भाजीबाजार

Submitted by दिनेश. on 3 August, 2011 - 05:46

भाजीबाजार

भाजीबाजारात जाणे हे माझ्यासाठी एक आनंदनिधान असते. भाज्यांचा मी शौकीन आहे
असे म्हणालात तरी चालेल. मुंबईच्या बाजारात जितक्या भाज्या मिळतात, मग त्या
हंगामी का असेनात आमच्या घरी आणल्या जातातच.
अफ़िम कि सब्जी (खसखशीच्या पानाची भाजी ) सारखी एखादीच भाजी असेल, जी मी
अजून एकदाही खाल्लेली नाही. अगदी लहानपणापासून आईने मला भाजीबाजारात पाठवायला
सुरवात केली. त्यामूळे भाज्या कश्या निवडाव्यात, याचे तंत्र चांगलेच जमले. भाव मात्र मी
सहसा करत नाही, पण माझ्याकडे बघून अनेक भाजीवाले मला आपणहून चांगला भाव
देतात हे मात्र नक्की.

आता भाज्या घ्यायच्या असोत कि नसोत, एखाद्या हाय स्ट्रीटवरच्या ब्रॅंडेड मालाच्या दुकाना
बाहेरुन फ़ेरी मारण्यापेक्षा मला भाजीबाजारातून फ़ेरी मारायला कधीही आवडते. अश्याच
काही भाजी बाजाराच्या आठवणी.

१) मुंबई

आम्ही राहतो त्या कुर्ल्यामधे पुर्वी फ़ार भाज्या मिळत नसत. आम्ही राहतो पुर्वेला आणि
पश्चिमेकडची लक्ष्मणराव यादव मंडई तशी आम्हाला लांबच पडते. तिथे उत्तम भाज्या मिळतात,
पण तिथे आमचे जाणे होत नाही.
गेल्या १५/२० वर्षांपासून मात्र कुर्ल्याला चांगल्या भाज्या मिळायला लागलेल्या आहेत. स्टेशन
रोडवर असतात पण मदर डेअरीकडे जरा जास्त चांगल्या असतात. पण तरी कुर्ल्यात भाज्या
खाणारे लोक कमीच आहेत असे दिसते. नेहरुनगरात बसणारा एक वसईवाला, आणि
डेअरी रोडवर बसणारी एक आजी हे खास मर्जीतले. त्या आजींकडे गावठी बोरे आणि कवठ
मिळतात म्हणून त्या खास आवडीच्या.

माझी शाळा होती चेंबूर नाक्याला. चेंबूर फ़ाटकाजवळचा बाजार हा अगदी खास आहे. खास
करुन दाक्षिणात्य लोकांच्या आवडीच्या भाज्या तिथे मिळतात. सांबार काकडी, कोहळा,
शेवग्याच्या शेंगा वगैरे उत्तम मिळतात. तिथे पूलाखाली एक बाई मुंबई मेथी, शेवग्याचा
पाला वगैरे विकत असते तर स्टेशनजवळ एक मुलगा फ़क्त गवती चहा, पुदीना, कोथिंबीर
विकत असतो. सरोजच्या बाहेर एकाकडे खास काटळलेली चिंच, डोंगरी आवळे मिळतात.
हा बाजार आजही गजबजलेला असतो. तिथेच मणिस नावचए एक छोटे दुकान आहे, तिथे
सांबार, फ़्राईड राईस, पुलाव साठी लागणा-या भाज्या, खास कापून तयार असतात. शाळेतून
येताना मी हौसेने भाज्या घेऊन येत असे.

मग कॉलेज होते माटुंग्याला. तिथला बाजारही खासच. तिथे जरी दाक्षिणात्य जास्त असले
तरी गुजराथी लोकही खुप आहेत. त्यामूळे भाज्यांची रेलचेल असते. चिप्ससाठी लागणारी
राजेळी केळी तिथे ट्रक भरभरुन येत असतात. भरपूर व्हरायटी असते भाज्यांची. फ़ळेही
असतात. गुजराथी लोणच्यासाठी लागणा-या खास लाल मिरच्या, ओली मिरी पण तिथे
मिळते. आता तिथे पोलिस चौकि बसवल्यापासून वरदाच्या गणपतिचे प्रस्थ कमी झालेय,
पण त्या काळात हे भाजीवाले तिथला रस्ता सुशोभित करुन टाकतात. खास करुन
केवड्याच्या पानांची आणि सुपारीच्या फुलांची आरास देखणी असते.

दादर हे आमचे पुर्वापार सर्वच खरेदीसाठी आवडते ठिकाण राहिले आहे. प्लाझाच्या जवळची
मंडई सुरु व्हायच्या आधी, किर्तीकर मार्केट गजबजलेले असे. पण ते मला आवडत नसे कारण
तिथे पायाखाली कुजलेल्या भाज्यांचे ढीग असत आणि भयानक दर्प येत असे.
त्या मानाने डिसिल्व्हा रोड आणि रानडे रोडवर मात्र खास भाज्या मिळत. आता तिथे बरेच
भाजीवाले बसायला लागले आहेत. पण या दोन्ही रस्त्यावर दर्ज्यात आणि मालात बराच
फ़रक आहे. किर्तीकर मार्केटच्या बाहेरच्या बाजूला एक माणूस खास अळू, पपनस, केळफ़ूल
वगैरे घेऊन बसत असे. आता तिथेच नवरात्रातील देवी असते.
सर्वोदयच्या बाहेर जे भाजीवाले बसलेले असतात, त्यांनी केलेली भाज्यांची मांडणी पण
बघत रहावी अशी असते. तिथे एक भाजीवाला तर निव्वळ पालेभाज्या विकत असतो.
तिथल्याच एक बाई, दोन्ही हातांनी भिजवलेले वाल सोलत असतात. अश्याच काही
भाजीवाल्या आयडीयलच्या बाहेर पण बसायच्या, त्या मात्र आता नसतात.

