नर्मदा (जुन्या मायबोलीवरून)

Submitted by दाद on 21 July, 2011 - 22:49

"बायला माझ्या नांद पान्याचाsss
उचिलला हांडा नि गेली पान्यालाsss
गोमू हात लाव गो हांड्याला, लचक भरंल तुज्या कमरंला"

दुपारचे दोनेक वाजलेत. शाळेतून घरी येऊन खाऊन-पिऊन आम्ही उगीच आडवारलोय. खूप खूप आग्रह झाल्याने, घरात कुणी कर्ती पुरुषमाणसं नाहीत असं बघून नर्मदाने नाचायला सुरूवात केली आहे. तिचं छोट्या गिरक्या घेत बाल्या नाचातल्यासारखं, लयीत फिरणारं अंग, अगदी जिथल्या तिथे केल्यासारख्या नाचाच्या मोहक हालचाली. गोर्‍यापान कानात हालणारे कोळणींच्या असतात तशा जाड चांदिच्या रिंगा, एका पायात चांदिचं कडं..... आम्ही ’आ...’ करून बघत रहायचो. "तॉंड मिटा... मासकी जाईल आत. आन, पलाss आब्यासाला न्हाईतर सांजच्याला खेलाला मिलाचं न्हाई"!!

नर्मदा, आमच्याकडे वरकड कामाला येणारी. मला आठवतय तेव्हा तिचं वय असेल पस्तीस-चाळिशीचं वगैरे. अगदी ठुसका म्हणतात तसा छोट्या उंचीचा, पण सुबक बांधा. गोरा रंग. अगदी रेखीव चेहरेपट्टी. एक अंबुडी, कातकरी लोकांसारखं गुढग्यापर्यंतच येणारं काठाचं नऊवारी, कोपराच्या खाली हात येणारी चोळी. कपाळावर भुवईंच्यामध्ये, गोंदवणाचे ठिपके आणि त्यावर एक लाल चिरी. हनुवटीवर असेच ठिपके आणि त्यावर एक "खुदु खुदु" म्हणतात तसलं हसू.
आम्ही मुलं सकाळी उठू, तेव्हा नर्मदा कधीची येऊन कामाला लागलेली असायची. अंगण झाडून स्वयंपाकघरातली चिरणे, कातणे असली काम चालू झालेली असायची.
अगदी लहानपणीसुद्धा माझ्या लक्षात आलेली गोष्ट म्हणजे, नर्मदाच्या सगळ्याच हालचालींना एक प्रकारची लय होती. आता खूप मोठं झाल्यावर लक्षात येतय की एक लयदार चित्र समोर हलत बोलत असल्यासारखं तिचं वावरणं होतं. ओणव्यानं हळूवार केर काढणं, झटके देत फरशी पुसणं, जोरदार झटके देत मोठी मोठी पातळं धुणं आणि वाळत घालणं... सगळच लयदार. नर्मदा कांदे चिरायला बसली की, जाईच्या कळ्यांचा ढीग पडल्यासारखा एकसारखा बारीक कांदा चिरायची. तिचं पीठ मळणंसुद्धा बघण्यासारखं. एक कणही बाहेर न सांडवता सुरेख गोळा तयार व्हायचा. मग त्यातला छोटुकला एक गोळा माझ्या हातावर ठेवून, मान हलवत "कोंबड्यांसनी घालून या, पला, बेगिन" सांगणं व्हायचं.

