५ ऑगस्ट चा बॅंक संप कशासाठी ?

Submitted by विप्रा on 7 August, 2011 - 04:56

दि. ०५ ऑगस्ट २०११ ला देशातील १० लाख बँक कर्मचारी / अधीकार्‍यांनी १ दिवसाचा संप केला. बँकांचा
संप हा देशभरातील जनतेच्या टिकेचा धनी होतो. त्या संबंधाने या संपातील बँक कर्मचारी , अधीकारी संघटनांची संपामागील भुमीका लोकांपर्यंत जावी , ह्या करिता हा लेखप्रपंच.
१९९१ पासुन LPG (Liberalisation , Privatisation and globalisation ) चे वारे सुरू झाले व भारतातील
अर्थव्यवस्था पण त्यापासुन बदलायला लागली. अर्थव्यवस्थेचा कणा असलेली बँक ही संस्था त्यापासुन दूर राहीली नाही व बँकामध्येही बदलाचे वारे वाहु लागले.
आपल्या देशातील संरचना ही ह्या उदार अर्थनीतीला योग्य आहे का ? हे विचारात न घेता तसे बदल होऊ
लागले. LPG मुळेच इतर देशातील आर्थीक संकटांचा परीणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर, देशावर, जनतेवर होतो आहे. नव्या आर्थीक धोरणाचे चटके आता प्रकर्षाने जाणवू लागले आहेत.
आर्थीक मंदीमुळे अमेरिकेतिल शेकडो बँका बुडाल्या , मोठमोठे उद्योग बुडाले, या परिस्थीतीत भारतातील बँकींग सुरक्षीत राहीले. याचे महत्वाचे कारण या बँका insulated आहेत व त्यावर रिझर्व बँकेचे मजबुत नियंत्रण आहे. सध्याचे राजकीय पक्ष , राजकारणी त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असतील पण त्याचे खरे श्रेय जाते ते दिवंगत पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधींना, बँक संघटनानी स्वातंत्याआधीपासुन केलेल्या राष्ट्रीयीकरणाच्या मागणीला. १९६९ व १९८० साली मिळुन २० बॅंकांचे राष्ट्रीयीकरण झाले , स्टेट बँक व ६ सहयोगी बँकामुळे ही संख्या २७ झाली. १९९१ नंतर खाजगीकरणाचे आतापर्यंतचे सगळे हल्ले गेले २० वर्ष अविरतपणे विरोध करणार्‍या संघटनांनी शेकडो संप करुन परतवले आहेत.
बँकांचा संप म्हणजे पगारकपात , असे असुनही फक्त स्वतःच्या मागण्यांव्यतीरीक्त जनसामान्यांच्या प्रश्नांवर केलेले संप जनतेपर्यंत गेले नाहीत.
५ ऑगस्ट्चा संप हा देखील अशाच मागण्यांकरीता होता.

आउटसोर्सींग , विदेशी गुंतवणुक व त्यांच्या शेअरप्रमाणात मताधीकार , बँकींग रेग्युलेशन अ‍ॅ़क्ट मधील प्रस्तावीत खाजगीकरणाला चालना देणारे बदल , बँकांचे विलिनीकरण ह्या सगळ्यांच्या विरोधात हा संप होता.

बजेटपुर्व मिटिंगमध्ये संघटनानी अर्थमंत्र्याना दिलेल्या मागण्यांचा गोषवारा ह्या बाबी अधोरेखीत करतील.

