भ्रष्टाचार- मानसिकता आणि दिवार

Submitted by योग on 31 July, 2011 - 07:21

भ्रष्टाचार- मानसिकता आणि दिवार

मुळात एखादा मनुष्य (पुरूष वा स्त्री) भ्रष्टाचार का करतो हे एक न सुटलेले कोडे आहे. सद्य स्थितीत हा प्रश्ण जरा जास्त गुंतागुंतीचा वाटत असला तरी मुळात भ्रष्टाचार करायची वाईट प्रवृत्ती माणसात आधीपासूनच आहे असे म्हणायला वाव आहे. सुबत्ता वाढली तशी भ्रष्टाचाराचे प्रमाण आणि आकडे वाढले. शंभर रुपयाच्या भ्रष्टाचाराची नोंद होत नाही, दखल घेतली जात नाही. पण करोडोचा भ्रष्टाचार मात्र बातमी होतो एव्हडाच काय तो फरक आहे. मुळात या अपप्रवृत्तीच्या मानसिकतेकडे दुर्लक्ष केले जात आहे असे चित्र आहे. तापाचे जंतू आपल्या शरीरात आधीपासूनच असतात म्हणे. भोवतालचे हवामान त्या जंतूंच्या पुरक झाले की ते "जागे" होतात. तेव्हा त्यासाठी आधीपासूनच दक्षता घेणे, पथ्य पाळणे, वेळेप्रसंगी ईंजेक्शन असे या तापाचे आहे, भ्रष्टाचाराचेही काहीसे तसेच. प्रिव्हेंशन इ़ज बेटर दॅन क्युअर!

भ्रष्टाचार नेमकी कुठल्या मानसिकतेतून जन्म घेत असावा हे शोधणे एव्हडाच या लेखाचा हेतू. बाकी हा प्रश्ण म्हणजे सिस्टीम फेल्युअर, कायद्यातील पळवाटा, सक्तीचे/सोयीचे राजकारण, ईत्यादी नेहेमीचे मुद्दे आहेतच पण त्यातून गुंता फक्त वाढत जातो. जर यंत्रे १००% भ्रष्टाचार करत नसतील हे गृहीत धरले तर शेवटी या रोगाचे मूळ हे यंत्रामागिल माणसात आहे असेच म्हणावे लागेल.

आता मनुष्य भ्रष्टाचार का करतो, याची काही प्रत्यक्ष घडलेली दैनंदीन व्यवहारातील ऊदाहरणे:

१. साधारण १९८० चे दशकः आमच्या नात्यातील एक बांधकाम व्यवासायिक. एखादा पूर्ततेचा परवाना घ्यायचा तर दहा अधिकार्‍यांच्या सह्या/शिक्का लागतात. ८० च्या दशकात मूम्बईतील वांद्रे मध्ये अशाच एका सरकारी कार्यालयात ते गेले होते:
"साहेब" ही कागदपत्रे आहेत, तपासून सही करता का?
ऊद्या या, आता २ वाजलेत, आजचे कामकाज बंद.
साहेब, पण माझ्या घडाळ्यात २ ला पाच कमी आहेत.
असतील, ते भिंतीवरचं घड्याळ बघा त्यात २ वाजलेत.
साहेब तुमचे घड्याळ ५ मिनीटे पुढे आहे.
ते ठरवणार कोण? तुम्ही? ऊद्या या.
साहेब मला फक्त एका सहिसाठी पुन्हा दीड तासाचा प्रवास करून यावे लागेल.
मग या ना, तुमचे स्वागतच आहे!
साहेब तुम्हाला ५० रूपये देवू का?
द्या ना..
**५० रूपये जास्तीचे घेवून सही दिली जाते, दोघांच्याही घडाळ्यात कधीचे दोन वाजून गेलेले असतात.

२. आगस्ट, १९९५: हे मी "जावे त्याच्या वंशा" या माझ्या लेखमालिकेतही लिहीले होते. ईंजीनीयर होवून पहिलाच जॉब. ऊमेदीचे दिवस. बांधकाम साईट वर देखरेखीच्या कामावर होतो. त्यात दगड फोडणे, माती भरणे वगैरे काम करणार्‍या कंत्राटदाराशी झालेला संवादः
"साहेब, २ ट्रक जास्ती भरलेले लिहून द्या" कंत्राटदार मला विनवणी करतो.
"मी नाही देणार, चल नीघ".. असे मी ठणकावून सांगतो.
"अहो साहेब, तुम्ही नाही दिलेत तर तुमचा मोठा साहेब देईल, पेक्षा तुम्हीच द्या, तुम्हालाबी थोडं रोजी रोटीला जास्तीचं.."
मग तू त्यांच्याकडूनच घे.. मी नाही देणार".. माझे ऊत्तर!
**माझा साहेब २ ट्रक जास्त लिहून देतो.. ते रोजचेच असते.. मला आधी हे नविन असते नंतर माझा बॉस असे ईतर अनेक कंत्राटदारांना जास्त लिहून देतो, बक्कळ मोबदला घेतो, हे माहित झालेले असते एव्हडेच!

३. मार्च, २००८: अमेरीकेत एक अत्यंत नावाजलेल्या कंपनीत काम करत होतो. एका मोठ्या हॉटेल बांधकाम करणार्‍या क्लायंट ने त्यांच्या पूर्ण झालेल्या कामाचा व होवू घातलेल्या कामाचा "फेवरेबल" अहवाल द्या व त्या अनुशंगाने चक्क आकडे बदला अशी विनंतीवजा सूचना दिली. त्या अहवालाच्या जोरावर त्यांना पुढील ५ वर्षाचे बँक फंडींग व ईतर मोठी कंत्राटे मिळणार होती. मी"नाही" म्हटले. माझ्या व्हाईस प्रेसीडेंट ने थेट फोन करून मला विचारणा केली, वर तू कामात लक्ष देत नाहीयेस असे थातुर मातुर ऐकविले. निर्णयाचा क्षण होता... "हा गैरव्यवहार माझ्याकडून होणार नाही तुम्ही दुसरा माणूस शोधा" असे सरळ उत्तर त्याला देवून, माझा राजिनामा ईमेल ने दुसर्‍या मिनीटाला त्याला पाठवून दिला.
** "तत्काळ" स्किम मध्ये देखिल मिळणार नाही ईतक्या शीघ्र वेगाने माझा राजीनामा मंजूर होतो. त्या क्लायंट ला अपेक्षित फंडीग व ईतर कंत्राटे नंतर मिळतातच. मलाही दुसरी अधिक चांगली नोकरी मिळालेली असते.