मला आठवतं ते असं. शनिवारची सकाळ झालेली आहे. "चला चलाss उठाया होवं. निजून चालाचं न्हाईsss. आज शनवार. साळा लवकर सुटनार तुमची. उद्या काय बाय गंमत कराची ते कंदी ठरीवणार? आsss? चला चलाsss. आज आईनं काय ब्येत केलाय येका पोरायन्ला साठी? हंsss... पोल्या... पुर्नाच्या पोल्याsss".
एकदम रविवारची आठवण करून देणारा शनिवार आणायची ती. उठून बसण्याशिवाय गत्यंतरच नसे. आम्ही उठून "तोंडं धून, दुदं पियाला" येईपर्यंत, तिने पुरण वाटायला घेतलेलं असे. दगडी पाट्यावर, हुंकार काढत पुरणाचा पिवळा धम्मक ढीग घालायची. आमच्या हातावर इवलं इवलं ठेवत म्हणायची "बगा बगा, गॉड जालय का?" आणि वळून आईला म्हणायची, "मी निवेद दाकवलाय बरं मालनबाय - तुमच्याबी आदी". माझ्या आईचं मालिनी हे नाव तिच्याइतकं "गॉड" कुणी म्हणत नसावं. आईच्या लग्नाअगोदरपासून नर्मदा आमच्याकडे होती. त्यामुळे आईवर कधी कधी "सासूपणा" गाजवायची ती. पण त्या बरोबरच, आईला जरा बरं नसेल तर, तिची घालमेल व्हायची. तसं आमच्या घरातलं कुणीही आजारी पडली तरी ती अस्वस्थ व्हायची. आपल्या घरची मोहरी आणून आमची नजर आपल्या पद्धतीने कशी ती उतरवणे हा ही एक सोहळा असायचा.

नर्मदाला मूल बाळ नव्हतं. खर तर नर्मदा ही कुणी तरी लग्न न करता "ठेवलेली बाई"! मला हे अनेक अनेक वर्ष माहीत नव्हतं. गरजच नव्हती. त्यामुळे माझ्यामते, आपल्या "नवर्‍याला" एकेरी नावाने हाक मारणारी मला ती एकदम "पुढारलेली" बाई वाटायची त्या वयात. ती त्याला सरळ म्हांदू म्हणायची. आम्हीही म्हादूच म्हणायचो. म्हादूची लग्नाची बायको होती, मुलंही होती दोन, कुठेतरी गावी. नर्मदा चांगली ठसठशीत चिरी लावायची. "माज्या म्हादूची गाडी ष्टेपनीवरच चाललीया" ह्या वाक्याचा मला लहानपणी खरा अर्थच कळायचा नाही. म्हादूकडे सायकल होती त्यामुळे, नर्मदा काहीतरी ईंग्रजीत बोलायचं म्हणुन बोलतेय झालं असं मला वाटायचं.
न शिकलेल्या इतर नवर्‍यांप्रमाणेच म्हादू दारू पिऊन नर्मदाला मारहाणही करायचा. "काय करनार, नशिबात लिवल्यालं काय असल त्ये भोगाया होव. तुमी शिका न्हाईतर म्हांदूसारका नवरा मिलंल" - या एका स्वच्छ भितीने मी शाळेत जायला नाही म्हटलं नाही, कधीही.

घरची सगळी सगळी - अगदी जेवणसुद्धा, कामं करून नर्मदा आमच्याकडे सकाळीच हजर असायची. आमचा नेहमीचा खेळ, नर्मदाला विचारायचं "नर्मदा, काय काय केलंस सकाळपासून?" की हातातलं असेल ते काम ठेवून, हातवारे करत सुरू - "काय सांगू, सक्कालच्या पारी ऊsठलू, दात घाsसलू, पानी भsरलू, चाय केsलू, म्हांदूला चाय दीsलू, कोंबड्या सोsडलू, कवटा गोला केsलू....."
ही परवचा अगदी रोज विचारली तरीही रोज तितक्याच नव्याने आणि तन्मयतेने म्हणून दाखवायची.
नर्मदा अंधश्रद्धाळू म्हणावी, तर तशी होती अन नव्हतीही. श्रद्धा आणि समज यांचं एक मजेशीर मिश्रण होतं तिच्याकडे. शेजारणीच्या, आजारी मुलाला आधी "डागदरा" कडे नेऊन औषध आणेल आणि मग "उतारा" काढून ठेवेल. स्वत:च्या आईच्या वर्षश्राद्धाला ब्राम्हण न बोलावता कोपर्‍यावरच्या मोच्याला बोलावण्याची बुद्धी होती तिच्याकडे. परजासत्येनारायण (प्रजासत्ताकदिन तिच्या भाषेत) आणि स्वातंत्र्यदेवीच्या (स्वातंत्र्यदिन, दुसरं काय?) दिवशी कडकडीत उपास धरणारी मला माहीत असलेली ही एकमेव स्त्री.
"मंग? इकती जवान पोरा, आन आपले म्हात्मा गांदी, न्हेरू, आनी आपले ते हे... कोन कोन ते सगले बंदुकीच्या गोल्या खावान मेले ते? कुनासाठी? आ? आपल्याला सुकाsssनं (इथे का वर मोठे डोळे करून हलवलेली मानेची आरती) चार घास खावान मिलतिल म्हनूनच ना? मंग? एक दिवस जरा काडायचा उपास. मना माहीत हाय. कामान आनी उपासान कुनी मरत नाईत. आपापल्या कर्मान मरतात, सगले. दारू खावान, बीडी खावान....." इथे वेगळच "म्हादू तक्रार" पुराण सुरू होण्याची शक्यता जास्त.