१. भारतातील २७ राष्ट्रीय बँकांचा शाखाविस्तार सुमारे ४०००० शाखांचा आहे. १५००० लोकवस्ती पर्यंत बँकशाखांचा विस्तार केल्यास ७० टक्के जनता बँकींग क्षेत्रात सामावुन घेतली जाईल व विकासाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोचतील. त्याकरीता बँकांचा शाखाविस्तार कार्यक्रम अर्थसंकल्पात अधोरेखीत करावा.
२. राष्ट्रीयीक्रूत बँकांची मालकी सरकारकडे आहे, किमान ५१ टक्के मालकी हक्क सरकारकडे कायम ठेवण्याची पुन्हा घोषणा करावी, खाजगीकरण करु नये.
३. ह्या बॅंकांचे विलिनिकरण करुन १० महाकाय बँका बनविणे या धोरणामुळे केवळ बड्या भांडवलधारांसाठी कर्जपुरवठा करणार्‍याच संस्था निर्माण होतील व सर्वसामान्य ग्राहकांना पुन्हा सावकाराच्या पाशात अडकविले जाईल. या धोरणाचा पुनर्विचार व्हावा.
४. बँकींग उद्योगात ४० लाख कोटीहुन अधीक बचत ठेवी सर्वसामान्य, कष्टकरी , मध्यमवर्ग या घटकांच्या आहेत मात्र ७० टक्केहुन अधीक कर्जवाटप बड्या कार्पोरेट उद्योगांना केले जाते. बड्या कंपन्यांची कोट्यावधी रुपयांची कर्जे दरवर्षी थकीत व बुडीत होत आहेत. म्हणुनच केंद्र सरकारने , जाणीवपुर्वक कोट्यावधींची कर्जे बुडवणे हा इंडियन पीनल कोड कायद्यांतर्गत दखलपात्र , दंडनिय गुन्हा ठरवावा, तसेच
वसुली कायदे कठोर बनवावे.
५. बँकांची कर्जे बुडविणार्‍या व्यक्तींना लोकप्रतिनिधी कायद्यामध्ये सुधारणा करुन निवदणुकीस अपात्र ठरवावे.
६. देशात बचतीचे प्रमाण वाढविण्यास उत्तेजन देण्याकरिता सेव्हींग अकाउंटवर व्याजदर किमान ५ टक्के असावा.
७. बँक ठेविंवरील व्याज उत्पन्न आयकर मुक्त असावे.
८. रु. ३ लाख पर्यंतचे उत्पन्न आयकर मुक्त असावे.
९. अल्पभुधारक शेतकर्‍यांना ४ टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करावा. राष्ट्रीयीक्रूत बँका, खाजगी बँका , विदेशी बँका या सर्वांनाच किमान १८ टक्के शेती व्यवसाय कर्ज पुरवठा करणे बंधनकारक करावे. Priority sector मध्ये दिली जाणारी कर्जे बँकांच्या शाखांमार्फतच दिली जावीत. त्याचे आउट सोर्सिंग करणे म्हणजे
नविन सावकारी संस्था निर्माण करणे असे होईल.
१०. केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये अन्नधान्य संकटावर मात करण्यासाठी फॉरवर्ड ट्रेडिंग वर बंदी घालावी, रेशन दुकानांची संख्या वाढवावी.
११. शेती व्यवसाय केंद्र सरकारची गुंतवणुक वाढवावीव पद्मभुषण श्री. एम. एस. स्वामिनाथन कमीटीच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी.
१२. सर्व कंत्राटी असंघटीत कामगारांना कायद्याचे संरक्षण द्यावे तसेच सर्व असंघटीत कामगारांना सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत पेंशन लागू करावे.
१३. अशक्त व आजारी सहकारी बँकामधील ठेवीदार व कर्मचार्‍यांच्या १०० % संरक्षणासाठी राष्ट्रीयीक्रूत
बँकामध्ये सहकारी बँकांचे विलिनिकरण करावे.
१४. सहकारी बँकांचा नफा आयकर मुक्त करावा.
१५. महागाई , चलनवाढ रोखावी . नोकरकपात नको , नोकरभरतीचे धोरण आखावे.

गुलमोहर: 

मनःपूर्वक पाठिंबा !

एलपीजी धोरणाबद्दल आधी जनजागृती व्हायला हवी तरच या संपाचा उद्देश्श सफल होईल. नाहीतर या संपाला आणि पर्यायाने संघटनांना मीडियाला हाताशी धरून बदनाम केले जाईल.

राष्ट्रीयीक्रूत बँकांची मालकी सरकारकडे आहे, किमान ५१ टक्के मालकी हक्क सरकारकडे कायम ठेवण्याची पुन्हा घोषणा करावी, खाजगीकरण करु नये >>>

पटले नाही. सरकारी लाल फितीच्या कारभारात, ९ ते ५ ड्युटी व ती पण त्यांना वाटेल तशी, अशी मागणी आहे. आयसीआयसीआयच्या शाखा भारतभर विस्तारण्यापूर्वी SBI, SBH अशा मोठ्या बँकांचे कामगार लोकांना उद्दटपणे उत्तर देत, आज नाही उद्या या असे सांगत, लोन मंजूर व्हायला १-१ महिना लागून तिथे भ्रष्टाचार चालत असे. हे सर्व मोडीत निघाले, आता ह्या बॅंकांनापण ग्राहकाच्या वेळात, कधी घरी जाऊन काम करावे लागते. परत सरकारीकरण झाले की सर्व बट्याबोळ! ग्राहक म्हणून नामंजूर!

केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये अन्नधान्य संकटावर मात करण्यासाठी फॉरवर्ड ट्रेडिंग वर बंदी घालावी, रेशन दुकानांची संख्या वाढवावी. >>

फॉरवर्ड ट्रेडिंगला पर्याय नाही. उद्या मला १ लाख डॉलर हवे असतील तर मी त्याचे फॉरवर्ड कव्हर घेणारच. शिवाय जो फॉरवर्ड कव्हर घेतो तो नेहमीच फायद्यात असतो असे वरील मागणीवरून सूचित होते आहे. ते तसे अजिबात नसते. आजच्या दिनांकाला जी मालाची किंमत आहे, त्या दिनांकाला भविष्यात देखील माल मिळतो, उद्या कापसाचा भाव समजा गडगडला आणि मी ९०० ने कव्हर घेतले तर फॉरवर्ड कव्हर घेऊनही माझा तोटाच झाला. कव्हर हा इन्शूरंस असतो. विचार करा, उद्या LIC म्हणाली की मी इन्शुरंसच देणार नाही तर कसे होईल? अमेरिकेत देखील सगळ्या वस्तूचे कमोडिटी (कॉर्न , शुगर ई ) ट्रेडिंग होते. तरी कोणाला २ डॉलरचा बर्गर अचानक ५ ला एकेदिवशी व परत ३.५ ला दुसर्‍यादिवशी मिळत नाही. थोडक्यात कमोडिटी ट्रेड मध्ये फॉरवर्ड कव्हर घेणे आणि किमतीतील चढ-उतार ह्यांचा संबंध नसतो तर मालाच्या पुरवठ्याशी असतो. स्पेशली २०१२ च्या कॉर्नचे समजा मी कव्हर घेतले आणि तेवढे उत्पादन झालेच नाही तर माझा फायदा होईल, पण उत्पादन झाले आणि किंमत कमी झाली तर माझा तोटा.
रेशन मध्ये किती भ्रष्टाचार होतो हे कोणी वेगळे सांगायची गरज नाही. १० टक्के माल योग्य लोकांपर्यंत पोचत असावा.

ह्या व अशा एक दोन मागण्या सोडल्या तर बाकींशी सहमत आहे.

<<<<<आयसीआयसीआयच्या शाखा भारतभर विस्तारण्यापूर्वी SBI, SBH अशा मोठ्या बँकांचे कामगार लोकांना उद्दटपणे उत्तर देत, आज नाही उद्या या असे सांगत, लोन मंजूर व्हायला १-१ महिना लागून तिथे भ्रष्टाचार चालत असे.>>>>>

खाजगी बँकात सर्व आलबेल आहे असं मुळीच नाही. काहीही असो. राष्ट्रीयीकृत बँका बुडाल्या नाहीत. माझ्या पत्नीने टीव्हीएस स्कूटीसाठी एका नामांकित खाजगी बँकेकडून लोन घेतलं होतं. हप्ते फिटल्यानंतरही त्यांचे फोन येत होते. दोन हप्ते राहीलेत म्हणून एकदा एक गुंड येऊन गेला. दोनशे रूपये दंड घेऊन गेला आणि एकदा गाडी रस्त्यात अडवली. मी बाहेरगावी होतो. आल्यानंतर त्या बँकेच्या मॅनेजरकडे गेलो. त्याने उडवाउअडवीची उत्तरे दिली. मग छत्रपती सेल्स मधे गेलो. तिथं सगळा प्रकार उघड झाला.

बँकेने लोन दिलं २२०००. प्रत्यक्षात कागदपत्रं बनवली २५०००रु ची. चेक परस्पर देण्यात आला. तीन हजार डाऊन पेमेंटच्या नावाखाली घेतले. ते एजंट ने खाल्ले. कर्जाचा हप्ता मात्र २५००० रू वर ठरवला गेला. आणि उलट त्यांचेच हिशेब व्यवस्थित नव्हत्ये. ही कागदपत्रं घेऊन पुन्हा बँकेत गेलो. त्यांच्या अतिवरिष्ठ मॅनेजरने फुल्यांच्या भाषेत उत्तरं दिल्यावर मी डीआयजी दर्जाच्या पोलीस अधिका-याला भेटलो. त्यांनी त्यांच्या पद्धतीने तपास केल्यावर बँकेचा बनाव लक्षात आला. त्यानंतर त्यांचा एजंट, मॅनेजर आणि वसुली एजंट यांच्याविरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. हे प्रत्ये.कालाच शक्य होत नाही. काही जण चूक नसताना पैसे भरून मोकळे होतात तर काहींना मारहाणही होते.

आयसीआयसीआय च्या होमलोनबद्दल तर खूप ओरड आहे. सुरूवातीला मुलीच्या गोड आवाजात चौकशी केली जाते. लोन दिलं जातं. नंतर ते काही फिटतच नाही. फिक्स्ड रेट हा ऑप्शन भरून दिला तरीही तो आपोआप प्लोटिंग रेट मधे कन्व्हर्ट केला जातो.