ही तीन ऊदाहरणे भ्रष्टाचाराच्या मानसिकतेची प्रातिनिधीक ऊ.दा. म्हणता येतील. पहिल्या घटनेत, माझ्यामूळे याचे काम अडणार आहे तेव्हा नाडलेल्या व्यक्ती/समाजाची पिळवणूक, त्या व्यवहारापुरता असलेल्या अधिकाराचा गैरवापर ही प्रवृत्ती दिसून येते. त्याच बरोबर माझे काम अडले आहे, हेच काम करायला पुन्हा पैसा, वेळ, (चार आणे की मुर्गी आठ आणे का मसाला) खर्च होणार पेक्षा, माझे कितीही बरोबर असले तरी, माझी तत्वे योग्य असली तरिही समोरचा अधिकारी मला नडणार ही हतबल मानसिकता आहे. दुसर्‍या ऊदाहरणात १९ चे २० केलेले कुणाला कळते आहे? खेरीज तुम्ही भ्रष्टाचार नाही केलात तरी दुसरा कुणीतरी करेलच, तेव्हा सारे मिळून करुयात, अशी मानसिकता दिसते. तिसर्‍या घटनेत मात्र सो कॉल्ड यशस्वी, संपन्न होण्याची लालसा, नशा, अधिक पैसा कमावण्याची भूक अन त्यासाठी प्रसंगी सर्व जोड तोड करायची तयारी ही मानसिकता दिसून येते. यातील तीनही ऊदाहरणात कुणाचे वैयक्तीक नुकसान झाले नसेल असे क्षणभर मान्य केले तरी सिस्टीम चे प्रचंड नुकसान झाले, ज्याची भरपाई आम्ही आजही करत आहोत हे निश्चीत!

अशी व दुसरी अनेक ऊदाहरणे देता येतील. तुंबलेली गटारे साफ न करणे, कचरा न ऊचलणे या अशा कामांपासून ते, सणा सुदीच्या दिवसात आवश्यक गोष्टि जसे फोन लाईन, मोबाईल, यात मुद्दाम यांत्रिक बिघाड करवणे, पोस्टातील मोठ्या रकमेची मनी ऑर्डर अडवून ठेवणे, भेसळीचा, जास्त किंमत वाढवून माल विकणे, रेशन कार्डावर कमी अधिक लिहून देणे, जन्म-मृत्यू दाखले देताना अडवणूक करणे, अशी कितीतरी न संपणारी यादी आहे.

अनेक विचारवंते, सामाजिक कार्यकर्ते, नेकीचे राज्यकर्ते यांनी वेळो वेळोवेळी भ्रष्टाचाराची कारणमिमांसा केली आहे. "पॉवर करप्टस" हे त्यातलेच एक आवडीचे वाक्य. वरील अगदी रोजच्या दैनंदीन व्यवहारात काम करून देणार्‍याकडे अशी कुठली मोठी पॉवर असते? खरं तर कुठलीच नाही. वरील जवळ जवळ सर्व ऊदाहरणात नेमून दिलेले काम चोख करण्या साठीच त्या माणसाची नेमणूक केलेली असते. त्याचा मोबदला म्हणून ठराविक पगार नेमून दिलेला असतोच आणि त्याच्याकडून ते काम कुठल्याही कारणास्तव वेळेत होत नसेल तर तक्रार, निवारण, व्यवस्थापन ई. साठी प्रत्त्येक नोकरदाराच्या डोक्यावर पगारी व्यवस्थापकही नेमून दिलेला असतोच. थोडक्यात कार्यालयीन संरचना अशी केलेली असते की प्रत्त्येक व्यक्ती कुठल्या तरी गोष्टीला, निर्णयाला वा व्यक्तीला जबाबदार असते. पण होते की काय की या संरचनेतील प्रत्त्येक पायरीवर भ्रष्टाचार स्वागताला ऊभा असतो. "टॉप टू बॉटम करप्ट सिस्टिम आहे" चे दुसरे आवडीचे वाक्य असे लागू होते. "आपल्या देशात सचोटीने नोकरी करता येत नाही अन दुसर्‍याचे हात गरम केल्याशिवाय कुठलाही धंदा करता येत नाही" हे तीसरे आवडीचे वाक्य!

खरे तर ही आवडीची वाक्ये म्हणजे क्रूर चेष्टा आहे... यात विनोद, ऊपहास देखिल शोधून सापडत नाही.

भ्रष्टाचार हा यंत्रे करत नाहीत, भ्रष्टाचार ही नैसर्गिक आपत्ती/ संकट नाही, भ्रष्टाचार हा निश्चीतच शारीरीक विकलांगतेतून आलेला नाही, तेव्हा नेमके भ्रष्टाचाराचे मूळ त्या माणसाच्या मानसिकतेत शिरूनच शोधावे लागेल.

आताचा जमाना हा झटपट श्रीमंती, यश, प्रसिध्धी, पैसा याचा आहे. दुसर्‍याकडे जे आहे ते माझ्याकडेही हवेच, आता, आज, नाहीतर ऊद्या, ही मानसिकता आहे. तो करतो म्हणून मि देखिल करतो, करणे भाग आहे, हा प्रवाद आहे. भोवतालचा समाज भौतिक दृष्ट्या आधुनिक असेल तर मला मागासलेले राहून चालत नाही, ही गरज आहे. भोवतालच्या समाजाची मानसिकता ठराविक असेल तर त्या विरुध्द मानसिकता ठेवून मी प्रगती करू शकत नाही अशी सक्ती आहे. थोडक्यात गरजेसाठी जगणारे "गरजू", चैनीत जगणारे "श्रीमंत", जगाला दाखवण्यासाठी उधळण, चंगळ करणारे "ऊच्चब्रू", आणि या सर्वांच्या डोक्यावर सर्वात वरच्या स्तरात सत्ता, संपत्ती, सुविधा यांचा सतत ऊपभोग घेणारे "सत्ताधारी" अशी आपल्या समाजाची विभागणी दिसून येते. ज्या स्तरात तुम्ही आहात त्यानुसार तुम्ही भ्रष्टाचार करता. आणि खालच्या स्तरातून वरच्या स्तरात जाण्याची चढाओढ वेगळीच त्या अनुशंगाने होणारा भ्रष्टाचार वेगळाच. गरज, चैन, चंगळ, यांच्या सीमारेषा देखिल अस्पष्ट झाल्या आहेत.
या सर्वात नितीमत्ता, व्यवहारमूल्ये, संस्कार, सद्सदविवेकबुध्दी हे सर्व कुठे गायब झाले कुणास ठावूक? असे म्हटले तरी त्यावर "तुम्ही तुमचं बघा आम्ही आमचं बघतो" ही सर्व भाजल्या, जळल्यावरती लावली जाणारी बँडेड पट्टी आहेच.

