पण या मामेआत्याच्या सासूबाईंची लाडकी भाची असल्यानं पूर्वी म्हणे खूपदा ती आमच्या अकोल्याला यायची. ताडदेवची ही आजी विणकाम, भरतकाम उत्तम करायची, स्वयंपाकात पारंगत होती. तिला अनेक भाषा अवगत होत्या. शिवाय अनेक विषयांत तिनं केलेलं संशोधन गाजलं होतं. बरीच पुस्तकं लिहिली होती.
शाळेत मग तिनं लिहिलेली ही पुस्तकं वाचून काढली. लहान मुलांसाठी गोष्टी, प्रांतोप्रांतीच्या लोककथा, सुंदर ललित निबंध, महाभारतातील व्यक्तिरेखांचा ऊहापोह, झाडं, पानं, फुलं, यांचा उत्सव साजरा करत गायलेलं निसर्गसूक्त.. शिवाय खाद्यसंस्कृती, बौद्ध धर्म, वाङ्मय, त्याचा इतिहास, ज्ञानकोशकार केतकर, थोरो असं असंख्य वेगवेगळ्या विषयांवर केलेलं अतिशय अभ्यासपूर्ण आणि तितकंच रंजक लेखन. मी त्या पुस्तकांच्या सपशेल प्रेमात पडलो.

दहावीच्या सुट्टीत आई मला या आजीला भेटायला मुंबईला घेऊन गेली. शिडशिडीत, लहान चणीच्या या आजीनं माझी सगळी चौकशी केली. माझे आवडते लेखक, पुस्तकं, छंद असं बरंच काही. आणि मग पुढचे तास-दोन तास असंख्य निरनिराळ्या गोष्टींबद्दल, माणसांबद्दल माझ्याशी बोलली. जेआरडी टाटा, पंचवीस भाषा अवगत असणारा दादासाहेब फाळक्यांचा पुतण्या, दक्षिण धृवावर गेलेला अपंग फोटोग्राफर, किशोरीताईंचं गाणं, वुडहाऊसची पुस्तकं. एका व्यक्तीला इतक्या सगळ्या गोष्टींत रस असू शकतो हे बघून मी चकितच झालो.

मग आमची निघायची वेळ झाली. आजीला आवडतात म्हणून आईने तिच्यासाठी भरपूर मोगर्‍याची फुलं घेतली होती. आणि आवडला म्हणून एक छोटासा हार. पण तो हार घालायला आजीच्या घरात देवच नव्हते. बैठकीच्या खोलीत भिंतीवर टिटवाळ्याच्या गणपतीचा एक फोटो होता. आजी म्हणाली, ' मी काही देवाला हार वगैरे घालत नसते. तूच घाल.' आजीला नमस्कार करायला वाकलो तर परत मला अडवलं. म्हणाली, 'कायम लक्षात ठेव. कधीही कुणासमोर वाकू नकोस. अगदी नमस्कारालासुद्धा.' आणि मग छान हसत माझ्या खांद्यावर थोपटलं, आणि डोक्यावरून हात फिरवला.
आता तर मी आजीच्याही प्रेमात पडलो होतो. आजीने मला पुरतं भारून टाकलं होतं. Energize होणं म्हणजे काय, ते मला पुरेपूर कळलं होतं.

पुढे दोन महिन्यांनी अकरावीसाठी मुंबईला आलो, आणि आजीच्या ताडदेवच्या घरानं मला सामावून घेतलं. आजीच्या घरासमोर मोकळं मैदान होतं, आणि त्या मैदानाच्या दोन्ही कडेला पारश्यांची बैठी दुमजली घरं. पायर्‍यांवर पारशी आजीआजोबा बसलेले असायचे. घरांत अंधुक प्रकाश आणि काही घरांतून विवाल्डी, बाखचे सूर ऐकू यायचे.

आजीच्या घराची बेल वाजवली की आधी सिंबाचं भुंकणं ऐकू यायचं, मग आजी येऊन दार उघडायची. 'ये. गर्दी नव्हती ना लोकलला?', असं छान हसत विचारत सिंबाला शांत करायची. हा सिंबा कायम दाराशी बांधलेला असे. आतल्या खोल्यांत त्याला प्रवेश नव्हता. होता एवढासा पण भुंकून अख्खी इमारत डोक्यावर घ्यायचा. बैठकीच्या खोलीशेजारी स्वयंपाकघर आणि मग आजीची खोली. खोलीत एक पलंग, आजीचं लिहिण्याचं टेबल, एक आरामखुर्ची आणि पुस्तकांची दोन कपाटं.
आजी माझ्याशेजारी पलंगावर बसे, आणि आठवडाभरात मी काय काय केलं याची चौकशी होई. तिला अभ्यासाचे तपशील नको असत. मी काय काय वाचलं, मुंबईत कुठे जाऊन आलो, होस्टेलच्या घडामोडी, चित्रांचं प्रदर्शन, नुकताच पाहिलेला सिनेमा किंवा नाटक यात तिला रस असे. मग त्यातलाच कशाचा तरी संदर्भ घेऊन आजीशी गप्पा सुरू होत.

तसं पाहिलं तर आजीचं आयुष्य अतिशय अनुभवसंपन्न असलं तरी संघर्षमय होतं. आजीच्या लहानपणी तिची आई वारली. तिच्या आजी-आत्यांनी तिला वाढवलं. आजीचे आजोबा संस्कृतचे गाढे अभ्यासक होते. तिच्या वडिलांचा आणि काकांचा टाटा उद्योगसमुहाच्या उभारणीत मोठा वाटा होता. टाटांचं मीठ आणि वनस्पती तूप ही दोन्ही उत्पादनं तिच्या काकानं सुरू केली होती.
लहानपणी आजी अतिशय हूड होती. तिला सर्कससुंदरी व्हायचं होतं. तिचे वडील तिला म्हणत, 'दगडावर पेरलं तरी रुजशील तू.'