सरकारी बँकेमधे ग्राहकाची पत हा मुख्य घटक असतो. अर्थात भ्रष्टाचार थोड्या प्रमाणात आहे. पण खाजगी बँकेचा एजंट तुमच्याकडून पैसे खातोच कि. त्याला बँकेचीच साथ असते. मात्र सरकारी बँकेत काही ठराविक लोकांनाच बँकेकडून मोठी कर्ज दिली जातात हे चूक आहे. बुडीत खात्यांमधे प्रतिष्ठित लोकांचा भरणा जास्त आहे. त्यांच्यावर कारवाई होत नाही हे पण चुकीचं आहे.

दुसरीकडे पारदर्शकतेचा अभाव हे भारतातल्या खाजगी बँकांचे शस्त्र आहे. डॉक्युमेंटची साईन्ड कॉपीही दिली जात नाही.

असाच प्रकार विमा कंपनीबाबत..

खाजगी कंपन्यांचे दावा निकाली काढण्याचे प्रमाण नगण्य आहे. याउलट एलआयसी मधे ९५% दावे निकाली निघतात. खाजगी कंपन्या काहीही बघत नाहीत. फक्त बकरा पाहतात. एका कंपनीत ग्रुप इन्शुरन्स चा हप्ता एलआयसीने २७००० रु दिला. तर बजाज ने ४०००/- साहजिकच कंपनीने बजाजकडून इन्शुरन्स केला. पहिल्याच वर्षी दोन कॅज्युअल्टीज झाल्या. कंपनीने पुढच्या वर्षी प्रीमियम सांगितला ४५००० रु. त्यात दाव्याची रक्कम अ‍ॅड केली होती. वास्तविक विम्याच्या कायद्याप्रमाणे प्रीमियम फिक्स्ड असावा लागतो तसाच तो सर्व कंपन्यांचा एकच असावा लागतो. पण खाजगी कंपन्या नियम धाब्यावर बसवतात. सरकारी कंपन्या नियम पाळून धंदा करतात. बजाजने प्रीमियम कमी देऊन नियम मॉडलाच पण पुढच्या वर्षी वाढवून पुन्हा एक नियम मोडला.

त्या कंपनीने मग रिलायन्सचे कोतेशन घेतले त्ञांनी सहा हजार प्रीमियम दिला. पुढच्या वर्षी एक मृत्यू झाला. अडीच लाखाची भरपाई दिल्यावर हप्ता २६५००० सांगितला गेला !!

कंपनीने मुकाट एलआयसीची ग्रुप इन्शुरन्स घेतली. जी कंपनी विम्याची जबाबदारी घेणार तिच्याकडे अनुभव तर हवाच शिवाय प्रीमीयम असा हवा कि कंपनीचं दिवाळं निघू नये !

तिसरा प्रकार खाजगी टेलिफोन कंपन्या

कुठलीही कंपनी तेर्फबाबत पारदर्शकता ठेवत नाही. उलट कुणालाही सिम देण्यामुळे दहशतवाद्यांचं फावलं होतं. या कंपन्यांच्या कारभारावर शेवटी अंकुश ठेवावा लागला. एअरटेलने इन्फ्रास्ट्रकचर नसताना महाराष्ट्रात वाट्टेल तितकी सिमकार्डे दिली. परिणामी दोन सेकंदानंतर संभाषण तुटण्याचा अनुभव सर्वांना येऊ लागला. बीएसएनल वर कितीही टीका करा, प्लान पारदर्शक असतो.

आत्ता मात्र बरीचशी सुधारणा आहे. पण सुरूवातीचा गोंधळ हॉरिबल होता.

प्रवासी कंपन्या, मालवाहतूक अशी इतरही क्षेत्रे आहेत ज्यावर बोलता येईल.

मुद्दा हा कि खाजगी सर्व चांगलं आणि सरकारी सर्व वाईट असा निष्कर्ष काढू नये. चांगल्या बाजू समोर मांडाव्यात आणि मग दोष दाखवावेत. नाहीतर रोगापेक्षा इलाज भयंकर होईल. कारण पोलीस, लष्कर, देशापुढील आरिष्टं या प्रत्येक प्रसंगात एलआयसी, स्टेट बँक यांच्ञाकडून मदत होते. इन्फ्रास्ट्रकचर मधे त्यांचा हातभार असतो. मायक्रोलोन्स साठी सरकारी बँकांना पर्याय नाही. उपेक्षित भागात याच बँका आहेत. वंचितांसाठीच्या योजना निव्वळ सरकारी बँकाच राबवू शकतात.

गरज आहे ती या क्षेत्रातली कीड दूर करण्याची. सरकारी बँका संपवण्याची नव्हे !

