जीवाचे मौन

Submitted by बेफ़िकीर on 26 July, 2011 - 04:53

"आमच्या मंडळात एक भगिनी आल्या होत्या काल! त्यांनी मौनाचे महत्व सांगितले. प्रत्येकाने आठवड्यातून एक दिवस मौन करावे असे त्यांनी सांगितलेले आहे. तेव्हा मी आज दहा वाजल्यापासून मौन करणार आहे"

वामनरावांना खरे तर हे ऐकून शाळकरी मुलीसारखी एक गिरकी घेऊन टाळ्या वाजवत सोसायटीभर नाचत सुटावेसे वाटत होते. पण 'निखळ आनंद' व्यक्त करण्यास त्यांच्या घराच्या घटनेत तरतुद नव्हती. छद्मी किंवा आसुरी आनंद असल्यास ते चालायचे, पण तोही लतिकाबाई एकट्याच व्यक्त करणार असा नियम होता. आणि घरची घटना लतिकाबाईंच्या एकसदस्यीय समितीने निर्माण केल्यामुळे घटना दुरुस्तीही करता येत नव्हती.

वयाची साठी ओलांडलेले वामनराव त्यामुळे ' झोपलेलं कुत्रं श्वास घेताना हालतं' तसे नुसतेच उडत होते. उकळ्या फुटत असल्या तरी त्या दाबाव्या लागत असल्यामुळे त्यांची साठलेली सर्व एनर्जी त्याच कामात व्यतीत होत होती.

"थडथडताय काय? उद्या तुम्ही मौन धरायचं आहेत"

"काय म्हणाल ते धरीन"

वामनरावांना ओव्हर कमिट करण्याची जुनी सवय लागलेली होती.

आपला अगडबंब देह झोपाळ्यावरून उचलत लतिकाबाई एक वही घेऊन नियम वाचू लागल्या.

"मौनाच्या काळातले नियम ऐका"

जीवाचे कान करून वामनराव लक्ष देऊ लागले. जीवाचे कान करणे हा त्यांच्यासाठी डाव्या हातचा मळ झालेला होता आता! कारण त्या व्यतिरिक्त फारश्या क्रिया त्यांना कराव्या लागत नसत.

" हे नियम मौन धरणार्‍यासाठी नाहीत, हे इतरांसाठी आहेत, तेव्हा नीट ऐका"

"सांगा"

"मौन धरलेल्या व्यक्तीला दिवसातून सोळा भांडी पाणी आणि चार वेळा खायला, तसेच चहा कॉफी घेत असल्यास दिवसातून चार वेळा ती पेये द्यावीत"

"कुणी??"

"घरात कोण कोण आहे आपल्या??"

"तुम्ही, मी, आंद्या आणि भांडीवाल्या सरूबाई आल्या तर येतात"

"त्यातला आंद्या कुठे असतो?"

"कॉलेजला"

"आणि सरूबाई?"

"दुपारी अर्धा तास इथे असतात, बाकी कुठे असतात ही माहिती मी मिळवलेली नाही"

"मग सोळा भांडी पाणी कोण देणार??"

"मीच"

"मग 'कुणी' काय 'कुणी'???"

"माफ करा, यापुढे ही चूक होणार नाही"

"पुढचा नियम... मौनातील माणसासमोर काही ना काही वाचायला ठेवावे"

"काय ठेवू?"

"वर्तमानपत्र, पुस्तक, अध्यात्मिक ग्रंथ असे काहीही चालेल"

"ठीक आहे"

"पुढचा नियम - मौनातील माणसाप्रती आदरभाव व्यक्त करावा"

"तो मी तसाही करतो"

"हो पण मी मौन धरल्यानंतर स्वतंत्र असा एक आदर व्यक्त केला पाहिजेत"

"ठीक आहे, करेन"

"मौनातील माणूस कमीतकमी हालचाली करतो, बहुतांशी तो एकाच जागी बसतो, तेव्हा त्याला हालावे लागेल असे काही करू नये, एकाच जागी बसून मौन धरल्याचा फायदा सर्वाधिक आहे"

"छे छे... मी असे कसे काही करेन??"