आजीनं मग स्वातंत्रलढ्यात उडी घेतली. लहानपणी एकदा कस्तुरबा गांधींच्या झोळीत आपले दागिने घातले होते. आता थेट लाठ्या खाण्यासाठी ती रस्त्यावर उतरली.
आजीनं पुढे बौद्ध वाङ्मयाचा सखोल अभ्यास केला. सातपुडा व विंध्य परिसरातल्या आदिवासींचे सांस्कृतिक जीवन अभ्यासण्यासाठी चार वर्षं ती मध्य प्रदेशातल्या जंगलात हिंडली. तिच्या Ph.D साठीच्या संशोधनाचा हा विषय होता. मध्य प्रदेशात एकदा सुरण चिरताना तिला भयंकर विषबाधा झाली, आणि तिला मुंबईला परतावं लागलं. तिचं संशोधन पुरं झालं होतं. पण डॉ. घुर्येंनी तिचा प्रबंध स्वीकारायचं नाकारलं. आजारपण आणि न मिळालेली डिग्री यामुळं तिची जगण्याची इच्छाच नाहिशी झाली. आत्महत्येचे विचार मनात डोकावत. ४-५ वर्षं ती अंथरुणाला खिळून होती.
मग एक दिवस कुठूनशी वार्‍याची एक झुळूक आली, आणि आजीला सुखावून गेली. जीवनाची आसक्ती परत निर्माण झाली. आणि आजीचं लेखन-संशोधन-चळवळी असं पुन्हा सुरू झालं.

आजीच्या बोलण्यात अनेक वेगवेगळे विषय असायचे. हे बोलणं क्वचित अघळपघळ असायचं. आणि त्यातून एखादा हुंकार असा उमटायचा की त्यातून तिच्या सार्‍या आयुष्याचं श्रेष्ठत्व डोळ्यासमोर झळाळून जायचं.
बौद्ध संस्कृती, गांधीजी, भारताचा, जगाचा इतिहास, व्यक्तिस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य, आणीबाणी अशा असंख्य विषयांवर ती माझ्याशी बोलत असे. इतक्या विविध विषयांतील तिचं ज्ञान अक्षरशः स्तिमित करणारं होतं. अर्थात माझं काम फक्त ऐकण्याचं. पण माझी मतंही मी तिला सांगावी हा तिचा आग्रह असे.
कधी तिनं काही पत्रं लिहिलेली असत. कधी लेख. त्यात अरूण शौरींची पत्रं असायची. शांताबाई शेळके साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडून याव्यात म्हणून केलेला पत्रव्यवहार असे. कधी तिनं पुनर्जन्मावर लिहिलं असे, कधी तुकारामाच्या अप्रकाशित अभंगांवर. ते ती मला वाचायला द्यायची. 'कसं वाटलं?', हे विचारायची. मला प्रचंड अवघडल्यासारखं होई. आजीच्या लेखनावर मी काय प्रतिक्रीया देणार? पण नुसतं 'छान आहे', असं म्हणून चालत नसे. मी काहीतरी वेगळं मत द्यावं ही तिची अपेक्षा मला जाणवे. तो लेख किंवा पत्र वर्तमानपत्रात/मासिकात छापून आला की हे आपण सगळ्यांच्या आधी वाचलं आहे, हे जाणवून उगीच मस्त वाटायचं.

आजीचा वावर समाजात असे. तिचं संशोधन, लेखन, मोहिमा लोकांसमोर आणि लोकांसाठी असत. तिच्या संशोधनाच्या, मोहिमेच्या कथा खिळवून ठेवणार्‍या असत. त्यातले काही व्यक्तिगत संदर्भ, काही व्यक्तिंबद्दलचे ग्रह वगळले तर या गप्पा भारून टाकणार्‍या असत. त्यात माहिती ओतप्रोत असे, पण त्याहून अधिक जाणवे ते लालित्य. खरं तर तिनं ललित लेखन खूप कमी केलं. पण तिच्या सार्‍या लेखनाला आणि अनुवादांना लालित्याची सुंदर डूब आहे. अगदी छोट्या गोष्टींच्या वर्णनातदेखील ते सौंदर्य जाणवे. ही उत्कटता हाच तिचा स्थायीभाव होता.

आजीच्या खोलीच्या खिडकीतून तळवाभर आकाश दिसे. एरवी निसर्गाचं, ऋतूंचं एवढ सुरेख वर्णन करणारी आजी त्या टिचभर आभाळातसुद्धा आनंद शोधायची. तिथे तिला नाना पक्षी दिसायचे. आणि मग त्या पक्ष्यांचा संदर्भ घेत तिला अन मला न दिसणार्‍या जगाची सफर ती घडवून आणायची. आमच्या रुपारेल कॉलेजच्या आवारात सोनचाफ्याची झाडं होती. ती फुलं आजीसाठी नेली की त्याचंसुद्धा कौतुक तिला बरेच दिवस पुरत असे.रसिकपणा व आनंद घेण्याची तिची ही सहजप्रवृत्तीच होती.

आपल्या ज्ञानाचा बडेजावही कधी तिने मिरवला नाही. तिच्याशी बोलताना मला प्रचंड मोकळं वाटत असे. त्यावेळी 'बँडीट क्वीन' हा चित्रपट गाजत होता. मी तो बघावा अशी तिची इच्छा होती. मात्र १८ वर्षांचा नसल्याने मला तो बघता येणार नाही, हे कळल्यावर माझ्यापेक्षा तिलाच जास्त वाईट वाटलं होतं. मला घरची आठवण येत असली की तिला लगेच कळायचं. मग माझ्या वहीत काही छानसं लिहून द्यायची. ते वाचल्यावर मी लगेच बरा व्हायचो.