केदार , अनिल सोनवणे धन्यवाद.
Forward trading will lead to speculation and dangerous fluctuations in prices.
ज्या देशात बराच मोठा समुह दारिद्र्य रेषेखाली आहे , तिथे अन्नधान्याच्या किमती नियंत्रणात
ठेवल्या पाहीजेत असे वाटते.
public distribution system should be strenghthened.
रेशन दुकानात आजकाल आपण जातच नाही , पण अजुनही मोठ्या समुहाची गरज आहे ती.

भ्रष्टाचार हा निंदनीयच आहे , आम्ही पण अशा व्यक्तींच समर्थन करीत नाही , प्रष्नच नाही.
अनिलजी , मी काल हे टाईप करताना फार कंटाळलो होतो , पण तुमची इतकी सविस्तर
प्रतिक्रिया बघुन थक्कच झालो. मला १ ब्रेक घेउन ३ तास लागले टायपायला.
धन्यवाद.

चांगला धागा. केदार आणि अनिल यांचे प्रतिसादही आवडले, जरी मतभेद असले तरी.

कोणताही अंकुश नसलेल्या खाजगी कंपन्यांपेक्षा सरकारी कंपन्या चांगल्या असा सर्वसाधारण अनुभव आजकाल येतो. तो अंकुश कधी मार्केट फोर्सेस चा असतो कधी ग्राहकहित वाल्या संस्थांचा तर कधी ग्राहकाचे किमान हित अबाधित ठेवणार्‍या सरकारी नियमांचा. भारतात बर्‍याच वेळा यात तीन्हीपैकी एकही इफेक्टिव्ह नाही असे वाटते.

पण खाजगी कंपन्यांच्या स्पर्धेमुळे सरकारी कंपन्यांनी आपला कारभार सुधारला तर चांगलेच आहे. खाजगीकरणाच्या मूळ हेतूंपैकी तो एक होताच. किती साध्य झालाय माहीत नाही.

मूळ लेखाबद्दल प्रश्नः या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा व्हायला हवी, पण हे वाचताना असे वाटते की हे केवळ एवढ्या जनहिताच्या मुद्द्यांवर एवढे लोक संपावर जातील असे वाटत नाही. हा बँक कर्मचार्‍यांविरूद्ध अविश्वास्/आरोप नाही पण एवढी प्रतिक्रिया व्हायला बँक कर्मचार्‍यांवर थेट परिणाम करणारे काही निर्णय असतील ज्याला विरोध म्हणून संप झालाय. ते कोणते हे या मुद्द्यांतून स्पष्ट होत नाही. कृपया गैरसमज नसावा: सर्वसाधारणपणे स्वतःवर थेट इम्पॅक्ट होणार्‍या गोष्टींसाठीच एवढी प्रतिक्रिया दिली जाते, कोणाकडूनही.

चौथ्या आणि काही प्रमाणात नवव्या,बाराव्या, तेराव्या मागणीशी सहमत. अन्य नाही.
LPG ला पर्याय नाही. आपल्या देशातल्या संरचनेला ते योग्य नाही म्हणजे काय ते कळले नाही. संरचना=सिस्टिम असेल तर त्यात बदलाला भरपूर वाव आहे.
LPG मुळे आपल्या देशातल्या उद्योगांना फायदाही झालेलाच आहे. जर वैश्विकीकरण नको असेल तर निर्याताधारित सगळे उद्योग बंद करायचे का?
आरबीआयच्या कठोर नियंत्रणांमुळे अमेरिकन-युरोपियन मंदी आणि वित्त संस्था डबघाईसे येण्याचा प्रकार आपल्याकडे झालेला नाही.

महागाई रोखण्यासाठी RBI Interest rates वाढवते पण त्यामुळे महागाई तर कमी होतच नाही पण EMI वाढतो. ह्या उपायात काहीतरी लोचा आहे. जाणकारांनी जरा यावर प्रकाश टाकावा. कारण गेल्या १.५ वर्षात तीन वेळा Interest rate वाढवुन महागाई एका पैशानेही कमी झाली नाही.

LPG ला पर्याय नाही. तसेच सरकारचे काम हे कायदे बनवणे व सरकारी हस्तक्षेपापासून मुक्त असलेल्या नियंत्रण संस्था बनवणे हे आहे. उदा. सेबि, निवडणुक आयोग इत्यादी. आपल्या देशात ह्या नियंत्रण संस्थांमधला भ्रष्टाचार व सराकारी हस्तक्षेप LPGच्या उद्देशांना सुरुंग लावतो. जळजळीत उदाहरण 2G घोटाळा.
ह्याचा निष्कर्श आर्थिक उदारीकरणाचे धोरण चुकीचे व खाजगी वित्तीय संस्था वाईटच असतात असा नाही. तसेच जसे आहे तरे उदारीकरणाचे धोरण रेटणे असाही नाही.

