सिंघमच्या यशाचं रहस्य काय ?

Submitted by असो on 2 August, 2011 - 21:51

सिंघमच्या यशाचं रहस्य काय ?

दबंग येऊन गेला आणि सुपरहीट झाला त्याला खूप दिवस झालेले नाहीत. यातला नायक एक भ्रष्ट पोलीस अधिकारी आहे तरीही तो बरीच चांगली कामे करतोय. अन्यायाच्या विरूद्ध लढतोय. थोडक्यात काय तर प्रॅक्टिकल नायक आहे (मूर्ख नाही). जंजीर येऊन गेल्याला आता ३५ वर्षे तरी होऊन गेली असतील. इतक्या वर्षात एक पिढी आणि संस्कृती बदलली.

जंजीर आला तेव्हा समाज कसा होता ?

भारताला स्वातंत्र्य मिळून २५ एक वर्षे होऊन गेलेली होती. स्वातंत्र्याच्या आधी घरदार फुंकून इंग्रजांच्या विरूद्ध लढलेले नेते राजकारणात होते. या नेत्यांची, त्यांच्या नि:स्वार्थी इमेजची, त्यांच्या त्यागाची मोहिनी समाजावर होती. उच्च नैतिक मूल्यांचा बोलबाला होता. किमान सार्वजनिक जीवनात तरी लोकांची हीच अपेक्षा होती. लाच घेणे, काळाबाजार इ. समाजाच्या दृष्टीने गंभीर गुन्हे होते. लोकांमधे भाबडा आशावाद होता. काळे किंवा पांढरे व्यक्तिमत्व अशी सरधोपट विभागणी लोकांच्याच मनात होती. ग्रे शेडस असलेल्या व्यक्तिरेखा अ‍ॅक्सेप्टेबल नव्हत्या असं नाही पण त्यांच उदात्तीकरण मान्य नव्हतं. विनोबा भावे, बाबा आमटेंसारखे लोक समाजात होते. त्याच वेळी २५ वर्षांच्या प्रवासात हाजी मस्तान, करीमलाला अशी प्रॉडक्टसदेखील प्रस्थापित होत होती.

सिनेमावाल्यांना सामाजिक परिस्थितीचं, लोकांच्या मानसिकतेचं बरोब्बर भान असतं. त्यांच्या अपेक्षांचंच ओझं वागवणारा नायक त्यांनी जन्माला घातला आणि लोकांनी जंजीरमधे त्याला डोक्यावर घेतला. एकीकडे उच्च नैतिक मूल्यांना मान्यता आणि त्ञाच वेळी समाजात काही लोकांच्या काळ्या धंद्यांविरूद्ध असलेली अगतिकता यामुळे खदखदत असलेल्या असंतोषाला अमिताभरूपी नायकाने वाट करून दिली. अर्थात सगळ्याच प्रकारचे सिनेमे लोक डोक्यावर घेत असतात. रोज रोज कुणी गोड खात नाही तसच रोजच कुणी तिखटही खात नाहीत. पण काही सिनेमे हे ट्रेंडसेटर म्हणूनच लक्षात राहतात.

पुढे दीवार मधे याच प्रेक्षकांनी अँटी हिरोदेखील स्विकारला. तरीही त्यात सत्य असत्य यांचा झगडा दाखवण्याचं चातुर्य होतच. सत्याचा विजय हा भारतिय मनाला भुरळ घालत आलेला परंपरागत संस्कार आहे म्हणूनच पडद्यावर आपल्या आवडत्या नायकाचा अपेक्षित शेवट त्यांनी मान्य केला. उच्च नैतिक मूल्यांचा विजय पुन्हा एकदा बाजी मारून गेला.

१९९१ नंतर मात्र चंगळवादी संस्कृती फोफावली. खाऊजा धोरणाने अमूलाग्र सामाजिक बदल देखील झाले. या बदलांवर सिनेमावाले लक्ष ठेवून होते. म्हणूनच नैतिक मूल्यांबद्दल बोलनारा नायक त्यांना नकोसा वाटू लागला. एकीकडे परंपरागत संस्कार आणि बदलत चाललेली पिढी यातली तडजोड म्हनून चुलबूल पांडेरूपी नायक पडद्यावर अवतीर्ण झाला. हा नायक सध्याच्या परिस्थितीचं अचूक प्रतिनिधीत्व करीत होता. हेच या सिनेमाचं खरं यश.