आजीने मला कधीतरी एक गोष्ट सांगितली होती. खैरनारांना म्हणे त्यांच्या वडिलांनी एकदा सांगितलं होतं, ' कोणतंही काम करायला लाजू नकोस. मात्र ते फस्क्लास झालंच पाहिजे. उद्या तुला कोणी दादरच्या चौपाटीवर उभं राहून लाटा मोजायला सांगितल्या तर तू त्या अशा मोजायच्या की लोकांनी म्हटलं पाहिजे, लाटा मोजाव्यात त्या खैरनारांच्या मुलानीच.' तिच्या बोलण्यात असं काही बरेचदा यायचं. मरगळ कुठल्या कुठे पळून जायची.
आजी सतत कशाचा तरी ध्यास घेऊन जगायची. आपण एक जागरूक, सावध नागरिकही आहोत ही भूमिका ती कधीच विसरली नाही. जिथे जिथे सामाजिक अन्यायाची तिला जाणीव झाली, राजकीय अथवा सामाजिक, नैतिक अधःपतनाचे चित्र दिसले, तिथे तिथे ती ठाम पवित्रा घेऊन त्याविरुद्ध उभी ठाकली. नुसतीच 'बघ्या'ची भूमिका घेणं तिला मान्यच नव्हतं. इतर अनेकांप्रमाणे कातडी बचावण्याचे धोरण तिनं स्वीकारलं नाही.

आणीबाणीत तिचं हे व्यक्तिमत्त्व अधिकच प्रखर झालं. उभा महाराष्ट्र तिनं पिंजून काढला. व्यक्तिस्वातंत्र्याची झालेली गळचेपी तिला मंजूर होणं शक्यच नव्हतं. त्या काळात कोणत्याही सभासमारंभात तिच्या भाषणाचा विषय एकच असे - आणीबाणी. संपूर्ण भारतात मूठभर साहित्यिक आणीबाणीविरुद्ध उभे राहिले. आजीकडे त्यांचं नेतृत्व आपसूक चालून आलं.
त्यानंतर सरकारशी, प्रस्थापितांशी फटकून राहण्याचं तत्त्व तिनं टोकाला नेलं. सरकारी माध्यमांवर बहिष्कार टाकला. 'पद्मश्री', 'ज्ञानपीठ'सारखे पुरस्कार नाकारले. वेळोवेळी, वेगवेगळ्या प्रश्नांवर ती कडवी भूमिका घेत राहिली. खैरनार, रिबेरो, इनामदार, तिनईकर यांसारख्या अधिकार्‍यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली. झुंडशाही, समांतर सेन्सॉरशिप याला सतत विरोध केला. मात्र आपली मत चुकीची आहेत हे कळलं तर ती बदलण्याची, खुल्या दिलानं चूक मान्य करण्याची लवचिकताही तिच्या ठायी होती.
सरदार सरोवर प्रकल्पाला तिचा विरोध होता. मात्र दत्तप्रसाद दाभोळकरांचं 'माते नर्मदे' वाचून तिनं आपलं मत बदललं. अशा वेळी तिनं 'जे योग्य आहे ' त्याचंच समर्थन केलं. झोपडपट्ट्या आणि मुंबईचे आरोग्य यासंदर्भातही तिने अशीच भूमिका घेतली. बहुजनांच्या, सामाजिक कार्यकर्त्यांच्या विरोधात गेल्याने आपल्या हितसंबंधांना बाधा येईल वगैरे विचार तिच्या मनाला शिवलेही नसतील.

आजीला समाजधारणेची, संघटनेची विलक्षण आस होती. आणि सारे काही जलद घडायला हवे असायचे. ही तिची तडफड हाच तिचा जीवनाधार होता. अशातच तिचं हळवेपण, संवेदनशील वृत्ती जागी असायची.
पुस्तकं आणि विचारस्वातंत्र्य याबाबत ती अतिशय हळवी होती. पुस्तकं फाडल्यावर, जाळल्यावर तिचा होणारा संताप मी बघितला होता. एकदा शिवसैनिकांनी कुठल्याशा मासिकाच्या अंकांची होळी केली. आजीला हे कळताच ती भयंकर चिडली. ताबडतोब तिनं मनोहर जोशींना फोन लावला आणि आपला निषेध नोंदवला. तिचा तो संताप, आवेश अतिशय सच्चा होता. 'विचारांचा सामना हा विचारांनीच व्हायला हवा. पुस्तकं जाळणं, फाडणं हे अतिशय गर्हणीय कृत्य आहे' हे ती सदैव सांगत असे.
एरवी डॉ. आंबेडकरांच्या विद्वत्तेबद्दल आदर असणारी आजी त्यांनी मनुस्मृतीची होळी केल्यावर अशीच व्यथित झाली होती. आणि इंदिरा गांधीनी थोरोवर कविता केल्याचं कळताच तिने त्यांचे सारे गुन्हे माफ करून टाकले होते.

आजीची पुस्तकं हादेखील माझ्या विलक्षण आनंदाचा भाग होता. रात्री होस्टेलला परत जायला निघालो की आजी तिची पुस्तकांची कपाटं उघडत असे. मी एखादं पुस्तक निवडलं की लगेच त्यावर माझं नाव, तारीख आणि खाली स्वतःची सही करून मला देऊन टाकत असे. मग नेहमीप्रमाणे माझ्या खांद्यावर थोपटून, डोक्यावर हात फिरवून 'नीट जपून जा. गर्दी असते आता लोकलला' हे सांगायला ती विसरत नसे.
या पुस्तकांवर तिच्याशी बोलायलाही मजा यायची. एखाद्या साहित्यशास्त्रीय तत्त्वाचे खंडन-मंडन करणे ही तिची भूमिका नसायची. एका रसिक आणि व्युत्पन्न वाचकाची उत्स्फुर्त प्रतिक्रीया असं तिचं स्वरूप असे.
आजीचा व्यासंग जबरदस्त होता. लोकसाहित्य, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र यांची ती एक परिश्रमी अभ्यासक होती. त्याचबरोबर एक दर्जेदार ललितलेखिका होती. विविध ज्ञानशाखांशी संबंधित अशा तिच्या व्यक्तिमत्त्वाचे पडसाद जसे तिच्या लेखनात दिसत तसे ते तिच्या या मतांमध्येही दिसायचे.
एखाद्या पुस्तकाबद्दलची तिची प्रतिक्रीया इतरांपेक्षा वेगळी, नवीन असे. इतरांना सहज न जाणवणारं असं काहीतरी तिला जाणवे. लोकसाहित्याचा आणि बौद्ध वाङ्मयाचा तिचा अभ्यास तिच्या या प्रतिक्रीयांना अस्तरासारखा चिकटलेला असे.