खाली नमूद केलेली चढती भाजणी काम करणे महत्त्वाचे असते.
खाजगी संस्था - प्रत्यक्ष ग्राहकांना सुविधा पुरवणे
नियंत्रण संस्था - उद्योगांचे नियंत्रण, कायद्याचे पालन होत आहे ह्याची खबरदारी घेणे वगैरे
सरकार - कायदे बनवणे, नियंत्रण संस्थास सरकारी/प्रशासकीय हस्तक्षेपापासून दूर ठेवणे व नियंत्रण संस्थाचे काम त्यांना आखून दिलेल्या नियमात होत आहे की नाही इतकेच पाहणे

अनिल सोनवणे, केदार, भरत मयेकर तसेच विप्रा ह्या सर्वांच्या मुद्द्यात तथ्य आहे.

महागाई का होते? वस्तूच्या पुरवठ्यापेक्षा मागणी वाढली तर किमती वाढतात.
व्याज दर वाढले तर लोकांच्या/उद्योगांच्या हातातला खेळता पैसा कमी होतो. लोक पैसे खर्च करण्यापेक्षा गुंतवणे पसंत करतात, कर्ज महागल्याने कर्ज काढत नाहीत. यामुळे मागणी कमी होते.
पण महागाई जर कमी पुरवठ्याने असेल - जसे दुष्काळामुळे अन्नधान्याचा तुटवडा तर व्याज दर वाढल्याने त्याचा फार परिणाम होत नाही.

फारएण्ड ,
बरोबर आहे , सेवा सुधारण्यास भरपुर वाव आहे .
शेवटचा मुद्दा पण मान्य, अर्थात त्यात चुक (कंटाळा) माझीच आहे.
अनुकंपा धरतीवर नोकरभरती चालु करावी , पेंशन अपडेशन ह्या जुन्या व खंडेलवाल कमीटीच्या
विरोधाच्या कर्मचार्‍यांच्या मागण्या पण होत्या ,

भरत मयेकर विशेष धन्यवाद, कारण mandard च्या विचारणेला तुम्ही ज्या सोप्या , सहज समजेल
असा प्रतीसाद दिलात , मी उगाचच Dear money policy , Cheap money policy , liquidity अशा
terminology त अडकलो असतो.

प्रतिसादांबद्दल सगळ्यांना धन्यवाद.

शहरी जनतेला पर्याय उपलब्ध असतात , पण लहान गावं व खेडी ह्यांना , जर ही शासकीय व्यवस्था ( आरोग्य , पोष्ट , बँकीग , परिवहन , शिक्षण ) नामशेष झाली तर जगणेच कठीण होईल.
खाजगीकरण स्पर्धेमुळे सेवा सुधरतील हे जितकं खरं तेवढेच काही अयोग्य गोष्टी शिरकाव करताहेत
हेही खरे, ह्या बँका लहान गावात जाणार नाहीत पण हा बिझीनेस त्यांना हवा आहे त्याकरिता franchise.
आता हे लोण आमच्याकडे business correspondent म्हणुन येतंय. या लोकांवर नियंत्रण ठेवणे हा तसा
कठीण जॉब होणार,

आमच्या एका शाखेने ग्राहकांचे कलेक्शनचे चेक्स कुरियरने पाठवले , पाकीट गहाळ झालंय.
ग्राहक , तिथल्या शाखेचे लोक आणी आमच्या शाखेतील लोक परेशान. पोष्टवाल्यांना आपण जाब तरी
विचारु शकतो, स्पीड पोष्ट्चं तर आपण नेटवर बघु शकतो . कुरियरवाल्याची सध्या भाषा नरम आहे ,
पण एकंदरीत असे वाटते की तो म्हणेल , कितने पैसे दिये , १० रु. ना ? उतनी हद तक बात करो.

ट्रॅव्हल्सचे रेट सिझनप्रमाणे बदलतात , एस टी वाले सिनीयर सिटीझन्स ना फक्त घेउन जाणार का?
असेही किस्से आहेत , मुलगा जिप , ट्रॅवल्सने गावातुन शहरात येतो पण वयस्करांना एस टी ने पाठवतो.

एकदा का ही व्यवस्था नामशेष झाली , तर मग ह्यांची मुजोरी सुरु होईल.