शिवाजी पार्कचा जो रस्ता आहे, तिथे नेब्यूलाच्या बाहेर एकच भाजीवाला बसायचा.
तिथे मी उत्तरा केळकर, रिमा यांना भाज्या घेताना बघितले आहे.
गोल देवळाच्या परिसरात आणि त्याच्या मागच्या गल्लीत खास पनवेलच्या
भाजीवाल्या बसतात. त्यांच्याकडच्या भाज्या खास गावठी असतात. रानभाज्या
वगैरे मिळायचे ते खात्रीचे ठिकाण.

वसुमति धुरुंच्या चिंगलान पुस्तकात, सिटिलाईट मार्केटचा उल्लेख आहे. त्यांनी
लिहिल्याप्रमाणे चायनीज पदार्थांसाठी लागणा-या खास भाज्या तिथे मिळत.
अगदी पुर्वापार तिथे रंगीत सिमला मिरच्या, सेलरी वगैरे मिळत. आजही तिथे
काही खास भाजीवाले बसतात. पण माझी खरेदी बाहेरच. माश्यांमूळे मी आत
मार्केटमधे जात नाही.

आता लोअरपरेल ला तेवढ्या मिल्स राहिल्या नाहीत. पण २५ वर्षांपुर्वी तिथे
जाणवण्याइतपत मराठी वातावरण होते. खास मराठी सणांना म्हणजे ऋषीपंचमी,
गौरी गणपतिना, लागणा-य़ा खास भाज्या तिथे मिळत. आता तिथे फ़्लायओव्हर
झालाय.

नाना चौकात चिखलवाडीत माझा एक मित्र रहात असे. त्याच्याकडे माझे नेहमी
जाणेयेणे असे. त्याच्यासोबत भाजीगल्लीत मी जात असे. अगदी खास असा हा
रस्ता आहे. दोन्ही बाजूंना केवळ भाज्यांचीच दुकाने. आजही मी जेव्हा शक्य
असेल त्यावेळी या रस्त्यावर फ़ेरी मारतोच (मेरवानजीचे केकही घ्यायचे असतात
ना !) अस्पारगस, पाक चोई सारख्या अप्रूपाच्या भाज्याही इथे दिसतात.

मराठी वातावरण असलेला आणखी एक बाजार म्हणजे ठाण्याच्या तलावपाली
जवळचा. सणासुदीला लागणा-या खास भाज्या इथे मिळतातच पण रानभाज्याही
हमखास मिळायची हि जागा. मोहट्या, मसाल्याची पाने, कोरलाची पाने घेण्यासाठी
मी इथे जात असे. त्यामानाने गावदेवीजवळचे भाजीवाले जरा उच्चभ्रू वाटतात.

पार्ले आणि मुलुंडचा बाजार हा खास गुजराथी ठसा असलेला. पार्ल्यात उंधियुच्या
सिझनमधे दाणेवाली आणि बिनदाणेवाली मांखणी पापडी, कंद, ओला लसूण,
छोटे बटाटे, कोथिंबीर हे सगळे एकाच भाजीवाल्याकडे मिळू शकते. जांभळाचे
आकारावरुन केलेले वर्गीकरण इथेच बघायला मिळते तर खास गुजराथहून आलेली
सुकी बोरे पण इथे हमखास मिळतात.

२) भारतातले इतर बाजार

मुंबईबाहेर माझे दिर्घकाळ वास्तव गोव्याला झाले. तिथे भाजीवाले दारावर येत नसत.
मासेवाले मात्र येत असत. मासे हवे असतील तर घराच्या गेटला प्लॅस्टीकची पिशवी
अडकवून ठेवायची. पण मला मात्र पणजीच्या बाजारात जावे लागे.

तिथला जूना बाजार आणि नव्याने बांधलेला बाजार दोन्ही खास आहेत. गोव्याची
सुशेगात वृत्ती तिथेही दिसायचीच. दुपारच्या वेळी अनेक भाजीवाले तिथे भाज्यांच्या
ढिगावरच गाढ झोपलेले दिसत. गोव्यात तशा भाज्या महागच असत. जांभळे, भेंडी
वगैरे तर नगावर मिळत. पण तरी तिथल्या भाज्या खास असत. खास बेळगावहून
येणा-या भाज्या पण तिथे मिळत. तिथले अननस, मानकुराय आंबे म्हणजे माझ्यासाठी
पर्वणी असे. रानभाज्याही खास मिळत तिथे. मश्रुमच्या दिवसात तळहातावर मावतील
एवढे मश्रुम तिथे २०० रुपयांना मिळत. या मश्रुम्सवर आता गदा येणारसे दिसते. अगदी
काडेपेटीतल्या काड्याइतक्या आकाराचे मश्रुमही असत विकायला. माझ्या माहितीप्रमाणे
वासोते (बांबूचे कोवळे कोंब) विकायला बंदी आहे, पण तेही तिथे दिसतच. नवल
वाटेल, पण ओले काजू तिथे महागही मिळत आणि फ़ार कमी दिसत.
तिथल्या बाजारात सुपारींच्या पानापासून केलेल्या टिकाऊ आणि ईकोफ़्रेंडली पत्रावळ्या
मिळतात. सुबक आकाराच्या या पत्रावळी तितक्या लोकप्रिय का झाल्या नाहीत, ते
मला कळत नाही.
पणजी भाजीबाजाराची आणखी एक खासियत म्हणजे तिथे अजिबात प्लॅस्टिकच्या पिशव्या
दिल्या जात नाहीत. सर्व भाज्या कागदात बांधूनच दिल्या जात.

गोव्याला असताना, मी दर आठवड्याला कामानिमित्त कोल्हापूरला येत असे. कोल्हापूरहून
पहाटे २ वाजताची बस पकडून मी गोव्याला येत असे. त्यावेळी टाइमपास म्हणून मी
एकतर पार्वती मधला लास्ट शो बघत असे किंवा रेल्वे फ़ाटकाजवळच्या बाजारात
फ़ेरी मारत असे. माजी कारबारीन घरला वाट बगाया लागली न्हव का, असे म्हणत
अगदी २/४ रुपयांना सगळी भाजी ते मला देऊन टाकत असत. वाळुक, पोकळा
सारख्या खास कोल्हापुरी भाज्यांसाठी मी तिथे जात असे. तिथल्या एक आजी कणसापासून
काढलेले मक्याचे अगदी कोवळे दाणे विकत असत. त्याही उरलेले सगळे दाणे मला देऊन
टाकत असत. (मग स्टेशनसमोरच्या साळुंक्यांकडे कॉकटेल आइसक्रीम खाणे, हे ओघाने
आलेच.)
मायबोलीकर बॉंबे व्हायकिंग बरोबर मी एकदा नारायणगावच्या आठवडी बाजारात भटकलो
होतो. मुंबईच्या तूलनेत अगदी किरकोळ भावात तिथे भाज्या होत्या. किती घेऊ आणि किती
नको असे खाले होते. मुंबईत त्यावेळी अभावानेच मिळणारे करडईचे दाणे पण मला तिथे
मिळाले होते. त्या लोकांचा साधेपणा, सच्चेपणा बघून खुप हरखलो होतो मी.