साध्या साध्या शब्दांचं तिला अपार कौतुक असे. त्यामुळे एखाद्या लेखकानं वापरलेल्या साध्या पण वेगळ्या शब्दाची ती लगेच दखल घेई. त्या शब्दार्थामागचे धागेदोरे उलगडून दाखवे.
तिनं लिहिलेली परिक्षणंही अशीच वेगळी होती. एखाद्या लेखकाच्या प्रामाणिक प्रयत्नांचे ती भरभरून कौतुक करी, परंतु एखाद्याने व्यासंगाचा आव आणून वरवरचे लेखन केले असेल तर त्या तसल्या नकली लेखनाचे बेगडी आवरण टरकावून त्यातील पोकळपणा दाखवून देण्यासही ती कचरत नसे. अशा वेळी तो लेखक किंवा ती लेखिका कितीही मान्यवर असले तरी त्याचे दडपण तिच्या मनावर मुळीच येत नसे. अतिशय परखडपणे ती आपली मतं मांडत असे. मात्र या परखडपणाबरोबरच दुसरं एक भान तिला होतं. ते म्हणजे प्रामाणिक, वास्तव लेखनाला पाठबळ देण्याचे. अशावेळी संबंधित लेखकाच्या लेखनातील त्रुटींचा निर्देश करूनही त्याच्या प्रामाणिक प्रयत्नांना आजी प्रोत्साहन द्यायची; कारण या प्रयत्नांतून पुढे काही चांगले निर्मिले जाईल अशी खात्री तिला वाटे. याच हेतूतून काही अप्रसिद्ध पुस्तकांवरही तिने अगत्याने लिहिले. श्रीनिवास विनायक कुलकर्णी, कमल देसाई यांच्या पुस्तकांचं यथोचित स्वागत व्हावं म्हणून ती धडपडली. चोखा कांबळे यांसारख्या कवीला प्रकाशात आणलं.

एकूण साहित्य व्यवहार हा निर्दोष असावा, वाचकाला नवे-चांगले द्यावे, त्यांची अभिरुची घडवावी आणि मुख्यतः त्याच्यासमोर काही चुकीचे येऊ नये यासाठी तिची सारी धडपड असे. त्यासाठी वेळप्रसंगी पदरी वाईटपणा घेऊनही तिनं लिहिलं.
'वासूनाका'वर प्रतिकूल टीकेची झोड उठताच आजीने भाऊ पाध्यांच्या बाजूने अनेक लेख लिहिले. भाषणे दिली. अत्र्यांनी 'मराठ्यात' याबद्दल गलिच्छ उद्गार काढले. तरी आजी ठाम राहिली. हाच प्रकार 'बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर'च्या बाबतीतही झाला. पण 'ऑपरेशन छक्का' या पाध्यांच्या नाटकाला मात्र आजीने झोडपून काढलं.
'घाशीराम कोतवाल' आजीला आवडलं नव्हतं. इतिहासाचा विपर्यास झाल्याचं तिचं मत होतं. 'सखाराम बाईंडर'वर जेव्हा अश्लीलतेचा आरोप झाला तेव्हा मात्र आजी तेंडूलकर, सारंगांच्या बाजूने उभी राहिली. असंख्य लेख लिहिले, सह्यांची मोहिम राबवली. इतकंच काय, लालन सारंग यांची सततच्या दगदगीमुळे पाठ दुखते हे कळल्यावर स्वतः पायपीट करून त्यांना कुठलंसं तेलही नेऊन दिलं.
पाडगावकर, श्री. ना. पेंडसे यांच्या सुरुवातीच्या लेखनाचं भरभरून कौतुक आजीने केलं. पण नंतर मात्र ते तंत्राच्या आहारी जाताहेत हे पाहून तिने त्यांना सावधही केलं.स्वतःच्या आजोबांच्या ग्रंथांवरही तिने विवेचनात्मक पुस्तक लिहिले तेव्हा त्यात प्रतिकूल टीकाही होती.
कोणतीही चुकीची विधानं, चुकीच्या कल्पना किंवा गैरसमज प्रस्थापित होऊ नयेत म्हणून ती कमालीची दक्ष असे. याच भूमिकेतून केवळ पुस्तकं खपतात म्हणून नामवंत लेखकांची निकृष्ट पुस्तकं मौज प्रकाशनगृहाने प्रकाशित केली तेव्हा त्यांची 'दांभिक' म्हणून आजीने संभावना केली.