"मौना.... हा पुढचा नियम आहे... मौनातील माणसाला सतत प्रसन्न वाटेल असेच वातावरण घरात ठेवावे"

"मी उदबत्ती लावेन"

"उदबत्ती नकोय... फक्त टीव्ही बिव्ही, आवाज आले नाही पाहिजेत"

" पण... एक विचारू का??? "

"काय??"

"स्वयंपाक???"

"केलेला आहे... रात्रीही तेच जेवायचे आहे... चहा मात्र तुम्हाला करावा लागेल"

"करेन की... तुम्ही म्हणाला असतात तर.... भातही टाकला असता मी"

"माहितीय कर्तव्यतत्परता... आता शेवटचा नियम..."

"....."

"मौनातल्या माणसासमोर एक कागद पेन ठेवावे, काही वेळ आलीच तर लिहून कळवता येते"

"नक्की... नक्की ठेवतो... पण... हे मौन किती वेळ आहे??"

"उद्या सकाळी दहा वाजता संपेल.. चोवीस तास"

"प.... पण... "

"काय??????"

"अहो... म्हणजे .. राग नका मानू.... पण तुम्ही... झोपेत बोलता हो?? स्त्रीमुक्ती वगैरे असे काहीसे"

"तो मौनभंग ठरत नाही"

"अहो... पावणे दहा झाले...."

"होय... प्रार्थना करा...."

दोघांनी हात जोडले. लतिकाबाईंनी टीपेच्या आवाजात एका देवाला हादरवायला सुरुवात केली. वामनरावांना हे नित्याचेच असल्याने ते आधीच आक्रसून बसायचे.

बरोब्बर दहा वाजता लतिकाबाई हॉलमध्येच एका आसनावर बसल्या. मांडी घालून आणि दोन्ही हात पद्मासनासारखे गुडघ्यांवर ठेवून त्यांनी डोळे मिटले. आणि समोरच खुर्चीत बसलेल्या वामनरावांनी डोळे ताणून त्यांच्याकडे पाहायला सुरुवात केली.

सात मिनिटे!

सात मिनिटे वामनराव खुर्चीत निश्चलपणे बसून लतिकाबाईंकडे पाहात होते. ही आत्ता बोलेल, पुढच्या क्षणी बोलेल, निदान आपल्याला तरी शिव्या देईल असे सत्तत त्यांच्या मनात येत होते. पण जाम हालेनात लतिकाबाई!

वामनरावांना नियम आठवू लागले. त्यांनी आधी पटकन एक कागद पेन हेवले समोर लतिकाबाईंच्या! न जाणो एखाद्या नियमात चुकलो तर निदान ही लवकर लिहून तरी कळवेल, नाहीतर एकदम उद्याच चंपी! त्याचपाठोपाठ त्यांनी तांब्या भांडेही आणून ठेवले व चहा टाकायला म्हणुन स्वयंपाकघरात गेले.

आधण टाकून बेडरूममद्ये जाऊन आरश्यासमोर उभे राहिले.

गेली नऊ मिनिटे घरात असलेली अद्वितीय शांतता! या घटकाने मात्र वामनरावांवर जादू केली जादू! आरश्यात पाहात त्यांनी चोरून हासत मोजून सहा उड्या मारल्या आनंदाने! आपले प्रतिबिंबही हासत आहे हे पाहून तर त्यांना हर्षवायूच झाला. आणखीन काही उड्या मारून त्यांनी 'निखळ आनंद' व्यक्त केला व घटनाबाह्य वर्तन केले.

कित्येक सेकंद ते बेडवर नुसतेच बसून राहिले.

या अचानक उद्भवलेल्या सुवर्णसंधीचे सोने कसे करता येईल हेच त्यांना समजेना! आता त्यांच्या धमन्यांमधून रक्त उसळ्या घेऊ लागलेले होते. पण अनेक दशकांनी मिळालेले एक दिवसाचे स्वातंत्र्य अचानक मिळाल्यामुळे ते कसे कसे उपभोगता येईल यावर काही योजनाच नव्हती. त्यामुळे हवालदिल होऊन त्यांनी आधी स्वतःच्या डाव्या तळहातावर उजव्या हाताची मूठ कित्येकवेळा आपटली. हेच काल समजले असते तर आपण कित्येक तरतुदी करून ठेवल्या असत्या स्वातंत्र्य उपभोगायच्या, हा विचार त्यांना आत्ताही दु:खी करत होता.