३) मस्कत, ओमान

मस्कतला जाण्यापुर्वी तिथे भाज्या मिळतात कि नाही, का आपल्याला शाकाहार सोडावा
लागेल, अशी मला धास्ती होती. पण तिथे गेल्यावर ती फ़ोल ठरली. बहुतेक बिल्डींगच्या
तळमजल्यावर किंवा आसपास एक मोठे सुपरमार्केट होते. जगभरातल्या ताज्या, रसरशीत
भाज्या तिथे मिळत. भाज्या आणि फ़ळांच्या बाबतीत माझी तिथे चंगळच होती.

त्यापुर्वी भारतात कधी फ़्रोझन भाज्या खाल्ल्या नव्हत्या. तिथे मटार, फ़रसबी, फ़ावा बीन्स
सारख्या भाज्या मुबलक उपलब्ध असत. मला तिथे अनेक नवीन फळे खायला मिळाली.
ओले पिस्ते, इराणी डाळींबे, ओला मस्कती खजूर, किवी वगैरे मी तिथे पहिल्यांदा चाखली.
अमेरिकन ड्रायफ़्रुट वाल्यांनी तिथे त्यावेळी ऊंधियो, अळुवडी सारखे प्रकार टिनमधे विकायला
सुरवात केली होती.
शुक्रवारी सकाळी आम्ही मस्कतमधल्या कोर्निशच्या बाजारात जात असू. तिथला मासळी
बाजार आणि भाजीबाजार शेजारी शेजारी आहेत. आणि नवल म्हणजे मला तिथल्या मासळी
बाजारात देखील फ़ेरी मारायला आवडायचे. एकतर नवनवीन देखणे मासे बघायला मिळायचे
आणि तो बाजार रोज धूत असल्याने खुप स्वच्छ असायचा. शिवाय तिथे मासे कापण्यासाठी
वेगळा विभाग होता, त्यामूळे तिथे घाणही नसायची.
भाजीबाजारात सर्वच खुप स्वस्त असे, पण सगळा माल घाउकच घ्यावा लागे. १ रियालला
२४ सफ़रचंदे वगैरे मिळत. खाऊन खाऊन संपत नसत. असाच बाजार वादी कबीरला पण
भरत असे. तिथे तर त्यापेक्षा स्वस्ताई असे पण कार्टनभर माल घ्यावा लागे.
मस्कतच्या बाजारात इदच्या आसपास सबज्याचे तूरे विकायला असत. त्यांचा घमघमाट
सगळीकडे पसरलेला असे. तिथेच खजूराची फ़ूले पण असत. (खजूराचे परागीकरण हाताने
करावे लागते. तरच अप्रतिम चवीचा आणि अस्सल वाणाचा खजूर मिळतो.)
कुरुमला मस्कत फ़ेस्टीव्हल व्हायचे. त्यावेळी रोझ गार्डनमधे खास गावठी भाज्या विकायला
असत. विलायती चिंचा तर असतच पण अंबाडीची ओली बोंडे पण असत. खरे तर हि बोंडे
भारतातही कुठल्या बाजारात बघितली नाहीत कधी.

पुढे मस्कतमधे ऑथॉरिटी फ़ॉर मार्केटींग ऎग्रिकल्चरल प्रोड्यूस अशा नावाची एक सरकारी
संस्था सुरु झाली. त्यांचा स्टॉल माझ्या घराजवळच होता. खास ओमानमधे पिकवलेल्या
भाज्या आणि फळे तिथे मिळत असत. भले मोठे कांदे, टोमॅटो वगैरे तिथे मिळत असत.
माझ्या अमाप भटकंतीत ओमानच्या ग्रामिण भागात भाजी कशी पिकवली जाते, ते मी
बघत असेच. त्यामूळे त्या भाज्या मी कौतूकाने विकत घेत असे.

४ ) ताकापुना, न्यू झीलंड

लेकीकडे गेलो कि रविवारचा ताकापुना गावातला आठवडी बाजार मी चुकवत नाही.
तिथल्या गावातला मुख्य भाग त्या दिवशी या बाजारासाठी मोकळा ठेवला जातो.
गाड्यांना बंदी असते आणि गावोगावचे शेतकरी आपल्या शेतात पिकवलेली फ़ळे
व भाज्या तिथे घेऊन येतात.
अप्रतिम रंगांची, स्वादाची फळे तिथे असतात शिवाय भाज्याही. नजर तृप्त होऊन
जाते. लेकीबरोबर तिथे फ़िरत असताना, तास दोन तास कसे जातात ते कळतच
नाही. स्वस्त असल्या तरी आम्हाला फ़ारशी खरेदी करायची नसतेच. तिथल्या
शेतक-यांनी नमुना म्हणुन चाखायला दिलेल्या फ़ळांनीच आमचे पोट भरते.

५ ) नायजेरिया

भाज्यांसाठी सगळ्यात जास्त त्रास मी नायजेरियात काढला. माझे वास्तव्य
आधी बदनाम पोर्ट हारकोर्ट मधे होते. माझ्या ऑफ़िसच्या समोरच तिथला
भाजीबाजार होता. केवळ रस्ता क्रॉस करुन तिथे जाण्यासाठी मला एक आर्म्ड
बॉडीगार्ड आणि एक सहकारी यांना घेऊन जावे लागत असे. कोबी, बटाटे,
गाजर आणि त्यांच्या तिखटजाळ मिरच्या याशिवाय फ़ारसे काही मिळत नसे.