फारएण्ड,

पेपरमध्ये दुसर्‍या दिवशी चांगल कव्हरेज होतं, पण त्यात बँक बंद होत्या , ह्या ह्या मागण्या होत्या व फोटो.
ह्याने अर्थबोध होत नाही , तुमच्या प्रश्नाने मात्र मला असं वाटतं आहे की ह्याची उकल करुन सांगणे गरजेचे
आहे. यामुळे धागा हलता राहील व प्रश्न सगळ्यांपर्यंत व्यवस्थीत जाईल. आम्ही जिथे काम करतो तिथले होणारे बदल व त्याचे होणारे दुष्परिणाम हे आम्हीच लोकांना सांगायला हवेत . काही काही उदाहरणं भन्नाट असतात , पण केवळ सिक्रसी च्या नावाखाली बांधल्या जातो.

मागण्याच अशा आहेत की त्या तात्काळ मान्य होणार नाहीत , ह्यावर त्या दिवशी संसदेत प्रश्न आलेत व विषय होता असे कळले आहे. उत्तर मोघम असतं की इतक्यात आमचा तसा काही विचार नाही वगैरे , पण हा विचार केव्हाही बदलतात . पण ह्या संपामुळे त्याला ब्रेक लागतो व गती निश्चीतच कमी होते.

मी वर ज्या आमच्या अनुकंपा धरतीवर भरती व पेंशन अपडेशन ह्या मागण्याचा उल्लेख केला , त्या अशाच प्रलंबीत आहेत , आमची पेंशनचा सेकंड ऑप्शन ही मागणी १५ वर्षांनंतर मान्य झाली आहे , हे लक्षात घ्या. (अर्थात with retrospective effect).

विप्रा,

आपण बैक नि तिच्या नियमावली, कायदे, मर्यादा यावरही सविस्तर लिहाल तर वाचायला आवडेल.

>>> बँकींग उद्योगात ४० लाख कोटीहुन अधीक बचत ठेवी सर्वसामान्य, कष्टकरी , मध्यमवर्ग या घटकांच्या आहेत मात्र ७० टक्केहुन अधीक कर्जवाटप बड्या कार्पोरेट उद्योगांना केले जाते. >>>>>

ह्या विषयी नक्की काय होतय नि काय व्हायला पाहिजे त्याचेही स्पष्टिकरण केलेत तर खूप मोलाचे ठरेल

धन्यवाद !!!

बँका ह्या व्यावसायीक तत्वावरच चालतात. त्यामुळे त्यांनी खाजगीकरणाला वगैरे घाबरू नये. स्पर्धेमध्ये उतरावे.
शासनाच्या मदतीशिवाय किंवा हस्तक्षेपाशिवाय बँका अधिक कार्यक्षमपणे कार्य करू शकतात, असे मला वाटते.

<<बँकींग उद्योगात ४० लाख कोटीहुन अधीक बचत ठेवी सर्वसामान्य, कष्टकरी , मध्यमवर्ग या घटकांच्या आहेत मात्र ७० टक्केहुन अधीक कर्जवाटप बड्या कार्पोरेट उद्योगांना केले जाते>>
याच्या उलत व्हावे असे अपेक्षित आहे की काय?

<<बँकींग उद्योगात ४० लाख कोटीहुन अधीक बचत ठेवी सर्वसामान्य, कष्टकरी , मध्यमवर्ग या घटकांच्या आहेत मात्र ७० टक्केहुन अधीक कर्जवाटप बड्या कार्पोरेट उद्योगांना केले जाते>>

बँकात ठेवी ठेवणे अधिक फायद्याचे असते, असे सर्वसामान्य, कष्टकरी , मध्यमवर्ग या घटकांना वाटते. बँका बुडू शकतात, हे त्यांच्या ध्यानीमनीही नसते.

याउलट

बँकात ठेव ठेवण्याऐवजी कर्ज काढणे अधिक फायद्याचे असते, बॅंका जगल्या तर एकपट फायदा, डुबल्या तर दहापट फायदा- असे बड्या कार्पोरेट उद्योगांना वाटते. व्यावसायीक दृष्टीकोन म्हणतात ना, तो यालाच.

जनतेच्या ठेवी सुरक्षीत ठेवणे व त्याद्वारे लघु उद्योग , शेती व पुरक उद्योगांना कर्जवाटप करुन सर्वसामान्य
जनतेला रोजगार , उत्पन्नाचे साधन उपलब्ध करुन देणे, त्या विभागाचा पर्यायाने देशाच्या विकासाला हातभार लावणे हा राष्ट्रियिकरणाचा मुख्य उद्देश. मोठ्या उद्योगांना उभारणीत सहाय्य करुन रोजगार निर्मीती करणे हा पण .
Corporate houses ना मोठी कर्जे सवलतीच्या दरात मिळतात , त्यातही थकीत होतात मग परतफेडीतही सवलत घेतल्या जाते. मोठी कर्जे देउच नयेत असे नाही. पण गरजु लोकांना बँक रेट ने व मोठ्यांना सवलतीने हा प्रकार योग्य नाही.
खाजगीकरणामुळे येणार्‍या स्पर्धेला घाबरणे हा प्रश्नच नाही , पण त्यामुळे मुळ उद्देशालाच हरताळ फासला जातोय. स्पर्धेकरिता level play field असायला हवे , पण स्पर्धेसाठी विकासाच्या मुळ उद्देशाला बाजुला ठेवणे योग्य होणार नाही.