मला आठवतय, शाळेत असताना एखाद्या विद्यार्थ्याकडे छान वासाचा खोड रबर, रंगीत पेंसिली, किंवा ठसठशीत वळणदार लिहीणारे पायलट पेन, वगैरे असे तत्सम साहित्य असेल तर त्या काळी स्वतःला कितीही आकर्षक वाटले, ते विकत घ्यायची ऐपत नसली, तरी ते चोरायची वा ढापायची हिम्मत नव्हती. परिक्षेत एखाद्या प्रश्णाचे ऊत्तर माहित नसेल आणि आणी बाणीचा प्रसंग असेल तर बाजूच्याला हळूच विचारून त्याचे ऊत्तर विचारायची हिम्मत नव्हती. तसे ऊत्तर विचारलेच आणि चुकून मला त्याच्यापेक्षा दोन गुण जास्त मिळाले तर पुढिल वर्षभर त्याच्याशी नजरानजर करताना ओशाळल्यागत होत असे. एखाद्याकडे आपल्यापेक्षा जास्त (कुवत, बुध्दी, पैसा, सुपरिस्थिती, ईत्यादी) आहे याचे नाविन्य, कौतूक, लोभ होता पण त्यासाठी चुकीच्या मार्गाने दुसर्‍याचे ते सर्व वा स्वतः त्या वस्तू मिळवण्याचे धारीष्ट्य, लालसा नव्हती. मनातील कुठल्यातरी नितीमत्तेच्या, चूक/बरोबर च्या समिकरणांनी त्या ईच्छेवर विजय मिळवला होता- यालाच संस्कार म्हणतात का? तसे असेल तर ऊभा जन्म त्यासाठी आई, वडील, शिक्षक यांचे प्रथम ऋणी रहावे लागेल. आणि हेच ते मूळ कारण असेल तर मग भ्रष्टाचार करणार्‍यांच्या घरी कळत्या वयात असलेली मुले, कुटूंबातील ईतर व्यक्ती, आपल्या आई, वडीलांना हा प्रश्ण विचारत असतील का- "बाबा, एव्हडे सर्व कुठून आले..?" मग त्या यादीत भेटवस्तू असोत, महागड्या गाड्या, फोन्स असोत, चैन असो, काहीही असो. ऊदाहरणा दाखल बँक कर्मचारी, सरकारी कार्यालयातील कारकून, कस्टम अधिकारी, टपाल खात्यातील व्यवस्थापक, दूरध्वनी, विद्युत मंडळातील अभियंते, ईत्यादी अशा प्रातिनिधीक नोकरदार वर्गाचा महिन्याचा पगार जगजाहीर असतो. अशा वेळी त्यांच्या कुटूंबीयांना नक्कीच जास्तीचे काय, किती, याचे आकलन असते. मग तेही त्या सर्वाकडे सोयिस्कर दुर्लक्ष करत असतील का? अगदी मंत्री, संत्री, यांचे पगारही जगजाहीर असतात, तरिही त्यांच्याकडील बेनामी (हे काय असते?) अन बेहिशेबी मालमत्ता याची असंख्य प्रकरणे बाहेर येतात, पुन्हा गायब होतात. यामागची मानसिकता काय- भूक? हव्यास? चंगळवाद, मरेपर्यंत भोगवाद?

एकीकडे हे तर दुसरीकडे सिग्नल तोडल्यावर आपणच वाहतूक पोलिसाला देवू केलेली चिरीमिरी, जकात चुकवून एका शहरातून दुसर्‍या शहरात आपल्या घर व व्यवसाय सामानाची केलेली ने-आण, एखाद्याची गाडी दुरूस्त करून देताना ऊगाचच नाही ते दोष सांगून त्याच्याकडून उकळलेले पैसे, एखादा एन. आर. आय. क्लायंट मिळाला म्हणून त्याच्या घर सुशोभितकरण्याच्या कामात लावलेले अवाजवी भाव (याचाही प्रत्त्यय मला आमच्या पुण्याच्या घराचे ईंटीरीयर करताना आला), यातला मी व माझी मानसिकता ही अडलेला, नाडलेला अशी नसून शिक्षा चुकवू पहाणारा, पैसे वाचवू, कमवू पहाणारा अशी आहे. संधी मिळेल तर घ्या ऊपटून, क्वचित ओरबाडून अशी आहे.

(*)अजून एक नविन प्रकारचा भ्रष्टाचार जो अगदी अलिकडे बोकाळला तो म्हणजे घर बांधकाम व्यवसायात घरे विकताना कारपेट एरीया (घरातील निव्वळ वापरायचे क्षेत्रफळ) च्या हिशेबाने न विकताना सेलेबल एरीया (थोडक्यात यात घराच्या भिंती, पोटमाळे, संकुलात बाहेर लिफ्ट, जिना, वगैरे साठी सोडलेली जागा) च्या हिशेबाने विकतात. आजकाल ३०%, ४०% लोडींग लावतात. थोडक्यात १०० चौरस फूटाची जागा घ्यायची तर १४० चौरस फूटाचे पैसे द्यावे लागतात! हे अगदी अलिकडचे आहे. आणि कुठल्याही दृष्टिकोनातून तपासून पाहिले तरी कायद्यातील ही तरतूद म्हणजे चक्क "कायदेशीर मार्गाने ग्राहकाला लुबाडणे" आहे असेच म्हणावे लागेल. ईथे आपल्याला ग्राहक म्हणून अशा दुष्ट कायद्यांचा विरोध करणे गरजेचे ठरते. पण आपणही "घरखुळ" शर्यतीत जुंपलेले असतो आणि या दुष्टचक्राचा कळत/नकळत एक मुख्य हिस्सा होवून जातो.

छोट्यांच्या जश्या छोट्या गोष्टी तशा मोठ्यांच्या मोठ्या गोष्टी. यात मोठे ऊद्योगपती, त्यांच्याकडून मागितली जाणारी लाच (टाटा- एयर ईंडीया प्रकरण), मोठ्या फायद्यांसाठी जुळवलेली सत्तेची समीकरणे (राडीया टेप्स), शेयर मार्केट घोटाळा, स्टँप पेपर तेलगी घोटाळा, लष्करी सामान, तोफा घेण्याचा बोफोर्स घोटाळा, चारा घोटाळा, सत्तेसाठी पैसा- वोट फॉर स्कॅम घोटाळा, सत्यम घोटाळा, २g स्पेक्ट्रम घोटाळा, आदर्श घोटाळा, टिव्ही चॅनल फेम कानिमोझी घोटाळा, सिव्हिसी कमिशनर घोटाळा, नावे बदलतात... यादी संपत नाही... आणि भ्रष्टाचाराला नित्य नविन आयाम देणारे घोटाळे अजून होतच आहेत. त्यातही अलिकडे दुर्दैव म्हणजे भारतात ज्यांनी अशा भ्रष्टाचाराविरुध्द लढा ऊभा केला तेच आता "जोकपाल" म्हणून स्वताच्या लढाईची हतबलता व्यक्त करत आहेत.