मधेच एकदा उठून बाहेर जाऊन ते लतिकाबाईंना पाहून आले. दचकलेच! लतिकाबाईंनी डोळे उघडलेले होते. मात्र त्यांचे लक्ष वामनरावांकडे नव्हते.

शॉक लागल्यासारखे वामनराव पुन्हा पलंगावर येऊन बसले.

ही बघत असताना आपण काय करू शकणार असा निराशाजनक विचार मनात आला त्यांच्या! च्यायला, मौनात बघायचेही नाही असा नियम असता तर बरे झाले असते असा विचार करत ते चहात दूध घालायला पुन्हा किचनमध्ये आले.

आणि दूध घालत असतानाच त्यांच्या मनात तो भयानक विचार डोकावला.

स्वतःच डोके हालवत त्यांनी अनेकदा तो विचार झटकण्याचा प्रयत्न केला. पण चहा गाळेपर्यंत किमान सहा वेळा तो विचार तस्साच किंवा अधिक तीव्रतेने डोक्यात आला.

मग मात्र त्यांनी चहा लतिकाबाईंसमोर ठेवून येण्याआधी ओट्यापाशीच मिनिटभर विचार केला की तो जो विचार आहे तो प्रत्यक्षात आणला तर काय होईल!

भयानक परिणाम होणार होते त्याचे! मात्र एक मन सांगू लागले. 'लेका वामन, माणसाने एक दिवस जगावं, पण सिंहासारखं जगावं'! हेच वाक्य डोक्यात फेर धरू लागलं! आणि ठरलं! एक दिवस सिंहासारखे जगायचेच! जगायचे म्हणजे जगायचे.

आणि चहाचे दोन्ही कप उचलले गेले तेच मुळी एका आवेशात! बाहेर येऊन पाहतात तर लतिकाबाई मौनात असल्या तरीही चहा वेळेवर न आल्याच्या संतापात डोळे हे एवढाल्ले करून किचनच्या दाराकडे बघत आहेत.

हॅड तिच्यायला!

वामनरावांनी स्वतःला धीर दिला. उद्याचे उद्या, आत्ता तर जग? दाखवच एकदा हिसका त्या भवानीला! लेका पुरुषासारखा पुरुष तू, आणि ही तुझी तर्‍हा????

वामनरावांनी तिरीमिरीत आल्यासारखे दाखवत एक चहाचा कप लतिकाबाईंसमोर आपटला. त्या आवाजाचा परिणाम लतिकाबाईंचे डोळे आणखीन मोठे होण्यात झाला तसे मात्र दचकून वामनराव पाच पावले मागे आले.

दोघांमधील अंतर वाढल्यामुळे आलेली सुरक्षिततेची जाणीव त्यांना धीर देऊन गेली. त्याची परिणती त्यांच्या या पुढच्या वाक्यात झाली.

"बघते काय थोबाड वर करून??? ओत तो चहा नरड्यात, नवरा म्हणजे काय ते समजत नाही का?"

तब्बल पंधरा सेकंद तितक्याच अंतरावर उभे राहून वामनराव आपल्या या साहसाचा परिणाम पाहात होते. ढिम्मही हालणे मान्य नसल्यामुळे लतिकाबाईंचा बसल्याजागी तीळपापड झालेला होता. त्यांच्या डोळ्यांमधून वीजा पडत होत्या. दात कराकरा वाजत होते. पण अक्षर फुटत नव्हते तोंडातून!

वामनरावांच्या मनात स्वातंत्र्यरसाचे आणि वीररसाचे तुषार फुटले. आपल्या मौनात बसलेल्या बायकोसमोर वरातीत नाचतात तसे नाचावे असे त्यांना वाटू लागले. काय वाट्टेल ते करावेसे त्यांना वाटू लागले. अजून एक तपासणी म्हणून त्यांनी आणखीन एक विधान करून पाहिले.

"आणि ते मंडळ बिंडळ सगळं बंद आता! गपचूप घरात माझ्यासमोर बसून राहायचं, बायकोयस माझी, समजले काय???"

घुबड फडफडावं तश्या लतिकाबाई जागच्याजागी घुसळत होत्या.

आता मात्र वामनरावांची खात्री पटली. हे चोवीस तास आपलेच!