आजूबाजूच्या झोपड्यांमधली पोरं जर उगीच टवाळक्या, किंवा मुलींची छेडछाड करताना दिसली तर, तरा तरा जाऊन त्यांच्या एक कानाखाली ठेवून द्यायला तिने मागे पुढे बघितल नाही. शेजारच्या झोपडीत रहाणारी कुणी सखूबाई आपल्या नव्या सुनेला छळतेय म्हटल्यावर भर सार्वजनिक नळावर पाणी भरताना तिच्या झिंज्या धरण्याची हिम्मत होती नर्मदात. इतकंच नव्हे तर, तिने सुनेला घराबाहेर काढल्यावर, हिने घरात ठेवून घेतली. तिच्या नवर्‍याशी गोड बोलून दुसरीकडे जागा बघायला लावली. आणि एक मूल झाल्यावर दोन घरात गोडीही करून दिली.
निवडणुकीच्या वेळी आपल्या नावाचं कार्ड घेऊन जाऊन पहिल्यांदा मत द्यायची. माझ्या बाबांना विचारून कोण चांगला उमेदवार आहे ह्याचा "व्यवस्थीत" अभ्यास आदल्या दिवशी करून, दुसर्‍यादिवशी "म्हांदूसंगट" नवीन साडी वगैरे नेसून जायची.

नर्मदाला अनेक लोकगीतं यायची तिच्या भाषेतली - म्हणजे वसईकडे वगैरे बोलली जाणारी बाल्या लोकांची बोली भाषा. खूप आग्रह केल्यास, हातातलं काम ठेऊन, घरात कुणी पुरुषमाणूस नाही याची खात्री झाल्यावरच, नाचूनही दाखवायची. तिच्या सगळ्या अंगातच एक लय होती म्हणताना, तिचं जिथल्या तिथे छोटी छोटी पावलं टाकीत मुरडणं सुद्धा अतिशय देखणं होतं. अजूनही मला नर्मदा "दिंड्या मोड गं पोरी, दिंड्याची लांब दोरी" असलं काहीतरी किनर्‍या आवाजात गाता गाता छोट्या छोट्या गिरक्या घेताना नजरेसमोर येते.