माझी हाऊसमेड माझ्यासाठी तिच्या गावाहून दुधी, पडवळ, कारली अश्या भाज्या
घेऊन येत असे. या भाज्या तिथे रस्त्याच्या कडेला उगवत. (तिथे उपलब्ध
असणारे अनेक प्राणी खायचे सोडून मी अशा बेचव भाज्या खातो, म्हणून माझी
मेड मला बुशमॅन म्हणत असे.)

मी ज्या फ़्रेंच कंपनीत काम करत होतो, ती सुदैवाने अन्नपदार्थांशी संबंधितच
होती. आमच्या कंपनीतच अनेक भाज्या युरपमधून फ़्रोझन रुपात किंवा टिनमधे
मिळत असत. शिवाय मी तिथे बरिचशी झाडेही लावली होती. पडवळ, कारली,
आपली भेंडी (त्यांची भेंडी वेगळी असते.) मूळे, मेथी यांची मी शेतीच करत असे.
तिथे आपली मायाळू, वॉटर लिफ़ किंवा चक्क स्पिनॅच म्हणून विकतात. मेथीसारखी
एक भाजी तिथे बिटर लिफ़ म्हणून विकतात. पंपकिन लिफ़ म्हणून पण एक भाजी
असते. ती पण चवीला उत्तम लागते. पण ती भाजी म्हणजे आपला भोपळा नव्हे.
पण या भाज्यांच्या तिथल्या जूड्या म्हणजे आपले गवताचे भारे असतात त्या
आकाराच्या. मी पहिल्यांदा माझ्या मेडला ती भाजी आणायला सांगितली त्यावेळी
तिने किती आणू म्हणून विचारले. तर मी आण दोन जुड्य़ा असे सांगितले. तर
तिला बिचारीला त्या खांद्यावरुन आणाव्या लागल्या होत्या.

नायजेरियाची खास भाजी म्हणजे त्यांचे यॅम. हे यॅम म्हणजे सूरण नव्हे. दिड दोन
फ़ुट लांब, आणि सहा सात इंच व्यासाचा हा कंद असतो. याचा वेल असतो.
हा यॅम फ़ार कमी भारतीय खातात, पण मला तो खुप आवडत असे. तो अजिबात
खाजरा नसतो. आतून पांढराशुभ्र असतो आणि सहज शिजतो. चवीला साधारण
बटाट्यासारखाच लागतो.
तिथे एक प्रकारची वेगळी चवळी मिळते. लाल रंगाचीच पण आकाराने चौकोनी
असते. या चवळीची खासियत म्हणजे ती भिजत घालून हाताने चोळली कि तिची
साले निघून येतात. ही चवळी वाटून, त्यात कांदा घालून ते लोक भजी करतात.
ती छान कुरकुरीत लागतात. (त्यांना करकरा असाच शब्द आहे.)
कसाव्यापासून तिथे जो गारी नावाचा प्रकार करतात, तो मात्र आपल्या सहनशक्तीच्या
बाहेरचा असतो.

माझे नंतरच्या काळात वास्तव्य, अगबारा या गावी होते. हे गाव पण लेगॉसपासून
चाळीस किलोमीटर्स वर आहे. त्या गावात काही भाज्या मिळायच्याच नाहीत.
भाज्या घेण्यासाठी मला इलुपेजूला यावे लागे. दर रविवारी सकाळीच मला निघावे लागे.
माझ्या कंपनीतल्या सर्व मॅनेजर्ससाठी मला खरेदी करावी लागे आणि ती सहज १० ते
१५ हजारापर्यंत जात असे. हि झाली भाजी. बाकिचे वाणसामान आणखी ३५ ते
४० हजाराचे. एवढी रक्कम रोख घेऊन प्रवास करणे तिथे धोक्याचेच होते. त्यामूळे
चोर मंडळी उठायच्या आत खरेदी करुन मी परत येत असे.

इलुपेजू भागात तिथले देऊळ आहे आणि भारतीय वाणसामान मिळणारी दोन तीन
दुकाने आहेत. तिथले बहुतेक भारतीय रविवारी तिथेच येतात. भाज्यांमधे निवड
करायला फ़ारशी संधी नसते. दुधी, पडवळ (हे बरेचदा कडू निघत) कारली, पातीचा
कांदा, रताळी, कोबी अशा मोजक्या भाज्या मिळत. कांदे बटाटे पण त्यांनी जे वाटे
लावून ठेवले असतील तेच घ्यावे लागत. एखादी वेगळी भाजी मिळाली तर फ़ारच
आनंद होत असे. हिरव्या मिरच्या मिळायची मारामार (त्यांच्या मिरच्या अतिजहाल
असतात. मी तरी त्या खाऊ शकत नसे.) तर कोथिंबीर कुठली मिळायला ?
नवल वाटेल, कधी कुणाला कोथिंबीर मिळाली तर एकमेकांना आम्ही फ़ोन करुन ती
गुड न्यूज देत असू. तिथे घरांच्या आजूबाजूला भरपूर मोकळी जागा असे, पण सहसा
कुणी कोथिंबीर लावत नसे. कोथिंबीर लावली तर ते घर सोडावे लागते, अशी अजब
अंधश्रद्धा, तिथल्या भारतीय बायकांमधे आहे. मी मात्र घरी कडीपत्ता, कोनफ़ळ
वगैरे भाज्या लावल्या होत्या. माझ्या एका गुजराथी भाभींने तुरीची झाडे लावली होती.
ओंजळभर तुरी त्या आम्हाला पाठवत असत.
तिथे केळ्याची, पपयांची झाडे भरपूर असल्याने, कच्ची केळी, केळफ़ूल, कच्ची पपई
वगैरे आम्हाला येताजाता तोडता येत. कै-या पण भरपूर आणि तिथे स्थानिक कच्ची फळे
खात नाहीत.
त्या लोकांना टोमॅटो अतिप्रिय पण ते त्यांना लालभडकच आवडतात. पिवळेच काय
केशरी पण चालत नाहीत. बाजारात येतात ते असेच पिकलेले आणि तिथल्या रस्त्यांच्या
अवस्थेमूळे ते वाटेतच फ़ूटलेले असत. कधीकधी तर बुरशी पण आलेली असे, मी अजिबात
ते घेत नसे.
पण तिथल्या मोठ्या सुपरमार्केटमधे मात्र टोमॅटो पेस्टचे वेगवेगळे प्रकार, पील्ड टोमॅटो,
चॉप्ड टोमॅटो असे टिनमधे मिळत. कुळीथ, मसुरांसारखी कडधान्ये पण मिळत. ती
घेण्यासाठी मात्र मी तिथे जात असे. तिथे खास आयात केलेल्या भाज्याही असत पण त्या
प्रचंड महाग असत.