हा प्रश्ण केवळ भारता सारख्या प्रगतीशील समाज व देशापुरता मर्यादीत नसून आज अमेरिका, युरोप, ईंग्लंड यांसारख्या प्रगत देशातूनही अनेक मोठ्या वित्त बॅंका, ऊद्योगधंदे, यातील आर्थिक गैरव्यवहार, आंतरराष्ट्रीय गुप्त कारवाया, प्रसारमाध्यमांमधील अनैतीक कामकाज (अलिकडील गाजलेले रुपर्ट मरडॉक प्रकरण) यांच्या रूपाने कायम जिवंत आहे व आपले जाळे पसरत आहे. अगदी अलिकडे अरब राष्ट्रांत झालेले नागरी ऊठाव, राजकीय अस्थिरता, ऊलथापालथ या मागेही "भ्रष्टाचार" हेच मूळ आहे.

आजच्या प्रगतीशील समाजात भ्रष्टाचाराचा भस्मासूर नेमकी कुठे, कसा, कुठल्या वेळी जन्म घेतो याची लाक्षणिक कारणमिमांसा देणारे एखादे अद्ययावत यंत्र, ज्योतिष, विज्ञान, तत्वप्रणाली बनत नाही तोवर या संबंधीत अनेक प्रश्णांची ऊत्तरे सापडणे अवघड आहे. प्रत्त्येक भ्रष्टाचारामागची कारणे, परिस्थिती, तपशील, वेग वेगळा आहे पण ५० रुपयाची लाच घेण्यापासून ते अब्ज्वावधींची लूट करून देश विकायला काढणार्‍यांची मानसिकता तीच आहे.

अशा वेळी आता न सापडणारे, दुर्मिळ होत चाललेले असे अभ्रष्ट मानवी स्पिसि़ज यांच्या गुणसूत्रांचे जतन/कृत्रीम प्रजनन वगैरे करून येणार्‍या अनेक पिढ्यांत ती गूणसूत्रे मुद्दामून रोपण करून असा अभ्रष्ट मनुष्य प्राणी बनवणे शक्य आहे का, तो ऊपाय ठरू शकतो का? माहित नाही. आशावाद हे विज्ञानाचे बलस्थान आहे, जे नैसर्गिक दृष्ट्या मानवाला शक्य नाही ते विज्ञान करून दाखवू शकते.

माझ्यापुरते बोलायचे तर, आई वडीलांनी ठरवून दिलेले, मनावर संस्काररूपातून कोरलेले "चूक/बरोबर" हे वैयक्तीक व व्यावहारीक आयुष्यात पाळत आलो अणि कधीच कुठल्याही प्रसंगात तोटा झाला नाही, लाज गेली नाही हे निश्चीत. त्यांनी ठरवून दिलेले चूक का बरोबर ते तपासून पाहण्याची योग्यता अजून आलेली नाही हे मान्य केले की आपसूक बर्‍याच गोष्टी स्पष्ट भासू लागतात. शिक्षण, अनुभव, यातून आलेले व्यवहारद्यान, समज, आणि विवेकबुध्दी, याचे जतन करणे व त्याचा योग्य वापर स्वताच्या दैनंदीन आयुष्यात अन आपल्या पुढील पिढीच्या उन्नतीसाठी करणे एव्हडे केले तरी येणार्‍या काळाची मानसिकता अधिक सक्षम, व सगुणात्मक बनविण्यासाठी वाट दिसू लागले.

एकंदरीत भ्रष्टाचार निर्मूलन हा वेगळ्या स्वतंत्र लेखाचा विषय आहे पण दिवार या सुपरहीट चित्रपटातील अनेक अजरामर सीन्स पैकी एक सीन जेव्हा नुकतेच पोलिस अधिकारी बनलेला शशी कपूर एका शिक्षकाच्या घरात जातो तेव्हाचा सीन आठवला की आजही अंगावर रोमांच ऊभे राहतातः

शशी कपूर ला त्याचा भाऊ अमिताभ याच्या काळ्या धंद्या बद्दल माहिती देवून ते धंदे बंद करवणे आणि अमिताभ व कंपनी ला अटक करून शीक्षा करणे ही त्याची पहिली असाईंटमेंट दिली जाते. एकीकडे पोलिस कर्तव्य तर दुसरीकडे भाऊ व कुटूंबाचा विचार या कात्रीत सापडल्याने अखेर मनाने कमकुवत झालेला शशी कपूर ती असाईंट्मेंट नाकारतो. दुसर्‍या क्षणी एका फुटकळ चोराचा पाठलाग करताना शेवटचा ऊपाय म्हणून तो त्याच्या पायाला गोळी मारतो. त्या मुलाकडे (चंदर) चोरलेले पावाचे चार तुकडे निघतात. त्यामूळे काहीसा शरमलेला, गहिवरलेला शशी काही पैसे, अन्न वगैरे घेवून मुलाच्या घरी झोपड्यात जातो. नेहेमीप्रमाणे ए.के. हंगल नावाचा दीन बाप व मुलाची संतापलेली आई, दु:खी कुटूंब हे शशी च्या सहानुभूतीबद्दल आभार मानते पण जेव्हा शशी हा तोच पोलिस अधिकारी आहे ज्याने त्याच्या मुलाच्या (चंदर) पायाला गोळी मारलेली असते हे सांगतो तेव्हा चंदरच्या आईचा राग अनावर होतो-
"असा काय अपराध केला होता माझ्या मुलाने? चार दिवस घरात अन्न नाही म्हणून आमच्या साठी पाव चोरला एव्हडेच ना? त्याला गोळी मारली एव्हडी मोठी शिक्षा? मग आधी त्याच्यापेक्षा ईतर अनेक मोठे अपराध करणार्‍या लोकांना का नाही गोळी मारत?"
मुलाचा बाप, ए.के. हंगल तीला समजावतो आणि शशी ला म्हणतो- "चंदर तसा वाईट मुलगा नाही. आमची भूक व ऊपासमार त्याला बघवली नाही आणि त्याने पाव चोरण्याचा अपराध केला. पण तुम्ही केलेत तेही ठीकच केलेत. या दुनियेत कितीतरी लोक दोन वेळच्या अन्नाचे भुके आहेत, म्हणून काय सर्वांनीच चोरी करायची काय?"
हे ऐकल्यावर शशी च्या चेहेर्‍यावरचे भाव अचानक बदलतात.. आधी शरमलेला त्याच्यातील पोलिस ईंस्पेक्टर करारी, निग्रही होतो.
"तुम्ही काय काम करता?" या त्याच्या प्रश्णवर " एका शाळेत शिक्षक होतो, आजकाल फुटकळ शिकवण्या करतो" असे चंदर चा बाप ऊत्तर देतो.
"अशी शिकवणूक मला एखाद्या शिक्षकाच्याच घरात मिळाली असती," असे म्हणून शशी त्यांना नमस्कार करतो.
(स्वताच्या भावा विरुध्द कारवाई करायचे बळ त्याला या एका प्रसंगातून मिळालेले असते, मानसिक द्वंद्व संपलेले असते आणि चूक काय/ बरोबर काय हे स्पष्ट झालेले असते.)