मी मोजकंच परंतु चांगलं वाचावं ही आजीची इच्छा असे. पण तिने कधीही आपली मतं माझ्यावर लादली नाहीत. ती केवळ आपलं मत मांडायची. पटलं तर घ्यावं, असंच तिला वाटे. असंख्य नवनवीन लेखक, कवींची गाठ मला आजीने घालून दिली. कोलटकर, पाब्लो नेरुदा मला आजीकडेच भेटले. 'I want to do with you what spring does to cherry trees' किंवा
I am alone with rickety materials,
the rain falls on me, and it is like me,
it is like me in its raving, alone in the dead world,
repulsed as it falls, and with no persistent form.
हे वाचून मी झपाटलो होतो. आजीशी या कवितांबद्दल बोलणं अतिशय सुखकर असे.
पुस्तक वाचताना जोपर्यंत वाचकाला 'हे सारे माझ्यासाठी आहे, केवळ माझ्यासाठी' असा आत्मप्रत्यय येत नाही तोपर्यंत एक तर लेखक वाचकाच्या पातळीला येत नाही किंवा वाचक लेखकाच्या, हे तिचं आवडतं मत होतं.
म्हणूनच पाडगावकरांच्या 'जिप्सी', 'छोरी'बद्दल आजीला अतिशय सुरेख लेख लिहिता आले. संवेदनक्षमता हा तिच्या व्यक्तिमत्त्वाचा एक विशेष होता. अतिशय सहजतेने अर्थवाही, चपखल शब्द तिच्या बोलण्यात येत. शांताबाई शेळक्यांच्या कवितांबद्दल बोलताना ती एकदा म्हणाली होती, 'शांताबाईंनी गेयता आपल्या काव्यात ओतली आहे. बासरी वाजवणारा आपला श्वास बासरीत ओततो तशी.'
आजीच्या या साहित्यविषयक मतांमध्ये व्यक्तिगत संदर्भ डोकावत. कलावंताने, साहित्यिकाने सरकारी हस्तक्षेप सहन करू नये, सत्तेपासून दूर राहावे, हा आजीचा आग्रह असे. सरकारी अनुदान स्वीकारलं की मिंधेपण येतं आणि साहित्यिक आपलं स्वत्व गमावून बसतो, हे तिचं मत होतं. मग कोणी हुजरेगिरी केली, सरकारदरबारी वशिला लावला की ती व्यक्ती आजीच्या ब्लॅकलिस्टमध्ये सामील व्हायची. अर्थात यामुळे त्या साहित्यिकाच्या कलाकृतीबद्दलचं आजीचं मत बदलत नसे. पण ते उल्लेख व्हायचेच.

बरेचदा मला आजीची ही मतं टोकाची, दुराग्रही वाटत. पण तात्त्विकदृष्ट्या ती योग्य अशीच होती. मुख्य म्हणजे विचार योग्य असतील तर आजी त्यांच्यापासून फारकत घ्यायला तयार नसे. स्वसमर्थन तिने कधीही केले नाही. द्रौपदीला 'कामिनी' म्हटले म्हणून पुण्याच्या भटाब्रह्मणांनी आजीला शिव्या दिल्या. आंबेडकरांच्या व्यक्तिपूजेवर टीका केली म्हणून रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी हल्लाबोल केले. आजी मात्र शांत राहिली. आपल्या मुल्यांसाठी झगडत राहिली. तिचे सगळेच व्यवहार आरस्पानी होते. ती ज्या शुचितेसाठी आग्रही होती, ती शुचिता ती स्वतः आचरत होती. म्हणून तिच्या बोलण्याला नैतिक अधिष्ठान लाभले होते.
याच दरम्यान पार्ल्याच्या एका घरानंही मला ओढ लावली होती. गाणं, खाणं, नाटक, सिनेमा, पुस्तकं अशी सारी चंगळ तिथे असे. मात्र हे सारं त्या घरातल्या एकाच व्यक्तीभोवती फिरतंय असं वाटे. ताडदेवच्या आजीकडे मात्र तसं काही नव्हतं. स्वतःचं संस्थान तिनं निर्माण होऊ दिलं नव्हतं.

दर रविवारी आजीला भेटायला तिची धाकटी बहिण यायची. ह्या कमलाआजी. त्यांचे सामर्थ्य तेवढेच प्रखर. त्यांचे क्षेत्र वेगळे, विज्ञानाचे. त्या भारतातल्या पहिल्या महिला शास्त्रज्ञ. तरी आजीसारखेच संघर्ष कमलाआजींच्या वाट्याला आले.
मुंबईतून B.Sc झाल्यावर १९३३ साली पुढील शिक्षणासाठी त्या बंगलोरला इंस्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये (आताची IISc) गेल्या. नोबेल पारितोषिकविजेते सर. सी. व्ही. रामन त्यावेळी संस्थेचे प्रमुख होते. त्यांनी कमलाआजींचा अर्ज नामंजूर करून टाकला. कारण रामन यांचा मुलींना शिकविण्याला विरोध होता! केवळ स्त्री आहे म्हणून शिक्षणाच्या संधी नाकारल्या जाणं कमलाआजींना मान्य होणं शक्यच नव्हतं. मुंबई विद्यापीठातून त्या प्रथम आल्या होत्या आणि इंस्टिट्यूटमध्ये प्रवेश मिळणं हा त्यांचा हक्क होता. रामन यांच्याशी त्यांनी वाद घातला. परोपरीने विनवणी केली. तरीही रामन बधत नाहीत हे पाहून त्यांनी सत्याग्रहाचे अस्त्र वापरले. रामन यांच्या ऑफीसबाहेर त्या ठाण मांडून बसल्या. तिसर्‍या दिवशी रामन यांना नमतं घेणं भाग पडलं. मात्र प्रवेश देताना कमलाआजींना एक अट घातली गेली. पहिलं वर्षभर रामन स्वतः त्यांच्या कामावर देखरेख करतील, आणि जर त्या रामन यांच्या परीक्षेत उतरल्या तरच त्यांना पुढील वर्षी अभ्यासक्रमास प्रवेश दिला जाईल. कमलाआजींनी हे आव्हान स्वीकारलं. रामन यांना मात्र कमलाबाई इंस्टिट्यूटमध्ये नकोच होत्या. त्यांनी शक्य त्या प्रकारे आपल्या या पहिल्या विद्यार्थिनीला त्रास द्यायला सुरुवात केली. पण कमलाआजी या सगळ्याला पुरून उरल्या आणि रामन यांनी त्यांना आपली विद्यार्थिनी म्हणून इंस्टिट्यूटमध्ये प्रवेश दिला. तेथे त्यांनी अहोरात्र अभ्यास करून उत्तम यश मिळवलं आणि रामन यांनी संस्थेत मुलींना रितसर प्रवेश द्यायला सुरुवात केली.