तिथे लेकी नावाचा एक भाग आहे. तिथे मोती आणि पोवळी मिळतात. ती घेण्यासाठी
मी तिथे जात असे. तिथेच एक भाजीबाजारही आहे. तिथे ताज्या पालेभाज्या वगैरे मिळत.
तिथे जास्त करुन चिनी आणि जपानी लोक जातात. ताजे मश्रुम्स वगैरे पण तिथे मिळत.
पण तो भाग जरा लांब असल्याने नेहमी तिथे जाणे होत नसे.

माझा चालक मला नेहमी वेगवेगळ्या रस्त्याने फ़िरवत असे. त्या वेगातही कुठे मला
रस्त्याच्या कडेला भाजीवाला दिसला, तर त्याच्याकडची पालेभाजी मला खुणावत असे.
मी गाडी थांबवून त्या भाजीवाल्याकडे जात असे. माझ्या या तीक्ष्ण नजरेने मला तिथे
अंबाडी, सरसो अश्या पालेभाज्या मिळवून दिलेल्या आहेत. आणि त्याबाबत मी मित्रमैत्रीणींकडून
शाबासकी मिळवली आहे.

६) केनया

केनया म्हणजे भाज्यांसाठी स्वर्ग आहे. माझी पुर्ण विठाई मालिका, केनयातील
वास्तव्यामूळेच शक्य झाली. नैरोबीपासून कुठल्याही दिशेने गेले, कि रिफ़्ट व्हॅलीमधे
उतरण्यापुर्वी रस्त्याच्या दोन्ही बाजूला भाज्यांचे मळे दिसू लागतात. मला ते दृष्य तर
रिफ़्ट व्हॅलीपेक्षाही आनंददायी वाटते.

माझे आधी वास्तव्य, किसुमु या लेक व्हिक्टोरियाच्या काठावर वसलेल्या गावी होते.
ले बेसिनमधल्या या गावचे हवामान नैरोबीपेक्षा वेगळे आहे. त्यामुळॆ तिथल्या भाज्याही
वेगळ्या. तिथल्या सुकुनी (भाजीबाजार) मधे रविवारी खास भारतीय भाज्या मिळत.
सर्वच भाज्या चवदार असत. माझ्या परसात पण मी खुप भाज्या लावल्या होत्या.
तिथे एक खास प्रकारचे सोयाबीनचे दाणे मिळत. त्या केसाळ शेंगा सोलायला कठीण
असत पण आतले दाणे मात्र निव्वळ चवदार असत. तिथे कसावा पण खुप मिळायचा.
त्याची कापं, भाजी, वडे असले अनेक प्रकार आम्ही करत असू.

पण नैरोबीचे थंडगार हवामान (काल रात्री तपमान १० अंश सेंटीग्रेड होते) भाज्यांना खुप
मानवते. इथले सिटी मार्केट रविवारी तर गजबजलेले असते. अनेक प्रकारच्या ताज्या
भाज्या आणि फळे यांचे नुसते ढिग लागलेले असतात.
ओला राजमा, ओला मटार, ओले तुरीचे दाणे हे सगळे सोललेलेच मिळते. भाजीचे
फ़णस, केळफ़ूल इतकेच नव्हे तर माइनमूळे, भोकरे, ओली हळद पण मिळते.
इथली गवार आणि फ़रसबी इतक्या अप्रतिम चवीची असते, कि तशी चव मला भारतातही
कधी चाखायला मिळाली नाही.
केवळ भारतीच नव्हे तर विठाईमधे आलेल्या सर्वच भाज्या अगदी मुबलक प्रमाणात
असतात. इथे मिळाणारी ताजी कोथिंबीर तर मला मुंबईतही दिसत नाही. मला फ़ारश्या
भाज्या घ्यायच्या नसतात तरी केवळ नजरसुखासाठी मी तिथे फ़ेरी मारतो.

तर असे आमचे भाजीपुराण !!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

खासच दिनेशदा... Happy
लहानपणी कल्याणच्या भाजीमंडईत फिरतांनाही मजा यायची.
आजही कल्याणला गेल्यावर एक फेरी भाजीमंडईत नक्कीच असते.

भाजी पुराण मस्त आहे.पुण्यात आम्ही डेक्कन वर राहायचो तेव्हा समोरच सर्व भाजी वगैरे असायचे. कधीही खाली उतरा व भाजी आणा. डेक्कन वर चितळे समोरही कवळ्या काकड्या व तोंडली पेरू लै भारी. भाजीवाले व बायका आम्हाला ओळखत. मी शाळेचा टिफिन न्यायची जी पिशवी असते ती डोक्यावर मुसलमानी टोपीसारखी घालून ह्या बाजारातून आईने सांगितलेले घेउन येत असे. १० - २५ पैश्याचे कोथिंबीर, मिरची चे वाटे, खोबर्‍याचे तुकडे. इत्यादी. पुणेरी असल्याने मटार घेणे म्हणजे सूख अल्टिमेट.

रविवारी कधीकधी बाबांबरोबर मंडईतवारी. कोवळ्या भेंड्या इत्यादी फेवरिट. इथे आल्यावर बडी चौडी!! ( मी नव्हे, भाजीबाजाराचे नाव आहे. ) पुण्यासारखी तोंडली मिळत नसत. मी चारमिनारच्या समोरही भाजी घेतली आहे. फ्रेश भाजी घेतली की अगदी मस्त वाटते. काकडी वगैरे खातच घरी यायचे.

दिनेशदा मस्तच.