म्हणजे उच्च नैतिक मूल्य नाहीशी झाली का ? तसं वाटत नाही. या मूल्यांचा उच्चार करण्याइतकं नैतिक धैर्य असलेली माणसं दिसेनाशी झाली. म्हणूनच कुणाच्या तोंडी मूल्यांचा पुरस्कार बेगडी वाटू लागला. समाजात आदर्श नसले म्हणजे पडद्यावर असून चालत नाही. समाजासमोर नेहमी आदर्श असावा लागतो. दबंगच्या वेळी असा कुणीही आदर्श दिसून येत नव्हता.

अशातच घोटाळ्यांची मालिका सुरू झाली. मंत्री, आमदार, खासदार, उद्योगपती, पोलीस सगळेच तुरूंगात जाताहेत असं चित्र अचानक समोर आलं. लोक अगतिक होतेच पण त्यांच्या उरल्यासुरल्या भावनांचा पुरता कडेलोट झाला.

आणि अमावस्येच्या रात्री एखादी पणती लुकलुकताना दिसावी आणि त्या पणतीने सगळा आसमंत उजळून निघावा अशा पद्धतीने अण्णांच्या आंदोलनात समाजाला आपला आदर्श हिरो सापडला. काही तासात अण्णा नॅशनल लीडर झाले. त्यांचं आंदोलन राष्ट्रीय आंदोलनात परिवर्तित झालं. पुन्हा सार्वजनिक जीवनात उच्च आदर्श मूल्य प्रस्थापित झाली.

या पार्श्वभूमीवर बाजीराव सिंघम पडद्यावर अवतीर्ण झाला. कुठलीही तडजोड मान्य नसणारा, नोकरीची गरज नसणारा, कुठल्याही क्षणी राजीनामा देऊन गावी जाऊन मेहनत करून खाण्याची तयारी असणारा हा नायक लोकांना अपील झाला. मेरी जरूरते कम है... हे या नायकाचं स्पष्टीकरण लोकांना भावलं. मनात आणलं तर पोलीस खातं काय करू शकतं हा आशावाद या सिनेमाने जागवला. अजूनही सर्व काही संपलेलं नाही, एखाद्या अण्णांप्रमाणेच एखादा सिंघमही हवा हा इशाराच भ्रष्ट व्यवस्थेला या यशातून मिळतोय.

समाज बदललेला नाही. त्याची मुल्यं पूर्णपणे ढासळलेली नाहीत हा सकारात्मक आशावाद या सिनेमाच्या यशात दिसतो. आदर्श नायक हा भाबडेपणा आजच्या तथाकथित प्रॅक्टिकल पिढीलाही आवडतोय हे चित्र सुखावह आहे. त्यासाठी भडक मांडणी, अतर्क्य दृश्य या सा-यांकडे स्मार्ट प्रेक्षकही दुर्लक्ष करतोय. त्याला आत काही तरी सुखावणारं या सिनेमात आहे हे मान्य करायलाच हवं. यातलं गावातून शहरात गेल्यावर यशाच्या धुंदीत आपल्याच माणसांकडे तुच्छतेने पाहणारं "गोट्या" उर्फ "सिद्धार्थ" हे पात्र वरवर अनावश्यक जरी वाटलं तरी आत्ममग्न अशा पिढीचं ते प्रातिनिधीक चित्र दिग्दर्शकाने मुद्दामून उभं केलय असं वाटतं.

भ्रष्ट व्यवस्थेला उघड उघड आव्हान देणारा, उच्चपदस्थांना शिव्या घालणारा नायक प्रत्येकाला गुदगुल्या करून जातो हे ही खरंच !! सिंघम दिल्लीपासून गल्लीपर्यंत , मल्टीप्लेक्सपासून एकपडदा सिनेगृहात आणि कोथरूडपासून येरवड्यापर्यंत सर्वत्र अजूनही हाऊसफुल्ल चालू आहे. प्रोमोजचा मारा नसताना, मुन्नी, शीलासारखं कुठलंही आयटेम साँग नसताना, कुठलाही पब्लिसिटी स्टंट न करताही धो धो चालतोय.