थोडं कौतुकाने आणि कधी कधी वैतागानेही, आई स्वयंपाकघरात वावरू द्यायची नाही. आम्ही काम करणार म्हणजे "काम करून ठेवणार" आणि निस्तरायच्या वेळी पळ काढणार. मला आठवतं मी विळीवर खोबरं किसायचा हट्ट धरला. "काही नको, हात धसून का घ्यायचाय! मला आत्ता वेळ नाही तुझ्याजवळ बसून....." वगैरे वगैरे आईचा वैताग चालू होता. इतक्यात नर्मदा आली. "अग्गोss माजी बाय, नारल किसनार म्हनतेss? थांब वाइच".
तिने एक जाडसा फडका बांधला विळीच्या पात्याला आणि शोधून छोट्या नारळाची खोबर्‍याची वाटी दिली, हातात. दाखवलही, कसं बाहेरून आत किसत जायचं ते. शिवाय कौतूक चालूच माझ्या "एकसारख्या" किसण्याचं - "लगीन जाला की नोवरा घालवून देनार न्हाई माज्या बाईला, कश्शीss किसते, कश्शीss किसते हंssss?" एव्हाना माझा उत्साह संपलेला असतो. पण "अर्द्यावर काम टकलात तर म्हंदूसारका अर्धवट नोवरा मिलंल" ह्या धमकीमुळे मी पूर्ण वाटी किसून देते. शिवाय मी किसलेल्या खोबर्‍यातला छोटा वाटा गूळ घालून देण्याची लालूच दाखवल्यावर, सगळा पसारा उचलूनही ठेवते.
नर्मदाकडे लहान मुलांबरोबर वागण्याची एक वेगळीच हातोटी होती. आमच्या घरी आलेल्या माझ्या मावसबहिणीचा तीन वर्षाचा मुलगा, बावरला होता वेगळं ठिकाण, वेगळी माणसं बघून. आईल जाम सोडेना तो. हीss रडारड चालली होती. बिचारी आशाताई आता चार दिवस कसं करायचं म्हणून हतबल होऊन बघत होती. तितक्यात नर्मदाने "चल तुला दोन शिंगांची म्हैस दावते" म्हणून कडेवर मारून नेला सुद्धा. त्यानंतर, चार दिवस तो नर्मदाजवळच होता. तिच्याजवळ झोपला सुद्धा. आशाताई जाताना एखाद्या मोठ्ठ्या मावशीच्या वगैरे पडाव्यात तशा नर्मदाच्या पाया पडून गेली.
असंच एकदा आमच्याकडे कुणी नातेवाईक बाई आपल्या ८ - १० वर्षांच्या दोन मुली घेऊन आल्या होत्या. त्यांनी मुलींना "हे करू नको, ते करू नको" इतकं सांगितलं की, आम्ही घरची मुलंही कंटाळून, दबून गेलो. नर्मदा हातातलं काम ठेऊन आली आणि बाजूला घेऊन त्या बाईंना म्हणाली, "काय करू नका त्ये बेस सांगितल पन काय करा त्ये कुठं सांगितलय अजून?" त्या बाईंचा चेहरा बघण्यासारखा झाला होता.
"तुमचं चालू द्या बोलगाडगं, मी पघते पोरांकडं". त्या दिवशी तिने आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या वेण्या घालायला शिकवलं. दोन तीन तास कसे गेले कळलंच नाही.

म्हादूची बायको पार्वती, मुलं वर्षातून एकदा, दोनदा यायची हिच्याकडे - "म्हमई बगाया". म्हादूच्या बायकोचं माहेरपण नर्मदा करायची. जरा मोठे झाल्यावर आम्ही तिला उगीच "चाव्या" मारायचा प्रयत्न करायचो. "नर्मदा, बघ हो, म्हादू जाईल तुला सोडून तिच्याकडे". त्यानंन्तर एक झणझणीत नाक मुरडणे, एक हात कमरेवर, एक आपल्या घराच्या दिशेला फेकून "होव, तो मस्त जाईल, तिनं ठिवून घ्याया नको? ह्या गाडीला ष्टेपनीच होवी, नायतर डग लागल्यापरीस चालंल". आम्ही थक्क! कसला जबरदस्त आत्मविश्वास होता तिला!

आपलीच मुलं दूर जात असल्यासारखी व्याकूळ व्हायची, नर्मदा सवतीला आणि तिच्या मुलांना निरोप देताना. साधारणपणे एखाद्या दुपारी आमच्या व्हरांड्यात हा निरोपाचा कार्यक्रम चाललेला मला आठवतोय. नर्मदा आणि म्हादूची बायको रडतायत, मुलं नवीन कपडे, खेळणी हातात धरून बावरून बघतायत, म्हादूने एकीला धरून बाजूला करेतो, दुसरी परत मिठी मारून नव्याने सूर धरतेय. एक-दोनदा प्रयत्न करून म्हादू त्यांना पूर्ण रडू देण्यासाठी मुलांना घेऊन स्वस्थपणे झाडाखाली बसायचा विडी फुंकत. इथे यांच्या एकमेकींना सुचना चालू असायच्या, रडता रडता.
"पोरीवर लक्ष ठेव, पार्वतीsss. आत्ता न्हाती धुती व्हईल. उगीच तिकडं गावाकडला पोरगा बगू नगsssस. मी चांगला मिलमधला बगून दीssन हितं. अदुगर शिकूदे पोरीलाsss."
"तुमीबी तब्येतीला जपाsss. काय बाय लागलं तर कलवा. थोड भात धाडते भावाबऊबर गेले की. तुमाला बरं नसतं वोssss, दागदराकडनं शक्तीची विंजेक्शन मारून घ्याss" इथवर नर्मदाने तिला मिठी मारून गळा काढलेला असतो.
"गोंधळ नुसता!!" - असं तेव्हा वाटायचं तेव्हा मला. आता वाटतं किती विलक्षण गुंतागुंतीच्या नात्याची घट्टं वीण बघत होते मी?