मलाही भाजीमार्केटमध्ये फिरायला खुप आवडते. मी दर रविवारी न चुकता मुद्दाम भाजीमार्केटमध्ये जाते. कारण सकाळी आमच्याइथे अलिबागच्याही भाज्या विकायला आलेल्या असतात. त्यात तोंडली, भाजे (माठाची जाड देठे), आंबाडे, मोठी वांगी, कारली ह्यांचा समावेश असतो.

रानभाज्या चालु झाल्यावर तर रोज ऑफिसवरुन घरी जाताना माझी भाजीमार्केटमध्ये चक्कर असते. खर सांगायच तर आमची जी भाजीची मंडई आहे त्यात मी कधी जातच नाही. कारण मला असे वाटते की तिथे शिळी भाजी असेल. मी नेहमी बाहेर बसणार्‍या बायकांकडूनच भाजी घेते. त्यांच्याकडे अगदी ताजी ता़जी भाजी असते.

मी जेंव्हा वाशीत जाते तेंव्हा डेपोच्या पुढे जे मार्केट आहे तिथे जाते. तिथेही मला वेगवेगळ्या भाज्यांचे दर्शन होते.

दादरलाही मी दोन्-तिन वेळा भाजी मार्केटमध्ये गेले आहे. तिथल्या रानडेरोडवरुन मी बर्‍याचदा भाजी घेतली आहे.

मॉलमधल्या भाज्यांच्या विभागातही मी नेहमी फेरफटका मारते. लगेच माझी मुलगी तिच्या वडीलांना बोलते. झाल आईच इथे चालु भाज्या बघण्याच काम. तिथे तुम्ही दिलेल्या बर्‍याचशा भाज्यांचे दर्शन होते.

पेणवरुन येताना रस्त्यात भाजीचे स्टॉल लागतात. आता नेमका एरिया मला आठवत नाही. तिथुनही मी भाज्या उचलते.

मस्तच दिनेशदा... Happy
मलाही भाजी मार्केटमध्ये जायला आवडते. त्यांनी भाज्यांची मांडलेली आरास बघायला आवडते. वसईवाल्यांकडून भाजी घ्यायला जास्त आवडते. टोपल्यांमध्ये केळीच्या पाणांमध्ये ठेवलेली भाजी मस्तच वाटते बघायला.

नुकताच ( ३१ जुलै) मुलाचा वाढदिवस झाला मी सुट्टी नसल्याने सौदीतच होतो. मग मुलाला एक भली मोठी मेल केली. त्यात आता मोठा होतोय ना मग आता हे शिकायचय तुला अस म्हणून एक यादीच पाठवली त्यात पहिल्या नंबर वर आजोबांबरोबर भाजी बाजारात जा, कोणत्या कोणत्या भाज्या असतात ते पहा, चांगली भाजी निवडून, भाव करून विकत घे, पैसे दिल्यावर उरलेले मोजून घे हेच लिहिल मी. Happy

दिनेशदा , मस्त लेख. मि म्हणजे ह्याबाबतित देइ वाणि घेइ प्राणि . त्यामुळे हे वाचताना खरच तुमच्याबद्द्ल ऊर भरुन आला.

दिनेशदा, तुमच्या सगळ्या भाजीबाजारांतून मस्त फेरफटका झाला.

माटुंग्याला खरच छान भाज्या मिळतात. सेंट्रल माटुंगा स्टेशनातून बाहेर आल्यावर समोरच रेलिश नावाचं रेस्टॉरंट होतं (आता त्याचं नाव बदललय बहुधा) त्याचाबाहेरच एक फळवाला बसतो. त्याच्याकडे हिरव्या मिरीचे घोस बरेचदा असतात (किंवा मोसमात असतील). माटुंगा मार्केटमधला गुलाबभाई भाजीवाला घरपोच भाजी देतो. अतिशय छान, अतिशय स्वच्छ, अतिशय सुरेखपणे पाठवतो. पण त्याचबरोबर अतिशय पैसेही घेतो. Happy

नंतरची आठवण आमच्या डोंबिवलीच्या बाजाराची. बाजीप्रभु चौकात सकाळी जवळपासच्या गावातल्या आगरी बायका त्यांच्या मळ्यातल्या भाज्या घेऊन यायच्या. एकदम ताज्या. तशा मळातल्या भाज्या नांदिवली रोडवर मिळायच्या. आता नांदिवली रोड म्हणजे एक शहरच झालंय. पण २० वर्षांपूर्वी तिथे सकाळी फिरायला जायला खूप छान वाटायचे. अगदी गावात आल्यासारखे. रविवारी तिथून फिरून येताना तिथल्या मळ्यातल्या भाज्या दामदुप्पट भाव देऊन विकत आणायचो. तसंच डोंबिवली एमआयडिसीतून अंबरनाथकडे जाणार्‍या सुरेखशा रोडवर ड्राईव्ह करून येताना तिथल्या मळ्यातल्या भाज्याही एकदोन ठिकाणी विकत मिळतात त्या घेण्याचा प्रोग्रॅम असायचाच.

प्रभादेवीला दै. सामनाच्या ऑफिससमोर एक छानशी मंडई आहे. छोटी पण परिपूर्ण. तिथे खरेदी करायलाही मला आवडायचे. इथे पालकाच्या जुडीतच दोन-तीन शेपूचे दांडेही बांधलेले असतात. कारण इथे बरेच उत्तर भारतीय लोकं राहतात आणि त्यांना तसं लागतं. Happy

दादरला रानडे रोड आणि गोलदेवळाजवळचा (वाट्याने विकणार्‍या भाज्या) बाजार तर नेहमीचाच. फक्त पालेभाज्या विकणारा ... त्याच्याकडे सगळ्या सगळ्या प्रकारच्या पालेभाज्या असतात.