त्यांनी अक्षरशः भगवान या हिंदी चरित्र नेत्यासारखा नाच केला नाच लतिकाबाईंसमोर! शोला जो भडके, दिल मेरा धडके हे गाणे स्वतःच म्हणत!

आता नेमके काय करावे हेच समजत नसल्यामुळे ते पुन्हा बेडरूममध्ये आले. या वेळेस जर ते आडवे झाले तर लतिका बाई घर डोक्यावर घ्यायच्या. हे आठवून वामनराव पलंगावर अस्ताव्यस्त लोळले पाच मिनिटे! अचानक त्यांच्या लक्षात आले की एक एक क्षण महत्वाचा आहे. पुन्हा आरश्यासमोर उभे राहून त्यांनी आंद्या वापरत असलेला एक परफ्यूम स्वतःच्या अंगावर उडवला. स्वतःच्याच बंडीचा सुवास घेत ते आरश्यासमोर प्रफुल्लीत चित्तवृत्ती घेवून काही क्षण थांबले. काही असले तरी ते लतिकाबाईंना सोळा भांडी पाणी, चार वेळा खायला, चहा आणि,जेवण वगैरे देणारचे होते.

काहीतरी आठवल्यासारखे घड्याळात बघत लतिकाबाई असलेल्याच हॉलच्या चक्क खिडकीत आले. समोरची सुवर्णा याचवेळेस केस विंचरायला गॅलरीत यायची. एक दोनदा सहज तिच्याशी बोलल्यानंतर लतिकाबाईंनी वामनरावांच्या खिडकीत उभे राहण्याची टायमिंग्ज ठरवून दिलेली होती. पहाटे चार आणि रात्री बारा!

मात्र आज वामनराव खिडकीचाच गज असल्यासारखे खिडकीला चिकटून उभे राहिले. लतिकाबाईंचा धूर निघत होता. त्यातच खरोखरच समोर सुवर्णा आली आणि मोहक विभ्रम दाखवत केस विंचरू लागली.

" क्काय???? गेले का मिस्टर???? ऑफीसला???"

दचकलेल्या सुवर्णाला आधी तो धक्का पचवावा लागला. वामनराव चक्क खिडकीत आणि इतके जाहीर बोलतायत??

पण शेवटी सोसायटीतला एक आदरणीय व कौटुंबिक पातळीवर शोषण सोसणारा म्हातारा आहे म्हंटल्यावर तिनेही अगदी लाजून वगैरे होकार भरला.

"अधून मधून चहाबिहा पाजत जा... शेजारधर्म आहे तो"

वामनराव एकेक शिखर पादाक्रांत करत होते.

"अय्या या की? केव्हाही या... आत्ता येताय??"

वामनरावांचे हृदय मेलेल्या कोंबडीसारखे उडू लागले. पण इथून तिच्याकडे गेलो तर नेमके तिच्याच शेजारचे राजाभाऊही पचकायचे तिथेच असा विचार करून ते गेले नाहीत.

लतिकाबाईंना आता 'उद्या या वामन्याला सोलतेच' असे वाटत होते.

तेवढ्यात दुसर्‍या खिडकीतून हाक आली.

"काय वामनराव??? आज अगदी खिडकीत??"

राजाभाऊ! राजाभाऊंना पाहून सुवर्ना आत निघून गेली.

"हो म्हंटलं जरा मोसम अनुभवावा... बाहेरचा... येताय काय्???टाकू चार डाव"

पत्ते!

'घरात राहायचंय की पत्ते खेळायचे आहेत' असा प्रश्न एक वर्षापुर्वी लतिकाबाईंनी वामनरावांना चार चौघांसमोर विचारला होता. त्याची आठवण राजाभाऊ आणि वामनराव या दोघांनाही होती.

"वामनराव?? वहिनी कुठे आहेत??"

"क्का??"

"नाही... पत्ते खेळायला बोलवताय म्हणून विचारलं"

"तिचा काय संबंध त्यात?? या तुम्ही"

वामनरावांना आता असली विधाने करताना लतिकाबाईंकडे पाहण्याचेही साहस उरलेले नव्हते. पण ते सुटले होते.

राजाभाऊ गोखले आले.

साडे दहा ते बारा!

दिड तासात पाच कप चहा, चक्क घरात आणि लतिकाबाईंसमोर बसून प्रत्येकी तीन तीन पनामा आणि वाट्टेल ते विनोद प्लस रुपया रुपया लावून पत्ते!