दिवार चित्रपटातील हा एक प्रसंग अन ईतरही प्रसंग "जाओ पहेले ऊस आदमी का साईन लेके आओ" या अमीताभच्या फेमस संवादा नंतर आलेले शशी चे संवाद.. "दुसरोंके पाप गिननेसे तुम्हारे खुदके पाप नही धुलते".... वगैरे.. त्या नंतर आई निरूपमा रॉय चे असलेले संवाद... "जिसने तेरे हात पर ये लिखा वो तेरा कौन था... लेकिन तू तो मेरा अपना खून था" ... वगैरे... हे सर्व अजूनही मनावर कोरलेले आहे.

हा वरील प्रसंग मला खूपच आवडतो. जगातील तमाम पोलिस (व ईतर) कर्मचारी आणि तमाम बाप व शिक्षक या दृष्यात दाखवल्या सारखे असतात/असावेत हा आशावाद मला कठीण परिस्थितीत ठामपणे ऊभे राहण्यास मदत करतो. मी क्षणापुरता का होईना "हिरो" असल्याचा फील येतो. मला त्यावेळी कर्तबगार शशी कपूर आवडतो. तर दुसर्‍या वेळी मला आईच्या आयुष्याची मागणी करण्यासाठी देवळाच्या पायर्‍या चढणारा, शेवटी आईच्याच कुशीत प्राण सोडणारा अमिताभही आवडतो. (ठरवले तर) मी माझ्या आयुष्यात कर्तव्यतत्पर पोलिस अधिकारी शशी कपूर व आई वडीलांवर जीव ओवाळणारा, हळवा, अमिताभ अशा दोन्ही भूमिका जगू शकतो कुठल्याही रूपेरी पडद्याशिवाय, कुठल्याही पटकथा वा लिहून दिलेल्या संवादाशिवाय, अन कुठल्याही मानसिक द्वंद्वाशिवाय! निरूपमा रॉय मध्ये मला माझी आई दिसते, आणि ए.क. हंगल मध्ये बाप वा शिक्षक!

चैन करावी, छान आयुष्य जगावे, सर्वांनी संपन्न, स्वस्थ रहावे, यात काही गैर नाही. हीच ऊद्दिष्टे असावीत, त्यासाठी जे जे पडेल, लागेल, ते ते सर्व करावे पण ते सर्व करताना ईतरांच्या न्याय्य, हक्क, यांच्यावर गदा येणार नाही हे किमान पथ्य पाळण्याची अपेक्षा आहे. थोडक्यात, या लेखापुरते बोलायचे तर भ्रष्टाचार हा मानसिक आजार, विकार असेल तर त्याचे मूळ हे देखिल शिक्षण, संस्कार, नितीमूल्ये, एकमेकांप्रती आदर, यातून घडलेल्या मानसिकते मध्येच असल्याने या सर्वांचा पाया भक्कम करणे हीच काळाची गरज आहे.
-----------------------------------------------------------------------------------
(*) ता.क.: नुकतेच माननीय श्री. नारायण मूर्ती यांनी लाच देणे हे कायदेशीर करून टाका असे विधान केले. ते बदलून नंतर त्यातील काही भाग कायदेशीर करा असे म्हटले. (http://www.business-standard.com/india/news/certain-amountbribe-giving-c...)
अर्थात त्यांचे विधान बर्‍याच अंगानी वा दृष्टीकोनातून तपासून पहाता येईल, त्यावर चर्चा होवू शकेल. पण नारायण मूर्ती सारखे आजचे जिवंत आदर्श देखिल जेव्हा असे सुचवतात तेव्हा निश्चीत खटकते. मला त्यांच्या एकंदरच व्यक्तीमत्वाबद्दल आणि कर्तुत्वाबद्दल प्रचंड आदर, कौतूक आहे. पण हेतू कितीही चांगला असला तरी मुळात लाच देणे/घेणे हेच कायदेशीर कसे? एखाद्या अधिकार्‍याला एखादे काम करण्यासाठी ठरलेले वेतन मिळत असेल तर त्याच्या "ऊपर" अधिक पैशाची/मोबदल्याची मागणी करणे हे कायदेशीर कसे? यातून नक्की कुणाचा फायदा होवू शकेल? हा आता "लाच देणार्‍याला यातून कायद्याचे "संरक्षण" मिळते, जे सध्या मिळत नाही", हा त्यांच्या विधानातील मुद्दा मान्य केला तरी ही नुसतीच रोगाच्या लक्षणांची मलमपट्टी नाही का? मूळ रोगाचे काय? नारायण मूर्तींचे विधान अर्थातच देशाच्या आर्थिक उन्नती मधील "अडसर" दूर करणे या अनुशंगाने असले तरीही "लाच देणे/घेणे वा कुठलाही भ्रष्टाचार मुळात स्विकारार्ह नाही आणि त्यासाठी कायद्याने दोघांनाही कडक शिक्षा/दंड केला जावा", ईतके साधे स्पष्ट विधान त्यांनी केले असते तर मला अधिक आवडले असते.

(*) new addition.

(शुध्दलेखनाच्या चुकांबद्दल क्षमस्व!)

गुलमोहर: 

अ‍ॅडमिन,

नेट प्रॉब्लेम मुळे चुकून दोनदा अपलोड झाला.. एक "अप्रकाशित केला आहे" त्यातले टेक्स्ट ऊडवले आहे. पण तो दुसरा लेख ऊडवता येत नाहीये. कृ. ऊडवाल का? (या पानावरचा राहू द्यावा) Happy
धन्यवाद!