१९३६ साली पुढील संशोधनासाठी कमलाआजींनी केंब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला. फ्रेडरिक हॉपकिन्स या नोबेल पारितोषिकविजेत्या शास्त्रज्ञाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी plant biochemistry या विषयात अतिशय मुलभूत संशोधन केलं. त्यांचे प्रबंध संशोधन जिवंत पेशीत आढळणार्‍या सायटोक्रोम-सी या घटकाबद्दल होते. त्या वेळेपर्यंत हा घटक प्राण्यांच्या पेशीत असतो हे सिद्ध झाले होते. तो वनस्पतींच्या पेशीतही असतो हे कमलाआजींनी दाखवून दिले. त्यामुळे वनस्पतीसृष्टीसंबंधीच्या मानवी आकलनाचे स्वरूप एकदम पालटून गेले. आजही सायटोक्रोम-सी आणि trypsin बाबत संशोधन करताना आम्ही कमलाआजींनी साठसत्तर वर्षांपूर्वी केलेल्या संशोधनाचे दाखले देतो.

कमलाआजींच्या या प्रबंधाचीही एक गंमत आहे. अवघ्या एकोणचाळीस पानांचा हा थिसीस होता. थिसीस म्हणून जाडजूड ग्रंथ लिहिण्याची पद्धत. विद्यापीठात सगळीकडे कमलाआजींचा थिसीस चर्चेचा विषय झाला. या भारतीय विद्यार्थिनीला परिक्षकांनी पास करणं अशक्य आहे, हे सगळ्यांनी ठरवून टाकलं. पण कमलाआजींना परिक्षकांनी गौरवानं पीएच. डी. दिली ती त्यांची निबंधातील बुद्धिप्रगल्भता पाहून.
मुलभूत विज्ञानात पीएच. डी. मिळविणार्‍या त्या पहिल्या भारतीय विद्यार्थिनी ठरल्या.
पुढे त्यांना वॉशिंग्टनला जाण्याची प्रवासवृत्ती मिळाली. तेथे त्यांचे चंद्रशेखर हे जुने मित्र त्यांना भेटले. (पुढे त्यांना 'नोबेल' मिळाले.) चंद्रशेखर कमलाआजींना अमेरिकेत राहण्याचा आग्रह करत होते. परंतु त्यांनी भारतात येऊन दिल्लीच्या एका कॉलेजमध्ये आपल्या बायोकेमिस्ट्री विषयाचा विभाग सुरू करण्याची जबाबदारी स्वेच्छेने, आनंदाने स्वीकारली.

कधी, क्वचित आजीला भेटायला ताडदेवला तिच्या घरी रविवारी गेलो तर कमलाआजी भेटायच्या. दिसायला विलक्षण सुंदर. आजीच्या आजारपणामुळे आणि मनस्वी जगण्यामुळे तिचे शरीरप्रकृतीकडे सतत दुर्लक्ष झाले. याउलट कमलाआजी प्रकृतीने ताठ होत्या. त्यांच्या वागण्याबोलण्यात एक वेगळाच रुबाब व दिमाख होता. त्यामुळे असेल कदाचित पण कमलाआजींशी बोलताना सतत दडपण असायचं. कमलाआजींनी ते ओळखलं असावं किंवा आजीने त्यांना तसं सांगितलं असावं, कुणास ठाऊक. पण नंतर कमलाआजींनी माझं हे अवघडलेपण दूर केलं. मलाही मग त्यांच्याशी जरा मोकळं वागता येऊ लागलं.
कमलाआजींचा आहारशास्त्राचा जबरदस्त अभ्यास होता. मी येणार असलो की आजी मला होस्टेलला द्यायला खाऊ तयार ठेवत असे. चिवडा, चकली असं काहीतरी. कमलाआजींना ते फारसं आवडत नसे. फॅट्स, कॅलरीज अशा मोजमापात आजीचे पदार्थ जेमतेम पास होत. मग कमलाआजी पौष्टीक लाडू, भोपळ्याचे घारगे असं काहीतरी करायला सांगत.

आजीइतकाच कमलाआजींचा वैचारिक कणा ताठ. बोलणं अतिशय स्पष्ट व निर्भीड. त्यांचीही ओढ सारे स्वतःचे स्वतः जाणून घेण्याकडे. त्यांच्याजवळ अपार जिज्ञासा. संशोधनात त्या अधिक नेमक्या आणि विज्ञानविषय असल्याने तर्ककठोर. कमलाआजींच्या प्रबंधाचे पाश्चात्य जगात त्या काळी बरंच कौतुक झालं होतं. त्यामुळे केंब्रिजमधील बर्‍याच वैज्ञानिक मंडळींना त्यांच्याविषयी आदर वाटे. त्यांचा आपापसात पत्रव्यवहार असेच, परंतु त्यांच्यापैकी कोणी भारतात कधी आले तर आवर्जून कमलाआजींची भेट घेई.
कमलाआजींच्या तोंडून त्यांच्या संशोधनाबद्दल, समकालीन शास्त्रज्ञांबद्दल, त्यांच्या गुरूंबद्दल ऐकणं हा एक विलक्षण अनुभव असे. पण या गोष्टी त्या सांगत अतिशय निर्लेपपणे. कोणताही दुराग्रह किंवा आत्मप्रौढीचा लवलेशही त्यात नसे. कुन्नूरच्या आहार संशोधन संस्थेत, मुंबईच्या विज्ञान संस्थेत त्यांनी मोलाचं संशोधन केलं. पण भारतात त्यांना त्यांच्या योग्यतेचं स्थान लाभलं नाही. त्या जर केंब्रिजमध्ये राहत्या, अथवा तशाच पुढे चंद्रशेखरांनी सुचवलं तसं अमेरिकेत स्थिरावत्या तर कदाचित त्यांना नोबेल पुरस्कारही मिळून गेला असता. पण त्यांच्यामध्ये एक कार्यकर्तेपण लपलेलं होतं. त्यामुळे भारतात आपल्या विषयाची प्रगती आपल्या जाण्याने होणार आहे म्हणताच त्या भारतात परतल्या. त्यानंतरच्या तीस-पस्तीस वर्षांत त्यांनी अनेक शोधनिबंध लिहिले, ते आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये छापून आले. मराठी विज्ञान संमेलनाच्या त्या अध्यक्षा झाल्या. वेगवेगळ्या अधिकारपदांवरून त्यांनी केलेले जीवनोपयोगी संशोधन लोकांपर्यंत पोहोचावे, ही त्यांची इच्छा होती.