लतिकाबाई संपलेल्या होत्या.

"वामनराव, वहिनी आज अगदी बोलत नाहीयेत?? काय विशेष??"

"हिम्मत आहे का तिची माझ्यासमोर बोलायची??"

राजाभाऊ ही असली विधाने ऐकून दचकून लतिकाबाईंकडे पाहात होते. त्यांना ही दृष्येच पटत नव्हती. पण त्यात ते स्वतःही एक भाग होते.

बारा वाजता सरुबाई आल्या भांडी घासायला.

"जेवणं झाली नाहीयेत अजून... चार वाजता या..."

"च्चार??"

"का?"

"बाई... केव्हा येऊ??"

"ती बोलणार नाही आज... तिला सांगीतलंय मी.. नवर्‍यासमोर अक्षर बोलायचं नाही... "

"तुमच्यातबी असंच असतं??"

वामनरावांना 'नसतं हो सरुबाई, नसतं, काय सांगू तुम्हाला' असे म्हणुन खरे तर टाहो फोडावासा वाटत होता. पण एकदा बाण सुटलेला आहे म्हंटल्यावर समर्थन करत राहणेच योग्य होते.

सरुबाई निघून गेल्या आणि दहा मिनिटांनी राजाभाऊही निघून गेले.

आता एका सोफ्यावर उरलेल्या सहा पनामांपैकी एक पेटवत आणि लवंडत लतिकाबाईंकडे पाहात वामनराव बोलू लागले.

"बघतेस काय? थोबाड फोडीन! मान खाली... मान खाली... तुला जेवायला वाढायला मी काय वाढपीय काय?? आं?? हे मौन आता आयुष्यभर पाळायचं... काय?? "

रिमोट हातात घेऊन त्यांनी टीव्ही ऑन केला. व्हॉल्यूम सहापेक्षा वाढता कामा नये हा लतिकाबाईंचा नियम होता. तो कस्पटासमान लेखून वामनरावांनी व्हॉल्यूम बत्तीसवर नेला. लतिकाबाईंनी कानांवर हात ठेवले तरी हे निवांतच! आयटेम सॉन्ग लागलेले होते. बिडी जलाईले जिगरसे पिया, जिगरमा बडी बात है! बिपाशा बसूच्या महान अदा पाहून पनामा ओढणारे वामनराव उठून उभे राहिले आणि सैफ अली खानसारखे नाचू लागले.

लतिकाबाईंनी समोरचा रिकामा झालेला तांब्या जमीनीवर आपटायला सुरुवात केली. ते पाहून वामनरावांनी 'चूप' असा आवाज केला. प्रथमच त्यांना भेदरून लतिकाबाई गप्प बसल्या.

काही वेळाने वामनराव एक जेवणाचे ताट घेऊन आले आणि लतिकाबाईंसमोर बसून भुरके मारत जेवू लागले.

"पती हा परमेश्वर असतो... त्या मंडळात जाऊन सांग तुझ्या... म्हणाव माझा नवरा नेताजी पालकरचा अवतार आहे.. चळचळा कापते म्हणाव मी त्याच्यापुढे.... काय?? मी आधी जेवणार.. . आणि उरलं सुरलं तर देईन तुला.. खाली बघ??? खाली बघायचं"

भरपेट जेवून मग वामनरावांनी एक ताट लतिकाबाईंसमोर आणून ठेवले.

" मी आता पडतोय जरा.... काय?? दाराकडे लक्ष ठेव... दार उघडंच ठेवतोय.. म्हणजे सरुबाई येऊन भांडी घासून जातील.. आणि मला उठवण्यासाठी तांब्या वगैरे आपटलास तर याद राख... पाणी आणून ठेवलेलं आहे.."

बेडरूमकडे जाताना मागे वळून म्हणाले...

"आणि हो... मला प्रसन्न वातावरण हवं आहे झोपताना.. शांततेचा भंग झाला तर आपल्या विवाहाच्या कराराचाही भंग होईल... "

आयुष्यात पहिल्यांदाच लतिकाबाई इतका धसका घेऊन बघत होत्या.

वामनराव आत जाऊन झोपले तर दहाव्या मिनिटाला बेल वाजली.

अरे तिच्यायला! सेल्सगर्ल??