मी कॉर्पोरेट जगात असताना या विषयावर दीड दिवस अत्यंत गंभीर अन सखोल चर्चेनंतर असा निष्कर्ष निघला की आपणास न्याय्यपणे देय नसलेल्या कुठल्याही वस्तूचा वापर करण्याचा विचार देखील मनात येणे (कृती तर किती तरी कोस दूर आहे अजून) म्हणजे भ्रष्टाचार.
या मूल्याच्या पातळीवर जर आपले संस्कार घडले अन आचरणात आले तरच तुम्ही त्या भ्रष्टाचार्‍याच्या अन भ्रष्टाचाराच्या जाळ्याबाहेर आहात असे समजायचे.
योग्-तुम्ही स्वतःबद्दल दिलेली उदाहरणे या व्याख्येत चपखल बसतात म्हणून तुमचा अभिमान वाटतो.
आपल्या नैसर्गिक कुवतीबाहेर अथवा शक्यते बाहेर जेन्व्हा काही प्राप्त करायचे असते तेंव्हा हा मार्ग प्रथम मनात तयार होतो.संस्कारांच्या अभावी कुठलाच प्रतिरोध होत नाही आंतरिक अथवा बाह्य -अन मग तो मार्ग स्वीकारला जातो.त्याच प्रमाणे आपल्या गरजांची परिसीमा सद्सद्विवेक बुध्द्धिला सोडून असते -अथवा परिसीमाच असत नाही तेंव्हा ही असेच होते.

रेव्यु,

धन्स! Happy

कॉर्पोरेट कल्चर चे म्हणाल तर अमेरीकेतील कंपनीत काम करताना अगदी पार fcpa (foregin correuption prevention act) वगैरे चे ही धडे दिले जातात, कोर्सेस करावे लागतात. अमेरीकन कंपनी साठी आंतरराष्ट्रीय ईतर देशात कामे करताना तर याचा फार बागुलबुवा केला जातो.
तरी भ्रष्टाचार यत्र तत्र सर्वत्र कायम आहेच... आपण त्याला खत पाणी घालत नाही हेच काय ते समाधान!

संस्कारांना, चांगुलपणाला, पापभिरूपणाला जबरदस्त ग्लानी आली आहे. प्रलय जवळ आल्याची लक्षणे आहेत ही. त्यानंतर सर्व काही धूवून जाईल आणि पुन्हा एका चांगल्या नव्या जगाची सुरूवात होईल अशी आशा करूयात.

.

योग ~ प्रत्येकाच्या मनातील विचार अत्यंत समतोल साधून तुम्ही प्रकटले आहेत असेच म्हणतो. कुठेही आक्रस्ताळेपणा न करता Putting the Plate As It Is या न्यायाने तुम्हाला सलत असलेला विषय मांडण्याची तुमची हातोटी सुंदर आहे असे एक वाचक म्हणून प्रथम सांगणे गरजेचे आहे.

मीही सरकारी यंत्रणेला या ना त्या निमित्ताने सामोरे जाताना आवश्यक तितक्या 'गांधीबाबां'च्या नोटा खिशात ठेवतो. त्या पवित्र नावाची हेटाळणी सध्या कोण करीत असेल तर त्या यंत्रणेत असलेले झारीतील शुक्राचार्य. सध्या तर सरकारी कार्यालयात [विशेषतः कोर्टात] एजंटांचा असा काही वावर असतो की, मूळ बाबू कोण आणि कुठे बसतो हेच कळत नाही. भाषाही अशी की "निळा गांधी काढू नका, आज हिरवाच द्या. काम झाल्यावर मग एक लाल देऊन सही मिळवून देतो." हतबलता म्हणजे काय याचे सोदाहरण देणे गरजेचे असेल तर अशा कार्यालयात जमलेल्या पक्षकारांचे चेहरे दाखवावेत.

शशी कपूरचा तो रोल [किंवा त्याच्या संदर्भात घडलेले ते शिक्षकाचे संवाद] तुमच्या मनी किती ठसला आहे हे तुम्ही स्वतःच तडकाफडकी राजिनामा देऊन सिद्ध केले त्याबद्दल तुम्ही निश्चितच अभिनंदनास पात्र आहे. नाहीतरी अमुक एका अभिनेत्याचा रोल मला फार प्रभावित करून गेला असे म्हणायचे आणि त्यापासून शिकायचे मात्र काहीच नाही.

"स्वदेस" मधील मोहन भार्गव अखेरीस नासा सोडून त्या खेड्यात येतो, हे पाहून भारावून जाणारा आजचा युवक तोच विचार मनी पक्का करेल असे धाडसाने विधानही करू शकत नाही, कारण आज या घडी तर इथला प्रत्येक मोहन (आणि त्याचे आईबाप) कधी मी एन.आर.आय. बनेन हीच चिंता करीत असतो. त्यामुळे तसे बनण्यासाठी जितके गांधीबाबा टेबलवरून आणि खालून द्यावे लागतील ते देण्याची त्यांची तयारीही असते.

खूप लिहिण्यासारखे आहे या प्रतिसादात, पण तूर्तास तुमचे परत एकदा अभिनंदन करून इथेच थांबतो.

अशोक,

मनःपूर्वक आभार. तुमचेही विचार/प्रसंग वाचयला आवडतील. खरे तर माझे अभिनंदन वगैरे ईथे केल्याने थोडे अवघड वाटते आहे. ते तर निव्वळ ऊदाहरणादाखल आहे. मी जे केले ते काही फार ग्रेट नाही, जे योग्य वाटले ते केले, बस्स ईतकच!
मुन्नाभाई चित्रपटात वगैरे जे दाखवले गेले (सरकारी अधिकार्‍याला लाच देवू शकत नाही म्हणून तो वयस्कर गृहस्थ थेट कपडे वगैरेच काढतो) ते सर्व बघायला छान वाटते. प्रत्यक्षात आपल्यातील कुणीही तसे करणार नाही ही वस्तूस्थिती आहे. ईथे मायबोलीवरच मॅरेज सर्टीफिकेट मिळवताना आलेला अनुभव मागे कुणीतरी लिहीला होताच. तेव्हा आपल्या तत्वांखातर सिस्टीम शी झगडत तत्वाखातर झुंज देणारेही आहेत..

योग, पोटतिडिकेने लिहिले आहेस. कधी कधी वाटतं का आयूष्यभर आपण तत्वांना घट्ट बिलगून राहिलो.
पण दुस-याच क्षणी ऊर अभिमानाने भरुन येतो.
भ्रष्टाचार नेमका कधी सुरु झाला, सांगणे कठीण आहे. अगदी पुर्वीपासून म्हणजे ज्या काळापासून एका
व्यक्तीच्या हाती सत्ता आणि संपत्ती जमा झाली. त्याच्या अपराधी भावनेतून (स्वत:कडच्या संपत्तीमूळे)
झाली असावी. त्याने मग स्वत:च्या मनाला वाटेल तशी बक्षीसांची खैरात सुरु केली असावी.
मग त्याची मर्जी राखण्यासाठी त्याला रुचेल ते करणे, त्याबदल्यात लायकीपेक्षा आणि केलेल्या
श्रमापेक्षा जास्त मोबदला मिळणे...