********************

गोव्याला असताना, मी दर आठवड्याला कामानिमित्त कोल्हापूरला येत असे. कोल्हापूरहून
पहाटे २ वाजताची बस पकडून मी गोव्याला येत असे. >>>> याबद्दल खास _____/\_____

देइ वाणि घेइ प्राणि >>>>> सुनिल परचुरे ... खुप दिवसांनी ऐकलं हे. आमच्या मातोश्री आम्हाला बाजारमास्तरकी करायला पाठवायच्या तेव्हा हे वाक्य हमखास पढवून घ्यायच्या. Proud

ललित गटात "नॉस्टॉल्जिया" च्या वारूवर बसून सफर केली म्हणजे कोणत्या प्रकारचा आनंद मिळतो तशीच काळाच्या ओघात आपण नेमके काय 'मिस' केले याची हुरहूर लावणारा अनुभव घ्यावासा वाटणारा हा "भाजी" लेख. अगदी पु.ल. देशपांडे यांच्या 'माझे खाद्यजीवन' ची झटदिशी आठवण आली. तोही असाच एक जबरी लेख आहे.

कोल्हापुरात 'कपिलतीर्थ' भाजीमंडई घरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असल्याने मी स्वतः वेळोवेळी हा भाजी खरेदीचा आनंद घेतो. [मात्र 'पोकळा मेथी पाचला एक आणि आठाला दोन' अशा फंदात पडत नाही. बागवान किंवा बागवानी जे काही पिशवीत टाकेल त्याचा हिशोब देणे. यामुळे तिथेही बर्‍याच छानपैकी ओळखी होतात]. कोबी, पडवळ, गवार, घेवडा, दोडका, भेंडी, वांगी, ढब्बू मिरची ही मंडळी तर नित्यातील पण ज्यावेळी शेपू आणि कांद्याची हिरवी पात तसेच मटार बाजारात आगमन करतात त्यावेळी भाजी खरेदीला विशेष हुरूप येतो. बाजाराचा रंग अधिकच हिरवा होतो

आम्ही 'पाटील' मंडळी मांसाहारी असल्याने भाजी मंडईकडे वारंवार जावे लागतेच असे नाही, पण मनुष्यस्वभावाचे विविध नमुने पाहावयाचे असतील तर रोज एखादा फेरफटका, अगदी निरुद्देशपणाने असला तरी, मारावा. मस्त वाटते.

दिनेशदा तुम्ही कोल्हापुरातील स्टेशन फाटकालगतच्या भाजीबाजाराचा उल्लेख केला आहे, पण तो आता 'इतिहासजमा' झाला. शहर अंतर्गत वाहतुकीचा पुरता बोजा उडाल्याने त्यावर जे काही अनेकविध उपाय केले जात आहेत त्यापैकी एक कुर्‍हाड या स्टेशन भाजीविक्रेत्यावर बसली आणि आज तिथून बाजार पूर्णतया हलविला गेला आहे. पण दुर्दैवाने त्यांचे पुनर्वसन आज तारखेला महानगरपालिकेने केलेले नाही. हातावरचे पोट असणारे ते किरकोळ विक्रेते दर आठवड्याला एकदोन स्थानिक पुढार्‍याना हाताशी घेऊन पार्वती टॉकिज परिसरात 'रास्ता रोको' आंदोलन करतात, तास दोन तास अधिकार्‍यांसमवेत बाचाबाची होते....मग परत शांत शांत.

(एक बदल : स्टेशन रोडवरील ज्या आईसक्रिम पार्लरमध्ये तुम्ही कॉकटेल खाल्ले, ते साळुंके नसून 'सोळंकी' ~ राजस्थानातून कोल्हापुरात येऊन त्यानी आईस्क्रीम धंद्यात नावलौकिक मिळविला आहे.)

अशोक, तो बाजार उठला ! फ़ार वाईट वाटलं.
आणि हो ते सोळंकीच. रात्री खुप वेळ उघडे असते.

मामी, ती पावलोची बस माझी खास आवडती. चार तासात कोल्हापूरहून
गोवा. एरवी सात तास लागत.
पण कोल्हापूर रात्रभर जागेच असते. रात्री कधीही स्टॅण्डजवळ जाग असते.
पहाटे पाचला देवीचे मुखदर्शन होते आणि त्याआधीच लोक तिथे बसलेले
असतात.
मी पण त्यात असायचो.

मला पण भाजी बाजारात जायला फार फार आवडतं, अगदी मॉल पेक्षाही जास्त.( लहान पणी कधी ही आवडल नाही )
I am a true foodie. तिथलं वातावरण खूपच inspiring असतं. बरेच वेळा फूड आणी ट्रॅव्हल चॅनल्स वर वेगळ्या वेगळ्या देशातले भाजी बाजार दाखवतात तेंव्हा अगदी पहात रहावसं वाटतं.

अमेरिकेत Outdoor farmer's markets ही साधारण मे ते ऑक्टोबर एंड किंव्हा नोव्हेंबर पहिला आठवडा पर्यंत अशी असतात. जवळपास चे शेतकरी, फळांच्या बागा (छोट्या प्रमाणावर ) असणारे, घरगुती, चीझ, ब्रेड, जॅम,जेली, पिकल्स बनवणारे ह्यांना सिटी तर्फे स्वताचे प्रॉडक्ट्स विकायला छान संधी असते. हे नॉर्मली फक्त शनिवार रविवार असतात(छोट्या गावात ). थंडी पडायला लागली की हे आउटडोअर स्टॉल्स बंद होतात. http://www.explorechicago.org/city/en/supporting_narrative/events___spec...

मोठ्या शहरात, मोठी मंडई सारखी मार्केट्स वर्षभर असतात. सियाटल आणी सॅन फ्रॅन च खूप प्रसिध्द आहे. अश्या ठिकाणी, ऑरगॅनिक भाज्या, फळे, आणी सगळं सीझनल मिळू शकतं.

आता फोटोसाठी जोगवा मागावा लागेल. माझ्याकडे तरी फक्त आठवणीच आहेत.
आठवडी बाजार ते मोठी मंडई... प्रत्येकाची वेगळीच मजा असते.

वाह..
मी भारतात असताना भाजीबाजारात जास्त गेलो नाही... इथे फ्रान्समधे भाज्या अक्षरशः शोधाव्या लागतात. न्युझिलंड प्रमाणे इथेही आठवडाबाजार असतो हे बघुन आश्चर्य वाटतं! आता हे फोटो, एक आठवडाबाजारातला आणि दुसरा दुकानातला, (फळं-भाजी कुठुन आयात झालीये तेही किमतीबरोबरच लिहिलेलं दिसेल)

सॅम,
मग मला पण इथल्या बाजाराचा फ़ोटो काढावा लागेल. ओसंडून वहात असतो.(स्थानिकच माल जास्त असतो.)