"अरे??? या या या या या या या... बसा बसा.... बसा इथे... कोण आपण???"

"मी सेल्सगर्ल आहे.. घरात लेडीज आहेत का??"

"ह्या काय बसल्यायत लेडीज??"

"मावशी नमस्कार"

"ती बोलणार नाही... काय ते माझ्याशी बोला.. "

"अं... आम्ही हर्बल प्रॉडक्ट्स विकतो... "

"घेईन ना... नक्की घेईन... तुम्हाला काय चहा वगैरे??"

"नको नको... पाणी देता का?? "

" अहो पाणी काय! पाण्याला कोण नाही म्हणेल?? लिंबू सरबत करू???"

"चा... लेल"

सेल्सगर्ल खुष झालेली पाहिल्यावर वामनरावांनी दोन ग्लास लिंबू सरबत तयार केले आणि परराष्ट्रमंत्री असल्याप्रमाणे थाटात बोलायला सुरुवात केली.

"हं... तर काय काय विकता तुम्ही??"

"अ‍ॅक्च्युअली स्कीन प्रॉडक्ट्स आहेत..."

"हे काय आहे??"

"हे क्रीम आहे... "

"केवढ्याला?? "

"तीस रुपये... "

"पण काय होते याने??"

"फेअर होते स्कीन.."

"फेअर म्हणजे??"

"गोरी... "

"तुमच्याइतकी??? "

तेथे लतिकाबाई असल्याने त्या सेल्सगर्लला तसा मोकळेपणा वाटत होता. त्यामुळे ती दिलखुलास हासली.

"ठीक आहे... हे घेतो मी या लेडीजसाठी... येत जा हं बाळ केव्हाही"

पैसे देताना त्या मुलीला उद्देशून वामनरावांनी 'बाळ' अशी हाक मारल्यामुळे लतिकाबाईंच्या जीवात जीव आला.

तोवर पुन्हा सरुबाई येऊन भांडी घासून गेल्या. आणि पाठोपाठ आम्द्याचा फोन आला. आज मी अभ्यासासाठी मित्राकडेच जाणार आहे आणि उद्या सकाळी येईन!

देदी हमे आजादी बिना मौन बिना ढाल

वामनराव हुरळून शॉवरखालीच उभे राहिले. मनाच्या त्वचेवरची दशकादशकांची उपेक्षेची पुटे त्या जलधारांनी वाहून जात होती.

अर्धा तास नाहून बाहेर येऊन त्यांनी आले घालून चहा केला आणि लतिकाबाईंसमोर पुन्हा एक कप आपटला.

इतका वेळ हा भीषण तमाशा पाहणार्‍या लतिकाबाईंमध्ये एक सूक्ष्म फरक पडलेला त्यांना जाणवलाच नव्हता. लतिकाबाई आता अ‍ॅक्च्युअली घाबरलेल्या होत्या. हा माणूस आणखीन काय करून दाखवतो असे वाटत होते त्यांना!

मात्र त्यातच नुसते बसून बसून त्यांचे अंग अवघडलेले होते. त्या उठायला गेल्या तर उठताच येईना! प्रथम वामनरावांनी थट्ता केली. मग त्यांना खरच उठता येत नाही आहे हे पाहून ते लगबगीने उठले आणि त्यांनि आधार दिला. मग लतिकाबाईंना ते बाथरूमपर्यंत तसेच धरून घेऊन गेले. जाताना बडबडत होतेच!

"एक आपलं कर्तव्य म्हणून हात धरतोय, लगेच लाडात येऊ नकोस... मौनं धरतायत बिनकामाची"

परत येऊन बसताना लतिकाबाई किंचित मुसमुसलेल्या असाव्यात असेही त्यांना वाटले.

त्या काही वेळ पडल्या. त्यानंतर वामनराव फिरायला बाहेर पडले. हू केअर्स? बसेल बायको घरात!

आज वामनरावांनी फिरता फिरता अनेक गोष्टी केल्या. टपरीवर चहा प्यायले, ज्येष्ठ नागरीक संघातील काही जुन्या मित्रांना भेटले, एका ठिकाणी तर चक्क पाणीपुरी खाल्ली, एका बाकावर बसून गर्दी न्याहाळली आणि घटनेत असलेला फिरण्याहा अर्धा तास वाढवत वाढवत दिड तासावर नेला आणि आरामात घरी आले.