आपल्याकडे जी नोकरशाही ब्रिटिशांनी सुरु केली, त्यांना कधी मूल्यशिक्षण मिळालेच नाही. पण
मानसिक अहंगंड मात्र भरपूर. त्यामूळे त्यांच्याकडे येणार्‍या मंडळींना नाडणे सुरु झालेच.
आधी तक्रार करायची सामान्य लोकांना भिती वाटली, तक्रार केली तर आपले काम होणार
नाही, हि भावना तर आजही आहे.
आणि तक्रार केली तरी ती चैकशी यंत्रणा इतकी सुस्त निर्माण केली गेली कि ती कधीच प्रभावी
ठरली नाही.
कलमाड्याला काही होणार नाही पण त्या न्यायाधिशांची मात्र बदली होईल, याची आपल्या
सगळ्यांनाच खात्री आहे, नाही का ?

योग
मी कॉर्पोरेट हा शब्द वापरून चूक केली.उद्देश एवढाच होता की व्याख्या किती खोलवर आहे.मनात येणे टाळणे हे महत्त्वाचे आहे.कृती दूरच आहे.त्या कॉर्पोरेट मध्ये पुढे ती लागू झाली नाही हे संगणे न लगे!!!
Happy

योग छान लिहीले आहे. सिस्टिम सडलेली आहे हे खरे आहे दुर्दैवाने. आपण त्यात किती खोल जायचे हा वैयक्तिक निर्णय आहे. काल बेल्लारीतील आयर्न ओअर मायनिंग ची पूर्ण केस वाचून काढली. चांगले शिक्षण झाले. यातून मार्ग कसा काढायचा ते समजत नाही कधीकधी.

>>आपल्याकडे जी नोकरशाही ब्रिटिशांनी सुरु केली, त्यांना कधी मूल्यशिक्षण मिळालेच नाही. पण
मानसिक अहंगंड मात्र भरपूर.

दिनेशदा,
मला तर नेमके ऊलटेच वाटते. म्हणजे ब्रिटीश राजवटीच्या काळात जास्त अकांऊटेबिलिटी होती की काय? (से बुजूर्ग म्हणतात). मानसिक अहंगंड नेमकी कशातून येतो हाच प्रश्ण आहे. भ्रष्टाचाराची वेगवेगळी ऊ.दा. पाहिली तर कधी न्यूनगंड, कधी अहंगंड, कधि निव्वळ बदला घेणे, कधी निव्वळ छळणे अशा अनेक स्वभावांच्या छटा दिसून येतात.
वरील लेखात एक मुद्दा लिहायचा राहूनच गेला खरे तर तो ता.क. मध्ये टाकलाय.

>>यातून मार्ग कसा काढायचा ते समजत नाही कधीकधी.
मामी,
दुर्दैवाने हे खरे आहे!

मला एक कधीही कळत नाही. सदसदविवेक बुद्धी नसावी म्हणजे किती नसावी?

गरिबांसाठीच्या योजनांमध्ये, वनवासी मुलांच्या जेवणात, औषध पुरवठ्या मध्ये, कसे काय कोणी करप्शन करू शकते? शिक्षण योजनांमध्ये पर्यावरण संबंधी योजनांमध्ये कसे काय? पदोपदी सामना करावा लागतो ह्या करप्शनचा. आपण मध्यमवर्गी माणसे नीट वागलो किंवा कसे तरी काहीही फरक पड्त नाही. कारण फार मोठ्या प्रमाणावर हे व्यवहार चालतात. आपल्याला हे लोक बाजूला फेकून देतात. अतिशय संताप येतो कधी कधी. खोटे बोलावे लागले तरी आपल्या मनावर दड्पण येते. तसे ह्यांना होत नसेल का?

"....तो म्हणजे प्रत्येकाने आपली स्वतःची मानसिकता बदलणे...."

महेश ~
एक विचार म्हणून ठीक आहे हे; पण दुर्दैवाने व्यवहारात असे घडून येत नाही. माझेच अगदी लेटेस्ट उदाहरण इथे देतो. मुलाच्या लग्नाच्या पत्रिका पुण्यातील नातेवाईक आणि तिथे स्थायिक झालेल्या जुन्या मित्रांना देण्यासाठी मी गेल्या महिन्यात पुण्यात मुलाकडेच उतरलो होतो. त्या शहरातील वाढती वाहतूक आणि रस्त्यांचे चक्रव्यूह माझ्यासारख्या कोल्हापूरकराला नक्कीच समजणार नाही म्हणून मुलाने आपल्या एका स्थानिक मित्राला माझ्यासोबत दिले, जो स्वतः हीरो पॅशन चालवणार होता व मी मागे बसून त्याला फक्त प्रमुख ठिकाणे सांगणार. सकाळी ९.३० ला पुणे भटकंती सुरू झाली आणि सिंहगड रोडवर असलेल्या माणिकबाग या ठिकाणी जात असता साधारणतः १२.३० च्या सुमारास तेथील दोन पोलिसांनी आमची पॅशन अडविली आणि त्यानी आम्ही सिग्नल तोडल्याचे निदर्शनास आणले. सहा चौकी तो रस्ता असल्याने खुद्द पुण्यातीलच त्या तरुणाला कदाचित सिग्नल लक्षात आला नसेल, पण आता तसे सांगून चालणारही नव्हते; कारण सिग्नल तोडल्याचे पाप आम्ही केले होते. बाजूला गाडी लावून मी विनम्रपणे त्या दोन्ही हवालदारांना वस्तुस्थिती सांगत होतो, शिवाय मी कोल्हापूरहून पुण्यास लग्नपत्रिका वाटण्यासाठी आलो आहे, आणि घाईत आहे इ.इ., इतके सांगूनही ती दोघेही '४०० रुपये दंड भरला पाहिजे' असा आग्रह धरू लागले. चटकन निघणे गरजेचे असल्याने मी "करा दंडाची पावती अन् मोकळे करा आम्हाला" असे म्हटल्यावर त्या दोघांनी एकमेकाकडे सहेतुक पाहिले आणि "ज्याच्याजवळ दंड पावतीपुस्तक आहे तो दुसर्‍या सिग्नलला गेलाय्, तास दोन तास लागतील त्याला परत यायला. तेव्हा गाडी त्या झाडाखाली पार्क करा आणि वाट पाहा...". हे काय उत्तर वा खुलासा होऊ शकत नव्हते म्हणून मी 'मला मुख्य ऑफिसचा पत्ता द्या. मी तिथे कॅश भरून तुम्हाला संध्याकाळी पावती आणून दाखवितो, पण आत्ता आम्हाला जाऊ द्या' असा धोशा लावल्यावर त्यातील एकाने माझ्या बरोबरच्या मुलाच्या मित्राला बाजूला बोलाविले आणि त्यांच्यात काहीतरी खुसरफूसर चालले. अतुल माझ्याजवळ आला, "काका, लग्नपत्रिकेचे कारण त्याना पटले आहे असे दिसत्ये, त्यामुळे ४०० चा दंड राहू दे असे म्हणतात, फक्त त्याना चहापाण्यासाठी १०० रुपये द्या." याचा मला थोडा राग आलाच पण पुढील सर्व कार्यक्रम कोलमडून पडणार याचीही कल्पना असल्याने मी मुकाट्याने एक निळा गांधीबाबा काढून अतुलकडे दिला तो एका हवालदाराच्या डायरीत गुडूप झाला आणि आम्ही दुसर्‍याच मिनिटाला माणिकबागेकडे झूरर्रम केले.