निवृत्तीनंतर त्यांनी ग्राहक परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारले. त्यावेळीही त्यांनी प्रयोगशील राहून भेसळीचे अनेक प्रकार उघड केले. सर्वसामान्य गृहिणींपर्यंत ते शास्त्र नेण्याचा प्रयत्न केला. हे सगळं त्यांच्या तोंडून ऐकताना त्यांची ध्येयासक्ती जाणवे.
या दोघी बहिणींचं विलक्षण प्रेमही असंच लक्षात येई. त्यांच्या लहानपणी ते जेवढं जीवाभावाचं होतं, तेवढंच वृद्धपणी ते उत्कट आणि हळवं झालं होतं. दोघींची वयं झाली होती. शरीरव्याधी होत्या. पण मनं सतेज होती. त्या दोघींना एकमेकींच्या बुद्धिवैभवाची जाण होती. कमलाआजींचं मराठी वाचन फारसं नव्हतं. पण आजीच्या श्रेष्ठतेचा त्यांना अंदाज होता. बुद्धीची समज आणि भावनेची ओढ असं हे नातं होतं. वयामुळे, विद्वत्तेमुळे त्यात परिपक्वता आली होती आणि वृद्धत्वामुळे विकलता.
भारतातील पहिली स्त्री शास्त्रज्ञ म्हणून इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने कमलाआजींचा १९९७ साली गौरव केला. या समारंभातच त्या कोलमडून पडल्या. मेंदूत अतिरिक्त रक्तस्रावामुळे कोमात गेल्या.
त्या life support system वर होत्या. अगदी चमत्कार झाला तरच शुद्धीवर येण्याची शक्यता होती. आजी शांतपणे म्हणाली, 'let her go'..
आठ सप्टेंबर १९९७ ला कमलाआजी गेल्या.
जाताना आपल्या थोरल्या बहिणीची जीवनेच्छा बरोबर घेऊन गेल्या.
आजी पुरतीच खचली. काहितरी चमत्कार घडून आपली कमू शुद्धीवर आली असती असं तिला सारखं वाटू लागलं. धाकटी, लाडकी बहिण आधी गेल्याचं दु:ख तिला डाचू लागलं.

त्याच दरम्यान कधीतरी मुंबई सोडून इंजिनियरींगसाठी मी पुण्यात आलो. कमलाआजी गेल्यानंतर ३-४ महिन्यांनी आजीला भेटायला गेलो तर त्यांच्या फोटोला हार घालून रडत बसलेली आजी मला दिसली. कमलाआजींच्या रोजच्या वापरातल्या निळ्या सपाता होत्या. आयुष्यात कधीही देवाला फुलं न वाहणारी आजी त्या सपातांची रोज तुळशीच्या मंजिर्‍या वाहून पूजा करायची. एवढी कणखर स्त्री पण बहिणीची माया आणि वृध्दत्व यामुळे विकल झाली होती. तिचं लेखन, न्यायाचे लढे सुरू होते, पण ती फार एकाकी झाली होती.
आजीने सतत ज्ञानाची उपासना केली. आपल्या विचारांशी, तत्त्वांशी ठाम राहिली. समाज जिवंत रहावा म्हणून आयुष्यभर धडपडली. सत्य, शिव, सुंदर हे सारं तिच्या ठायी एकवटलं होतं. पण आता ती खरंच थकली होती.
हळूहळू तिची तब्येत ढासळली. ती विस्मृतीच्या गर्तेत गेली. लोकांना ओळखेनाशी झाली.
पुढे दोन वर्षांनी आजी गेली. तिचं शेवटचं दर्शन घ्यायला मी गेलो नाही. आजीला तसं बघणं मला शक्यच झालं नसतं.
पार्ल्याच्या घरातली वडीलधारी मंडळीही अशीच पाठोपाठ गेली, आणि मग खूप एकटेपण जाणवायला लागलं.
आजीने मला खूप प्रेम दिलं. मला सांभाळून घेतलं. अनेक गोष्टी मला नकळत शिकवल्या. तिची सतत खूप आठवण येते. कारणं वेगवेगळी असतात, पण आत्ता या क्षणी ती असायला हवी होती, हे नेहमी वाटतं.
तिची पुस्तकं वाचताना, तिच्याबद्दल इतर कोणी लिहिलेलं वाचताना ताडदेवचं ते घर आठवतं, तिचं निर्मळ हसू आठवतं, तिचं पोटतिडिकीने बोलणं आठवतं. पण माझ्या डोक्यावर हात ठेवायला ती नसते. डोळ्यातल्या पाण्यामुळे ती दिसत नाही असंच मी समजतो.

गुलमोहर: 

हे जे काही आहे ते भारावून टाकणारे आहे
या महान व्यक्तीचं नांव सर्वांना समजले पाहिजे असे आपल्याला वाटत नाही का?
गोदेय

चिनू खूप भाग्यवान आहेस तू.
सुंदर लिहिल आहेस. इतक्या महान व्यक्तिंना इतक जवळून अनुभवण म्हणजे पूर्वजन्मीची पुण्याई.