येताना बरोबर आणलेली कच्छी डाबेली लतिकाबाईंसमोर आदळली. तांब्यातले पाणी संपलेले पाहून तो पुन्हा भरून ठेवला आणि एक वाइनची बाटली काढली. ही बरेच दिवस तशीच होती. लतिकाबाईंचा एक भाऊ आला होता त्याला माहीतच नव्हते की वामनरावांना 'घ्यायची' परवानगी नाहीच आहे. त्यामुळे तशीच राहिलेली होती.

वामनरावांनी चांगला भला मोठा ग्लास भरून घेतला. लतिकाबाई आताअंगात आलेल्या बाईसारख्या घुमत होत्या रागाने!

गटागटा वाईन पिऊन टाकल्यावर दहा मिनिटांनी वामनरावांना खरीखुरी 'किक' बसली. अगदी वाईनचीही किक बसावी इतकी कमीवेळा घ्यायचे ते!

किक जितकी बसली होती त्यापेक्षा दसपट बसल्याचा अभिनय ते आता करू लागले. साडे सात ही देवाला दिवा लावायची वेळ आज त्यांनी ढकलली पुढे!

वामनराव आता झोपडपट्टी स्टाईलमध्ये लतिकाबाईंसमोर उभे राहून हातवारे करू लागले.

"तुझा बाप... तो थेरडा नाक घासत आला पोरगी पदरात घ्या म्हणत... म्हणून आणली तुला करून... च्यायला माझ्यावरच सव्वाशेर??? आ?? आत्ताच्या आत्ता पाठवून देईन माहेरी! झाली असोत पस्तीस वर्षे! मंडळात जातीय... बंद करून टाकीन ते मंडळ.. घरात नाद घेऊन यायचे नाहीत तिथले... घरात मी करीन तेच नियम..मौनाचा अर्थ काय एकेजागी बसायचे होय?? तुझ्या त्या भगिनीला सांग म्हणाव माझ्या नवर्‍याने सांगीतलंय की मौन स्वतःच्या घरी पाळायचं.. बाकीच्यांना अक्कल शिकवायची नाही मंडळात येऊन! ऊठ??? चल ऊठ आणि जेवायला वाढ"

लतिकाबाई खरच उठल्या. दोन पाने वाढून घेऊन आल्या. जेवणे झाल्यावर त्यांनी कागदावर लिहीले.

"उद्या सकाळी दहा वाजता घरात थांबा... मग बघते तुमच्याकडे"

आणि तो कागद वामनरावांना द्यायला पुन्हा उठल्या तर त्यांचा तोल गेला. वामनरावांनी पटकन उठून त्यांना सावरलं!

त्यांना सोफ्यावर बसवून ग्लुकॉन डी दिलं! मग तो कागद वाचला आणि म्हणाले..

"वेडीयस का तू लतिका?? ही सगळी नाटके होती..माझं प्रेम नसतं तर तुझी आवडती कच्छी डाबेली आणली असती का? तुझ्या चहाच्या आणि खाण्याच्या वेळा पाळल्या असत्या का? बंद कर आता हे मौन! घर म्हणजे बोलायची जागा असते. मनातले बोलायची! एकमेकांना न घाबरायची! एकमेकांना स्वातंत्र्य द्यायची जागा असते घर! ऊठ आणि आत जाऊन पड!"

लतिकाबाई त्यांचा आधार घेऊन उठल्या आणि आतल्या खोलीत जाऊन पडल्या. वामनराव तिथे शेजारी बसले.

आता लतिकाबाईंना कंठ फुटला.

"अहो... एक विचारायचंच राहिलं... "

"काय??"

"तुम्ही... त्या सुवर्णाकडे चहा प्यायला तर गेला नव्हतात ना? इतकावेळ का लागला??"

गुलमोहर: 

अरे वा..............मस्त आहे........४० वर्षे आनि लग्नाची १०-१५ वर्षेझाल्या नंतर चे संवाद.............. Happy

जोरदार! अहो पण चहाचा एव्हढा उल्लेख कि नुसते वाचून आम्हांस पित्त झाले Happy

(सॉरी हं! पुणेरी असल्याने निखळ प्रशंसा आम्हांस पसंत नाही :))

Proud Happy