मोठ्ठ्या मोठ्ठ्या जोडव्यांचा फरशीवर चट्चट आवाज करीत म्हादूची बायको जायची. मला तो आवाज खूप आवडायचा. पुढे कॉलेजात जायला लागल्यावर, कशा तरी कारणाने मला बक्षीस म्हणून काही पैसे मिळाले. त्यांची मी दोन जोडवी आणली- मोठ्ठी मोठ्ठी, नर्मदासाठी. ती बघून नर्मदाच्या चेहर्‍यावरचे भराभर बदललेले भाव मी अजूनही विसरू शकत नाही. सगळ्यात आधी आश्चर्य, विस्मय. त्यानंतर अपार कौतुक. माझ्या हनुवटीला हात लाऊन तिन गोड मुका घेतल्या सारखं केलं, मग दोन्ही हात माझ्यावरून ओवाळून आपल्या कानशीलावर बोट मोडीत अला-बलाही घेतली. मग झाकोळून आलं ते दु:खं.... अगतिक दु:खं.
"माझी बाय ती. कशी गुनाची हाय बगा, माज्यासाठी आनलीत जोडवी. बाये, मना घालता येनार नाहीत, ती.".
मग परत आपल्या त्या पारिजातकाच्या खुदुखुदु हसण्यात शिरत, "माजा लगीन करनार ना, तवा घालीन होव, तुजी जोडवी. म्हांदूने हानलेलीबी नाय घालनार, तुजीच घालिन होsss".

कुठे शिकता येत हे असं वागणं? कोणती शाळा आहे ज्यात इतकं राजस वागायला शिकते स्त्री?

आपल्या सवतीचा मुलगा घरात ठेवून घेतला, त्याच्या शिक्षणासाठी, नोकरीसाठी खूप मेहनत घेतली नर्मदाने. आणि एक दिवस दारू पिऊन आला तर काठी घेऊन चामडी लोळवलीन त्याची. म्हादूचीही बिशाद नव्हती एक अक्षर बोलण्याची. नर्मदाने आपली शपथ घ्यायला लावली त्याला, आणि आश्चर्य म्हणजे त्या पठ्ठ्याने ती आयुष्यभर पाळली.

तिचं आणि म्हादूचं एकाच गोष्टीवरून वाजायचं - दारू! दाताच्या कण्या करून ती त्याला विनवायची. पण म्हादूने दारू सोडली नाही. हळु हळू नर्मदा थकली, वयाच्या मानाने लवकरच थकली. तिच्या भाषेत "ठकली". काम होईनासं झालं होतं. बाबांनी तिला पेन्शन चालू केलं होतं. येऊन बसायची आमच्याकडे. जमलं तर मदत करायची. नुसते घडी केलेले कपडे पाहून आम्ही ओळखायचो, की आज नर्मदा आली होती. आपल्या सवतीच्या मुलांचं कौतुक सांगत "चायचा कोप" घेऊन बसायची. मीही थोडी मोठी झाले होत्ये. त्याच काळात नर्मदाची "चित्तरकथा" (हा तिचाच शब्द) समजली.
नर्मदाचे आई वडील तिच्या लहानपणीच गेले. मामाकडे वाढली ही अनाथ पोर. मामाने अक्षरश: विकायला आणली तिला मुंबईला. त्या रात्री दारू पिऊन झालेल्या झगड्यात म्हादूने तिला वाचवली आणि घरी आणली. वाघासारखा म्हादू तिच्या पाठिशी उभा राहिला. त्यानंतर मामाने पाठवलेल्या मारेकरी गुंडांबरोबर म्हादू कसा झगडलाय ते सांगताना नर्मदाचे डोळे अपूर्व अभिमानाने लकाकायचे. म्हादूच्या बायकोने तिला कशी काय आपली म्हटली, त्यांचं इतकं सख्य कसं काय हा मात्र एक अगम्यं भाग आहे.