हा प्रकार साधारणतः दहा मिनिटे चालला होता आणि ते पाहणारे डझनावारी पुणेकर मुकाटपणे तिथून ये-जा करीत होते. डायरीत नोट घालताना तर अन्य तिघे पादचारी पाहात होते....निमूटपणे.

आता इथे 'मानसिकता बदलणे' हा घटक कसा लागू करावा ? म्हणजे मी एकीकडे सुजाण नागरिक म्हणून ४०० रुपये दंड भरण्यास तयार आहे, पण दुसरीकडे हीच सरकारी यंत्रणा मी दंड भरू नये आणि त्याबदल्यात काय करावे हे सुचवित आहे. दुसरा मार्ग मी अगतिकपणे स्वीकारला. काय करणार ?

अशोक,

अडचण समजू शकतो. खरे आहे तुमच्यापुढे पर्याय असे ऊभे केले जातात की you have to chose lesser evil.. पण तुमच्या प्रसंगात एक (ठरवले तर) करता आले असते. त्या वाहतूक पोलिसाच्या वरिष्टाचा नाव/दू. क्रमांक किंवा तो ज्या चौकीत कामला आहे तिथला दू. क्र. घेवून तिथे संबंधितांशी किमान एव्हडी तक्रार देता आली असती की "मी दंड भरायला तयार आहे पण आता या क्षणी तुमचा ड्युटी वर अपेक्षित असलेला पोलिस, पावती पुस्तकासकट गायब आहे". मला खात्री आहे असे झाले असते तर ते पावती पुस्तक दुसर्‍याच क्षणी आकाशातून पडले असते! Happy
किंवा अशा प्रसंगी मुद्दामून एखाद्या दुसर्‍या वाहनचालक्/घटनास्थळी ऊपस्थितांता साक्षीदार म्हणून विनंती करून थांबवून घेता येईल का? दुर्दैवाने "बघे" खूप असतात पण साक्षीदार वा मदतनीस होणारे कधीच भेटत नाहीत. "नको ते लफडे आपण आपल्या मार्गी बरे".... हाच प्रत्त्येकाचा दृष्टीकोन असल्याने प्रत्येकाचेच नुकसान होते हीच शोकांतीका!

मायबोलीवर मला वाटते मागेही कुणीतरी असा सिग्नल तोडण्याचा अन त्या अनुशंगाने पुढील रामायण लिहीले होते. तेव्हा त्या लेखात अशा प्रसंगी कॉल करावयाचे पोलिस अधिकारी, कचेरी वगैरे चे दूरध्वनी क्र. दिल्याचे स्मरणात आहे- तेही पुण्यात.
कुणाला माहित असल्यास पुनः ईथे ती माहिती/लिंक देता येईल.

खरं तर अशा घटनांचा वेगळा बा.फ. ऊघडाला तर मला खात्री आहे की तिथे हजार नोंदी होतील.. घटनांची अधिकृत नोंद "तशी नाही तरी अशी" होईल! Happy

अश्विनी, भिती राहिली नाही आता कसलीच. पुर्वी निदान देवाची तरी होती, पण पापाला निदान या जन्मी तरी काही शिक्षा होईल, असा विश्वास आता उरला नाही. आणि आजची व्यवस्था सहज खिशात घालता येते, ती आपले काहिही वाकडे करु शकत नाही, हा विश्वास मात्र बळावला.

योग, त्या काळातही तसेच होते. त्या नोकरशहांना आपण सामान्य लोकांपेक्षा थोडे श्रेष्ठ आहोत, असा गंड व्हायला सुरवात झालीच होती.

शिवाय असा बिनहिशोबी पैसा खर्च करायला, अनेक षौक उपलब्ध झाले. मग त्यांची सवय लागली, मग ते पुरवायला पैसा कमी पडला, मग तो मिळवण्यासाठी भलेबुरे मार्ग अवलंबावे लागले.

खरच चांगले विचार मांडले आहेत योगदा तुम्ही. मला नेहमी एक प्रश्न पडतो.....आनंदात जगायला असा किती पैसा लागतो?

योग,
चांगला लेख. तुमची तळमळ पोचली.

खरं तर अशा घटनांचा वेगळा बा.फ. ऊघडाला तर मला खात्री आहे की तिथे हजार नोंदी होतील..>>
कृपया या वेबसाईट वर पहा http://www.ipaidabribe.com/ बंगलोर येथील हि संस्था अशा नोंदी करायला सांगतेय. या नोंदीच्या आधारे सरकारवर दबाव टाकण्याचे त्यांचे तंत्र आहे. तिथे बरिच चांगली माहिती आहे. आणि त्याचा फायदाही होतो आहे असे त्यांचे म्हणणे आहे.

त्यांचे हे क्विझही चांगले आहे शिवाय प्रश्नोत्तरे सुद्धा खरच चांगली आहेत.

भ्रष्टाचाराच्या मानसिकतेचा दुसरा पैलूही खूपच महत्वाचा आहे; त्यामुळे येणारी लाचारी व ती झांकण्यासाठी पांघरावी लागणारी मग्रूरतेची कातडी ! भ्रष्टाचाराला सरावलेला माणूस कोणत्याही घटनेकडे फक्त "यातून आपल्याला काय सुटेल ", याच नजरेतून पहायला लागतो व म्हणूनच नैसर्गिक वा मानवनिर्मित आपत्ती, गरिबांसाठीच्या योजना इ. इ.चं त्याला कांहीच सोयर-सुतक रहात नाही. आज अनेक चांगल्या योजनांचा ,सुरक्षाव्यवस्थेचा बट्याबोळ त्यामुळेच झालेला दिसतो. क्वचित भ्रष्टाचारी माणसातला देशाभिमान , गरिबांची कणव जागी झालीच तरी ताठ मानेने त्यासाठी कांही करण्याचं मानसिक बळही मग त्याला रहात नाही.