हा नागपूर चा भाजी बाजार

दारावर विकायला येणारा इंदौर चा भाजीवाला..त्याच्याकडे पाहून इतक्या जड हँडलने सायकल कशी चालवत येतो, असे वाटले.

आणी हा चीन चा भाजी बाजार

कार्ल्यापेक्षा दुधी लहान

अजून कित्येक हिरव्या भाज्यांची ओळख झाली नाहीये

सह्हीच फोटो ग वर्षुताई. नागपूरचा फोटो लै झ्याक!

कारलं आहे ते? शिव शिव. आणि ते राक्षसी कारलं आणि तो गोंडस दुधी विकतय कोण? तर एक चवळीची शेंग! Proud

दिनेशदा, विषय छान, नेहेमीप्रमाणे, निवान्त वाचेन. तुमचे फोटो पण येऊ द्यात जोडीने

सॅम मला तर वाटलं होतं कि फ्रांस चा भाजी बाजार अगदी प्रसिध्ध. कारण इथल्या फूड शोज वर दाखवतात व वर्णन पण खूप करतात. बर्याचश्या ब्लॉग्स वर पण त्याचे वर्णन वाचलय.
म्हणून माझ्या मनात फ्रांस ला त्याच्या करता पण भेट द्याययच खूप मनात आहे.

दिनेशदा, सगळ्यांच्या मनातल्या एका कोपर्‍यालाच हात घातलात; अर्थात, तुमच्या अनुभवाला बहुदेशीय छान झालर पण आहेच.
<< अश्याच काही भाजीवाल्या आयडीयलच्या बाहेर पण बसायच्या, त्या मात्र आता नसतात. >> तिथं आतां दोन वसईवाले टिपीकल तिथल्या भाज्या घेऊन बसतात.
गिरगावात प्रार्थनासमाज नजीकचा भाजीबाजारही माझा लहानपणीचा आवडीचा. तिथं मलबार हिलवाल्या गिर्हाईकांसाठीचीं दुकानं व इतरांसाठीची हीं समाज व्यवस्थेची प्रतिकं असल्यासारखीं; पहिलीं, जरा उंचावर, नीट,सुबकपणे मांडून ठेवलेल्या भाज्या व विक्रेता-मालक शुभ्र कपड्यात, टोपी व मग्रूरी चढवून, तर दुसरीं खालीच टोपल्या ठेऊन , घाऊक मार्केट किंवा वसई-विरारहून आणलेल्या भाज्या 'अ‍ॅज इज, व्हेअर इ़अ' वर्णनाला शोभेशा ठेवलेल्या व भाजीवाला घामट चेहर्‍यावर ओळखीचं हंसू उपजतच असलेला !
पहिल्या वर्गातल्या दुकानात घासाघीस करणं अप्रतिष्ठेचं व अशोभनीय तर दुसर्‍यात, भावाची घासाघीस हा स्थायीभावच ! [ आतां मी भाजीसाठी घासाघीस कधीच करत नाही पण तेंव्हा आईकडे सिनेमाच्या 'मॉर्निंग शो'साठी पैसे मागण्यापूर्वीं स्वस्तात भाजी आणलीय , हे तिला पटवावं लागायचं ! Wink ]
गणपतिदरम्यान रायगड जिल्ह्यात कोकण महामार्गावर लगतच्या मळ्यातल्या भाज्या विकायला बसतात;त्या पहात बसणं, भरपूर विकत घेणं व तो ताजेपणा मुंबईतल्या जवळच्याना वाटत सुटणं हाही आनंद माझ्यासारखे कित्येक जण लुटतच असतात !

दिनेशदा, सगळ्यांच्या मनातल्या एका कोपर्‍यालाच हात घातलात; अर्थात, तुमच्या अनुभवाला बहुदेशीय छान झालर पण आहेच.
भाऊसाहेब,
पुर्ण अनुमोदन !
Happy
दिनेशदा,
मला पण असंच म्हणायचं होतं.
Happy

खास भाज्या विकत घेण्यासाठी बाजारात जाणं हे मला, घरी नवीन होतं, शेतात ३-४ भाज्या या नेहमी असायच्या, घरा शेजारी असे भाज्या असणारे १०-१२ घरं, त्यामुळे भाज्या भरपुर, मुख्यतः वांगी(हिरवी-काटेरी)शेवगा,ढब्बु मिरची,टोमैटो,गवारी,काकडी,वालाच्या शेंगा,बीन्स,पडवळ,घेवडा, भेंडी, दोडका, मुळा, गाजरतसेच मेथी इतर पालेभाज्या असतात. पण भाज्यांची माहिती मात्र मला खुप कमी, आता भाज्यांच महत्व थोड कळतयं पण मी गावापासुन दुर आहे.
पानमळ्यातुन शेवग्याच्या शेंगा २ पोते (२-३ हजार शेंगा) एकदम निघायच्या,कॉलेजला असताना भावाबरोबर मी विकायला कधी कधी इचलकरंजीला जायचो, दोघे वेगवेगळ्या ठिकाणी त्या घेऊन विकायचो, भावाकडुन नेहमी त्याच्याकडील संपवुन माझ्याही राहिलेल्या विकायचा, याच कारण (मी जास्त शाळा शिकलेला असल्यामुळे) हे मला नंतर नंतर समजल.

आता अलिकडे ३-४ वर्षात गावी गेलो कि आठवडे बाजारात फिरायला खुप आवडतं, जुने मित्र,सवंगडी एकाच ठिकाणी भेटतात, तिथल्या काही अस्सल भाज्या, वर स्वस्ताई पाहुन हेवा वाटतो.
दिनेशदा, तुमच्यामुळे मला लिहिता देखील यायला लागलं...
Happy

लेख अप्रतिम झाला आहे.. मला पण भाजी मडई मधे जायला खुप आवड्ते. त्या सर्व भाज्याचे ढईग बघुन च खुप
मस्त वाट्ते....

Pages