मला आठवतं. अंगारकी चतुर्थीचा दिवस होता. आम्ही भर दुपारचे जेवायला बसणार इतक्यात भेसूर आवाजात रडत, छाती पिटत, अनवाणी पायांनी दोन मैल धावत म्हादू आमच्याकडे आला. "भाऊsss, माजी राणी गेली वोsss, मना सोडून गेली, वोsss". नर्मदा गेले काही दिवस बरीच आजारी होती. आम्ही जाऊन बघून आलो होतो. पण तिची जगण्यावरची इच्छाच संपल्याचं दिसत होतं. आपण गेल्यावर आपल्या मृतदेहाचे सगळे संस्कार भाऊंनी (माझे बाबा) करायचे. कुणी हातही लावायचा नाही अस तिनं म्हादूला, बाबांना आणि घरच्या सगळ्यांना सांगून ठेवलं होतं. आमच्या सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आलं. बाबा हातातला घास सांडून उठले.
एका बाजूला म्हादूची बायको आणि तिची मुलं धाय मोकलून रडत होती. एखाद्या मोठ्या बहिणीचं करावं तसं बाबांनी तिचं सगळ केलं. म्हादूने, बाबांच्या हातात, तिची मी दिलेली नवी कोरी जोडवी ठेवली, तेव्हा बाबाही हलले. आईने आमच्या घरीच तिचे दिवस वगैरे केले. म्हादू आला होता पण त्याचं कशातच लक्ष नव्हतं. म्हादूने दारू सोडली होती. त्याची पार रया गेली. नर्मदानंतर अक्षरश: ३ -४ महिन्यातच म्हादूही गेला. आमचा आमच्या कानावर विश्वास बसेना.

थोडी देव भोळी माझी आई अजून अंगारकी चतुर्थीला नर्मदाचं पान वाढते तुळशीकडे. शनीवारी सकाळी लोळणार्‍या माझ्या लेकाला अंथरुणातून बाहेर काढताना मी रवीवारच्या गोष्टी सुरू करते. अत्यंत अवखळ अशा माझ्या भाच्याला "काय करू नको" पेक्षा "काय कर" ते सांगते माझी वहिनी, आणि "दिंड्या मोड गं..." सारखं काही कानावर पडलं की नर्मदाचं खुदू खुदु हसू आमच्या जिवणीवर खेळू लागतं......

आज विचार करतेय, आपल्या मृतदेहावरचे संस्कार कुणी करायचे ते सांगताना काय मनात असेल तिच्या? आजन्मं मुकलेल्या माहेराकडून करून घ्यायचाय असा एकच एक संस्कार?
छ्छे... थोडी अजून कळायला हवी होती, नर्मदा!

समाप्त.

गुलमोहर: 

किती छान वाटत आहे आज......संगणक सुरु केल्या केल्या...
"दाद" ने रेखाटलेले एक अप्रतिम व्यक्तिचित्रण....
ते माळवा शैली, राजस्थानी, इ. असं काही असतं ना चित्रांमधे तसे
व्यक्तिचित्रणातील एकमेवाद्वितीय...."दादशैली".....
आम्हाला असं काही वाचायला मिळतंय यातच सगळं धन्य धन्य....

सुंदर! तेव्हाही आवडली होतीच.

आता ती साधी माणसं ही टाक. ती सर्वात आवडती आहे माझी Happy

दाद, पुन्हा एकदा सुरेख व्यक्तिचित्रण. जुन्या मायबोलीवर मिसली होती माझ्याकडुन Sad

.........!

अ........प्र...........ति.............म...........!!!!!!!!!!

खूप सुंदर लिहिता तुम्ही........... Happy

दाद, परत एकदा अप्रतिम!!! अफलातुन लिहीतेस तू!!
एका श्वासात वाचल! (लेक म्हणतीये, aai, don't hold your breath! तेव्हा लक्षात आलं)

दाद,

तुमची कथा वाचली आणि डोळ्यातुन पाणी आल नाही अस झालच नाही. व्यक्ती चित्रे लिहावीत तर तुम्हीच.
ही कथा सुध्दा सुटली होती.

वा वा ! कशी दाद द्यायची 'दाद' ला तेच सुचत नाही. सुरेख व्यक्तिचित्रण ! मला नर्मदा दिसली डोळ्यासमोर. नाचताना, खुदुखुदु हसताना, भराभरा काम करतानाची लय जाणवली, गोंदलेल्या हनुवटीवरचे गोंदण दिसले आणि पार्वतीच्या जोडव्यांचा चटचट आवाज ही आला. अप्रतिम !

Pages