कदाचित सध्या चालू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सिनेमा रिलीज होण्याचं अचूक टायमिंग हेच सिंघमचं खरं यश असावं !!

गुलमोहर: 

.

मस्त लिहिलंय..

प्रोमोजचा मारा नसताना, मुन्नी, शीलासारखं कुठलंही आयटेम साँग नसताना, कुठलाही पब्लिसिटी स्टंट न करताही धो धो चालतोय.

खरे आहे. एवढी मारधाड असुनही कुटूंबासोबत बघण्यासारखा आजच्या काळातला दुर्मिळ चित्रपट Happy

"गोट्या" उर्फ "सिद्धार्थ" .................ते नाव गौतम होते ......... Happy

मुळातच सिनेमा मधे कुठेही अ‍ॅक्शन सोडुन इतर कशाही बाबतीत अतीपणा नाही आहे...किंवा चित्रपट चालवण्यासाठी आयटम साँग नाही आहे...द्विअर्थी संवाद नाही आहे...नाही कुठला पांचट्पना.......फार दिवसांनंतर स्वच्छ चित्रपट बघण्यात आला...........

तसा मी चित्रपट फारसा पहात नाही.पण तुम्ही या चित्रपटाचे केलेले समीक्षण आवडले.म्हणून एखादी पायरेटेड सीडी मिळाली तर पाहतो.कारण मी खेडेगावात रहात असून तेथे मल्टिप्लेक्स नाही.या चित्रपटाबद्दल जिज्ञासा निर्माण केल्याबद्दल आपले अनंत आभार.धन्यवाद. Happy

अनिलजी,
छान माहिती आणि विष्लेशण.
Happy
प्रोमोजचा मारा नसताना, मुन्नी, शीलासारखं कुठलंही आयटेम साँग नसताना, कुठलाही पब्लिसिटी स्टंट न करताही धो धो चालतोय.
अनुमोदन ! जनता त्रस्त आहे या एकुण व्यवस्थेविरुद्ध !

अनिलजी
मस्त लिहलाय लेख...:स्मित:
एखाद्या अण्णांप्रमाणेच एखादा सिंघमही हवा हा इशाराच भ्रष्ट व्यवस्थेला या यशातून मिळतोय.<<<<
आज अशा एका सिंघमची खरोखर गरज आहे देशाला.

सर्वांचे मनःपूर्वक आभार ( सिनेमाची समिक्षा नाही तर अशा सिनेमांच्या रिलीज होण्याच्या टायमिंगबद्दल सहजच मनात विचार आले त्यानिमित्ताने हा मागोवा घेतलाय Happy )
मार्मिक प्रश्न बाळू जोशी ;). लोकपाल हा सिंघम बनेल कि चिंगम हे त्याच्या गरजा किती यावर ठरावं. Happy

अनिल सोनावणे लेख आवडला, चांगल लिहिलय

एखाद्या अण्णांप्रमाणेच एखादा सिंघमही हवा >>> पद्धत वेगळी असली तर ते महत्वाचे नाहि. अण्णा म्हण़जे सिंघमच आहेत.

सलमान खानचा पंखा असल्याने त्याचे हल्लीचे सगळे मारधाड वाले चित्रपट आवडले. त्याच पठडीतला असल्याने सिंघम ही आवडला. मी अजय देवगणचा पंखा नाहीय पण त्याचे खानावळींसारखे नखरे नसतात. याच्याशी भांडण मी नं १ वैगेरे वैगेर... त्याच्यामुळेच त्याचा हा चित्रपट बघीतला + अजय अतुल च संगीत आहे म्हणुनही बघीतला.
पण सिंघमच वर केलेल विश्लेशन बापरे...ईतका लोक विचार करतात? आणि तो सुद्धा एवढ्या गंभीरपणे....खतरनाकाच ! Happy

बंडुपंत.. चिखलात कमळ उगवावं तसच या असंबद्ध लेखात तुम्ही चांगलं तेव्हढंच पाहीलत !! गहिवरून आलं. कदाचित तो तुमचा उमदा स्वभाव असावा ;).