हो. दुर्गाबाई भागवत.
पार्ल्याचं घर म्हणजे 'त्रिंबक सदन', अजमल रोड, पार्ले (पू.)..
पुलंचं घर..

फार फार सुरेख लिहिलंय!
माझी आई दुर्गाबाईंची प्रचंड चाहती. माहेरी कंप्युटर नाहीये. जवळपासच्या कुणी तुझ्या ह्या लेखाची प्रत काढून तीला दिली वाचायला तर चालेल का तुला?

धन्यवाद मृण्मयी. न चालायला काय झालं? जरूर द्या.
दुर्गाबाईंवर आम्ही ३-४ वर्षांपूर्वी लघुपट तयार केला होता. तो बघितला आहे का त्यांनी?

कल्पना नाही . विचारते. कुठे दाखवायचे हा लघुपट?

अंजली किर्तनेंच्या लघुपटाबद्दल बोलत आहात कां चिनुक्स? चांगला होता तो. फक्त इला भाटे नाही पटल्या त्यात दुर्गाबाई म्हणून. जरा कर्कश्शच वाटल्या त्यांची तेजस्वीता नाही दाखवू शकल्या त्या प्रखरतेने.
.
फार सुरेख लिहिलय तुम्ही हे.

अंजली कीर्तने यांनी दिग्दर्शित केला होता तो लघुपट.
आर्थिक अडचणींमुळे फार काही तो आमच्या मनाप्रमाणे नाही झाला. दुर्गाबाईंच्या गोतावळ्यातील अनेकांना तो नाही आवडला.
या लघुपटाचे private shows अंजलीताई करतात. एवढ्यात कुठे असण्याची शक्यता नाही कारण त्यांची प्रकृती ठिक नाही आणि पलुस्करांवर त्या नवीन लघुपट तयार करताहेत.

चिनूक्ष, फारच सुरेख लिहिलंय. दुर्गाबाईंसारख्यांना प्रत्यक्ष भेटायला मिळणं देखील भाग्याची गोष्ट म्हणायला पाहिजे.

चिनू, केवळ अप्रतीम!!!! दुर्गाबाई आणि कमलाबाई ह्या दोन विदुषींबद्दल भरभरून लिहिलसं. तू भाग्यवान आहेस खरचं.

सुरेख लिहील आहेस Happy
पण एक आगाऊ प्रश्न: ही दोन्ही वगळी ललित झाली असती का रे ? Happy

खुप छान लिहिलं आहेस चिनूक्स. तू भाग्यवान आहेस ह्या की दूर्गाबाई तुला तुझ्या घडत्या वयात भेटल्या..

चिन्मय, अरे, कसला जबरदस्त अनुभव... जीवनशिक्षण! कधीतरी त्यांना भेटले तर पायावर डोकं ठेवणार होते... पण करू द्यायच्या नाहीत असं आता लक्षात येतय.

हॅ! कसला लकी रे तू!

आवडले खुप छान लिहिलयस चिनुक्स, तुझा अगदी मनापासुन हेवा वाटावा असाच जीवनानुभव आहे हा.

सुरेख लिहिलय चिन्मय.

सुरेख.

दोन विदुषींचा दुर्मळ सहवास मिळाला आणि तू त्यातून खूप शिकलास. तुझ्या इतर लेखनावरूनही हे जाणवल. चला तुझ्यामुळे त्यांची झलक वाचायला मिळाली. त्याबद्दल आभार.

चिन्मय ती पोस्ट लिहिली आणि रात्री कधीतरी आठवलं की तुझ्या सुर्रेख लेखाला दाद द्यायची राहूनच गेली की रे.
एखाद्या आज्जीला नातवाने अशा वेगळ्या कोनातून बघणं आणि ते ही इतक्या समर्पक शब्दात उतरवणं... खास आहे!
छानच जमलाय लेख.

सुरेख लिहिलं आहेस! भावलं!

तुझ्या नशिबाचा खरंच हेवा वाटतोय. अशी वादळी व्यक्तित्वे इतक्या जवळून अनुभवायला मिळणे म्हणजे परमभाग्य..
***
शब्दचि आमुच्या जीवाचें जीवन, शब्दें वाटू धन जनलोकां..

चिन्मय, ज्यांच्या बद्दल तू हा लेख लिहीला आहेस त्या दोघीही महान होत्या ह्यात वादच नाही आणि त्यांचा सहवास लाभणे ह्यासारखी भाग्याची गोष्ट दुसरी कुठली नाही.. पण विशेष कौतुक तूझ्या लेखन शैलीबद्दलही.. सुंदर लिहिलं आहेस तू..

फार फार सुंदर!! भाग्यवान आहेस मुला.

अप्रतिम लिहिलयंस चिन्मय.
केदारशी सहमत. हा लेख सुंदरच आहे पण कमलाताई सोहोनींबद्दल अजून लिहायला जमलं तर बघ.. त्यांच व्यक्तिमत्व पण असंच जबरदस्त होतं.

चिन्मय खुपच अप्रतिम लिहिलयंस. तुम्ही खरच भाग्यवान आहात.
वाचताना लेख संपुच नये असे वाटत होते.
मला आता माझाच थोडा राग येत आहे कि तुमची हि एव्हढी सुंदर पोस्ट माझ्याकडुन कशी काय वाचायची राहिली. Sad

चिन्मय - सुरेख लिहिलय.
शब्दच नाहीत.

अप्रतिम. आजीच्या सार्‍या पैलूंना सहज समतोलपणे हाताळून त्यातील मऊ दाटपणादेखील जपला आहे. भाग्य आहेच पण अशा तेजःपुंज, ज्ञानःपुंज तपस्विनीने तुम्हाला जवळ करावं हे नक्कीच तुमच्या योग्यतेचं मोठ्ठं प्रशस्तिपत्र आहे.

Pages