जनतेचा पैसा जनतेसाठी , नाही कॉरपोरेट लुटीसाठी .
People's money for people's welfare and not corporate loot.
हि स्लोगन ह्या संदर्भात पुरेशी स्पष्ट असावी.

विप्रा,

आपण बैक नि तिच्या नियमावली, कायदे, मर्यादा यावरही सविस्तर लिहाल तर वाचायला आवडेल.

आपण बैक नि तिच्या नियमावली, कायदे, मर्यादा यावरही सविस्तर लिहाल तर वाचायला आवडेल.
मला संदर्भ लक्षात नाही आला , तुम्हाला काय सांगता येईल ह्यावर विचार करतोय , जरुर लिहीन.
निश्चीत काय माहीती हवी आहे ?

<>
बेस रेट आल्यापासून असं करता येतं का?
कर्जासाठीचे व्याज दर ठरवण्यात पारदर्शिता, नियमितता (कन्सिस्टन्सी) असायला हवी असा रिझर्व्ह बँकेचा आदेश आहे ना|

बेस रेट सध्या ९.५ ते १०.७५ असा आहे, बँका ह्यावर +१ , +२ , +३ असे व्याजदर ठरवतात, ते deregulated आहे.
कारपोरेट हाउसेसना बेस रेटवर व ईतराना वाढीव असा हा प्रकार आहे.
ठेवींवरचा व्याजदर हा देखिल deregulated आहे. आता सेव्हिंग अकाउंट वरचा व्याजदर पण deregulate करायचा असा विचार चालु आहे .
असेही अनुभव आम्ही ऐकलेत sub prime lending rate ने कर्ज घेउन त्यापेक्षा जास्त व्याजाने त्याच बँकेत
तेच पैसे ठेवी ठेवल्या , prime lending rate is replaced now.

अवांतर : सोमवार पर्यंत दांडी (वर्षासहल ).

लेख वाचला, चान्गली माहिती.
मागल्या आठवड्यातच एका राष्ट्रीयकृत ब्यान्केत गेलो होतो. तेथिल काम अन एकन्दरीत परिस्थिती पाहून मी देवाचे आभार मानले की इसवीसन एकोणीसशे ऐन्शीच्या दशकात ब्यान्क भरतीच्या परीक्षा मी उत्तिर्ण झालो नाही व तिकडे जावे लागले नाही! Proud
फारच भयानक परिस्थिती आहे. अन हे वेळीच म्हणजे येत्या एक्दोन वर्षात सुधारले नाही तर राष्टीयकृत ब्यान्कान्चा डोलारा कोसळून देशी बाजार-व्यवहार-अर्थव्यवस्थेत हाहा:कार माजण्याची शक्यता मला तरी नाकारता येत नाहीये.

कॉर्पोरेट हाउसेसच्या बॅलन्स शीट ऑडिट होऊन पब्लिक डोमेनमध्ये येतात ना? असं काही (कमी दराने लोन घेऊन जास्त दराने डिपॉझिट ठेवणं) इतक्या उघडपणे करता येईल का? पुन्हा डिपॉझिट-लोन यातल्या व्याजाच्या फरकापेक्षा तो पैसा उद्योगात वापरून जास्त रिटर्न्स मिळणार नाहीत का?बँकाच्या कारभाराचंही ऑडिट आणि पुन्हा आरबीआय कडून परीक्षण होतं, त्यात हे पकडलं जाणार नाही का?

पुन्हा लोन घेताना तारण द्यावं लागतं. त्याचं काय?

हे प्रकार मोठ्य कॉर्पोरेट हाउसेस पेक्षा लहान बिझिनेसेस करत असतील का? माझा २० वर्षांपूर्वीचा एक अनुभव : एका पार्टनरशिप फर्मचे एकाच राष्ट्रीयीकृत बँकेत चार ओडी अकाउंट्स होते, आणि तारण म्हणून ठेवलेल्या कच्च्या मालाचे कधीही परीक्षण केले गेले नाही.

दोष सिस्टमचा/नियमावलीचा नसून ती राबवणार्‍या व्यक्तींचा आहे असे वाटते.

Pages